27 August, 2016

एकाकी आणि लोकाकी काॅम्रेड

सचिन माळीचा 'एकाकी आणि लोकाकी प्रज्ञासूर्य काॅ. शरद पाटील' हे पुस्तक वाचलं. सुरुवातील प्रचंड कंटाळवाणं वाटतं. याचं कारण पुस्तक शरद पाटलांवरचं आणि सचिन त्याचेच अनुभव सांगत बसतो. पण आठ-दहा पानं पुढे सरकल्यावर कळून येतं की, सचिन त्याचे अनुभव का सांगत होता. सचिनच्या जातीअंताच्या लढाईला वैचारिक धार देणारा माणूस म्हणजे काॅ. शरद पाटील.



या पुस्तकात सचिनने शरद पाटलांचं भारतीय विचारविश्वातील महत्त्व अत्यंत योग्य आणि समर्पक शब्दात वर्णन केलंय. दुर्दैवाने समकालानाे काॅ. शरद पाटलांची अजिबात कदर केली नाही. मुळात आपल्या देशाची आणि महराष्ट्राचीच अशी पद्धत आहे की, जिवंतपणी कोणत्याही संतांचा, कलावंताचा आणि ज्ञानवंताचा छळच केला जातो, हे सचिनचं म्हणणं पटतं. काॅ. पाटीलही याला अपवाद ठरले नाहीत.



पद, पैसा आणि पुरस्कारापासून चार हात लांब राहाणारा हा सच्चा काॅम्रेड अखेरच्या काळात भयानकरित्या एकाकी पडला. नातेवाईकांनी घात केल्यावरही काॅ. पाटील खचले नाहीत, वैचारिक स्तरावर तर अनेकदा विरोध सहन करावा लागला, मात्र कुठेही माघार न घेता आपल्या ज्ञानाच्या आधारावर सर्वांनाच उत्तरं देत राहिले.


मार्क्सवाद आणि पोथीवाद या दोन परस्परविरोधी तलवारी एकाच म्यानात ठेवू पाहणा-या कम्युनिस्ट चळवळींच्या म्होरक्यांना काॅ. शरद पाटलांनी कडाडून विरोध केला. मार्क्सवाद भारतातील परिस्थितीनुसार बदलून घ्यायला हवं, असं त्यांनी सांगितलं. किंबहुना, मार्क्सही एकेठिकाणी असंच म्हणालाय.


कम्युनिस्ट जाहिरनाम्याच्या २५ वर्षांनंतर जर्मन आवृत्तीला लिहिलेल्या प्रस्तावनेत मार्क्स म्हणतो- "आम्ही क्रांतीसाठी आवश्यक काही ढोबळ सूत्र देण्याचा प्रयत्न केला आहे. ते अपरिवर्तनीय नाही. त्यामुळे त्या त्या परिस्थितीनुरुप या ढोबळ सूत्रांना सृजनात्मक पद्धतीने लागू केले पाहिजे."


याचा अर्थ मार्क्सचाही विचारांच्या पोथीवादाला विरोध होता. मग तेच तर काॅ. शरद पाटलांनीही मांडलं. पण तरीही त्यांना विरोध झाला. असो.


शरद पाटील यांचा सार्वजनिक जीवनातील प्रवास, वैचारिक संघर्ष इत्यादी जाणून घ्यायचं असल्यास सचिनचं हे छोटेखानी पुस्तक नक्की वाचा.

22 August, 2016

ब्लॉगचं अर्धशतक !

55 ब्लॉग झाले. अर्धशतक पूर्ण केलंय. अजून सुरुवात आहे. पण या अर्धशतकी खेळीत खूप वेगवेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न केला. सर्वच जमलंय अशातला भाग नाही. पण कोणताही प्रकार वर्ज्य मानला नाही. पुस्तक परीक्षणापासून कथालेखनापर्यंत, ललितलेखापासून प्रवासवर्णनापर्यंत आणि विश्लेषणापासू अनुभव आणि आत्मपर लेखांपर्यंत.... बहुतेक विषयांना दुरून स्पर्श करण्याचा प्रयत्न केलाय.

19 फेब्रुवारी 2013 ला 'एक अनावृत्त पत्र' हा पाहिला ब्लॉग लिहिला. त्यानंतर काही दिवस सातत्य होतं लेखनात. मात्र, मध्यंतरी फार बरगळलं. मग गेल्या दीड वर्षांपासून लेखनात अधिक सातत्य आणण्याचा प्रयत्न केलाय. सातत्य नसण्याला दुसरं-तिसरं कारण नसून, माझा आळशीपणा आहे.


पहिला ब्लॉग वाचल्यावर मलाच माझ्या लेखनावर हसू येतं. इतकं वाईट लिहिलंय. पण असो.. ती सुरुवात होती. त्यानंतर प्रत्येक ब्लॉगगणिक लेखनशैली सुधारत गेलीय, असं मला स्वत:ला वाटतंय. कारण 19 फेब्रुवारी 2013 रोजीचा पहिला ब्लॉग आणि काल परवाचा ब्लॉग यात प्रचंड इम्प्रूव्हमेंट झाल्याचं माझं मलाच वाटतंय.

दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या लेखांना अनेक मोठमोठ्या माणसांनी दादही दिली. लेखनाची तारिफ केली. शिवाय, सातत्याने उत्कृष्ट शैलीत ब्लॉग लिहिणाऱ्यांनी मार्गदर्शनही केलंय. अजूनही करत आहेत.

Sachin Parab यांच्या ब्लॉगमधून इन्स्पायर होऊन माझा ब्लॉग सुरु केला. सचिन सरांचं लेखनही प्रचंड आवडतं. त्यानंतर Navnath Sakunde गुरुजींसारखं लिहिण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते काही जमलं नाही. नवनाथ गुरुजी अफाट लिहितात. डेन्जरच. त्यानंतर Praveen Bardapurkar सरांचे ब्लॉग वाचून लेखनाला वेगळं वळण मिळालं. ‪#‎एकरेघ‬सारखा ब्लॉग वाचून लेखनाला संदर्भ दिल्यास ब्लॉग पोस्टचं वजन वाढतं, हे कळलं. लेखन डीपमध्ये कसं लिहायचं हेही 'एक रेघ'मधून कळलं. असे खूप ब्लॉग आहेत. सर्वांचीच नावं इथं घेणं शक्य नाही.

ब्लॉगसंख्या 50 पार केली असली, तरी ही सुरुवात आहे. अजून स्वत:ची अशी लेखनशैली नाही. लेखाचा फ्लो अनेकदा गडबडतो. अनेकदा पूर्णच्या पूर्ण लेखच गंडतो. विशेष म्हणजे, असं लेखन गंडलं, तरी वाचणाऱ्यातले अनेकजण स्वत: काय चुकलंय, हे सांगतात. त्यानुसार ब्लॉगगणिक मी तशी सुधारणा करण्याचा प्रयत्न केलाय.

लेखन करताना वाचन महत्त्वाचं असतं. ते वाढवलंच आहे. शिवाय, अनेक दिग्गज नेहमीच वेगवेगळी पुस्तकं सूचवतात. हे वाच-ते वाच.. असं सांगत असतात. काहीजण थेट पुस्तकचं पुढ्यात आणून ठेवतात. एकंदरीत काय तर, अधिक वाचन केलं तरच लेखनशैली अधिक चांगली होत जाईल. हे मलाही पटतं. कारण अधिक वाचलं, तर नवनवीन शब्द, संदर्भ वगैरे कळत जातील. तरच ते माझ्याही लेखनात येईल. शिवाय, प्रत्येक लेखकाची स्वत:ची एक लेखनशैली असते, तीही वाचनातून कळत जाईल. म्हणून वाचनही वाढवलंय.

सरतेशेवटी तेच...... ही सुरुवात आहे. अजून खूप लिहायचंय. वाचायचंय. ब्लॉग खूप वाचकांपर्यंत पोहोचू लागलं आहे. ब्लॉग अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्यास झुक्यादाद, ट्विटरकर आणि व्हॉट्सअपवाल्यांचा मोठा हातभार लागला आहे. त्यांचेही विशेष आभार!

जे काही तोडकं-मोडकं लिहितो, ते अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचतंय, ते लेखन वाचलं जातंय, त्यावर प्रश्न उपस्थित केले जातायेत, चूक-बरोबर आवर्जून सांगितलं जातंय, याचा अर्थ मी अधिक जबाबदारीने लिहायला हवं. आणि याची मला जाणीव आहे. त्याच जाणीवेतून पुढे लिहित राहीन.
               
ब्लॉग वाचणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार..!!

18 August, 2016

दाद प्रवीण बर्दापूरकरांची...

प्रवीण बर्दापूरकर, माजी संपादक, लोकसत्ता (नागपूर आवृत्ती)


माझ्याच लेखनाला मी कधीच नावं ठेवत नाही. कारण जे काही तोडकं-मोडकं लिहितो, ते माझं असतं. जसं जमतं, जे सूचतं, जे मत असतं, ते ते मांडत जातो. वैयक्तिकरित्या एक माणूस म्हणून आणि ज्या माणसांमधून आलो त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी व्यक्त होतो. किंबहुना, हा एक आणि एकमेव उद्देश माझ्या लेखनाचा आहे.


आतापर्यंत जवळपास 50 हून अधिक ब्लाॅग झाले आहेत. अडीच-तीन वर्षांपूर्वी लिहिलेला पहिला ब्लाॅग आणि आजचा ब्लाॅग यामध्ये मला स्वत:ला प्रचंड सुधारणा जाणवते. दरम्यानच्या काळात लेखनाचे वेगवेगळे प्रकार ट्राय केले. सर्वच जमलंय अशातला भाग नाही. पुस्तक परीक्षण तर पार फसलं. कथालेखनही गंडलंय. गावाकडील प्रसंग, स्वत:चे अनुभव आणि विश्लेषणात्मक लेख, हे प्रकार त्यातल्या त्यात बऱ्यापैकी जमतायेत. बस्स. बाकी बट्याबोळच.


कसंही लिहिलं, तरी फेसबुकवर कमेंट आणि मेसेजमधून किंवा कधी प्रत्यक्षात कुणी भेटला, तर आवर्जून प्रतिक्रिया मिळतात. मात्र, परवा थोडं वेगळंच घडलं. पहिल्यांदाच.


आपलं लेखन अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात असताना, ते लेखन अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीच्या नजरेखालून गेलं. ज्या व्यक्तीने लेखनशैलीवर हक्काने बोलावं, अशा व्यक्तीचा दोन दिवसांपूर्वी फोन आला. ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांचा.


प्रवीण सरांचा स्वत:हून फोन येणं, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. 'डायरी' आणि 'डायरीनंतरच्या नोंदी' वगैरे तुम्ही वाचलं असालच किंवा 'आई'सुद्धा. सर्वच बेस्ट. पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही स्तरावर आदरणीय असलेल्या या व्यक्तीने स्वत:हून मला फोन करणं, यापेक्षा माझ्यासारख्या नवख्या पत्रकारासाठी आनंदाची बाब ती कोणती?


'नगरची निर्भया आणि जातीचा चष्मा' हा लेख वाचल्यानंतर प्रवीण सरांनी फोन करुन लेखनाचा फ्लो, शैली, विषय मांडणी यांवर जवळपास 20 ते 25 मिनिटं चर्चा केली. मार्गदर्शन केलं. बरं तेव्हा वाटलं की, एका लेखापुरतं फोन केला असेल. पण परवा पार्ट टाईम जॉबवरील लेखाबाबतही त्यांनी फोन करुन अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. शिवाय, याआधीच्या ब्लॉगबद्दलही चर्चा केली.


प्रवीण सर वयाची साठी पार आहेत. पत्रकारिता आणि इतर लेखनाचा त्यांना काही दशकांचा अनुभव आहे. त्यामुळे माझ्यासारख्या नवख्या पत्रकारासाठी त्यांच्यासाठी बोलणं म्हणजे खूप काही शिकण्यासारखंच आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेत, दोन्ही वेळेला फोनवरुन त्यांना कित्येक प्रश्न विचारुन त्रास दिला. अर्थात यापुढेही देईनच.


पण भारी वाटलं. प्रवीण बर्दापूरकर यांच्यासारख्या व्यक्तीने स्वत:हून आपल्याला फोन करुन लेखनशैलीबाबत मार्गदर्शन करावं, आपलं कौतुक करावं, ही खूप मोठी गोष्ट आहे. किमान माझ्यासाठी तरी. ठेवणीतले सोन्याचे दागिने कसे असतात, ज्यांची आपण प्रचंड काळजी घेतो. अगदी तसंच प्रवीण सरांची प्रतिक्रियाही माझ्यासाठी ठेवणीतलीच. अशा प्रतिक्रिया जबाबदारीची जाणीव करुन देतात.


धन्यवाद Praveen Bardapurkar सर !!

हुंदक्यांना सावली देणारा कवी : गुलजार


या माझ्या कविता
तुझं चरित्र नसेल
माझं आत्मचरित्रही नसेल


माझ्या कविता
रात्रभर कोसळणाऱ्या पावसाच्या
नोंदी आहेत


कविता वाचणाऱ्याला प्रश्न पडतील
उत्तरे मिळतीलच असेही नाही


पाठमोऱ्या हुंदक्यांना इथे सावली मिळेल
गावची वेस ओलांडण्याची गरज भासणार नाही
एका गावात राहून इतिहास घडू शकतो.

                                  - अरुण शेवते


अरुण शेवतेंनी ज्याप्रकारे त्यांच्या कवितांबद्दल हे वर्णन केलंय. अगदी तसंच वर्णन गुलजार साहेबांच्या कवितांबद्दल करता येईल. 


गुलजारांच्या कविता, गीतं, शायऱ्या हुंदक्यांना सावली देतात.
जगणं मांडतात.
जगवतात.
असंख्य क्षणांची घुसमट व्यक्त करतात.
एकांताला बोलतं करतात.
प्रांतांच्या सीमा गुलजार साहेब तडातड तोडून टाकतात.


‘आँखो को वीसा नहीं लगता’ ही त्यातलीच एक कविता. गुलजारांनी लिहिल्यानंतर प्रांतांच्या सीमाही जिथे धुसर होतात...


आँखों को वीसा नहीं लगता,
सपनो की सरहद नहीं होती
बंद आँखों से रोज़ मैं सरहद पार चला जाता हूँ
मिलने "मेहदी हसन से"
सुनता हूँ उनकी आवाज़ को चोट लगी है
और ग़ज़ल खामोश है सामने बैठी हुई
काँप रहे हैं होंठ ग़ज़ल के फिर भी
उन आँखों का लहजा बदला नहीं
जब कहते हैं...सूख गए हैं हैं फूल
किताबों मेंयार "फ़राज़" भी बिछड़ गए हैं,
शायद मिलने वो ख्वाबों में
बंद आँखों से अक्सर सरहद पार चला जाता हूँ मैं
आँखों को वीजा नहीं लगता
सपनों की सरहद नही होती

                    - गुलजार


वाह! हाच शब्द प्रत्येक गीतानंतर, कवितेनंतर, शायरीनंतर... किंबहुना गुलजार बोलत असताना, त्यांच्या प्रत्येक पूर्णविरामाला ‘वाह’ म्हणावं वाटतं. किंबहुना, ते आपसूक बोललं जातं. गुलजार बोलतात ती कविता होते. त्यांचे शब्द भिडतातच. अगदी नुकतंच समजायला लागलेल्या चिमुकल्यापासून ते शेवटच्या घटका मोजणाऱ्या म्हाताऱ्या-कोताऱ्याला प्रत्येकासाठी गुलजारचे शब्द आधार देतात.


गुलजार साहेबांनी जगण्यातील प्रत्येक प्रसंग मांडलंय. इतकं की, विरहाच्या वेदना कधी अनुभवल्याही नाहीत, अशा माणसालाही गुलजारांची विरहावरील कविता वाचून विरह अनुभवता यावा. शब्दांची ताकद यापेक्षा काय असावी?


खरंच जिंदगी गुलजार है!


अगदी काही वेळापूर्वी दोन ओळी सूचल्या होत्या. त्या ओळींनीच शेवट करतो:


मी मलाच खूपदा भेटतो हल्ली..
मी ‘गुलजार’ खूप ऐकतो हल्ली..

12 August, 2016

लेबलं


: काल बाळासाहेबांचं भाषण ऐकलं रे... कसली ती शब्दफेक.. वाह!
: तू तर बाळासाहेबांचा समर्थक दिसतोयेस. कट्टर शिवसैनिक वाटतं?

: काय पण बोला.. पवारसाहेबांवर कितीही भ्रष्टाचाराचे केले गेले तरी प्रत्येकाला एक मान्य करावेच लागेल की  पवारसाहेबांनी कधीही कुणावरही खालच्या पातळीवर जऊन टीका केली नाही.
: राष्ट्रवादी समर्थक... क्या बात है... अरे तू मराठा आहेस का?

: राज ठाकरेला पण मानलं.. साला कसलं भाषण करतो. समोरच्याला पटवून देतो की त्याला काय म्हणायचंय. बाळासाहेबांचा खरा वारस तोच.
: काय नाय रे.. नुसती पोपटपंची. असल्या नेत्यांना तू कशाला आदर्श मानतोस?

: मोदीला वैचारिक विरोध हा कायमच आहे रे... पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे.
: म्हटलं ना की मी तूलाही एक दिवस नक्की पटतील मोदी.... पटलंच ना.

: कम्युनिस्ट विचारधारा मला इतर सर्व विचारधारांपेक्षा वेगळी आणि न्याय्य वाटते. कालानुसार काही बदल करायलाच हवे. प्रश्नच नाही. पण त्या विचारधारेला सरसकट मारु नये. कम्युनिस्टांचा तिरस्कार करु नये, असे मला मनापासून वाटतं.
: क्रांतिकारकच का तू पण... नव्हे नव्हे कॉम्रेड.

वरील सर्व संवाद वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या माणसांशी वेगवेगळ्या वेळी झालेला आहे. अर्थात यातला म्हणजे मीच. आणि म्हणजे मला भेटलेली माणसं ज्यांच्याशी हा संवाद झाला. वरील संवाद वाचून आपण काय निष्कर्ष काढायचा हे माझ्या सुजाण वाचकांना वेगळं सांगण्याची गरज नाही. तरीही मी आज या लेखात यामागची कारणं काय ती शोधण्याचा प्रयत्न केला आहे. खरंतर असे संवाद माझ्यासारखं आपल्या नेहमीच्या आयुष्यात झाली असतील. कधीतरी तुम्ही च्या जागी असाल किंवा कधीतरी च्या जागी. जसे आपल्याला एखादी माणसं अशी लेबलं लावतात अगदी तसंच कधीतरी आपणही नकळतपणे इतरांना अशी लेबलं चिटकवत असतो. का आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या एखाद्या वाक्यावरुन एका शे-दोनशे वर्षांचा इतिहास असलेल्या विचारधारेत बांधून टाकतो? एखाद्याने केवल एका विशिष्ट मुद्द्यावर एखाद्या नेत्याला/व्यक्तीला, समर्थन दिले तर त्याला आपण त्या नेत्याचा किंवा त्या संबंधित व्यक्तीचा समर्थकच करुन टाकतो. अगदी कट्र-बिट्टर. एखाद्याला त्याच्या कोणत्यातरी एका भूमिकेवरुन, वाक्यावरुन एका विशिष्ट विचारधारेची लेबलं लावली का जातात? आपण सर्व कुणा एका विचारधारेचेच असायला हवे असा अट्टाहास आपल्या समाजात का वाढत चालला आहे? असे अनेक प्रश्न मला माझ्याशी झालेल्या वरील संवादानंतर पडतात.

एखाद्याला एका विशिष्ट विचारात बांधून त्यावर त्या विशिष्ट विचारधारेची लेबलं लावणं हे काही काल परवापासून सुरु झालेलं नाही. आपल्याकडे फार पूर्वीपासूनच लेबलं लावण्याची परंपरा आहे. दुर्दैवाने मागच्या काही वर्षांपासून आणि सध्या हे लेबलं लावण्याच्या प्रकाराचा प्रादुर्भाव वढत चालला आहे. आपण कधीही कोणत्या माणसाला पूर्णपणे न समजून घेता त्याच्या एखाद्या घटनेवरील भूमिकेचा आधार घेत त्याला एखाद्या विचाराधारेत बंदिस्त करुन टाकतो. असे आपण का करतो? तर अनेकदा हे लेबलं लावण्याची आपल्याला गरज भासते कारण समोरील व्यक्तीला एकदा की आपण एखाद्या विचारात बंदिस्त केलं की त्यानंतर त्या व्यक्तीच्या विविध मुद्द्यांवरील भूमिका ठरवायला मोकळे होतो. जेव्हा समोरील व्यक्तीची भूमिका कळत नाही तेव्हा आपण त्या व्यक्तीशी बोलताना, चर्चा करताना किंवा त्याच्याशी काही एक शेअर करत असताना गोंधळतो, त्यामुळे लेबलं लावली जातात. अनेकदा तर एकाच माणसाला आपण अनेक विचारात बांधू पाहतो. एखादा व्यक्ती कामगारांच्या हितावर बोलत असेल तर पटकन त्याला डावा असल्याचं लेबल, कोणी थोडं जागतिकीकरण किंवा परदेशी गुंतवणुकीचं समर्थन केलं की मग उजवा असल्याचा लेबल लागतो. जर आपण तटस्थपणे एखाद्या मुद्द्याचं विश्लेषण केलं तर  आपल्याला  भूमिकाहीन असल्याचा लेबल लागतो. आपण काही प्रातिनिधिक उदाहरणांनीच ते समजून घेऊ.

उदाहरणार्थ- जेव्हा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर इंदिरा गांधी, सोनिया गांधींच्या बाजूने बोलतात तेव्हा आपण त्यांना काँग्रेसी नावाचं लेबल लावून टाकतो व ते पुढे जे काही विचार मांडतात ते त्याच चष्म्यातून मोजू लागतो. आणि त्याच वेळी जेव्हा आपल्याला कुणी सांगतो की केतकर हे नेहरुंना मानणारे आहेत तेव्हा आपण त्यांना नेहरुवादी किंवा नेहरु ज्या विचारधारेचे होत्या त्या उदारमतवाद नावाचं लेबल लावून टाकतो. पण नंतर मग कुणी अजून एक येतो आणि तो जेव्हा आपल्याला सांगतो की कुमार केतकरांनी त्यांच्या सार्वजनीक आयुष्याच्या सुरुवातीला लाल निशाणमध्ये सक्रीय काम केलं आहे, तेव्हा आपण त्यांना तर सरळ सरळ कम्युनिस्ट नावाचं लेबल चिटकवून मोकळे होतो. एवढंच नाही तर ते जेव्हा एका नरेंद्राचा अतं आणि एका नरेंद्राचा उदय हा काही निव्वल योगायोग नाही असे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन बोलतात तेव्हा तर त्यांना मोदीविरोधक नावाचं लेबल लावलं गेलं. मला कुमार केतकरांची बाजू मांडायची आहे वगैरे अशातला भाग नाही तर मला हे दाखवून द्यायचं आहे की आपण एखाद्याला किती दुटप्पी लेबलं लावतो व याधी आपणच लावलेल्या लेबलांना आपण तिलांजली देवून नवीन लेबलं चिटकवत फिरत असतो, हे मला केतकरांचं उदाहरण देऊन सांगायचं आहे.

बरं अशी लेबलं चिटकवूनच ही लोकं थांबत नाहीत तर कधी कधी त्या व्यक्तीवर शारिरीक हल्लाही करण्याच्या घटना आपल्याकडे झालेल्या दिसून येतात. अर्थात त्यांचा युक्तीवाद त्यांना करता आला नाही म्हणून शब्दांऐवजी शस्राची ते निवड करतात. असो.

आपण खूप संकुचित विचारांची आपल्या भोवती एक चौकट आखून घेतली आहे. त्या चौकटीच्या बाहेर आपण पडायला तयार नसतो वा ती चौकट मोडून टाकण्याची आपली मानसिकता नसते. ही चौकट आपण आपल्याला माहित असलेल्या अर्धवट माहितीतून किंवा आपलं ब्रेनवॉशिंग करुन आपल्याला सांगितल्या गेलेल्या विचारातून आखून ठेवतो. उदाहरणार्थ- जेव्हा प्रकाश आंबेडकर म्हणतात की माझा नक्षलवादी चळवळीला पाठिंबा आहे तेव्हा आपण त्यांच्या विधानाची पार्श्वभूमी किंवा त्यांचं म्हणणं ऐकून न घेता त्यांना नक्षलवादी समर्थक किंवा कधी-कधी तर सरळ नक्षलवादी असल्याचं लेबल चिटकवून टाकतो. पण ते घटनेला मानतात व घटनेला मानणारा कुणीही हिंसक असू शकत नाही तसे तेही हिंसक कारवायांना प्रखर विरोध करतात, हे मात्र आपण जाणीवपूर्वक किंवा असं म्हणूया ना की आपण ते सोयीस्करपणे जाणून घेत नाही किंवा माहित असूनही याचा आपण त्यांच्या नक्षलावादाला पाठिंबा असण्याच्या विधानाशी संबंध जोडत नाही. मग यासाठी काय कारणीभूत आहे तर आपलं अर्धवट ज्ञान. उगाच म्हटलं जात नाही की, अर्धवट ज्ञानापेक्षा अज्ञान बरा. असो. आपण प्रकाश आंबेडकरांना एक लेबल लावून टाकतो आणि त्याच लेबलच्या चष्म्यातून पाहत असतो

कधी-कधी आपण एखाद्या गोष्टीवरुन सरळसोट पूर्णच्या पूर्ण व्यक्तीला, विचारधारेला, संस्थेला किंवा पक्षालाच लेबलं लावू पाहतो. अगदी उदाहरणानिशी सांगायचं तर- काही दिवसांपूर्वीची गोष्ट. मी फेसबूकवर एक कम्युनिस्ट कसे तत्त्वाशी एकनिष्ठ असताता अशा आशयाची एक पोस्ट टाकली होती. त्यावर माझ्या एका सन्मानीय मित्रांनी भारतातल्या कम्युनिस्टांनी कशाप्रकारे चुकीच्या निर्णयांना पाठिंबा देऊन आपला दुटप्पीपणा दाखवून दिला वगैरे वगैरे कमेन्ट्स केल्या. ह्या साऱ्या कमेंट्स मला पूर्वग्रहदूषित वाटतात याचं कारण कम्युनिस्ट म्हणजे दुटप्पी, ते विरोध करायचा म्हणून करतात असे पूर्वग्रह अनेकांच्या मनात असतात. त्यावरुनच मला माझ्या फेसबूक पोस्टला अलेल्या काही कमेन्ट्स वाटल्या. मला फक्त एवढंच सांगायचंय की आपण एखाद्या विचारधारेबाबात असे पूर्वग्रह ठेवून न राहता अर्थात ती विचारधाराच तशी असेल तर प्रश्नच उद्भवत नाही मात्र विरोध करायचा म्हणून विरोध करण्याऐवजी खरं काय ते जाणून घेण्याची तसदी आपण का घेत नाही? हेच लागू पडतं राष्ट्रीय संघाबाबात. संघाचे विचारांचा विरोध करत असताना अनेकजण ती विचारधारा कोणत्या पातळीवर चुकीची आहे याचा कधीच अभ्यास करत नाही.

समजायला लागल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपण आपल्याला आवडणाऱ्या-नावडणाऱ्या व्यक्तींना लेबलं लावत फिरत असतो. व्यक्तींनाच काय एखाद्या मुक्या प्राण्यालाही आणि निर्जीव वस्तूलाही लेबलं लावत फिरत असतो. अशी लेबंल लावण्यापेक्षा आपण संबंधित व्यक्ती अथवा अन्य कशाबद्दल पुरेशी माहितीद्वारे बोलायला हवं, असे वाटतं. अशी लेबलं लावून आपण फक्त समोरच्याला एखाद्या विचारात बंदिस्त करत असताना आपण नकळतपणे स्वत:ही एका विशिष्ट विरोधी विचारात बंदिस्त होत असतो, मात्र याकडे आपलं दुर्लक्ष होत असतं.


शेवटी एवढंच वाटतं की एखाद्या व्यक्तीची किमान माहिती मिळाल्याशिवाय, विशिष्ट विचारधारेचा अभ्यास केल्याशिवाय आपण त्याबद्दलचं मत बनवणं बंद केलं पाहिजे. 

पूर्वप्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, पुणे (संपादक- डॉ. अभिजित वैद्य)

10 August, 2016

आदरणीय (?) शोभाबाई!



आदरणीय (?) शोभाबाई,

खरंतर तुमचं एकही पुस्तक मी आजतागायत वाचलं नाहीय. मला इंग्रजी फार जमत नाही आणि पेज थ्री कल्चरबद्दल वगैरे लिहिता, असं ऐकलं. त्यामुळे तसंही तुमच्या लेखनाला कधी स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला नाही. असो. तरीही हे पत्र तुम्हाला लिहितोय. पत्रकारितेतला नवखा पोरगा आहे. त्यामुळे चुकभूल द्यावी-घ्यावी.

परवा तुमच्याशी संबंधित बातमी करत होतो. आता बातमी काय असेल, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण हल्ली तुमच्या बातम्या अशाच प्रकारच्या होतात. अर्थात- वादग्रस्त विधानांच्या. आणि आताही तसाच विषय आहे- ऑलिम्पिक खेळाडूंच्या खिल्ली उडवण्याची. तर बातमी करताना तुमच्या नावापुढे 'सुप्रसिद्ध लेखिका' अशी बिरुदावली अभिमनाने लावली आणि बॅलन्स बातमी केली. खरंतर मनात तुमच्या विधानाबाबत प्रचंड राग होता. पण बातमीत तो उतरु दिलं नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार वगैरे आठवलं. आणि बातमी तटस्थपणेच केली.

शोभाबाई, या पत्रातून मी माझं मत मांडणार आहे. ते तटस्थ वगैरे आहे की नाही, हे मला माहीत नाही. कारण हे पत्र वैयक्तिक आहे. या देशातील क्रीडाप्रेमी म्हणून आणि देशाचा नागरिक म्हणून थोडं तुमच्या थोबाडावर चार शब्द फेकणार आहे.

थेट मुद्द्याकडेच येतो. उगाच वेडीवाकडी वळणं नको. तुम्हाला फार वेळ नसेल वाचायला. इतर ट्वीट्स करायचे असतील. आणखी कुणाचे अपमान करायचे असतील.

तर शोभाबाई, खरंतर तुमच्याबद्दल प्रचंड आदर होता. कारण आपल्या कलेतून ज्या माणसाने आमच्या महाराष्ट्राची ओळख देशासह जगभरात निर्माण केली, त्या आदरणीय दिवंगत गौतम राजाध्यक्षांच्या घराशी तुम्ही नातं सांगाता. तुम्ही मूळच्या मराठी आहात म्हणूनही वेगळा अभिमान होताच. हो.. हे सारं होतं यातच मोडतं. किंबहुना तुम्ही ते मोडायला भाग पाडलत.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे गोष्टी आहेतच. त्या नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. किंबहुना, मी तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रखर समर्थक आहे. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे, सातासमुद्रापलिकडे जाऊन देशाची मान उंचावण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्यांचा अपमान करणं नाही. (अर्थात, तुमच्या ट्वीट्सना आलेल्या रिप्लायवरुन हे एव्हाना कळलंच असेल.)

शोभाबाई, तुम्ही भारतीय संस्कृतीचे दाखले आपल्या लेखानातून कायम देता, असं ऐकलंय. पेज थ्री कल्चरचं भारतीय जीवनाशी आलेला संबंध वगैरे मांडता, असंही ऐकलंय. (तुमच्या लेखनाबद्दल फक्त ऐकलंयच. वाचलं नाही, हे प्रामाणिकपणे नमूद करतो. आणि यापुढे वाचावं, असंही वाटत नाही. असो) पण गेल्या काही दिवसांपासून तुमची वादग्रस्त विधानं पाहता, तुमच्या कल्चरवरही आम्हाला बोलावं लागेल, असं दिसतंय. एक सांगू का शोभाबाई, विकिपीडियावर मराठीत तुमच्याबद्दल मोजून 10 ओळी आहेत. भारतीय लेखिका म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहात. त्यातही मराठीशी नातं सांगता. त्याच मराठीत तुमच्याबद्दल 10 ओळींपेक्षा जास्त माहिती नाही. (एकदा विकिपीडिया सर्च करुन बघा. मग कळेल.) यातच तुमची विधानं किती गांभीर्यानं घ्यावी, असाही प्रश्न पडतोच. पण तरीही एका सर्कलमध्ये, तुमच्या मताला किंमतही आहे. म्हणून हा नको असलेला आणि मनाविरुद्धचा पत्रप्रपंच.



आता तुमच्या ट्वीटकडे येतो. “Goal of Team India at the Olympics: Rio jao. Selfies lo. Khaali haat wapas aao. What a waste of money and opportunity.” हे तुमचं ट्वीट. कुणाबद्दल केलंय? तर घरदार सोडून, अफाट मेहनत करुन, जीवाची बाजी लावून, घाम गाळून, सातासमुद्रापलिकडे फक्त आणि फक्त भारताचा तिरंगा डौलाने फडकला जावा, या एक आणि एकमेव उद्देशाने गेलेल्या माझ्या भारतीय खेळाडूंबद्दल. या ट्वीटनंतर कुणा भारतीयाला राग येणार नाही? अर्थात, राग कसा आला हे ट्वीट्सला मिळालेल्या रिप्लायवरुन कळलंच असेल. आयुष्याचे वाभाडे काढणारे रिप्लाय आलेत तुमच्या ट्वीटला. वाचले असालच. किंवा अशा रिप्लायना भावही देत नसाल, म्हणून कदाचित वारंवार वादग्रस्त विधानं करण्याची सवय जडली असावी. पण एकदा वाचा.. मग कळेल आपण काय आणि कुणाबद्दल बोलतो आहोत.

शोभाबाई, तुम्हाला दत्तू भोकनळ माहितंय? कसलं घंटा माहित असेल? नसेलच माहित. असतं तर असं ट्वीट करण्याआधी जनाचीव नाही, पण मनाची तरी लाज वाटली असती. सेल्फी काढण्यासाठी सातासमुद्रापलिकडे गेलेत, असं तुम्ही म्हणाला नसतात. अहो शोभाबाई, या दत्तू भोकनळची आई अंथरुणाला खिळलीय. त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत. म्हणून राहतं घर विकण्याची वेळ येऊन ठेपलीय. तरी हा पट्ट्या, फक्त आणि फक्त ऑलिम्पिकसारख्या जागतिक क्रीडा स्पर्धेत तिरंगा फडकवावा, या ध्येयाने झपाटलाय. अर्थात, तुम्हाला हे सारं कळणार नाही. कारण तुम्ही कधी दत्तू भोकनळच्या किंवा त्याच्यासारख्या खेळाडूंच्या घरी कधी गेलातच नसाल. काय मेहनत करुन ते इथवर पोहोचलेले असतात, हे तुमच्या गावीही नसेल, म्हणून कदाचित तुम्ही सेल्फी काढायला गेल्याचं बोलता.

अभिनव बिंद्रा, विश्वनाथ आनंद किंवा इतर खेळाडूंमुळे भारताची ओळख जगात काय आहे, ही तुम्हालाही माहित असेलच. कारण बारा गावं फिरण्याची तुम्हाला आमच्यासारख्यांपेक्षा जास्त आवड आहे.

आमचे खेळाडू ऑलिम्पिकमधून पदक आणो अगर न आणो... त्यांचा अभिमान आम्हाला कायम राहील. कारण यातला हर एक जण अफाट मेहनतीने तिथवर पोहोचलाय. त्यामुळे त्यांनी केलेल्या मेहनीचा आम्हाला प्रचंड आदर आहे. तुमच्या प्रमाणपत्रांची किंचितही गरज नाही.

आणि हो शोभाबाई, हे पत्र लिहिताना प्रचंड संताप मनात होता. पण त्या संतापाला आवर घातला. थोडं उघडपणे लिहायचं म्हटलं असतं, तर यातल्या प्रत्येक वाक्याची सुरुवात आणि शेवट शिवीने करणार होतो. पण लिटरली त्या वेलकममधील नाना पाटेकरसारखं कंट्रोल कंट्रोल म्हणत पत्र लिहिलंय. नाहीतर आई-वडिलांचा उद्धार करण्याचंच ठरवलेलं. पण तुम्हाला दिलेल्या शिव्या, या अप्रत्यक्षपणे आमच्या गौतम राजाध्यक्षांनाही लागतील. म्हणून स्वत:वर नियंत्रण ठेवलं. असो.  

तर सरतेशेवटी, आदरणीय शोभाबाई डे आणि तत्सम मंडळी, खेळाडूंना पाठिंबा द्यायचा नसेल तर तोंड आवरा. उरला-सुरला आदर घालवू नका.

धन्यवाद!

08 August, 2016

पार्ट टाईम जॉब (भाग 1) : वडापावची गाडी



दहावीपर्यंत गावी शिकलो. पुढील शिक्षणासाठी मुंबईला यायचं, हे आधीच ठरलेलं. मुंबईत कुठं राहायचं, काय खायचं, कसं राहायचं, हा नंतरचा प्रश्न होता. पण शिकायचं मुंबईतच, हे पक्क होतं. तस्सच झालं. दहावी झालो आणि मुंबईत आलो. काकांच्या येथे राहण्याची व्यवस्था झाली. खाणं-पिणं सर्व तिथेच. त्यांच्या घरातला एक सदस्य बनून राहिलो. विलेपार्लेतील आंबेवडीतील झोपडपट्टीत. ते नाही विमानतळाशेजारी आहे. तेच. पण इथे राहून शिकायचं, तर कामही करावं लागणार. कारण हातात पैसा असल्याशिवाय इथे पानही हालत नाही. त्यात कॉलेज वगैरे होतंच. मग अर्धवेळ नोकरी करण्याचं ठरवलं. मुंबईत या संकल्पनेला पार्ट टाईम जॉब असं प्रतिष्ठित शब्द आहे. काम कोणतंही असो, पार्ट टाईम जॉब करतोय म्हटलं की, त्याला एक वेगळाच स्टँडर्ड यायचा. असो. तर म्हटलं पैसा आवश्यक आहे. पावलोपावली खर्च वाढतोय. किमान वरखर्चाचे तरी पैसे आपण जमा केले पाहिजेत. मग आयुष्यातील आणि मुंबईतलाही जॉब सुरु केला- वडापाव विकण्याचा.

तुम्ही कधी मुंबईत आला आहात का? आला असाल, तर तुम्हाला आता सांगेन, ते ठिकाण कळेल. ते म्हणजे- अंधेरीहून दादरच्या म्हणजेच शहराच्या दिशेने निघालो की, अंधेरी सोडताच उजव्या बाजूला एक भली मोठी झोपडपट्टी लागते. विमानतळाला वेढा घातलेली. याच झोपडपट्टीतून मुंबईनगरीच्या प्रवासाची सुरुवात केली. इथे संभाजीनगर आणि आंबेवाडी अशा दोन झोपडपट्ट्या एकमेकांशेजारी आहेत. त्यातल्या आंबेवाडीत काकांच्या घरी मी राहत असे. आणि शेजारील संभाजीनगर झोपडपट्टीत, मात्र हायवेशेजारी एका वडापावच्या दुकानात कामाला जात असे. आता विमानतळाच्या उन्नत मार्गासाठी इथल्या झोपडपट्ट्या हलवल्या गेल्यात. पण काही झोपड्या अजूनही आहेत.

तर संभाजीनगरमध्ये अगदी हायवेशेजारी एक वडापावचं दुकान आहे. आजही आहे. तुम्ही अंधेरीहून शहराच्या दिशेने निघालात की, ते उजव्या हाताला दिसतं. अगदी रस्त्याच्या कडेलाच आहे. (बरं, तुम्ही तिथे कधी गेलात, तर माझं नाव सांगून वडापाव खाऊही शकता. वडापावही चविष्ट आहे.) तिथे बने आडनावाची ताई आहे. तिचं ते दुकान. नवरा वारला. मग आता काय करायचं म्हणून आठ-दहा वर्षांपूर्वी तिने हे दुकान उघडलं. ती मूळची रत्नागिरीची. तर काकाचं कुटुंब जवळपास 30-35 वर्षे मुंबईत राहत होतं. त्यामुळे त्यांच्या ओळखीने मी त्या वडापावच्या दुकानात कामाला लागलो.

काम काय तर पाव अर्धे तोडायचे, त्यात तिखट, गोड आणि सुकी चटणी लावायची आणि वडा ठेवून गिऱ्हाईकांना द्यायचं. कटलेट असेल, तर तो व्यवस्थीत चार तुकड्यांमध्ये कापून, त्यावर चटणी टाकून द्यायचं. पार्सल असेल, तर ते नीट कागदात बांधून द्यायचं. बस्स. संध्याकाळी 6 ते रात्री 9.30 पर्यंत काम. पगार 450 रुपये. आयुष्यातील पहिला पगार घेतला तो याच वडापावच्या गाडीवर. जवळपास 10-11 महिने इथे काम केलं. सुरुवातीला 450 रुपये असलेला पगार तीन-चार महिन्यांनी थेट 800 रुपये झाला. कॉलेजमधील वरखर्चासाठी एवढे पैसे खूप व्हायचे. पुढे कॉलेजचा खर्च वाढला म्हणून दुसरा चांगला जॉब बघितला आणि 10-11 महिन्याने वडापावच्या गाडीवर जाणं सोडून दिलं.

इथे काम करतानाचा एक किस्सा आठवतोय. लय भारी आहे. पण त्यातून खूप शिकलो. त्याचा पुढे उपयोगही झाला. अजूनही होतोय. तर झालं असं होतं की-  इथे काम करत असताना मी डहाणूकर कॉलेजला शिकायला होतो. अकरावीत. खरंतर मुंबईच माझ्यासाठी नवीन होती. त्यामुळे ओळखीचे असे फार कुणी नव्हते. किंबहुना नव्हतेच. म्हणून वडापावच्या गाडीवर काम करायला कसलीच लाज वाटायची नाही. मात्र, कॉलेज सुरु झालं आणि आजूबाजूचे काहीजण ओळखीचे झाले. त्यात डहाणूकर कॉलेज पार्ले टिळक असोसिएशनचं. त्यामुळे पार्ले टिळकची अनेक मुलं डहाणूकरमध्ये अकरावीला होती. आणि पार्ले टिळकला अधिकाधिक मुलं-मुली विलेपार्ले, अंधेरी पूर्व भागातीलच. त्यामुळे सहाजिक मी जिथे वडापाव विकायला जायचो, त्या भागातही काही मुलं-मुली राहत होते.

कॉलेज सुरु झाल्यावर सुरुवातील कुणी ओळखीत नव्हतं. त्यात मी गावाकडून आल्याने शांत असायचो. सर्व मुलं मागच्या बेन्चवर बसण्यासाठी धावाधाव करायचे आणि मी पहिल्या. अगदीच हुशार वगैरे नव्हतो. तसा असण्याचं काही कारणही नव्हतं. कारण गावाल दहावीपर्यंत मराठीतून शिकून आलेलो आणि इथे हे कॉमर्सचं सर्व इंग्रजीत. काहीच कळत नव्हतं. म्हणून पहिल्या बेन्चवर बसून समजून घ्यायचो. अर्थात पुढे काही कॉमर्सही माझ्याने झेपलं नाही. म्हणून नाट्यमंडळात गेलो आणि अखेर बारावीनंतर स्ट्रिम चेंज केली आणि थेट समोरच असलेल्या साठ्ये कॉलेजमध्ये पत्रकारितेला प्रवेश घेतला. असो.

तर डहाणूकरमध्ये सुरुवातील एक महिना वगैरे कुणी ओळखीचं नव्हतं. पण नंतर ओळख व्हायला लागली. झाली. यातच जिथे वडापावच्या दुकानात कामाला होतो, तिथली मुलगी माझ्याच वर्गात होती. तेजस्वी नार्वेकर. कॉलेज चार-पाच वाजता सुटायचं. मग घरी जाऊन, थोडं फ्रेश होऊन, चहा प्यायल्यावर दुकानात जात असे. तेव्हा एकदा तेजस्वी वडा-पाव न्यायला आली होती, तेव्हा वडापावच्या दुकानाची जी मालकीन होती, त्या ताईला म्हटलं, ताई, मी आलोच पटकन. पाच मिनिटांत येतो.असे म्हणत तेवढ्यापुरती वेळ मारुन नेली.

खरंतर तिथून जाण्याची किंवा तेजस्वी आली म्हणून जाण्याची काहीच गरज नव्हती. कारण मी काही चुकीचं काम करत नव्हतो. पण तरीही वाटायचं की, हिला कळलं समजा की, मी वडापावच्या गाडीवर काम करतो, तर ती कॉलेजमध्ये सर्वांना सांगेल. म्हणून थोडी मनात भीती होती. कारण कुणाला कळलं की, मग विचारणार वगैरे. मग नको असलेली ती सहानुभूती.

अखेर त्या दिवशी तेजस्वीला टाळलं. पण एक दिवस खूप कामात होतो. कुणीतरी दहा-बारा वडापाव न्यायला आला होता. मग त्याचं पार्सल बांधणं सुरु होतं. तेवढ्यात तेजस्वी आली आणि मी तिला दिसलो. मग दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यावर, वाटलं की हिने सांगितलं असणार. पण तिने कुणालाच नव्हतं सांगितलं. फार बरं वाटलं. आपण वडापावच्या दुकानात काम करतो, हे कुणाला कळायला नको, असंच सारखं वाटायचं.

एक दिवस पेपर आणायला हायवेच्या पलिकडे गेलो. संत जनाबाई रोडवर. पार्ल्यातील हा प्रसिद्ध रोड आहे. अभिनेते मकरंद देशपांडे आणि अभिनेता केतन क्षीरसागर वगैरे राहतात या रस्त्यावर. किंबहुना मकरंद देशपांडे राहतात, त्या बिल्डिंगसमोरच्याच पेपर स्टॉलवर पेपर आणायला गेलो. वाचनाची आवड होतीच. जरी कॉमर्सला होतो तरी. त्यामुळे नेहमी पेपर आणायला जात असल्याने तिथले पेपरवाले ओळखीचे झाले होते. गणपत जाधव त्यांचं नाव. आता त्यांनी पेपरस्टॉल बंद केलाय. आता ते तिथे नसतात. ते मूळचे चिपळूणचे. म्हणजे तसे गाववालेच. कोकणातले म्हटल्यावर. म्हणून त्यांच्याशी अधिक ओळख झाली. तर एके दिवशी जस्ट मी त्यांच्याशी बोलता-बोलता शेअर केलं की, वडापावच्या दुकानात काम करतो. पण तिथे वर्गातील काही मुलं-मुली राहतात. लाज वाटते. कॉलेजमध्ये सांगतील वगैरे.

त्यावर जाधव म्हणाले. (ते वयाने साठीत होते. पण मी त्यांना काका वगैरे बोलत नसे. जाधवच म्हणे. फक्त आदराने. अरे-तुरे नाही.) तर जाधव म्हणाले, आतापर्यंत वडापावच्या गाडीवर किती चोरी केलीस?”
मी- अहो चोरी काय? मी चोरी नाही करत. वडापाव विकायला जातो तिथे. ती ताई रीतसर पगार देते मला.
जाधव- छे! चोरी केलीसच असशील.
मी- नाही ओ. चोरी वगैरे नाही करत. तुम्ही असे का बोलता आहात?
जाधव- मग तिथे कुठल्या पोरीला छेडलंस?
मी- अहो, काय बोलताय? पोरीला का छेडू? कामाला जातो मी तिथे..
जाधव- बरं.. म्हणजे तू चोरी नाही करत, कुठलं गैरकाम करत नाहीस....असं तुला म्हणायचंय?
मी- अर्थात. हो... माझ्या आईने मला चोऱ्यामाऱ्या करायला नाही शिकवलं.
जाधव- गाढवा, एवढं कळतं ना तुला? मग का लाज वाटते तुला काम करायची? मेहनत करतोस. मग लाजायचं का? तू कुठल्या देशीदारुच्या दुकानात कामाला नाहीस. वडापाव विकून पगार घेतोस. तिथे कॉलेजची पोरं येवो नाहीतर आणखी कुठली.. मेहनत करताना लाजायचं असेल, तर एक सांगतो, मुंबई सोडून गावी जा परत. कारण मेहनतीला लाजणाऱ्याच्या गांडीवर लाथ मारते ही मुंबई...

मी निशब्द झालो. जाधवांना काय सांगायचं होतं, हे मला कळलं. आपण आपल्या मेहनतीचा आदर केला पाहिजे. तेव्हापासून वडापाव विकताना कसलीही लाज वाटली नाही. जाधवांनी सांगितलेलं वाक्य नी वाक्य पटलं होतं. जाधवांकडून पुढेही खूप शिकायला मिळालं. या माणसाचं आणखी महत्त्व आहे माझ्या आयुष्यात, ते या ब्लॉग सीरीजच्या पुढील भागात लिहिणारच आहे.

आता जाधव बहुतेक विरारला राहतात. गेली दोन-एक वर्षे कुठे दिसले नाहीत. त्यांनी पेपरचा धंदाही सोडलाय. एकुलता एक पोरगा दारु पितो. बायको कायम आजारी. जाधव एकटेच कमावते. साठी पार केल्यानंतरही जाधव खूप काम करतात. जीवतोड मेहनत. मध्यंतरी कुठल्याशा पॉलिसी कंपनीत एजंट म्हणून होते. पॅनकार्ड की आरएमपी, असं काहीतरी. चार वर्षात डबल पैसे वगैरे. त्यात अनेकांच्या त्यांनी पॉलिसी काढल्या आणि ती कंपनी बंद झाली. ज्यांच्या पॉलिसी काढल्या, ते लोक जाधवांकडे पैसे मागू लागले. कधी कधी धमक्याही देत. नंतर घरातलं काहीतरी विकून त्यांनी ते पैसे चुकते केल्याचंही मला कुणीतरी सांगितलं. असो. तर असा हा जाधव माणूस. मनाने दिलदार. प्रामाणिक. पण आयुष्याच्या कचाट्यात असा अडकला की, साला आयुष्य नकोसं व्हावं. पण तरीही मेहनत करुन जगतोय. असो.

तर जाधवांशी बोलल्यानंतर वडापावच्या गाडीवर काम करायलाही काही वाटायचं नाही. त्यामुळे जाधवांचं माझ्यासाठी महत्त्व मोठंय. तर पहिला जॉब असा सुरु झाला.

अगदी मोजून 10-11 महिने काम केलं आणि वडापावचं काम सोडलं. त्याला दोन कारणं होती- एक म्हणजे 6-9.30 अशी साडेतीन तास काम करुनही मिळणारा पगार कमी वाटला आणि दुसरं कारण म्हणजे याच काळात MS-CIT करण्याचं ठरवलं. दोन दोन कारण मिळाल्यानंतर वडापावच्या गाडीवर जाणं बंद केलं. अर्थात त्या ताईला आधी सांगितलं. तीही खूप मानते मला. आजही कधी पार्ल्यात गेलो, तर ताईच्या वडापावच्या गाडीशी जाऊन एखादा वडापाव खाल्ल्याशिवाय परतत नाही.

वडापावची गाडी... हा माझा आयुष्यातील आणि मुंबईतील पहिला जॉब. मेहनत करताना लाजायचं नाही, हे इथे शिकलो. कोणतंच काम लहान-मोठं नसतं. पडेल ते काम करायचं, हे मला इथेच कळलं. त्यामुळे या पहिल्या-वाहिल्या कामाचं मला अजूनही विशेष कौतुक आणि आदर आहे.

07 August, 2016

पप्पांची डेडबॉडी बघायला गेलेली आई!

माझ्या मोठ्या बहिणीच्या म्हणजेच निलिमाच्या लग्नात काढलेला पप्पांचा फोटो. 


खूपच दर्दभरा वगैरे लिहितो, अशी अनेकांची माझ्याबाबत तक्रार असते. त्यांची माफी मागूनच हे लिहितोय. कारण काल्पनिक वगैरे लिहायला फार जमत नाही. जे अनुभवलंय, जे जगलोय, जे पाहिलंय, ते मांडतो. किंबहुना, तेच मांडता येतं. बाकी काल्पनिक लिहायला गेलो की, दहा-पंधरा ओळींपलिकडे लिहिणं जमतच नाही. म्हणून जगण्यातलचे काही क्षण मांडत असतो. दुसरी गोष्टी अशी आहे की, मला व्यक्त व्हायचं असतं. बस्स.

विशेषत: पप्पांच्या आत्महत्येवरील बापाने आत्महत्या केली तो दिवस! हा लेख वाचल्यानंतर अनेकांनी पर्सनली फोन करुन तक्रार केली की, असे भयानक काही लिहित जाऊ नकोस. असे लेखन अंगावर येतं. झोप लागत नाही. मला त्यांचं म्हणणं पटतं, पण मला दुसरं लिहिता येत नाही. माझं लेखन हे माझं जगणं आणि माझं भोवताल मांडत राहतं. आजही तेच करणार आहे. जगण्यातला एक भयानक क्षण मांडणार आहे.

पाच दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे महाडच्या सावित्री नदीचा पूल पाण्याच्या वेगवान प्रवाहात मध्यरात्री वाहून गेला. कित्येक जणांचं आयुष्य त्या पाण्यात वाहून गेलं. तडफडत. कुणाचा काही पत्ता नाही. या भयानक घटनेने माझ्या आयुष्यातील एका प्रसंगाची आज तीव्र आठवण झाली. अर्थात, हल्ली कामाच्या धबाडग्यात थोडं विस्मरणातही जातात अशा आठवणी. पण काही घटनांमधून त्या नको असलेल्या आठवणी पुन्हा डोळ्यांसमोरुन सरकू लागतात. प्रचंड त्रास होतोच. पण आठवणींना रोखता येत नाही. रोखता आलं असतं, तर मीच काय, आजूबाजूचे कित्येक जण आज सुखात असते. हा आसवांचा खेळ दिसलाच नसता.

महाडमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली. असे कधीही न घडो. किड्यामुंग्यांसारखी अफाट आकाराच्या गाड्या आणि लाखमोलाची माणसं वाहून गेली. नदीच्या उदरात गुडूप झाली. हाहा:कार माजला.

महाडच्या घटनेचा दुसरा दिवस. शोधकार्य सुरु होतं. या दुर्घटनेचा बळी ठरला असल्याची शक्यता असणाऱ्याच्या एका नातेवाईकाशी आमचे रिपोर्टर उमेश कुमावतांनी टिकटॅक केला. टिकटॅक म्हणजे माहिती घेतली. तो नातेवाईक म्हणाला, कुणीच माहिती देत नाही. आम्ही डेडबॉडीची वाट पाहतोय. आम्हाला काहीच आशा उरली नाही. पण सरकारी यंत्रणा डेडबॉडीसाठी आम्हाला येरझऱ्या घालायला लावतेय. नीट माहिती दिली जात नाही.

हे सारं भयानक आहे. मृतांच्या नातेवाईकांना योग्य माहिती, योग्यप्रकारे देणं अत्यंत गरजेचं असतं. ही बातचीत ऐकताना, पाहताना माझ्याच आयुष्यातील एक भयानक प्रसंग डोळ्यांसमोर आला.

मी सातवीत होतो. म्हणजे आजपासून जवळपास दहा-अकरा वर्षे आधीची गोष्ट. पप्पा त्यावेळी प्रचंड आजारी असायचे. मुंबईला हिऱ्याच्या कारखान्यात असताना डोक्याला ट्युबलाईट लागल्याने त्यांच्या मेंदूवर आघात झाला होता. उपचार झाले. मात्र, त्यांना झटके येत असत. कधी कुठेही निघून जात असत. अर्थात, काम वगैरे सर्व सुटलं होतं. कधी दोन-तीन दिवस कुठल्या कुठे निघून जायचे, तर कधी आठवडा आठवडा. मग आई वेड्यासारखी बिना चपलीची रान-वन, खेडीपाडी शोधून काढी. शेती सांभाळून आई पप्पांना शोधत असे. अनेकदा आईला कुठेतरी ते भेटत असत किंवा कधी कधी तेच स्वत:हून घरी परतत असत. असं साधारण तीन-चार वर्षे सुरु होत. यात तीन-चार वर्षात कित्येकदा पप्पा कुठेतरी निघून जायचे. मग शोधाशोध वगैरे सुरुच.

मी नववीत असताना एकदा असाच झटका आला आणि पप्पा मागच्या दारातून निघून गेले. आम्हाला वाटलं, ते नेहमीप्रमाणे दोन-तीन दिवसांनंतर येतील परत. तरीही आईने शोधाशोध केलीच. पण ऐन भात लावणीचा काळ होता. त्यामुळे उन्हा-तान्हातून उभा केलेला हा संसार असा अर्ध्यात सोडताही येत नव्हता. त्यात पंधरा-वीस गुरं आमच्या घरी होती. भात लावणी, गुरं असं सर्व सांभाळून आई पप्पांना शोधायला, गावं हिंडायची. त्यावेळी आजी होती. त्यामुळे आम्हा तिन्ही भावंडाच्या जेवणाचं आणि शाळेची व्यवस्था ती करी. त्यामुळे आईला आजीची तशी मदतच होई. एकटी आई रान-वन-गाव-शहर सर्व सर्व ठिकाणी जायची. तीन-चार वर्षांपासून पप्पा नियमितपणे कामाला नव्हते, त्यामुळे घरात पैशांचीही वणवण असायची. शेतीच्या मजुरीतून मिळालेल्या पैशांत घर चालायचं. त्यामुळे पप्पांना शोधण्यासाठी कुणाकुणाकडून पैसे घेई.

आठवडा उलटला, दोन आठवडे झाले, महिना गेला... पप्पा परतलेच नाही. आधी जसे तीन-चार दिवसांनी किंवा आठवड्यांनी ते स्वत:हून परतत असत, तसे आले नाहीत म्हणून सर्वांचीच चिंता वाढली. मुंबईहून नातेवाईक गावी आले. आपापल्या वेळेनुसार सगळीजणं शोधाशोध करु लागले. या शोधाता दीड-दोन महिना उलटला.

दिवसभर पप्पांना कुठे कुठे शोधून आलेली आई रात्री चुलीपाशी भाकऱ्या शेकवताना हमसून-हमसून रडत असे. आणि आम्ही तिन्ही भावंडं तिच्या बाजूला बसून तिच्याकडे बघत रडायचो. आजी थोडी खमकी होती. ती आम्हाला सावरायची. आजी सारखी म्हणायची, मी गावदेवाला नवस केलाय. माझा पोरगा आला, तर दहीहंडी बांधीन, पाच घरात भिका मागेन.

या साऱ्यात तीन महिने गेले. अनेक नातेवाईकांनी तर आशाच सोडली होती. ते आईला तसं समजवण्याचाही प्रयत्न करायचे. पण आई त्यांचं काहीच मनावर घेत नव्हती. कुणी कितीही सांगितलं तरी ती उजाडलं की शोधायला बाहेर पडत असे.

पप्पा हरवल्याची रोहा पोलीस ठाण्यात रितसर कळवलंही होतं. त्यामुळे पोलिसांनी रायगडमधील अनेक पोलीस ठाण्यात याबाबत माहिती पोहोचवली. मात्र, सुरुवातील सुरुवातील पोलीस आईला उलट-सुलट प्रश्न विचारत, त्यामुळे आधीच खचलेली आई आणखी चिंतेत पडायची. त्यात सुरुवातीचे एक-दीड महिना शोधायला मदत करणारे अनेकजण नंतर नंतर यायचेही बंद झाले. त्यामुळे आई एकटीच शोधत फिरायची.

अशाचतच एकदा माणगाव जवळील गोरेगाव पोलीस ठाण्यातून गावातील एका टेलिफोनवर फोन आला. आम्हाला एक डेडबॉडी मिळालीय. तुम्ही सांगितलेल्या व्यक्तीशी कपडे मिळते जुळते आहेत. नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. तुम्ही येऊन पाहून जा. हे भयानक होतं. थरकाप उडवणारं.

मला आठवतंय पोलिसांचा फोन संध्याकाळच्या सुमारास आला होता. मी शाळेतून घरी आलो. वऱ्हांड्यातील धकाड्यावर बसून जेवत होतो आणि गावातना कुणीसा बोलवायला आला. काटकर बय, पोलिसांचा फोन आलाय.”, असं तो म्हणाला. नक्की कोण होता, ते आठवत नाही. बहुतेक आमच्या घरासमोरील दामूबाबा. आई वाड्यात होती. गाई-बैलांना पेंड घालत होती. मी आईला ओरडून सांगितलं, तेव्हा आई धावतच वऱ्हांड्यात आली आणि थेट फोनवाल्या घरात गेली. तिथून येताना आई प्रचंड घाबरलेली होती.

आई घरात आली आणि रडायला लागली. आम्ही तिन्ही भावंड, आजी आणि बाजूची तानी आक्का असे सर्वजण घरात तिच्यापाशी बसलो होतो. मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला म्हणजे निलिमाला समज होती. लहान भाऊ म्हणजे अक्षयला तेवढं समजत नव्हतं. त्यामुळे आई रडतेय म्हणून तोही रडू लागला होता. मी, निलिमा, आजी आणि तानी आक्काने आईला समजावलं आणि विचारलं की काय बोलले पोलीस?

आई रडतच आम्हाला सांगू लागली, पोलीस बोलत होते, गोरेगावला या. माणगावच्या इथे. पोलीस स्टेशनला या. एक बॉडी भेटलीय.. नदीत वाहून आलेली. तुमच्या माणसासारखेच कपडे आहेत. तेव्हा या आणि खात्री करुन जा.

आता आमचाही थरकाप उडाला. हे सारं भयानक होतं. आता संध्याकाळ झालीय. आता कसा कुणी जाणार. बाहेर मुसळधार पाऊस. त्यात आता जायचं नाही, मग रात्र कशी काढायची? सकाळपर्यंत थांबायला आई तयार नव्हती. मग गावातल्या कुणीतरी पोलिसांना फोन करुन विचारलं की, सकाळी आलो, तर चालेल का? तर पोलीस म्हणाले, "सकाळीच या. बॉडी हॉस्पिटलला आहे. तेव्हा आता आलात, तरी काहीच होणार नाही."

सकाळी तीन-चार वाजताच आई निघाली. ती भल्या पहाटे गोरेगावला निघून गेली. नंतर आजीने आम्हाला शाळेत पाठवलं. जितकं आठवतंय मला, मी शाळेत प्रचंड रडलो होतो. आमच्या शाळेतील सर्व सरांनाही पप्पांबद्दल माहित होतं. त्यामुळे त्यांनीही समजून घेतलं. संध्याकाळी शाळेतून परतलो, तरी आई आली नव्हती. आम्ही संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शाळेतून घरी आलो होतो. घरी वातावरण प्रचंड शांत होतं. आजी चुलीजवळ काहीतरी करत बसली होती. अंगणातून येणारा-जाणारा हाका मारत विचारत होते, आली का रं आयस?

अखेर सात वाजण्याच्या सुमारास आई आली. आई एकटीच होती. कुणीच तिच्यासोबत नव्हतं. गेल्या तीन महिन्यांपासून पप्पांना शोधायला गेलेली आई एकटीच घरी आली की रडायला यायचं. पण आज ती एकटी आली याचं बरं वाटलं. वऱ्हांड्यात होतो मी. तिला पाहिलं. ती एकटी होती. म्हणजे ती बॉडी पप्पांची नव्हती तर. खूप बरं वाटलं.

आई घरी आली. आणि खूप रडायला लागली. पप्पा नसल्याची खात्री करुन ती आली होती. आई घरी आल्यानंतर गावातल्या लोकांनाही गर्दी केली. काय झालं वगैरे विचारायला. आईने सांगितलं सर्व. रात्री जेवल्यानंतर आईला विचारलं, एवढा वेळ का झाला? आई म्हणाली, खूप वेळ पोलीस स्टेशनला बॉडीच आणली नव्हती त्यांनी. पोलीसही काहीच उत्तर देत नव्हते. विचारलं तर बोलायचे, तिथं बसा. बॉडी आली की सांगतो. हॉस्पिटलला आहे बॉडी. येईल की तुम्हाला बोलवू. मग बॉडी आली तेव्हाही माझ्यासारखेच खूप जण तिथे बॉडी बघून खात्री करायला आलेले. त्यांचाही कुणीतरी गेला असं बहुतेक. मग या गर्दीतून बॉडी पाहिली. पण ती बॉडी त्यांची नव्हती. तो दुसराच कुणीतरी व्हता.

कदाचित, तेव्हा मी तेवढा विचार केला नसेल, पण आज ते तीन महिने आणि खासकरुन तो दिवस आठवला तरी थरकाप उडतो. डेडबॉडी बघायला याअसा पोलिसांचा निरोप आल्यापासून ते बॉडी पप्पांची नाही, अशी खात्री पटेपर्यंत... यादरम्यानचा प्रत्येक क्षण कसा घालवला असेल? काय वाटलं असेल तिला? काय विचार तिच्या मनात आले असतील? तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल? किंबहुना, गोरेगावला पोलीस स्टेशनमध्ये बसून डेडबॉडीची वाट पाहत आई कशी बसली असेल? आपला नवरा जिवंत आहे की नाही, ही खात्री करण्याएवढी भयानक वेळ तिच्यावर आली होती.

तेव्हा हे सारं विचार करण्याएवढा मोठा नव्हतो कदाचित. पण आज जेव्हा कधी हा विचार करतो, तेव्हा तेव्हा अक्षरश: थरकाप उडतो.

हे सारं घडल्यानंतर दीड-दोन आठवड्यांनी पप्पा स्वत:च घरी परतले होते. ते अलिबागला कुठेतरी राहिले होते. असेच फिरते. कुणाच्या घरी नाही. कपडे माखलेले. प्रकृती पूर्णपणे ढासळळेली. ते आले तेही संध्याकाळीच. मला आठवतंय, पप्पा आल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. मग आम्ही शाळेतून आलो आणि घरी गेलो, त्यावेळी पप्पा खुर्चीत बसले होते. त्यांना पाहून रडायला आलं. त्यांनी आम्हाला जवळ घेतलं. बाकी पूर्ण आठवत नाही. पण गेल्या तीन-साडेतीन महिन्यात घरात कुट्टा अंधार होता, आज त्यांच्या येण्याने घरात आनंद होता. पण ते बरे झाले नव्हते. त्यामुळे त्यानंतरही ते अनेकदा असे निघून गेले होते.

आयुष्यातली ही अत्यंत वेदनादायक घटना आठवण्याचं कारण म्हणजे परवा महाड दुर्घटनेतील नातेवाईकांचा बाईट. एक नातेवाईक बोलताना म्हणाला की, पोलीस नीट सांगतही नाहीत. खरंय हे. पोलीस कधीही नीट उत्तरं देत नाही.

मृतांच्या नातेवाईकांना आधार देऊन बोलणं गरजेचं असतं. मात्र, संवदेनाहीन असल्यासारखे पोलीस मृतांच्या नातेवाईकांशी वागतात. नातेवाईकांना समजावून सांगितलं जात नाही. त्यामुळे नातेवाईक घाबरण्याचीच शक्यता अधिक असते. या नातेवाईकांच्या मनावर काय परिणाम होत असले, याची कल्पनाच केलेली बरी.

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...