पुण्यात आज राम कदम कलागौरव पुरस्कारावेळी शरद पवार यांची सुधीर गाडगीळांनी
मुलाखत घेतली. यावेळी गाडगीळांनी पवारांना खऱ्या अर्थाने बोलतं केलंय. या मुलाखतीत
पवारसाहेबांनी एक भन्नाट किस्सा सांगितला. तो खास तुमच्यासाठी लिहून काढलाय.
कवीवर्य पी. सावळाराम यांच्याशी संबंधित हा किस्सा आहे. शरद पवार, गदिमा आणि वसंतराव नाईकांमधील हा संवाद अफलातून आहे. खालील संपूर्ण संवाद शरद पवारांनी जसा सांगितलाय, तसा लिहून काढलाय. त्यामुळे पवारसाहेब सांगतायेत, हे ध्यानात ठेवून वाचा....
"मी विधानसभेत नुकताच आमदार म्हणून निवडून गेलो होतो. 1968-69 ची गोष्ट आहे. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. आणि मी काँग्रेस पक्षाचा सेक्रेटरी होतो. तर काहीतरी कामासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलो. तिथे माडगूळकर बसले होते. त्यांनी नाईकसाहेबांना सांगितलं की, दोन दिवसांनी ठाण्याला नगराध्यक्षपदाची निवडणूक आहे आणि तिथे आमचा एक दोस्त आहे. त्याला अध्यक्ष करायचंय. आणि काही करुन करायचंय. नाईकांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, यांच्या दोस्ताला निवडून आणायचं काम तू घ्यायचं."
मी विचारलं, "कोण दोस्त?"
त्यांनी सांगितलं, "सावळाराम पाटील म्हणजे पी. सावळाराम"
म्हणजे आपल्याकडे कदाचित आठवत असेल, एकेकाळी लग्न लागलं की, गंगा-यमुना वगैरे ही जी सगळी गाणी वाजवली जायची, ती लिहिणारे ते पी. सावळाराम.
मी मनात म्हटलं, एवढे मोठे कवी आपल्याला ठाऊक आहेत. पण हे मुनिसिपाल्टीच्या भानगडीत कुठं पडले आणि तिथं कसे निवडून येतील?"
नाईकसाहेब म्हणाले, "काही करुन त्यांना निवडून आणायचंय."
ठीकंय. आता माझ्यावर काम सोपवलं. गेलो ठाण्यात. तिथे काय उद्योग करायचे ते केले. दोन-तीन मतं कमी होती. ती दोन-तीन मतं कशी मिळवायची, त्यासाठी आणखी काय ते उद्योग केले. आणि त्यांना आम्ही निवडून आणलं.
निवडून आणल्यानंतर त्यांना (पी. सावळाराम) गाडीत घालून मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलो.
सावळाराम पाटील यांचं मूळ गाव येडेनिपाणी. इस्लामपूरच्या जवळ आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घरी माडगूळकरही होते. माडगूळकरांनी पी. सावळारामांना मिठी मारण्याऐवजी मला मिठी मारली आणि म्हणाले, "काय दोस्ता काम केलंस! येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास."
शरद पवार यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ :
No comments:
Post a Comment