25 January, 2017

'सिंह' सध्या काय करतो?


साधारणत: कोणताही नेता राजकारणातून बाहेर जाताना तसं सांगतो किंवा निवडणुका लढण्याचे टाळत त्यातून बाहेर पडत जातो. पण कालपर्यंत आपल्या आक्रमक टीकेने विरोधकांना घायाळ करणारा कुणी नेता जेव्हा अचानक बोलणं बंद करतो आणि हळूहळू मागे सरतो अन् एका बेसावध क्षणी सक्रीय राजकारणातूनच बाहेर पडतो, हे सारं थोडं विचित्र आणि आश्चर्यकारक वाटतं. या फोटोतील माणसाचं असंच काहीसं आहे.

शिरीष पारकर. मनसेचे सरचिटणीस आणि राज ठाकरेंचा कट्टर कार्यकर्ता, ही त्यांची शेवटची ओळख. शेवटची यासाठी म्हटलं कारण गेली चार-एक वर्षे हा नेता कुठेच दिसत नाही. सक्रीय राजकारणातून बाहेर पडल्यानंर कुठल्या कार्यक्रमातही दिसले नाहीत.

शिरीष पारकरांची मला आताच इतकी तीव्र वगैरे आठवण का यावी? असा प्रश्न पडला असेल. तर असंय की, विलेपार्ल्यातले काँग्रेसचे कृष्णा हेगडे भाजपात गेले. मी पार्ल्यात काही वर्षे वास्तव्य केल्याने काही आठवणी जाग्या झाल्या आणि पारकरांची आठवण आली.

शिरीष पारकर. मनसेचे आक्रमक शिलेदार. मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून मुंबईत मनसे ज्यांनी वाढवली, त्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे शिरीष पारकर.

मला आठवतंय, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसे पहिल्यांदा मोठ्या निवडणुकीला सामोरी गेली होती. त्याआधी रेल्वे भरती आंदोलनामुळे मनसे ऐन जोमात होती. राज ठाकरेंची अफाट क्रेझ होती. त्यावेळी मुंबईतून जे मनसेचे नऊ उमेदवार उभे होते, त्या सर्वांचे फोटो निळकंठ खाडीलकरांनी 'नवाकाळ'च्या पहिल्या पानावर अर्धा पान अग्रलेख लिहून छापले होते. आणि जनतेला आवाहन केले होते, की हे नऊ जण जिंकायलाच हवेत. त्या नऊ जणात एक शिरीष पारकर होते.

मतदान झालं. मतमोजणी झाली. मनसेने घवघवीत यश मिळवलं. पण निळकंठ खाडीलकरांनी ज्या नऊ जणांचे फोटो छापून मतदानासठी जनतेला आवाहन केले होते, त्यातील एक जण परभूत झाला होता. तो एक जण म्हणजे शिरीष पारकर. त्यावेळी मतमोजणीच्या दुस-या दिवशी खाडीलकरांनी 'नवाकाळ'मध्येच अग्रलेख लिहिला आणि शिरीष पारकरांचा फोटो छापून मथळा दिला होता, 'गड आला, पण सिंह गेला'

गेले काही दिवस मनसेच्या पहिल्या फळीतील नेते राज ठाकरेंची साथ सोडतायेत. नितीन सरदेसाई राहिलेत कारण ते 'मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर'मध्ये पार्टनर आहेत आणि बाळा नांदगावकर राजना सोडून जाणार नाहीत. कारण नांदगावकर हा माणूस मूळचा निष्ठावंत आहे. पण बाकीचे सोडून जात असताना खाडीलकरांनी उल्लेख केलेला 'सिंह' आठवला.

गड आल्यावरही ज्या सिंहाच्या पराभवामुळे थोडी निराशा झाली, तो 'सिंह' सध्या असतो कुठे? राज ठाकरेंची सावली म्हणून ओळखले जाणारे शिरीष पारकर आता कुठे असतात? काहीच पत्ता नाही.

काही वर्षांपूर्वी पारकर साठ्ये का़लेजच्या पटांगणात सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करायचे, तोही दोन-तीन वर्षांपासून बंद केलाय.

पक्षाला वैचारिक पाया असावा या हेतूने पारकरांनी 'महाराष्ट्र माझा' मासिक सुरु केलं. पार्ल्यातच आॅफिस होतं. प्रवीण धोपट सहसंपादक होते. पण ते मासिकही नंतर नंतर बंद पडलं. त्यानंतर हळूहळू पारकर सगळ्याच गोष्टीतून बाहेर पडत गेले.

वेगवेगळ्या चॅनेलच्या चर्चेत 'ही मनसेची स्टाईल आहे. तुम्ही चूक म्हणा की बरोबर. आम्ही मराठी माणसासाठी मरु आणि मारुही' असं समोरील टेबलावर हात आपटून सांगितल्यावर तितक्याच तत्परतेने हाताची घडी घालून सहभागी वक्त्यांचं बोलणं शांतपणे ऐकणारी मनसेची ही तोफ कुठल्या आरमारात गंजत पडलीय?
सरदेसाई आणि नांदगावकर वगळता मनसेची पहिली फळी पूर्ण रिकामी झाली असताना शिरीष पारकरांची आठवण झाली. कुणाला माहितंय का खाडीलकरांनी वर्णन केलेला हा 'सिंह' सध्या काय करतो? 

19 January, 2017

आठवणीतला प्रवास अन् प्रवासातल्या आठवणी



रुळलेल्या वाटेवरुन न जाता वेगळी वाट चोखाळत पत्रकारिता हे क्षेत्र निवडलं. पंचक्रोशीत आतापर्यंत या क्षेत्रात येण्याचं कुणी धाडस केलं नव्हतं. याला दोन कारण होती. एक म्हणजे- या क्षेत्रात कसं यायचं, पत्राकारितेत येण्यासाठी शिक्षण काय घ्यावं लागतं, याबद्दल मार्गदर्शन करणारं कुणीच नसायचं आणि दुसरं म्हणजे- कुणी मार्गदर्शन केलं तरी नोकरी मिळेल का, नोकरी मिळाली तर नोकरीची हमी आहे का वगैरे प्रश्न आ वासून उभे असायचे. त्यामुळे 'ये अपने बस की बात नहीं' म्हणत सगळेच या क्षेत्रापासून लांब राहायचे.

मला या क्षेत्राची माहिती होती, अशातला भाग नाही. पण ज्यावेळी विलेपार्लेतील म. ल. डहाणूकर काॅलेजसारख्या नामांकित कॉलेजमध्ये कॉमर्स शिकत होतो. त्यावेळी तिथे नाट्य मंडळात काम करत असताना वेगळं क्षेत्र निवडायचं ठरवलं आणि डहाणूकर कॉलेजच्याच समोर असलेल्या साठ्ये कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ मास मीडियाला अॅडमिशन घेतलं. फायनान्शियल बॅकग्राऊंड पाहता खरंतर मोठी रिस्क होती. पण मुंबईत आलोय तर काहीतरी वेगळं करायचंच, हे ठरवलेलं. डॉ. नरेंद्र जाधवांच्या वडिलांनी नाही का त्यांना सांगितलेलं, 'ज्यात जाणार त्यात टॉपला जायचं'. तसंच काहीतरी मी स्वत:लाच सांगितलं.

बीएमएम पूर्ण केलं. शेवटच्या वर्षाला पत्रकारिता निवडून पदवी मिळवली. पण नोकरीचा प्रश्न होताच. तो दिपक करंजीकरांनी सोडवला. अर्थक्रांतीमध्ये अनिल बोकील, दिपक करंजीकर, प्रसन्ना चौधरी, अनिल शिंदे यांसारख्या दिग्गजांसोबत काम करु लागलो. दरम्यान दोन महिने 'सकाळ'मध्येही गेलो. पण नोकरीची शक्यता न दिसल्याने काढता पाय घेतला. कारण महिन्याकाठी पगार महत्त्वाचा होता. नाहीतर मुंबईतनाच काढता पाय घ्यावा लागला असता.

'सकाळ'मध्ये दोन-अडीच महिने काढल्यानंतर पुन्हा अर्थक्रांतीत घुसलो. दिपक करंजीकरांचा सपोर्ट खूप मोठा ठरला.

'सकाळ' सोडल्यानंतर अर्थक्रांतीत पुन्हा काम सुरु केल्यानंतर मीडिया सोडण्याचाच विचार केला. मग 'रुरल डेव्हलपमेंट'चा कोर्स करुन समाजसेवेत पूर्णवेळ देण्याचा विचार मनात डोकावला. मग त्यासाठी धावधाव केली. चर्चगेटला जाऊन निर्मला निकेतनमध्ये चौकशी केली, IGNOU ची अॅडमिशन प्रोसेस शोधली वगैरे वगैरे.

दरम्यान, पनवेल-पेण रस्त्यावरील ताराजवळील युसुफ मेहेरअली सेंटरमध्ये गेलो होतो. जीजी पारेख आणि सुधा वर्देंच्या हस्ते 'बा कुटी'चं उद्घाटन होतं. तेव्हा मदन मराठे, अरुण शिवकर, जीजी, सुधाताई यांसारख्या सेवा दलातील माणसांना समोरासमोर भेटल्यावर आणि त्यांच्याशी बोलल्यावर समाजसेवा क्षेत्रात अॅक्टिव्हली उतरण्याचं ठरलं.

या काळात थोडं डिप्रेशन आलेलं. कारण पत्रकारितेत करिअर करण्याचं मनापासून ठरवलं होतं. पण इथे काहीच निभाव लागत नसल्याचं लक्षात आलं होतं. म्हणून मीडियाचा विचार सोडलेला. तर इकडे युसुफ मेहेरअली सेंटरहून आल्यानंतर समाजसेवेत उतरण्याचं पक्क झालं होतं. आॅक्टोबर महिना होता. म्हटलं आता पुढल्या वर्षीच अॅडमिशन घेऊ. तोपर्यंत अर्थक्रांती कन्टिन्यू करु.

दिवस उलटत गेले. ऑक्टोबर सरला, मागोमाग नोव्हेबरही गेला. डिसेंबरही सरत आला आणि नवीन वर्ष येणार तोच नवीन संधीही समोर आली. एबीपी माझात जाॅब लागला. मीडियाचा विचार डोक्यातून काढून टाकायचा ठरला असला, तरी तो निघणारा नव्हता. कारण याच क्षेत्रात यायचं होतं. कारण इथून अनेक गोष्टींमध्ये काम करु शकतो. मग एबीपीचं काम सुरु केलं.

असा मानसिक चढ-उतारांचा प्रवास आहे. माझाच नव्हे, बीएमएम करुन मीडियात नोकरीच्या आशेने ताटकळत असलेली अनेकजण आजही आहेत. त्यांचाही प्रवास असाच काहीसा आहे. मोठ्या उत्साहाने मुलं-मुली पत्रकारिता करतात. मात्र वास्तवात जॉब मिळत नाहीत. मग डिप्रेशनमध्ये जातात.

कट टू......

आठवडाभरापूर्वी पंचक्रोशीतील जी मंडळी मुंबईत राहतात, त्यांनी छोटासा सत्कार केला. तेव्हा उपस्थितांशी संवादही साधण्याची संधी मिळाली. सात-आठ वाक्य बोलून धन्यवाद म्हणून थांबलो. स्टेजवरुन उतरलो आणि खुर्चीत बसलो. विचार करताना डोळ्यांसमोरुन वरील सर्व प्रवास सरकू लागला.

कार्यक्रमात भाषण करताना गावातील एका दादाने फोटो क्लिक केला. दोनच दिवसांपूर्वी व्हॉट्सअपवर फोटो पाठवला त्याने. म्हटलं शेअर करुया.


दहा-पंधरा ओळी लिहिण्याचं ठरवलं होतं. पण खूपच लांबलचक लिहिलंय. असो. आठवणींचा प्रवास मांडताना आणि प्रवासातल्या आठवणी मांडताना मन हलकं होतं. मग शब्द कितीही वाढत जावो.

तुटलेल्या फांदीला तुटलेल्या मनाने श्रद्धांजली!


आर्ची बसलेली फांदी तुटली. 
फार म्हणजे फार म्हणजे फारच दु:ख झालं.
मनाला तीव्र चटका लागला.
पण मी समजावलं मनाला.
म्हटलं, आता झालं ते झालं.
नियतीच्या मनातलं आपण कसं ओळखणार?
त्या फांदीच्या नशिबातच ते होतं. 
तेव्हा कुठे आसवांनी पॉज घेतला.
पण डोळ्यांच्या कडा पाणवलेल्याच आहेत.

असो.

मला माहितंय, तुमच्यावरही दु:खाचं डोंगर कोसळलंय.
अर्थात त्या फांदीशी नातंही तसं होतं आपलं.
पण आता दु:ख गिळून थोडं सावरुया.
एकमेकांना आधार देऊया.
पुन्हा नव्या दमाने उभं राहूया.
मात्र दु:खातनं सावरलो तरी हलगर्जीपणा नको.

आर्ची-परशा बसलेल्या घोड्याला चारा-पाणी मिळतोय ना?
हैदराबादच्या त्या झोपडपट्टीत चोवीस तास वीज-पाणी मिळतंय ना?
आर्चीच्या ऊसशेतीचं अतिवृष्टीनं नुकसान झालं नाही ना?
बिटरगावचे क्रिकेट सामने सालाबादप्रमाणे सुरुयेत ना?
आर्चीच्या बुलेटमध्ये पेट्रोल आहे ना? 
'थेट शेतात' जाणा-या रस्त्याचे डांबरीकरण झालंय ना?
आणि ती विहीर... त्यात पाणी आहे ना?

असे हाय-लेव्हल-सेन्सिटिव्ह विषय आ वासून आपल्यासमोर उभे आहेत. त्यामुळे अत्यंत हळव्या मनाच्या जनतेला माझं हेच आवाहन आहे की, आता फांदी तुटल्याच्या दु:खातून सावरायला हवं आणि या विषयांकडे लक्ष द्यायला हवं.

हे बघा, मला कळतंय की, फांदीच्या तुटण्याने तुम्हीही आतून-बाहेरुन तुटला असाल. किंबहुना, फांदी तुटण्याच्या घटनेमुळे आपल्या जनतेची काय अवस्था झाली असेल, हे मला कळू शकतं. पण मला खात्री आहे, तुम्ही सावरुन नव्या उमेदीने जगायला सुरुवात कराल.

इथे थांबतो. अधिक बोललो तर अश्रू आवरता येणार नाहीत. शेवटी मीही याच हाय-लेव्हल-सेन्सिटिव्ह समाजाचा घटक आहे. लवकर रडायला येतं ओ.


असो. पुन्हा एकदा तुटलेल्या फांदीला तुटलेल्या मनाने श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो.

राज ठाकरे कुणाशी युती करणार?




मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आलीय. फेब्रुवारीत निवडणुका होणार आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे मिनी-विधानसभा. एखाद्या छोट्या राज्याएवढा अर्थसंकल्प असणारी महापालिका आहे. त्यामुळे अर्थात सर्वच पक्ष जीवाचं रान करतात. त्यात गेली कित्येक वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणूक म्हणजेच सत्ता राखण्याची अन् प्रतिष्ठेची लढाई आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत फार ताकद नसलेल्या भाजपने गेल्या दोन वर्षात प्रचंड मुसंडी मारलीय. सगळीकडेच मोठं यश मिळत असल्याने भाजपने शिवसेनेला टक्कर देण्याची आशा बाळगलीय.

दुसरीकडे मनसे आहेच. गेल्यावेळी मुंबई महापालिकेत 28 नगरसेवकांना निवडून आणणाऱ्या मनसेची यंदा किती नगरसेवक येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण आधीच्या 28 पैकी जवळपास निम्म्या नगरसेवकांनी पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केला आहे. तर तिकडे काँग्रेस-राष्ट्रवादी मुंबई महापालिका स्वबळावर लढत असल्याने त्यातल्या कुणाचीही एकहाती वगैरे सत्ता येणं दुरापस्त गोष्ट. त्यामुळे युती झाली नाही, तर शिवसेना आणि भाजपमध्ये खरी लढत असेल. मात्र, इथे थोडा इंटरेस्टिंग टर्न मिळालाय तो राज ठाकरेंच्या विधानाने.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले, कुणाकडून युतीचा प्रस्ताव आल्यास विचार करु. याचा अर्थ राज ठाकरे यांना स्वबळावर लढण्याचा विश्वास कमकुवत झालाय. तसा होणारच होता. कारण पक्षाची मुंबईतली ताकद कमी झालीय, हे स्पष्ट आहे. त्यामुळे कायम एकला चलो रेच्या आवेशात असलेल्या राज ठाकरे युतीच्या प्रस्तावावर विचार करण्याची मानसिकतेत आले असावे. पण काहीही असो, राज ठाकरेंनी कुणाशीही युती केल्यास मुंबई महापालिकेचं चित्र थोडंफार पालटण्याची चिन्ह आहेत. कारण राज ठाकरेंची ताकद कमी झालीय, असं जरी म्हटलं तरी त्यांनी एखाद्या पक्षाशी युती करणं हे निवडणुकीत अत्यंत प्रभावशाली निर्णय ठरेल.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा आणि एमआयएम असे सहा महत्त्वाचे पक्ष आहेत. खरी लढत यांच्यामध्येच असेल. आता प्रश्न असाय की, राज ठाकरे कुणाशी युती करणार? मात्र, यातले काही प्रश्न आधीच निकाली निघतात. म्हणजे सपा किंवा एमआयएम यांच्याशी राज ठाकरेंची युती करणं, हे कदापी शक्य नाही. काँग्रेससोबतही राज ठाकरे जाणार नाहीत. कारण राज ठाकरेंचं राजकारणच काँग्रेसविरोधी राहिलं आहे. त्यामुळे आता सोबत गेल्यास आगामी निवडणुकांमध्ये फटका बसेल. तर इकडे, राष्ट्रवादीने आधीच स्वबळाची तयारी करत यादीही जाहीर केलीय. त्यामुळे राज ठाकरेंच्या युतीच्या प्रस्तावातून राष्ट्रवादीही बाद झालीय. आता राहिले फक्त दोन पक्ष शिवसेना आणि भाजप. या दोन पक्षांमधील कुणाशी राज ठाकरे युती करणार? चला, काही शक्यता तपासून पाहूया.

शिवसेना
 :
मनसे आणि राज ठाकरे यांच्याशी विचारधारेने अत्यंत जवळचा कोणता पक्ष असेल, तर शिवसेना. राज ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतून झालीय. मराठीचा मुद्दा असो वा पाकिस्तानी कलाकार-खेळाडूंचा किंवा अगदी भाजपविरोधी सूर, प्रत्येक ठिकाणी सेना-मनसेचा सूर जुळतोच. हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे आंदोलनं करत नसली, तरी आंदोलनाचे विषय, मुद्दा आणि भूमिका एकसारखीच असते. त्यामुळे शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव आल्यास राज ठाकरे गंभीरपणे विचार करु शकतात, असं म्हणायला काहीच हरकत नाही.

शिवसेना मनसे युती शक्य
. कारण राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या भाजपच्या लोकप्रियतेखाली चिरडताना दिसतायेत. सगळीकडे मोदी..मोदी...चा गजर सुरुय. मुंबईत कधी नव्हे, ते भाजपच्या सभांना लाखोंची गर्दी पाहायला मिळाली. गुजराती मतं एकगठ्ठा भाजपकडे वळताना दिसतायेत. प्रवीण दरेकरांसारखे मनसेचे मुंबईत मोठमोठे शिलेदार भाजपच्या गोठ्यात जाऊन बसलेत. तर इकडे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्ये भाजपने कामांचा धडाका लावून मतं खेचण्याची तयारी केलीय. त्यामुळे भाजपविरोध आणि मराठी माणूस, अशा दोन मुद्दे पुढे करत शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय, दोन्ही पक्षांना आताच्या घडीला स्वबळापेक्षा आधाराने लढण्याचीच गरज वाटतेय.

शिवसेना मनसे युती अशक्य
. कारण शिवसेना मुंबईतल्या गल्ली-बोळात पसरलेला पक्ष आहे. प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर शिवसेनेचा भगवा झेंडा पाहायला मिळतो. मुंबई म्हणजे शिवसेना, असा गेल्या काही दशकांचं समीकरण आहे. प्रत्येक प्रभागात, वॉर्डात शिवसेनेचे नगरसेवक, उमेदवार निवडणुकीसाठी तयार आहेत. त्यामुळे मनसेशी युती करुन पक्षांतर्गत बंड फोफावेल अशी भीती शिवसेनेला असण्याची शक्यता अधिक आहे. तर तिकडे मनसेच्या नेत्यांनीही महापालिकेच्या लढाईसाठी प्रत्येक वॉर्डात जोरदार तयारी केलीय. त्यामुळे जागावाटपावरुन रणकंदन माजून दोन्ही पक्षात बंडाळी वाढेल आणि याचा थेट फायदा भाजपला होईल. त्यामुळे शिवसेना-मनसेमधील युती कठीण वाटतेय.

भाजप
 : नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय राजकारणाच्या कोणत्याच क्षितिजावर नव्हते, त्यावेळी गुजरातबाहेर त्यांची सर्वात जास्त स्तुती करणारा कुणी असेल, तर ते म्हणजे राज ठाकरे. मोदींच्या गुजरातचा डांगोरा महाराष्ट्रात भाजपपेक्षा राज ठाकरेंनीच जास्त पिटला. त्यामुळे भाजपशी मैत्री व्हायला, हे एक कारण राज ठाकरेंकडे असू शकतं. पण गेली लोकसभा, विधानसभा, नगरपालिका निवडणुकांमध्ये सातत्याने मनसेने भाजपविरोधी निवडणूक लढवलीय आणि प्रत्येक निवडणुकीत मनसेने मोदी, भाजपला टार्गेट केलंय. आता तर मोदी राष्ट्रीय राजकारणात कसे अपयशी ठरले, असेही सांगायला राज ठाकरे मागे पडले नाहीत. तरीही अधून-मधून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार कृष्णकुंजच्या पायऱ्या चढत असतात. त्यामुळे ही शक्यता पडताळून पाहणं गरजेचं आहे.

मनसे भाजप युती शक्य
. कारण
काही दशकं मुंबई महापालिकेत सत्ता असूनही शिवसेनेने मुंबईचा विकास केला नाही, या मुद्द्याला धरुन मनसे भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. मनसे-भाजप युती झालीच, तर विकास हाच मुद्दा असेल. बाकी कोणताही मुद्दा दोन्ही पक्षांकडे सध्यातरी दिसत नाही.

मनसे भाजप युती अशक्य
. कारण मनसेने भाजपशी युती केल्यास, मराठी मतं मनसेच्या विरोधात जाण्याची शक्यता अधिक आहे. नाही म्हटलं तरी मराठी माणसांच्या मनात भाजपविषयी राग आहे. त्यामुळे मनसे भाजपसोबत गेल्यास, याचा फायदा या दोन पक्षांना होण्याऐवजी शिवसेनेला अधिक होईल, असं वाटतंय. दुसरं कारण म्हणजे, राज ठाकरे सातत्याने भाजपविरोधी भूमिका मांडताना दिसतायेत. अगदी काल-परवापर्यंत राज ठाकरेंनी भाजपला झोडपून काढलंय. त्यामुळे त्यांच्यात सख्य जमेल, असं आता तरी काही वाटत नाही.

शेवटी
....

शिवसेना-भाजप युती झाली, तर युतीचा प्रस्ताव आल्यास विचार करेनया राज ठाकरेंच्या मुद्द्याला कसलीही किंमत राहणार नाही. राज ठाकरेंकडे स्वबळाशिवाय कोणताच पर्याय उरणार नाही. त्यामुळे राज ठाकरेंना जरी युती करण्यात स्वारस्य असलं तरी त्यांचं स्वारस्य हे शिवेसेना आणि भाजप यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यामुळे शिवेसना-भाजप युतीबाबत काय निर्णय घेते, याकडे मुंबईकरांसह मनसैनिकांचंही लक्ष लागलं असावं.

06 January, 2017

धावरकुट्या



तथाकथित प्रमाण वगैरे भाषेत लोहार. पण आमच्या गावाकडं धावरकुट्या. शेतीच्या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा अंग. कोयता-विळी पाजवण्यासाठी धावरकुट्याला पर्याय नाही. नितीन मोकल यांच्या पोस्टसोबत गणेश बागल यांनी टिपलेला हा फोटो पाहिला आणि धावरकुट्याची जिंदगी डोळ्यासमोरुन सरकू लागली.

सप्टेंबर महिना उजाडला की पाऊस परतीच्या मार्गाला निघतो. महिना संपेस्तोव निघून जातो अन् लागोलग थंडी येते. हिकडं भाताच्या काड्या हातभर वर आलेल्या असतात. पंधरा-वीस दिसात कोंबड्या पिल्लाचा निवद दाखवून कापणीला सुरुवात केली, तरी चालतंय. असे हे दिवस.

कापणी जवळ आली, मग कोयत्या, विळ्या, कुऱ्हाडी पाजवून घ्यायला पायजे. मग ढोरांशी जाणा-यांची रानावनात, पाणी भरणाऱ्या बायकांची विहिरीवर अन् म्हातारी-कोतारी भर दुपारी कुणाच्यातरी पडवीत बसून तांदूळ निवडताना....सगळीकडे एकच चिंता- ह्यो औंदा धावरकुट्या आला नाय तो. मेला राह्यला कुठं? भाता कापायला झालीत. आता धावरकुट्याला बोलावणं धाडण्याची यळ आली की काय म्हणायची कुणब्यावर?

चर्चांचं फड ठिकठिकाणी सुरु असताना कधीतरी दुपार टळून सूर्य मावळतीला निघताना एक बैलगाडी गावात शिरते. दोन पांढरे शुभ्र बैल, त्यांच्या शिंगांना भगवा रंग, भारदस्त आणि आडदांड...बैलांची मिजास काय! अहाहा!

बैलगाडीत एक छोटंसं बिऱ्हाड. दोन चिमुरड्या पोरी, एक पोरगा, पोरांची माय अन् दस्तुरखुद्द धावरकुट्या. बैलांचा कासरा वढतच म्हणतो, आरं थांब की रं फुकणीच्या. लय जोर कराय लागलाय व्हय. बैल जाग्यास थांबतात. चिमुरड्या बैलगाडीतना उड्या टाकतात, मंग हळूच त्यांची माय उतते. अन् सर्वात शेवटी धावरकुट्या. तेव्हा कुठं बैलांना जरा हायसं वाटतं. डोंगराच्या मध्यावर गाव असल्याने चढणीने आले व्हते. पार कंबरडं मोडलं असावं. त्यात या बिऱ्हाडाचं ओझं.

आडदांड शरीर, चांगला साडेसहा-सात फुटी उंच, कोळश्यानं माखलेला धोतर अन् वर गंजी... धावरकुट्या नाव जरी कानी पडलं तरी हे असं डेळ्यासमोर येतं. त्यात परत त्याची पोरं अन् बायको हायच. दोन पोरी. दोघीबी लहानच. कायम भोंगा सुरुच. पण धावरकुट्याच्या कामात अडथळा नाय. चुकून तापलेल्या निखा-यांकडे सरकल्या तरी धावरकुट्या फक्त पोरींकडे बघायचा, त्याच्या एका भेदक नजरेत पोरी चराचरा थरतरायच्या. पोरगा कामात हुशार व्हता. शाळेचे उंबरठे पाहिले सुद्धा नव्हते. पायाला भिंगरी लाऊन बिऱ्हाड फिरतं. कुठली आलीय शाळा अन् कुठलं काय. पण पोराला जाणीव होती बापाच्या कष्टाची. ऐन थंडीत अंगातना घाम गळेस्तोव ऐरणीवर एकामागोमाग एक हातोडे हाणायचा. त्याची माय बी ह्योच काम करायची.

धावरकुट्याचा बि-हाड असाच या गावातून त्या गावात फिरता. एका ठिकाणी म्हणून नाही. फिरत्या पायांवर पोटांचं चक्र सुरुय, हेही खरंच. पण यातली घुसमट जीवघेणी होती.

तर धावरकुट्या वेशीवरच बैलगाडी थांबवायचा. मग सारा सामानसुमान घेऊन दोन घरं पालटून एका बोळात बसायचा. दोन दिस मग त्याच बोळात मुक्काम. रातच्याला झोपायला फक्त कुणाचीतरी पडवी शोधायचा. बाकी घर उघड्यावरच. निळ्या छताखाली. सुरक्षित. आणि तसंही जिंदगीच उघडी पडलीय, तिथं घर अन् त्या सामानाचं काय घेऊन बसायचं म्हणा.

धावरकुट्या नेहमीच्या जागी थोडा विसावतो न विसावतोय, तोच कोयता, विळी, कुऱ्हाडींची रांग लागते, तर कुणी नवी कोयती उलटी सुलटी करुन पाहत बसतो. गेल्यावेळीपेक्षा विळा-कोयती पाजवण्याचा भाव वाढवला म्हणून हुज्जत घालणारी साळू आक्का आठवतेय. "मेल्या एवढं कमवून कुठं उरावर नेणारेस?" असं म्हणणाऱ्या साळू आक्काला धावरकुट्या काळजाला भिडावं अशा स्वरात म्हणायचा, 'उरावर नेण्याएवढं कमावलं आसतं तर कशाला या तीन पोरास्नी घेऊन गावोगाव हिंडलो असतो गं माय?" मग साळू आक्काही नरमून म्हणायची, "कर...कर... तू काय ऐकायचा नाहीस. रातच्याला पोरांना घरी पाठव. दोन भाक-या देती".. मग धावरकुट्याचं काम पुन्हा सुरु.

दोन दिवसाची वस्ती, पण त्याचं जगणं कळून जायचं. दिवसभर काम करुन रात्री थोडा आराम. तिन्ही पोरांना गावभर हिंडून जेवण गोळा करायला सांगायचा, तेव्हा कुठं रात्रीच्या जेवणाची सोय व्हायची.

धावरकुट्याचं काम तासं-तास उभं राहून पाहायचो. कदाचित तेव्हा तेवढी समज नव्हती म्हणून असेल, धावरकुट्याच्या बायकोच्या सतत पाणावलेल्या डोळ्यांचा अर्थ कळायचा नाही. सोबत जेवताना दगडासारखी कडक भाकरी चावणारी चिमुरडी आठवतायेत. त्याचा पोरगा आमच्यासोबत खेळायला यायचा. दोनच दिस असायचे, पण त्याचा पोरगा आमचा दोस्त झाला होता. रवी त्याचं नाव. एकदा घरी जेवायला नेल्याचंही आठवतंय. रवी भारी दोस्तार होता. हुशार होता. आता कुठं आसल माहित नाय... कदाचित बापासारखंच नशिबाच्या ऐरणीवर हातोडे मारत असेल.

धावरकुट्याचं जिणं हे असं असतंय. सगळीच हेळसांड. जगणंच विस्कळीत. पोरांचं शिक्षण नाही की काही नाही. आता तर शेती करणारेही फार कमी झालेत. त्यामुळे धावरकुट्याच्या हातालाही काम नसतं. जेव्हा काम होतं तेव्हा पोरांना शिकवलं नाही. आताच्या चक्रात पार कोलमडून निघतो हा समाज. घुसमट सारी.

जिंदगीवर किती काळ हातोडा मारणार आहोत, या अनुत्तरीत प्रश्नाशी दिस-रात झगडत आजही धावरकुट्या गावोगाव हिंडतो.

राहुल गांधी, वैयक्तिक टीका, संस्कार वगैरे


आजी आणि बापाची हत्या झाली. दोन्ही हत्येची कारणं वैयक्तिक नव्हती, तर या देशाशी संबंधित होती. आजी आणि बापाची हत्या झाल्यानंतर अर्थातच सुरक्षेचं कवच अधिक कडक केलं जाणार होतं. तसं झालंही. कधी नाव बदलून शिक्षण, तर कधी नाव बदलून नोकरी. स्वत:ची खरी ओळख सांगणं सुद्धा जीवाला धोका होता. स्वत:ची ओळख न सांगता जगणं, हे किती भयानक आहे! इमॅजिन करवत नाही.

राहुल गांधी असेच जगले. लोकांमध्ये बिनदिक्कीतपणे मिसळता येत नव्हतं किंवा कुठेही ख-या ओळखीने जाता येत नव्हतं. बरं या सर्व गोष्टी तुमच्या-आमच्यामुळेच. कारण त्यांच्या जीवाला भीती असण्याची कारणं वैयक्तिक नव्हती, तर या देशाशी संबंधित होती. कदाचित लहानपणापासून सर्वसाधारण मुलांसारखं मुक्तपणे बागडायला मिळालं नाही म्हणून किंवा अत्यंत संवेदनशील स्थितीत जीवन जगल्याने असेल, राहुलना तळागाळात पोहोचता आलं नाही. म्हणून अनेकदा भाषणात-वागण्यात कृत्रिमपणा जाणवतो. पण त्यामागील भावना खरी वाटते. हे राहुल गांधी या व्यक्तीबद्दल बोलतोय. काँग्रेस पक्षाबद्दल नाही.

जीवाला असलेला धोका आजही कमी झालेला नाही. आजही 'आपरेशन ब्ल्यू स्टार'ची भीती कमी झालेली नाही. अशा एकंदरीत भयावह वातावरणात जगणं, हे तुम्ही आम्ही फक्त इमॅजिन करु शकतो. किंवा तेही नाही.

एवढं सारं सांगण्याचा मुद्दा असाय की, उठता-बसता त्यांची खिल्ली उडवणं, राहुल गांधींची 'विनोदी' अशी इमेज तयार करुन ते पसरवणं, यामागे राजकीय हेतू आहे, हे लपून राहिलेलं नाही. मात्र, वैयक्तिक टीका करणा-यांकडे दुर्लक्ष करत राहुल वाटचाल करतायेत. वैयक्तिक टीकांवर ते बोलणंही टाळतात. कारण त्यांच्या दृष्टीने देशाचे प्रश्न महत्त्वाचे असतात. 'कुजक्या मेंदूच्या' लोकांच्या वैयक्तिक टीकेला ते अजिबात महत्त्व देत नाहीत. बरं हे मी नाही, तर तेही अनेकदा सांगतात.

संस्काराची टिमकी मिरवणारे जेव्हा राहुल यांच्यावर दर्जाहीन टीका करतात, तेव्हा हसूच येतं. कारण एकीकडे संस्कृती मिरवायची अन् दुसरीकडे 'खरी संस्कृती' दाखवायची.

जर तुम्हाला राहुल यांची संस्कृती काय आहे, हे पाहायचं असेल तर सहा दिवसांपूर्वीची उत्तर प्रदेशातील सभा आठवा. राहुल भाषणाला उभे राहिले आणि काँग्रेस कार्यकर्ते ओरडू लागले, 'मोदी मुर्दाबाद..मोदी मुर्दाबाद'. राहुल भाषणाच्या सुरुवातीलाच थांबले, 'मोदी मुर्दाबाद' घोषणा देणा-यांकडे रागाने पाहिलं अन् खडसावलं, "ये नारे बंद किजीए I हम काँग्रेस के हैं I हमारी संस्कार में ये नहीं है I हमारी लढाई विचार की है, विचार से ही लढेंगे I".

हे उदाहरण सांगण्याचं कारण असं की, संस्कार मिरवणं वेगळी गोष्ट आहे अन् ते आचरणात आणणं वेगळी गोष्ट आहे.

असो. हे सारं सविस्तर लिहिण्याचं निमित्त असं की, एका फेसबुक मित्राने खालील फोटो शेअर करुन राहुल गांधींची खिल्ली उडवली. तसं खूप जण उडवतात. कारण तो त्यांच्या संस्काराचा भाग असतो. बरं खिल्ली उडवण्यालाही आक्षेप नाही. मात्र, वैयक्तिक पातळीवरची नसावी. एवढंच. कारण राहुल ज्या घराशी नातं सांगतात, त्या घराने देशाला नक्कीच महत्त्वाचं योगदान दिलंय. बाकी बोफोर्स, आणीबाणी, हेराॅल्ड, वेस्टलँड या थेट गांधी घराण्याशी संबंधित प्रकरणांवर मलाही आक्षेप आहेतच. पण म्हणून योगदान काहीच नाही असं म्हणणं आणि नेहरु-गांधी घराण्यावर सरसकट वैयक्तिक टीका करणं, हे योग्य नाही, असं प्रामाणिकपणे वाटतं.

(ता.क. : मागे शरद पवार यांच्यावर नोटाबंदीनंतर लिहिलं होतं. तेव्हा मला 'राष्ट्रवादी'चं लेबल लागलं होतं. आता 'काँग्रेस'चं लागेल, याची खात्री आहे. उद्या मोदींवर लिहिलं की 'भक्त' म्हटलं जाईल, याचीही खात्रीय. पण असो. मी लिहितच राहणार, जे योग्य वाटेल ते.)

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...