ऑफिसमधून घरी येताना शेअर टॅक्सीने येत होतो. अंधेरीहून निघाल्यानंतर पुढे गोरेगावपर्यंत बोरीवलीकडे जाणाऱ्या मार्गावरील स्ट्रिट लाईट पोलवर बॅनर अडकवले होते. राजीव गांधींचा मोठा फोटो आणि खाली उजव्या कोपऱ्यात गुरुदास कामत यांचा छोटासा फोटो.
टॅक्सीत असल्याने बॅनरवरील मजकूर नीट वाचता येत नव्हते. बॅनरवर काय लिहिले होते ते, कळत नव्हते. पण आजच गुरुदास कामत यांचं निधन झाल्याची बातमी करुन आलो होतो. त्यामुळे मनात अंदाज लावला, गुरुदास कामत यांना श्रद्धांजली अर्पण करणारे पोस्टर असतील. पण विचार आला, मग राजीव गांधी का पोस्टरवर? स्थानिक कुणीतरी कार्यकर्ते असायला हवे होते.
पुढे एका ठिकाणी ट्राफिकमध्ये अडकलो, तेव्हा बॅनरवरील मजकूर वाचला. तर ते बॅनर राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त (20 ऑगस्ट) आदरांजली अर्पण करणारे होते. गुरुदास कामत यांनीच लावलेले.
गुरुदास कामत हे राजीव गांधी यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. असे म्हटले जाते की, गुरुदास कामत युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना राजीव गांधी मुंबईत दौऱ्यानिमित्त आले की, त्यांची गाडी चालवण्यापासून सर्व पाहत असत. (या पोस्टसोबत जोडलेला फोटो पाहू शकता. यातही युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना गुरुदास कामत गाडी चालवत आहेत, आणि मागे राजीव गांधी बसलेत.) पक्षाचा वरिष्ठ म्हणूनच नव्हे, तर वैयक्तिकरित्या ते राजीव गांधींच्या प्रभावात होते. त्याच राजीव गांधी यांना जयंतीदिनी आदरांजील अर्पण करणारे लावलेले बॅनरही उतरले नाहीत, तोच गुरुदास कामत यांचं निधन झालं. आता त्याच ठिकाणी उद्या त्यांचे बॅनर लागतील. हा विचार करुनच काळजात थोडसं धस्स झालं.
गांधी घरण्याचे ते कायमच एकनिष्ठ राहिले. पक्ष सोडण्यापर्यंत पावलं नेली असताना, केवळ गांधी कुटुंबीयांच्या आदराखातर ते शांत बसले.
गुरुदास कामत शांत स्वभावाचे होते. पार्ल्यात असताना कृष्णा हेगडे यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांची दोन भाषण ऐकलीयेत. शांतपणे बोलणं, हे वैशिष्ट्य. उगाच अकांडतांडव नव्हता. संजय निरुपम यांच्यासारख्या काहीशा आक्रमक नेत्याशी त्यांचं कधीच पटलं नाही, ते बहुधा त्यांच्या या शांत स्वभावामुळेच असावे.
गुरुदास कामत यांना घरातून कोणताच राजकीय वारसा नव्हता. वडील खासगी क्षेत्रात होते. कुर्ल्यात लहानाचे मोठे झालेले गुरुदास कामत यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी संघटनेपासून आपला प्रवास सुरु केला. म्हणजे ग्राऊंडपासून.
गुरुदास कामत यांना राजकारणात जे काही मिळाले, ते आयतं मिळालं नाही. मेहनत, एकनिष्ठपणा आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी सर्व पदं मिळवली. पोद्दार कॉलेजचा विद्यार्थी संघटनेचा सेक्रेटरी ते गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष, त्यानंतर काँग्रेसचा सदस्य ते युवक काँग्रेसचा अध्यक्ष, पुढे आपल्या गुणांच्या जोरावर ते अगदी केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचले.
मुंबई काँग्रेस आणि गुरुदास कामत हे एक समीकरण बनले. मुंबईतल्या पहिल्या पाच नेत्यांमधील गुरुदास कामत होते. मुरली देवराही होते. मात्र मुरली देवरा हे कायमच उच्चभ्रूंचे नेते वाटायचे. ते कधीच कार्यकर्त्यांसोबत मिसळले नाहीत, असे जाणकार सांगतात. गुरुदास कामत तसे छोट्य-मोठ्या आंदोलनातही रस्त्यावर उतरत. म्हणून तर संजय निरुपम यांच्याशी वादानंतर मुंबई काँग्रेस आरपार दुंभगल्यासारखी झाली होती. आणि हाय-कमांडला हस्तक्षेप करावं लागलं होतं.
गुरुदास कामत यांच्या जाण्याने राज्यात किंवा देशात काँग्रेसला मतांच्या दृष्टीने फारसा फरक पडणार नाही, हे स्पष्ट आहे. मात्र केवळ तिकिटांसाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्या नेत्यांच्या काळात गुरुदास कामत यांच्यासारखा कमालीचा एकनिष्ठ नेता काँग्रेसने आज गमावला, एवढं निश्चित.
उद्या ऑफिसमधून येताना, हायवेवरील त्याच बॅनरच्या जागी गुरुदास कामत यांना आदरांजली वाहणारे बॅनर पाहताना, कामतांचा हा प्रवास पुन्हा आठवेल, एवढं नक्की. गुरुदास कामत यांना मनापासून आदरांजली.
नामदेव अंजना | www.namdevanjana.com
No comments:
Post a Comment