21 November, 2018

माझं नाव ढोंगीपणा!



संध्याकाळचा किस्सा आहे. दोन सहकाऱ्यांसोबत लोकलने घरी परतत होतो. पत्रकारिता, राजकारण वगैरे चर्चा सुरु असताना, सेना-भाजपच्या कारभाराबाबत चर्चा सुरु होती. तेवढ्यात एकजण म्हणाला, "सेना-भाजप युतीच्या 1995 च्या सत्तेवेळी मी 5-6 वर्षांचा होतो. त्यामुळे त्यावेळी जनतेच्या मनात शिवसेनेबद्दल नेमके काय मत होते आणि त्यावेळीही असाच गदारोळ सुरु असायचा का, सेनेचा असाच दुटप्पीपणा असायचा का, ते माहित नाही. पण त्यानंतर जनतेने पुढे 15 वर्षे यांना का सत्ता दिली नाही, ते मात्र गेल्या साडेतीन-चार वर्षांच्या यांच्या वागण्यातून कळलंय."

किस्सा तसा बोलता-बोलता सांगितलेला असला, तरी यात खरंच आजची जनभावना आहे. येणाऱ्या-जाणाऱ्याशी बोलल्यावर ते कळूनही येतं. इतका दुटप्पीपणा सत्तेचा गाडा हाकण्यातून दिसून येतो. विशेषत: शिवसेनेचा दुटप्पीपणा. आता आपण सेनेबाबत बोलतोय म्हणून विस्तृत बोलायलाच हवे. आता दुटप्पीपणाढोंगीपणा आणि शिवसेना हे शब्द एव्हाना समानार्थी झालेत. त्यामुळे किती आणि काय काय बोलावे, हा प्रश्न असला, तरी बोलायला हवे. शेवटी लोकांपुढे आपण यांचं रुपडं मांडलं पाहिजेच.

फार मागे नको जाऊया. अगदी कालचीच घटना घेऊ आणि मग पुढे बोलत जाऊ. काल नवी मुंबईतील एमआयडीसीच्या 30 एकर जागेवर अनधिकृतरित्या उभारलेलं बावखळेश्वर मंदिर पाडण्यात आलं. बावखळेश्वर, श्रीगणेश आणि लक्ष्मीमाता असे तीन मंदिरांचं एक बावखळेश्वर मंदिर बनलं होतं. खरंतर ते अनधिकृत होतं, त्यात सुप्रीम कोर्टाचा आदेश होता, त्यामुळे तोडकाम हे स्वागतार्हच आहे. मात्र, इथे अनधिकृत मंदिराला समर्थन करण्याचा उद्देश नाही, पण इथेही पाहा कसं शिवसेनेचं ढोंगीपण उघड होतं.

बावखळेश्वर मंदिर हे नवी मुंबई एमआयडीसीत बांधलं गेलं होतं. एमआयडीसीवरील नियंत्रण उद्योग मंत्रालयाकडे असते. उद्योगमंत्री सुभाष देसाई आहेत. सुभाष देसाई हे शिवसेनेचे नेते आहेत.

जोश जगा दो हिंदू में... राम खडे है तंबू में..! असे म्हणत अयोध्येकडे कूच करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना घराशेजारील मंदिर तुटत असताना कुठल्या तंबूत बसली होती? बरं ज्या एमआयडीसीच्या जागेवर हे बावखळेश्वर उभं होतं, त्या एमआयडीसीचे सर्वेसर्वा असलेल्या उद्योग मंत्रालयाचे मंत्री यांच्याच पक्षाचे नेते आहेत. मग तिथं जोश नव्हता का दाटून आलाइतकीच मंदिरांची ओढ आहे, तर मग सुभाष देसाईंना सांगून बावखळेश्वर नियमित का केले नाही? बावखळेश्वर या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सेनेने पाडू का दिलंप्रश्न मंदिर अनधिकृत असताना, ते नियमित करण्याचा नाहीय. प्रश्न आहे, यांच्या दुटप्पी आणि ढोंगी राजकारणाचा. मतांसाठी वाट्टेल त्या थराला जाण्याचा यांचा इतिहास आहे.

हे मी दुपारीच एका शिवसैनिकाला सांगत असताना, तो म्हणे, अरे पण बावखळेश्वरचं प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं आणि तिथूनच आदेश होते. या शिवसैनिकांच्या बुद्धीचं पण लई अवघड असतं. अरे बाबांनो, जर बावखळेश्वर मंदिराचं प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं, म्हणून तिथे सेनेचा मंत्री असून काही करु शकत नाही, मग बाबरीचं प्रकरण तर दोन दशकं सुप्रीम कोर्टात आहे, तिथे कुठल्या अत्युच्च आशेने राम मंदिर बांधायला जाता आहात?

हे झालं मंदिरांच्या भावनात्मक राजकारणाबाबत. थोडं ग्राऊंडला यायचं म्हटलं, तरी यांचा ढोंगीपणा काही कमी नाही. राज्यात कमालीचा दुष्काळ आहे. यंदाच्या दुष्काळाची तुलना 1972 च्या भीषण दुष्काळाशी केली जाते आहे. हल्ली पाहतोय, रोज शेतकरी आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. अशा काळात राज्याचा दौरा करण्याचं सोडून हे उद्धव महाराज शेकडो किलोमीटर दूर असलेल्या उत्तर प्रदेशात जाऊन मंदिराचं राजकारण करु पाहत आहेत. राज्याचा दौरा करुन, जनतेच्या खांद्यावर हात ठेवून, आम्ही तुमच्या सोबत आहोत, इतका दिलासा यांच्याकडून अपेक्षित असतो. शासनकर्ते आपल्यासोबत आहेत, आपण कुठलेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे किमान दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटलं असतं. मात्र, ते सोडून हे महाशय भावनेचं राजकारण करत बसलेत. राज्यात स्थिती काय, आपण करतोय काय, याची कल्पना यांना नसावी? खरंतर असेल कल्पना, मात्र ती कल्पना असतानाही असले भावनेचं राजकारण करण्यात गुंतलेल्या शिवसेनेचा ढोंगीपणा जनतेने आता जाणून घ्यायला हवा.

त्याचं असंय की, उठता-बसता-फिरता-दौरे करता करता-सभा घेता घेता-उठ-सूठ सत्तेला लाथ मारण्याची भाषा करणारी आणि आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो या राणा भीमदेवी थाटात फुशारक्या मारणारी शिवसेना आता बावचाळलीय. याचं कारण स्पष्ट आहे. गेली साडेतीन-चार वर्षे दुटप्पीपणाची हद्द यांनी पार केली. सत्तेतून बाहेर पडण्याची वेळही सरुन गेली. सत्तेतून बाहेर पडण्यासाठी अनेकदा संधी आल्या. त्यावेळी त्या त्या मुद्द्यावर सेना सत्तेतून बाहेर पडली असती, तर एक सहानुभूती गोळा करता आली असती. तीही आता मिळणार नाही. कारण आता सत्तेतून बाहेर पडली, तर निवडणुका वर्षभरात असताना, खाऊन-पिऊन बाहेर पडले, असे चित्र निर्माण होईल. त्यामुळे सत्तेतून बाहेर पडता येत नाही. त्यामुळे सेना बावचाळलीय. मग आता लोकांसमोर कसं जायचं, तर मग राम मंदिर असो किंवा इतर भावनेचं राजकारण करत जायचं. कारण भावनेच्या राजकारणाला इथली जनता सहज (दुर्दैवाने!) बळी पडते, हे यांना चांगले ठाऊक आहे. मात्र, आता जनतेनेही समजून-उमजून यांच्याकडे पाहिले पाहिजे.

जनतेला गृहित धरणे, हे सेनेचे आता तत्व झाले आहे. एरवी आशिष शेलारांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत आणि रावसाहेब दानवेंपासून अमित शाह आणि नरेंद्र मोदींपर्यंत कधी 'समाना'तून, तर कधी कथित विराट सभेतून, टीकेची झोड उठवणारे हे उद्धव ठाकरे अटीतटीच्या वेळी मात्र तलवार म्यान करुन लपून बसतात. हेच अविश्वासाच्या ठरावावेळी आणि त्याआधी व त्यानंतरही अनेकदा या महाराष्ट्राने पाहिले आहे.

सत्तेला विरोध करणं, ही केवळ विरोधकांचीच मालकी आहे, अशातला भाग नाही. सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांच्या कोणत्या निर्णयाला विरोधच करायचा नाही, असेही नाही. पण त्यात दुटप्पीपणा नसावा. सेनेच्या बोलण्यात आणि चालण्यात अंतर दिसतो. दुटप्पीपणा दिसतो. ढोंगीपणा दिसतो.

2014 साली सत्तेत येण्यासाठी सेनेच्या जाहिरातीत तुझं नाव काय?’ या प्रश्नाला उत्तर देताना माझं नाव शिवसेना असं उत्तर येत होतं. आता सेनेने प्रश्न तोच ठेवून, उत्तरात फक्त बदल करुन, माझं नाव ढोंगीपणा’ असं म्हणावं. म्हणजे उत्तराला परिपूर्णता प्राप्त होईल.

नामदेव अंजना www.namdevanjana.com

20 October, 2018

उद्धव ठाकरेंच्या नादाला लागू नका!


 

शिवसेनेचा दसरा मेळावा आता हसरा मेळावा झालाय. सातत्याने काही दशके हा मेळावा घेतल्याने सेनेचा तो एक नियमित कार्यक्रम असला, तरी कधीकाळी सेनेचे राजकीय प्रतीक होते. आता त्याचे महत्त्व तितकेसे उरले नाही. अर्थात याला कारणीभूत उद्धव ठाकरेंचे तकलादू नेतृत्व हेच आहे. कारण त्यांच्या दुटप्पी धोरणांनी मेळाव्याची, भाषणांची पत पार धुळीस मिळवलीय. त्यामुळे दसरा मेळाव्याचे तसे आकर्षण कट्टर वगैरे म्हणवणाऱ्या शिवसैनिकांच्या पलिकडे आता फारसे उरले नाही.
 
पूर्वी सेनेच्या दसरा मेळाव्यातून घोषणा व्हायच्या. दसरा मेळाव्यातून बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना विशिष्ट कार्यक्रम द्यायचे. पुढे ते अवलंबले जायचे. पक्षाची भूमिका जाहीर व्हायची. वगैरे वगैरे. त्यामुळे दसरा मेळाव्यात एक्स्क्लुझिव्हनेस होता. पर्यायाने या मेळाव्याची राजकीय विश्लेषक आणि माध्यमांमध्ये उत्सुकता असायची. आता प्रत्येक मुद्द्यावर सेनेच्या कोलांटीउड्या इतक्या वाढल्यात की, दसरा मेळाव्यातून जाहीर केलेली भूमिका दिवाळीपर्यंत तरी कायम राहील का, असा प्रश्न पडावा इतकी भयंकर अविश्वासार्हता सेनेच्या नावे गोळा झालीय.
 
आता कालच्या दसरा मेळाव्यावर येऊ. नेहमीप्रमाणे रटाळ आणि तेच तेच बोलून उद्धव ठाकरे यांनी आपले भाषण आटोपते घेतले. उगाच मोठमोठे आक्रमक शब्द वापरुन समोरील श्रोत्यांना भूलवत राहायचे हे ठाकरे घराण्याचे (आमचे वैचारिक बाप प्रबोधनकार यांना वगळून.) कसब आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणात सुद्धा वेगळे काही गवसले नाही. एक गोष्ट फक्त वेगळी घडली, ती म्हणजे उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबर रोजी स्वतः अयोध्येत जाऊन मंदिर कधी बांधणार हा प्रश्न विचारणार आहेत.
 
राज्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे, अनेक ठिकाणी आतापासूनच टँकर सुरु झालेत, मेळघाटात कुपोषणामुळे गेल्या वर्षभरात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, तसे परवाच हायकोर्टात सांगण्यात आले, अनेक असंघटित कामगार आपल्या मागण्या घेऊन आझाद मैदानात दिवस दिवस उपाशी बसलेले असतात इत्यादी नाना समस्या राज्यासमोर आ वासून उभ्या असताना उद्धव ठाकरे नामक नेत्याला, जो महाराष्ट्रातील ५० वर्षे जुना पक्ष चालवतो, त्याला कोणता प्रश्न मोठा वाटावा? - तर अयोध्येत राम मंदिर कधी बांधणार?
 
उद्धव ठाकरे हे काही लोकनेते नाहीत. त्यांचा शहरी जनतेशी वगळता, खेड्या-पाड्यातील जनतेशी फारसा संबंध नाही. त्यामुळे जमिनीत पावसाविना पडलेल्या भेगांचा अर्थ त्यांच्या गावी नाही. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील गटारांची पाहणी करणे, इथवर त्यांच्या जनतेच्या काळजीची मर्यादा गोठलेली आहे. आणि त्यामुळेच राज्यातली जनता नाना समस्यांना तोंड देत असताना, हे उद्धव ठाकरे राम मंदिर बांधण्यासाठी आग्रही राहतात. जनतेशी नाळ तुटल्यावर वेगळे काही अपेक्षित नसते म्हणा.
 
आता तुम्ही म्हणाल, मग जनता शिवसेनेला इतकी मते का देते. तर यावर माझे काही विश्लेषण आहे. शहरातील जनता यांच्या भावनिक भूलथापांना भुलते आणि ग्रामीण भागात त्या त्या भागातील स्थानिक आमदार काम करतात म्हणून यांना मते मिळतात. अन्यथा राम मंदिर किंवा हिंदुत्व वगैरे मुद्द्यांवर सेनेले ग्रामीण भागात कुणीच (कुणीच ऐवजी कुत्रे असे म्हणायचे होते, पण तो संबंधित प्राण्याचा अपमान ठरेल. असो.) विचारणार नाही. म्हणून तर इतकी वर्षे हे सत्तेपासून दूर राहिले. असो.
 
सत्तेत राहून, सत्तेची चव चाखून, सत्तेची फळे खाऊन, पुन्हा त्याच ताटात मुतायची पद्धत आताच्या सेनेची आहे. काल दसरा मेळाव्यात तर सेनेचे रामदास कदम म्हणाले की, मंत्रालयातील कचरा शिवसेना काढून टाकेल आणि भगवा फडकवेल. मुळात रामदास कदम यांची मेंटल लेव्हल जगजाहीर आहे. पण तरी, हे स्वतःलाच कचरा म्हणतात, इतकी बुद्धी नसावी? असो. आताचा मुद्दा राम मंदिराचा आहे.
 
राम मंदिराची इतकीच कणव या उद्धव ठाकरेंना आहे, तर केंद्रातून - राज्यातून सत्तेतून बाहेर का पडत नाहीत? सत्तेत पण राहायचे आणि सत्तेला प्रश्न विचारायचे, असले उपटसुंभ धंदे हे लोक बंद का करत नाहीत? बरं, यांचे सगळे प्रश्न सत्तेला असतात, ज्या सत्तेत हे लोक पण असतात. च्यायला त्या टॉम अँड जेरीमध्ये जेवढे लॉजिक असते, तेवढे सेनेच्या भूमिकांना पण नाहीय.
 
हा झाला सेनेचा मुद्दा. आता जरा लोकांच्या अंगाने विचार करु. आपण गृहीत धरु की, उद्धव ठाकरेंच्या अयोध्येत जाण्याने राम मंदिर उभारणीस सुरुवात होईल. मात्र त्याने आपल्या पोटाचा प्रश्न सुटणार आहे का, राज्यातली पाणी टंचाई मिटणार आहे का, कुपोषण संपणार आहे का, शिक्षण मिळणार आहे का, आरोग्याच्या सुविधा मिळणार आहेत का? अर्थात, याचे उत्तर कुणीही शहाणा (शिवसैनिक सोडून) माणूस 'नाही' असेच देईल. मग या मुर्खांच्या नादाला लागून आपल्या आयुष्याचे तीनतेरा का वाजवून घ्यायचे?
 
उद्धव ठाकरे अयोध्येत जातील, तिथे त्यांना हाय-सेक्युरिटी असेल. असे होऊ नये, पण तिथे काही झाले तर त्याची जबाबदारी कुणाची? बाबरी विध्वंस या देशाने पाहिला आहे. त्यानंतर झालेल्या दंगली या देशाने पहिल्या आहेत. त्यात कित्येक निरपराध चिरडले गेले, मारले गेले. हे आपल्याला पुन्हा हवे आहे का? पुन्हा धार्मिक तेढ हवा आहे का? आपल्याला आपला जीव गमवायचा आहे का? याचा विचार आपण करायला हवा.
 
उद्धव ठाकरेंना काही होणार नाही. किंवा त्यांचा मुलाला सुद्धा. मुलगा तर मरीन ड्राईव्हवर एसी टॉयलेट बांधणे, वर्सोवा बीचवर तोंडाला फडके बाधून साफसफाई करणे यापलीकडे जात नाही. असले हे ठाकरे इतर बहुजन वर्गाला पुन्हा अयोध्येच्या माध्यमातून धंद्याला लावतील. यांच्या घरचे काही जात नाही. ज्यांचे जाते, त्यांनी याकडे गांभीर्याने बघायला हवे आणि ठरवायला हवे. राम मंदिराने आपले पोट भरणार नाही. आपल्या जगण्याचे मुद्दे वेगळे आहेत, प्रश्न वेगळे आहेत, हे आपण समजून घेतले पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या नादाला लागून काडीचा फायदा नाही.
 
दोस्तांनो, रामाला माना किंवा बाबरीचा आदर करा किंवा आणखी काही. पण या धार्मिक भावना मनात असू द्या. देव-धर्माने उंबरठा ओलांडला की, जीव जातो. हे आपण दहीहंडीत पडून मेलेल्या, गणपतीत बुडून मेलेल्या आणि दसऱ्यात ट्रेन खाली चिरडून मेलेल्या घटनांवरून समजून घेतले पाहिजे. आणि आपण आपला देव-धर्म घरात ठेवू इच्छित असताना, उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते उंबरठ्याच्या बाहेर आणण्यासाठी उद्युक्त करतात. कारण त्यांच्या घरचे कुणी मरत नसते, मारतो तो तुमच्या - आमच्या घरातील निष्पाप जीव.
 
 
नामदेव अंजना | www.namdevanjana.com

14 October, 2018

मी टू आणि माझे काही मुद्दे


१) तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले. तिने पोलीस तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाला. महिला आयोगाने दखल घेतली. पुढे चौकशी होईल.
२) साजिद खानवर आतापर्यंत चार महिलांनी आरोप केले. त्यात एक पत्रकार, दोन अभिनेत्री आणि एक सहदिग्दर्शिका आहे. यातल्या दोघींचे आरोप सारखे आहेत. म्हणजे कपडे काढायला सांगितले.
३) आलोकनाथ यांच्यावर आतापर्यंत तीन जणींनी आरोप केले. त्यात ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी, विनता नंदा यांचाही समावेश आहे. नंदा आणि हिमानी यांना प्रसिद्धीचा हव्यास आहे, असे त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवसावरून तरी वाटत नाही.
४) बीसीसीआयच्या सीईओवर आरोप केला. ते कुण्या सिने अभिनेत्रीने नव्हे. तिथेही प्रसिद्धीचा हव्यास असण्याचा प्रश्न नाही.
५) एम जे अकबर यांच्यावर आरोप सहकारी पत्रकार महिलांनी केलेत. या पत्रकार महिलांना प्रसिद्धीची काय गरज? आणि असतीच तर त्या आतापर्यंत का गप्पा बसल्या असत्या?
ही काही मोजकी आणि बातम्यांमध्ये असलेली उदाहरणे. वरील सर्व प्रकरणे कुठल्या ना कुठल्या यंत्रणेतून चौकशीच्या फेऱ्यात येतील. म्हणजे कायदेशीर मार्गाने जातील. मग प्रसिद्धी कसली? असो.
आपण या चळवळीवर जे आक्षेप घेतले जातात, त्यावर बोलू :
१. एवढी वर्षे काय करत होतात? ---
मुळात न्याय मागण्याला ठराविक काळ कसा असू शकतो? आपल्यावरील अन्यायाला वाचा फुटली पाहिजे, ही जाणीव झाल्यावर व्यक्त होण्यात गैर काय? आणि तसेही, पीडित महिलेला/पुरुषाला त्या वेळेला न्याय मिळेल वाटले नसावे, किंवा आरोपी इतकी ताकदवान आहे की व्यवस्थेवर दबाव टाकू शकते असे वाटले असावे, किंवा आरोपी आपले करीयर संपवू शकते असे वाटले असावे, किंवा त्या त्या वेळची आणखी काही मजबुरी असावी..... या शक्यता नाकारता कशा येतील? मध्यंतरी काही काळ गेला, हा अन्याय झाला नसल्याचा निकष कसा असू शकतो?
२. प्रसिद्धीचा हव्यास ---
आलोकनाथ प्रकरणात हिमानी शिवपुरी, विनता नंदा या पीडित आहेत, बीसीसीआय सीईओ प्रकरणात सर्वसामान्य नोकरदार महिला आहे, साजिद प्रकरणात पत्रकार आहे. समाजातील जबाबदार क्षेत्रातील महिला आणि वर्षानुवर्षे प्रसिद्धीपासून लांब असणाऱ्या महिला जर आरोप करत असतील, तर त्यांना सुद्धा प्रसिद्धीचा हव्यास म्हणून बाजूला सारायचे? आणि उडदामाजी काळे गोरे असणारच. जाहीर व्यासपीठावरील चळवळ म्हटल्यावर त्यात आपली पोळी भाजणारे काही नग असणारच. पण म्हणून संपूर्ण चळवळीला बदनाम कसे ठरवतं येईल?
३. पोलिसात/कोर्टात जा, सोशल मीडियावर का? ---
कालची घटना आहे. टाइम्स नाऊच्या क्राईम रिपोर्टरला अज्ञातांनी बेदम मारहाण केली. तो रिपोर्टर अंगावरील जखमा, रक्त तसेच घेऊन पोलिसात तक्रार दाखल करायला गेला, पोलीस त्याला उलट विचारतात, तुला मारहाण झाली कशावरून, पुरावा काय? यावरून आपल्या व्यवस्थेचे आजचे रूप दिसून येईल. मग त्यावेळी पीडित महिलांना सुद्धा असे वाटले असावे, तर नवल काय? आणि त्यावेळी काही झाले तरी आपलीच बदनामी होईल, असे वाटले असावे आणि आज सगळ्या बोलायला लागल्यानंतर अंगात धाडस आले असेल, तर चूक काय? आणि तसेही अन्याय झाला असेल, तर ते कुठल्या माध्यमातून किंवा व्यासपीठावरून व्यक्त करावे, हा मुद्दा गौण ठरायला हवा.
४. फक्त शहरातील महिला, गावाकडील महिलांचे काय? ---
ज्यांच्याकडे जे व्यासपीठ आहे, त्यावरुन त्या व्यक्त होत आहेत. काहींच्या घरात मीडिया पोहोचते आहे, काहींना सोशल मीडिया योग्य वाटतोय. पण प्रश्न असा की, ग्रामीण भागातील महिलांचे काय? हा प्रश्न पीडित महिला किंवा त्यांना समर्थन देणाऱ्या लोकांना विचारण्याऐवजी आपल्या व्यवस्थेच्या ठेकेदारांना विचारले पाहिजे. ग्रामीण भागात दबलेला आवाज बाहेर येईल, इतकी सुरक्षित, आपलीशी वाटणारी आणि निर्धास्त करणारी यंत्रणा या शासनाने उभारली पाहिजे, असे आपण पीडित किंवा पीडितांना समर्थन देणाऱ्यांना विचारण्याऐवजी शासनाला विचारले पाहिजे.
५. बदनामी केली जाते, त्याचं काय? ---
या चळवळीचा बदनामीसाठी वापर करणाऱ्या असतीलही, पण त्यांची संख्या काय, त्या कोण आहेत, कुठल्या क्षेत्रातल्या आहेत, याची आकडेवारी आणि एकामागोमाग एक विशिष्ट एखाद्या व्यक्तीवर गंभीर आरोप करणाऱ्या जबाबदार स्त्रियांची आकडेवारी काय, याची तुलना आपण करणार आहोत की नाही? इथे कायद्यांचा दुरुपयोग केला जातो, तिथे नेतृत्व नसलेल्या एखाद्या चळवळीचे काय घेऊन बसलात? आणि अर्थात, मी टू ही गंभीर चळवळ आहे, हे जाणून प्रत्येक स्त्री किंवा पुरुषाने व्यक्त झाले पाहिजे, कुणाचीही नाहक बदनामी यातून करू नये, जेणेकरुन मूळ गंभीर आरोपांना आणि पीडितांना याचा फटका बसेल, अशी आशा आपण बाळगू शकतो. आशा यासाठी कारण ही जाहीर व्यासपीठावरील चळवळ आहे, आपण कसे नियंत्रित करणार आहोत?
शेवटी एक महत्त्वाचे... शोषितांचा आवाज स्वतंत्र होऊ लागला की शोषक खाडकन जागे होतात आणि प्रश्न उपस्थित करून पुन्हा आवाज दाबायला बघतात, हे काही नवीन नाही. आज महिलांच्या बाबतीत होतंय, काल-परवा आणखी कुठल्या तरी समूहाबाबत होत होते. एवढेच. असो.

नामदेव अंजना | http://www.namdevanjana.com/ 

23 August, 2018

नय्यर साब


कुलदीप नय्यर काय करायचे की, वाघा-अटारी सीमेवर जायचे. दरवर्षी १४ किंवा १५ ऑगास्टला. आणि तिथे जाऊन मेणबत्त्या लावायचे. हे गेली पंधरा - सोळा वर्षे सुरू होते. यामागे उद्देश एकच - भारत आणि पाकिस्तान या दोन देशात शांतता प्रस्थापित व्हावी. किती छोटीशी कृती, पण किती उदात्त अर्थाचा संदेश!
आज कुलदीप नय्यर यांचं निधन झालं. आता यापुढे सीमेवर जाऊन मेणबत्त्या पेटवून शांततेचा संदेश कोण देईल की नाही, ते माहित नाही. पण १४ आणि १५ ऑगस्टला वाघा अटारी सीमा 'कुलदीप नय्यर' नावाच्या शांतीदूताची वाट पाहत राहील, एवढं नक्की.
स्वातंत्र्यपूर्व भारतात जन्म. आता पाकिस्तानात असलेलं सियालकोट हे जन्मगाव. वयाच्या पंचविशी-तिशीत फाळणी झाली. त्यामुळे फाळणीच्या जखमा झाल्या, त्यावेळी ते जाणते होते. दोन्हीकडील लोकांचे अश्रू त्यांनी पाहिले होते. कदाचित म्हणूनच या दोन देशांनी शांततेत राहावे, यासाठी मरेपर्यंत त्यांचा जीव तुटत राहिला.
दोन वर्षांपूर्वी अरुण शेवते सरांच्या ऋतुरंग दिवाळी अंकात फाळणीचा अनुभव कुलदीप नय्यर यांनी कथन केला आहे. वाचताना अंगावर काटा येतो. काय तो थरार!!!
कितीतरी ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार होता हा माणूस. फाळणी असो वा भारत - पाकिस्तान युद्ध, आणीबाणी असो वा देशाच्या खासगी रणनीती.
लाल बहादुर शास्त्री यांचे ते माध्यम सल्लागार होते. शास्त्रींचे निधन झाले, त्यावेळी ते त्यांच्यासोबत होते. शास्त्रींच्या निधनाच्या कारणाबाबत अजूनही दबक्या आवाजात संशय घेतला जातो. या विषयावरही अधिकाराने आणि नेमके बोलणारे नय्यर हेच होते. ते अनेकदा बोललेही. नाही असे नाही.
भारत पाकिस्तान यांची फाळणी ज्या इंग्रज अधिकाऱ्याने केली. म्हणजे ज्याने पाहणी करून सीमा रेषा आखून दिली, त्या रेडक्लिफ या अधिकाऱ्याची लंडनमध्ये जाऊन नय्यर यांनी भेट घेतली आणि फाळणी नक्की कशी झाली, याची माहिती घेतली. नकाशा होता का, किती शहरे इकडे, किती शहरे तिकडे असे काही ठरले होते का, हे नय्यर यांनी त्याला विचारले होते. त्याचा दस्तऐवज सुद्धा त्यांच्याकडे होता.
स्वातंत्र्योत्तर भारताची वाटचाल, धोरणे, चुकीचे निर्णय वगैरे गोष्टींवर अधिकाराने बोलणारा, माहिती देणारा माणूस आपण आज गमावला.
८० हून अधिक वृत्तपत्र, १४ विविध भाषांमधून लेखन, अनेक पुस्तके, व्याख्याने... विचारविश्व किती मोठे होते या माणसाचे!!
कुलदीप नय्यर आज गेले. ९५ वर्षांचे होते. वय झालेच होते. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता नांदावी म्हणून आपल्या पत्रकारितेच्या पलिकडे जात प्रयत्न करणारा सच्चा मानवतावादी आज हरपला.
खरं सांगतो, आज भारत - पाकिस्तानच्या सीमेवरील तीक्ष्ण काटेरी कुंपण सुद्धा भावूक झालं असेल. नय्यर साब, तुम्हाला आदरांजली.

नामदेव अंजना | www.namdevanjana.com

22 August, 2018

गुरुदास कामत : विद्यार्थी नेता ते केंद्रीय मंत्री


ऑफिसमधून घरी येताना शेअर टॅक्सीने येत होतो. अंधेरीहून निघाल्यानंतर पुढे गोरेगावपर्यंत बोरीवलीकडे जाणाऱ्या मार्गावरील स्ट्रिट लाईट पोलवर बॅनर अडकवले होते. राजीव गांधींचा मोठा फोटो आणि खाली उजव्या कोपऱ्यात गुरुदास कामत यांचा छोटासा फोटो.
टॅक्सीत असल्याने बॅनरवरील मजकूर नीट वाचता येत नव्हते. बॅनरवर काय लिहिले होते ते, कळत नव्हते. पण आजच गुरुदास कामत यांचं निधन झाल्याची बातमी करुन आलो होतो. त्यामुळे मनात अंदाज लावला, गुरुदास कामत यांना श्रद्धांजली अर्पण करणारे पोस्टर असतील. पण विचार आला, मग राजीव गांधी का पोस्टरवर? स्थानिक कुणीतरी कार्यकर्ते असायला हवे होते.
पुढे एका ठिकाणी ट्राफिकमध्ये अडकलो, तेव्हा बॅनरवरील मजकूर वाचला. तर ते बॅनर राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त (20 ऑगस्ट) आदरांजली अर्पण करणारे होते. गुरुदास कामत यांनीच लावलेले.
गुरुदास कामत हे राजीव गांधी यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. असे म्हटले जाते की, गुरुदास कामत युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना राजीव गांधी मुंबईत दौऱ्यानिमित्त आले की, त्यांची गाडी चालवण्यापासून सर्व पाहत असत. (या पोस्टसोबत जोडलेला फोटो पाहू शकता. यातही युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना गुरुदास कामत गाडी चालवत आहेत, आणि मागे राजीव गांधी बसलेत.) पक्षाचा वरिष्ठ म्हणूनच नव्हे, तर वैयक्तिकरित्या ते राजीव गांधींच्या प्रभावात होते. त्याच राजीव गांधी यांना जयंतीदिनी आदरांजील अर्पण करणारे लावलेले बॅनरही उतरले नाहीत, तोच गुरुदास कामत यांचं निधन झालं. आता त्याच ठिकाणी उद्या त्यांचे बॅनर लागतील. हा विचार करुनच काळजात थोडसं धस्स झालं.
गांधी घरण्याचे ते कायमच एकनिष्ठ राहिले. पक्ष सोडण्यापर्यंत पावलं नेली असताना, केवळ गांधी कुटुंबीयांच्या आदराखातर ते शांत बसले.

गुरुदास कामत शांत स्वभावाचे होते. पार्ल्यात असताना कृष्णा हेगडे यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांची दोन भाषण ऐकलीयेत. शांतपणे बोलणं, हे वैशिष्ट्य. उगाच अकांडतांडव नव्हता. संजय निरुपम यांच्यासारख्या काहीशा आक्रमक नेत्याशी त्यांचं कधीच पटलं नाही, ते बहुधा त्यांच्या या शांत स्वभावामुळेच असावे.
गुरुदास कामत यांना घरातून कोणताच राजकीय वारसा नव्हता. वडील खासगी क्षेत्रात होते. कुर्ल्यात लहानाचे मोठे झालेले गुरुदास कामत यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी संघटनेपासून आपला प्रवास सुरु केला. म्हणजे ग्राऊंडपासून.
गुरुदास कामत यांना राजकारणात जे काही मिळाले, ते आयतं मिळालं नाही. मेहनत, एकनिष्ठपणा आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी सर्व पदं मिळवली. पोद्दार कॉलेजचा विद्यार्थी संघटनेचा सेक्रेटरी ते गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष, त्यानंतर काँग्रेसचा सदस्य ते युवक काँग्रेसचा अध्यक्ष, पुढे आपल्या गुणांच्या जोरावर ते अगदी केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचले.

मुंबई काँग्रेस आणि गुरुदास कामत हे एक समीकरण बनले. मुंबईतल्या पहिल्या पाच नेत्यांमधील गुरुदास कामत होते. मुरली देवराही होते. मात्र मुरली देवरा हे कायमच उच्चभ्रूंचे नेते वाटायचे. ते कधीच कार्यकर्त्यांसोबत मिसळले नाहीत, असे जाणकार सांगतात. गुरुदास कामत तसे छोट्य-मोठ्या आंदोलनातही रस्त्यावर उतरत. म्हणून तर संजय निरुपम यांच्याशी वादानंतर मुंबई काँग्रेस आरपार दुंभगल्यासारखी झाली होती. आणि हाय-कमांडला हस्तक्षेप करावं लागलं होतं.
गुरुदास कामत यांच्या जाण्याने राज्यात किंवा देशात काँग्रेसला मतांच्या दृष्टीने फारसा फरक पडणार नाही, हे स्पष्ट आहे. मात्र केवळ तिकिटांसाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्या नेत्यांच्या काळात गुरुदास कामत यांच्यासारखा कमालीचा एकनिष्ठ नेता काँग्रेसने आज गमावला, एवढं निश्चित.
उद्या ऑफिसमधून येताना, हायवेवरील त्याच बॅनरच्या जागी गुरुदास कामत यांना आदरांजली वाहणारे बॅनर पाहताना, कामतांचा हा प्रवास पुन्हा आठवेल, एवढं नक्की. गुरुदास कामत यांना मनापासून आदरांजली.

नामदेव अंजना | www.namdevanjana.com

17 August, 2018

स्पायडर आणि मसणजोगी

ढसाळ लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये सविता प्रशांत यांची ‘मसणवाटा’ डॉक्युमेंट्री पहिली होती. त्यानंतर आणखी माहितीसाठी शोधाशोध केली होती, त्यावेळी प्रशांत पवार यांचा दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेला लेख वाचला. आमच्या गावाकडं (रोहा-रायगड) मसणजोगी समाज नाही, त्यामुळे ते भयंकर अन् विदारक जीणं कधी पाहिलं नव्हतं, त्याबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे डॉक्युमेंट्री पाहिल्यावर आणि नंतर प्रशांत पवारांचा लेख वाचल्यानंतर अधिक अस्वस्थ वाटलं होतं.
“आम्ही लोकांच्या मरणाची वाट पाहत असतो. कारण कुणीतरी मेला, तर आमच्या पोटाला अन्न मिळण्याची तजवीज होणार असते”, अशा आशयाचे संवाद त्या डॉक्युमेंट्रीमध्ये ऐकल्याचे आठवते.
मसणजोगी हा भटक्या जमातींपैकी समाज. गावकुसाबाहेर पालावरचं त्यांचं जगणं. अंत्यविधीसाठी लाकडं पुरवण्यापासून सरण रचण्यापर्यंतची कामं हा समाज करतो. स्मशाणातच झोपडी बांधून, मसणवट्याची राखण करतो. मेलेल्या व्यक्तीचे कपडे, वस्तू हक्काने मागून ते वापरतात. त्यांना त्यात काहीही वावगं किंवा भितीदायक वाटत नाही. कारण तेच मसणजोगी समाजाचं जगणं बनलंय. एकंदरीत जिथे इतर माणसांचा मृत्यू होऊन शेवट होतो, तिथून मसणजोगी समाजातील लोकांच्या जगण्याची सुरुवात होते.
किती भयंकर आहे हे! पण हे वास्तव आहे. आजही महाराष्ट्रात हा समाज आहे. कुणाच्यातरी मरणाची वाट पाहत, रोज सकाळी उठतो. कारण त्याचे जगणे कुणाच्यातरी मरणावर अवलंबून असते. असले विदारक जगणे आपल्याच राज्यात, आपल्यापासून काही भौगोलिक अंतरावर असताना आपण विकास आणि प्रगतीच्या गप्पा मारतो, हे किती विसंगत आहे!
मसणजोगी समाजाशी संबंध सांगणारा ‘स्पायडर’ हा सिनेमा २०१७ साली तामिळ, तेलुगू भाषेत प्रसिद्ध झाला होता. आता तो हिंदीत सुद्धा डब करण्यात आलाय. त्यामुळे पाहण्याची संधी मिळाली. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता महेशबाबू ‘स्पायडर’मध्ये मुख्य भूमिकेत आहे. थ्रिलरपट असणारा हा सिनेमा समाजातील अत्यंत महत्वाच्या विषयाला अप्रत्यक्षपणे हात घालतो. मात्र आपल्याकडे फक्त तो थ्रिलर म्हणूनच पाहिला जाईल. मला त्या सिनेमातल्या खलनायकाच्या आयुष्याचा धांडोळा घेण्यात आणि त्यावर बोलण्यात स्वारस्य आहे. त्यावरच या ब्लॉगमधून बोलणार आहे.
‘स्पायडर’ सिनेमा पाहताना मला मसणजोगी समजावरील सविता प्रशांत यांच्या 'मसणवाटा' डॉक्युमेंट्रीची लख्खपणे आठवण झाली. कारण या सिनेमातील खलनायक मसणजोगी कुटुंबातून आलेला असतो. एवढाच संबंध नाही, तर खलनायक होण्याला सुद्धा त्याचे मसणजोगी कुटुंबातील असणे कारणीभूत असते. खलनायक म्हणून त्याच्याबद्दल चीड सिनेमा संपेपर्यंत निर्माण करण्यात दिग्दर्शक-लेखक वगैरे यशस्वी होतात. त्यासाठी मास-मर्डरचा वगैरे आधार घेतला गेलाय. मात्र तरीही काळजाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात खलनायकाबद्दल आस्था सुद्धा टिकून राहते.
थांबा.. तुमचा गोंधळ होईल, म्हणून इथे सिनेमाची स्टोरी थोडक्यात सांगतो. जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल.
शिवा (महेशबाबू) आयबी ऑफिसमध्ये फोन टॅपिंग विभागात काम करत असतो. त्याच्या कामाच्या अन् बुद्धीच्या हिशेबाने त्याला कमी पगार असतो. महिना केवळ ४० हजार रुपये. मात्र तो त्याच्या कामाचा विधायक वापर करत असतो. त्यामुळे त्याला त्यात रस असतो.
खरतर वरिष्ठांच्या आदेशाशिवाय टॅपिंग केलेले फोन कॉल ऐकायचे नसतात. पण शिवा ऐकतो आणि कुणी अडचणीत असेल, तर त्याला वाचवतो. हे सारे नियम विरोधी असते, पण शिवा विधायक वापर करु इच्छित असतो. कारण त्याला वाटते की, गुन्हा घडून गेल्यानंतर तपास, कोर्ट, शिक्षा वगैरे गोष्टी मुर्खपणाच्या आहेत. गुन्हा आधीच रोखता आला पाहिजे आणि आपण नियमबाह्य जाऊन तसे काम करायचे. गुन्हे रोखायचे. आणि तो तसे करण्यास सुरुवात करतो.
असेच एक दिवस एक मुलगी अडचणीत असल्याचे शिवाला तिच्या कॉलवरुन कळतं. तो तातडीने जवळच राहणाऱ्या त्याच्या पोलीस मैत्रिणीला तिच्या घरी जायला सांगतो. दुसऱ्या दिवशी बातमी असते की, शिवाची पोलीस मैत्रीण आणि अडचणीत असलेली मैत्रीण दोघींचीही हत्या झालीय. याचा शिवाला जबर धक्का बसतो. या धक्क्यात शिवा असताना, पोलीस आयुक्तांच्या फोन कॉलवरुन शिवाला कळते की, हा कुणीतरी सिरीयल किलर आहे, जो माणसांना मारत सुटलाय. इथेच सुरु होते सिनेमाची कथा.
खलनायक कोण आहे, तो लोकांना का मारत सुटला आहे, याचा शोध घेत शिवा खलनायकाच्या मुळापर्यंत पोहोचतो. ‘भैरव’ असे खलनायकाचे नाव असते. भैरव, त्याचा भाऊ भारथ, त्याची आई आणि वडील, असे चौघेजण स्मशानात राहत असतात. आजूबाजूच्या गावातील कुणी मेला, तर त्याचे अंत्यविधी करुन हे कुटुंब आपल्या जगण्याचं रहाटगाडं हाकत असतात. गावात कुणी मेला, की भैरवला प्रचंड आनंद होत असे. लोकांचं रडणं पाहून त्याला हसू येत असे. ते हसू विकृत म्हणायचं की, जगण्याची अपरिहार्यता, हा प्रश्न सिनेमा संपेपर्यंत माझ्या मनात कायम होता आणि अजूनही आहे.
एक वेळ अशी येते की, महिनाभर आजूबाजूच्या गावात कुणीच मरत नाही. त्यामुळे घरात प्रचंड अस्वस्थाता निर्माण होते. भैरव थोडा वेगळ्या स्वभावाचा असतो. कुणी मेला तरच आपलं आयुष्य चालणार, इतर वेळी भीक मागून जगायचं. या जगण्याची त्याच्या मनात तीव्र चीड असते.
याच रागातून भैरव गावातील चौघांची वेगवेगळ्या प्रकारे हत्या करतो. पाचवी हत्या करताना भैरव गावातील एकजण पाहतो आणि मग तो गावकऱ्यांना सांगतो. यातून गावकरी भैरवचं स्मशाणातील झोपडी जाळतात. त्यात भैरवची आई आणि वडील जळून खाक होतात. भैरव आणि भारथ हे दोघेच भाऊ वाचतात. आणि हेच पुढे खलनायक होतात.
एखाद्या सायको-सिरियल किलरसारखे हत्या करत सुटतात. हत्या झाल्यानंतर तिथल्या रडणाऱ्या लोकांचा आवाज ऐकण्यात दोघांना आनंद मिळत जातो. लोकांचं रडणं आवडण्याचं हे वेड लोकांच्या हत्या करण्यात परावर्तीत होतं आणि यातून शेकडो हत्या भैरव करत सुटतो.
मग एकेदिवशी भैरवचा भाऊ भारथ महेशबाबूच्या हाती लागतो आणि नंतर एका स्ट्रॅटेजिक प्लान करुन महेशबाबू भैरवलाही पकडतो. आणि दोघांनाही ठार करतो. वगैरे वगैरे. सिनेमा संपतो.
सिनेमा संपल्यानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतातच की. मसणजोगी समाज हा काही गुन्हेगारी समाज नाही. मात्र तरीही त्यांच्या समस्या, त्यांच्या मनात येत असणारे विचार या सगळ्याचा ज्यावेळी आपल्या मनात काहूर माजतो, त्यावेळी खलनायकाबद्दल अधिक विचार डोक्यात घोळू लागतात. तसे माझ्याही झाले.
भैरव सायको-सिरियल किलर बनून हत्या करत सुटला होता, हे चूकच. मात्र तो त्याकडे का वळला, याचा विचार सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून सिनेमा पाहताना आपण करत नाही, तो करावा असेही कमर्शियल हेतूसाठी सिनेमा बनवणाऱ्यांना नाही. मात्र समाजातील संवेदनशील घटक म्हणून तो विचार आपल्या मनात यायला हवा.
केवळ एक थ्रिलरपट तयार करुन पैसे कमावण्याच्या हेतूने ‘स्पायडर’ केला गेलाय. मात्र त्या सिनेमात खोलवर सामाजिक संदर्भ आहेत. अर्थात ते सिनेमातील खलनायकाशी जोडून मसणजोगी समाजाचं नाकारात्मक चित्रण केलंय. मात्र आपण त्यावर दिशादर्शक चर्चा करणं गरजेचं आहे. कारण ‘सर्वांगीण विकास’ हे शब्द आपण ज्यावेळी वापरतो, त्यावेळी त्यात मसणजोगी समाज सुद्धा येतो. मात्र मसणजोगी असो किंवा त्यासारखे अन्य समाज, ज्यांना वगळूनच आपला सर्वांगीण विकास सुरु असल्याचे दिसते, हे दुर्दैव आहे. या सर्वाच्या मूळापर्यंत गेलो, तर ‘स्पायडर’ सिनेमातील भैरव खलनायक का बनला, याचेही मूळ सापडेल आणि आपण माणूस म्हणून किती संकुचित प्रवास करत आहोत, याचीही खोऱ्याने उदाहरणे सापडतील.
नामदेव अंजना | www.namdevanjana.com

18 July, 2018

वारी : काही आठवणी आणि काही प्रश्न

फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी
मूळ नाव ज्ञानेश्वर, शाळेत दाखल करताना आजोबांनी ज्ञानदेव सांगितलं, लिहिणाऱ्याने नामदेव लिहिलं...असा माझ्या नावाचा प्रवास. पण ज्ञानेश्वर असो, ज्ञानदेव असो, वा नामदेव. तिन्ही नावं वारकरी संप्रदायाशी संबंधित आहेत. नाव ठेवण्यामागे अर्थात आजोबांचं वारकरी संप्रदायातील असणं कारणीभूत आहे. लहानपणापासून घरात - गावात - पंचक्रोशीत वारकरी संप्रदायाबद्दल प्रमाणिक श्रद्धा आहे.
आधी केवळ देव-धर्म म्हणून वारकरी संप्रदायाबद्दल आदर होता, मात्र पुढे तुकोबा वाचल्यानंतर विचारानेही या परंपरेशी जोडला गेलो. तमाम संतांच्या जीवनातून बंधुभावाचीच शिकवण दिली गेलीय. आपण किती अंगीकारली हा पुढचा वादाचा मुद्दा. पण संतपरंपरा ही एकता आणि बंधुभावावर आधारलेली आहे, एवढे निश्चित.
चौथीत असताना माझ्या हट्टामुळे आणि सहावीत असताना आजोबांनी स्वत:हून - अशा दोनवेळा आजोबांनी पंढरीची वारी घडवली. वारीशी संबंधित एक रंजक आठवण आहे. आजोबांचं बोट धरुन पंढरीच्या डेपोत एसटीतून उतरल्यावर घोषणा ऐकायला आली - "यात्रेचा काळ आहे. चोरांचा सुळसुळाट आहे. आपापल्या बॅगांवर लक्ष ठेवा." घोषणा ऐकून आजोबा कुजबुजले, "आम्हीही चोरीच करायला आलोय - बा पांडुरंगाच्या आशीर्वादाची चोरी करायला."
आमच्या गावाकडं वारकरी संप्रदाय चांगला रुजला आहे. मुळात शेतकरी समाज असल्याने वारकरी संप्रदायासारखं तळातल्या माणसांचं जगणं सांगणारा संप्रदाय रुजण्यास सुपिक वातावरण होतं. आणि तसेच झाले. आजही सगळ्या एकादशा नित्यनेमाने साजऱ्या केल्या जातात. दिवंगत सोनब अण्णा कदम यांनी बंधुभावाचा संदेश देणारे किर्तन गावा--गावात केले. लोकांना वारकरी संप्रदायाशी जोडले. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रवीण दादा हा वारसा सक्षमपणे पुढे नेत आहे. एकंदरीत मनाने-तनाने वारकरी परंपरेशी जोडला गेलेला आमचा परिसर आहे.
पुढे मुंबईत आल्यानंतर वाचनाकडे वळलो. एका दिवशी तात्यांचं म्हणजे आदरणीय डॉ. आ. ह. साळुंखे यांचं 'विद्रोही तुकाराम' हाती आलं. वैचारिकतेनेही संतपरंपरेशी अधिक घट्टपणे जोडला गेलो. वारकरी संप्रदायाशी जोडला गेलो असलो तरी, काही गोष्टी कायम प्रश्नांकित करत आल्यात. त्यावर आता बोलावं वाटतंय. किंवा वरील सारा लेखनप्रपंच त्या प्रश्नांसाठीच केलाय.
चंद्रभागेच्या वाळवंटी नाना जाती-धर्माची माणसं एकरुप होतात. जाती-धर्माची लेबलं पंढरीच्या बाहेर सोडतात आणि पंढरीच्या विठ्ठलाच्या नामात दंग होतात. कुणीही स्पृश्य-अस्पृश्य राहत नाही. वारीतला प्रत्येकजण केवळ 'वारकरी' असतो. मात्र हेच वारकरी जेव्हा पंढरीची वारी करुन आपापल्या गावात पोहोचतात, तेव्हा पुन्हा आपल्या जाती-धर्मात का शिरतात? (अर्थात अपवाद आहेत. नाही असे नाही.) संतपरंपरेनी विश्वबंधुभावाचा संदेश दिला, तो पंढरीत आपण अंमलात आणतो, मग परतल्यावर का विसरतो? आजूबाजूला जाती-धर्मात विघातक तेढ निर्माण होत असताना, आपल्याला याचे उत्तर नक्कीच शोधायला हवे.
फ्रेंच राज्यक्रांतीने स्वतंत्र्य, एकता बंधुता ही मूल्य दिली असे म्हणतात. मात्र आपल्या वारकरी संप्रदायाने फ्रेंच राज्यक्रांतीच्या साडेसातशे वर्षांपूर्वीच एकता आणि बंधुभावाची शिकवण दिली. ते आपण किती लवकर विसरलो.
ज्या संतपरंपरेने आपल्या वारकरी संप्रदायाच्या चळवळीचं नेतृत्त्व संत सोयराबाई, संत जनाबाई यांसारख्यांच्या खांद्यावर सोपवलं. त्याच परंपरेतील आपण स्त्रियांना का दुय्यम वागणूक देत असून, स्त्रियांकडे कमकुवत म्हणून का पाहतो?
असे अनेक प्रश्न आज मनात घिरट्या घालतात. वारकरी संप्रदायाबद्दल आस्था असल्याने या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आपण घेतला पाहिजे आणि आपली परंपरा अधिक सक्षम बनवली पाहिजे. कारण वारकरी संप्रदाय हा या भूमीतल्या आधुनिकतेचा अविष्कार आहे. आपण परंपरा जपली पाहिजे. कारण अशी परंपरा जगातल्या खूप कमी समूहांच्या वाट्याला आली आहे. आपण त्यात नशीबवान आहोत.

नामदेव अंजना

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...