संमेलनाच्या नोंदी लिहीत असताना काहीजणांनी मेसेज करुन विचारले, काय रे यावेळी पुस्तके नाही मिळाली का? तर दोस्त हो, साहित्याच्या प्रांगणात जाऊन रिकाम्या हाताने परतेन, असे कसे होईल? महानगर साहित्य संमेलनातूनही माझ्या किताबखान्यात अनेक मित्र आले.
यावेळी थोडं वेगळं घडलं, जेवढी पुस्तके खरेदी केली, त्यापेक्षा जास्त भेट म्हणून मिळाली. भेट मिळाल्या पुस्तकांचा आनंद वेगळा असतो. पैसे द्यावे लागले नाहीत म्हणून नव्हे, तर भेट मिळालेल्या पुस्तकांसोबत देणाऱ्यांच्या आठवणीही आपल्या किताबखान्यात येतात.
महानगर साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शन नव्हते. पण दोन टेबलांवर काही पुस्तके विक्रीस होती. तिथेही दोन चार साहित्यिकांचीच. ती खरेदी केली.
संमेलनाहून परत येताना बॅगमध्ये एकूण ८ पुस्तके आणि १ दिवाळी अंक असा ऐवज होता. प्रत्येक पुस्तकाबद्दल थोडक्यात :
▪️हरवल्या आवाजाची फिर्याद - कवी मित्र नामदेव कोळी यांनी रावसाहेब कुवर यांचा हा कविता संग्रह भेट दिला. यातील एक कविता मी याआधी येशू पाटील सरांच्या मुक्त शब्दमध्ये वाचली होती. आता संपूर्ण संग्रह वाचता येईल. योगायोग म्हणजे आजच या पुस्तकाला नामदेव ढसाळांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झालाय.
▪️कवडसा - तरुण लेखिका प्रज्ञा माने हिचं हे पुस्तक. अगदी हलकं-फुलकं लेखन असलं, तरी विचार करावयास भाग पाडणारं. प्रज्ञाने संवेदनशील नजरेने भोवताल टिपलाय. हे पुस्तक खरंतर मी खूप आधीच वाचले होते. पण नंतर कुणी पुस्तक नेले, तर परत दिलेच नाही. म्हणून संग्रही ठेवण्यासाठी पुन्हा खरेदी केले. आणि हो, प्रज्ञाचीही या संमेलनात भेट झाली. त्याचाही वेगळा आनंद.
▪️हुंकार मनाचा, प्रकाशाचे झाड - सुजाता पाटील यांची ही दोन्ही कवितासंग्रह आहेत. छोटेखानी संग्रह आहेत. अजून वाचले नाहीत, त्यामुळे आताच भाष्य करणे चूक ठरेल.
▪️अंतरंग - उमा कोल्हे यांचं हे पुस्तक. कथासंग्रह आहे. याआधी मी कधीच उमा कोल्हेंचं लेखन वाचलं नाहीय. पण कथा हा फॉर्म माझा सर्वात आवडीचा फॉर्म आहे. त्यामुळे ग्रंथप्रदर्शनाच्या टेबलवर कथेचं पुस्तक दिसल्याने ते लगेच उचललं. यावरही वाचल्यावरच लिहिणे योग्य ठरेल.
▪️गजल : सुरेश भटांच्यानंतर - डॉ. राम पंडित यांनी या पुस्तकाचं संपादन केलंय. तब्बल 42 पानांचं संपादकीय आहे. गझलसंदर्भात सविस्तर लेखन या संपादकीयमध्येआहे. त्यानंतर तीन खंडांमध्ये 100 हून अधिक गझलकारांच्या रचना आहेत. हे पुस्तक आप्पा ठाकूरांनी भेट दिलंय.
▪️अन् उदेला एक तारा वेगळा - हे सुरेश भटांवरील गौरवग्रंथ आहे. डॉ. राम पंडित यांनी संपादित केलंय. यात 17 मान्यवरांनी सुरेश भट आणि त्यांच्या गझलांवर लिहिलंय. त्यात राम पंडितांपासून सुरेशकुमार वैराळकरांपर्यंत, तर राम शेवाळकर, न्या. चंद्रशेखर धर्माधिकाऱ्यांपासून अरुण म्हात्रे अन् डॉ. रवी बापटांपर्यंत... अशा मान्यवरांचा समावेश आहे. वाचनीय अन् संग्रही ठेवण्याजोगे हे पुस्तकही आप्पा ठाकूरांनी भेट म्हणून दिलंय.
▪️गुंतलेले पाश - आप्पा ठाकूर यांच्या गझलांचा हा संग्रह. स्वतः आपप्पांनी च भेट दिलं य. आप्पा यांच्या गझल अफाट सुंदर आणि अर्थ आपल्या काळजात शिरतात, भिडतात. त्यामुळे येत्या काही दिवसात या संग्रहाला वाचनासाठी प्राधान्य देणार आहे.
▪️ वाघूर - परवाच्या संमेलनात सर्वात महत्वाची भेट म्हणजे हा अंक आहे. कारण अर्थात अंक देणारा माणूस. नामदेव कोळी आणि माझी भेट या अंकासाठी मुंबईत होणार होणार म्हणता राहिली आणि अखेर इथे झाली. आणि हा अंक अखेर हाती आला. वाघूर महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात आता प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यावर वेगळं काय बोलणार? ते लवकरात लवकर वाचून काढण्याचा प्रयत्न असेल. इतकेच.
एकंदरीत महानगर मराठी साहित्य संमेलनात पुस्तकांची जमवाजमव सुद्धा छान झाली. आणि अशाप्रकारे संपूर्ण साहित्य संमेलन समृद्ध करणारं ठरलं.
(समाप्त)
No comments:
Post a Comment