जवळपास १९० ते १९५ गावांना फटका बसेल, जर सरदार सरोवराची उंची वाढवली गेली तर. म्हणजे सुमारे ४५ हजार कुटुंब विस्थापित होतील. घराला वितभर भेग पडली, तर हतबल व्हायला होतं. इथे तर ४५ हजार कुटुंबांच्या डोक्यावरचं छप्परच जाणाराय... काय हतबलता असेल त्यांची!
याच लोकांसाठी मेधा पाटकर गेली १२ दिवस आंदोलन करतायेत. तेही उपोषण करुन. म्हणजेच अहिंसेच्या मार्गाने. बारा दिवसांपासून इतक्या मोठ्या संख्येतील लोकांचा आवाज बनलेल्या मेधा पाटकरांची किमान विचारपूस करावी किंवा चर्चेसाठी तरी पुढे यावं, इतकंही मध्य प्रदेश सरकारला वाटू नये?
'आम्हाला फरक पडत नाही', या भयंकर मानसिकतेत आणि अहंकरात शिवराज सि़हांसोबत सगळेच सत्ताधीश बुडत चाललेत. हे तुमच्या-आमच्या आणि अखंड देशाच्या दृष्टीने घातक घटनांची चाहूल आहे.
लोकांच्या प्रश्नावर मेधाताई लढतायेत. आणि मेधाताईंवर विश्वास ठेवून स्थानिकांनी न भुतो न भविष्यति पाठिंबा दिलाय. अर्थात, मेधा पाटकर सेटलमेंटवाल्या आहेत, असं वाटणारेही आहेत आजूबाजूला. पण त्यांना सिरियस घेण्यात अर्थ नसतो. कारण सार्वजनिक जीवनात झोकून देणं कधीच न जमलेलेच मेधाताईंवर बिनबुडाचे आरोप करत फिरतच असतात. असो. आणि तसंही, एका रात्री जेवायला मिळालं नाही की रात्रभर या कुशीवरुन त्या कुशीवर होणारे १२ दिवसांच्या उपोषणावरही टीका करतात, हेही विशेषय.
तर बारा दिवस उपोषण सुरु असतं. मेधा ताईंची तब्येत खालवते. ही बातमी वार्यासारखी पसरते. सोशल मीडियासह सगळीकडेच पडसाद उमटू लागतात. आणि मग अचानक पोलिस उपोषणस्थळी दाखल होतात. दांडक्यांना टोकदार खिळे लावून. पोलिसांची अरेरावी सुरु होते. अर्थात अरेरावीमागचा मास्टरमाईंड कोण असेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज होतो. तसं लाठीचार्ज हा काही मास्टरमाईंडला मोठी गोष्ट नाहीय. व्यापममध्ये एकामागोमाग एक असे दसपटीत माणसं गूढरित्या मारली जातात, तिथे खिळे टोचून केलेल्या लाठीचार्जचं काय घेऊन बसलात!
मेधाताईंना प्रचंड पाठिंबा मिळतोय. लोक आपल्याला अडवू शकतात. म्हणून अटकेसाठी शेकडो पोलिसांचा सशस्त्र फौजफाटा आणला जातो आणि पोलिस व्हॅनऐवजी त्यांना अॅम्ब्युलन्समधून नेलं जातं. सोबत आणखी ११-१२ कार्यकर्ते पकडले जातात.
काय सुरुय हे?
काय समजायचं याला?
प्रश्न साधे आहेत :
- विस्थापितांची सोय करुनच प्रकल्प पुढे न्या, या मागणीत चूक काय?
- लोकांचा आवाज अहिंसेच्या मार्गाने बुलंद करणं, चूक आहे का?
- उपोषण हे कम्पलिटली अहिंसात्मक आंदोलन असतानाही सरकार लाठीचार्जचे आदेश कसं देतं?
- मेधा पाटकरांसारखी कार्यकर्ती उपोषणाला बसलेली असतानाही साधी चर्चा करु वाटू नये? हा सरकारचा निगरगट्टपणा म्हणायचा की सत्तेच्या नशेचा माज?
दोस्तहो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आपली शोधायचीयेत आणि किमान पाठिंब्याची भूमिका तरी ठरवायचीय.
आणि हो... अहिंसेची गळचेपी करणाऱ्या या घटना तुम्हा-आम्हाला दिसतात तितक्या प्रासंगिक नाहीत. या घटनांचे पडसाद भविष्यातही उमटतील. त्यामुळे याकडे त्याच भविष्याची नांदी म्हणूनच बघायला हवं.
No comments:
Post a Comment