संध्याकाळचा किस्सा आहे. दोन सहकाऱ्यांसोबत लोकलने घरी परतत होतो. पत्रकारिता, राजकारण वगैरे चर्चा सुरु असताना, सेना-भाजपच्या कारभाराबाबत चर्चा सुरु होती. तेवढ्यात एकजण म्हणाला, "सेना-भाजप युतीच्या 1995 च्या सत्तेवेळी मी 5-6 वर्षांचा होतो. त्यामुळे त्यावेळी जनतेच्या मनात शिवसेनेबद्दल नेमके काय मत होते आणि त्यावेळीही असाच गदारोळ सुरु असायचा का, सेनेचा असाच दुटप्पीपणा असायचा का, ते माहित नाही. पण त्यानंतर जनतेने पुढे 15 वर्षे यांना का सत्ता दिली नाही, ते मात्र गेल्या साडेतीन-चार वर्षांच्या यांच्या वागण्यातून कळलंय."
किस्सा तसा बोलता-बोलता सांगितलेला असला, तरी यात खरंच आजची जनभावना आहे. येणाऱ्या-जाणाऱ्याशी बोलल्यावर ते कळूनही येतं. इतका दुटप्पीपणा सत्तेचा गाडा हाकण्यातून दिसून येतो. विशेषत: शिवसेनेचा दुटप्पीपणा. आता आपण सेनेबाबत बोलतोय म्हणून विस्तृत बोलायलाच हवे. आता ‘दुटप्पीपणा’, ‘ढोंगीपणा’ आणि ‘शिवसेना’ हे शब्द एव्हाना समानार्थी झालेत. त्यामुळे किती आणि काय काय बोलावे, हा प्रश्न असला, तरी बोलायला हवे. शेवटी लोकांपुढे आपण यांचं रुपडं मांडलं पाहिजेच.
फार मागे नको जाऊया. अगदी कालचीच घटना घेऊ आणि मग पुढे बोलत जाऊ. काल नवी मुंबईतील एमआयडीसीच्या 30 एकर जागेवर अनधिकृतरित्या उभारलेलं बावखळेश्वर मंदिर पाडण्यात आलं. बावखळेश्वर, श्रीगणेश आणि लक्ष्मीमाता असे तीन मंदिरांचं एक बावखळेश्वर मंदिर बनलं होतं. खरंतर ते अनधिकृत होतं, त्यात सुप्रीम कोर्टाचा आदेश होता, त्यामुळे तोडकाम हे स्वागतार्हच आहे. मात्र, इथे अनधिकृत मंदिराला समर्थन करण्याचा उद्देश नाही, पण इथेही पाहा कसं शिवसेनेचं ढोंगीपण उघड होतं.
बावखळेश्वर मंदिर हे नवी मुंबई एमआयडीसीत बांधलं गेलं होतं. एमआयडीसीवरील नियंत्रण उद्योग मंत्रालयाकडे असते. उद्योगमंत्री सुभाष देसाई आहेत. सुभाष देसाई हे शिवसेनेचे नेते आहेत.
‘जोश जगा दो हिंदू में... राम खडे है तंबू में..!’ असे म्हणत अयोध्येकडे कूच करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना घराशेजारील मंदिर तुटत असताना कुठल्या तंबूत बसली होती? बरं ज्या एमआयडीसीच्या जागेवर हे बावखळेश्वर उभं होतं, त्या एमआयडीसीचे सर्वेसर्वा असलेल्या उद्योग मंत्रालयाचे मंत्री यांच्याच पक्षाचे नेते आहेत. मग तिथं ‘जोश’ नव्हता का दाटून आला? इतकीच मंदिरांची ओढ आहे, तर मग सुभाष देसाईंना सांगून बावखळेश्वर नियमित का केले नाही? बावखळेश्वर या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सेनेने पाडू का दिलं? प्रश्न मंदिर अनधिकृत असताना, ते नियमित करण्याचा नाहीय. प्रश्न आहे, यांच्या दुटप्पी आणि ढोंगी राजकारणाचा. मतांसाठी वाट्टेल त्या थराला जाण्याचा यांचा इतिहास आहे.
हे मी दुपारीच एका शिवसैनिकाला सांगत असताना, तो म्हणे, अरे पण बावखळेश्वरचं प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं आणि तिथूनच आदेश होते. या शिवसैनिकांच्या बुद्धीचं पण लई अवघड असतं. अरे बाबांनो, जर बावखळेश्वर मंदिराचं प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं, म्हणून तिथे सेनेचा मंत्री असून काही करु शकत नाही, मग बाबरीचं प्रकरण तर दोन दशकं सुप्रीम कोर्टात आहे, तिथे कुठल्या अत्युच्च आशेने राम मंदिर बांधायला जाता आहात?
हे झालं मंदिरांच्या भावनात्मक राजकारणाबाबत. थोडं ग्राऊंडला यायचं म्हटलं, तरी यांचा ढोंगीपणा काही कमी नाही. राज्यात कमालीचा दुष्काळ आहे. यंदाच्या दुष्काळाची तुलना 1972 च्या भीषण दुष्काळाशी केली जाते आहे. हल्ली पाहतोय, रोज शेतकरी आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. अशा काळात राज्याचा दौरा करण्याचं सोडून हे उद्धव महाराज शेकडो किलोमीटर दूर असलेल्या उत्तर प्रदेशात जाऊन मंदिराचं राजकारण करु पाहत आहेत. राज्याचा दौरा करुन, जनतेच्या खांद्यावर हात ठेवून, ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत’, इतका दिलासा यांच्याकडून अपेक्षित असतो. ‘शासनकर्ते आपल्यासोबत आहेत, आपण कुठलेही टोकाचे पाऊल उचलू नये’, असे किमान दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटलं असतं. मात्र, ते सोडून हे महाशय भावनेचं राजकारण करत बसलेत. राज्यात स्थिती काय, आपण करतोय काय, याची कल्पना यांना नसावी? खरंतर असेल कल्पना, मात्र ती कल्पना असतानाही असले भावनेचं राजकारण करण्यात गुंतलेल्या शिवसेनेचा ढोंगीपणा जनतेने आता जाणून घ्यायला हवा.
त्याचं असंय की, उठता-बसता-फिरता-दौरे करता करता-सभा घेता घेता-उठ-सूठ सत्तेला लाथ मारण्याची भाषा करणारी आणि ‘आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो’ या राणा भीमदेवी थाटात फुशारक्या मारणारी शिवसेना आता बावचाळलीय. याचं कारण स्पष्ट आहे. गेली साडेतीन-चार वर्षे दुटप्पीपणाची हद्द यांनी पार केली. सत्तेतून बाहेर पडण्याची वेळही सरुन गेली. सत्तेतून बाहेर पडण्यासाठी अनेकदा संधी आल्या. त्यावेळी त्या त्या मुद्द्यावर सेना सत्तेतून बाहेर पडली असती, तर एक सहानुभूती गोळा करता आली असती. तीही आता मिळणार नाही. कारण आता सत्तेतून बाहेर पडली, तर निवडणुका वर्षभरात असताना, खाऊन-पिऊन बाहेर पडले, असे चित्र निर्माण होईल. त्यामुळे सत्तेतून बाहेर पडता येत नाही. त्यामुळे सेना बावचाळलीय. मग आता लोकांसमोर कसं जायचं, तर मग राम मंदिर असो किंवा इतर भावनेचं राजकारण करत जायचं. कारण भावनेच्या राजकारणाला इथली जनता सहज (दुर्दैवाने!) बळी पडते, हे यांना चांगले ठाऊक आहे. मात्र, आता जनतेनेही समजून-उमजून यांच्याकडे पाहिले पाहिजे.
जनतेला गृहित धरणे, हे सेनेचे आता तत्व झाले आहे. एरवी आशिष शेलारांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत आणि रावसाहेब दानवेंपासून अमित शाह आणि नरेंद्र मोदींपर्यंत कधी 'समाना'तून, तर कधी कथित विराट सभेतून, टीकेची झोड उठवणारे हे उद्धव ठाकरे अटीतटीच्या वेळी मात्र तलवार म्यान करुन लपून बसतात. हेच अविश्वासाच्या ठरावावेळी आणि त्याआधी व त्यानंतरही अनेकदा या महाराष्ट्राने पाहिले आहे.
सत्तेला विरोध करणं, ही केवळ विरोधकांचीच मालकी आहे, अशातला भाग नाही. सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांच्या कोणत्या निर्णयाला विरोधच करायचा नाही, असेही नाही. पण त्यात दुटप्पीपणा नसावा. सेनेच्या बोलण्यात आणि चालण्यात अंतर दिसतो. दुटप्पीपणा दिसतो. ढोंगीपणा दिसतो.
2014 साली सत्तेत येण्यासाठी सेनेच्या जाहिरातीत ‘तुझं नाव काय?’ या प्रश्नाला उत्तर देताना ‘माझं नाव शिवसेना’ असं उत्तर येत होतं. आता सेनेने प्रश्न तोच ठेवून, उत्तरात फक्त बदल करुन, ‘माझं नाव ढोंगीपणा’ असं म्हणावं. म्हणजे उत्तराला परिपूर्णता प्राप्त होईल.
नामदेव अंजना | www.namdevanjana.com
No comments:
Post a Comment