नवीनचंद्र बांदिवडेकरांना तिकीट द्यायचं की
नाही, हा काँग्रेसचा पक्षाअंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी घरात शस्त्र नि स्फोटके
सापडलेल्या सनातनच्या साधकाला समर्थन करणाऱ्या बांदिवडेकरला तिकीट द्यावं किंवा थेट
सनातनचा म्होरक्या असलेल्या जयंत आठवलेला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावा.
व्हॉटेव्हर. मुद्दा असाय की, केवळ मतांसाठी असले चाले केल्यानंतर काँग्रेसने
पुरोगामीपणा आणि गांधीवादी असल्याचा आव आणू नये. इतकेच.
ज्या गांधींच्या नावावर (विचारांवर नव्हे!) गेली सत्तरहून अधिक वर्षे काँग्रेस पक्ष चालतोय. त्या गांधींची वैचारिक
भूमिका किमानपक्षी काँग्रेसने लक्षात ठेवायला हवी होती. अहिंसा शब्दाला आपल्या गुणांबाबत
काहीसा कमीपणा वाटावा, इतके अहिंसावादी गांधी होते. अशा पक्षाने घरात स्फोटके
ठेवणाऱ्या आणि त्या स्फोटकांचा नि त्या आरोपीचा विवेकवाद्यांच्या हत्येशी संबंध
असताना, त्याला थेट लोकसभेचं तिकीट देणं, हे गांधींच्या कुठल्या तत्त्वात बसते? हे सत्यसाई बाबाचा फोटो शासकीय निवसस्थानातील 'पुरोगामी
भिंती'वर टांगणाऱ्या अशोक चव्हाणांनी सांगावं. म्हणजे कसं, काँग्रेसच्या
बेगडी नि बोगस पुरोगामीपणाचा बुरखा आणखी नीट फाटला जाईल.
वैभव राऊतचं समर्थन करणारे बांदिवडेकर हे
समाजबांधव म्हणून तिथे गेले होते, असं 'सत्यसाई भक्त' अशोक चव्हाण सांगतायत. त्या अशोक चव्हाणांना इतकाच प्रश्न आहे की, वैभव
राऊत हा भंडारी आहे म्हणून त्याला अटक करण्यात आली नव्हती, तर त्याच्या घरात
स्फोटके सापडली म्हणून अटक करण्यात आली होती. असं असताना वैभव राऊतला 'समाजबांधव' म्हणून समर्थन करण्याचा प्रश्न येतोच
कुठे? इतके बालिश स्पष्टीकरण अशोक चव्हाणांकडून येणं
अनपेक्षित होतं. मात्र, तात्काळ मला त्यांचे 'सत्यसाई'प्रेम आठवलं आणि मी शांत झालो. म्हटलं, शक्य आहे!
तसेही रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा
मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार कुठल्याही स्थितीत निवडून येणार नाही, हे
निश्चित. काँग्रेसच्या उमेदवाराचा फायदा डॉ. निलेश राणेंनाच होईल. वर आघाडीतल्याच
सुनील तटकरेंनी राणेंना पाठिंबा दिलाय. त्यामुळे सगळा सावला गोंधळ आहेच. त्यात हे बांदिवडेकर
काही येत नाहीत. मात्र, तरीही काँग्रेसने सनातनशी संबंधित व्यक्तीला उमेदवारी देण्याची
डेअरिंग केली, यावर चर्चा व्हायलाच हवी आणि त्यावरुन काँग्रेसचं बेगडी पुरोगामीत्व
समोर यायलाच हवं.
बांदिवडेकरची शिफारस ज्यांनी केलीय, असे ऐकिवात
आहे, त्यांचं नाव ऐकून माझा संताप वाढलाय. ते म्हणजे हुसेन दलवाई. हुसेन दलवाई
यांनी जर बांदिवडेकरच्या नावाची शिफारस केली असेल, तर हुसेन दलवाई यांनी
हमीदभाईंचे भाऊ असल्याचे कुठे सांगू नये. हमीदभाईंचं सच्चा पुरोगामीपणा
हुसेनभाईंनी धुळीस मिळवल्याचे हे जिवंत उदाहरण आहे.
पुरोगामी चळवळीतून किंवा विवेकवाद्यांकडून
तक्रार करुन जर काँग्रेस सनातनशी संबंधित बांदिवडेकरची उमेदवारी रद्द करत नसेल, तर
हा अरेरावीपणा काँग्रेसला आणखी गाळात रुतवून ठेवणार, हेही नक्की.
दुसरीकडे, चंद्रपुरात शिवसेना आमदार बाळू
धानोरकर यांना काँग्रेसकडून तिकीट मिळावी म्हणून कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे मागणी
केली. तर आता जाहीर झालेल्या उमेदवारीवर काँग्रेसकडून पुनर्विचार सुरु झालाय.
म्हणजे मतांसाठी नि राजकारणासाठी केवळ तुम्ही उमेदवाऱ्या बदलणार, पण विचारांना
केराची टोपली दाखवणार... वाह रे वाह!!!
ज्या कन्हैयाने देशभरात भाजप नि मोदीविरोधी
वातावरण निर्माण केलं, त्याच्या विरोधात बेगुसरायमधून उमेदवार देण्याचा काँग्रेसचा
विचार असो किंवा सनातनाच्या बांदिवडेकरला उमेदवारी देण्याचा निर्णय असो...
काँग्रेसला लोकशाही वगैरे वाचवायची नसून, केवळ पक्ष शाबूत ठेवायचाय नि सत्ता
मिळवायचीय, एवढेच यातून दिसतेय. आणि हेच असेल तर काँग्रेसची हेलकावे खात तरंगणारी
नौका तळाशी जायला वेळ लागणार नाही, एवढे निश्चित.
नामदेव अंजना | namdevanjana.com
No comments:
Post a Comment