24 January, 2016

बापाने आत्महत्या केली तो दिवस!



आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते केवळ त्याचं शरीर घेऊन नव्हे तर.. तो कोसळला माझ्यासाठी, माझ्या भावासाठी, माझ्या आईसाठी, माझ्या बहिणीसाठी शेतात लढता लढता कोसळला.. तो कोसळला माझ्या स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी माझ्या पंखांना बळ दिल्यावर...

23 जूनला पप्पा आम्हाला सर्वांना सोडून गेले. कायमचे. वयाच्या सत्तेचाळीसाव्य वर्षी त्यांचं जाणं मलाच काय कुणालाच अपेक्षित नव्हतं. किंबहुना त्यांनीच स्वत:त्यांच्या आयुष्याचं अस्तित्व संपवलं. आत्महत्या करुन.

दिनांक२३ जून २०१४

मी नुकताच पेपरलाईन टाकून घरी आलेलो. घड्याळाकडे पाहिलं तेव्हा साडेआठ वाजलेले. हात-पाय धुवून सवयीप्रमाणे पलंगावर पडलो होतो. आदल्यादिवशी सेकंड शिफ्ट म्हणजे दुपारी 3 ते रात्री 12 अशी शिफ्ट केलेली. त्यात रात्री एक वाजता घरी येऊन पुन्हा सकाळी चार वाजता पेपरलाईन टाकून आलो होतो. त्यामुळे अंगात थकवा आणि डोळ्यांवर झोप होती. त्यात भरीस भर म्हणजे पुन्हा थोड्याच वेळात जनरल शिफ्टला निघायचं होतं. म्हणजे दहा वाजता. घड्याळाने नऊचा ठोका दिला. म्हटलं अर्धा तास पडतो... डोळ्याला डोळा लागणार तेवढ्यात मोबईल वाजला. कम्प्युटर डेस्कवर मोबाईल होता. मोबाईल उचलण्यासाठी जाणार तोच येणारा कॉल कट झाला. मोबाईल पाहतो तर काय मोबाईलमध्ये सात ते आठ मिस्ड कॉल... आणि तेही गावच्या घरातील मोबाईलवरुन. मी घाबरलोच. कारण गावाहून सहसा मला फोन येत नाहीत. किंबहुना आईला फोनच करता येत नाही. ती फक्त मी केलेले फोन रिसिव्ह करते. मग एवढे मिस्ड कॉल कसेआईला कसं जमलं फोन करायलाबरं तिला फोन करायला जमलंही असेल. पण मग तिने सात-आठवेळा का फोन केला असावाया व अशा अनेक प्रश्नांचा काहूर मनात माजू लागला. लागलीच गावचा नंबर डायल केला... ‘मोबईल संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ असं सोमरुन उत्तर... माझ्या काळजाची धाकधूक आणखी वेगवान झाली. थो़डा थांबलो. अक्षय होताच बाजूला. अक्षय. माझा धाकटा भाऊ. त्याला मी मोबाईलवर आलेल्या मिस्ड कॉलबद्दल सांगितलं नाही. मनात प्रश्नांचं मोठं वादळ घोंघावत होतं. त्याचवेळी गावच्या मोबाईलवर फोन लावण्याचे माझे प्रयत्न चालूच होते.

फोन लागला. ह्रदय बंद आणि कान बहिरे झाल्यासारखे वाटले. डोळ्यावरुन पटकन काळी तिरिप गेली. काय असेल समोरुन उत्तरकाही क्षणात समोरुन प्रश्न, “ज्ञान्या बाबू?” (मला गावी अनेकजणं नेन्या या नावानंच ओळखतात. मूळ ज्ञानेश्वर नावाचं ज्ञान्या)

मी- हो... कोण बोलतंय?... आई कुठेय?... काय झालंय? (मी प्रश्नांचा भडीमार केला.)
समोरुन- मी दिवाळे मामी बोलतेय... तुझ्या पप्पासला अॅडमिट केलंय. रोह्यास नेलंय. आयस पण तिकडंच गेलीय. तू भाव्या दादासला फोन कर लवकर. नायतर सरपंच सायबांना. ते गेलेत त्यांच्यासोबत रोह्यास.
फोन कट... की ठेवून दिला. माहित नाही.
फोन कट झाल्याचा किंचितसा आवाज मला एखाद्या बॉम्बस्फोटातील धमाक्यासारखा वाटला. त्या आवाजाने काही वेळ सुन्न झालो. मी पूर्णपणे थंड पडलो. शब्दांत अस्पष्टपणा... तोतलेपणा.. भावाने म्हणजे अक्षयने “काय झालंय दादा..काय झालंय?” असे दोन-चार वेळा विचारलं बहुतेक. पण माझं त्याच्या प्रश्नांकडे लक्ष नव्हतं. मग काही क्षणांनी मी त्याला सर्व सांगितलं. काय झालं असेल.. काय नक्की घडलं असेल... पप्पांना नक्की काय झालंय  मला असं अचानक, लवकर फोन करायला का सांगितलं असेल, असे अनेक प्रश्न मनात घिरट्या घालू लागले. पण मी त्या प्रश्नांना मनातल्या मनात दाबून ठेवलं आणि लगेच भाव्या दादाला फोन केला. त्याचा टेम्पो होता. बहुतेक त्याच्या टेम्पोने पप्पांना उपचारासाठी रोहाला आणलं असावं, असा अंदाज बांधला आणि तो खराच ठरला. भाव्यादादाने माझा फोन उचलला.
भाव्यादा- ज्ञान्या..
मी- भाव्यादा, काय झालंय रे पप्पांनारोहाला का आणलंय?
भाव्यादा- अरे तू टेन्शन नको घेऊ.. काही नाही... तू ये गावी.

गणेशन अण्णांनी भाव्या दादाच्या हातातून फोन घेतला. गणेश अण्णा आमच्या घरापासून सात-आठ घरं लांब राहायचे. ते भाव्यादापेक्षा वयाने मोठे होते. म्हणून त्यांनी मला समजावण्यासाठी बहुधा फोन घेतला असावा.

गणेश अण्णा- ज्ञान्या... तू एक काम कर. तू आणि अक्षय, दोघांनीही ताबडतोब निघूनच या गावी.
मी घाबरलोच. काळजाचा ठोकाच चुकला. काय झालंय असं विचारलं.
गणेश अण्णा- अरे काहीनाही. तू ये.
मी- आई कुठेयआणि पप्पा कसे आहेत?
गणेश अण्णा- आयस आहे इथे.. तू ये.

त्यांनी पप्पांबद्दल बोलणं टाळल्याचं माझ्या लक्षात आलं. मला वास्तवाची जाणीव झाली. माझं शरीर तिथे धाडकन जमिनीवर आपटण्याचंच बाकी होतं. पण अगदी पनवेलच्या वडकळ नाक्यापर्यंत जाईपर्यंत मी अशाच आशेत होतो की पप्पांची स्थिती गंभीर असेल आणि ते बरे होतील. ते नाहीत, हे मान्य करायला माझं मन धजावतच नव्हतं.

आता माझ्यासमोर मोठं आव्हान होतं ते अक्षयला सांभाळण्याचं. गणेश अण्णांनी फोन कट केला. पुन्हा एकदा फोन कट झाल्याच्या त्या किंचितशा आवाजाचा स्फोट. कान बहिरे करणारा. शरीरात कुठेतरी मोठा सुरुंग लावला असावा आणि त्याचा स्फोट झाला असावा असं वाटलं. मी अक्षयला समजावण्याचा प्रयत्न केला.

मी- चल. लवकर तयार हो. आपल्याला गावी जायचंय. पप्पांना बरं नाहीय. ते रोहाला अॅडमिट आहेत. (मी एका श्वासात तीन-चार वाक्य बोलून गप्प बसलो.)
तो मला प्रश्न विचारेल.. नक्की काय झालंय याची चौकशी करेल, असे वाटले. पण तो अगदी दोन-तीन सेकंद गप्प उभा राहिला आणि मोठ-मोठ्याने रडू लागला. त्याला रडताना बघून मलाही रडायला आलं. पण मी मोठ्या प्रयत्नाने अश्रू थांबवले कारण मला माहित होतं की मी रडलो की हा गप्प बसणार नाही आणि आणखी घाबरेल. मी त्याला समाजवण्याच पुन्हा प्रयत्न केला.

मी- अरे. रडतो कशालापप्पा फक्त आजारी आहेत.
तरीही तो रडतच होता. थोड्या वेळाने त्याला समजावलं. तो तयार झाला. मीही कपडे बदलले. ज्याच्या येथे पेपरलाईन टाकायचो त्या सुभाषदादाच्या घराच्या बाजूलाच भाड्याने रुम घेतलेली. त्याचे आणि आमचे संबंध घरच्यासारखेच होते. आम्ही दोघेही तयार झाल्यावर त्याने त्याच्या स्कूटरने जवळच राहणाऱ्या काकांच्या घरी आणून सोडले. तिथे आत्या, मामा वगैरे जमणार होते. तिथे गेल्यावर अक्षय आणि मला अश्रू आवरणं कठीण झालं. एव्हाना आम्हाला आता वास्तव कळलं होतं की आपला बाप आपल्याला सोडून गेला. पप्पा आपल्याला सोडून गेले.

काही वेळाने मी रडायचं थांबलो. मला अक्षयला सांभाळणं त्या क्षणी महत्त्वाचं वाटलं. मात्र त्याला जवळ केलं तर तो आणखी जोराने रडायला लागला. गाडीत जातनाही तो हुंदके देत रडत होता. त्याच्याकडे पाहून मलाही अश्रू थांबवता येत नव्हते. आई कोणत्या परिस्थितीत असेलपप्पा कालपर्यंत तर चांगले बोलत-फिरत होते मग असे अचानक कसं असे झालेअसे अनेक प्रश्न गाडीतून जाताना मनात घोंगावत होते. एक खासगी गाडी केलेली गावी जाण्यासाठी. गाडीतून जाताना पप्पांचा चेहरा डोळ्यासमोरुन जाता जात नव्हता. ते हसताना दिसत होते... ते मला रागवताना दिसत होते.. ते काम करताना दिसत होते... ते माझ्यासोबत खेळताना दिसत होते...

मी असं काय चुकीचं केलंय की माझं छत्र हरपलंमनात गोंधळ-गदारोळ सुरु होता. मधेच अक्षय हुंदके देत आत्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होता. माझी नजर गाडीबाहेर..मात्र मन पप्पांच्या आठवणीत. आई..निलिमा..अक्षय..या साऱ्यांना मला आधार देण्याची गरज होती.

आदल्या रात्री म्हणजे 22 जूनच्या रात्री मी पप्पांशी फोनवरुन बोललो होतो. ते माझं आणि त्यांचं शेवटचं बोलणं होतं. शेवटचं. माहित नव्हतं की ते यापुढे माझ्याशी कधीच बोलणार नव्हते. ते नेहमीसारखं बोलत होत. मला पोस्टातल्या पैशाचं सांगत होते. पुढच्या महिन्यात पैसे मिळणार आहेत असे सांगत होते. तू रुम घे...गावची चिंता करु नको, गावी पैसे नको देऊस, मी सर्व सांभाळेन इकडे असे सांगत होते.

त्यांनी आमच्यासाठी मुंबईत रुम घेऊन ठेवली नाही याची रुखरुख त्यांच्या मनात कायम होती. गावातल्या बहुतेक जणांनी त्यांच्या मुलांसाठी मुंबईत रुम घेतलीय, मात्र मी नाही, यामुळे ते नेहमी अस्वस्थ असत. आपण आपल्या मुलांना मुंबईत स्वत:ची रुम नाही घेतली.. ते कुणाकडे राहती, उद्या कुणी त्यांना घराबाहेर काढले तर ते कुठे राहती, नातेवाईक कितीही चांगले असले तरी ते किती दिवस पोरांना ठेवतील अशा अनेक प्रश्नांनी ते घेरले असायचे, हे त्यांच्या बोलण्यातून मला नेहमी जाणवायचं. त्यादिवशी म्हणजे 22 जूनला रात्री फोन केलेला त्यांना तेव्हाही ते हेच सारे बोलत होते. ते उद्या आपल्यात नसतील याची किंचितसंही मला वाटलं नाही.

मागच्यावेळी गावी गेलेलो त्यावेळी दिवा-सावंतवाडी अपघातानंतर मी एबीपी माझावर एक दहा मिनिटांचा लाईव्ह दिला होता. दिवा-सावंतवाडी अपघातग्रस्त ट्रेनमध्ये मी होतो त्यामुळे त्याचा अनुभव मी एबीपी माझावर सांगितला होता. त्याची व्हिडिओ क्लिप मी मोबाईलमध्ये घेतली होती. ती क्लिप गावी गेलो असताना पप्पांना दाखवली. मग काय बघता... अख्ख्या गावात दवंडी पिटवली की माझा पोरगा टिव्हीवर दिसला वगैरे वगैरे. काय म्हणून आनंद झाला होता त्यादिवशी. मी पत्रकारिता म्हणजे नक्की मला पुढे जाऊन काय काम मिळणार आहे याची त्यांना नेहमी चिंता असायची. मात्र त्या व्हिडिओनंतर त्यांच्या मनातील बरेच प्रश्न निकाली निघाले होते.

मुंबईहून गावी जाताना गाडीतून माझी नजर बाहेर नक्की होती मात्र हे सारे मला प्रवासात आठवत होते. पप्पांच्या प्रत्येक आठवणीनंतर डोळे पाणावत होते. मधेच हुंदके देत रडू येत होतं. पप्पा नाहीत, ही गोष्ट मन मानायलाच तयार होत नव्हतं.

एव्हाना नागोठण्याचा डोंगर उतरुन आम्ही रोहाच्या दिशेने निघालो होतो. थोड्याच वेळात रोहा एसटी स्टँडच्या समोर गाडी पोहोचली. काहींनी खाल्लं. दुपारचे साडेतीन वाजले होते. वडापाव की काहीतरी आत्याने आणलेलं. मात्र मला घशाखाली एक घासही जाईना. मी ते तिथेच त्यांच्यासमोर सारुन सरळ गाडीत जाऊन बसलो. तेवढ्यात मागून एक गाडी आली. त्या गाडीत निलिमा आणि तिच्या सासरची माणसं होती. निलिमाच्या लग्नाला आता कुठे तीन महिने झालेले. तिने तर पूर्णपणे अंग सोडूनच दिलं होतं. मला आणि अक्षयला बघितल्यावर ती आणखी रडायला लागली. वयाने आम्हा दोघांपेक्षा मोठी पण मनाने खूपच हलवी. तिच्या लग्नात पप्पांनी काही कमी होऊ दिलं नव्हतं. आठवतं मला, ते त्या दिवशी जेवढे आनंदी होते तेवढे आनंदी मी आतापर्यंत कधीच पाहिलं नव्हतं. आपल्या मुलीला तिचा संसार थाटून दिला आहे, याचा त्यांना प्रचंड अभिमान असावा बहुतेक. याच आवेशात ते खूप दिवस होते. मागच्यावेळी तर निलिमा मुंबईहून गावी गेली असताना तिला तिचं सासरच्या गावचं घर साफ करायला ते किती आनंदाने गेलेले. मुलीचं घर साफ करायला जाण्यात त्यांना काहीच गैर वाटलं नाही किंबहुना आपल्या मुलीला काही त्रास होऊ नये म्हणून त्याच आनंदाने निलिमाच्या सासरी जाऊन आले होते.

आता आमच्या गाड्या रोहातून बारशेतच्या दिशेने म्हणजे माझ्या गावाच्या दिशेने निघाल्या. माझ्या गावात जाणारा नेहमीचा रस्ता म्हणजे रोह्याच्या हनुमान टेकडीवरुन जाणाऱ्या रस्त्याने आम्ही न जाता दुसऱ्या आडमार्गाच्या रस्त्यानं जाणं पसंत केलं कारण नेहमीचा रस्ता खराब झालाय असं रोहात जाऊन कळलं. मग दुसऱ्या रस्त्याने गावी जाण्यास आमची गाडी निघाली. एकेका डोंगरांना मागे टाकत आमची गाडी गावाच्या जवळ जाऊ लागली. मनातली धाकधूक वाढू लागली. रडणं आवरता आवरेना. अखेर गाडी वाली या गावात पोहोचली. वाली. आमचं ग्रामपंचायतीचं गाव. या गावातून पुढे निघालो. चढण चढलो की वर टेकडावर आमचं गाव. वालीहून पुढे निघालो झाडांच्या डोक्यावरुन गावातील कौलारु घरं दिसू लागली. एरवी आलो की जी प्रसन्नता वाटायची ती आज नव्हती. पूर्ण गावावर शोककळा पसरलेली. गाव निपचित पडलेलं. जसजसा गावाच्या जवळ जात होतो तसतसा गावाजवळली भयाण शांतता जाणवू लागली. गाव अगदी दोनशे-अडीचशे मीटरवर आले आणि रडण्याचा एकच मोठा आवाज कानावर आदळला. अनेक नातेवाईक गावात दाखल झालेले. सर्वजण आम्हा भावंडांचीच वाट पाहत होते. गावाच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो. गाव पूर्ण शांत निपचित पडलेलं. गावातील प्रत्येक माणूस आणि माणूस आमच्या घराभोवती जमलेलाआमची गाडी घराच्या समोर जाऊन उभी राहिली. घराभोवती जमलेला प्रत्येकजण रडत होता. मी गाडीतून उतरलो आणि थेट धावत्या पावलांसोबत घराच्या दिशेने गेलो. अक्षय, आत्या किंवा इतर कोणी गाडीतून उतरले याकडे माझं लक्ष गेलं नाही.
घराच्या वऱ्हांड्यात खूप गर्दी होती... आणि घरातही. आत मोठ-मोठ्याने रडण्याचे आवाज. कान सुन्न झालेले. आईचा आवाज आला. माझं शरीर थंडच पडलं. कुठल्याश्या आजीने मला वऱ्हांड्यातच कुशीत घेतलं आणि मला गोंजारुन रडू लागली. माझ्या मागे बहुतेक अक्षय होता. त्यालाही कुणीशी अशीच गोंजारत रडत होते. दुसऱ्या कुणीतरी त्या गर्दीतून वाट काढत मला आत नेलं... मी दारातून आत पाऊल टाकला... समोर पांढऱ्या फडक्यांनी गुंडाळेला एका धिप्पाड सात फूट उंचीची व्यक्ती जमिनीवर निपचित पडलेली... फक्त चेहरा दिसत होता. त्या चेहऱ्यावर काहीही हावभाव नव्हते. तो माझा बाप होता. मला, आम्हाला कायमचा सोडून गेलेला माझा बाप..

मी त्या लादीवर पडलेल्या पप्पांकडे एकदा पाहिलं. आणि जागीच कोसळलो. मागे अक्षय होता..तो आईच्या दिशेने जाताना दिसला. शेवटचा. नंतर तो मला त्या गर्दीत कुठे दिसलाच नाही. मला गावातल्या दोघांनी उचलून बाजूच्या खोलीत नेले आणि शर्ट काढून बाजूला पडलेल्या सुपाने हवा घालत होते.. तर कुठलीशी आजी पदराने हवा घालत त्याच पदराने मला आलेला घाम फुसत होती. माझी मोठी आत्या होती बहुतेक की मावशी. आठवत नाही नीट. डोळ्यासमोर अंधार. थोड्या वेळाने मला बरं वाटलं तेव्हा पाणी प्यायलो. रडणं थांबत नव्हतं. मग मला आईजवळ जायचंय असं बाजूला असलेल्यांना सांगितलं. तेथे उभे असलेल्या दोघांनी माझ्या दोन्ही हातांच्या दंडाना पकडून उठवलं आणि आईच्या पुढ्यात नेऊन ठेवलं. आईने मला पाहिल्यावर आणखी मोठ-मोठ्याने रडू लागली. आईने मला, अक्षयला आणि निलिमाला कवेत घेतलं. तिच्या कवेत आम्ही तिघे मावत नव्हतो मात्र तरीही ती प्रयत्न करत होती. ती ढसाढसा रडत होती. बाजूच्या बायका तिला समजावत होत्यापोरांकडे बघ. तू रडणं थांबव..तर ते थांबतील’ मात्र आई रडायचं थांबली नाही. तीच्या मागोमाग आम्हीही पुरतं ढासळत चाललो होतं. मला तर पूर्णपणे थकवा जाणवू लागला होता. मला चालताही येत नव्हतं. अशात पप्पांचं प्रेत घरातून अंगणात काढण्यासाठी चार-पाच जण पुढे आले. आईने पप्पांचं प्रेत धरुन ठेवलं आणि आणखी मोठ्याने रडू लागली. तीचं रडणं माझ्याने बघवत नव्हतं.

थोड्यावेळाने आई रडता रडता म्हणाली, “मरायचा व्हता तर मला घेऊन मरायचा...पोरांना घेऊन मरायाचा..एकाटाच का मेलास?...विष का प्यायलास?”

मी हादरलोच. पायाखालची जमीनच सरकली. “पप्पा विष प्यायले?”

पप्पा विष प्यायले हे कळल्यावर मला बसलेला हादरा इतका जबर होता की मला ते सहनच झालं नाही. माझ्या डोळ्यावर पुन्हा अंधार पसरला. मला चक्करसारखं करु लागलं. मला पुन्हा पाणी पाजलं गेलं. एकीकडे अश्रू आवरत नव्हते...दुसरीकडे डोक्यात प्रश्नांच्या चक्राचा वेग वाढला. पप्पांनी असे का केलं असेलत्यांना कसलं टेन्शन होतं?त्यांनी मला का नाही सांगितलं त्यांचं टेन्शनते कालच तर माझ्याशी बोलले मग काही होतं तर मला सांगायचं..पण या साऱ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आता ते या जगात नव्हते. मनातील प्रश्नांचं वादळ आणखी मोठ्याने घोंगावू लागलं. तेवढ्यात चार-पाच जणांनी प्रेत अंगणात नेण्यासाठी उचललं. आम्हा सर्वांचं रडणं थांबेना. आई वेड्यासारखी करु लागली होती. ती प्रेत उचलणाऱ्यांच्या पाया पडू लागली “माझ्या धन्याला नेऊ नका.. माझ्याजवळच त्यांना ठेवा
तिचा तो काळजाचा थरकाप उडवणारा स्वर मला आणखी कासाविस करत होता. तिच्या त्या विणवण्या आम्हा तिघा भावंडांना आणखी हादरे देत होता. अखेर पप्पांचं प्रेत अंगणात नेलं गेलं. आम्ही त्या प्रेतामागून गेलो. अंगणात नातेवाईक पाणी पाजत होते. मला पुन्हा चक्कर आली. घरी आल्यापासून तिसऱ्यांदा असं झालं. कुणीतरी डॉक्टरना बोलवा असं मोठ्याने म्हणाला. मग मीच धीर करुन नकार दिला.पप्पांच्या निपचित पडलेल्या..नेहमी हसत-खेळत असणाऱ्या त्या चेहऱ्याकडे मला पहावेना. मी दुसरीकडे पाहूनच पप्पांना पाणी पाजलं. थोड्या वेळाने प्रेत स्माशानाकडे नेण्यासाठी उचललं. मला स्मशानभूमीकडे घेऊन जाऊ नये, असे अनेकांनी सूचवले कारण मला सारखी-सारखी चक्कर येत होती व हात-पाय पूर्णपणे थंड पडलेले. शेवटी माझ्या विनंतीनंतर ते घेऊन गेले. पप्पांच्या आत्याच्या नातवांनी मला दोन्ही बाजूंनी पकडलं आणि ते स्मशानभूमीकडे घेऊन गेले. गावापासून अडिचशे-तीनशे मीटरवर असलेल्या स्मशानभूमीत आम्ही गेलो. पप्पांचं प्रेत तिथे खाली ठेवलं होतं. आणि काही वेळातच निपचित पडलेलं...सकाळीच आम्हाला कायमचे सोडून गेलेले माझे पप्पा आता तर त्यांचं शरीरही आमच्यातून निघून गेलं. बाप गेला. तिथून घरी येईपर्यंत रडणं चालूच होतं. ठरवूनही डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते.पप्पा विष का प्यायले?’ हा प्रश्न मात्र उत्तराची वाट पाहतमनात घर करुन बसला होता.

संध्याकाळी घरी स्मशान शांतता पसरली होती. काल याच घरात फिरणारे माझे पप्पा आज नव्हते आमच्यात. ते आमच्यात नव्हते हे मान्य करायला कुणीच तयार नव्हते. घरात बसलो असताना वाटायचं की आता वऱ्हांड्यातून घरात येतील किंवा आता मागच्या दारातून घरात येतील. पण ते तिथे यायला आमच्यात होते कुठे?

प्रथेप्रमाणे घरातील चूल बंद होती. रात्री गावातील महिला जेवण घेऊन आल्या. आणलेल्या प्रत्येकाच्या जेवणातील एक घास तरी खायचा अशी प्रथाच. त्यामुळे आम्ही तीन भावंडं आणि आई असे एख रांगेत बसलो. आणि जेवू लागलो. जेवता जेवता आई हुंदके देत रडू लागली. मागोमाग अक्षय आणि मी..मग निलिमाही. आई रडता-रडता सकाळी पप्पांच्या बाबतीत नक्की काय झालं ते सांगू लागली. तेवढ्यात एका आजीने तिला थांबवलं आणि म्हणाली न रडता सांग सर्व. आईला रडणं थांबवता आलं नाही. मात्र आईने सर्व सांगायला सुरुवात केली. ते सर्व ऐकून मला धक्काच बसला. पप्पा मृत्यूला घाबरत असतं. त्यामुळे ते असे करुच शकत नाहीत याची मला खात्री होते. आईही तेच म्हणत होती. आईने सर्व हकीकत सांगितली आणि पुन्हा मोठ-मोठ्याने रडू लागली.

सकाळी आई-पप्पा एकत्र उठले. आई जेवणाच्या मागे लागली. आई चुलीजवळ होती. पप्पा गाई-बैलांना रानात सोडून आले. आणि पेरणी चालू होती म्हणून दोन बैल वाड्यात बांधून ठेवलेली. त्यांना पेंडा घातला. आणि नांगर ठेवायला शेतावर गेले. तिथून आल्यावर ते थेट आईजवळ चुलीशा आले.
मला पाणी दे” त्यांनी आईला सांगितलं. त्यांनी बोलल्यावर त्यांच्या तोंडातून आईला कसलासा वास आला. तिला पहिल्यांदा कळलंच नाही की हा वास नक्की कसला आहे. तिने विचारलं तुमच्या तोंडातून वास कसला येतोय त्यावर ते कोणतंही उत्तर न देता निघून गेले. जाऊन पंख्याखाली पडले आणि मोठमोठ्याने रडू लागले. आई त्यांच्या मोगमागच गेली. ते का रडायला लागले याने ती घाबरली. एवढा धड-धाकट माणू असा रडायला का लागला. आई विचारायाला पुढे गेली तर पाहते तर पप्पांचे डोंळे लालभडक झालेले,. डोळे फिरवू लागलेले ते. आईला हिसका मारुन ते घराच्या मागच्या बाजूला गेले. आणि तिथे एका दगडाच्या बाजूला धाडकन खाली पडले. आईने त्यांचं डोकं मांडीवर घेतलं तेव्हा ते मोठ्याने रडू लागले. म्हणाले ‘माझ्या पोरांना बघ. मला मरायचं नाहीय. मला डॉक्टरकडे घेऊन चल.’ आई घाबरली. आईने त्यांच्य़ा तोंडात हात घातला. तर त्यांच्या तोंडाता माती होती. त्यांनी फॉरेटची पाऊडर खाल्ली होती व त्यांवर बहुधा माती खाल्ली असावी. आई त्यांना तिथेच टाकून घराच्या पुढच्या अंगणात गेली आणि मोठ्याने ओरडू लागली. कारण आईच्याने पप्पांना उचलताच आलं नसतं. गावातील सर्वजण कामावर गेलेले मग ज्या कोणी बायका गावात होत्या त्या आल्या. त्यांनी पप्पांना खेचत खेचत पुढच्या अंगणात आणून ठेवलं. पप्पांचं शरीर काळं-निळ पडत आलं. गावातील भाव्या दादाचा टेम्पो घेऊन रोहाच्या दिशेने निघाले. टेम्पोत पप्पांचं डोकं आईतच्या मांडवर आणि बाजूला पप्पांच्या आत्याची सून. आणि मागेमाग सरपंच आण्णांची गाडी. रोहाला हॉस्पिटमध्ये घेऊन जाईपर्यंत पप्पांचा जीव गेलेला. आई तर सांगते की गावापासून वालीला म्हणजे बाजूच्या गावात जाईपर्यंतच पप्पांचा जीव गेलेला. तरीपण आईला वाटत होतं की ते बेशुद्ध पडले असावेत म्हणून आईने आशा सोडली नव्हती. सरपंच अण्णा म्हणत होते की आपण हॉस्पिटलला नको नेऊया कारण परत पोलिस केस होईल.पण आईला आशा होती. तीच्या विनंतीनंतर सरपंच अण्णा शेवटी मानले आणि म्हणाले चला मग. पण हॉस्पिटलच्या पहिल्याच चेकअपमध्ये पप्पा गेल्याचं सांगितंल डॉक्टरनी.
आईने हे सर्व तिथे जमलेल्या बायकांना सांगितलं. हे सांगत असताना आई अनेकवेळा ढसा-ढसा रडली. हुंदके देत तिने हे सर्व सांगितलं...

माझे पप्पा. गेल्या सात-आठ वर्षांपासून पप्पा आजारी होते. मानसिकरित्या ते सात-आठ वर्षांपासून स्टेबल नव्हते. त्याचं झालं असं होतं की ते मुंबईत दहिसरला हिऱ्यांच्या कारखान्यात काम करायचे. त्यावेळी त्यांच्या डोक्याला ट्युबलाईट लागलेली. आणि डोक्यातून खूप रक्त वाहून गेलेलं. त्यावेळी योग्य उपचार झाले नाहीत आणि मग गेल्या सात-आठव वर्षांपासून ते मानसिकरित्या खूप खालावले होते. कधी-कधी घरातून तीन-तीन महिने कुठेतरी निघून जायचे. नंतर नंतर तर आम्हाला ते धमी द्यायचे की मी आता जाईन तो परत येणार नाही किंवा मी माझ्या जीवाचे बरं-वाईट करुन घेईन वगैरे वगैरे. पण आम्हा सर्वांना माहित होतं की ते मरणाला घाबरतात. ते तसं काहीच करणार नाहीत. ते गेल्यावर आई त्यांना शोधण्यासाठी आजूबाजूची गावं, जंगलात सर्व ठिकाणी पायपीट करायची. आम्ही शाळेत जायचो... शाळेला सुट्टी घेऊन येऊ का म्हटल्यावर आई आम्हाला नाही म्हणायची. पप्पा मुंबईला गेलेत असं सांगून ती आम्हाला धीर देण्याचा प्रयत्न करायची. शाळेतली पोरंही मला जेव्हा ‘अरे, तुझा पप्पास वेडा आहे ना?’ असे बोलायचे तेव्हा खूप राग यायचा.  यादरम्यान, आईने पप्पांना बरं करण्यासाठी खूप मेहनत घेतली. पप्पा जेव्हा-जेव्हा घरातून जायचे तेव्हा-तेव्हा आई ऊन-पाऊस न बघता त्यांना शोधत फिरायची. त्यांना घरी आणल्यावर ते पुन्हा परत जातील हे माहित असतानाही तीने कधीच त्यांना शोधण्याचं टाकून दिलं नाही. एवढंच काय... अलिबागच्या मेन्टल हॉस्पिटलमध्ये त्यांना अॅडमिट केलं गेलं. गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. ते गोळ्या घ्यायला नकार देत मग आई भाकरीतून त्यांना गोळ्या देत असे... याचदरम्यान, शाळेतही आम्हा भावंडांना खास करुन मला आणि निलिमाला मित्रांच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागायचं... तुझे पप्पा अलिबागहून आलेत ना?...तुझे पप्पा वेडे आहेत ना?..इत्यादी इत्यादी. गेल्या काही महिन्यांपासून...खासकरुन निलिमाच्या लग्नापासून म्हणजे एप्रिल 2014 पासून त्यांची स्थिती सुधारली होती. ते सर्वसाधारण माणसांसारखे वागत होते. 

मात्र गेल्य़ा काही महिन्यांपासून खासकरुन मुंबईत काकांच्या घरातून बाहेर पडून मी आणि अक्षय वेगळे राहू लागलो तेव्हापासून ते फार चिंतेत दिसायचे. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चिंता असायची. बहुतेक आमच्या रुमबाबत असावी ती चिंता. एवढी मेहनत करुन पोरांना रुम घेऊन देऊ शकलो नाही याची त्यांना बहुतेक नेहमी रुखरुख वाटत राहिली. आणि हल्ली याचंच ते जास्त टेन्शन घेऊ लागले होते कारण हल्ली मी जेव्हा कधी त्यांनी फोन करत असे तेव्हा तेव्हा ते मला तू रुमचं कसं काय करणार आहेस... तुझ्या पगारातू कसं रुम घेणार.. माझे पोस्टात एवढे पैसे आहेत वगैरे अशाच गोष्टी तासंतास करत बसायचे. परवा गावी आईला भेटायला गेलो असताना आईने विषय काढला की त्यांनी नक्की का आत्महत्या केली असेल तर मी तिला हे रुमचं कारण सांगितलं. ते याचंच टेन्शन घेऊन त्यांनी त्यांच्या जिवाचं बरं वाईट केलं असणार. तेव्हा आईने मला आणखी एक सांगितलं की ‘नेनू, त्यांना जेव्हा टेम्पोत भरलं तेव्हा गावापासून एक-दोन किलोमीटर गेल्यावर त्यांनी एख वाक्य मला बोलले... त्यानंतर ते पुटपुटत राहिले पण त्यांच्या तोंडून स्पष्ट आलेला शेवटचा वाक्य बहुतेक तोच होता....तो म्हणजे- नेन्याला सांग रुमचं टेन्शन नको घेऊ. अक्षयला ओरडायला नको सांगू. निलिमाला वेळच्या वेळी भेटायला जायला सांग नेन्याला. आणि आणखी काहीसे पुटपुटले. पण हे वाक्य शेवटचे

आईने सांगितलेलं हे वाक्य माझ्या मनात कायम घर करुन राहिलेत. त्यांनी आमच्यासाठीच आयुष्याचं असं करुन घेतलं असं मला आजही कायम वाटत राहतं... आपल्या पोरांना मुंबईसारख्या शहरात राहायला खोली-थारा घेऊ शकलो नाही, याची रुखरुख त्यांना कायम होती.

-नामदेव अंजना

19 January, 2016

ही माझी हतबलता की देशातील वस्तूस्थिती?




रोहिथ वेमुला दोस्ता,

तू आत्म'हत्या' केलीस. तुझ्या मृत्यूला ही व्यवस्था म्हणजेच आम्ही सारे जबाबदार आहोत, हे सर्वप्रथम मान्य करतो. कारण ही वर्तमान व्यवस्था-सत्ता ही आमच्या मताची देण आहे. तुझ्या जाण्याने खूप दु:ख झालं, तुझं बलिदान व्यर्थ जाणार नाही, तू भगतसिंह आहेस, तू लढवय्या आहेस वगैरे वगैरे खूप काही यापुढचे काही दिवस बोललं जाईल. दोस्ता, यातील काहीशब्द मुद्दामहून वापरला आहे. कारण काहीच दिवस हे असणार आहे. मग तूही आमच्या दाभोळकर-पानसरे-कलबुर्गींच्या रांगेत चौथ्या नंबरवर जाऊन बसशील. म्हणजे शाहू-फुल-आंबेडकरांचा महाराष्ट्रअसं नाही का बोललं जातं, तसं हल्ली दाभोळकर-पानसरे-कलबुर्गींम्हटलं जातं. आता यात तुझं नाव. बस्स बाकी काही फार होणार नाही. याची दुर्दैवाने खात्री वाटते.

दोस्ता, अगदीच काही निराशा नाही. काल आणि आज तुझ्या समर्थनासाठी खूप आंदोलनं झाली. तशी यापुढेही होत राहतील काही दिवस. हेच काय ते सकारात्मक चित्र. बाकी काळाकुट्ट अंधारच. कारण आगामी आठवडाभर मोर्चे निघतील, पोलिसांचे मार खाऊन मोर्चातील कार्यकर्ते परत घरी जातील. घरी त्याचा आई-बाप त्याला दणके देईल. मेल्या उद्या पोलिसांचे मार खायला गेलास तर घरात घेणार नाही, असे आई-बाप धमकी देईल. मग तो तरणाबांड पोरगाही दुसऱ्या दिवासापासून मोर्चा-बिर्चा सोडून देईल. 

नाही असे नाही. दिल्ली-मुंबई आणि तू जिथे प्राण सोडलेस त्या हैद्राबादेत काही मेणबत्त्या जळतील. विझतील. मेणबत्त्या पेटवणारे घरी जातील. शांत झोपतील. बस्स. संपलं. एवढंच.

आपलं कसंबसं अस्तित्व टिकवून असलेल्या एखाद्या चळवळीतील कुणीतरी तुझी न्यायालयीन लढाईही लढेल. त्यातही फार काही होणार नाही. त्यातही हमीद, मुक्ताताई, मेघाताई यांच्यासारखंच पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवायला लागतील आणि कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतील. बाकी काही हाती येणार नाही.

रोहिथ, हेच पाहा ना...
दाभोळकरांना मागून गोळ्या घातल्या गेल्या. कुणीही भेटले नाही.
त्यांची हिंमत वाढली.
पानसरेंना बाजूला उभं राहून गोळ्या घातल्या गेल्या. कुणीही भेटले नाही.
त्यांची आणखी हिंमत वाढली. 
मग काय?
कलबुर्गींना थेट समोरुनच गोळ्या घातल्या गेल्या. कुणीच भेटले नाही.

रोहिथ दोस्ता, तुला तुझ्याच हाताने संपवलं त्यांनी. कुणी भेटेल याची अजिबात म्हणजे अजिबात विश्वास नाही. कोण ते दत्तात्रेय की कोण... काहीही होणार नाही त्याला, याची 200 टक्के खात्री आहे. दुर्दैवाने.
फार फार तर, दत्तात्रेय की कोण आहे, त्याला कोर्टात खेचलं जाईल. मात्र, तुला-मला-सर्वांना माहित आहे, कोर्टात येण्याचा रस्ता एक आहे, मात्र कोर्टाच्या भिंती-भिंतीतून हजार पळवाटा आहेत. त्या तुला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्यांना चांगल्या माहित आहे.

आणि हो, मीही काही करत नाहीय. मी कुठल्याही मोर्चात सहभागी झालो नाही किंवा पाच रुपयांची मेणबत्ती घेऊन कुठल्याही मेणबत्त्या घेतलेल्या झुंडीत शिरलो नाही. कारण ज्याने तुला दबावआणून मारलं, ते मोर्चे-मेणबत्त्या-आंदोलनांच्या दबावाला घाबरतील का? हा प्रश्न मला पडला आहे.

छबीलदास, भुपेश गुप्ता भवन, चैत्यभूमी, आंबेडकर भवन किंवा फार फार तर दिल्लीत स्मृतीबयेच्या ऑफिसबाहेर, हैदराबादेत तू शिकत असलेल्या विद्यापीठाबाहेर किती मेणबत्त्या पेटतात आणि किती दिवस त्या पेटत राहतात, यावर तु्झ्या न्यायाचं भवितव्य आहे. कारण पानसरे-दाभोळकर-कलबुर्गींसाठी पेटलेलेल्या मेणबत्त्या कधीच विझवल्या गेल्या आहेत. तुझ्याबाबतीत तसं होऊ नये असं वाटतं. पण तिथेही माझ्या मनी निराशाच आहे.

मला माहित नाही, मी हे हतबलतेतून लिहिलंय की हीच वस्तूस्थिती आहे. पण जे वाटलं ते लिहिलं.
पानसरेंची हत्या झाल्यानंतर काही दिवसांनी तपास यंत्रणांचा सुस्साट वेग पाहून एक कविता लिहिली होती. आज पुन्हा पोस्ट करतोय. इच्छा आहे की, या कवितेसारखं होऊ नये.

घटना झाल्यावर
निषेध,
आंदोलन,
मोर्चे,
सभा,
परिसंवाद,
धरणं,
निदर्शनं,
काळे झेंडे,
रास्ताराको,
जाळपोळ,
निवेदनं,
आवाहनं,
आव्हानं,
बदल्याच्या धमक्या,
प्रत्युत्तरं,
टीका,
हल्ला
इत्यादी
इत्यादी...
ते तरीही घाबरत नाहीत..
ते शांत राहतात...
कारण त्यांना खात्री असते...
आपल्या आरंभशूरतेची अन् निमित्तखोरपणाची...


-नामदेव अंजना

05 January, 2016

आशादायी चित्रावर रेघोट्या ओढणारा 'पठाणकोट हल्ला'


मुळात भारत आणि पाकिस्तानात अशी काही डोचकी आहेत, ज्यांना भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सौहार्दाचे संबंध निर्माण व्हावे, असे वाटत नाही. त्यामुळेच या शक्ती भारत-पाकिस्तान चर्चा होण्याच्या मार्गावर असली, की त्यात खोडा घालतात. पठाणकोट हल्ला हा त्याच शक्तींनी केला आहे, हे स्पष्ट आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानात जाऊन पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली. त्यामुळे भारत-पाकिस्तान या दोन देशांमध्ये चर्चा होऊ शकते, अशी आशा निर्माण झाली. दोन्ही देशांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, दहशतवादी शक्तींना हे पाहावत नसल्याने त्यातून पठाणकोट हल्ला करण्यात आला. मुळात हे नेहमीचंच झालं आहे. भारत-पाकिस्तान चर्चा होणाच्या मार्गावर असली की, नेमकं देश विघातक शक्ती सक्रीय होतात.

आता खरंतर भारताने पाकिस्तानशी चर्चा रद्द न करता, उलट चर्चा करुन दहशतवाद्यांना उत्तर द्यायला हवं. खरंतर भारतानेच नव्हे, पाकिस्ताननेही चर्चेसाठी पुढाकार घ्यायला हवा. जोपर्यंत दोन्ही देशांमध्ये दहशतवाद किंवा इतर वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा होत नाही, तोपर्यंत भारत-पाक संबंध कायम ताणलेलेच राहतील.

त्यातल्या त्यात एक आनंदाची बाब अशी आहे की, पठाणकोट हल्ल्यानंतरही पंतप्रधान मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी फोनवरुन काही मिनिटं चर्चा केली. आशा आहे की, आगामी काळात भारत-पाक चर्चा रद्द न होता, यशस्वी होईल. कारण पाकिस्तानशी चर्चा रद्द करुन आपल्याला काहीच मिळणार नाहीय. उलट असेच हल्ले यापुढेही दहशतवाद्यांकडून होत राहतील. त्यामुळे चर्चेला पर्याय नाही, हे दोन्ही देशांच्या नेतृत्त्वांना पटावं, हीच इच्छा.

वर्तमान स्थितीत युद्ध पाकिस्तानला झेपणारं नाही आणि भारताला युद्ध परवडणारं नाही. किंबहुना, संघर्षात कायम ज्याच्याकडे असतं, त्याला गमवावं लागतं. त्यामुळे युद्धात भारताचंच मोठं नुकसान होईल. त्यामुळे पाकिस्तानशी युद्ध करा, असे मत मांडणाऱ्यांनी आपापली तोंडं बंद ठेवावी. युद्ध वगैरे पुन्हा एकोणीसाव्या-आठराव्या शतकात घेऊन जातील.

पुन्हा तोच मुद्दा- भारत असो वा पाकिस्तान, चर्चेशिवाय या दोन्ही देशांना पर्याय नाही. गेल्या 13-14 वर्षात भारताचे पंतप्रधान साधं पाकिस्तानतही गेले नाहीत. त्यामुळे मोदींच्या छोट्याशा पाकिस्तान दौऱ्यामुळे नक्कीच आशा बाळगायला हरकत नाही. जोपर्यंत चर्चेची दारं उघडत नाहीत, तोपर्यंत हे संबंध असेच राहतील. त्यामुळे पठाणकोट हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी चर्चा न थांबवता, ती केली पाहिजे. भले या हल्ल्याचा त्या चर्चेत जाब विचारा, पण चर्चा झाली पाहिजे. कारण चर्चा रद्द करुन आपल्या हाती काहीच नसेल. केवळ पुढे काय होतंय याची वाट पाहावी लागेल. 


मोदी-शरीफ भेटीनं एक आशादायी चित्र निर्माण केलं आहे. त्या आशादायी चित्रावर रेघोट्या ओढणारे खूप आहेत. किंबहुना त्यांनीचपठाणकोट हल्ला केलाच आहे. मात्र, मोदींनी हे ओळखून चर्चा करावी एवढंच.

30 December, 2015

प्रिय गुरुजी

प्रिय गुरुजी,

आज तुमचा स्मृतीदिन. 24 डिसेंबर 1899 साली कोकणातील पालगडमध्ये तुमचा जन्म झाला. ज्या ‘श्यामची आई’मधून तुम्ही जिला अजरामर केलंत, त्या यशोदामायेच्या पोटी. खरंतर हे सागंण्याची वेळ आलीय, हेच मोठं दुर्दैव. कोण होते साने गुरुजी, असा कुणी प्रश्न विचारला, तर फार फार तर आगामी चार-पाच वर्षांत उत्तर मिळू शकेल. मात्र, ‘पांडुरंग सदाशिव साने’ कोण, असा प्रश्न आज विचारल्यास, पृथ्वीची निर्मिती कशी झाली, हा प्रश्न विचारल्यावर जशा चेहऱ्यावर एक्स्प्रेशन्स असतात, तशा दिसतील. आणि हे मला आश्चर्यकारक वाटत नाही. कारण हल्ली केजी-बिजी किंवा ट्युशन वगैरे या शाळेआधीच्या शाळेमुळे तुमचे विचार मुलांपर्यंत पोहोचतच नाहीत. फार-फार तर सातवी-आठवीपर्यंत मराठी पुस्तकातील एखाद्या धड्यात तुम्ही बंदिस्त झाला आहात.

आता विशी-तिशीत असलेल्यांना बऱ्यापैकी आणि त्याहून वयाने मोठे असलेल्यांना जरा नीटसं तुमचं कार्य माहित आहे. बाकी सर्व बट्याबोळ आहे. त्याबद्दल या पिढीचा प्रतिनिधी म्हणून सॉरी.. खरंतर मी माफी मागितलेलं तुम्हाला आवडणार नाही. कारण आपल्या विद्यार्थ्याने कायम स्वाभिमानाने राहावं, अशी तुमची कायम इच्छा असायची. असो. तर गुरुजी, आज मी तुम्हाला पत्र लिहिण्याचं कारण फार वेगळं आहे. समाजातील विदारक परिस्थिती, तुम्ही ज्या राज्यात जन्म घेतलात, त्याच राज्यात गुरु-शिष्य परंपरेला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. तुम्ही असतात, तर तुम्हालाही हे बघवलं नसतं. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा आठवावसं वाटतं आहे. तुमच्या असण्याची गरज भासते आहे.

बरं हे पत्र लिहिण्याचं आणखी एक कारण, ते म्हणजे आज मी तुम्हाला तुमचंच कार्य सांगणार आहे. हो..हो…मला माहित आहे, तुमचं कार्य तुम्हाला सांगण्यात काय अर्थ आहे? पण गुरुजी, आता तुमच्या कार्याची, विचारांची, संस्कारांचा पुन्हा इथे उल्लेख करुन या निमित्ताने तुमच्या कार्याची पुन्हा एकदा उजळणी होईल. कारण माझ्यासह अनेकजण तुमचे संस्कार विसरले आहेत. तुम्ही तुमच्या आसवांनी लिहिलेलं ‘श्यामची आई’ पुस्तक केवळ आम्ही पुस्तक म्हणूनच वाचलं. ते संस्काराचं विद्यापीठ आहे, हे आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही. बहुधा म्हणूनच आज मानवतेला कलंक फासणाऱ्या घटना दिवसेंदिवस घडताना दिसत आहेत.

आज अमाप पैसा आहे, अशी मुलं शिक्षणाच्या नावाखाली मजामस्ती करतायेत आणि ज्याच्याकडे पैसे नाहीत, असे निमूटपणे शिक्षण सोडून गप्प आहेत. शिक्षणापासून वंचित असलेल्यांची संख्या दिवसागणिक वाढत जाते आहे. श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी भयानकरित्या वाढत जाते आहे. घरावर पराकोटीचं आर्थिक संकट असतानाही तुम्ही शिक्षणासाठी घेतलेल्या परिश्रमांची मला आठवण होते. त्या परिश्रमांचा मला आवर्जून येथे उल्लेख करावासा वाटतो. खरंतर तसं पाहायला गेलो तर तुमचं घर श्रीमंत. म्हणजे तुमचे वडील म्हणजे सदाशिवराव खोत. खोताचं घराणं म्हटलं की श्रीमंत असं घराणं. मात्र, तुमच्या घराची आर्थिक स्थिती खालावत गेली आणि त्यात घरही जप्त झालं. अशा घरात तुमचा जन्म झाला.

प्राथमिक शिक्षण पालगडला घेतल्यानंतर पुढील शिक्षण घ्यायचं की नाही, यावर तुमच्या घरात विचार सुरु झाला. कारण आर्थिक परिस्थिती म्हणावी तशी चांगली नव्हती. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी तुम्हाला मामांच्या घरी पाठवण्यात आले. पुण्याला. मात्र पुण्यात न जमल्याने तुम्ही पालगडाला परतलात आणि दापोली मिशनच्या शाळेत शिकू लागलात. खरंतर ‘हुशार विद्यार्थी’ म्हणून तुमची पहिली ओळख इथेच झाली. घरातील गरिबी वाढल्याने तुम्ही औंध संस्थानात राहायला जाण्याचा निर्णय घेतलात आणि तोही एका मित्राच्या सांगण्यावरुन. गरीब विद्यार्थ्यांना औंध संस्थानात मोफत जेवण मिळत म्हणून तिथे तुम्ही दाखल झालात खरे.. मात्र, शिक्षणासाठी हालअपेष्टा सुरुच राहिल्या. दरम्यान, प्लेगची साथ पसरली आणि औंध संस्थानातील शिक्षण अर्धवट सोडून तुम्ही पुन्हा पालघरल परतलात. मग त्यानंतर पुण्याच्या नूतन विद्यालयात दाखल झालात. अखेर 1918 साली तुम्ही मॅट्रिक झालात. पुढे न्यू पूना कॉलेज म्हणजे आताच्या एस. पी. कॉलेजमधून एमएपर्यंतच शिक्षण पूर्ण करुन अंमळनेरमध्ये एका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालात आणि तिथेच प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाचे प्रमुख. आणि इथेच आम्हाला आमचे ‘गुरुजी’ सापडले. तुमच्या रुपाने…

मनाने अतिश हळवे असणारे तुम्ही वसतिगृहातील मुलांना स्वावलंबनाचे धडे दिलेत. तुमच्यातला प्रेमळ शिक्षक खऱ्या अर्थाने इथे दिसला. विद्यार्थ्यांना सेवावृत्ती शिकवलीत. तुमचं शिक्षण हालाखीच्या परिस्थितीत झाली. मात्र, गरिबीपुढे कधीच हार मानायची नाही आणि त्यात शिक्षणासाठी तर नाहीच नाही, ही शिकवण तुम्ही विद्यार्थ्यांना स्वानुभवातून पटवून दिलीत.
“करी मनोरंजन जो मुलांचे
जडेल नाते प्रभुशी तयाचे”
असे म्हणत तुम्ही विद्यार्थ्यांचं मनोरंजन करत गोष्टींच्या माध्यमातून शिक्षण दिलेत. छान छान गोष्टी, धडपडणारी मुले, आस्तिक, मिती, रामाचा शेला ही पुस्तकं तुम्ही यासाठीच खास लहान मुलांसाठी लिहिलीत. 1928 मध्ये याच प्रेरणेतून ‘विद्यार्थी’ मासिकही सुरु केलंत. तुमच्या शिक्षकी पेशाचं वर्णन तुमच्याच भाषेत सांगायचं तर, गुळाच्या ढेपेला जशा मुंग्या चिकटतात. तशी तुमच्या भोवती मुलं गोळा होत असत. खरंतर तुमची स्तुती तुम्हाला आवडणार नाही. तुम्ही आता असतात, तर पटकन म्हणाला असातात, ‘मी काहीच केलं नाही. माझे विद्यार्थीच हुशार आहेत.’ पण खरंच, गुरुजी, तुमच्यातला मोठेपणा शब्दात व्यक्त न करणारा आहे.

पुढे महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन तुम्ही 1930 चया सुमारास देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतलीत. समाजिक क्षेत्र ते देशाचा स्वातंत्र्य लढा आणि पुन्हा समाजकार्य असा प्रवास असणारे बहुधा तुम्ही देशातील एकमेव असाल. स्वार्थाचा ज्याला कधी स्पर्शही झाला नाही, अशातले तुम्ही होतात.

गुरुजी, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्यानंतर 1930 ते 1950 या कालावधीत तुम्ही जवळपास 6 वर्षे 6 महिने तुरुंगवास भोगलात. मग तुम्ही कधी धुळ्याच्या तुरुंगात तर कधी नाशिकच्या, जळगाव आणि येरवाड्याच्या तुरुंगातही तुम्ही होतात. 1933 साली नाशिकच्या तुरुंगात असताना तुम्ही रोज रात्री आपल्या सहकाऱ्यांना आईच्या आठवणी सांगितल्यात आणि याच आठवणी पुढे सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव लिहून काढल्यात.. त्या आठवणींचं लेखन रुपांतर म्हणजे ‘श्यामची आई’

गुरुजी, श्यामच्या आईबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं हा प्रश्न माझ्यासमोर आहे. आजही आपण पाहिलं तर लक्षात येईल की, दर शंभरा मुलांपैकी 80-85 मुला-मुलींना पहिलं पुस्तक ‘श्यामची आई’चं वाचलं असेल, अशी मला खात्री आहे. संस्कारचं विद्यापीठ म्हणून उगाच मराठी साहित्यकारांनी या पुस्तकाचा गौरव केला नाही. अनेकजण अनेकदा आपपाल्या पुस्तकाबद्दल म्हणतात, ‘मी प्रचंड मेहनतीने हे पुस्तक लिहिलं आहे’.. मात्र, तुमच्या पुस्तकाबद्दल नेहमी म्हटलं जातं की, “श्यामची आई हे पुस्तक आसवांनी लिहिलं गेलं आहे. दाटून आलेल्या गळ्यातून आणि दाबून ठेवलेल्या हुंदक्यातून हे महाकाव्य लिहिलं गेलं आहे.” खरंच आहे हे. श्यामची आई वाचत असताना कुठलंही पान उघडलं आणि डोळ्यातून टचकन पाणी नाही आलं, तरच नवल. “कोंड्याचा मांडा करुन shyamchi aaकसा खावा आणि गरिबीतही आपले स्वत्व व सत्त्व न गमविता कसे रहावे, हे माझ्या आईनेच मला शिकवले.” असे म्हणत तुम्ही मातृप्रेमाचं महाकाव्य चितारलंत…‘श्यामची आई’च्या रुपाने. अमृताशी पैजा जिंकण्याचं सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे, हे ज्ञानोबा माऊलींचं म्हणणं ‘श्यामची आई’ वाचल्यानंतर मनोमन पटतं.

गुरुजी, श्यामची आई वाचताना एक प्रश्न राहून राहून पडतो, तो म्हणजे तुम्ही 45 रात्रींपैकी 42 रात्रींच्या गोष्टी सांगितल्यात. मात्र त्या तीन रात्रींमध्ये कोणत्या आठवणी होत्या, हे सांगितलंत नाही. हा प्रश्न कायम माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना पडतो. पण तो प्रश्न फार मोठा ठरत नाही. कारण तुम्ही 42 रात्रीत सांगितलेल्या गोष्टी आमचं आयुष्य घडवण्यासाठी आणि येणाऱ्या कोट्यवधी पिढ्यांना संस्कार शिकवण्यासाठी पुरेशा आहेत. तुमच्याच शब्दात या पुस्तकाचं वर्णन करायचं तर, ह्रदयातील सारा जिव्हाळा तुम्ही यात ओतलेला आहे. आणि हा जिव्हाला आम्हाला आयुष्य जगण्याची दिशा देतो.

गुरुजी तुम्हाला माहित आहे का, हल्ली पुस्तकाच्या मालकीहक्कावरुन किती वाद होतात. कुणाचं पुस्तक कुणी चोरतं तर कुणी थेट कथाच. मग कोर्ट कचेऱ्या वगैरे. पण मला येथे तुमच्या एका प्रसंगाचा आलर्जून उल्लेख करावा लागेल. तुम्हाला आठवतंय, श्यामची आई प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांनी ‘पत्री’ कवितासंग्रहावर इंग्रज सरकारने बंदी आणली. कारण तो संग्रह पुण्याच्या अनाथ विद्यार्थी गृहाच्या मालकीच्या लोकसंग्रह छापखान्याने छापला होता. त्यामुळे तुम्हाला 2 हजार रुपयांचा जामीनही भरावा लागला होता. पण गरीब विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेला फटका सोसावा लागला. याचं तुम्हाला वाईट वाटलं आणि तुम्ही चक्क ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे सर्व हक्क अवघ्या 500 रुपयांमध्ये अनाथ विद्यार्थी गृहाला देऊन टाकले. गुरुजी, तुम्हाला सांगतो, हा मनाचा मोठेपणा आणि असं संवेदनशील मन आता नाही उरले या जगात. आणि असतील तर हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच.

पंढरीच्या पांडुरंगाला बडव्यांच्या तावडीतून मुक्त करणाऱ्या तमच्यासारख्या पांडुरंगाची आजही या समाजाला गरज आहे. शोषित, वंचितांचे प्रश्न आजही तसेच आहे, जसे तुमच्या काळात होते.

तुमच्याबद्दल जेवढं लिहावं, बोलावं तेवढं कमीच… तुम्ही आईचं महात्म्य 42 रात्रीत सहकाऱ्यांना सांगितलंत…पण गुरुजी, तुमच्याबद्दल सांगण्यासाठी 42 जन्म लागतील. ही अतिशोयोक्ती नाही. कारण संस्काराचे जे धडे तुम्ही विद्यार्थ्यांना आणि पर्यायाने येणाऱ्या शेकडो पिढ्यांना दिलेत, ते शब्दांत मांडता किंवा व्यक्त करता न येण्यासारखं आहेत.

तुमचाच,
एक लाडका विद्यार्थी

26 December, 2015

सायकल: एक सोबती

कधी-कधी माणसांसोबत काही निर्जीव गोष्टीही आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान निर्माण करतात. त्यांचं आपल्या आयुष्यातील महत्त्व मोलाचं असतं. किंबहुना अनेकदा आपल्या चढ-उतारात त्यांची मोलाची साथ असते. पण आपण कधीच त्या निर्जीव वस्तूंचे आभार मानत नाही. माझ्याही आयुष्यात अत्यंत महत्त्व असणारी एक गोष्ट म्हणजे- सायकल.

सकाळी पेपरलाईन टाकण्यासाठी पेपरलाईनचा मालक म्हणजेच सुभाष दादा आणि मी, दोघांनी मिळून ही सेकंड हँड सायकल विकत घेतली होती. पार्ल्यातील महिला संघ शाळेजवळील जाफर भाईकडून. सकाळी साडेचारला उठून मला वाऱ्याच्या वेगाने काम करायला या सायकलने शिकवलं. पावसातूनही या सायकलने कधी अर्ध्या रस्त्यात धोका दिला नाही. कधी सायकल पंक्चर झाली तर चालत पेपरलाईन टाकायचो, मात्र एखादा दिवस वगळता कुणा दुसऱ्याची सायकल घेतलेली आठवत नाही.

पेपरलाईनच्या पगारातून मी पहिला कॅमेरा मोबाईल घेतला, अनेक पुस्तकं खरेदी केली. वेळोवेळी वरखर्चाचे पैसेही पेपरलाईनमधून सुटत असत. आणि या साऱ्यामध्ये या सायकलचा मोठा वाटा आहे. वेगात सायकल चालवून पेपर टाकायचो. कारण तिथून कॉलेजला वेळेवर पोहोचावं लागायचं. अनेकदा रिक्षाशी शर्यत लावायचो.. कधीही सायकलने दगा दिला नाही. सायकल कधी स्लिपही झाली नाही.

आम्हा पेपर टाकणाऱ्या मुलांमध्ये 'जाग्यास ब्रेक लागणारी सायकल' म्हणून बऱ्यापैकी प्रचलित होती माझी सायकल.
विशेष म्हणजे सायकलवरुन एकदाही पडलो नाही. मात्र, कुठे सायकल ठोकली किंवा टायर मुद्दामहून कुणी पंक्चर केला तर मग तिला गॅरेजमध्ये न्यावं लागायचं. कामावरुन घरी गेल्यावर, अनेकदा सुभाषला मजेनं म्हणायचो, आज सायकलला डॉक्टरकडे न्यायचं आहे. सायकल म्हणजे नात्यातील वाटायची.

आता दहिसरला राहायला आलोय. सायकल पार्ल्यालाच आहे. पेपरलाईन मालकाकडे. आता कुणी दुसरा मुलगा ही सायकल चालवत असेल... ती निर्जीव सायकल असली, तरी कायम आठवणीत राहील. खरंच माणसांइतकंच कितीतरी निर्जीव गोष्टी आपल्याला नकळतपणे सोबत देत असतात. मदत करत असतात.

आज मोबाईलमधील नको असलेले फोटो डिलिट करताना हा फोटो दिसला आणि सायकलसोबतच्या आठवणींना उजाळा मिळाला. साला हे फोटो पण किती किती आठवणी, क्षण बंदिस्त करुन ठेवतात नै?

22 December, 2015

शिवी

हजार शब्दांच्या बरोबरीचं एक चित्र असतं, असं कायम म्हटलं जातं. शिव्यांबाबतही माझं तेच निरीक्षण आहे. एखाद्याविरोधातला राग एखादा टीकात्मक लेख लिहून व्यक्त होऊ शकत नाही, तेवढा राग 'च्युत्या साला' या दोन शब्दात व्यक्त होऊ शकतो, असं माझं मत आहे. शिव्यांची किमयाच न्यारी राव!

परवाचीच गोष्ट: एक मित्र म्हणाला, "तो मूर्ख आहे. नालायक कुठला. मला फसवलं त्याने. त्याचं भलं नाही होणार." हे सारं बोलत असताना माझा मित्र दात चावत होता.. बहुधा खूप राग वगैरे आला असेल. मी त्याला म्हटलं, "ज्याच्यावर राग आहे ना त्याला मनातल्या मनात तुला माहित असलेल्या उच्च दर्जाच्या शिव्या हासड. बघ तुला थोडं बरं वाटेल." लेकाच्याने पटकन तसं केलं. थोडा चेहरा फुलला गड्याचा. म्हटलं ना शिव्यांची किमयाच न्यारी!

बोली भाषा बारा पावलांवर बदलते, असं म्हणतात.. तशा शिव्याही. दर वीस-पंचवीस गावं ओलांडली की नव-नव्या शिव्या ऐकायला मिळतात. बरं..काही शिव्यांना स्वत:ची अशी लय आहे. 'काय रे भाड्या' म्हणताना एक सूर लागतो... तसंच 'भुसनळ्या' म्हणतानाही.

काही शिव्यांनी तर दैनंदिन व्यवहारात शिरकाव केलाय. म्हणजे बघाना ओळखीतला एकजण दर दोन वाक्यांनंतर म्हणतो, 'रांडच्यांनो...' आता त्याला 'रांडच्यांनो' ही शब्द काही शब्दश: वापरायचा नसतो. पण त्याने बोलण्यात ते एवढं घुसवलंय की त्याची सवय बनलीय. म्हणजे काही सांगायचं असल्यास वाक्याची सुरुवातच अशी, "रांडच्यांनो काय सांगू तुम्हाला.. तो गण्या आहे ना.." असं. मागे एकदा एकजण भेटला होता. तो त्याच्या बोलण्यात सारखं 'भेंडी' शब्द वापरत असे. म्हणजे, "भेंडी पैसे असते ना तर बाईक घेतली असती. पण भेंडी पैसेच नाहीत ना तेवढे. नशीबच खराब भेंडी"

या पृथ्वीवर जिथे-जिथे माणूस नावाचा प्राणी वसला आहे, तिथे-तिथे शिवी आहेच. शिवीविना संवादास काय अर्थ, असं म्हटलं तरी वावगं ठरु नये, एवढं महत्त्वं शिवीप्रती माणसांसाठी आहे. काहीजण 'इडियट' किंवा 'नाॅनसेन्स' म्हणत शिवीला स्टँडर्ड लेव्हलवर नेत असतील. पण शिवी देणारच.

शिव्यांचं समर्थन करत नाही मी.. किंवा आजपासून शिव्या द्यायला सुरुवात करा, असेही मला सांगायचं नाहीय... पण शिवीचं थोडं महत्त्वं सांगण्याचा हा प्रयत्न.

15 December, 2015

योद्धा शेतकरी

हा तो काळ आहे जेव्हा भारतातील शेतकरी अंधारात चाचपडत होता. नैसर्गिक संकटांनी शेतकरी पुरता त्रासलेला होता. सुलतानी संकटं टाळता येत नव्हती. त्यात भरीस भर म्हणजे ज्यांनी मदतीला धावून यायचं, त्या माय-बाप सरकारने तर अक्षरशथट्टा सुरु केली होती. सरकारविरोधात लढण्याची ताकदही शेतकऱ्यांमध्ये नव्हती आणि अशाच महासंकटाच्या काळात शेतीच्या क्षितिजावरुन सरकारच्या निष्ठूर धोरणांविरुद्ध शरद जोशी नावाचं एक वादळ घोंघावलं...

शेतकरी तितका एक एक

शरद जोशींनी शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. शेतकऱ्यांच्या मनात स्वभिमानाने जगण्याचं बीजारोपण केलं. ताठ मानेनं आणि मूठ आवळून घामाच्या दामासाठी लढा देण्याचा मंत्र दिला. शेतकऱ्यांच्या मनातील सत्ताधाऱ्यांची भीती कायमची घालवली. शेतीला अर्थशास्त्रीय बैठक निर्माण करुन दिली. शेतकरी तितका एक एक’ हा नारा देऊन शरद जोशींनी शेतकऱ्यांना जातधर्म,प्रांतभाषा हे भेद विसरुन जगायला आणि लढायला शिकवलं.

स्वित्झर्लंड ते शेतकरी...

स्वित्झर्लंडमधील संयुक्‍त राष्ट्रसंघातील गलेलठ्ठ नोकरी सोडून देशातील गरिबीच्या समस्येच मूळ जाणून घेण्यासाठी शरद जोशी नावाच्या या उमद्या माणसानं थेट नांगर हाती घेतला आणि शेती करू लागला. पुण्याजवळ चाकण तालुक्‍यातील आंबेठाण येथे 28एकर कोरडवाहू जमीन खरेदी करून वयाच्या चाळिशीनंतर श्रमदान सुरू केले. उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने शेती तोट्यात गेल्याचे समजल्यानंतर जोशींमधील शेतकऱ्याने बंड केलआणि 1979 साली शेतकरी संघटनेची स्थापना केली.

यापुढे शेतकऱ्यांना गृहीत धरता येणार नाहीत

शेतकरी संघटनेचा उदय होण्यापूर्वी म्हणजे ऐंशीच्या दशकाच्य सुरुवातील शेतकऱ्यांच्या समस्या हा केवळ निवडणुकीचा मुद्दा बनला होता. शेतकऱ्यांचे क्रूर शोषण, अन्याय वगैरे मोठमोठाले शब्द वापरत मतांची भीक मागितली जायची. मात्र, ऐशींच्या दशकात शरद जोशी नामक वादळ आलं. ते असंकाही घोंघावत आलं की ज्याने कुणी शेतकऱ्यांची थट्टा चालवली होती, तो हर एक जण अगदी खडबडून झागा झाला. कारण शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होण्याचे ते संकेत होते. शेतकऱ्यांना यापुढे गृहीत धरता येणार नाही, असं शरद जोशींनी ठणकावून सांगितलं.

ऐशींच्या दशकात आंदोलनांना सुरुवात

शरद जोशींनी शेतीचा अर्थशास्त्राच्या नजरेतून अभ्यास करुन शेतीला वैचारिक बैठक मिळवून दिली. भारतात शेती तोट्यात असण्याचं कारण उत्पादनखर्चावर आधारित रास्त दर शेतमालाला मिळत नाही हे आहेअसं त्यांनी शेतीच्या सर्वांगीण अभ्यासाअंती मांडलं. याच अभ्यासाच्या जोरावर आणि वैचारिक बैठकीच्या जोरावर त्यांनी ऐशींच्या दशकात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष करण्याचं ठरवलं आणि त्यातूनच 1978 साली चाकणचं प्रायोगिक कांदा आंदोलन आणि त्यानंतर 1980 साली कांदा व ऊस-उत्पादक शेतकऱ्यांचं संयुक्त आंदोलन त्यांनी उभारलं. कांदा, ऊसाच्या आंदोलनसोबत त्यांनी सहकारी साखर कारखान्यांच्या खासगीकरणाला विरोध केला.

...म्हणून कांदा-ऊसाच्या आंदोलनानं सुरुवात

शेतकरी संघटनेच्या सुरुवातीला शरद जोशींनी कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतले. मात्र, यावेळी त्यांच्यावर चौफेर टीका झाली. शरद जोशी हे बड्या बागायतदारांचे प्रतिनिधी आहेत, अशी त्यांच्यावर टीका होऊ लागली. मात्र, या टीकेवर शरद जोशींनी एका मुलाखतीदरम्यान छान स्पष्टीकरण दिलं आहे. शरद जोशी म्हणतातमाझ्या दृष्टीने कांदा इथल्या राजकीय संवेदनेशी जोडला गेला आहे, तर ऊस आर्थिक लवचिकतेशी निगडित असलेलं पीक आहे. म्हणजे असं कीदेशातील एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रात सुमारे 40 टक्के कांदा होतो. त्यामुळे त्या प्रश्नाला हात घातला तर देशाच्या नाड्या आवळता येऊ शकतातहे माझ्या लक्षात आलं होतं. त्यामुळे मी प्रथम या दोन पिकांच्या आंदोलनाला हात घातला.

त्यानंतर त्यांनी बँकांच्या कर्जवसुलीविरोधातही शरद जोशींनी एल्गार पुकारला. अमानूषपणे कर्जवसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात शरद जोशींनी गावबंदी जाहीर केली. जोशींनी प्रसंगी तुरुंगाची हवा खाल्ली, मात्र सक्तीची कर्जवसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आवाज बुलंद केला आणि लढा पूर्णत्वास नेला.

कर्जाचे दस्ताऐवज हिंदी महासागरात बुडवा

कर्जाच्या जोखडातून शेतकर्‍यांना मुक्ती मिळायलाच हवी, ही मागणी शरद जोशींनी कायम ठेवली. कर्जमाफीने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, त्यामुळे कर्जमुक्तीला पर्याय नाहीअसा विचार शरद जोशींनी मांडला. शेतकऱ्यांनी कर्जाचे सर्व दस्ताऐवज हिंदी महासागरात नेऊन बुडवावं, शरद जोशींच्या या विधानानंतर त्यांच्यावर सर्वपक्षीय अक्षरशतुटून पडले. अशाने देशाची अर्थव्यवस्था कोसळेल, शरद जोशी देशातील बँका बुडविण्याची सुपारी घेतली आहे, या बामणाला शेतीतलं काय कळतंयाच्या नादी लागू नका, अशा चौफेर टीका शरद जोशींवर करण्यात आल्या. मात्र, तरीही शरद जोशी कर्जमुक्तीच्या विचारावर ठाम राहिले. उलट कर्जमुक्तीचा लढा आणखी तीव्र केला. आता तर आधी शरद जोशींवर टीका करणारे पक्षच शरद जोशींची कर्जमुक्तीची भाषा बोलताना दिसत आहेत. त्यामुळे हाही शरद जोशींचा विजय मानायला हवा.


भारत विरुद्ध इंडिया

शेतीमालाला उत्पादन खर्चाइतकाही दर मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शिवाय, औद्योगीकरणासाठी,शहरीकरणासाठी शेतकऱ्यांची लूट केली जात आहेअशी सुस्पष्ट मांडणी सर्वात आधी शरद जोशी यांनी केली. त्यातूनच त्यांनी भारत विरुद्ध इंडिया’ अशी मांडणी केली. वसाहतवादाचा वारसा सुरू ठेवणारे शहरी अभिजन म्हणजे इंडिया, असं शरद जोशींनी मांडलं. 

शेतकरी आळशी, उधळ्या नाही

काही दिवसांपूर्वी ज्याप्रकारे भारताच्या कृषिमंत्र्यांनी शेतकरी आळशी असल्याने आत्महत्या करतात, असे विधान केलं. त्याचप्रकारे ऐंशी-नव्वदच्या दशकात शेतकरी आळशी, उधळ्या वगैरे आहे, असा समज पसरवला जात होता. मात्र, शरद जोशींनी हा समज खोटा ठरवला. शेतकऱ्यांबाबतच्या या नकारात्मक प्रतिमेचा तीव्र विरोध करत त्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली. शेती फायद्याची नाही आणि कधीच नव्हती. शेतीतून उत्पादन खर्चही भरुन निघत नाही. त्यात सरकार शेतमालाला अत्यल्प भाव देतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुर्दशेला सरकारचं धोरणच जबाबदार आहेत.”, असं शरद जोशींनी ठामपणे सांगितलं. शरद जोशींनी शेतकऱ्यांप्रती मांडलेली वैचारिक बैठ, आजतागायत कुणालाही खोडून काढता आली नाही.

शरद जोशींनी महिलांचे प्रश्नही उचलून धरले. शेतकरी महिला आघाडीची स्थापना करत शरद जोशीं चांदवडमधील शेतकरी महिला अधिवेशनात महिलांच्या संपत्ती अधिकारांची फेरमांडणी केली. या अधिवेशनाला सुमारे दोन लाख महिला उपस्थित होत्या.जमिनीच्या सातबाऱ्यावर महिलांची नाव नोंदवण्याचं शरद जोशींनी आवाहन केलं आणि त्यांच्या आवाहनाला लाखो घरांतून प्रतिसाद मिळाला. दारुबंदी असो, वा महिलांच्या राजकीय सहभागासाठी प्रयत्न असो, शरद जोशींनी नेहमीच पुढाकार घेतला.

चराचरांत वास करणारी गुरुदेवशक्ती आणि कोटी कोटी शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांना वंदन करून...”' कोणत्याही भाषणाचीअशीच सुरुवात करण्याची प्रथा 1980 च्या दशकात महाराष्ट्रातीलजिल्ह्यांमध्ये होती. यावरुनच शेतकऱ्यांमध्ये शरद जोशींप्रती असलेला आदर आणि निष्ठा लक्षात येते.     

सप्टेंबर 1935 रोजी साताऱ्यात जन्मलेल्या हा योद्धा शेतकरी वयाच्या 81 व्या वर्षी 12 डिसेंबर 2015 रोजी तमाम शेतकऱ्यांना पोरका करुन निघून गेला. शेतीला अर्थशास्त्रीय बैठक देऊन लढा पुकारणारा हा सूर्य अखेर मावळला. मात्र, भारतासह जगभरात जेव्हा कधी शेतकऱ्यांच्या लढ्याचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा या लढवय्या शेतकऱ्याचा उल्लेख ठळक अक्षरात केला जाईल.

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...