एखाद्या साहित्य संमेलनाला ज्यावेळी उपस्थिती लावण्याचं ठरवतो, त्यावेळी अर्थात तिथून काहीतरी वैचारिक खाद्य मिळेल, हीच पहिली अपेक्षा असते. किमान माझी तरी. आणि मुंबईतून दोन-अडीच तासांचा प्रवास करुन अलिबागला जायचं, दिवसभर संमेलन अटेन्ड करायचं, म्हटल्यास विषयही तसे हवे असतात. सुदैवाने तसेच विषय होते.
महानगर साहित्य संमेलनात तीन वैचारिक खाद्य देणारे कार्यक्रम मी अटेन्ड केले. त्यातील पहिल्या कार्यक्रमाची काही टिपणं काढली. ती इथे मांडतो. विषय असा होता की, 'समाजमाध्यमं आणि वाचनसंस्कृती'. श्रीरंजन आवटे, राही पाटील, आदित्य दवणे, जयंत धुळप यांनी यात सहभाग घेतला होता. आणि समीरण वाळवेकर या परिसंवादाचे अध्यक्ष होते.
समाज माध्यमं आणि वाचनसंस्कृती - हा विषय तसा खोल आहे. समाज माध्यमं येऊन अगदी आठ-दहा वर्षांचा कालावधीच लोटला असला, तरी त्याच्या प्रसाराचा वेग तुफान आहे. याच परिसंवादाच्या सुरुवातीला समीरण सरांनी यासंदर्भात अत्यंत नेमक्या शब्दात मांडणी केली. ते म्हणाले, माध्यमक्रांतीला कमी कालावधीत कित्येक मैल पुढे नेण्यात समाज माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. मला हे अगदी पटलं. कारण इतर कोणत्याही माध्यमाच्या ज्या वेगात प्रसार झाला, त्याच्या कित्येक पटीने समाज माध्यमांचा प्रसार झाला, हे निश्चितच.
▪️राही पाटील - या तरुण मैत्रिणीने छान मांडणी केली. मुळात ती याच समाज माध्यमांवर बऱ्यापैकी सक्रीय असते. त्यामुळे तिचे अनुभवकथन हे वास्तवाला धरुन होते. तिची उदाहरणं ही माझ्यासारख्या तरुणांना समजणारी होती. राहीने समाज माध्यमं आणि वाचनसंस्कृती यांची टीकात्मक तुलना करण्याऐवजी त्यासंदर्भात आपले स्वत:चे मत मांडणं योग्य समजलं. आणि ते समोरील प्रेक्षकांना भावलंही. कारण अशा व्यासपीठावरुन वक्त्याची भूमिका काय, हे ऐकणं आमच्यासारख्या वाचक-प्रेक्षकांना महत्त्वाचं असतं.
"युवापिढी वाचते, अगदी सातत्याने वाचते आणि त्यावर विचारही करते. चालू घडामोंडीवर व्यक्तही होते. सोशल मीडियामुळे फायदा असा झाला की, हे व्यक्त होणं, विचार करणं इनोव्हेटिव्ह पद्धतीने मांडण्याची त्यांना संधी मिळाली.", असे राहीने सांगितले. वाचन करत नाही, अशी ओरड करणाऱ्यांची बाजू तिने खोडूनच काढली नाही, तर तिने पुढे जाऊन आवाहनही केले की, "समाज माध्यमांवरील तरुण पिढीचे लेखन उथळ आहे, असे समजून नाकारण्यापेक्षा ते स्वीकारायला शिकूया.". समाज माध्यमं तसे आता 80-85 वर्षांच्या वृद्धांपर्यंत वापरु लागले आहेत. मात्र तरी या समाज माध्यमांच्या खांद्यावर बंदुक ठेवून तरुण वर्गावर टीका करण्याची संधी अनेकजण अनेकजण सोडत नाहीत. त्यांचा अत्यंत सौम्य शब्दात समाचार घेत, राहीने विषयाची उत्तम मांडणी केली.
▪️आदित्य दवणे - आदित्यनेही राहीचा मुद्दा आणखी पुढे नेला. 'वाचत नाही, वाचत नाही' अशी ओरड करणाऱ्यांना त्याने आरसा दाखवला. 'आम्ही वाचतो आणि व्यक्तही होतो. फक्त आमचं माध्यम वेगळं आहे.' असा एकंदरीत सूर आदित्यच्या भाषणाचा होता. तो पटण्यासारखाही होता. वाचनसंस्कृतीवर राही बऱ्यापैकी बोलली होती. त्यामुळे त्यापुढे जात आदित्यने समाज माध्यमांवर बोलणं योग्य समजलं.
आदित्यने या नव्या माध्यमाविषयी बोलताना एक छान वाक्य वापरलं, तो म्हणाला, "काडेपेटी माणसाच्या हातात आणि काडेपेटी माकडाच्या हातात - या दोन घटनांवेळी वापराचे जे फायदे-तोटे आहेत, तसेच समाज माध्यमांचे आहेत. कोण कसं वापर करतो, यावर सारं काही अवलंबून आहे.". आदित्यचे हे म्हणणे अगदी पटण्यासारखे होते. कारण आजही समाजमाध्यमांचा सदुपयोग होताना दिसतो, तसाच दुरुपयोगही होताना दिसतो. आदित्यने खरंतर या फायद्या-तोट्यांची आणि सोबत वाचनसंस्कृतीला कशाप्रकारे हे माध्यम पूरक आहे, याची सविस्तर मांडणी केली. मात्र शेवटी जाता जाता त्यांनी मांडलेला एक मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा आहे. हे माध्यम आपल्याला आत्मकेंद्रीत करत आहे. हे भयंकर आहे.
▪️श्रीरंजन आवटे - श्रीरंजनने ज्याप्रकारे विषयाची जी मांडणी केली, ती अगदी मलाही अपेक्षित होती तशीच होती. वाचनसंस्कृती, समाज माध्यमं या पुढे जात त्याने विषय मांडला. 'समाजमाध्यमं आणि वाचनसंस्कृती' हा एक विषय असला, तरी ते मुळातच दोन स्वतंत्र विषय असल्याचे श्रीरंजनने मांडले. दोन्हींची वेगवेगळी चिकित्सा करणे त्याने योग्य समजलं.
"वाचन म्हणजे केवळ पुस्तकी वाचन नव्हे. तर इंटरनेटवरील एखादी शॉर्टफिल्म पाहणे म्हणजे सुद्धा वाचन असतं. तुम्ही त्या व्हिडीओचं जे अवलोकन करत असता, ते एकप्रकारे वाचन असतं. एवढंच नव्हे, तर पुस्तकी वाचनाच्या पुढे आपल्याला जायला हवे. माणसं वाचनं, ज्याला आपण समाजवाचन म्हणून हेही या वाचनसंस्कृतीत आपण मोडायला हवे." अशी मांडणी करत असताना, श्रीरंजनने एक छान वाक्य वापरलं, जे मी नोट करुन ठेवलं, तो म्हणाला, "जगणं समजून घेण्याची प्रोसेस म्हणजे वाचन होय." किती नेमक्या शब्दात 'वाचन' या शब्दाचा अवकाश चितारलाय श्रीरंजनने.
समाज माध्यमांवरील शुद्ध-अशुद्ध लेखनावर किंवा इंग्रजी-हिंदीच्या मिश्रणावर नेहमीच टीका केली जाते. मात्र श्रीरंजनने हा मुद्दाही खोडून काढला. श्रीरंजनची भूमिका स्पष्ट होती. तो म्हणाला, सध्या अविवेकी विचारांचा विखार पसरत जात असताना शुद्ध-अशुद्धाचा वाद महत्त्वाचा आहे की तरुणवर्गाने व्यक्त होणे महत्त्वाचे आहे, हे आपण ठरवूया. मला श्रीरंजनचे हा मुद्दा अगदी पटला. व्यक्त होण्याला भाषेचं बंधन नसावं, हे निश्चितच योग्य आहे. श्रीरंजनने मांडलेल्या मुद्द्यांशी समोरील वाचक-प्रेक्षक-साहित्यप्रेमी वर्गही सहमत होत होता. म्हणून त्याच्या अनेक पूर्वविरामांना टाळ्या वाजत होत्या.
▪️जंयत धुळप - समाज माध्यमांचं अस्तित्त्व आपण नाकारुन चालणार नाही. कारण हे माध्यम केवळ तरुणपिढीच्या मनोरंजनाचा विषय राहिला नसून, शासकीय व्यवस्था बदलण्याचं सामर्थ्य या माध्यमात आहे. ते अनेक घटनांमधून दिसूनही आले आहे. त्यामुळे या माध्यमाला साहित्यविश्वानेही गांभिर्याने घ्यायला हवे, अशी मांडणी धुळप सरांनी केली. शिवाय, माहिती आणि ज्ञानाचं विकेंद्रीकरण करण्यात या माध्यमाने महत्त्वाची भूमिका बजावल्याचंही त्यांनी नमूद केले.
एकंदरीत 'समाज माध्यमं आणि वाचनसंस्कृती' यावरील परिसंवाद असा झाला. माझ्या नोटपॅडमध्ये लिहायचे राहून गेले, असे अनेक मुद्दे यात झाले. लिहिण्यातून सुटले असतील. पण एकंदरीतच उत्तम चर्चा झाली. समाज माध्यमं आणि वाचनसंस्कृती यावर एका वेगळ्या अंगाने चर्चा झाली, असे म्हणायलाही हरकत नाही.
पुढील भागात आवडती कवयित्री निरजा यांच्याविषयी.
(क्रमश:)
No comments:
Post a Comment