हा तो काळ आहे जेव्हा भारतातील
शेतकरी अंधारात चाचपडत होता. नैसर्गिक संकटांनी शेतकरी पुरता त्रासलेला होता.
सुलतानी संकटं टाळता येत नव्हती. त्यात भरीस भर म्हणजे ज्यांनी मदतीला धावून यायचं, त्या माय-बाप सरकारने तर अक्षरश: थट्टा सुरु केली होती. सरकारविरोधात लढण्याची ताकदही शेतकऱ्यांमध्ये नव्हती
आणि अशाच महासंकटाच्या काळात शेतीच्या क्षितिजावरुन सरकारच्या निष्ठूर
धोरणांविरुद्ध शरद जोशी नावाचं एक वादळ घोंघावलं...
‘शेतकरी तितका एक
एक’
शरद जोशींनी शेतकऱ्यांना
सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. शेतकऱ्यांच्या मनात स्वभिमानाने जगण्याचं
बीजारोपण केलं. ताठ मानेनं आणि मूठ आवळून घामाच्या दामासाठी लढा देण्याचा मंत्र
दिला. शेतकऱ्यांच्या मनातील सत्ताधाऱ्यांची भीती कायमची घालवली. शेतीला अर्थशास्त्रीय बैठक निर्माण करुन दिली. ‘शेतकरी तितका एक
एक’ हा नारा देऊन शरद जोशींनी शेतकऱ्यांना जात, धर्म,प्रांत, भाषा हे भेद विसरुन जगायला आणि लढायला शिकवलं.
स्वित्झर्लंड ते शेतकरी...
स्वित्झर्लंडमधील संयुक्त राष्ट्रसंघातील गलेलठ्ठ नोकरी सोडून देशातील गरिबीच्या समस्येचं मूळ जाणून घेण्यासाठी शरद जोशी नावाच्या या उमद्या माणसानं थेट नांगरच हाती घेतला आणि शेती करू लागला. पुण्याजवळ चाकण तालुक्यातील आंबेठाण येथे 28एकर कोरडवाहू जमीन खरेदी करून वयाच्या चाळिशीनंतर
श्रमदान सुरू केले. उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने शेती तोट्यात
गेल्याचे समजल्यानंतर जोशींमधील शेतकऱ्याने बंड केलाआणि 1979 साली शेतकरी
संघटनेची स्थापना केली.
“यापुढे शेतकऱ्यांना गृहीत धरता येणार नाहीत”
शेतकरी संघटनेचा उदय होण्यापूर्वी म्हणजे ऐंशीच्या दशकाच्य सुरुवातील
शेतकऱ्यांच्या समस्या हा केवळ निवडणुकीचा मुद्दा बनला होता. शेतकऱ्यांचे क्रूर
शोषण, अन्याय वगैरे मोठमोठाले शब्द वापरत
मतांची भीक मागितली जायची. मात्र, ऐशींच्या दशकात शरद जोशी
नामक वादळ आलं. ते असंकाही घोंघावत आलं की ज्याने कुणी शेतकऱ्यांची थट्टा चालवली
होती, तो हर एक जण अगदी खडबडून झागा झाला. कारण शेतकऱ्यांचा
आवाज बुलंद होण्याचे ते संकेत होते. शेतकऱ्यांना यापुढे गृहीत धरता येणार नाही,
असं शरद जोशींनी ठणकावून सांगितलं.
ऐशींच्या दशकात आंदोलनांना सुरुवात
शरद जोशींनी शेतीचा अर्थशास्त्राच्या नजरेतून अभ्यास करुन शेतीला वैचारिक बैठक
मिळवून दिली. भारतात शेती तोट्यात असण्याचं कारण उत्पादनखर्चावर आधारित रास्त दर
शेतमालाला मिळत नाही हे आहे, असं
त्यांनी शेतीच्या सर्वांगीण अभ्यासाअंती मांडलं. याच अभ्यासाच्या जोरावर आणि
वैचारिक बैठकीच्या जोरावर त्यांनी ऐशींच्या दशकात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष
करण्याचं ठरवलं आणि त्यातूनच 1978 साली चाकणचं प्रायोगिक कांदा आंदोलन आणि
त्यानंतर 1980 साली कांदा व ऊस-उत्पादक शेतकऱ्यांचं संयुक्त आंदोलन त्यांनी
उभारलं. कांदा, ऊसाच्या आंदोलनसोबत त्यांनी सहकारी साखर
कारखान्यांच्या खासगीकरणाला विरोध केला.
...म्हणून कांदा-ऊसाच्या आंदोलनानं सुरुवात
शेतकरी संघटनेच्या सुरुवातीला शरद जोशींनी कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे
प्रश्न हाती घेतले. मात्र, यावेळी त्यांच्यावर चौफेर टीका झाली.
शरद जोशी हे बड्या बागायतदारांचे प्रतिनिधी आहेत, अशी
त्यांच्यावर टीका होऊ लागली. मात्र, या टीकेवर शरद जोशींनी
एका मुलाखतीदरम्यान छान स्पष्टीकरण दिलं आहे. शरद जोशी म्हणतात, “माझ्या दृष्टीने कांदा इथल्या राजकीय संवेदनेशी जोडला गेला आहे, तर ऊस आर्थिक लवचिकतेशी निगडित असलेलं पीक आहे. म्हणजे असं की, देशातील एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रात सुमारे 40 टक्के कांदा होतो.
त्यामुळे त्या प्रश्नाला हात घातला तर देशाच्या नाड्या आवळता येऊ शकतात, हे माझ्या लक्षात आलं होतं. त्यामुळे मी प्रथम या दोन पिकांच्या आंदोलनाला
हात घातला.”
त्यानंतर त्यांनी बँकांच्या कर्जवसुलीविरोधातही शरद जोशींनी एल्गार पुकारला.
अमानूषपणे कर्जवसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात शरद जोशींनी ‘गावबंदी’ जाहीर केली. जोशींनी प्रसंगी तुरुंगाची हवा खाल्ली,
मात्र सक्तीची कर्जवसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आवाज बुलंद
केला आणि लढा पूर्णत्वास नेला.
“कर्जाचे दस्ताऐवज हिंदी महासागरात
बुडवा”
कर्जाच्या जोखडातून शेतकर्यांना
मुक्ती मिळायलाच हवी, ही मागणी शरद जोशींनी कायम ठेवली.
कर्जमाफीने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, त्यामुळे
कर्जमुक्तीला पर्याय नाही, असा विचार शरद जोशींनी
मांडला. शेतकऱ्यांनी कर्जाचे सर्व दस्ताऐवज हिंदी महासागरात नेऊन बुडवावं, शरद जोशींच्या या विधानानंतर त्यांच्यावर सर्वपक्षीय अक्षरश: तुटून पडले. अशाने देशाची अर्थव्यवस्था
कोसळेल, शरद जोशी देशातील बँका बुडविण्याची सुपारी घेतली आहे,
या बामणाला शेतीतलं काय कळतं? याच्या
नादी लागू नका, अशा चौफेर टीका शरद जोशींवर करण्यात आल्या.
मात्र, तरीही शरद जोशी कर्जमुक्तीच्या विचारावर ठाम राहिले.
उलट कर्जमुक्तीचा लढा आणखी तीव्र केला. आता तर आधी शरद जोशींवर टीका करणारे पक्षच
शरद जोशींची कर्जमुक्तीची भाषा बोलताना दिसत आहेत. त्यामुळे हाही शरद जोशींचा विजय
मानायला हवा.
भारत विरुद्ध इंडिया
शेतीमालाला उत्पादन खर्चाइतकाही
दर मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शिवाय, औद्योगीकरणासाठी,शहरीकरणासाठी शेतकऱ्यांची लूट केली जात आहे, अशी सुस्पष्ट मांडणी सर्वात आधी शरद जोशी यांनी केली. त्यातूनच त्यांनी ‘भारत विरुद्ध
इंडिया’ अशी मांडणी केली.
वसाहतवादाचा वारसा सुरू ठेवणारे शहरी अभिजन म्हणजे इंडिया, असं शरद जोशींनी मांडलं.
“शेतकरी आळशी, उधळ्या
नाही”
काही दिवसांपूर्वी ज्याप्रकारे
भारताच्या कृषिमंत्र्यांनी शेतकरी आळशी असल्याने आत्महत्या करतात, असे विधान केलं. त्याचप्रकारे ऐंशी-नव्वदच्या दशकात शेतकरी
आळशी, उधळ्या वगैरे आहे, असा समज
पसरवला जात होता. मात्र, शरद जोशींनी हा समज खोटा ठरवला.
शेतकऱ्यांबाबतच्या या नकारात्मक प्रतिमेचा तीव्र विरोध करत त्यांनी शेतकऱ्यांची
बाजू मांडली. “शेती फायद्याची नाही आणि कधीच नव्हती. शेतीतून
उत्पादन खर्चही भरुन निघत नाही. त्यात सरकार शेतमालाला अत्यल्प भाव देतं. त्यामुळे
शेतकऱ्यांच्या दुर्दशेला सरकारचं धोरणच जबाबदार आहेत.”, असं शरद
जोशींनी ठामपणे सांगितलं. शरद जोशींनी शेतकऱ्यांप्रती मांडलेली वैचारिक बैठ,
आजतागायत कुणालाही खोडून काढता आली नाही.
शरद जोशींनी महिलांचे प्रश्नही
उचलून धरले. शेतकरी महिला आघाडीची स्थापना करत शरद जोशीं चांदवडमधील शेतकरी महिला
अधिवेशनात महिलांच्या संपत्ती अधिकारांची फेरमांडणी केली. या अधिवेशनाला सुमारे
दोन लाख महिला उपस्थित होत्या.जमिनीच्या सातबाऱ्यावर महिलांची नाव नोंदवण्याचं शरद
जोशींनी आवाहन केलं आणि त्यांच्या आवाहनाला लाखो घरांतून प्रतिसाद मिळाला.
दारुबंदी असो, वा महिलांच्या राजकीय सहभागासाठी
प्रयत्न असो, शरद जोशींनी नेहमीच पुढाकार घेतला.
“चराचरांत वास
करणारी गुरुदेवशक्ती आणि कोटी कोटी शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांना वंदन
करून...”' कोणत्याही भाषणाचीअशीच सुरुवात करण्याची प्रथा 1980 च्या दशकात महाराष्ट्रातीलजिल्ह्यांमध्ये होती. यावरुनच शेतकऱ्यांमध्ये शरद जोशींप्रती असलेला आदर आणि निष्ठा लक्षात येते.
3 सप्टेंबर 1935 रोजी साताऱ्यात जन्मलेल्या हा योद्धा शेतकरी वयाच्या 81 व्या
वर्षी 12 डिसेंबर 2015 रोजी तमाम शेतकऱ्यांना पोरका करुन निघून गेला. शेतीला
अर्थशास्त्रीय बैठक देऊन लढा पुकारणारा हा सूर्य अखेर मावळला. मात्र, भारतासह जगभरात जेव्हा कधी शेतकऱ्यांच्या लढ्याचा इतिहास
लिहिला जाईल, तेव्हा या लढवय्या शेतकऱ्याचा उल्लेख ठळक
अक्षरात केला जाईल.
No comments:
Post a Comment