31 July, 2016

इंग्रजी साहित्य आणि मी



मी मराठी वाचक. म्हणजे मराठी भाषेतील साहित्य आणि इतर भाषेतून मराठीत आलेले साहित्य, यापलिकडे फारसं वाचन होत नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अर्थात भाषेचा अडसर. गेल्या दीड-दोन वर्षांपासून इतर भाषेतील साहित्य वाचन गंभीरपणे सुरु केलं आहे. पण ते इतर भाषेतून नव्हे, तर मराठी अनुवादित-भाषांतरित झालेलं साहित्य वाचतोय. प्रत्येक साहित्य त्या त्या भाषेतीलच, म्हणजेच मूळ साहित्य वाचावं, असं सारखं वाटतं आणि अनुवादन वाचल्यानंतरही ती खंत कायम राहते. कारण मूळ भाषेतील साहित्य वाचण्यात वेगळी मजा आहे.


उदाहरणादाखल सांगायचं तर, आपण हमीद दलवाई यांच्या इंधन कादंबरीचं उदाहरण घेऊ शकतो. मराठीतील मूळ इंधन आणि दिलीप चित्र यांनी इंग्रजीत ट्रान्सलेट केलेली ‘Fuel’, या दोन एकच कादंबरी असल्या, तरी वाचताना कुठेतरी भाषेमुळे फरक जाणवतोच. चित्रेंनी खूप छान ट्रान्सलेट केलीय. पण तरीही मराठीतील वाचण्यात जी मजा आहे, ती मजा इंग्रजी ट्रान्सलेशन वाचताना जाणवत नाही. असो.


कथा, कादंबरी किंवा अगदी कविता असो, यांमधून त्या त्या राज्यातील, देशातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थिती आपल्याला कळते किंवा त्याचा किमान कानोसा घेता येतो. मात्र, भाषेच्या अडसरीमुळे मराठी वगळता इतर भाषेतील साहित्य वाचताना मोठी अडचण निर्माण होते. माझी तर प्रचंड. कारण शिक्षण मराठीतून, अगदी अकरावी-बारावी ही कॉमर्सची दोन वर्षे वगळता पदवीपर्यंतच शिक्षण मराठीतूनच झालंय. त्यामुळे इंग्रजी फारसं नीट येत नाही. इंग्रजीवर कमांड नाही.


तरीही जवळपास वर्षभरापूर्वी ‘Building a New India’ हे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन यांचं पुस्तक वाचायला घेतलं. या दोघांची भाषा सोपी वाटली. काही निवडक शब्दांसाठी ऑक्स्फर्ड डिक्शनरीची मदत घ्यावी लागली. बाकी संपूर्ण पुस्तक समजलं. त्यामुळे इंग्रजी वाचनात रस वाटला. या पुस्तकातील ‘Can India Become a Developed Country?’ आणि ‘Manufacturing  for the Future’ ही दोन प्रकरणं तर संसदेत सर्व खासदारांना आणि प्रत्येक राज्यातील आमदारांनी सक्तीने वाचून काढायला सांगायला हवीत. इतकी मार्गदर्शक आणि विकासाची वाट दाखवणारं लेखन कलाम आणि राजन यांनी संयुक्तपणे या दोन प्रकरणांमध्ये केलं आहे. शिवाय, याच पुस्तकातील ‘Visionary Teachers and Scientist’ हे एक अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादीय प्रकरण यात आहे. बाकीची प्रकरणंही उत्तमच आहे. इंग्रजीत वाचलेलं पहिलंच पुस्तक इतकं भारी होतं.


पण ज्यावेळी दुसरं पुस्तक हाती पडलं, त्यावेळी मात्र थोडा हिरमोड झाला. ‘Death of Moneylender’ हे Kota Neelima यांचा पुस्तक वाचता- इंग्रजीवर आपलं थोडंही प्रभुत्त्व नसल्याची तीव्र जाणीव झाली.जवळपास 225 पानांचं हे पुस्तक 80-90 पान वाचल्यानंतर वाचायचं सोडून दिलं. कंटाळा आला. काहीच समजेना. एखाद्या वाक्यातील किमान शब्द कळले, तरी वाक्याचा अर्थ लागतो. पण इथे तसंही काही नाही. क्रियापदांपलिकडे काहीच कळायचं नाही. मग पुस्तक सरळ बाजूला ठेवलं आणि त्यानंतर इंग्रजीच पुस्तक हाती घेतलं. ते म्हणझे- रजनी कोठारी यांचं ‘Political India’. मूळात आधीपासूनच राजकारणी आवड असल्याने मला राजकीय परिस्थिती माहिती होती. त्यात रजनी कोठारींबाबत प्रचंड ऐकलेलं-वाचलेलं. याआधी कुठल्याशा पुस्तकात रजनी कोठारींचा लोकशाहीबाबत लेख वाचला होता. तेव्हापासून या माणसाचं लेखन वाचण्याचं ठरवलं. मग अखेर ‘Political India’ हाती घेतलं. भारतीय राजकारणातील डावपेच, युत्या-महायुत्या, भारतीय राजकारणातील विचारधारा आणि त्यांची बलस्थानं, विविध राजकीय पक्षांचा आर्थिक सुधारणेकडे आणि आधुनिकतेकडे पाहण्यचा दृष्टीकोन, पक्षांची संस्थात्म रचना, बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतीय राजकारणाचा प्रभाव इत्यादी अनेक मुद्द्यांवर सखोल लेखन कोठारींनी या पुस्तकात केलं आहे. ज्यांना भारतीय राजकारणाचा अभ्यास करायाच आहे, त्यांनी हे पुस्तक वाचण्याचं टाळणं म्हणजे घोडचूक ठरेल. इतकं महत्त्वाचं असं हे पुस्तक.


‘Death of Moneylender’ या पुस्तकामुळे मधल्या काळात इंग्रजी साहित्याबद्दल निराशा झाली, असली तरी ‘Building a New India’ आणि ‘Politics in India’ या दोन पुस्तकांनी इंग्रजी साहित्य वाचण्यास प्रवृत्त केलं. त्यानंतर ‘I am Malala : The Girl Who Stood Up for Education and Was Shot by the Taliban’ पुस्तकाने तर इंग्रजीतलं वाचन वाढयाला हवं, या मताला पोहोचवलं. मूळात इंग्रजी साहित्यिक रुची माझ्यात निर्माण झाली नव्हती. या पुस्तकांनी मला इंग्रजीची असणारी भिती घालवली. इंग्रजी साहित्यही मी वाचू शकतो, हा विश्वास मलालाचं पुस्तक वाचल्यानंतर निर्माण झाला. मूळात मलाला माला प्रचंड आवडते. त्यात आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीचा प्रवास वाचणं, यापेक्षा आवडीचं काय असू शकतं? विशेष म्हणजे ‘I am Malala’ वाचताना मला काही निवडक शब्द आणि काही दहशतवाद आणि शिक्षणाशी संबंधित संकल्पना सोडल्यास कुठलीही अडचण आली नाही. इतकं सोप्या पद्धतीने लिहिलं गेलेलं हे पुस्तक आहे. वाचतानाही एका फ्लोमध्ये ते वाचून होतं, हे विशेष. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटच्या समोरील फूटपाथवरुन खरेदी केलेलं हे 276 पानी पुस्तक, जवळपास एका आठवड्यात वाचून पूर्ण केलं.


परवा छोटंसं पण अत्यंत महत्त्वाचं असं स्वामी विवेकानंदांवरील ‘Life and Message of Swami Vivekand’ हे पुस्तक वाचून काढलं. भारी पुस्तक. या पुस्तकातील ‘Way to Reneration’ आणि ‘I Shall inspire Men Everwhere’ ही दोन प्रकरणं अत्यंत प्रेरणादायी आणि वाचनीय अशी आहेत. आठवी-नववीच्या पुढील मुलांनी वाचायला हवं. म्हणजे त्याआधीच्या इयत्तेतील मुलंही वाचू शकतात. तसं केवळ प्रौढांसाठी असं वगैरे नाहीय. पण सातवी किंवा त्याआधीच्या मुलांना तितकं समजेल असं वाटत नाही. पण ट्राय करायला काही हरकत नाही.


आता माझ्याकडे दोन इंग्रजी पुस्तक रांगेत उभी आहेत. त्यांना वाचण्याचा मुहूर्तच सापडत नाहीय. मराठी पुस्तकं वाचून होत नाही, तर त्यांना कुठे हात लावू, असं झालंय. Meher Pestonji यांचं ‘Sadak Chhap’ आणि Sudhansu Mohanty यांचं ‘Babuspeak & Other Stories’ ही ती दोन पुस्तकं. बघूया, कधी वाचून होतायेत. असो.


तर दोन आठवड्यापूर्वी बोरिवलीच्या शब्द बुक गॅलरीतून विलास सारंग यांचा एक कथासंग्रह आणला होता. चिरंतनाचा शोध नावाचा कथासंग्रह. तो वाचून काढला. आता तुम्ही म्हणाल, विलास सारंग आणि इंग्रजी वाचनाचा काय संबंध? तर संबंध आहे. या माणसाने इंग्रजीतही प्रचंड लेखन केलंय. शिवाय, सर्जनशोध आणि लिहिता लेखक हे पुस्तक एकदा वाचा. या पुस्तकात पाश्चिमात्य जगातील लेखकांबद्दल अत्यंत विश्लेषणात्मक लिहून, त्यांना भारतीय साहित्याशी जोडलं आहे. तर चिरंतनाचा शोध कथासंग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे, सारंगांच्या ‘The Women in Cages’ आणि ‘Barrel & Bombil : A Love Story’ या दोन्ही मूळ इंग्रजीत लिहिलेल्या कथांचं ट्रान्सलेशन या संग्रहात आहे. सारंगांच्या लेखनाची एक आगळी-वेगळी शैली आहे. मराठीक बऱ्यापैकी वाचन केलंय, त्यांनाच सारंगांचं लेखन समजू शकतं, असं मला कायम वाटतं. पण एखाद्या नवख्या वाचकालाही समजू शकतं, नाही असे नाही. प्रचंड शांततेत वाचण्यासारखं सारंगांचं लेखन आहे. प्रवासादरम्यान वगैरे वाचण्यासारखं नाही.


तर इंग्रजीतलं खूप लेखन वाचायचं आहे. इंग्रजीतून मराठीत आलेलं वाचतोच आहे. पण मूळ इंग्रजीतलं आणि फ्रेंच, रशियन, जर्मन अशा इतर भाषेतून इंग्रजीत आलेलं लेखनही वाचायचंय. इंग्रजीने ते एक सोपं केलंय, जगभरातील विविध भाषांमधील लेखन इंग्रजीत येतं, त्यामुळे सर्वच भाषा शिकण्याची आवश्यकता भासत नाही. पण शेवटी इंग्रजीत आल्यावर काही बदल होतोच. मूळ लेखन हे मूळच असतं. त्याची तुला अनुवादाशी होऊच शकत नाही.


इंग्रजीही पासपोर्ट भाषा झालीय. इतर साहित्यात फेरफटका मारायचा असल्यास इंग्रजी भाषा नावाच्या पासपोर्टची गरज भासते. त्यामुळे मीही इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतोय. कारण इंग्रजीतील वैचारिक लेखन कळतं. मात्र, कथा-कादंबरी वाचताना अडचण येते. कारण वैचारिक लेखनात केवळ संकल्पना असतात, इतिहास-घडामोडींचं विश्लेषण असतं. मात्र, कथा, कादंबरी, कविता इत्यादींमध्ये भावना असते, जी त्या त्या भाषेवर प्रभुत्त्व असल्याखेरीज कळत नाही. त्यामुळे इंग्रजीवर प्रभुत्त्व मिळवणं मला अत्यंत गरजेचं वाटतं आणि इंग्रजी भाषा नामक पासपोर्टच्या मदतीने जगभरातील साहित्याची चौफेर सैर करायचीय.

29 July, 2016

उमाक्का गेली!



उमा आक्का गेली. व्हॉट्सअप ग्रुपवर उमा आक्काच्या निधनाचा मेसेज आला. RIP आणि रडण्याचे दोन सिम्बॉल, असा रिप्लाय ग्रुपवर दिला. गावाकडचं कुणी गेलं की, हल्ली असं मेसेजवरच कळतं. फोनकरुन सांगण्याची पद्धत आता इतिहासजमा झालीय. अशा बातम्या कळल्या की, RIP आणि रडण्याच्या सिम्बॉल टाकून जसं आधी चाललंय, तसंच पुढे सुरु होतं. कदाचित या शहरात येऊन संवेदनाच बोथट झाल्या असाव्यात. माहित नाही. पण आज उमा आक्काच्या निधनाची वार्ता कळली आणि तिच्या खूप आठवणी डोळ्यांसमोर सरकू लागल्या.

उमा आक्का तशी आमच्या नात्यातली नव्हती आणि आमच्या गावातीलही नाही. ज्या गावात शाळेत शिकायला जायचो, त्या गावातली उमा आक्का. आमच्या गावापासून जवळपास दोन-अडीच किलोमीट दूर. शाळेत असताना उमा आक्काची माया आम्हाला अनुभवता आली.

म्हसाडी नावाच्या गावात आम्ही शाळेत जायचो. गावाच्या वेशीवर शाळा. मात्र, दुपारच्या सुट्टीत या गावातील दुकानात काही ना काही खायला घेण्यासाठी जायचो. त्यावेळी आवर्जून उमा आक्काच्या घराकडून फेरफटका मारायचो. गावात शिरता पहिलंच घर उमाक्काचं. कोणत्याही परवानगीशिवाय घरात शिरण्याची आणि स्वत:च्या हाताने पाणी घेऊन पिण्याची, हात-पाय धुण्याची, भूक लागली असेल, तर थेट चुलीवरल्या भांड्यात काय आहे पाहण्याची परवानगी होती. उमाक्काने कधीच माझं-तुझं केलं नाही. मनाने मोठी असणारी माणसं खूप कमी असतात. त्यातलीच आमची उमाक्का. माणुसकीचं जिवंत उदाहरण म्हणजे उमाक्का.

आठ-नऊ वर्षापूर्वी उमाक्कावर मोठं संकट कोसळलं होतं. त्यांच्या गावातील भांडणामुळे उमाक्काला गाववाल्यांनी वाळीत टाकलं होतं. आधीच गावाच्या एका कोपऱ्यात घर, त्यात वाळीत. गावातील एकही माणूस तिच्याशी बोलायचा नाही. दुपारी जेवणाच्या सुट्टीत जेव्हा तिच्या घरी पाणी पिण्यासाठी जायचो, त्यावेळी चुलीपाशी बसून एकटीच रडत बसलेली उमाक्का आजही मला आठवतेय. काय गं उमाक्के, रडायला काय झालं? मेला की काय तुझा कोण?” असं म्हटल्यावर लुगड्याच्या फाटक्या आणि मळकटलेल्या पदराने डोळे पुसत म्हणायची, “नाय रं बाबा, कोण नाय मेलं. घे पाणी घेअसं बोलून ती वेळ मारुन न्यायची. पण तिचं दु:ख आम्हा मुलांना माहित होतं. आम्ही तिला अनेकदा समजवायचो, "अगं बोलतील गाववाले. किती दिवस वाळीत टाकणारेत?" पण आमच्या समजवण्याचा फारसा फरक पडत नव्हता.

मध्यंतरी खूप काळ गेला. उमाक्का आणि तिचं कुटुंब वाळीत टाकण्याला जवळपास सहा-सात महिने झाले होते. सहा-सात महिन्यात गावातील एक चिटपाखरूही उमाक्काच्या कुटुंबींयांशी बोलला नाही. आणि यातच एक भलंमोठं संकट उमाक्का आणि तिच्या कुटुंबावर कोसळलं. ते म्हणजे उमाक्काच्या नवऱ्याचं निधन. उमाक्काचा नवरा म्हमजे जानू अण्णा. त्याच्या मरणाची घटनाही अंगाचा थरकाप उडवणारी आहे.

त्याचं झालं असं की, गावातील काही लोकांशी उमाक्काचं पटलं नाही. तिने ते ताणून धरलं, असं बोलतात. मग गावकी बसवून उमाक्काच्या कुटुंबाला वाळीत टाकलं गेलं. वाळीत टाकल्यानतंरही उमाक्काविरोधातील राग गावातील काही जणांच्या मनात कायम होता. वाळीत टाकल्यानंतर सहा-महिन्यांनी उमाक्काचा नवरा जानू अण्णा अचानक गायब झाला. सगळीकडे शोधाशोध सुरु झाली. उमाक्काचे मुंबईत असणारे दोन्ही पोरं गावी आले. रानावनात जानू अण्णाला शोधू लागले. गावातले कुणीच मदतीला आले नाहीत. उमाक्काला तशी अपेक्षाही नव्हती. कारण गावातील लोक साधं बोलत नाही, तिथे नवऱ्याला शोधायला का येतील? उमाक्का, तिची दोन पोरं आणि इतर गावातील तिचे काही नातेवाईक मिळून जानू अण्णांना शोधायला लागले.

पोलीस केस करण्यात आली. पोलीसही शोधाशोध करु लागले. अखेर एके दिवस शोधाशोध सुरु असताना, जवळील कातकरी पाड्यापासून काही अंतरावर जानू अण्णाचा मृतदेह सापडला. उंबराच्या बुंध्यात दोन पाय आणि जवळच्या करवंदीच्या जाळ्यात बाकीचं शरीर, अशा अवस्थेत जानू अण्णाचा मृतदेह सापडला. गावातील काहींनी जानू अण्णाला मारले होते. पुढे पोलिसांनी त्यांना अटकही केली. मात्र, अगदी काल कालपर्यंत उमाक्काला तो धक्का पचवता आला नाही. आपल्या नवऱ्याला असा निर्घृणपणे मारणाऱ्यांना उठता बसता उमाक्का शिव्या देत असे. खूप रडत असे. तिचं रडणं पाहून कधी आपले डोळे पाणावले हेही कळत नसतं. तिचं दु:ख, तिच्या वेदना काय असतील, याचा साधा विचारही करवत नाही.

अशा एकंदरीत भयानक-भयंकर परिस्थितीतून गेली कित्येक वर्षे उमाक्का जात होती. नवऱ्याच्या अशा जाण्याने तिला मोठा धक्का बसला होता. ती मानसिक-शारीरिकरित्या पार खचली होती. मरणाकडेच तिचीही वाटचाल सुरु होती. या जगण्याला काय आर्थ हाय काय”, असं बोलत कित्येकदा रडताना पाहिलंय. तिचं रडणं आठवलं, तरी अंगावार शहारा येतो आणि डोळ्यात अश्रू दाटतात.

आज सकाळी उमाक्काच्या मृत्यूची वार्ता कळली आणि तिच्या आठवणी पुन्हा डोळ्यासमोरुन सरकू लागल्या. या अफाट वेदनेतून उमाक्काची सुटका झाली. ती काही वयस्कर नव्हती. साठीत असावी. पण नवऱ्याच्या टेन्शनने ती सत्तरी पार केलेली वाटायची.

नात्यात-गोत्यात नसतानाही जीव लावणारी माणसं आपल्यातून निघून गेली की, प्रचंड दु:ख होतं. उमाक्का अशातलीच एक.

लव्ह यू उमाक्का. तू कायम लक्षात राहशील.


19 July, 2016

नगरची निर्भया आणि जातीचा चष्मा



निर्भया कोण?


अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डीत माणूस म्हणवून घ्यावयास लाज वाटावी इतका भयानक बलात्कार एका अल्पवयीन मुलीवर करण्यात आला. बलात्कारानंतर नराधमांनी मुलीची निर्घृणपणे हत्या केली. 25 जून 2001 रोजी जन्मलेली निर्भया अवघ्या 15 वर्षांची होती. कर्जतमधील नूतन माध्यमिक महाविद्यालयात नववीच्या वर्गात निर्भया शिकत होती.


घटना काय आहे?


13 जुलै 2016. नेहमीसारखाच दिवस. निर्भया कुळधरणहून म्हणजे आपल्या शाळेतून घरी आली. घरी आल्यावर तिच्या आईने तिला आजोबांच्या घरातून मसाला आणायला सांगितले. 15 वर्षीय निर्भया सायकलने आजोबांच्या घरी गेली. मसाला घेऊन निर्भया आजोबांच्या घरातून निघाली. त्याचवेळी नराधम आजोबांच्या घरापाशी दबा धरुन बसले होते. निर्भया घरी परतत असताना नराधमांनी तिला अर्ध्या रस्त्यात गाठले आणि रस्त्याशेजारी माळरानावर नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला. इतका की माणूस म्हणून घेण्याचीही लाज वाटावी.


नराधमांनी असा केला अत्याचार


नराधमांनी अत्याचार कसा केला, हे मुद्दाम इथे देतोय. याचं कारण तुम्हालाही कळेलं की, माणूस किती निच आणि विकृत दर्जाचा असू शकतो. नराधमांचं कृत्य वाचल्यावर तळपायाची आग मस्तकात जाते. दिसताक्षणी नराधमांवर गोळ्या झाडल्या पाहिजेत, असं वाटतं. इतकं भयानक कृत्य त्या नराधमांनी केलं आहे.

निर्भयावर सामूहिक बलात्कार करताना नराधमांनी तिच्या तोंडात बोळा भरला. तिचे दोन्ही हात-पाय बांधले. तिची मान पिरगळून उलटी केली. छातीसह संपूर्ण अंगावर चावे घेतले. डोक्याचे केस उपटले. अत्याचारानंतर नराधमांनी निर्भयाच्या गुप्तांगात लाकडाने माती भरली. त्यानंतर मृत निर्भयाचं प्रेत रस्त्याच्या पलिकडे फेकून दिलं.

त्यानंतर निर्भया घरी परतली नसल्याने तिची शोधाशोध सुरु झाली. रस्त्याच्या बाजूला लिंबाच्या झाडाखाली निर्भयाच्या काकांना निर्भया मृतावस्थेत पडलेली दिसली. त्यानंतर घटना उघडकीस आली.


घटनेचा सारा तपशील सांगण्यामागचं कारण काय?


या घटेचा सारा तपशील सांगण्याचं कारण तुम्हाला खरंतर समजलंच असेल. अंगात राग संचारलाय ना? तळपायाची आग होतेय ना? होणारच... कारण इतके पाशवी अत्याचार जनावरंही करत नसतील. नराधमांचं हे कृत्य सांगण्याचं हेच मुख्य कारण.


आवाज कुणी उठवला? समाजमाध्यमांनी की प्रसारमाध्यमांनी?


मी स्वत: समाजमाध्यमांवर बऱ्यापैकी सक्रीय असतो. शिवाय, माध्यमांमध्येही काम करतो. त्यामुळे या घटनेबाबत एक निश्चितपणे सांगू शकतो की, समाजमाध्यमं नसती, तर कदाचित नगरच्या निर्भयाचं हे प्रकरण समोर आलंच नसतं किंवा समोर येण्यास आणखी उशीर झाला असता. समाजमाध्यमांवरुन, मग ते फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल, यांवरुन आवाज उठू लागला. त्यानंतरच प्रसारमाध्यमांनी प्रकरण लावून धरलं. आता यात प्रसारमाध्यमांची मी चूक काढणार नाही. कारण घटना कळल्याशिवाय, त्यावर बातमी कशी करणार? मात्र, पुन्हा हाच प्रश्न उपस्थित राहतो की, बारीक-सारीक गोष्टी सर्वात आधी कळणाऱ्या प्रसारमाध्यमांनी पाशवी अत्याचाराची नगरसारख्या मध्यवर्ती जिल्ह्यातील बातमी कळू नये? पण जेव्हा बातमी समोर आली, तेव्हा नक्कीच त्यावर प्रसारमाध्यमांनी आवाज उठवला. हेही डोळेझाक करुन चालणार नाही.

मात्र समाजमाध्यमांनी या प्रकरणाचा आवाज बुलंद करण्यासाठी मोठी भूमिका बजावली, हे नक्की. #नगरचीनिर्भया किंवा #कोपर्डी असे हॅशटॅग वापरुन फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरवरुन आवाज उठू लागल्यानंतर प्रसारमाध्यमं आणि राजकीय नेत्यांनी गंभीरतेने या प्रकरणाकडे पाहावयास सुरुवात केली, हे सत्य आहे. त्यामुळे या प्रकरणात समाजमाध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


जातीय रंग दिला गेला आणि तो योग्य आहे का?


मी कदाचित वादग्रस्त किंवा मला ओळखणाऱ्यांना न पटण्यासारखं बोलत असेन, पण हे खरंय की, का जातीय रंग देऊ नये? निर्भया मराठा समाजातील असून, नराधम दलित आहेत. मग जातीय रंग का देऊ नये, असा प्रश्न उपस्थित होतो. याचं कारण, ज्यावेळी एखाद्या दलित माता-भगिनीवर अत्याचार होतो, त्यावेळी नराधम मराठा असेल, तर सरसकट मराठा समाजाला दोषी ठरवून मोकळे होतात. कारण तेव्हा एका दलित महिलेवर अत्याचार झालेला असतो, मग मराठा मुलीवर अत्याचार झाल्यावर, तो माणूस म्हणून बघण्याची जबरदस्ती का? आणि तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल की, अशा विकृत घटनांकडे जातीच्या चष्म्यातून पाहू नये, तर हा नियम सर्वच घटनांना लावला गेला पाहिजे.

खर्डा घडतो, त्यावेली दलित मुलावर अत्याचार, असं म्हणायचं आणि कोपर्डीवेळी नराधमांना जात नसते, असं म्हणायचं, हा निव्वल सोईस्करवाद आहे. दुटप्पीपणा आहे. नराधमांना जात नसते, हे मलाही पटतं. पण मग ते सर्वच ठिकाणी लागू व्हायला हवं. आपापल्या सोईनुसार लावलेलं, कसं कुणी खपवून घेईल?


समाजमाध्यमांवरील मराठा तरुणं इतकी संतप्त का?


ज्यावेळी खर्डा-जवखेडा घडलं, त्यावेळी दलितावर अत्याचार असे म्हणत सरसकट मराठा समाजाला दोषी धरलं गेलं. शिवाय, मी फेसबुकवरही अनेक पोस्ट, कमेंट्स, फोटो असे पाहिलेत की, ज्यामध्ये लिहिलं गेलेलं की, मराठा समाज असाच अन्याय करणारा आहे. मात्र, त्यावेळी कित्येक दलितेतर लोक खर्डा-जवखेडा घटनांवर आवाज उठवत होते. तरीही सरसकट सर्वच मराठा समाजाला दोषी ठरवलं जात होते. अर्थात याला अपवाद होते. मात्र, अपवाद नगण्य होते. त्यामुळे आता समाजमाध्यमांवरील मराठा तरुण संतप्त झाल्याचे मला दिसतात. काही प्रमाणात ते योग्यही वाटतं. कारण सिलेक्टिव्हपणे वागायला नको. जातीच्या चष्म्यातून बघायचं असेल, तर सर्वच घटनांकडे जातीच्या चष्म्यातून बघा, अन्यथा कुठल्याच नको. मात्र, तसे होताना दिसत नाही.


जाती-पातीच्या चष्म्याबाबत मला काय वाटतं?


खरंतर जातीच्या चष्म्यातून पाहणं चूक ठरेल, असं म्हणणं मुर्खपणाचंच आहे. कारण जातीच्या द्वेषातूनही अनेक हत्याकांडं किंवा अशा घटना घडतात. पण सर्वच घटना अशा नसतात. काही वैयक्तिक वादातूनही असतात. मग अशावेळी आपण जातीच्या नावाखाली एखाद्या समाजाला दोषी ठरवतो. मराठा समाजाला अशाच प्रकारे बदनाम केले गेले, असे मी मुद्दाम म्हणतो. कारण जर मराठा अन्याय करणारेच आहेत, तर मग पानसरे, बी. जी. कोळसे-पाटील किंवा अन्य मराठा समाजिक कार्यकर्त्यांबद्दलही असा आरोप करणाऱ्यांनी आपलं तोंड उघडावं. सिलेक्टिव्ह बोलू नये आणि वागू नये. त्यामुळे एका क्षणी आपल्या साऱ्यांनाच हे ठरवावं लागेल की, जातीच्या पलिकडे जाऊन प्रत्येक घटनकडे पाहायचं की जातीच्या चष्म्यातूनच. अन्यथा, घटनेनुसार जात काढायची की नाही ते ठरत जाईल आणि त्याने जाती द्वेष वाढतच जाईल, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.


सरतेशेवटी....


नगरच्या निर्भयावर पाशवी अत्याचार करणाऱ्यांवर आज ना उद्या कठोर कारवाई होईलच. तपास सुरु आहे. त्यांना फासावर लटकवावं, अशा प्रकारचा तपास झाला पाहिजे. त्यासाठी समाज म्हणून आपण सारे पाठपुरावा केलाच पाहिजे.

कुठल्याही घटनेकडे जातीच्या चष्म्यातून न पाहता, त्या त्या ठिकाणची ती घटना आहे, असं पाहिलं पाहिजे. नाहीतर खर्डातील दलित हत्याकांड आणि कोपर्डीत नुसतं हत्याकांड, हे दुटप्पी आहे. त्यामुळे जातीचे लेबल लावायचे नसतील, तर सर्वच ठिकाणी नको. एखाद्या घटनेला लावायचे आणि एखाद्या घटनेला नाही, हे चूक आहे.


टीप :मी काही विश्लेषक वगैरे नाही. किंवा कुणी मोठा पत्रकारही नाही. मिळालेल्या माहितीनुसार आणि समाजमाध्यमांवरील पोस्ट-कमेंट वाचून, प्रसारमाध्यमांतील बातम्या पाहून, याच समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून मला जे वाटलं, ते लिहिलं. काही आक्षेप असतील, तर namdev.anjana@gmail.comया ईमेलवर कळवा. मी माझी भूमिका रिप्लाय करेन.

15 July, 2016

संतपरंपरा आणि मी



चौथीत असताना स्वत:हून आणि पाचवीत असताना माझ्या हट्टापायी, असे दोनदा आजोबांनी मला पंढरपूरला नेले होते. अर्थात विठू-रखुमाईच्या दर्शनाला. जवळपास दीड दिवस रांगेत उभं राहून विठूरायाचं दर्शन घेतलं होतं. तेही तिथल्या पूजाऱ्यांनी पायाला स्पर्शही करु दिला नव्हता. स्पर्शाला हात पुढे करणार, तोच धक्का देत बाजूला सारत होते.

चंद्रभागेच्या तिरी सकाळी अंघोळीनंतर चार आणे देऊन कपाळी टिळा लावून दिवसभर विठूनामाच्या गजरात सामील व्हायचो. अशाप्रकारे लहानपणापासूनच संतपरंपरा मनात रुजलीय.

आजोबा वारकरी सांप्रदयातील होते. तुळशीमाळ वगैरे घातली नव्हती. पण विठ्ठलाचे परमभक्त. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक वाऱ्या केल्या. पायीही. तेच नाही, आमच्या गावाकडे वारकरी सांप्रदय प्रचंड मोठा आहे. राम सांप्रदाय आत्ता आता नानासाहेब धर्माधिकाऱ्यांमुळे पसरत चाललाय. असो.

तर आजोबांचं विठ्ठल आणि संतपरंपरेवरील प्रेमापोटीच माझं नाव ज्ञानेश्वर. पुढे शाळेत प्रवेश घेताना कुणीतरी ज्ञानदेव सांगितलं आणि गुरुजींना कमी ऐकू आलं बहुतेक, तर त्यांनी लिहिताना नामदेव लिहिलं. मग ज्ञानेश्वरचं ज्ञानदेव आणि ज्ञानदेवाचा नामदेव झालं. आताही गावात ज्ञानदेव म्हणूनच ओळखतात. पण कागदोपत्री नामदेवच. असो. ज्ञानदेव काय किंवा नामदेव काय, दोघेही संतच.

आता नामदेव नाव म्हणून मी काही संत नाही. किंवा कुणी मोठा ठरत नाही. तसं मला वाटतही नाही. संतपरंपरेची कायम ओढ वाटण्याचं कारण आहे या नावात आणि घरातील वातावरणात. सहावीत की सातवीत असताना तुळशीमाळ घालण्यासाठी खूप रडलो होतो. पंचक्रोशीतील प्रसिद्ध किर्तनकार सोनू कदम यांच्याकडे गेलो होतो आणि तुळशीमाळ घालण्यासाठी खूप आरडाओऱड केलेली. "महिनाभर वशान सोड (म्हणजे नॉनव्हेज). महिनाभर साजूक खाऊन राहिलास, तर तुला माळ घालेन", असं सांगून सोनू अण्णांनी मला समजावलं होतं. पण मला काही पुढे जमलं नाही आणि मी माळ काही घातली नाही. पण पंचक्रोशीतील भजनांच्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती लावत असे. माळ घातली नसली, तरी संतपरंपरेबद्दल प्रचंड आदर आहे.

देवपूजेला विरोध आहेच. पंढरपुरात जाऊन विठोबाचं दर्शन घेण्यात अर्थ वाटत नाही. त्यापेक्षा माणसात विठोबा शोधणं, महत्त्वाचं वाटतं. सर्व संत माणूस होते. माणूस होण्याचीच शिकवण देतात. तुकारामाने तर भोंदूगिरी, चमत्कार इत्यादींना आपल्या अभंगातून पार झोडपून काढलं. नामदेवाने तर सनातन्यांचा बळी ठरलेल्या चोखोबाची समाधी विठ्ठलाच्या दारासमोर बांधून समानतेचा झेंडा रोवला. त्याची शिक्षा त्याला पुढे सनातन्यांनी दिली. अशी शिक्षा आपल्याला मिळणार, याची जाणीव देश फिरलेल्या नामदेवाला नसेल, असं म्हणणं मुर्खपणाचं ठरेल. पण ती डेअरिंग नामदेवाने केली. असे सर्वच संत मला जवळचे वाटतात.

एकादशीला उपवास, पूजा वगैरे हे सर्व वारकरी सांप्रदयातील समानतेच्या परंपरेला छेद देणारे आहे.

संतपरंपरा मला मानवताच शिकवते...
एकनाथाच्या ओवीतून...
तुक्याच्या अभंगातून...
नामाच्या दोह्यातून...
गोरा कुंभाराच्या जीवनगाण्यांतून...
जनाईच्या कवितेतून...
सावता माळ्याच्या अभंगातून...

आषाढीनिमित्त थोडं लिहायचं म्हणून हे लिहिलंय. सर्वच फाफटपसारा. पण जे मनात आलं ते लिहिलं. सरतेशेवटी पुन्हा तेच की, उपास-तपास किंवा पूजा-अर्चा करुन काही होणार नाही. संतांचे विचार आत्मसात करुन प्रत्यक्षात आणल्यास अर्थ आहे.


सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...