03 February, 2018

संमेलनाच्या नोंदी (भाग चार)



संमेलनाच्या नोंदी लिहीत असताना काहीजणांनी मेसेज करुन विचारले, काय रे यावेळी पुस्तके नाही मिळाली का? तर दोस्त हो, साहित्याच्या प्रांगणात जाऊन रिकाम्या हाताने परतेन, असे कसे होईल? महानगर साहित्य संमेलनातूनही माझ्या किताबखान्यात अनेक मित्र आले.

यावेळी थोडं वेगळं घडलं, जेवढी पुस्तके खरेदी केली, त्यापेक्षा जास्त भेट म्हणून मिळाली. भेट मिळाल्या पुस्तकांचा आनंद वेगळा असतो. पैसे द्यावे लागले नाहीत म्हणून नव्हे, तर भेट मिळालेल्या पुस्तकांसोबत देणाऱ्यांच्या आठवणीही आपल्या किताबखान्यात येतात.

महानगर साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शन नव्हते. पण दोन टेबलांवर काही पुस्तके विक्रीस होती. तिथेही दोन चार साहित्यिकांचीच. ती खरेदी केली.

संमेलनाहून परत येताना बॅगमध्ये एकूण ८ पुस्तके आणि १ दिवाळी अंक असा ऐवज होता. प्रत्येक पुस्तकाबद्दल थोडक्यात :

▪️हरवल्या आवाजाची फिर्याद - कवी मित्र नामदेव कोळी यांनी रावसाहेब कुवर यांचा हा कविता संग्रह भेट दिला. यातील एक कविता मी याआधी येशू पाटील सरांच्या मुक्त शब्दमध्ये वाचली होती. आता संपूर्ण संग्रह वाचता येईल. योगायोग म्हणजे आजच या पुस्तकाला नामदेव ढसाळांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झालाय.

▪️कवडसा - तरुण लेखिका प्रज्ञा माने हिचं हे पुस्तक. अगदी हलकं-फुलकं लेखन असलं, तरी विचार करावयास भाग पाडणारं. प्रज्ञाने संवेदनशील नजरेने भोवताल टिपलाय. हे पुस्तक खरंतर मी खूप आधीच वाचले होते. पण नंतर कुणी पुस्तक नेले, तर परत दिलेच नाही. म्हणून संग्रही ठेवण्यासाठी पुन्हा खरेदी केले. आणि हो, प्रज्ञाचीही या संमेलनात भेट झाली. त्याचाही वेगळा आनंद.

▪️हुंकार मनाचा, प्रकाशाचे झाड - सुजाता पाटील यांची ही दोन्ही कवितासंग्रह आहेत. छोटेखानी संग्रह आहेत. अजून वाचले नाहीत, त्यामुळे आताच भाष्य करणे चूक ठरेल.

▪️अंतरंग - उमा कोल्हे यांचं हे पुस्तक. कथासंग्रह आहे. याआधी मी कधीच उमा कोल्हेंचं लेखन वाचलं नाहीय. पण कथा हा फॉर्म माझा सर्वात आवडीचा फॉर्म आहे. त्यामुळे ग्रंथप्रदर्शनाच्या टेबलवर कथेचं पुस्तक दिसल्याने ते लगेच उचललं. यावरही वाचल्यावरच लिहिणे योग्य ठरेल.

▪️गजल : सुरेश भटांच्यानंतर - डॉ. राम पंडित यांनी या पुस्तकाचं संपादन केलंय. तब्बल 42 पानांचं संपादकीय आहे. गझलसंदर्भात सविस्तर लेखन या संपादकीयमध्येआहे. त्यानंतर तीन खंडांमध्ये 100 हून अधिक गझलकारांच्या रचना आहेत. हे पुस्तक आप्पा ठाकूरांनी भेट दिलंय.

▪️अन् उदेला एक तारा वेगळा - हे सुरेश भटांवरील गौरवग्रंथ आहे. डॉ. राम पंडित यांनी संपादित केलंय. यात 17 मान्यवरांनी सुरेश भट आणि त्यांच्या गझलांवर लिहिलंय. त्यात राम पंडितांपासून सुरेशकुमार वैराळकरांपर्यंत, तर राम शेवाळकर, न्या. चंद्रशेखर धर्माधिकाऱ्यांपासून अरुण म्हात्रे अन् डॉ. रवी बापटांपर्यंत... अशा मान्यवरांचा समावेश आहे. वाचनीय अन् संग्रही ठेवण्याजोगे हे पुस्तकही आप्पा ठाकूरांनी भेट म्हणून दिलंय.

▪️गुंतलेले पाश - आप्पा ठाकूर यांच्या गझलांचा हा संग्रह. स्वतः आपप्पांनी च भेट दिलं य. आप्पा यांच्या गझल अफाट सुंदर आणि अर्थ आपल्या काळजात शिरतात, भिडतात. त्यामुळे येत्या काही दिवसात या संग्रहाला वाचनासाठी प्राधान्य देणार आहे.

▪️ वाघूर - परवाच्या संमेलनात सर्वात महत्वाची भेट म्हणजे हा अंक आहे. कारण अर्थात अंक देणारा माणूस. नामदेव कोळी आणि माझी भेट या अंकासाठी मुंबईत होणार होणार म्हणता राहिली आणि अखेर इथे झाली. आणि हा अंक अखेर हाती आला. वाघूर महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात आता प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यावर वेगळं काय बोलणार? ते लवकरात लवकर वाचून काढण्याचा प्रयत्न असेल. इतकेच.

एकंदरीत महानगर मराठी साहित्य संमेलनात पुस्तकांची जमवाजमव सुद्धा छान झाली. आणि अशाप्रकारे संपूर्ण साहित्य संमेलन समृद्ध करणारं ठरलं.
(समाप्त)

संमेलनाच्या नोंदी (भाग तीन)



चंद्र-सूर्य-तारे यांच्या पलीकडे जात, आपल्या कवितेतून ठाम अशी भूमिका घेत, आपल्या आणि समाजाच्या जगण्यातील खाच खळगे, भोवतालाचे पडसाद इत्यादी गोष्टी नीरजा यांच्या कवितेचं आशय सूत्र. किंवा त्यांच्या कवितेतून डोकावतात, नव्हे स्पष्टपणे जाणवतात. अशा संवेदनशील आणि पुरोगामी विचारांच्या कवयित्रेचा लळा माझ्यासारख्या तरुण वाचकाला लागणार नाही, असे कसे होईल?

महानगर साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी संमेलनाच्या स्वागताध्यक्षा सुजाता पाटील म्हणाल्या, “ज्यांच्यामुळे मी साहित्यिक म्हणून घडले, त्या नीरजा यांनी इथे उपस्थिती लावल्याने मला प्रचंड आनंद होतोय.” खरंतर माझ्याही भावना तशाच होत्या. महानगर साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे नीरजा यांना ऐकण्याची संधी मिळणार होती. नुसते विचार नव्हे, त्यांची कविता त्यांच्याच तोंडून ऐकण्याची संधी मिळाली.

मी ज्या जिल्ह्यातून येतो, त्या रायगडची ओळख सांगताना ज्यांची नावं पटकन सांगतो, त्यात एक नाव कवयित्री नीरजा यांचेही असते.

नीरजा यांनी महानगर मराठी साहित्य संमेलनात कवितांच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवले. नावाला अध्यक्षपद खांद्यावर न घेता, ज्या कवींनी कविता सादर केल्या त्यांचं थोडक्यात विश्लेषण सुद्धा नीरजा यांनी केलं. या विश्लेषणाला टीकेचा सूर नव्हता, तर समजूतदार शब्दांचा मुलामा होता. किती नेमक्या शब्दात त्यांनी संजय चौधरी, नामदेव कोळी आणि आप्पा ठाकूरांच्या कविता, गझलेचं चालता-बोलता समीक्षण केलं. वाह!

नीरजा व्यासपीठावर बोलत असातना, माझ्या बाजूला बसलेले कवी नामदेव कोळी मला म्हणाले, “नीरजा यांच्यासारख्या कवयित्रीच्या तोंडून आपल्यासाठी कौतुकाचे दोन शब्द यावेत, हे माझे अन् माझ्या शब्दांचे भाग्य आहे. एखादा पुरस्कार मिळाल्यासारखं वाटतं.”. खरंच, नीरजा यांच्याबद्दल नव्या पिढीच्या कवींमध्ये अशीच भावना आहे. त्यांनी ती भावना आपल्या लेखनातून कमावली आहे.

नीरजा यांच्या भाषणावेळी जेव्हा जेव्हा टाळ्या वाजत होत्या, तेव्हा तेव्हा मी बसलेलो त्या मागच्या-पुढच्या रांगेतून, आजू-बाजूहून कौतुकाचे शब्द नीरजांप्रती ऐकायला मिळत होते, त्या त्या वेळी मला अभिमान वाटत होता. आपण ज्या जिल्ह्यातून येतो, तिथल्या माणसाचे असे कौतुक नेहमीच अभिमानास्पद वाटते.

नीरजा यांनी समारोपाचं भाषणही उत्तम झालं. अत्यंत धाडसी होतं भाषण. “रायगड पट्ट्यात, जिथे विवेकी विचारांची मोठी परंपरा होती, तिथे आज कपाळावर टिळे लावत जथ्थेच्या जथ्थे रस्त्याने जाताना दिसतात. ब्राम्हण आणि दलित स्त्रिया या जोखडातून बाहेर येण्यासाठी धडपडत असताना, बहुजन वर्ग मात्र पुन्हा त्याच गुलामगिरीच्या आणि प्रतिगामी शक्तींच्या जोखडाखाली जाऊ पाहतोय.”, अशी मांडणी नीरजा यांनी यावेळी केली. समोर एवढा मोठा सामुदय असताना, जाहीर व्यासपीठावरुन अशी भूमिका मांडण्याचं धाडस नीराज यांच्यासारख्या कवयित्रीने केलं. साहित्यिक भूमिका घेत नाहीत, म्हणणाऱ्यांनी नक्कीच या भाषणाची दखल घ्यायला हवी.

संमेलन संपल्यावर नामदेव कोळी यांनी माझी आणि नीरजा यांची भेट घालून दिली. अगदी काही सेकंदांची भेट झाली. दोन शब्द त्यांच्याशी थेट बोलता आले. तो क्षण जपून ठेवावा म्हणून एक फोटोही काढला. सोबत बाजूलाच उषा तांबे होत्या. दोन लेखिका आणि मी वाचक. किती मस्त क्षण बंदिस्त झालाय. नीरजा यांच्यासारख्या आवडत्या लेखिकेची भेट, तीही साहित्याच्याच प्रांगणात, अन् आमच्याच जिल्ह्यात होणं, हा सुवर्ण क्षणच.

पुढील भागात महानगर साहित्य संमेलनातून माझ्या किताबखान्यात आलेल्या पुस्तकांविषयी..

संमेलनाच्या नोंदी (भाग दोन)



एखाद्या साहित्य संमेलनाला ज्यावेळी उपस्थिती लावण्याचं ठरवतो, त्यावेळी अर्थात तिथून काहीतरी वैचारिक खाद्य मिळेल, हीच पहिली अपेक्षा असते. किमान माझी तरी. आणि मुंबईतून दोन-अडीच तासांचा प्रवास करुन अलिबागला जायचं, दिवसभर संमेलन अटेन्ड करायचं, म्हटल्यास विषयही तसे हवे असतात. सुदैवाने तसेच विषय होते.

महानगर साहित्य संमेलनात तीन वैचारिक खाद्य देणारे कार्यक्रम मी अटेन्ड केले. त्यातील पहिल्या कार्यक्रमाची काही टिपणं काढली. ती इथे मांडतो. विषय असा होता की, 'समाजमाध्यमं आणि वाचनसंस्कृती'. श्रीरंजन आवटे, राही पाटील, आदित्य दवणे, जयंत धुळप यांनी यात सहभाग घेतला होता. आणि समीरण वाळवेकर या परिसंवादाचे अध्यक्ष होते.

समाज माध्यमं आणि वाचनसंस्कृती - हा विषय तसा खोल आहे. समाज माध्यमं येऊन अगदी आठ-दहा वर्षांचा कालावधीच लोटला असला, तरी त्याच्या प्रसाराचा वेग तुफान आहे. याच परिसंवादाच्या सुरुवातीला समीरण सरांनी यासंदर्भात अत्यंत नेमक्या शब्दात मांडणी केली. ते म्हणाले, माध्यमक्रांतीला कमी कालावधीत कित्येक मैल पुढे नेण्यात समाज माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. मला हे अगदी पटलं. कारण इतर कोणत्याही माध्यमाच्या ज्या वेगात प्रसार झाला, त्याच्या कित्येक पटीने समाज माध्यमांचा प्रसार झाला, हे निश्चितच.

▪️राही पाटील - या तरुण मैत्रिणीने छान मांडणी केली. मुळात ती याच समाज माध्यमांवर बऱ्यापैकी सक्रीय असते. त्यामुळे तिचे अनुभवकथन हे वास्तवाला धरुन होते. तिची उदाहरणं ही माझ्यासारख्या तरुणांना समजणारी होती. राहीने समाज माध्यमं आणि वाचनसंस्कृती यांची टीकात्मक तुलना करण्याऐवजी त्यासंदर्भात आपले स्वत:चे मत मांडणं योग्य समजलं. आणि ते समोरील प्रेक्षकांना भावलंही. कारण अशा व्यासपीठावरुन वक्त्याची भूमिका काय, हे ऐकणं आमच्यासारख्या वाचक-प्रेक्षकांना महत्त्वाचं असतं.

"युवापिढी वाचते, अगदी सातत्याने वाचते आणि त्यावर विचारही करते. चालू घडामोंडीवर व्यक्तही होते. सोशल मीडियामुळे फायदा असा झाला की, हे व्यक्त होणं, विचार करणं इनोव्हेटिव्ह पद्धतीने मांडण्याची त्यांना संधी मिळाली.", असे राहीने सांगितले. वाचन करत नाही, अशी ओरड करणाऱ्यांची बाजू तिने खोडूनच काढली नाही, तर तिने पुढे जाऊन आवाहनही केले की, "समाज माध्यमांवरील तरुण पिढीचे लेखन उथळ आहे, असे समजून नाकारण्यापेक्षा ते स्वीकारायला शिकूया.". समाज माध्यमं तसे आता 80-85 वर्षांच्या वृद्धांपर्यंत वापरु लागले आहेत. मात्र तरी या समाज माध्यमांच्या खांद्यावर बंदुक ठेवून तरुण वर्गावर टीका करण्याची संधी अनेकजण अनेकजण सोडत नाहीत. त्यांचा अत्यंत सौम्य शब्दात समाचार घेत, राहीने विषयाची उत्तम मांडणी केली.

▪️आदित्य दवणे - आदित्यनेही राहीचा मुद्दा आणखी पुढे नेला. 'वाचत नाही, वाचत नाही' अशी ओरड करणाऱ्यांना त्याने आरसा दाखवला. 'आम्ही वाचतो आणि व्यक्तही होतो. फक्त आमचं माध्यम वेगळं आहे.' असा एकंदरीत सूर आदित्यच्या भाषणाचा होता. तो पटण्यासारखाही होता. वाचनसंस्कृतीवर राही बऱ्यापैकी बोलली होती. त्यामुळे त्यापुढे जात आदित्यने समाज माध्यमांवर बोलणं योग्य समजलं.

आदित्यने या नव्या माध्यमाविषयी बोलताना एक छान वाक्य वापरलं, तो म्हणाला, "काडेपेटी माणसाच्या हातात आणि काडेपेटी माकडाच्या हातात - या दोन घटनांवेळी वापराचे जे फायदे-तोटे आहेत, तसेच समाज माध्यमांचे आहेत. कोण कसं वापर करतो, यावर सारं काही अवलंबून आहे.". आदित्यचे हे म्हणणे अगदी पटण्यासारखे होते. कारण आजही समाजमाध्यमांचा सदुपयोग होताना दिसतो, तसाच दुरुपयोगही होताना दिसतो. आदित्यने खरंतर या फायद्या-तोट्यांची आणि सोबत वाचनसंस्कृतीला कशाप्रकारे हे माध्यम पूरक आहे, याची सविस्तर मांडणी केली. मात्र शेवटी जाता जाता त्यांनी मांडलेला एक मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा आहे. हे माध्यम आपल्याला आत्मकेंद्रीत करत आहे. हे भयंकर आहे.

▪️श्रीरंजन आवटे - श्रीरंजनने ज्याप्रकारे विषयाची जी मांडणी केली, ती अगदी मलाही अपेक्षित होती तशीच होती. वाचनसंस्कृती, समाज माध्यमं या पुढे जात त्याने विषय मांडला. 'समाजमाध्यमं आणि वाचनसंस्कृती' हा एक विषय असला, तरी ते मुळातच दोन स्वतंत्र विषय असल्याचे श्रीरंजनने मांडले. दोन्हींची वेगवेगळी चिकित्सा करणे त्याने योग्य समजलं.

"वाचन म्हणजे केवळ पुस्तकी वाचन नव्हे. तर इंटरनेटवरील एखादी शॉर्टफिल्म पाहणे म्हणजे सुद्धा वाचन असतं. तुम्ही त्या व्हिडीओचं जे अवलोकन करत असता, ते एकप्रकारे वाचन असतं. एवढंच नव्हे, तर पुस्तकी वाचनाच्या पुढे आपल्याला जायला हवे. माणसं वाचनं, ज्याला आपण समाजवाचन म्हणून हेही या वाचनसंस्कृतीत आपण मोडायला हवे." अशी मांडणी करत असताना, श्रीरंजनने एक छान वाक्य वापरलं, जे मी नोट करुन ठेवलं, तो म्हणाला, "जगणं समजून घेण्याची प्रोसेस म्हणजे वाचन होय." किती नेमक्या शब्दात 'वाचन' या शब्दाचा अवकाश चितारलाय श्रीरंजनने.

समाज माध्यमांवरील शुद्ध-अशुद्ध लेखनावर किंवा इंग्रजी-हिंदीच्या मिश्रणावर नेहमीच टीका केली जाते. मात्र श्रीरंजनने हा मुद्दाही खोडून काढला. श्रीरंजनची भूमिका स्पष्ट होती. तो म्हणाला, सध्या अविवेकी विचारांचा विखार पसरत जात असताना शुद्ध-अशुद्धाचा वाद महत्त्वाचा आहे की तरुणवर्गाने व्यक्त होणे महत्त्वाचे आहे, हे आपण ठरवूया. मला श्रीरंजनचे हा मुद्दा अगदी पटला. व्यक्त होण्याला भाषेचं बंधन नसावं, हे निश्चितच योग्य आहे. श्रीरंजनने मांडलेल्या मुद्द्यांशी समोरील वाचक-प्रेक्षक-साहित्यप्रेमी वर्गही सहमत होत होता. म्हणून त्याच्या अनेक पूर्वविरामांना टाळ्या वाजत होत्या.

▪️जंयत धुळप - समाज माध्यमांचं अस्तित्त्व आपण नाकारुन चालणार नाही. कारण हे माध्यम केवळ तरुणपिढीच्या मनोरंजनाचा विषय राहिला नसून, शासकीय व्यवस्था बदलण्याचं सामर्थ्य या माध्यमात आहे. ते अनेक घटनांमधून दिसूनही आले आहे. त्यामुळे या माध्यमाला साहित्यविश्वानेही गांभिर्याने घ्यायला हवे, अशी मांडणी धुळप सरांनी केली. शिवाय, माहिती आणि ज्ञानाचं विकेंद्रीकरण करण्यात या माध्यमाने महत्त्वाची भूमिका बजावल्याचंही त्यांनी नमूद केले.

एकंदरीत 'समाज माध्यमं आणि वाचनसंस्कृती' यावरील परिसंवाद असा झाला. माझ्या नोटपॅडमध्ये लिहायचे राहून गेले, असे अनेक मुद्दे यात झाले. लिहिण्यातून सुटले असतील. पण एकंदरीतच उत्तम चर्चा झाली. समाज माध्यमं आणि वाचनसंस्कृती यावर एका वेगळ्या अंगाने चर्चा झाली, असे म्हणायलाही हरकत नाही.
पुढील भागात आवडती कवयित्री निरजा यांच्याविषयी.
(क्रमश:)

संमेलनाच्या नोंदी (भाग एक)



मुंबई मराठी साहित्य संघ आणि साहित्य रसिक (अलिबाग) अशा दोन संस्थांनी मिळून अलिबागमधील कुरुळ येथे ४३ वे महानगर मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. सुजाता आणि प्रसाद पाटील या दोन साहित्यिक-साहित्यप्रेमींनी आयोजन-नियोजन-संयोजनाची धुरा सांभाळली. तीही अत्यंत यशस्वीपणे.

चार महत्त्वाचे कार्यक्रम यात झाले. बाळ फोंडकेंचं अध्यक्षीय भाषण, समाजमाध्यमं आणि वाचनसंस्कृती या विषयावर परिसंवाद, संवेदनशील दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा आणि कविता सादरीकरण.

अलिबागला उशिरा पोहोचल्याने बाळ फोंडकेंचं अध्यक्षीय भाषण काही ऐकता आलं नाही. मात्र अध्यक्षीय भाषणातून जी अपेक्षा असते, ती कवितांच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या कवयित्री नीरजा यांनी भरुन काढली. अत्यंत धाडसी भाषण त्यांनी जाहीर व्यासपीठावरुन केले. त्यावर पुढे लिहिणारच आहे.

समाजमाध्यमं आणि वाचनसंस्कृती यावरील परिसंवादात श्रीरंजन आवटे, आदित्य दवणे, राही पाटील, जयंत धुळप सहभागी होते. समीरण वाळवेकरांनी परिसंवादाचं अध्यक्षपद भूषवलं. यात श्रीरंजनचं भाषण विशेषत्वाने आवडलं. चारही सहभागी वक्त्यांचं आणि अध्यक्ष वाळवेकर सरांचे मुद्दे मी लिहून काढलेत. तेही पुढील पोस्टमध्ये सविस्तर लिहीनच.

कवितांचा कार्यक्रमही उत्तम झाला. विशेषत: आप्पा ठाकूर, नामदेव कोळी, संजय चौधरी यांच्या अर्थपूर्ण रचना आणि स्वत: नीरजा यांनी सादर केलेली त्यांची कविता मनाचा ठाव घेणाऱ्या होत्या, विचार करायला लावणाऱ्या होत्या. त्या कविताही मी पुढेली पोस्टमध्ये तुम्हाला वाचण्यासाठी देणार आहे.

संपूर्ण संमेलनात सर्वात काय आवडलं असेल तर कवयित्री नीरजा यांचं भाषण. अत्यंत समर्पक शब्दात त्यांनी सद्यस्थितीचं वर्णन आणि भेदाची बिजं पेरणाऱ्यांवर टीका केली. श्रीरंजन आणि नीरजा या दोघांनीही काल मांडलेले विचार आणि तेही जाहीर व्यासपीठावरुन, हे नक्कीच नोंद घेण्याजोगे आहे.

एकाच पोस्टमध्ये सर्व सांगता येणार नाही. कारण पोस्ट खूप मोठी होईल. अनेक नोंदी आहेत, ज्यावर अधिक विस्तृत लिहितोय. एक एक नोंद पोस्ट करत जाईन.

(क्रमश:)

02 February, 2018

किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है...



काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला सहाव्या रांगेत बसवलं गेलं. हे निषेधार्ह तर आहेच. त्याचवेळी सत्ताधाऱ्यांच्या मुजोर अन् अहंकारी मानसिकतेचं नागडं रुप दाखवणारं आहे. सत्तेत इतके मंत्रीही नाहीत, की पहिली रांग भरुन जावी. एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षासाठी पहिल्या रांगेत खुर्ची मिळू नये?

त्यात आणखी एक मुद्दा असाय की, राहुल गांधींकडे शासकीय पद नाही. मात्र मग त्यावेळी प्रश्न असा येतो की, अमित शाहांकडे कोणतं शासकीय पद आहे, जेणेकरुन त्यांना पहिल्या रांगेतील खुर्ची बहाल करण्यात आली?

आणि तसेही एरवी प्रोटोकॉलची ऐशी-तैशी करुन कुठल्याही ऐऱ्या-गैऱ्या राष्ट्रांच्या अध्यक्षांना मिठ्या मारल्या जातात, मग इथे तर आपल्याच देशातील पक्षाचा अध्यक्ष होता ना. इथे असे काय झाले की, पहिल्या रांगेतही स्थान दिले नाही.

असो. मुद्दा केवळ मानसिकतेचाही नाही, तर संस्कार, संस्कृती आणि परंपरेचाही आहे. कारण या गोष्टी केवळ बोलण्याच्या नसतात, त्या आचरणात आणायच्या असतात. मात्र विद्यमान सत्ताधारी केवळ या गोष्टी बोलण्यापुरते ठेवतंय. आचरणाच्या नावाने बोंब आहे. हेही असो.

याही पुढे जात एक गोष्ट भयंकर आहे, ती म्हणजे विरोधीपक्षांबाबतचा दृष्टीकोन. सत्तेला स्पर्श झाला की सत्ता अंगात शिरते, डोक्यात भिणते आणि मग वर्तनातून दिसू लागते, अंस म्हणतात. पण ती सत्ता अवघ्या तीन-साडेतीन वर्षात शिरेल-भिणेल-दिसेल असं वाटलं नव्हतं.

गुंगी गुडिया ते दुर्गा, असा बदल याच भाजपच्या तत्कालीन नेतृत्त्वाला करावा लागला, असे काँग्रेसचे राजकारण आहे. याच काँग्रेसच्या तत्कालीन नेतृत्त्वाने विरोधी पक्षातील अटलजींना यूएन डेलिगेशनमध्ये पाठवलं होतं. विरोधी पक्षांचा आदर करण्याची परंपरा पक्षीय नेतृत्वाच्या रक्तात असावी लागते. याही असेल. नाही असे नाही. मात्र ती दिसून येत नाही.

विरोधी मत जुमानणारच नाही, ही विद्यमान सत्ताधाऱ्यांची मानसिकताच भयंकर आहे. हुकूमशाही वगैरे टाईप आहे की नाही, ते माहित नाही, पण मुजोरीशाही नक्कीच आहे.

असो. या अहंकरी सत्ताधाऱ्यांसाठी राहत इंदौरी साहेबांच्या कवितेतील चार ओळी नेमक्या लागू होतात. त्या अशा :

जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे
किराएदार हैं ज़ाती मकान थोड़ी है
सभी का ख़ून है शामिल यहाँ की मिट्टी में
किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है

प्रिय मित्रा लहू...



लहू मित्रा, गावातल्या लोकांचे चप्पल-बूट शिवलेस, शेळ्या सांभाळल्यास, हॉटेलमध्ये भांडी धुतलीस, एसटीडीवर काम केलेस, विटभट्टीवर बालकामगार म्हणून राबलास, पेपर लाईन टाकलीस, लोकांच्या शेतात ऊस, गहू, कापूस खुरपलास... आणि त्याचवेळी शिक्षण घेतलेस. नुसते शिक्षण घेतले नाहीस, तर बीएड, डीएड, एमए आणि सेट नेट... अशा एकास एक सर करणाऱ्या पदव्या मिळवल्यास.

H.S.C. D.Ed. B.A. B.Ed, CTET, TET, M.A. SET, NET in History, M.A. SET, NET-JRF in Pol. Sci., M.A. Economic, M.A. English - पदव्यांचा पाढा वाचूनच थकायला होतं रे. किती शिकलास आणि अजूनही शिकतोयेस!

जिवलग मित्र लहू कांबळे याच्या शिक्षणाचा आणि संघर्षाचा हा प्रवास. या खडतर प्रवासातून इतरांना शिकण्याची प्रेरणा मिळतेच. मात्र त्याहीपुढे जात, जगण्याची उमेद मिळते. निराशेच्या अंधारात धडपडत असताना, लहूचा प्रवास आठवून सकारात्मकता मिळते.

लहू मित्रा, तू तुझ्या हस्ताक्षराइतका सुंदर मनाचा आहेस. तू मित्र असणे, ही खूप मोठी गोष्ट आहे.

हॉस्टेलमध्ये नुसत्या भातावर दिवस ढकलले असशील, पण जगण्याच्या व्यवहारात तू कधीच उपाशी असल्याचे दाखवले नाहीस. प्रत्येक गोष्टीत आनंद, सकारात्मकता आणि नम्रता मिसळत आहेस. खरंच तुझ्या शिकण्याचा अन् शिकवण्याचा उगम शोधायला हवा, तिथेच असेल तुझ्या संघर्षाचे खरे मूळ आणि तिथेच सापडेल शिक्षणाच्या भूकेचे खरे बीज.

खूप शिकत रहा. शिकवता शिकवता शिकत राहा. शिकणे हेच भविष्यातील समस्यांवर उपाय असल्याचे तूच म्हणतोस. लहू, बाबासाहेबांना यापेक्षा मोठी आदरांजली काय असू शकते? बाबासाहेब आज असते, तर तुझा त्यांना नक्कीच अभिमान वाटला असता.

वाढदिवस केवळ निमित्त मित्रा. शुभेच्छा कायमच तुझ्यासोबत असतील. सुखी राहा वगैरे म्हणणार नाही. कारण ते आयुष्य तुला मानवणारे नाही. तू ज्ञानाचा यात्री आहेस. वाट खडतर आहे. पण मला माहित आहे की, संघर्षाच्या खांद्यावर हात टाकून तू चालतोस. खूप पुढे जा.

संघर्षाचं दुसरं नाव : सागर रेड्डी



जन्म झाला आणि आई-वडिलांचं छत्र हरपलं. आंतरजातीय विवाहाच्या रागातून कुटुंबीयांनीच आई-वडिलांना संपवलं. 'सैराट'च्या एन्डसारखी लाईफस्टोरी. मग 12-13 महिन्याचा असताना आजोबांनी त्याला अनाथालयात सोडलं. तिथे तो राहिला. वाढला. एका विशिष्ट आकाराची अनाथालय नावाची चौकट. त्या चौकटीत त्याने आयुष्यातली 18 वर्षे घालवली.

अनाथालय देईल ते खायचं, सांगेल तसं वागायचं, सांगतील ते शिकायचं... स्वातंत्र्य नावाचं पाखरु अनाथालयाच्या आभाळावरुनही कधी उडायचं नाही. अशा चौकटीतलं ते आयुष्य.

मग सरकारी कायद्यान्वये वयाच्या 18 व्या वर्षी बोजा-बिस्तारा गुंडाळायचा आणि अनाथालयातून बाहेर पडायचं. कुठे जाणार, काय करणार, कुठे राहणार, काय खाणार, इतके असंख्य अनुत्तरित प्रश्न घेऊन तो बाहेर पडतो.

लोणावळ्यातील अनाथालयातून 18 वर्षांचा हा मुलगा मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर येतो. दिवस-दिवस फिरतो. मिळालं तर खातो. अन्यथा भुकेल्या पोटी झोपी जातो. अन्न पोटात जात नसलं, तरी विचार मात्र तुफान वेगाने डोक्यात घुमत होते. भिनत होते. नको नको ते विचार डोक्यात डोकावत होते. अगदी आत्महत्या करुन जीवन संपवण्यापर्यंत.

दुसरीकडे, स्वत:ला सिद्ध करण्याची ओढही मनात तेवत होती. इच्छा-आकांक्षांचे दिवेही वादळाच्या झंझावातसमोर पेटत होत्या. त्यामुळे त्या उजेडात मार्ग सापडणार होतेच. ते सापडलं एक अनोळखीच व्यक्तीच्या रुपाने. आणि अवघं जगणं बदललं...

तो शिकला. इंजिनिअरिंग करुन एल अँड टीमध्ये चांगल्या हुद्द्यावर कामाला लागला. मात्र आपला संघर्षमय भूतकाळ तो विसरला नाही. आपल्यासारखे हजारो तरुण आहेत, जे आजही दिशाहीन नजरेने अनाथालयातून बाहेर पडतात, याची जाणीव त्याच्या मनात कायम होती.

त्याने वयाच्या 18 व्या वर्षानंतर ज्या मुलांना अनाथालय सोडणं भाग पडतं, त्या मुलांना आधार देण्याचं ठरवलं आणि दोन रुम भाड्याने घेऊन आधाराचा पहिला हात पुढे केला. आणि पुढे याच कार्यात त्याने स्वत:ला झोकून दिलं.

‘एकता निराधार संघ’ नामक संस्थेच्या माध्यमातून आता देशभरात हजारो अनाथांचा ‘आधार’ बनलेला सागर रेड्डी नक्कीच इन्स्पिरेशनल व्यक्तिमत्त्व आहे.

तुम्ही-आम्ही इमॅजिनही करु शकत नाही, इतकं भयाण जगणं जगलेल्या या तरुणाशी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'वर संवाद साधण्याची संधी मिळाली.

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...