08 February, 2018

श्रेय ज्याचे त्यास द्यावे..



सह्याद्रीच्या पर्वतरांगा, चहूबाजूला गर्द झाडी, डोंगराच्या मध्यभागी नारळाच्या झाडांनी वेढलेलं तीस ते पस्तीस उंबरठ्यांचं चिमुकलं गाव, गावाच्या वेशीवर एक पार, मस्त रुंद चौथरा... डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यातला एखादा दिवस, त्या दिवसाची दुपार थोडी संध्याकाळकडे झुकलेली, साडेतीन-चार वाजण्याचा सुमार.... एकंदरीत चहूबाजूंना प्रसन्न वातावरण.

अशा नितांत सुंदर निवांत वेळी आपण दोन-चार सवंगड्यांसोबत हलक्या-फुलक्या गप्पा मारत पारावर बसलेलो असावं, अनं सवंगड्यांपैकी कुणीतरी त्याच्या आयुष्यातल्या कडू-गोड आठवणी सांगाव्यात. अगदी सहज, सोप्या भाषेत आणि प्रेमळ सुरात... वाह!

कसलं भारी ना? सारं कसं स्वप्नवत!

माधुरी अरुण शेवते यांचं ‘श्रेय ज्याचे त्यास द्यावे’ हे पुस्तक वाचताना असंच काहीसं वाटलं. माझ्या धावपळीच्या वेळातून निवांत क्षण या पुस्तकासाठी ठेवले होते. त्यामुळे शांततेत या पुस्तकाचा रोमँटिसिझम अनुभवता आला.

लेखिका अगदी सहजतेने एक एक प्रसंग उलगडत जाते. वाचत असताना एका क्षणी आपण पारावर निवांत बसून माधुरी शेवतेंच्या तोंडून हे किस्से ऐकतोय की काय, असं वाटून जातं. इतकं त्यांच्या लेखनात गुडूप व्हायला होतं आणि प्रत्येक प्रसंगात लेखिकेच्या आजूबाजूला वावरु लागतो.

विंदा करंदीकरांची एक छानशी कविता आहे. त्या कवितेची सुरुवात अशी की – “उंची न वाढते आपली, फारशी वाटून हेवा.. श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा...” विंदांच्या या कवितेतील एक ओळ लेखिकेने आपल्या पुस्तकाला शीर्षक म्हणून दिलंय. पुढे पुस्तक वाचताना पुस्तकाचे शीर्षक किती चपखल, नेमकं आणि समर्पक आहे, हे लक्षात येतं. शीर्षकाला छेद जाईल, असं वाक्य या पूर्ण पुस्तकात कुठेही आढळत नाही. आत्मस्तुतीचा लवलेशही नसलेलं वर्णन वाचकांच्या मनाला स्पर्श करतं, अन् मनापासून भावतं.

गुलजारसाहेब, ते दिवस, शहाळ्यातील पाणी, बाई, शर्वरी, एका श्वासाचे अंतर, चंदाराणी आणि गुलमोहर अशी दोन हाताच्या बोटावर मोजावेत इतकेच लेख या 108 पानी पुस्तकात आहेत. लेख छोटेखानी असले, तरी त्यातील माणसं, त्यातील आठवणी, प्रसंग, किस्से लेखिकेसाठी अविस्मरणीय असतीलच, पण वाचक म्हणून आपल्यालाही समृद्ध करणारे आहेत.

पुस्तक वाचत असताना, जसजसे आपण एका पानावरुन दुसऱ्या पानावर, दुसऱ्यावरुन तिसऱ्या.. असं पुढे पुढे सरकत शेवटाकडे येतो, तेव्हा शेवटी शेवटी लेखिकेचा हेवा वाटतो. लेखिकेचं किती मनस्वी मनाच्या माणसांशी नातं जुळलं, ऋणानुबंध जुळले!

वाचकांनाही समृद्ध करणारे प्रसंग या पुस्तकाच्या अनेक कोपऱ्यात दडलेले असताना, लेखिका प्रामाणिकपणे मनोगतात नमूद करते, “मी काही लेखिका नाही, पण मनातील भावभावना आपण लिहाव्यात अशी इच्छा निर्माण झाली, त्याचे कारण आमच्या घरातील सांस्कृतिक वातावरण.”. वाचकांना समृद्ध करणे, हे जर लिहिणाऱ्यांच्या अनेक हेतूंपैकी एक असेल, तर माधुरी शेवते ते पूर्ण करतात. तरीही त्या विनम्रतेने लेखिका नसल्याचे नमूद करतात, हे त्यांचं मोठेपण आहे.

आता थोडं पुस्तकातील लेखांकडे वळूया. मोजून आठ लेख यात आहेत. त्यातील प्रत्येक लेखाबद्दल बोलूया. अर्थात, सविस्तर नाहीच. अगदी थोडक्यात.

पहिला लेख ‘गुलजारसाहेब’ आहे. मुळात मराठी सृष्टीत गुलजार या नावासोबत मराठीतलं नाव जोडलं जातं ते कवी अरुण शेवते यांचं. म्हणजेच लेखिकेचे पती. अरुण सरांमुळे गुलजार आणि शेवते कुटुंबीयांचा स्नेह वाढला आणि गुलजार त्यांच्या नात्यातील एक असल्यासारखे बंध जुळले. गुलजारांच्या सहवासातील आठवणी लेखिकेने सांगितल्या आहेत. आजही शेवते आणि गुलजार हे समीकरण मराठीसृष्टीत सर्वश्रुत आहे. त्यामुळे साहित्यापलिकडचे गुलजार या लेखात वाचायला मिळतात.

अरुण शेवतेंच्या ‘शर्वरीच्या कविता’ या संग्रहातील कवितांचा भावनुवादही गुलजारसाहेबांनी केला आहे. गुलजारांनी त्यांच्या कविताही अरुण सरांना समर्पित केल्या आहे. इतके जवळचे आणि सहृदयी नाते. गुलजार प्रत्येकवेळी नव्याने कळतात, असे म्हणतात. या लेखातूनही गुलजार नव्याने कळतात, असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

यानंतर यशवंतराव गडाख यांच्याबद्दल लेखिकेने लिहिले आहे. महाराष्ट्रातील खूप कमी राजकीय नेते आहेत, जे साहित्यविश्वातही रमले. त्यात गडाखांचं नाव नक्कीच वरच्या स्थानावर घेता येईल. गडाख आणि शेवते यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. इतके की आडी-अडचणीला अगदी घरच्या माणसासारखी त्यांना हाक मारली जाते. राजकारणाच्या पलिकडचे गडाख इथे अनुभवायला मिळतात.

ग्रामीण भागाचे खाच-खळगे जे जगले, ते यशवंतराव गडाख हे खऱ्या अर्थाने लोकनेते. गाववर्गणी गोळा करुन जिल्हा परिषदेची निवडणूक लढून गडाख राजकारणात आले. मात्र जे लहानपणी सोसले होते, ते चटके ते विसरले नाहीत. दीन-दुबळ्यांसाठी कायम झटत राहिले. राजकारणातल्या या मनमिळाऊ आणि राजबिंडं व्यक्तिमत्त्वाने कुणाला भुरळ घातली नाही, तरच नवल. पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जात हा माणूस प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवून आहे. अशा माणसासोबतचे कौटुंबिक सहृदयी नाते लेखिकेने या लेखात मांडले आहे.

‘शहाळ्यातील पाणी’ या तिसऱ्या लेखातही गडाखांसारखेच प्रसंग. मात्र ज्या व्यक्तीवर आधारित हा लेख आहे, ती व्यक्ती म्हणजे टी. एन. धुवाळी. राजकारणाच्या परीघात 'धुवाळीसाहेब' म्हणून ते परिचित. शरद पवार यांचे ते 40-45 वर्षे सेक्रेटरी होते. पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी. धुवाळी हे शेवते कुटुंबीयांसाठी ‘बाबा’ होते. साक्षात पवारांच्या ‘जवळचा माणूस’ म्हणजे किती अहंकारी असायला हवे ना, पण हा लेख वाचून त्या गृहितकाला पार धक्का बसतो. कारण धुवाळीसाहेब किती नम्र स्वभावाचे होते, हे कळतं.

‘बाई’, ‘एका श्वासाचे अंतर’ आणि ‘शर्वरी’ हे तिन्ही लेख काळजाला भिडणारे आहेत. ते यासाठी कारण रक्ताच्या नात्यातील या तीन व्यक्ती, म्हणजे लेखिकेच्या सासूबाई, पती अरुण शेवते आणि मुलगी शर्वरी यांच्यावर आधारित हे लेख आहेत.

सुनेने सासूवर लिहिलेला ‘बाई’ हा लेख आहे की, मुलीने आईवर, असा प्रश्न पडावा, इतके ऋणानुबंध. अरुण शेवतेंवरील लेख एका प्रसंगाभोवती फिरतो. पण त्यातून अरुण सरांचं शांत, संयमी आणि समजूतदार व्यक्तिमत्त्व उलगडतं.

‘शर्वरी’ हे नाव मराठी साहित्यसृष्टीत तसे ओळखीचे. अर्थात ते अरुण शेवतेंच्या ‘शर्वरीच्या कविता’मुळे. पण शर्वरीच्या लहानपणापासूनचा जडण-घडणीचा प्रवास, सोबतची माणसं, तिचे छंद इत्यादी गोष्टी आणि त्याआडून आई म्हणून सुख, लेखिका यात मांडते.

शर्वरी हे नाव ठेवण्याचा किस्साही खूप छान आहे. अरुण शेवतेंच्या आईंना धाडसी कलेक्टर शर्वरी गोखले फार आवडायच्या. त्यावरुन शर्वरी नाव.

शर्वरी गोखेल या महिला सनदी अधिकाऱ्यांच्या पहिल्या पिढीच्या प्रतिनिधी. एक आदर्श सनदी अधिकारी म्हणून त्या लोकप्रिय होत्या. कुणाच्याही दबावापुढे न झुकता, अगदी निर्भीडपणे लोकाभिमुख निर्णय घेणाऱ्या अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख होती.

पुढे अरुण शेवतेंच्या कवितासंग्रहाने ‘शर्वरी’ शब्दात आपल्यासमोर आणली.

उर्वरित दोन लेख, ‘चंदाराणी’ आणि ‘गुलमोहर’, हे दोन्ही लेख लेखिकेच्या माणुसकीचं मोठेपण आणि संवेदनशीलता दाखवून देतात. चंद्रा या घरकाम करणाऱ्या मद्रासी मुलीचे लेखिकेवरील आणि लेखिकेचे प्रेम सांगणारा ‘चंदाराणी’ हा लेख. चंद्राला मुलीप्रमाणे वागवणाऱ्या, तिच्या सुख-दु:खात धावून जाणाऱ्या लेखिकेचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. त्यानंतरचा ‘गुलमोहर’ हा लेखही तसाच आहे. लेखिकेतला संवेदनशीलपणा दाखवणारा. मुक्या गोष्टींविषयी असलेली संवेदनशीलता, ओढ, कौतुक, आपुलकी या बाबी तशा दुर्लभ झालेल्या काळात लेखिका गुलमोहराच्या झाडासोबतचं तयार झालेलं नातं सांगते. ते वाचताना एकाचवेळी कौतुक वाटतं आणि आदरही.

असे एकूण आठ लेख या छोटेखानी पुस्तकात समावले आहेत. प्रत्येक लेखातील प्रत्येक गोष्ट आता इथे सांगता येणार नाही. पण पुस्तकावरची धावती नजर अशी आहे.

खरं तर पद्मगंधा, शब्दालय, सकाळ, चिंतन आदेश, वाघूर आणि ऋतुरंग अशा अंकांमध्ये याआधी यातील सर्व लेख प्रकाशित झाले आहेत. पण ते सर्व एका ठिकाणी पुस्तकाच्या स्वरुपात आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ‘ग्रंथाली’चे वाचक म्हणून आभार मानायलाच हवे.

जेव्हा हे पुस्तक खरेदी करुन तुम्ही घरी आणाल, तेव्हा असंख्य पुस्तकांच्या मांडणीत हे प्रेमळ संवाद साधणारं पुस्तक एखाद्या सुवासिक फुलासारखं शोभून दिसेल, एवढं नक्की.

No comments:

Post a Comment

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...