चौथीत असताना स्वत:हून
आणि पाचवीत असताना माझ्या हट्टापायी, असे दोनदा
आजोबांनी मला पंढरपूरला नेले होते. अर्थात विठू-रखुमाईच्या दर्शनाला. जवळपास दीड
दिवस रांगेत उभं राहून विठूरायाचं दर्शन घेतलं होतं. तेही तिथल्या पूजाऱ्यांनी
पायाला स्पर्शही करु दिला नव्हता. स्पर्शाला हात पुढे करणार, तोच धक्का देत बाजूला सारत होते.
चंद्रभागेच्या तिरी सकाळी अंघोळीनंतर चार आणे देऊन कपाळी टिळा लावून दिवसभर विठूनामाच्या गजरात सामील व्हायचो. अशाप्रकारे लहानपणापासूनच संतपरंपरा मनात रुजलीय.
आजोबा वारकरी सांप्रदयातील होते. तुळशीमाळ वगैरे घातली नव्हती. पण विठ्ठलाचे परमभक्त. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक वाऱ्या केल्या. पायीही. तेच नाही, आमच्या गावाकडे वारकरी सांप्रदय प्रचंड मोठा आहे. राम सांप्रदाय आत्ता आता नानासाहेब धर्माधिकाऱ्यांमुळे पसरत चाललाय. असो.
तर आजोबांचं विठ्ठल आणि संतपरंपरेवरील प्रेमापोटीच माझं नाव ज्ञानेश्वर. पुढे शाळेत प्रवेश घेताना कुणीतरी ज्ञानदेव सांगितलं आणि गुरुजींना कमी ऐकू आलं बहुतेक, तर त्यांनी लिहिताना नामदेव लिहिलं. मग ज्ञानेश्वरचं ज्ञानदेव आणि ज्ञानदेवाचा नामदेव झालं. आताही गावात ज्ञानदेव म्हणूनच ओळखतात. पण कागदोपत्री नामदेवच. असो. ज्ञानदेव काय किंवा नामदेव काय, दोघेही संतच.
आता नामदेव नाव म्हणून मी काही संत नाही. किंवा कुणी मोठा ठरत नाही. तसं मला वाटतही नाही. संतपरंपरेची कायम ओढ वाटण्याचं कारण आहे या नावात आणि घरातील वातावरणात. सहावीत की सातवीत असताना तुळशीमाळ घालण्यासाठी खूप रडलो होतो. पंचक्रोशीतील प्रसिद्ध किर्तनकार सोनू कदम यांच्याकडे गेलो होतो आणि तुळशीमाळ घालण्यासाठी खूप आरडाओऱड केलेली. "महिनाभर वशान सोड (म्हणजे नॉनव्हेज). महिनाभर साजूक खाऊन राहिलास, तर तुला माळ घालेन", असं सांगून सोनू अण्णांनी मला समजावलं होतं. पण मला काही पुढे जमलं नाही आणि मी माळ काही घातली नाही. पण पंचक्रोशीतील भजनांच्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती लावत असे. माळ घातली नसली, तरी संतपरंपरेबद्दल प्रचंड आदर आहे.
देवपूजेला विरोध आहेच. पंढरपुरात जाऊन विठोबाचं दर्शन घेण्यात अर्थ वाटत नाही. त्यापेक्षा माणसात विठोबा शोधणं, महत्त्वाचं वाटतं. सर्व संत माणूस होते. माणूस होण्याचीच शिकवण देतात. तुकारामाने तर भोंदूगिरी, चमत्कार इत्यादींना आपल्या अभंगातून पार झोडपून काढलं. नामदेवाने तर सनातन्यांचा बळी ठरलेल्या चोखोबाची समाधी विठ्ठलाच्या दारासमोर बांधून समानतेचा झेंडा रोवला. त्याची शिक्षा त्याला पुढे सनातन्यांनी दिली. अशी शिक्षा आपल्याला मिळणार, याची जाणीव देश फिरलेल्या नामदेवाला नसेल, असं म्हणणं मुर्खपणाचं ठरेल. पण ती डेअरिंग नामदेवाने केली. असे सर्वच संत मला जवळचे वाटतात.
एकादशीला उपवास, पूजा वगैरे हे सर्व वारकरी सांप्रदयातील समानतेच्या परंपरेला छेद देणारे आहे.
संतपरंपरा मला मानवताच शिकवते...
एकनाथाच्या ओवीतून...
तुक्याच्या अभंगातून...
नामाच्या दोह्यातून...
गोरा कुंभाराच्या जीवनगाण्यांतून...
जनाईच्या कवितेतून...
सावता माळ्याच्या अभंगातून...
आषाढीनिमित्त थोडं लिहायचं म्हणून हे लिहिलंय. सर्वच फाफटपसारा. पण जे मनात आलं ते लिहिलं. सरतेशेवटी पुन्हा तेच की, उपास-तपास किंवा पूजा-अर्चा करुन काही होणार नाही. संतांचे विचार आत्मसात करुन प्रत्यक्षात आणल्यास अर्थ आहे.
No comments:
Post a Comment