मी मराठी वाचक. म्हणजे मराठी भाषेतील साहित्य आणि इतर भाषेतून मराठीत आलेले
साहित्य, यापलिकडे फारसं वाचन होत नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अर्थात
भाषेचा अडसर. गेल्या दीड-दोन वर्षांपासून इतर भाषेतील साहित्य वाचन गंभीरपणे सुरु
केलं आहे. पण ते इतर भाषेतून नव्हे, तर मराठी अनुवादित-भाषांतरित झालेलं साहित्य
वाचतोय. प्रत्येक साहित्य त्या त्या भाषेतीलच, म्हणजेच मूळ साहित्य वाचावं, असं
सारखं वाटतं आणि अनुवादन वाचल्यानंतरही ती खंत कायम राहते. कारण मूळ भाषेतील
साहित्य वाचण्यात वेगळी मजा आहे.
उदाहरणादाखल सांगायचं तर, आपण हमीद दलवाई यांच्या इंधन कादंबरीचं उदाहरण घेऊ
शकतो. मराठीतील मूळ इंधन आणि दिलीप चित्र यांनी इंग्रजीत ट्रान्सलेट केलेली ‘Fuel’, या दोन एकच कादंबरी
असल्या, तरी वाचताना कुठेतरी भाषेमुळे फरक जाणवतोच. चित्रेंनी खूप छान ट्रान्सलेट
केलीय. पण तरीही मराठीतील वाचण्यात जी मजा आहे, ती मजा इंग्रजी ट्रान्सलेशन
वाचताना जाणवत नाही. असो.
कथा, कादंबरी किंवा अगदी कविता असो, यांमधून त्या त्या राज्यातील, देशातील
सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थिती आपल्याला कळते किंवा त्याचा किमान
कानोसा घेता येतो. मात्र, भाषेच्या अडसरीमुळे मराठी वगळता इतर भाषेतील साहित्य
वाचताना मोठी अडचण निर्माण होते. माझी तर प्रचंड. कारण शिक्षण मराठीतून, अगदी
अकरावी-बारावी ही कॉमर्सची दोन वर्षे वगळता पदवीपर्यंतच शिक्षण मराठीतूनच झालंय.
त्यामुळे इंग्रजी फारसं नीट येत नाही. इंग्रजीवर कमांड नाही.
तरीही जवळपास वर्षभरापूर्वी ‘Building a New India’ हे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन यांचं पुस्तक वाचायला घेतलं. या दोघांची भाषा सोपी वाटली. काही निवडक
शब्दांसाठी ऑक्स्फर्ड डिक्शनरीची मदत घ्यावी लागली. बाकी संपूर्ण पुस्तक समजलं.
त्यामुळे इंग्रजी वाचनात रस वाटला. या पुस्तकातील ‘Can India Become a Developed
Country?’ आणि ‘Manufacturing for the Future’ ही दोन प्रकरणं तर संसदेत सर्व
खासदारांना आणि प्रत्येक राज्यातील आमदारांनी सक्तीने वाचून काढायला सांगायला
हवीत. इतकी मार्गदर्शक आणि विकासाची वाट दाखवणारं लेखन कलाम आणि राजन यांनी
संयुक्तपणे या दोन प्रकरणांमध्ये केलं आहे. शिवाय, याच पुस्तकातील ‘Visionary Teachers and
Scientist’ हे एक अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादीय प्रकरण यात आहे. बाकीची प्रकरणंही
उत्तमच आहे. इंग्रजीत वाचलेलं पहिलंच पुस्तक इतकं भारी होतं.
पण ज्यावेळी दुसरं पुस्तक हाती पडलं, त्यावेळी मात्र थोडा हिरमोड झाला. ‘Death of Moneylender’ हे Kota Neelima यांचा पुस्तक वाचता-
इंग्रजीवर आपलं थोडंही प्रभुत्त्व नसल्याची तीव्र जाणीव झाली.जवळपास 225 पानांचं
हे पुस्तक 80-90 पान वाचल्यानंतर वाचायचं सोडून दिलं. कंटाळा आला. काहीच समजेना.
एखाद्या वाक्यातील किमान शब्द कळले, तरी वाक्याचा अर्थ लागतो. पण इथे तसंही काही नाही.
क्रियापदांपलिकडे काहीच कळायचं नाही. मग पुस्तक सरळ बाजूला ठेवलं आणि त्यानंतर
इंग्रजीच पुस्तक हाती घेतलं. ते म्हणझे- रजनी कोठारी यांचं ‘Political India’. मूळात आधीपासूनच राजकारणी आवड असल्याने मला
राजकीय परिस्थिती माहिती होती. त्यात रजनी कोठारींबाबत प्रचंड ऐकलेलं-वाचलेलं.
याआधी कुठल्याशा पुस्तकात रजनी कोठारींचा लोकशाहीबाबत लेख वाचला होता. तेव्हापासून
या माणसाचं लेखन वाचण्याचं ठरवलं. मग अखेर ‘Political India’ हाती घेतलं. भारतीय
राजकारणातील डावपेच, युत्या-महायुत्या, भारतीय राजकारणातील विचारधारा आणि त्यांची
बलस्थानं, विविध राजकीय पक्षांचा आर्थिक सुधारणेकडे आणि आधुनिकतेकडे पाहण्यचा
दृष्टीकोन, पक्षांची संस्थात्म रचना, बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतीय
राजकारणाचा प्रभाव इत्यादी अनेक मुद्द्यांवर सखोल लेखन कोठारींनी या पुस्तकात केलं
आहे. ज्यांना भारतीय राजकारणाचा अभ्यास करायाच आहे, त्यांनी हे पुस्तक वाचण्याचं
टाळणं म्हणजे घोडचूक ठरेल. इतकं महत्त्वाचं असं हे पुस्तक.
‘Death of Moneylender’ या पुस्तकामुळे मधल्या काळात इंग्रजी साहित्याबद्दल निराशा
झाली, असली तरी ‘Building a New India’ आणि ‘Politics in India’ या दोन पुस्तकांनी इंग्रजी साहित्य वाचण्यास प्रवृत्त
केलं. त्यानंतर ‘I am Malala : The Girl Who Stood Up for Education and Was Shot by the
Taliban’
पुस्तकाने तर इंग्रजीतलं वाचन वाढयाला हवं, या मताला पोहोचवलं. मूळात इंग्रजी
साहित्यिक रुची माझ्यात निर्माण झाली नव्हती. या पुस्तकांनी मला इंग्रजीची असणारी
भिती घालवली. इंग्रजी साहित्यही मी वाचू शकतो, हा विश्वास मलालाचं पुस्तक
वाचल्यानंतर निर्माण झाला. मूळात मलाला माला प्रचंड आवडते. त्यात आपल्या आवडणाऱ्या
व्यक्तीचा प्रवास वाचणं, यापेक्षा आवडीचं काय असू शकतं? विशेष म्हणजे ‘I am Malala’ वाचताना मला काही निवडक
शब्द आणि काही दहशतवाद आणि शिक्षणाशी संबंधित संकल्पना सोडल्यास कुठलीही अडचण आली
नाही. इतकं सोप्या पद्धतीने लिहिलं गेलेलं हे पुस्तक आहे. वाचतानाही एका फ्लोमध्ये
ते वाचून होतं, हे विशेष. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटच्या समोरील फूटपाथवरुन
खरेदी केलेलं हे 276 पानी पुस्तक, जवळपास एका आठवड्यात वाचून पूर्ण केलं.
परवा छोटंसं पण अत्यंत महत्त्वाचं असं स्वामी विवेकानंदांवरील ‘Life and Message of
Swami Vivekand’ हे पुस्तक वाचून काढलं. भारी पुस्तक. या पुस्तकातील ‘Way to Reneration’ आणि ‘I Shall inspire Men
Everwhere’ ही
दोन प्रकरणं अत्यंत प्रेरणादायी आणि वाचनीय अशी आहेत. आठवी-नववीच्या पुढील मुलांनी
वाचायला हवं. म्हणजे त्याआधीच्या इयत्तेतील मुलंही वाचू शकतात. तसं ‘केवळ प्रौढांसाठी’ असं वगैरे नाहीय. पण सातवी किंवा
त्याआधीच्या मुलांना तितकं समजेल असं वाटत नाही. पण ट्राय करायला काही हरकत नाही.
आता माझ्याकडे दोन इंग्रजी पुस्तक रांगेत उभी आहेत. त्यांना वाचण्याचा
मुहूर्तच सापडत नाहीय. मराठी पुस्तकं वाचून होत नाही, तर त्यांना कुठे हात लावू,
असं झालंय. Meher Pestonji यांचं ‘Sadak Chhap’ आणि Sudhansu Mohanty यांचं ‘Babuspeak & Other Stories’ ही ती दोन पुस्तकं. बघूया, कधी वाचून होतायेत. असो.
तर दोन आठवड्यापूर्वी बोरिवलीच्या शब्द बुक गॅलरीतून विलास सारंग यांचा एक
कथासंग्रह आणला होता. ‘चिरंतनाचा शोध’
नावाचा कथासंग्रह. तो वाचून काढला. आता तुम्ही म्हणाल, विलास सारंग आणि इंग्रजी
वाचनाचा काय संबंध? तर
संबंध आहे. या माणसाने इंग्रजीतही प्रचंड लेखन केलंय. शिवाय, ‘सर्जनशोध आणि लिहिता लेखक’ हे पुस्तक एकदा वाचा. या पुस्तकात
पाश्चिमात्य जगातील लेखकांबद्दल अत्यंत विश्लेषणात्मक लिहून, त्यांना भारतीय
साहित्याशी जोडलं आहे. तर ‘चिरंतनाचा शोध’
कथासंग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे, सारंगांच्या ‘The Women in Cages’ आणि ‘Barrel & Bombil :
A Love Story’ या दोन्ही मूळ इंग्रजीत लिहिलेल्या कथांचं ट्रान्सलेशन या संग्रहात आहे.
सारंगांच्या लेखनाची एक आगळी-वेगळी शैली आहे. मराठीक बऱ्यापैकी वाचन केलंय,
त्यांनाच सारंगांचं लेखन समजू शकतं, असं मला कायम वाटतं. पण एखाद्या नवख्या
वाचकालाही समजू शकतं, नाही असे नाही. प्रचंड शांततेत वाचण्यासारखं सारंगांचं लेखन
आहे. प्रवासादरम्यान वगैरे वाचण्यासारखं नाही.
तर इंग्रजीतलं खूप लेखन वाचायचं आहे. इंग्रजीतून मराठीत आलेलं वाचतोच आहे. पण
मूळ इंग्रजीतलं आणि फ्रेंच, रशियन, जर्मन अशा इतर भाषेतून इंग्रजीत आलेलं लेखनही
वाचायचंय. इंग्रजीने ते एक सोपं केलंय, जगभरातील विविध भाषांमधील लेखन इंग्रजीत
येतं, त्यामुळे सर्वच भाषा शिकण्याची आवश्यकता भासत नाही. पण शेवटी इंग्रजीत
आल्यावर काही बदल होतोच. मूळ लेखन हे मूळच असतं. त्याची तुला अनुवादाशी होऊच शकत
नाही.
इंग्रजीही पासपोर्ट भाषा झालीय. इतर साहित्यात फेरफटका मारायचा असल्यास
इंग्रजी भाषा नावाच्या पासपोर्टची गरज भासते. त्यामुळे मीही इंग्रजी शिकण्याचा
प्रयत्न करतोय. कारण इंग्रजीतील वैचारिक लेखन कळतं. मात्र, कथा-कादंबरी वाचताना
अडचण येते. कारण वैचारिक लेखनात केवळ संकल्पना असतात, इतिहास-घडामोडींचं विश्लेषण
असतं. मात्र, कथा, कादंबरी, कविता इत्यादींमध्ये भावना असते, जी त्या त्या भाषेवर
प्रभुत्त्व असल्याखेरीज कळत नाही. त्यामुळे इंग्रजीवर प्रभुत्त्व मिळवणं मला
अत्यंत गरजेचं वाटतं आणि इंग्रजी भाषा नामक पासपोर्टच्या मदतीने जगभरातील
साहित्याची चौफेर सैर करायचीय.
No comments:
Post a Comment