04 March, 2018

ज्यूस



पराग फाटक या बीबीसीत काम करणाऱ्या पत्रकार मित्राने नेहमीप्रमाणे काही इन्फॉर्मेटिव्ह लिंक पाठवल्या. त्यात एक लिंक या शॉर्ट फिल्मची होती. 'ज्यूस' असे नाव वाचल्यावर पहिले मनात आले, कुठल्यातरी हलक्या-फुलक्या विषयावरील असावी. म्हणून वेळेचा दुरुपयोग टाळण्यासाठी नाजरांदाज करणार, तेवढ्यात त्याखाली परागने लिहिलेले वाचले. त्याने लिहिलेले, 'मसान' सिनेमाचा दिग्दर्शक निरज घेवन याने दिग्दर्शित केलीय ही शॉर्ट फिल्म. मग अर्थात कुतूहल वाढले. आणि पटदिशी लिंकवर क्लिक केले.

मसान सिनेमामुळे निरज घेवनबद्दल आदरही वाढला आहे आणि अपेक्षाही. म्हणून कदाचित लिंकवर क्लिक अत्यंत तत्परतेने केले असावे. विशेष म्हणजे या शॉर्ट फिल्मच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निरजकडे आहेच, पण लेखनही त्यानेच केले आहे. त्यामुळे लेखकाचे अँगल त्याने उत्तमपणे दिग्दर्शनावेळी दाखवला आहे.

तर शॉर्ट फिल्म मोजून १४ मिनिटांची आहे. अगदी सुरुवातीचे क्रेडिट लाईन्स, टायटल आणि शेवटच्या क्रेडिट लाईन्स पकडून. म्हणजे दृश्य आणि भाष्य यासाठीचा कालावधी फार फार तर १३ मिनिटांचा. मात्र ही १३ मिनिटे सुद्धा अत्यंत प्रभावी आणि क्लास पद्धतीने वापरली आहेत. जे सांगायचंय ते अत्यंत नेमक्या दृश्यात मांडलंय आणि गरज भासेल तिथेच संवादाचा वापर आहे.

आता हे आपापल्या आकलन क्षमतेवर आधारित आहे. पण मी एकूण तीनवेळा पहिली ही शॉर्ट फिल्म. पहिल्यांदा ही शॉर्ट फिल्म पहिली, तेव्हा कंटेंट आणि मांडणी लक्षात आली. शब्दांविना साधलेले संवाद सुद्धा ध्यानात आले. मात्र तरीही काहीतरी मिस होतंय, असे वाटले आणि पुन्हा पाहिली. विशेष म्हणजे, दुसऱ्यांदा पाहील्यावरही वाटले की अजून एकदा पहावी. आणखी काहीतरी गवसेल. तीनही वेळा मला अनेक बारीक-सारीक गोष्टी नव्याने कळल्या.

इतक्या कमी कालावधीत नीरजने केवढ्या तरी मोठ्या, खोल आणि गंभीर विषयावर प्रभावी भाष्य केले आहे. तेही अत्यंत जबाबदारीने आणि सृजनशीलतेचा यथायोग्य वापर करुन. १४ मिनिटांमधील कोणताही सेकंद वाया न घालवता, त्यात विषयाचे दृश्य-अदृश्य संवाद भरले आहेत. उगाचच संवाद नाहीत किंवा उगाचच दृश्य नाहीत. जे आहेत, ते सारे विषयाची गरज वाटते..

शॉर्ट फिल्म विषय महिलांचा असला, तरी त्यातील अंतिम प्रश्न मात्र पुरुषांना आहे. अपरिहार्य आणि साहजिक प्रश्न आहेत. तुमच्या-आमच्या भाषेत सांगायचे, तर महिलांना रोजच्या जगण्यात कसे दुय्यम स्थान आहे, हे या फिल्ममध्ये दाखवले आहे. आणि थोड्या किचकट भाषेत बोलायचे तर पुरुषप्रधान संस्कृतीचे नगडे रुप दाखवणारी ही मोठ्या अर्थाची लहानशी कलाकृती आहे. एकंदरीत या शॉर्ट फिल्मची वन लाईन अशी आहे. मात्र अत्यंत प्रभावी दृश्य आणि संवादाच्या जोरावर आवश्यक आणि नेमका मेसेज दिग्दर्शकाने पोहोचवला आहे. कारण शॉर्ट फिल्म पाहून पूर्ण झाल्यावर पुरुष असल्याने, मान शरमेनं खाली जातेच. कुणा पुरुषाची जात नसेल, तर आपणही या पुरुषप्रधान संस्कृतीचे भाग आहोत, हे निश्चित.

काही दिवसांपूर्वीच मी आणि माझी पुण्यातील एक मैत्रीण मिनाज यासंदर्भात बोलत होतो. स्त्रीला कशी दुय्यम वागणूक इथल्या संस्कृतीत आहे यासंदर्भात. अगदी साध्या सोप्या गोष्टी असतात. पण त्यातला अर्थ भयंकर मोठा असतो. म्हणजे, बोलता बोलता मीनाज म्हणाली, घरकाम करणाऱ्या बाईला आपल्याकडे मावशी म्हटले जाते. का तर मावशी म्हणजे आईकडील नाते. त्याच ठिकाणी कुणी पुरुष असेल, तर त्याला मामा म्हटले जाते. का तर पुन्हा आईकडील नाते. आईकाडील नात्यांना असे दुय्यम दर्जा देण्याची एक अप्रत्यक्ष परंपरा चालत आलीय. हे एक उदाहरण झाले. खरंतर अशी अनेक उदाहरणे आहेत. असो. जरी हे किस्से विषयानुरुप असले, तरी आपण पुन्हा शॉर्ट फिल्मच्या विषयाकडे येऊ.

शॉर्ट फिल्मची कथा सांगून, ती पाहण्याची मजा मला घालवायची नाही. पण काही कथेचा ओझरता उल्लेख करायला आवडेल. कारण त्यातल्या काही गोष्टी मोठी भाष्य करतात.

पाच जोडपे आणि एक घरकाम करणारी महिला, अशी एकूण अकरा स्टारकास्ट आहेत. पैकी मंजू सिंग नामक महिलेच्या घरात एक गेट-टूगेदर आयोजित केलेला असतो. आधी चार पुरुष हॉलमध्ये बसून दारु, त्यासोबत चिकनवर ताव मारत असतात. मध्येच काही लागले तर किचनमध्ये काम करत असलेल्या मंजूला हाक मारतात. या चारही जणांच्या बायका किचनमध्ये काम करत असतात. काही वेळाने नव्यानेच लग्न झालेलं जोडपे येतं. तो पुरुषही आधीच्या पुरुषांमध्ये दारुच्या पंगतीत बसतो आणि बायकोला मंजू सोबत किचनमध्ये धाडतो. आपल्या बायकोला काही नवीन पदार्थ शिकवण्याची मंजूला विनंती करतो.

किचनची रचना एखाद्या गॅस चेंबरसारखी भासते. आता प्रचंड गरमी. धूर. उकाडा. एकंदरीत कोंडामरा असतो. त्या बाहेर दारुसोबत चिकानावर ताव मारत असलेल्या नवऱ्यांसाठी काहीबाही बनवत असतात. दुसऱ्या एका खोलीत मुले असतात. तिथेही मुलगा आणि मुलगी असा फरक प्रकर्षाने जाणवतो. तो रुमही एखाद्या चेंबरसारखा वाटतो. त्यात मुलांचे विश्व कोंडले आहे, असा अप्रत्यक्ष ध्वनी प्रतीत होतो.

स्त्रीला देण्यात येणाऱ्या दुय्यम स्थानाची नेमकी स्थिती यातून मांडली आहे. मात्र यातील काही गोष्टी प्रचंड बोल्ड करुन सांगायला हव्यात. कारण या कथेचे वेगळेपण त्यात दडले असावे, असे वाटते.

ज्यावेळी या साऱ्या स्त्रिया किचनमध्ये काम करत असतात, त्यावेळी त्या त्यांच्यासाठी चहा बनवतात. आणि चहा पिण्यावेळी इतर स्त्रिया तेथे घरकाम करणाऱ्या स्त्रिला कशाप्रकारे भेदाची वागणूक देता, हे नेकमेपणाने दिग्दर्शकाने दाखवले आहे. अगदी कोणत्याही संवादाविना. पुरुष महिलांना दुय्यम वागणूक देत असले, तरी स्त्रिया तरी स्त्रियांना कुठे समान वागवतात, हेच बहुधा दिग्दर्शकाला दाखवायचं असावं.

शॉर्ट फिल्मचा शेवट विचार करावयास लावणारा आहे. बाहेर हॉलमध्ये पाचही पुरुषांचा दंगा सुरु असतो. अकबरापासून ओबामा, ट्रम्प इत्या गोष्टींवर विनाकारण चर्चा झाडत असतात. मध्येच मंजूचा नवरा जेवण वाढायला सांगतो, त्यावेळी या सगळ्याला त्रासलेली मंजू ग्लासमध्ये ज्यूस घेते आणि दुसऱ्या हाताने किचनमधूनच एक खुर्ची सरकवत हॉलमध्ये आणते. कुलरच्या बाजूला बसते आणि थंड हवा घेत ज्यूस पिते. काही सेकंद डोळे मिटते, त्यावेळी सगळेजण अवाक होऊन तिच्याकडे पाहत बसतात. मंजू डोळे उघडते, त्यावेळी तिच्या डोळ्यात आसवांनी भरलेली भयंकर चमक जाणवते, ती पाहून समोरील सगळे पुरुष खाली मान घालतात. मंजू पुन्हा एकदा ज्यूस पिते आणि फिल्म संपते.

बस्स. पुढील विचार आपण करायचा असतो. स्टार्ट टू एन्ड अशी कथा असली तरी शेवट प्रचंड विचार करायला लावणारी आहे. ही फिल्म अनेक प्रश्न आपल्यापाशी सोडून जाते. आपण आपापल्या अंगाने त्यावर विचार करायचा, असे मत दिग्दर्शकाचे असावे. पण पुरुषी वर्चस्वाला नेमक्या जागी धक्के देण्याचे काम यातून नीरजने केले आहे, हे मात्र खरे.

पुरुषप्रधान संस्कृती आणि पुरुषी अहांकरावर प्रभावी भाष्य करणारी ही शॉर्ट फिल्म ('ज्यूस' पाहण्यासाठी इथे क्लिक करा) पाहायलाच हवी. इतकी महत्त्वाची कलाकृती बनवल्याबद्दल निरज घेवनचे आभार आणि ही शॉर्ट फिल्म पाहायला हवी असे म्हणत मला सुचवल्याबद्दल पराग फाटक या मित्राचेही आभार.

नामदेव अंजना

12 February, 2018

प्रिय साथी अस्मा..



काल अस्मा गेली. सॉरी अरे-तुरे करतोय. पण आपल्या जवळच्या माणसाला आपण अरे-तुरेच तर करतो. नाही का? अस्मा वैचारिकदृष्ट्या जवळचीच. तर अस्माच्या जाण्याने काय एवढा फरक पडतो, असे कुणालाही वाटून जाईल. पण फरक पडतो. कारण मानवतावादी चळवळीत अत्यंत महत्त्वाच्या स्थानी अस्मा उभी होती. निडरपणे आणि निर्भिडपणे.

अगदी १५ दिवसांपूर्वीच २७ जानेवारीला तिने ६७ व्या वर्षात पदार्पण केले होते. ५२ साली जमलेल्या या रणरागिणीने ऐन तारुण्यात चळवळीत झोकून दिले. केवळ रस्त्यावरची लढाई नव्हे, तर न्यायालयीन लढाई सुद्धा तिने लढली. ती पेशाने वकील होती.

पाकिस्तानसारख्या लोकशाहीच्या नावाखाली कधी दडपशाही, कधी एकाधिकारशाही, तर कधी लष्करशाही गाजवणाऱ्या देशात लोकशाही टिकून राहावी म्हणून तिने आवाज बुलंद केला.

भारतात जसे अल्पसंख्यांकांचे प्रश्न लाऊन धरल्यावर मुस्लिमांचे लांगुलचालन केल्याचा आरोप होतो, तसा पाकिस्तानात अस्मावर हिंदूंबाबत झाला. एकंदरीत इकडचे आणि तिकडचे कट्टर सारखेच. असो. पण अस्माने कधीच माघार घेतली नाही. ती कमकुवत घटकांची आवाज बनली आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टींविरोधात पेटून उठली.

बहिण हिना गिलानी हिच्यासोबत सुरु केलेली वुमेन्स अॅक्शन फोरम, नंतर वकिलांची संघटना असलेल्या बार असोसिएशनचे प्रमुखपद, मानवाधिकार आयोग.. असा खूप मोठा प्रवास अस्माचा आहे. 'मानवाधिकार चळवळ म्हणजे अस्मा जहांगीर' असे समीकरण पाकिस्तानात बनले होते. अगदी १९८० ते कालपर्यंत.

१९८२ साली झिया उल हक यांच्या अन्यायकरी निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरुन अस्माने लढा दिला. त्याचे परिणाम तिला भोगावे लागले. पण ती डगमगली नाही. प्रत्येक दडपशाहीला तिने प्राण पणाला लावून विरोध केला. मग मुशर्रफ असो वा आणखी कुणी. बालकामगार आणि फाशीची शिक्षा याविरोधातील तिचे लढेही प्रभावी राहिलेत.

कधी तुरुंगवास भोगला, कधी नजरकैद, कधी जीवे मारण्याच्या धमक्या, तर कधी प्रत्यक्ष हल्ले... तरी ती लढत राहिली. निर्भिड वृत्तीच्या या रणरागिणीचा मॅगसेसे, राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड अशा कित्येक मान-सन्मानांनी गौरव झाला.

पाकिस्तानसारख्या धर्माच्या नावावर टोकाची भूमिका घेणाऱ्या देशात काम करताना अस्मा म्हणायची, ""We never learnt the right lessons. We never went to the root of the problem. Once you start politicising religion, you play with fire and you get burnt as well.".

नेमक्या शब्दात अस्माने भोवताल मांडलंय. पाकिस्तानसह सगळ्याच देशात ते लागू होतं.

२०१६ साली अब्दुल सत्तार इधी गेले, काल अस्मा जहांगीर. पाकिस्तानात माणुसकीच्या ज्या काही मोजक्या जिवंत खुणा होत्या, त्या मिटत जात आहेत. आधीच वैचारिक सर्वनाशाच्या निराधार कड्यावर उभ्या असलेल्या पाकिस्तानसारख्या देशातील असे हिरे काळाच्या पडद्याआड जाऊ लागलेत. परिस्थिती कठीण आहे.

प्रिय साथी अस्मा,
मानवतावादी चळवळीतील महत्त्वाची व्यक्ती म्हणून तुझी आठवण राहिलंच, मात्र लोकशाही टिकवण्यासाठी देशाच्या सर्वोच्च पदाला रस्त्यावर उभी राहून थेट आव्हान देणारी रणरागिणी म्हणूनही तू कायम आठवणीत राहशील.

नामदेव अंजना

10 February, 2018

शॉर्टफिल्म : 2 + 2 = 5



बबाक अन्वारीची 'टू प्लस टू इज इक्वल टू फाईव्ह' ही अप्रतिम शॉर्ट फिल्म पाहिली. मोजून आठ मिनिटांची शॉर्ट फिल्म. वास्तवाला कट टू कट रिलेट करणारी. किंवा असं म्हणूया, कट्टरतावादी, वर्चस्ववादी आणि हुकुमशाही व्यवस्थांच्या पाऊलखुणांचा नेमका वेध घेण्याचा यशस्वी प्रयत्न या शॉर्ट फिल्ममध्ये केला आहे.

आठ मिनिटांच्या शॉर्ट फिल्मची सुरुवात 10 व्या सेकंदाला एका ब्लँक फळ्याला कॅमेरा झूम आऊट करत होते आणि 6 मिनिट 42 व्या सेकंदाला विचारांचं चक्र सुरु करणारा एक डार्क ब्लॅक स्क्रीन येऊन शॉर्ट फिल्म संपते.

ही इराणी शॉर्ट फिल्म असून, पारसी भाषेतील संवाद आहेत. मात्र संपूर्ण शॉर्ट फिल्मला इंग्रजी सबटायटल्स आहेत. अर्थात, सबटायटल्स नसते, तरी फिल्म समजू शकते, इतके ताकदवान दृश्य आहेत. मी पहिल्यांदा सबटायटल्स न वाचता पाहिली, नंतर काही एका ठिकाणचे संवाद समजणे गरजेचे होते म्हणून पुन्हा पाहिली.

एका शाळेच्या एका वर्गातील चार भिंतीत फिल्मचं कथानक आहे. एका गणिताभोवती संपूर्ण कथानक फिरतं. इतकं साधं असलं, तरी त्यामागील अर्थ नि संदेश क्रांतिकारी आहे.

संपूर्ण फिल्ममध्ये कुठेही कुठल्यादी देश किंवा प्रदेशाचा उल्लेख नाही, कुठल्याही कॅरेक्टरचं नाव नाही. ते नसणं किती महत्त्वाचं आहे, हे शॉर्ट फिल्म पूर्ण पाहिल्यावर कळून चुकतं. कारण या शॉर्ट फिल्मचा संदेश हा तमाम जगातील कट्टरतावादी आणि हुकुमशाही प्रवृत्तींना उद्देशून असल्याचे लक्षात येते.

एक एक्स्प्रेशनलेस शिक्षक, जो मुलांना 2 + 2 = 5 असे शिकवू पाहतो. अर्थात, त्याला तशा हेडमास्टरच्या सूचना असतात. या सूचनाही फिल्मच्या सुरुवातीला आहेत. विद्यार्थ्यांची कुजबूज सुरु होते. कारण दोन अधिक दोन चार होतात, मग पाच कसे? मात्र, मी जसे शिकवेन, तसेच बोलायचे, लिहायचे आणि तेच खरे, या आवेशात शिक्षक विद्यार्थ्यांना दरडावतो.

शिक्षक 2 + 2 = 5 असे त्याच्या मागोमाग म्हणायला सांगतो. मात्र समोरील एका विद्यार्थ्याला ते पटत नाही, तो उभा राहतो. शिक्षकाला आव्हान देतो. त्यावेळी आपल्या आजूबाजूच्या समाजाचे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व करणारे दोन विद्यार्थी त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करतात आणि आगामी परिणाम काय असतील, हेही सांगतात. मात्र तो विद्यार्थी खरेपणावर ठाम राहतो. त्याची परिणिती त्याची हत्या केली जाते. शिक्षकांच्या समोर.

त्यानंतर शिक्षक पुन्हा 2 + 2 = 5 हे फळ्यावर लिहून विद्यार्थ्यांना आपापल्या वहीत लिहायला सांगतात. समोरील बाकीचे विद्यार्थी बिथरलेले असतात. शिक्षकांनी सांगितले तसे लिहिले नाही, तर आपलीही हत्या होईल, या भितीने ते लिहू लागतात. मात्र शेवटच्या बेन्चवरील एक विद्यार्थी (या पोस्टला ज्याचा स्क्रीनशॉट अटॅच केला आहे.) असतो, तो 2 + 2 = 5 लिहितो, मग विचार करतो आणि 5 खोडतो आणि तिथे 4 करतो. खरंतर ते अत्यंत धाडसाचं असतं. त्यानंतर एक धडकी भरवणारा ब्लॅक डार्क येतो आणि फिल्म संपते.

खरंतर 'फिल्म संपते' म्हणणे चूक ठरेल. तिथून खऱ्या अर्थाने आपले विचार सुरु होता. 6 ते 7 मिनिटांच्या कालावधीत किती नेमकी स्थिती मांडली आहे. विशेषत: हुकुमशाही प्रवृत्तीच्या मानसिकता कशाप्रकारे आपले विचार(?) इतरांवर थोपवू पाहतात, किंवा आम्ही म्हणून तेच खरे, हे दाखवण्याच प्रयत्न यातून केला आहे. त्याचवेळी, अशा दहशतीच्या स्थितीतही बंडखोरी करणारे आणि व्यवस्थेला आव्हान देत सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहणारेही असतात, हेही यातून दाखवले आहे. यासाठी दिग्दर्शकाने ज्या प्रतिकांचा वापर केला आहे, तो अप्रतिम आहे.

मला फिल्म किंवा नाटकाबद्दल नीटसं लिहिता येत नाही. तसा कधी प्रयत्न केला नाही. पण पहिल्यांदा शॉर्ट फिल्मबद्दल लिहिण्याचा प्रयत्न केलाय. असो. तुम्ही ही शॉर्ट फिल्म नक्की पाहा. इथे लिंक देतो आहे - https://www.youtube.com/watch?v=PtkER-BhXzQ

नामदेव अंजना

होय, मी 'फुरोगामी' आहे!



गेले काही दिवस पाहतोय. काही महिने खरंतर. 'फुरोगामी' शब्दाची चलती वाढलीय. जगाच्या बेरीज-वजाबाक्या नुकतंच कळू लागलेल्यांना वाटावं की, 'फुरोगामी' हा शब्द 'पुरोगामी' शब्दाला समानार्थी शब्दच आहे की काय. इतका विकृत आणि प्रदूषित प्रचार केला गेलाय. यात शिकले-सवरलेले आघाडीवर आहेत, हे वेगळं सांगायला नको. कारण असल्या उचापत्या सर्वसामान्यांच्या आवाक्यातले नसतात. तर असो. मुद्दा तो नाही. त्याही पलिकडचा आहे.

पुरोगामी... ज्याला इंग्रजीत बहुधा प्रोग्रेसिव्ह म्हणतात. या शब्दाच्या व्याख्येत मला शिरायचं नाही. म्हणजे 'द वर्ड प्रोग्रेसिव्ह डिराईव्ह्ड फ्रॉम लॅटिन वर्ड अमूक-तमूक' असल्या व्याख्या इथे द्यायच्या नाहीत. मला या शब्दातला आशय महत्त्वाचा वाटतो. मी त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करेन. जमेल तसा.

पुरोगामी शब्दाने कितीतरी मोठा अर्थ स्वत:त सामावून घेतलाय. आपल्या विचारांनी आणि त्या विचारांच्या कृतीतून आपल्या भोवतालात योग्य बदल घडवणार्‍या कित्येकांनी मोठ्या अभिमानाने स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेतलंय. आणि पुरोगमी असल्याची ओळख ठेवणीतल्या दागिन्यांप्रमाणे जीवापाड जपलीय.

वर्षांमागून वर्षे लोटली, दशकं लोटली, अगदी शतकं लोटली. मात्र पुरोगामी विचार कालबाह्य झाले नाहीत. ते दिवसागणिक वृद्धिंगत होत गेले. उलट त्याकडचा ओढा आणखी वाढला. खरंतर हेच पाहता पुरोगामी विचारांमधील सामर्थ्य लक्षात यायला हवं होतं. पण उथळ विचारांनी भारावून गेलेल्या वर्तमान-वातावरणात इतका सखोल विचार करतो कोण? असो.

मुळात पुरोगाम्यांना 'फुरोगामी' म्हणून चिडवणार्‍यांच्या बेसिकमध्येच लोचा आहे. कदाचित तो जन्मजात असावा किंवा पुढच्या वाढीच्या काळात आजूबाजूच्या वातावरणाने दिला असावा. पण लोचा आहे हे नक्की. कारण त्यांना वाटतं की, पुढारलेला विचार करणारे स्वत:च स्वत:ला पुरोगामी म्हणवतात की काय. तर बच्चेलोग, असं नसतंय. जर नीट पाहा संपूर्ण प्रोसेसकडे. मग लक्षात येईल, ज्या ज्या व्यक्तींनी माणुसकीची कास धरली, ज्यांनी ज्यांनी सृष्टीतला प्रत्येक जीव सर्वोच्च मानला, ज्यांनी ज्यांनी अन्यायाचा कडाडून विरोध केला, त्या कुठल्याच व्यक्तीने कधीच स्वत:हून स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेतलं नाही. त्यांना आजूबाजूच्या समाजाने पुरोगामी म्हटलं. जे आता फुरोगामी म्हणून हिणवतायेत, त्याच प्रवृत्तीने त्यांना पुरोगामी म्हटलं होतं. कारण अंधारातल्या माणसालाच उजेडाचं अप्रूप असतं. उजेडाला स्वत:चं कौतुक काय!

आपण त्याही पुढे जात पुरोगामीपणाची व्याख्या करुया. कदाचित सगळ्यात सोपी व्याख्या ठरेल अशी. ती म्हणजे - माणुसकीची भावना जपणे. इन शॉर्ट - पुरोगामी इज नन आदर दॅन माणुसकीची चळवळ. इतकं सोप्पंय. अर्थात माझ्यालेखी अशी व्याख्या.

आता थोडं फुरोगामी म्हणणार्‍यांकडे वळूया. या जमातीचं मला प्रचंड कौतुक वाटतं. हे भयानकरित्या गोंधळलेलं असतात. म्हणजे इतके गोंधळलेले की हल्ली हल्ली तर यांनी खिल्ली उडवण्याची लेव्हलही क्रॉस केलीय. काहीही गोष्ट घडली की पुरोगाम्यांवर आगपाखड सुरु करतात. इतकी की कधी कधी वाटतं यांना मेंटल डिसआॅर्डर वगैरे झालंय की काय.

महाराष्ट्राला-देशला, इव्हन जगालाही पुरोगामी विचारांची मोठी परंपरा आहे. कट्टरतावादी विचारांना झुगारुन, अनिष्ट रुढींना नाकारुन, जुलमी प्रवृत्तींना पराभूत करुन ताठ मानेने मानवतावादी विचारांच्या पायावर पुरोगामी विचार भक्कमपणे पाय रोवून उभे आहेत. तुम्ही कितीही नावं ठेवलीत, कितीही फुरोगामी वगैरे म्हणत खिल्ली उडवलीत, कितीही हीन पातळी गाठलीत, तरी हे विचार संपत नसतात. कारण एका पॉईंटनंतर पुरोगामी केवळ विचार न राहता ती जीवनशैली होते. प्रत्येक गोष्टीकडे विवेकी नजरेतून पाहण्याची नवी दृष्टी तुम्हाला लाभते. आणि हो, ही 'फुरोगामी' म्हणण्याइतकी साधी गोष्ट नाहीय.

सांगण्याचा मुद्दा इतकाच होता की, पुरोगाम्यांना 'फुरोगामी' म्हटलंत तर, 'पुरोगाम्यांची कशी जिरवली' वगैरे म्हणत तुम्ही केवळ काही क्षण समाधानी होऊ शकता. पण पुरोगामी विचार दडपू शकत नाही. ते पुरुन उरतात. आणि प्रत्येक सजीवाची संवेदना जाणणारा विचार सजीव राहणारच, हे वेगळं सांगायला हवं का?

कुणीतरी भल्याचा विचार करत असतो. मात्र त्याला नावं ठेवणारी कमी नसतात. या नावं ठेवणाऱ्यांना आमच्या गावाकडे 'काळोखाची कुजबूज' म्हणतात. कारण काळोखाने कितीही कुजबूज केली, तरी उजेडाला फरक पडत नसतो. तो अस्खलित स्पष्ट आणि खरा असतो.

शेवटी एवढंच सांगेन, माणसाकडे माणूस म्हणून पाहायला सांगणाऱ्या या विचारांना कुणी 'फुरोगामी' विचार म्हणत असेल, तर तसेही चालेल. कारण प्रश्न शब्दाचा नाही, प्रश्न त्यातील विचाराचा, भावनेचा आहे. आणि त्या भावनेशी पुरोगामी चळवळीतील साथी एकनिष्ठ आहेत.


नामदेव अंजना

08 February, 2018

श्रेय ज्याचे त्यास द्यावे..



सह्याद्रीच्या पर्वतरांगा, चहूबाजूला गर्द झाडी, डोंगराच्या मध्यभागी नारळाच्या झाडांनी वेढलेलं तीस ते पस्तीस उंबरठ्यांचं चिमुकलं गाव, गावाच्या वेशीवर एक पार, मस्त रुंद चौथरा... डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यातला एखादा दिवस, त्या दिवसाची दुपार थोडी संध्याकाळकडे झुकलेली, साडेतीन-चार वाजण्याचा सुमार.... एकंदरीत चहूबाजूंना प्रसन्न वातावरण.

अशा नितांत सुंदर निवांत वेळी आपण दोन-चार सवंगड्यांसोबत हलक्या-फुलक्या गप्पा मारत पारावर बसलेलो असावं, अनं सवंगड्यांपैकी कुणीतरी त्याच्या आयुष्यातल्या कडू-गोड आठवणी सांगाव्यात. अगदी सहज, सोप्या भाषेत आणि प्रेमळ सुरात... वाह!

कसलं भारी ना? सारं कसं स्वप्नवत!

माधुरी अरुण शेवते यांचं ‘श्रेय ज्याचे त्यास द्यावे’ हे पुस्तक वाचताना असंच काहीसं वाटलं. माझ्या धावपळीच्या वेळातून निवांत क्षण या पुस्तकासाठी ठेवले होते. त्यामुळे शांततेत या पुस्तकाचा रोमँटिसिझम अनुभवता आला.

लेखिका अगदी सहजतेने एक एक प्रसंग उलगडत जाते. वाचत असताना एका क्षणी आपण पारावर निवांत बसून माधुरी शेवतेंच्या तोंडून हे किस्से ऐकतोय की काय, असं वाटून जातं. इतकं त्यांच्या लेखनात गुडूप व्हायला होतं आणि प्रत्येक प्रसंगात लेखिकेच्या आजूबाजूला वावरु लागतो.

विंदा करंदीकरांची एक छानशी कविता आहे. त्या कवितेची सुरुवात अशी की – “उंची न वाढते आपली, फारशी वाटून हेवा.. श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा...” विंदांच्या या कवितेतील एक ओळ लेखिकेने आपल्या पुस्तकाला शीर्षक म्हणून दिलंय. पुढे पुस्तक वाचताना पुस्तकाचे शीर्षक किती चपखल, नेमकं आणि समर्पक आहे, हे लक्षात येतं. शीर्षकाला छेद जाईल, असं वाक्य या पूर्ण पुस्तकात कुठेही आढळत नाही. आत्मस्तुतीचा लवलेशही नसलेलं वर्णन वाचकांच्या मनाला स्पर्श करतं, अन् मनापासून भावतं.

गुलजारसाहेब, ते दिवस, शहाळ्यातील पाणी, बाई, शर्वरी, एका श्वासाचे अंतर, चंदाराणी आणि गुलमोहर अशी दोन हाताच्या बोटावर मोजावेत इतकेच लेख या 108 पानी पुस्तकात आहेत. लेख छोटेखानी असले, तरी त्यातील माणसं, त्यातील आठवणी, प्रसंग, किस्से लेखिकेसाठी अविस्मरणीय असतीलच, पण वाचक म्हणून आपल्यालाही समृद्ध करणारे आहेत.

पुस्तक वाचत असताना, जसजसे आपण एका पानावरुन दुसऱ्या पानावर, दुसऱ्यावरुन तिसऱ्या.. असं पुढे पुढे सरकत शेवटाकडे येतो, तेव्हा शेवटी शेवटी लेखिकेचा हेवा वाटतो. लेखिकेचं किती मनस्वी मनाच्या माणसांशी नातं जुळलं, ऋणानुबंध जुळले!

वाचकांनाही समृद्ध करणारे प्रसंग या पुस्तकाच्या अनेक कोपऱ्यात दडलेले असताना, लेखिका प्रामाणिकपणे मनोगतात नमूद करते, “मी काही लेखिका नाही, पण मनातील भावभावना आपण लिहाव्यात अशी इच्छा निर्माण झाली, त्याचे कारण आमच्या घरातील सांस्कृतिक वातावरण.”. वाचकांना समृद्ध करणे, हे जर लिहिणाऱ्यांच्या अनेक हेतूंपैकी एक असेल, तर माधुरी शेवते ते पूर्ण करतात. तरीही त्या विनम्रतेने लेखिका नसल्याचे नमूद करतात, हे त्यांचं मोठेपण आहे.

आता थोडं पुस्तकातील लेखांकडे वळूया. मोजून आठ लेख यात आहेत. त्यातील प्रत्येक लेखाबद्दल बोलूया. अर्थात, सविस्तर नाहीच. अगदी थोडक्यात.

पहिला लेख ‘गुलजारसाहेब’ आहे. मुळात मराठी सृष्टीत गुलजार या नावासोबत मराठीतलं नाव जोडलं जातं ते कवी अरुण शेवते यांचं. म्हणजेच लेखिकेचे पती. अरुण सरांमुळे गुलजार आणि शेवते कुटुंबीयांचा स्नेह वाढला आणि गुलजार त्यांच्या नात्यातील एक असल्यासारखे बंध जुळले. गुलजारांच्या सहवासातील आठवणी लेखिकेने सांगितल्या आहेत. आजही शेवते आणि गुलजार हे समीकरण मराठीसृष्टीत सर्वश्रुत आहे. त्यामुळे साहित्यापलिकडचे गुलजार या लेखात वाचायला मिळतात.

अरुण शेवतेंच्या ‘शर्वरीच्या कविता’ या संग्रहातील कवितांचा भावनुवादही गुलजारसाहेबांनी केला आहे. गुलजारांनी त्यांच्या कविताही अरुण सरांना समर्पित केल्या आहे. इतके जवळचे आणि सहृदयी नाते. गुलजार प्रत्येकवेळी नव्याने कळतात, असे म्हणतात. या लेखातूनही गुलजार नव्याने कळतात, असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

यानंतर यशवंतराव गडाख यांच्याबद्दल लेखिकेने लिहिले आहे. महाराष्ट्रातील खूप कमी राजकीय नेते आहेत, जे साहित्यविश्वातही रमले. त्यात गडाखांचं नाव नक्कीच वरच्या स्थानावर घेता येईल. गडाख आणि शेवते यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. इतके की आडी-अडचणीला अगदी घरच्या माणसासारखी त्यांना हाक मारली जाते. राजकारणाच्या पलिकडचे गडाख इथे अनुभवायला मिळतात.

ग्रामीण भागाचे खाच-खळगे जे जगले, ते यशवंतराव गडाख हे खऱ्या अर्थाने लोकनेते. गाववर्गणी गोळा करुन जिल्हा परिषदेची निवडणूक लढून गडाख राजकारणात आले. मात्र जे लहानपणी सोसले होते, ते चटके ते विसरले नाहीत. दीन-दुबळ्यांसाठी कायम झटत राहिले. राजकारणातल्या या मनमिळाऊ आणि राजबिंडं व्यक्तिमत्त्वाने कुणाला भुरळ घातली नाही, तरच नवल. पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जात हा माणूस प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवून आहे. अशा माणसासोबतचे कौटुंबिक सहृदयी नाते लेखिकेने या लेखात मांडले आहे.

‘शहाळ्यातील पाणी’ या तिसऱ्या लेखातही गडाखांसारखेच प्रसंग. मात्र ज्या व्यक्तीवर आधारित हा लेख आहे, ती व्यक्ती म्हणजे टी. एन. धुवाळी. राजकारणाच्या परीघात 'धुवाळीसाहेब' म्हणून ते परिचित. शरद पवार यांचे ते 40-45 वर्षे सेक्रेटरी होते. पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी. धुवाळी हे शेवते कुटुंबीयांसाठी ‘बाबा’ होते. साक्षात पवारांच्या ‘जवळचा माणूस’ म्हणजे किती अहंकारी असायला हवे ना, पण हा लेख वाचून त्या गृहितकाला पार धक्का बसतो. कारण धुवाळीसाहेब किती नम्र स्वभावाचे होते, हे कळतं.

‘बाई’, ‘एका श्वासाचे अंतर’ आणि ‘शर्वरी’ हे तिन्ही लेख काळजाला भिडणारे आहेत. ते यासाठी कारण रक्ताच्या नात्यातील या तीन व्यक्ती, म्हणजे लेखिकेच्या सासूबाई, पती अरुण शेवते आणि मुलगी शर्वरी यांच्यावर आधारित हे लेख आहेत.

सुनेने सासूवर लिहिलेला ‘बाई’ हा लेख आहे की, मुलीने आईवर, असा प्रश्न पडावा, इतके ऋणानुबंध. अरुण शेवतेंवरील लेख एका प्रसंगाभोवती फिरतो. पण त्यातून अरुण सरांचं शांत, संयमी आणि समजूतदार व्यक्तिमत्त्व उलगडतं.

‘शर्वरी’ हे नाव मराठी साहित्यसृष्टीत तसे ओळखीचे. अर्थात ते अरुण शेवतेंच्या ‘शर्वरीच्या कविता’मुळे. पण शर्वरीच्या लहानपणापासूनचा जडण-घडणीचा प्रवास, सोबतची माणसं, तिचे छंद इत्यादी गोष्टी आणि त्याआडून आई म्हणून सुख, लेखिका यात मांडते.

शर्वरी हे नाव ठेवण्याचा किस्साही खूप छान आहे. अरुण शेवतेंच्या आईंना धाडसी कलेक्टर शर्वरी गोखले फार आवडायच्या. त्यावरुन शर्वरी नाव.

शर्वरी गोखेल या महिला सनदी अधिकाऱ्यांच्या पहिल्या पिढीच्या प्रतिनिधी. एक आदर्श सनदी अधिकारी म्हणून त्या लोकप्रिय होत्या. कुणाच्याही दबावापुढे न झुकता, अगदी निर्भीडपणे लोकाभिमुख निर्णय घेणाऱ्या अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख होती.

पुढे अरुण शेवतेंच्या कवितासंग्रहाने ‘शर्वरी’ शब्दात आपल्यासमोर आणली.

उर्वरित दोन लेख, ‘चंदाराणी’ आणि ‘गुलमोहर’, हे दोन्ही लेख लेखिकेच्या माणुसकीचं मोठेपण आणि संवेदनशीलता दाखवून देतात. चंद्रा या घरकाम करणाऱ्या मद्रासी मुलीचे लेखिकेवरील आणि लेखिकेचे प्रेम सांगणारा ‘चंदाराणी’ हा लेख. चंद्राला मुलीप्रमाणे वागवणाऱ्या, तिच्या सुख-दु:खात धावून जाणाऱ्या लेखिकेचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. त्यानंतरचा ‘गुलमोहर’ हा लेखही तसाच आहे. लेखिकेतला संवेदनशीलपणा दाखवणारा. मुक्या गोष्टींविषयी असलेली संवेदनशीलता, ओढ, कौतुक, आपुलकी या बाबी तशा दुर्लभ झालेल्या काळात लेखिका गुलमोहराच्या झाडासोबतचं तयार झालेलं नातं सांगते. ते वाचताना एकाचवेळी कौतुक वाटतं आणि आदरही.

असे एकूण आठ लेख या छोटेखानी पुस्तकात समावले आहेत. प्रत्येक लेखातील प्रत्येक गोष्ट आता इथे सांगता येणार नाही. पण पुस्तकावरची धावती नजर अशी आहे.

खरं तर पद्मगंधा, शब्दालय, सकाळ, चिंतन आदेश, वाघूर आणि ऋतुरंग अशा अंकांमध्ये याआधी यातील सर्व लेख प्रकाशित झाले आहेत. पण ते सर्व एका ठिकाणी पुस्तकाच्या स्वरुपात आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ‘ग्रंथाली’चे वाचक म्हणून आभार मानायलाच हवे.

जेव्हा हे पुस्तक खरेदी करुन तुम्ही घरी आणाल, तेव्हा असंख्य पुस्तकांच्या मांडणीत हे प्रेमळ संवाद साधणारं पुस्तक एखाद्या सुवासिक फुलासारखं शोभून दिसेल, एवढं नक्की.

03 February, 2018

पवारांचं डोकं ठिकाणावर आहे का?


      
पवारांबद्दल आदर आहेच. माझ्या ओळखीतले अनेकजण तर मला 'पवारांचा माणूस' म्हणतात. पण ते किती खोटे आहे, हे माझं मला माहित आहे. कारण माझं समर्थन हे विषयागणिक बदलत जातं. एखाद्या विषयावर ज्याची भूमिका योग्य, त्याच्या बाजूने राहणं मला पटतं. पवारांबाबतही तसेच आहे. पण आज त्यांच्या भाषणाने कहर केला. पवारांसारख्या 'जाणत्या' नेत्याकडून अशा भूमिकेची अजिबात अपेक्षा नव्हती. किमान आजच्या विखारी स्थितीच्या काळात तरी.

पवारांच्या भाषणातील ज्या मुद्द्यावर माझा पुढील संपूर्ण लेख अवलंबून आहे, तो मुद्दा नक्की काय आहे, पवार नेमकं काय म्हणाले हे प्रथम पाहूया.

औरंगाबादमधील हल्लाबोल यात्रेच्या सभेत पवार म्हणाले, ट्रिपल तलाक. माझं स्वच्छ मत असंय, भगिनींना संरक्षण द्यायचा विचार असेल, तर मुस्लिम समाजातील प्रमुख लोकांना विश्वासात घेऊन, धर्मगुरुंना विश्वासात घेऊन, काय पाऊल टाकायचे ते टाकता येईल. पण तलाक हा इस्लामच्या माध्यमातून एक दिलेला मार्ग आहे, संदेश आहे. आणि त्या संदेशामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कुठल्याही राज्यकर्त्याला नाहीय. तुम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप करता याचा अर्थ एका धर्माच्या लोकांना समाजामध्ये एका वेगळ्या स्थितीला नेऊन पोहोचवण्याचं काम तुम्ही करत आहात. याला आम्ही कदापि पाठिंबा देणार नाही.

सध्याचा काळ हा विखार पसरवणारा आहे. जुनाट चाली-रिती आणि प्रथांमध्ये ढकलणारा आहे. भाजप, संघ किंवा तत्सम संघटना प्रतिगामी शक्तींना बळ देत असताना, पवारांसारख्या स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या नेत्याच्या तोंडी तलाकसारख्या जुलमी पद्धतीला अप्रत्यक्ष समर्थन किंवा हलका विरोध माझ्यासारख्याला नक्कीच खटकतो. कारण पवारांचा तलाकविरोधी लढ्याशी जवळून संबंध आहे. पुढे त्यावर सविस्तर लिहिलं आहेच.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या तलाकबंदीच्या निर्णयाला पवारांनी अप्रत्यक्षही म्हणता येणार नाही, खरंतर स्पष्टपणे विरोध दर्शवला आहे. त्यांच्या बोलण्याचे सूर अगदी स्पष्ट होते. (पवारांच्या भाषणाचा व्हिडीओसाठी इथे क्लिक करा. 11.50 ते 12.40 या मिनिटांच्या दरम्यान पवारांचे तलाकसंबंधी वक्तव्य आहे.)

राज्यकर्त्यांना कुठल्याही धर्मात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असे पवारांचे मत आहे. हे त्याहून धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. पवारांसारख्या माणसाला हे सांगणे खरंतर उचित ठरणार नाही की, जुनाट पद्धती, जुलमी चाली-रिती या सगळ्या धर्माशी संबंधित आहेत. त्यात माणसाचे बळी जाण्यापर्यंतचे प्रकार आहेत. असे भयंकर वातावरण या पद्धतींमध्ये असताना, राज्यकर्त्याने या चाली-रिती बंद करताना त्या त्या धर्मातील मोठ्या लोकांसोबत चर्चा केली पाहिजे, असे मत असेल तर कमाल आहे. चोरट्याची चोरी चांगली की वाईट ठरवण्यासाठी इतर चोरट्यांना विचारण्यासारखं हे विधान आहे.

पवारांच्या आजच्या भाषणावर बोलूच. पण त्याआधी थोडे इतिहासात घुसू. पवारांनी कधी जातीयवादी भूमिका घेतली, कधी धर्मनिरपेक्ष भूमिका घेतली वगैरे गोष्टी आता मांडत नाही. त्या गोष्टींचा आलेखही मोठा असेल. पण मुस्लीम समाजातील तलाक, बहुपत्नीत्व वगैरे गोष्टींवर तरी किमान पवारांची भूमिका स्पष्ट असावी, असा माझा आतापर्यंतचा समज होता. कारण त्याला इतिहासात तसे संबंधांचे धागे आहेत. ते धागे पुढे मांडणार आहे. पण तो समज किती बोगस होता, हे आज कळून चुकले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पवारांनी जाहीरपणे कौतुक करायला हवे होते, स्वागत करायला हवे होते, अगदी सुप्रिया सुळेंनी ज्याप्रकारे केले तसे. पण तसे झाले नाही.

आणि पवारसाहेबऔरंगाबादेत भाषण करत होतात की पाकिस्तानात? कुठल्या धर्मात हस्तक्षेप करण्याचा अधिकार जर सरकारला नसेल, तर जुनाट प्रथा बंद कशा व्हायच्या? कारण सगळ्या जुनाट-जुलमी पद्धती या धर्माशी संबंधितच आहेत. त्या त्या धर्मातील लोकांशी चर्चा करत या गोष्टी सोडवत सरकार बसले, तर त्या त्या धर्मातील कमकुवत घटक आणखी १००-२०० वर्षे धर्माने तयार केलेल्या अदृश्य गुलामीत जगात राहतील. इतके तुमच्यासारख्या जाणत्या नेत्याला कळू नये? कमाल आहे!

खरंतर इतर कुणी ही भूमिका घेतली असती, तर तितके आश्चर्य वाटलं नसतं. पवारांच्या या भूमिकेवर धक्का बसण्याची दोन करणं आहेत, एक म्हणजे हमीद दलवाई यांच्यासोबत पवारांची वैचारिक मैत्री आणि वैयक्तिक मैत्री, दुसरं कारण म्हणजे महिला आरक्षणासाठी पवारांचा पुढाकार. दोन्ही कारणं एक एक करुन पाहू.

पहिले कारण हमीद दलवाई. हमीद दलवाई हे मुस्लिम समाजातील धाडसी समाजसुधारक. अत्यंत मानाचे नावं. मुस्लिम समाजातील शेकडो वर्षांच्या जुनाट रुढींना धक्के देत क्रांतिकारी विचार मांडणारा माणूस म्हणजे हमीदभाई. हमीदभाईंनी मुस्लिम समाजातील प्रखर विरोधाला तोंड देत, 40 वर्षांपूर्वी पहिल्यांदा तलाक प्रथेविरोधात मंत्रालयावर मोर्चा नेला होता. मुख्यमंत्र्यांपासून तत्कालीन पंतप्रधानांपर्यंत आवाज पोहोचवला होता. कित्येकदा कट्टर मुस्लिमांकडून झालेले हल्लेही पाचवले. त्या काळात हमीदभाईंचे जवळचे एक मित्र होते. वैचारिक आणि वैयक्तिकही. त्या मित्राचे नाव शरद पवार.

याच शरद पवारांना हमीदभाईंच्या सुरक्षेची काळजी लागलेली असायची. हमीद, तुझे काम क्रांतिकारी असून, हल्ल्याची भीती आहे. म्हणू ही बंदूक सांभाळ, असेही याच पवारांनी हमीदभाईंवर ज्यावेळी माहिमच्या दर्ग्याबहेर कट्टर मुस्लिमांनी हल्ला केला, त्यावेळी म्हटले होते. याच पवारांनी हमीदभाईंना शेवटच्या काळात स्वतःच्या शासकीय बंगल्यात ठेवले. तेव्हा पवार गृहराज्य मंत्री होते. 1977 सालची गोष्ट. त्याच बंगल्यात हमीदभाईंनी अखेरचा श्वास घेतला.

एकंदरीत शरद पवार आणि हमीदभाई हे केवळ वैयक्तिक मित्र राहिले नाहीत, तर वैचारिकही मित्र राहिले आहेत. हमीदभाईंसारख्या क्रांतिकारी विचारवंतांचे मित्र राहिलेल्या पवारांच्या तोंडून तलाकबंदीवर विरोधाचे सूर यावे, हे नक्कीच धक्कादायक आहे. आज हमीद भाई असते, तर त्यांनी मित्रत्वाच्या नात्याने पवारांना खडेबोल सुनावले असते, यात मला शंका वाटत नाही.

दुसरे कारण म्हणजे, याच पवारांनी सुमारे 25 वर्षांपूर्वी महिला आरक्षणासाठी पुढाकार घेतला होता. किंबहुना मुद्दा तडीस नेला आणि महिलांना आरक्षण मिळवून दिले. तो निर्णय क्रांतिकारी होता. महिलांना सार्वजनिक क्षेत्रात पुढे येण्यासाठी मोठं बळ मिळालं. तेच पवार तलाकबंदीला विरोध करत मुस्लिम समाजातील महिलांना पुन्हा जुनाट प्रथांच्या जोखडाखाली बांधू पाहत आहेत. एकीकडे महिलांनी पुढे यावे म्हणून आरक्षणासाठी प्रयत्न करायचे आणि दुसरीकडे तलाकबंदीला आडवळणाने विरोध करायचा, हे कुठल्याही पातळीवर पटण्यासारखे नाही. किमान पवारांसारख्या माणसाकडून. 

आधी म्हटल्याप्रमाणे, भाजप, संघ किंवा तत्सम संघटना जाती-धर्माच्या नावाने विष पसरवत असताना, पुरोगामी विचारांच्या निर्णयांवर, भूमिकांवर, मतांवर ठाम राहण्याची गरज आहे. धर्मनिरपेक्ष आणि समतेच्या विचारांना बळ देण्याची गरज आहे. ताकद देण्याची गरज आहे. तरच विषारी विचारांविरोधात लढण्याचं बळ सर्वसामान्य तरुणांमध्ये येईल. आणि ही बळ देण्याची जबाबदारी पवारांसारख्या नेत्याच्या खांद्यावर तर इतरांच्या तुलनेत अधिक आहे. कारण केवळ जाणता नेता नव्हे, तर देशातील विरोधी पक्षातील नेत्यांमधील ताकदवान आवाज म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.

मी तर म्हणेन, एकवेळ राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाची भूमिका म्हणून तलाकबंदीला विरोध केला असता, तरी मी समजून घेतले असते. कारण राजकीय पक्ष म्हणून त्यांचे हितसंबंध असतील, असे गृहीत धरले असते. पण पवारसाहेब, तुमचा तर संबंध क्रांतिकारी विचारांच्या हमीद दलवाई नामक माणसाशी आला होता, त्यांचे विचार इतक्या लगेच विसरलातही? 

मी तर म्हणेन, पवार औरंगाबादमधील तलाकबंदीसंदर्भातील मतावर स्पष्टीकरण देत नाहीत, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसनेही पुरोगामीपणाच्या बाता ठोकू नयेत. आणि ते मत पवारांचे वैयक्तिक मत असू शकते, असल्या पळवाटाही शोधू नयेत. 

जाणता नेता म्हणून शरद पवारांकडे पहिले जाते. 'पुरोगामी... पुरोगामी...' अशी ओरडसुद्धा याच पवारांच्या तोंडून आम्ही ऐकत आलोय. आणि महत्त्वाचे म्हणजे, आजच्या घडीला भोवताल इतका विखार पसरवणारा आणि जुनाट प्रथांमध्ये लोटणारा असताना पवारांसारख्या विरोधी पक्षातील जाणत्या नेत्याने तलाकसारख्या अत्यंत गंभीर मुद्द्यावर इतकं उथळ बोलाव? कठीण आहे. पवारांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध.

भाषण ऐकताना पवारांच्या तोंडून जेव्हा तलाकसंबंधी भूमिका ऐकली, त्यावेळी पहिलं वाक्य माझ्या तोंडून बाहेर पडलं – पवारांचं डोकं ठिकाणावर आहे ना?

आपण फक्त एवढंच करुया...



काल गांधींबद्दल काहीच लिहिले नाही. कारण गांधीवादी आणि गांधी विरोधक अशा दोन्हीकडून रणकंदन सुरु होतं. एकीकडे गांधी पटवून देण्याची धडपड दिसली, दुसरीकडे गांधींना चूक ठरवण्याचीही धडपड दिसली. मुळात गांधी पटवून देण्याची गोष्ट नाही. विवेकी आणि शांतताप्रिय माणसाला गांधी पटतोच. आणि चूक ठरवण्याची धडपड तर गांधी असल्यापासूनची आहे. त्यावर न बोललेलेच बरे.

प्रश्न असा आहे की, गांधींचा विरोध करता करता, अन् नथुराम गोडसेचं समर्थन करता करता, अनेकजण वधाच्या नावाखाली हत्येचं सुद्धा समर्थन करत आहेत. आपण इतक्या विखारात अन् असंस्कृत देशात वावरतो आहोत का, जिथे हत्येचं इतक्या उघडपणे समर्थन केले जाते?

गांधी की गोडसे हा वादाचा विषय कसा होऊ शकतो? निशस्त्र वृद्धाची हत्या करणाऱ्याला सहानुभूती कशी दिली जाऊ शकते? दिली जात असेल, तर सहानुभूतीदारांच्या मेंदूच्या तपासणीची नितांत गरज आहे. कारण हे मेंदू देशाला हिंसेच्या खाईत लोटण्याची शक्यता आहे.

प्राध्यापक संतोष शेणई सरांचं एक वाक्य मला आठवतंय. मागे एका ग्रुपवर चर्चा सुरु असताना त्यांनी गांधी-गोडसे वादावर छान वाक्य वापरलं होतं. ते म्हणाले - 'गांधी' हा विचार आहे, त्याची बांधिलकी मानता येते किंवा नाकारता येते. पण 'नथुराम' हा विचार नाही, ती विकृती आहे, ती केवळ नाकारताच येते.

या देशात गांधीवाद समजलेला नसूनही गांधीवादी असल्याचे सांगणारे जसे खोऱ्याने आहेत, तसेच केवळ कुणीतरी सांगितले म्हणून गांधीला विरोध करणारे सुद्धा खोऱ्याने सापडतील. हल्ली तर त्या शरद पोंक्षेंचे नाटक बघून सुद्धा गांधींचा विरोध करणारे वाढलेत. हे एक अजब आहे. केवळ नाटक पाहून, भारावून जात विरोध करणे. असो.

एखादा मुलगा आपल्या आई-वडिलांना त्रास देतो, त्याला ते नकोसे होतात. म्हणून त्यांना बाजूला करतो. त्याचवेळी आई-वडील नसणाऱ्यांना मात्र त्याच आई-वडिलांची किती आपुलकी असते. ओढ असते. त्याला ते हवे असतात. कारण त्याने आई वडिलांचे प्रेम अनुभवलेले नसते.

गांधींचे सुद्धा तसेच आहे. या देशाने गांधींना बाजूला केले, तरी जगातल्या कित्येक देशांना गांधी हवाच आहे. कारण त्यांना गांधींच्या विचारांची ताकद माहित आहे. असो.

येत्या काळात केवळ संघ किंवा भाजपचा विरोध म्हणून गांधींना आपलंसं करणारे वाढतील आणि अर्धवट माहितीवर गांधींना विरोध करणारेही वाढतील. अशा उथळ गोंधळात आपण फक्त एवढंच करुया - अहिंसा आणि सत्य ही तत्व जोपासणारा गांधी जपूया.

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...