24 April, 2018

वाचनप्रवास


काही महिन्यांपूर्वीचा फोटो आहे हा. आता आणखी एक थर वर बांधला आहे. मी फार निवडक पुस्तकं खरेदी केली आहेत. कथा, लोककथा, प्रवासवर्णन, कादंबरी, कवितासंग्रह, वैचारिक लेखसंग्रह, आत्मचरित्र इ. पुस्तकांनी भरलेला असा हा माझा किताबखाना आहे.

कुणाला नाटक पाहायला आवडतं, कुणाला सिनेमा, कुणाला मुशाफिरी, तर कुणाला आणखी काही. पोटा-पाण्याच्या धबाडग्यातून बाहेर पडून, आवडत्या गोष्टीत मन रमवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तसाच माझाही. मला पुस्तकं वाचायला आवडतात. खूप खूप आवडतात. इतकं इतकं वाचायला आवडतं, की मॅक्झिम गॉर्कीची भलीमोठी ‘आई’ कादंबरी एका बैठकीत संपवलीय.

दहावीपर्यंत पाठ्यपुस्तकांपलिकडे ‘श्यामची आई’ वगळता फार काही वाचले नव्हते. तसेही गावी कथा-कादंबऱ्यांसारखी पुस्तके नसायची. आमच्या शाळेलाही लायब्ररी वगैरे नव्हती. आताही एका कपाटाची आहे. त्यामुळे अभ्यासापलिकडे वाचन व्हायचं नाही.

अकरावीपासून पुढील शिक्षणासाठी मुंबईत आलो आणि अर्थात पावलं कॉलेजच्या लायब्ररीकडे वळली. म. ल. डहाणूकर कॉलेजला असतानाही फार अवांतर वाचन झालं नाही. एकतर पार्ट टाईम जॉब, त्यात इंग्रजीतून सर्व विषय आणि नाट्य मंडळात जाणारा वेळ. या साऱ्या गोष्टींमुळे तिथेही वाचनाकडे फार वळलो नाही.

पुढे पत्रकारितेसाठी साठ्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. इथे खऱ्या अर्थाने वाचनाला सुरुवात झाली. गोडी लागली. वर्षानुवर्षांचा अनुशेष भरुन काढावा अशा पद्धतीने वाचायला सुरुवात केली.

साठ्ये कॉलेजची लायब्ररीत हजारोंच्या पटीत पुस्तके आहेत. थेट लायब्ररीत जाऊन, हवे ते पुस्तक निवडून, घरी घेऊन जाऊन वाचण्याची मुभा होती. लायब्ररीचे सर्व काका तसे होते म्हणा. शिवाय इथे लाभलेले सर्व शिक्षकही वाचनाच्या आवडीला पुरक ठरले.

वादविवाद, वक्तृत्त्व, कथाकथन इ. स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागलो आणि त्यामुळे वाचनाला आणखी प्रोत्साहन मिळालं.

डॉ. कुंदा प्रमिळा निळकंठ, प्रा. गिरीजा गुप्ते, प्रा. गजेंद्र देवडा, प्रा. समीर जाधव यांच्यासारख्या शिक्षकांमुळे वाचनात आणखी भर घालत गेलो.

कुंदा मॅडमच्या घरात तर स्वत:ची लायब्ररी आहे. तिथे जाऊन वाचता यायचं. शिवाय कुंदा मॅडमनी सूचवलेले प्रत्येक पुस्तक बौद्धिक खुराक असायचा. आजही असतो. गिरीजा गुप्ते मॅडमने सूचवलेली अनेक पुस्तके वाचली. देवडा सरांनाही वाचनाची प्रचंड आवड आहे. वादविवाद स्पर्धांच्या निमित्ताने विविध विषयांवर समीर सरांनी पुस्तके सूचवलेली. प्रा. केतन भोसले सरांशीही विविध विषयांवर कॉलेजच्या पॅसेजमध्येच उभे राहून चर्चा करायचो. वर्ल्ड इज फ्लॅटसारखं पुस्तक केतन सरांनी सूचवलं होतं. एकंदरीत शिक्षक मंडळीच वाचनाला प्रोत्साहन देणारी ठरली.

वाचनाची ही भूक प्रचंड वाढत गेली. साठ्ये कॉलेजची लायब्ररी, पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघ, गोरेगावमधील केशव गोऱ्हे स्मारक ट्रस्टची लायब्ररी अशा तीन लायब्ररींनी वाचनाची भूक खूप भागवली. त्यांनतर पुस्तके विकत घेण्यासाठी पार्ल्यातील मॅजेस्टिक डेपो, दादरमधील साहित्य अकादमी, भूपेश गुप्ता भवन हे गाठायचो. केशव गोऱ्हे स्मारक आणि दादरचे संदर्भ ग्रंथालय इथे दिवस दिवस बसून वाचल्याचे प्रसंग आहेत.

नंतर एबीपी माझामध्ये कामाला लागलो आणि पार्ला किंवा दादरकडे जाणे कमी झाले. त्यात पार्ल्यातून मी दाहिसरला राहायला गेलो. ट्रेन कनेक्टिव्हिटीमुळे मुंबईत तसे काही जवळ-दूर हा प्रकार नसला तरी ट्रेनमधील गर्दीचा विचार करता दूरच गेलो म्हणायला हवे. पर्यायाने दादरला जाऊन पुस्तके खरेदी करणे कमी झाले. पण याची कमतरता बोरिवलीमधील येशू पाटील सरांच्या ‘शब्द’ गॅलरीने भरुन काढली.

पुस्तकांसोबतच वाचनाची इतर माध्यमंही हाताळत असतो. चित्रलेखा, लोकप्रभा, साधना, इंडिया टुडे (हिंदी), डाऊन टू अर्थ यांसारखी मासिकं, सप्तरंग (सकाळ), लोकरंग (लोकसत्ता), संवाद (मटा), मंथन (लोकमत), लिटररी रिव्ह्यू (द हिंदू) यांसारखे वृत्तपत्रीय लेखन, राईट अँगल, एक रेघ, बिगुल, अक्षरनामा यांसारखी ऑनलाईन पोर्टल, कविता-शेरो-शायरी वाचनासाठी रेख्ता, आठवणीतली गाणी, कविताकोश या वेबसाईट्स, दिवाळी अंक, विशेषांक इत्यादी गोष्टी वाचनाची भूक भागवण्यास मोठी मदत करतात. याआधी युवराज मोहिते सरांचं ‘कलमनामा’ आणि शिरीष पारकरांचं ‘महाराष्ट्र माझा’ सुद्धा वाचायचो. आता बंद झालंय. पण बहुतांश अंक आजही संग्रहित आहेत.

आणखी एक गोष्ट म्हणजे काही खास पुस्तकेही माझ्या संग्रही आहेत. खास म्हणजे, प्रा. प्रवीण बांदेकर, डॉ. कुंदा मॅडम, सतीश काळसेकर, कोंकणी लेखक दामोदर मावजो इत्यादींनी स्वत:च्या स्वाक्षरीनिशी भेट दिलेली पुस्तके माझ्या किताबखान्यात आहेत. एकंदरीत पुस्तकांबाबत फारच सुखी माणूस आहे मी.

पुस्तकंच वाचतो म्हणून अनेकजण टोमणे मारतात, काहीजण विविध विषयांचे रेफरन्स मागतात, काहीजण पुस्तकं सूचव म्हणतात, काहीजण पुस्तकेच वाचण्यासाठी मागतात वगैरे वगैरे. मात्र या साऱ्या गोष्टी सांभाळत मी माझे वाचन नियमित सुरुच ठेवतो. कारण केवळ बौद्धिक भूक भागवणे हे या वाचनामागचा माझा हेतू नाही, तर वाचन माझी आवड आहे. मला त्यातून आनंद मिळतो. नवनव्या गोष्टी कळतात. विविध गोष्टींचे कुतुहल वाढवतात. आपल्याला अनेक गोष्टी माहित असाव्यात, या कुतुहलापोटी वाचनाचा प्रवास सुरु झाला होता, तो आता सवयीपर्यंत येऊन ठेपला आहे.

पुस्तक दिनाचं निमित्त साधत हे लिहिलं आहे. चार-पाच ओळीत काहीतरी लिहीन म्हटलं आणि हे असं लांबलचक झालं. तरी वाचनाच्या या प्रवासातील अनेक रंजक किस्सेही आहेत. ते लिहियाला घेतले तर आणखी लांबलचक होईल. म्हणून इथेच थांबतो. पण पुस्तकांचाच विषय आहे म्हणून नागराज मंजुळेंच्या पुस्तकावरील एका कवितेने समारोप करतो. मला ही कविता फार आवडते.
मी एकाकी आहे
आणि या निर्घृण जगात
एकट्या-दुकट्या माणसानं
स्वरक्षणार्थ काही बाळगावं
म्हणून पुस्तक बाळगतो
मी कुठेही असो
पुस्तक सोबत असतंच
मी ते वाचत नसलो
तरी पडून असतो
छातीवर घेऊन प्रेयसीसारखं
वेळीअवेळी
मला एकटा पाहून
धावून येणाऱ्या ओसाडावर
मी पुस्तकच परजतो... तलवारीसारखं.

12 April, 2018

भोवताल टिपणारी मैत्रीण



लिहीन लिहीन म्हणता राहून जात होते. आणि साहित्यिक, सामाजिक किंवा राजकीय विषयांवर लिहिणे वेगळे. ते जमते. मात्र कुठल्या कलेवर लिहायचे म्हटल्यास, थोडे दडपण येते. कारण थोडे आवक्याबाहेरचे वाटते. आपल्या परिघात ते बसेल की नाही, यात शंका असते. तरी प्रतिक्षाच्या चित्रांवर बोलावे वाटते आहे. अगदी मनापासून. या लिहिण्यात परीक्षण नाही, फक्त निरीक्षण आहे.

कला कोणतीही असो, ती सादर करणारी व्यक्ती जर संवेदनशील असेल, तर त्या कलेला उंची प्राप्त होते, असे म्हणतात. याचा अर्थ कलेला भावनेशी जोडले गेले आहे. शब्दशः जिवंत नसली, तरी कलेत जिवंतपणाचे अंश असतात. ती सजीव असते. प्रतिक्षाचे चित्र पाहिल्यावर माझ्या मनात हे आणखी गडद आणि पक्के होते. कारण संवेदनशील तर ती आहेच, पण सोबत संवेदनशील भाव तिच्या चित्रात सुद्धा उतरले आहेत. तिच्या चित्रांचे मोठेपण यातच दडले आहे. तरी आणखी काही पदर तिच्या चित्रांच्या आड आहेत, ते उलगडण्याचा प्रयत्न करतो. कारण तिचा एक एक चित्र हजारो शब्द व्यक्त करतो. त्यामुळे ते नक्कीच या शे-पाचशे शब्दात सांगता येण्यासारखे नाही. तरी धाडस करतोच आहे.

प्रतीक्षा मुळात पत्रकार. व्यवसायाने म्हणेन. कारण आवडीने ती चित्रकार असेल. (असायला हवी.) पत्रकारितेत रोजच्या सुसाट वेगवान बातम्यांनी संवेदना पार बोथट होत जातात. एका क्षणी या साऱ्याचा कंटाळा येतो. नको वाटते हे जग. खून, हाणामाऱ्या, बलात्कार, छळ, चोरी, भ्रष्टाचार इत्यादी बातम्या रोज कानावर पडून कुणी संवेदनशील माणूस त्रस्त होणारच. अस्वस्थ होणारच. तरीही आपल्यातील संवेदनशील भावना, कलात्मकता, सृजनशीलता टिकवून ठेवणे, ही काही कमी हिंमतीची बाब नाही. मोठे बळ लागते अंगात. सुदैवाने प्रतीक्षात ते आहे. आणि चित्रांच्या माध्यमातून ते ती दाखवूनही देते.

तुमचा स्वभाव हा तुमच्या वागण्या-बोलण्यात परावर्तित होत असतो. वर्तनातून दिसत असतो. तसाच तो तुमच्या कृतीतून सुद्धा दिसतो. हेच निकष कलेला लागू पडतात. मग ती कला लेखनाची असो वा चित्राची. विषय कोणताही असो, त्यात तुमच्या स्वभावाचे आणि विचारांचे प्रतिबिंब उमटतेच.

प्रतीक्षा जितकी संवेदनशील आहे, जितकी हळवी आहे, तितकी सडेतोड आहे. तिचे स्वतःचे असे विचार आहेत. प्रत्येक गोष्टीवर तिचे मत असते. भूमिका घेऊन जगणारी आहे. ती भोवताल टिपत असते. कॉलेज संपल्यानंतर तिच्याशी फार बोलणे होत नाही. पण जेव्हा कधी आम्ही बोलतो, तेव्हा तिचे भोवताल टिपणे किती नेमके आहे, हे लक्षात येते. चित्र इतक्या नेमकेपणानं रेखाटण्यामागे तिचा 'भोवताल टिपणे' हाच गुण कामी येत असावा.

समोर ऑब्जेक्ट ठेवून चित्र काढणे वेगळे. अर्थात तेही कमी महत्त्वाचे नाही. पण डोक्यात एक विचार ठेवून चित्र काढणे हे किती कठीण असू शकते! विशेष म्हणजे, आपल्या डोक्यातील विचार चित्राच्या माध्यमातून जसेच्या तसे प्रकट करणे, नक्कीच कठीण बाब असावी. प्रतीक्षाचे चित्र पाहता, तिला ते सहज जमत असावे. किती सहज वाटतात तिचे चित्र. पण तितकेच खोल अर्थाचे.

तिचे स्त्रीविषयक चित्र कायमच माझ्या आवडीचे राहिले आहेत. प्रत्येक चित्रामागे एक प्रसंग आहे, विचार आहे, कल्पना आहे. तिच्याशी बोलताना अनेकदा काही किस्से तिने सांगितले सुद्धा आहेत. तेही खूप इंटरेस्टिंग आहेत. रंगांचा मुक्तहस्ताने वापर करत किती खोल शिरत जाते प्रतीक्षा. तिचा हर एक चित्र याची प्रचिती देत राहतो.

प्रतीक्षाने रेखाटलेली बहुतेक चित्र पहिली आहेत. एखादे प्रदर्शन भरवता येईल, इतकी तर नक्कीच झाली आहेत. तरी ती तिच्या पुरते ठेवते. माहित नाही का ते. पण ती सगळ्यांसमोर यायला हवीत, एवढेच माझ्यासारख्या मित्राला तिच्याकडून अपेक्षा आहे. तिने यावर विचार करावा. म्हणून हा जाहीर लेखनप्रपंच केला आहे.

प्रतिक्षाने रेखाटलेले निवडक चित्र इथे पाहायला मिळतील : https://www.facebook.com/pratiksha.choukekar.5/photos_all

आँधी हमारे बस में नहीं, मगर...



फेसबुक, ब्लॉग यांसारख्या माध्यमांचा प्रभाव सर्वश्रुत आहे. तरी अनेकांना शंका असतेच. त्यामुळेच ते इथल्या लेखनाला दुय्यम समजतात. मला ते पटत नाही. मध्यामात काम करत असताना, एवढे नक्कीच लक्षात आले आहे की सोशल मीडियाचा प्रभाव दखल घेण्याजोगा झाला आहे. कारण महिन्याकाठी किमान चार ते पाच तरी बातम्या सोशल मीडियातून आलेल्या असतात. इन शॉर्ट.. या माध्यमाचा प्रभाव आहेच.

इन जनरल न बोलता स्पेसिफिक माझ्यापुरते बोलून, ते जनरालाईज् करतो. म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते लक्षात येईल.

फेसबुक किंवा ब्लॉगवर लिहिताना मी कुठलेही विधान करताना उथळपणा टाळतो. एखादी पोस्ट लिहिल्यावर त्यातील एखाद्या मुद्द्यावर कुणी प्रश्न विचारला, तरी त्यावर स्पष्टीकरण देण्याची तयारी ठेवतो.

मागे मी रावते, पवार, मनसेवर लिहिलेले ब्लॉग हे कित्येक संदर्भ शोधून, चर्चा करुन लिहिले होते. कारण उद्या कुणी त्यातून आपल्याला खोडून काढू नये किंवा कुणी चूक दाखवली तर त्या मुद्द्याचा प्रतिवाद करता यावा.

माझी हुशारी वगैरे सांगण्याचा हेतू नाही. पण इथे गांभीर्याने लेखन केले जाते, हे कळावे म्हणून वरील उदाहरणे दिली. किंबहुना, मीच नव्हे, असे अनेकजण इथे सिरीयसली लेखन करतात. थोडक्यात या व्यासपीठावर सुद्धा जबाबदार लेखन केले जाते.

असे सारे असताना, सोशल मीडियावर (फेसबुक, ब्लॉग इ.) लिहिणारे वायफळ लिहितात, उथळ असते, त्यावर विश्वास ठेवू नये इत्यादी सरसकट विधाने जबाबदार लोकांनी टाळली पाहिजेत आणि या लेखनाकडे सुद्धा गांभीर्याने पाहिले पाहिजे.

मला या ठिकाणी आशुतोष जावडेकर यांचे एक विधान मुद्दाम नमूद करावे वाटते. ते म्हणतात, "सोशल मीडियातील लेखन म्हणजे साहित्याचे लोकशाहीकरण आहे." मला हे अगदी पटले आहे. इथे प्रत्येकजण व्यक्त होतो. ते चूक की बरोबर हा मुद्दा नंतर येतो. मुक्तपणे व्यक्त होता येणे, हे महत्त्वाचे. कदाचित आम्ही लिहितो ते 'अग्रलेखी' भाषेत नसेल, पण 'थेट' असते, एवढे नक्की.

सरते शेवटी तेच... व्यक्त होण्यासाठी प्रत्येक युगाचे, प्रत्येक पिढीचे एक माध्यम असते. आजच्या युगाचे, पिढीचे माध्यम सोशल मीडिया आहे, असे म्हणूया. ते स्वीकारले पाहिजे. त्यावर टीका करुन लिहिणाऱ्या मंडळींचे खच्चीकरण करु नये.

आणि हो, आमच्या लेखनाचा प्रभाव किती असेल माहित नाही. पण तरीही आम्ही लिहिणार, बोलणार आणि न पटलेल्या गोष्टींना धडका मारणारच. इथे शेवट करताना मला अझहर इनायती यांचा शेर आठवतो, त्यानेच शेवट करतो. या शेरमधून सोशल मीडियावरील लेखनामागची माझी किंवा माझ्यासारख्या अनेकांची भूमिका लक्षात येईल...
ये और बात कि आँधी हमारे बस में नहीं..
मगर चराग़ जलाना तो इख़्तियार में है..

स्टेप अप रिव्हॉल्युशन



कोणतीही चळवळ असो, तिला कलेची साथ मिळाली, तर तिची तीव्रता दसपटीनं वाढते. आणि एखाद्या चळवळीचं माध्यमच कला असेल, तर?.. तर मग चळवळीची उंची नक्कीच दखल घेण्यासारखी असते. याबाबत इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. 2012 साली प्रदर्शित झालेल्या 'स्टेप अप रिव्हॉल्युशन' या हॉलिवूडपटाचा विषयही असाच आहे आणि याच सूत्रावर आधारलेला आहे. मॉब डान्सच्या माध्यमातून आपली राहती वस्ती वाचवण्याचा यशस्वी लढा काही तरुण देतात.. त्यांची ही कहाणी.

आज वीक ऑफ होता, म्हणून यूट्यूबवर सर्च करताना, हा सिनेमा समोर आला. थोडा वेगळा वाटला म्हणून पाहत गेलो आणि खरंच एका मस्त विषयावर बनवलेला सिनेमा पाहता आला. हिंदीत डब केला गेलाय. त्यामुळे भाषेचा अडसर आला नाही. मोजून 99 मिनिटांचा सिनेमा आहे, त्यामुळे कंटाळवाणाही वाटला नाही.

मॉब डान्स हा सिनेमाचा विषय असला तरी त्यातील लव्ह स्टोरी, ड्रामा कमी नाहीय. मात्र त्यावर फार वेळ खर्च केला गेला नाही. विषयाला धरुन सिनेमा पुढे नेला जातो. त्यामुळेच कुठे कंटाळवाणं वाटत नाही.

दक्षिण अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांताच्या समुद्रकिनाऱ्यावर मियामी नावाचे शहर वसले आहे. या शहरात या सिनेमाचं कथानक फिरतं. इथल्या एका हॉटेलमध्ये काही तरुण काम करत असतात. डान्सची आवड असलेले हे तरुण ट्राफिक असो किंवा कुठला कार्यक्रम, तिथे मॉब डान्स करतात आणि व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करतात. त्यातून पैसे कमावणे हा हेतू असतो. सीन नामक तरुण त्यांचा मुख्य असतो.

पुढे सीन आणि त्याचे मित्र ज्या भागात राहतात, त्या म्हणजे मियामी कोस्टवर बिल अँडरसन नामक बिल्डारची नजर पडते आणि तिथे आलिशान हॉटेल बांधण्याची कल्पना त्याला सुचते. अर्थात, यात सीन आणि त्याच्या दोस्तांची राहती वस्ती जाणार असते.

ज्या मॉब डान्सचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करुन पैशासाठी वापर केला जायचा, त्याचाच या बिल अँडरसन विरोधात आवाज उठवण्यासाठी का वापर करु नये, अशी कल्पना सीनची गर्लफ्रेंड एमिली सुचवते. इथे थोडे इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ती म्हणजे, ही एमिली बिल्डर असलेल्या बिल अँडरसनची मुलगी असते. हे जेव्हा सीनच्या ग्रुपला कळते, त्यावेळी अर्थात थोडी वादाची ठिणगी पडते. मात्र तिथूनही थोडी खटापट होऊन पूर्ववत होतं. नंतर वस्तीत हॉटेल बांधण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम आखला जातो, तिथेच सीन आणि त्यांचा ग्रुप मॉब डान्स करुन त्या माध्यमातून आपली भूमिका मांडतात. आणि बिल्डर बिल अँडरसनला झुकायला भाग पाडतात. अशी थोडक्यात या सिनेमाची स्टोरी आहे.

'One step can change your World' अशी सिनेमाची टॅगलाईन आहे. ती किती नेमकी आहे, हे सिनेमा पाहिल्यावर लक्षात येते.

Ryan Guzman (सीन), Kathryn McCormick (एमिली), Peter Gallagher (बिल्डर बिल अँडरसन), Misha Gabriel (सीनचा मित्र) ही महत्त्वाची स्टारकास्ट. यापलिकडेही अनेकांच्या छोट्या-मोठ्या भूमका आहेत. त्याही अर्थात उल्लेखनीयच आहेत. स्कॉट स्पिर याने हा सिनेमा दिग्दर्शित केलाय.



कॅमेरा, एडिटिंग वगैरे गोष्टी कशा आहेत, यावर मी बोलणार नाही. कारण त्यातले मला कळत नाही. पण विषयाचे म्हणाल, तर एक उत्तम विषय आहे. स्टार्ट टू एन्ड कुठेही बोअरिंग वाटत नाही. सिनेमा यूट्यूबवर अव्हॅलेबल आहे. नक्की पाहा.

के. रं. शिरवाडकर नावाचं 'विचारविश्व'



कधी भेट नाही. प्रत्यक्षात कधी पाहिले नाही. दूर दूरचा परिचय सुद्धा नाही. दोन पुस्तकांच्या पलिकडे त्यांची पुस्तकेही वाचली नाहीत. हे नम्रपणे नमूद करतो. तरीही के. रं. शिरवाडकर या लेखकाचे माझ्या वैचारिक जडण-घडणीवर मोठे उपकार आहेत.

कॉलेजमध्ये असताना कुठल्याशा लेक्चरला आमच्या प्राध्यापिका डॉ. कुंदा प्र. नि. यांनी 'आपले विचारविश्व' पुस्तक वाचायला सांगितले होते. तातडीने कॉलेजच्या लायब्ररीतून पुस्तक मिळवलं आणि वाचलं. नंतर ते संदर्भासाठी संग्रही सुद्धा ठेवावे वाटले. म्हणून खरेदी केले.

आतापर्यंत तीनदा तरी हे पुस्तक पूर्ण वाचले असेन आणि शंभरहून अधिक वेळा संदर्भासाठी आवश्यक प्रकरणे नजरेखालून घातली असतील. जगाच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या विचारधारा मोजक्या शब्दात हे पुस्तक वगळल्यास क्वचितच कुठल्या मराठी पुस्तकात असतील. किंबहुना, नाहीच म्हटले तरी चालेल.

वेद उपनिषदांपासून चिनी, इस्लामी, ग्रीक, युरोपियन तत्वज्ञानापर्यंत, मार्क्स, सिग्मंड फ्रॉईड ते अगदी निऑम चॉमस्कीपर्यंत, महानुभाव संप्रदायापासून ते गांधींपर्यंत..आस्तिक-नास्तिक सर्वकाही. अवघ्या जगाचे तत्वज्ञान 'आपले विचारविश्व'मध्ये सामावले आहे.

जीवनाच्या प्रगतीची प्रेरणाशक्ती म्हणजे त्या समाजाच्या विचारांची गुणवत्ता - हे के. रं. शिरवाडकर यांचे विधान किती नेमकेपणाने आजच्या घडीला लागू होते. आणि असेच शतकों-शतके लागू असेल, यात वाद नाही.

ज्या ज्या वेळी माझ्या सोबतच्या माणसांनी माझ्या गंभीर लेखनाची टर उडविली, हसले, त्या त्या वेळी मला के. रं. शिरवाडकरांचे 'आपले विचारविश्व'च्या प्रस्तावनेततील पाहिले वाक्य आठवते आणि लेखन पुढे सुरु ठेवावे वाटते. ते वाक्य म्हणजे - "कुठल्याही गंभीर लेखनाची मुळे आयुष्यातील विविध अनुभवांत खोलवर रुजलेली असतात, मग ते अनुभव बौद्धिक असोत वा व्यवहारिक."

आज झुंडशाही बोकळत असताना केरंचे एक विधान इथे नमूद करावे वाटते. त्यांनी व्यक्त केलेली भीती किती विचार करण्यासारखी आहे, हे कळून चुकते. ते म्हणतात - "सध्याचे दिवस विचारांच्या लोकप्रियतेचे नाहीत. साधारण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मूठभर का होईना, सुजाण जन विचारांची देवाणघेवाण, विचारांचे संघर्ष मोलाचे मानीत. सध्या संस्कृतीतून अशा गोष्टींचे उच्चाटन होऊ लागले आहे; वैचारिकतेचा झपाट्याने संकोच होत आहे, आणि हे धोक्याचे आहे. हे मुक्त विचारांशी शत्रुत्व करणाऱ्या हुकुमशाहीला, झुंडशाहीच्या राज्याला आमंत्रण आहे."

मराठी वाचकांना विचारांची शिदोरी देणारा आणि अवघ्या जगाचे तत्वज्ञान समजावून सांगणारा हा लेखक आपल्यातून निघून गेला, ही मराठी विचारविश्वाची खरंच मोठी हानी आहे.

केरंना त्यांच्या भावाच्या अर्थात कुसुमाग्रजांच्या कवितेतून बोलावेसे वाटते,
अमर्याद मित्रा, तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलीकण
अलंकारण्याला परी पाय तुझे
धुळीचेच आहे मला भूषण !

मराठी वाचकांचे विचारविश्व ज्यांनी अधिक व्यापक केले, समृद्ध केले, त्या के. रं. शिरवाडकर यांना मनापासून आदरांजली.

दु:खाचा महाकवी


वयाच्या पाचव्या वर्षी आईनं सोडून जाणं, वडील सैन्यात आणि हालाखीची परिस्थिती... यातून दिवसागणिक एकटेपणात होत गेलेली वाढ आणि कमालीची गूढ जगण्याची सवय - यातूनच 'ग्रेस' जन्मला.

हाॅलिवूड अभिनेत्रीच्या एका डायलाॅगवरुन माणिकराव सीताराम गोडघाटेचं 'ग्रेस' होणं असो वा उन्हाळा-पावसाळा-हिवाळा कोणताही मोसम असो, सकाळी चार वाजता पोहायला जाण्याची विस्मयचकित करणारी सवय असो किंवा अगदी 'I am free but not available' अशी घरावरील काहीशी गोंधळात टाकणारी पाटी असो... ग्रेस डेन्जरस अनाकलनीय होता.

ग्रेसला आपल्याभोवती गूढतेचं वलय घेऊन जगण्यात आनंद मिळत होता की आणखी काही. ते माहित नाही. पण ग्रेससारख्या बेबंद माणसाने सस्पेन्स जपत का जगावं, ना कधी उमगले - ना कधी उमगणार. शोधूही नका. गुंतत जाल. आरपार.

दु:ख, एकांत, नैराश्य, नकारात्मकता, संध्याकाळ, काळोख, गूढता यांची कमालीची ओढ आणि त्यातच भान हरपून रमून जाण्याची तीव्र इच्छा. काय असावं यामागचं तत्त्वज्ञान? की कुणालाच समजू नये आपल्या अस्तित्त्वाचा अर्थ म्हणून गुंतवून ठेवलं शब्दात त्याने आणि निघून गेला त्याच्या प्राणप्रिय 'संध्याकाळी'?

असो. ग्रेस फक्त अनुभवायचा असतो.

ग्रेसांची आवडती एक कविता :
ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता
ती आई होती म्हणुनी घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

आजच्याच दिवशी 2012 साली कवी ग्रेस हे जग सोडून गेले. दु:खाच्या या महाकवीला विनम्र अभिवादन.

अण्णा रिटर्न



तेव्हा सत्तेत काँग्रेस होती. यूपीएच्या दुसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचार बोकाळला होता. पाणी तोंडापर्यंत आले आणि अण्णा दिल्लीत गेले. त्यांनी उपोषण केले. कावळा बसायला आणि फांदी तुटायला, अशी अण्णांच्या आंदोलनाच्या विजयाची आणि काँग्रेसच्या प्रभावाची गत झालो. अण्णांनी भ्रष्टाचार विरोधी, पर्यायाने काँग्रेस विरोधी वातावरण निर्माण केले, नाही असे नाही.

सतत दहा वर्षे, त्यातही नंतरची पाच वर्षे कुठल्या ना कुठल्या भ्रष्टाचाराची बातमी येत होती. मध्यामांनी सुद्धा काँग्रेसला झोडपून काढले. ते योग्यच होते. या सगळ्याला कंटाळलेला भारतीय तरुण अण्णांच्या आंदोलनात उतरला होता. भारतात फेसबुक तेव्हा नुकतेच तारुण्यात प्रवेश करत होतं. त्यानेही यात उडी घेतली आणि सुरु झाला काँग्रेसच्या शेवटचा प्रवास.

आता अण्णा पुन्हा दिल्लीत गेले आहेत. तेव्हाच्या आणि आताच्या स्थितीत मोठी तफावत आहे. आताच्या सरकारच्या कमकुवत बाजू वेगळ्या आहेत. पर्यायाने त्यावरील प्रतिक्रिया सुद्धा वेगळ्या आहेत. त्या समजून घेतल्या पाहिजेत.

थेट ज्याला भ्रष्टाचार म्हणता येईल, अशा नगण्य गोष्टी या सरकारच्या बाहेर आल्यात. किंबहुना नाहीच म्हटले तरी चालेल. जनतेला त्रास होत असणाऱ्या, किंवा आगामी काळात त्रास होणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्या किचकट आहेत, सहजा-सहजी कळून न येणाऱ्या आहेत, म्हणून जनता अद्याप चिडीचूप आहे. काँग्रेसचा भ्रष्टाचार दिसून येत होता. नेमकी आकडेवारी कळत होती. आता तसे नाही.

नोटाबंदी असो वा या सरकारचा इतर कुठला निर्णय असो, त्यातून आडमार्गाने जनतेची लूट झाली आहे, फसवणूक झाली आहे किंवा जनतेला त्रास झाला आहे. त्यामुळे ते नजरेत येत नाही. आणि जनतेला माध्यमातून सांगितलेल्या आकडेवारीवर जास्त विश्वास असतो, ना की कोणत्या विचारवंताने किंवा विरोधी पक्षाने सांगितल्यावर.

त्यात या सरकारची हुशारी थोडी वेगळी आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी त्या त्या निर्णयाचा बेस तयार करण्यात आला आहे. प्रत्येक गोष्ट देशहिताशी जोडली गेली, किंवा तशी जोडता आली नाही तर 'कठीण निर्णय घेतल्यास अडचणी सोसाव्या लागतीलच' अशी मानसिकता तयार केली गेली. त्यामुळे जनतेने झालेला त्रास निमूटपणे सहन करणे, योग्य समजले. हा त्रास जनतेने सोसला, यामागे एक कारण म्हणजे, 'हे सरकार काँग्रेस सारखे भ्रष्टाचार तर करत नाही, त्यामुळे हे निर्णय त्रासदायक असले तरी आम्ही सोबत आहोत'. अशाप्रकारे जनतेची सहानुभूती मिळवण्यास विद्यमान सरकार यशस्वी ठरले आहे.

आर्थिक घोटाळे किंवा गैरव्यवहार हे एकवेळ हा देश सोसेलही. पण जात, धर्म इत्यादी गोष्टींवरुन माणसा-माणसात निर्माण करण्यात आलेली तेढ या देशाच्या भवितव्याला मारक ठरणार आहे. कारण ही तेढ जितक्या वेगाने निर्माण झाली, तितक्या वेगाने भरुन निघणारी नाही. या सरकारचा आजच्या घडीला या गोष्टीवर सर्वात जास्त निषेध नोंदवणे गरजेचे आहे. असो.

आता झालंय असं की, अण्णांना गेल्यावेळी माध्यमांनी उचलून धरले होते. मग ते समाज माध्यमांनी असो वा प्रसार माध्यमांनी. आता परिस्थिती बदलली आहे. आता अण्णांना किती उचलून धरायचे याचा विचार माध्यमे जरुर करतील. याचे कारण, विद्यमान सरकार येऊन तीन पूर्ण वर्षे लोटली. गेल्या तीन वर्षात अनेकदा असे प्रसंग आले, ज्यावेळी राष्ट्रीय जनआंदोलनाची गरज भासली, तेव्हा तेव्हा अण्णांनी राळेगणमधून फक्त माध्यमांना बाईट देणे अनिवार्य समजले. किंवा सरकारला पत्र-बित्र पाठवणे वगैरे. पण त्यांनी रस्त्यावर येण्याची तसदी घेतली नाही. त्या त्या वेळी जनता अण्णांची आठवण काढत होती. पण अण्णा बाहेर आलेच नाहीत. पर्यायाने त्यांच्या आंदोलनाच्या वेळेबद्दल, हेतूबद्दल शंका निर्माण होऊ लागली. आणि अण्णांच्या भोवती अविश्वासाचे एक वर्तुळ तयार होऊ लागले. तेच वर्तुळ आज दिल्लीत रामलीलावरील तुरळक गर्दीचे कारण आहे, असे मला वाटते.

अतार्किक आर्थिक निर्णयांमुळे जनतेला झालेला त्रास किंवा दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे, हे केवळ या सरकराचे दोष नाहीत. तर दोन समाजातील जातीय आणि धार्मिक तेढ हेसुद्धा या सरकारचे कर्म आहेत. त्यावरही जेव्हा अण्णा बोलतील, उघड भूमिका घेतील, तेव्हाच त्यांना गेल्यावेळीसारखा पाठिंबा मिळेल. कारण हेच मुद्दे सध्या देशाच्या समोर आ वासून उभे आहेत.

काँग्रेस आणि भाजप (आताच्या नेतृत्वातील) यात मूलभूत फरक आहे. काँग्रेस विरोधी मताची दखल घेत असे. ते आता होत नाही. अर्थात अण्णांच्या पत्रांना मोदींनी दाखवलेली कचराकुंडी हे याचे उत्तम उदाहरण आहे. किमान अण्णांच्या बाबतीत बोलताना तरी हे उदाहरण लागू पडतेच. त्यामुळे अण्णांना समोरुन म्हणजे सत्ताधारी पक्षाकडून किती प्रतिसाद मिळेल, याबाबत माझ्या मनात तरी शंका आहे. बाकी येणारा काळ सांगेलच, रामलीलावरील 'अण्णा रिटर्न' सत्ताधाऱ्यांविरोधात लढा ठरतोय की त्याचे तहात रुपांतर होतेय?

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...