23 May, 2014

शाळेतील पंधरा ऑगस्टचं भाषण

आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, शिक्षकवर्ग आणि इथं जमलेल्या माझ्या विद्यार्थी बंधू-भगिनींनो.. देशाच्या स्वातंत्र्याबद्दल मी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते शांत चित्तेने ऐकाल अशी मला आशा आहे.....(एक दीर्घ श्वास घेवून... भाषणाची गाडी वेगात सुटते..) १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्या स्वातंत्र्यविरांपैकी एक म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक.. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणाऱ्या टिळकांचा जन्म रत्नागिरीतील चिखली या गावी झाला..... मग जेवढं काही पाठ केलंय धाडधाड बोलून टाकायचं आणि धन्यवाद...जईंद जय महाराष्ट्र... (जय हिंद, जय महाराष्ट्रअसे स्पष्ट शाळेत कुणी बोललेले आठवत नाही..अर्थात मीही नाही), असा समारोप.
छायाचित्र गुगल या संकेतस्थळावरून घेतला आहे
शाळेतल्या अर्ध्याहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थींनीच्या भाषणाची सरुवात आणि समारोप असाच असायचा. फार फार तर टिळकांच्या जागी महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर वा अन्य कोणा स्वातंत्र्यविरांचं नावं असायचं आणि त्यांचं योगदान... मात्र सुरुवात आणि समारोप सारखाच... मीही काही वेगळं भाषण करायचो अशातला भाग नाही... बरं १५ ऑगस्टला भाषण कोण करणार हेही ठरलेलं असायचं.... वर्गात पहिल्या पाचमध्ये येणारी टाळकीच या  भाषण नावाच्या फंदात पडायचे... ध्वजारोहणानंतर शाळेच्या वऱ्हांड्यात बसायचं...व्यासपीठावर शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, आजूबाजूच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक इत्यादी इत्यादी. बाकी शिक्षक सर्व मुलांच्याही मागे बसायचे. मग पाचवीपासून दहावीपर्यंत अशा क्रमाने एक एक जण भाषणाला जाणार... पाचवीची मुलं भाषण करत असताना सहावीची मुलं भाषण लिहून आणलेली कागद शेवटचं एकदा चाळत बसलेला असायची.. छातीत धडधड... काही चुकलं तर सर्वजण हसतील ही भिती... पुढे गेल्यावर गेले चार-पाच दिवस पाठ केलेले भाषण कुत्रा मागे लागल्यासारखं धाडधाड कुठेही न थांबता बोलून टाकायचं... समोरच्यांना भाषणातून काही कळलं, नाही कळलं याच्याशी काडीमात्र घेणंदेणं नसायचं... एकादचं बोलून झालं की चेहरा खांद्याच्या बाजूला वाकवायचा आणि चेहऱ्यावरचा घाम शाळेच्या शर्टाला पुसायचा मग एक दीर्घ श्वास घेवून आपल्या जागी बसायला जायचं.... ज्याचे भाषण उत्तम व्हायचं त्याचं दोन-चार दिवस तरी आजूबाजूच्या चार-पाच गावात तारिफ व्हायची... मग काय गडी एकदम हवेतच... अमक्या अमक्याच्या पोरानं लय भारी भाषणबाजी केलान..पोरगा तसा हुशारच हाय... मेला नाव कमवील बघ... अशी गावातील म्हाताऱ्यांच्या प्रतिक्रिया... खरंच शाळेतील भाषण म्हणजे अविस्मरणीयच. बरं एक सांगायचं राहूनच गेलं... १५ ऑगस्टचं भाषण हे फक्त १५ ऑगस्टलाच नव्हे तर २६ जानेवारीलाही उपोयागाला यायचं.. २६ जानेवारी म्हणजे १५ ऑगस्टचं रिपिट टेलिकास्टचं जणू...त्यामुळे चार-पाच दिवस कठोर मेहनतीने पाठ केलेलं भाषण फुकट जायचं नाही....भाषण लिहून काढलेला कागदही नीट घडी घालून कुठल्यातरी वहीत ठेवून द्यायचा आणि जाननेवारीतच बाहेर काढायचा...
सुदैवाने माझ्या शाळेत माझ्या वक्तृत्वाची नेहमी वाहवा झाली.... वर्गातील पहिल्या तीन क्रमांकांमध्ये यायचो म्हणूनच नव्हे तर वक्तृत्व चांगलं होतं म्हणूनही. फक्त शाळेतच नव्हे तर जिल्हा स्तरावरही शाळेचं प्रतिनिधित्व करण्याचं भाग्य लाभलं...
मुंबईत जेव्हा दहावीनंतरचं शिक्षण घ्यायला आलो तेव्हापासून म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून मुंबईतील अनेक वक्तृत्व स्पर्धांध्ये भाग घेण्याची संधी मिळाली... अनेक वक्तृत्व स्पर्धा जिंकलोही.. अनेक टाळ्या मिळवल्या पण गावच्या शाळेच्या वऱ्हांड्यातील भाषणाची तोड या कुठल्याच स्पर्धांना नाही....

No comments:

Post a Comment

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...