साधारणत:
कोणताही नेता राजकारणातून बाहेर जाताना तसं सांगतो किंवा निवडणुका लढण्याचे टाळत
त्यातून बाहेर पडत जातो. पण कालपर्यंत आपल्या आक्रमक टीकेने विरोधकांना घायाळ
करणारा कुणी नेता जेव्हा अचानक बोलणं बंद करतो आणि हळूहळू मागे सरतो अन् एका
बेसावध क्षणी सक्रीय राजकारणातूनच बाहेर पडतो, हे सारं थोडं विचित्र
आणि आश्चर्यकारक वाटतं. या फोटोतील माणसाचं असंच काहीसं आहे.
शिरीष पारकर. मनसेचे सरचिटणीस आणि राज ठाकरेंचा कट्टर कार्यकर्ता, ही त्यांची शेवटची ओळख. शेवटची यासाठी म्हटलं कारण गेली चार-एक वर्षे हा नेता कुठेच दिसत नाही. सक्रीय राजकारणातून बाहेर पडल्यानंर कुठल्या कार्यक्रमातही दिसले नाहीत.
शिरीष पारकरांची मला आताच इतकी तीव्र वगैरे आठवण का यावी? असा प्रश्न पडला असेल. तर असंय की, विलेपार्ल्यातले काँग्रेसचे कृष्णा हेगडे भाजपात गेले. मी पार्ल्यात काही वर्षे वास्तव्य केल्याने काही आठवणी जाग्या झाल्या आणि पारकरांची आठवण आली.
शिरीष पारकर. मनसेचे आक्रमक शिलेदार. मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून मुंबईत मनसे ज्यांनी वाढवली, त्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे शिरीष पारकर.
मला आठवतंय, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसे पहिल्यांदा मोठ्या निवडणुकीला सामोरी गेली होती. त्याआधी रेल्वे भरती आंदोलनामुळे मनसे ऐन जोमात होती. राज ठाकरेंची अफाट क्रेझ होती. त्यावेळी मुंबईतून जे मनसेचे नऊ उमेदवार उभे होते, त्या सर्वांचे फोटो निळकंठ खाडीलकरांनी 'नवाकाळ'च्या पहिल्या पानावर अर्धा पान अग्रलेख लिहून छापले होते. आणि जनतेला आवाहन केले होते, की हे नऊ जण जिंकायलाच हवेत. त्या नऊ जणात एक शिरीष पारकर होते.
मतदान झालं. मतमोजणी झाली. मनसेने घवघवीत यश मिळवलं. पण निळकंठ खाडीलकरांनी ज्या नऊ जणांचे फोटो छापून मतदानासठी जनतेला आवाहन केले होते, त्यातील एक जण परभूत झाला होता. तो एक जण म्हणजे शिरीष पारकर. त्यावेळी मतमोजणीच्या दुस-या दिवशी खाडीलकरांनी 'नवाकाळ'मध्येच अग्रलेख लिहिला आणि शिरीष पारकरांचा फोटो छापून मथळा दिला होता, 'गड आला, पण सिंह गेला'
गेले काही दिवस मनसेच्या पहिल्या फळीतील नेते राज ठाकरेंची साथ सोडतायेत. नितीन सरदेसाई राहिलेत कारण ते 'मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर'मध्ये पार्टनर आहेत आणि बाळा नांदगावकर राजना सोडून जाणार नाहीत. कारण नांदगावकर हा माणूस मूळचा निष्ठावंत आहे. पण बाकीचे सोडून जात असताना खाडीलकरांनी उल्लेख केलेला 'सिंह' आठवला.
गड आल्यावरही ज्या सिंहाच्या पराभवामुळे थोडी निराशा झाली, तो 'सिंह' सध्या असतो कुठे? राज ठाकरेंची सावली म्हणून ओळखले जाणारे शिरीष पारकर आता कुठे असतात? काहीच पत्ता नाही.
काही वर्षांपूर्वी पारकर साठ्ये का़लेजच्या पटांगणात सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करायचे, तोही दोन-तीन वर्षांपासून बंद केलाय.
पक्षाला वैचारिक पाया असावा या हेतूने पारकरांनी 'महाराष्ट्र माझा' मासिक सुरु केलं. पार्ल्यातच आॅफिस होतं. प्रवीण धोपट सहसंपादक होते. पण ते मासिकही नंतर नंतर बंद पडलं. त्यानंतर हळूहळू पारकर सगळ्याच गोष्टीतून बाहेर पडत गेले.
वेगवेगळ्या चॅनेलच्या चर्चेत 'ही मनसेची स्टाईल आहे. तुम्ही चूक म्हणा की बरोबर. आम्ही मराठी माणसासाठी मरु आणि मारुही' असं समोरील टेबलावर हात आपटून सांगितल्यावर तितक्याच तत्परतेने हाताची घडी घालून सहभागी वक्त्यांचं बोलणं शांतपणे ऐकणारी मनसेची ही तोफ कुठल्या आरमारात गंजत पडलीय?
सरदेसाई
आणि नांदगावकर वगळता मनसेची पहिली फळी पूर्ण रिकामी झाली असताना शिरीष पारकरांची
आठवण झाली. कुणाला माहितंय का खाडीलकरांनी वर्णन केलेला हा 'सिंह' सध्या काय करतो?
No comments:
Post a Comment