उमा आक्का गेली. व्हॉट्सअप ग्रुपवर उमा आक्काच्या निधनाचा मेसेज आला. RIP आणि रडण्याचे दोन सिम्बॉल, असा रिप्लाय ग्रुपवर दिला. गावाकडचं कुणी गेलं की, हल्ली असं मेसेजवरच कळतं. फोनकरुन सांगण्याची पद्धत आता इतिहासजमा झालीय. अशा बातम्या कळल्या की, RIP आणि रडण्याच्या सिम्बॉल टाकून जसं आधी चाललंय, तसंच पुढे सुरु होतं. कदाचित या शहरात येऊन संवेदनाच बोथट झाल्या असाव्यात. माहित नाही. पण आज उमा आक्काच्या निधनाची वार्ता कळली आणि तिच्या खूप आठवणी डोळ्यांसमोर सरकू लागल्या.
उमा
आक्का तशी आमच्या नात्यातली नव्हती आणि आमच्या गावातीलही नाही. ज्या गावात शाळेत
शिकायला जायचो, त्या गावातली उमा आक्का. आमच्या गावापासून जवळपास
दोन-अडीच किलोमीट दूर. शाळेत असताना उमा आक्काची माया आम्हाला अनुभवता आली.
म्हसाडी
नावाच्या गावात आम्ही शाळेत जायचो. गावाच्या वेशीवर शाळा. मात्र, दुपारच्या सुट्टीत या गावातील दुकानात काही ना काही खायला घेण्यासाठी
जायचो. त्यावेळी आवर्जून उमा आक्काच्या घराकडून फेरफटका मारायचो. गावात शिरता
पहिलंच घर उमाक्काचं. कोणत्याही परवानगीशिवाय घरात शिरण्याची आणि स्वत:च्या हाताने
पाणी घेऊन पिण्याची, हात-पाय धुण्याची, भूक लागली असेल, तर थेट चुलीवरल्या भांड्यात काय आहे
पाहण्याची परवानगी होती. उमाक्काने कधीच माझं-तुझं केलं नाही. मनाने मोठी असणारी
माणसं खूप कमी असतात. त्यातलीच आमची उमाक्का. माणुसकीचं जिवंत उदाहरण म्हणजे
उमाक्का.
आठ-नऊ
वर्षापूर्वी उमाक्कावर मोठं संकट कोसळलं होतं. त्यांच्या गावातील भांडणामुळे
उमाक्काला गाववाल्यांनी वाळीत टाकलं होतं. आधीच गावाच्या एका कोपऱ्यात घर, त्यात वाळीत. गावातील एकही माणूस तिच्याशी बोलायचा नाही. दुपारी जेवणाच्या
सुट्टीत जेव्हा तिच्या घरी पाणी पिण्यासाठी जायचो, त्यावेळी
चुलीपाशी बसून एकटीच रडत बसलेली उमाक्का आजही मला आठवतेय. “काय
गं उमाक्के, रडायला काय झालं? मेला की
काय तुझा कोण?” असं म्हटल्यावर लुगड्याच्या फाटक्या आणि
मळकटलेल्या पदराने डोळे पुसत म्हणायची, “नाय रं बाबा,
कोण नाय मेलं. घे पाणी घे” असं बोलून ती वेळ
मारुन न्यायची. पण तिचं दु:ख आम्हा मुलांना माहित होतं. आम्ही तिला अनेकदा
समजवायचो, "अगं बोलतील गाववाले. किती दिवस वाळीत
टाकणारेत?" पण आमच्या समजवण्याचा फारसा फरक पडत नव्हता.
मध्यंतरी
खूप काळ गेला. उमाक्का आणि तिचं कुटुंब वाळीत टाकण्याला जवळपास सहा-सात महिने झाले
होते. सहा-सात महिन्यात गावातील एक चिटपाखरूही उमाक्काच्या कुटुंबींयांशी बोलला
नाही. आणि यातच एक भलंमोठं संकट उमाक्का आणि तिच्या कुटुंबावर कोसळलं. ते म्हणजे
उमाक्काच्या नवऱ्याचं निधन. उमाक्काचा नवरा म्हमजे जानू अण्णा. त्याच्या मरणाची
घटनाही अंगाचा थरकाप उडवणारी आहे.
त्याचं
झालं असं की, गावातील काही लोकांशी उमाक्काचं पटलं नाही. तिने
ते ताणून धरलं, असं बोलतात. मग गावकी बसवून उमाक्काच्या
कुटुंबाला वाळीत टाकलं गेलं. वाळीत टाकल्यानतंरही उमाक्काविरोधातील राग गावातील
काही जणांच्या मनात कायम होता. वाळीत टाकल्यानंतर सहा-महिन्यांनी उमाक्काचा नवरा
जानू अण्णा अचानक गायब झाला. सगळीकडे शोधाशोध सुरु झाली. उमाक्काचे मुंबईत असणारे
दोन्ही पोरं गावी आले. रानावनात जानू अण्णाला शोधू लागले. गावातले कुणीच मदतीला
आले नाहीत. उमाक्काला तशी अपेक्षाही नव्हती. कारण गावातील लोक साधं बोलत नाही,
तिथे नवऱ्याला शोधायला का येतील? उमाक्का,
तिची दोन पोरं आणि इतर गावातील तिचे काही नातेवाईक मिळून जानू
अण्णांना शोधायला लागले.
पोलीस
केस करण्यात आली. पोलीसही शोधाशोध करु लागले. अखेर एके दिवस शोधाशोध सुरु असताना, जवळील कातकरी पाड्यापासून काही अंतरावर जानू अण्णाचा मृतदेह सापडला.
उंबराच्या बुंध्यात दोन पाय आणि जवळच्या करवंदीच्या जाळ्यात बाकीचं शरीर, अशा अवस्थेत जानू अण्णाचा मृतदेह सापडला. गावातील काहींनी जानू अण्णाला
मारले होते. पुढे पोलिसांनी त्यांना अटकही केली. मात्र, अगदी
काल कालपर्यंत उमाक्काला तो धक्का पचवता आला नाही. आपल्या नवऱ्याला असा निर्घृणपणे
मारणाऱ्यांना उठता बसता उमाक्का शिव्या देत असे. खूप रडत असे. तिचं रडणं पाहून कधी
आपले डोळे पाणावले हेही कळत नसतं. तिचं दु:ख, तिच्या वेदना
काय असतील, याचा साधा विचारही करवत नाही.
अशा
एकंदरीत भयानक-भयंकर परिस्थितीतून गेली कित्येक वर्षे उमाक्का जात होती.
नवऱ्याच्या अशा जाण्याने तिला मोठा धक्का बसला होता. ती मानसिक-शारीरिकरित्या पार
खचली होती. मरणाकडेच तिचीही वाटचाल सुरु होती. “या
जगण्याला काय आर्थ हाय काय”, असं बोलत कित्येकदा रडताना
पाहिलंय. तिचं रडणं आठवलं, तरी अंगावार शहारा येतो आणि
डोळ्यात अश्रू दाटतात.
आज
सकाळी उमाक्काच्या मृत्यूची वार्ता कळली आणि तिच्या आठवणी पुन्हा डोळ्यासमोरुन
सरकू लागल्या. या अफाट वेदनेतून उमाक्काची सुटका झाली. ती काही वयस्कर नव्हती.
साठीत असावी. पण नवऱ्याच्या टेन्शनने ती सत्तरी पार केलेली वाटायची.
नात्यात-गोत्यात
नसतानाही जीव लावणारी माणसं आपल्यातून निघून गेली की, प्रचंड दु:ख होतं. उमाक्का अशातलीच एक.
लव्ह
यू उमाक्का. तू कायम लक्षात राहशील.
No comments:
Post a Comment