09 March, 2018

राजकारण आणि फायटिंगबाज वर्ग


डब केलेले साऊथ इंडियन पिक्चर पाहणाऱ्यांचा मोठा वर्ग इंटरनेटच्या स्वस्तातल्या लो कॉस्ट डेटा ऑफरने तयार केलाय. जिओच्या ऑफर्सनी या वर्गाला तर मोठं प्रोत्साहन दिलंय. याने साध्य काय झालंय, तर लोक रजनीकांतपासून प्रभास, महेशबाबू, व्यंकटेश, सुपरस्टार रवी, विक्रांत, विक्रम, नानी वगैरेंच्या फायटिंग सीनने हा वर्ग फारच आक्रमक वगैरे होत चाललाय. म्हणजे कसं, हिरोवर एक इजाही न होता व्हिलनचा पार धुव्वा उडवण्याच्या फायटिंगने प्रेरित होत, हा वर्ग ‘एक घाव दोन तुकडे’ टाईप मानसिकतेत घुसलाय.

काँग्रेसच्या फारच अन-फिल्मी आणि मंदगती राजकारणाला कंटळलेला, त्यात करप्शनचा विटाळ आलेलाही हाच वर्ग असल्याने, साऊथ इंडियन पिक्चरमधला कुणीतरी महेशबाबू यावा आणि साऱ्या व्हिलन लोक्सना पार धुवून काढून, देशाला सुजलाम सुफलाम करुन टाकावे, अशी या वर्गाची सुप्त इच्छा राहिली आहे.

अशाच काळात अण्णा हजारेंची एन्ट्री झाली. काँग्रेसच्या काळात अण्णा हजारेंच्या रुपात या वर्गाला असाच साऊथ इंडियन टाईपचा हिरो सापडला आणि हा वर्ग पुन्हा उत्सावर्धक गोळ्या घेतल्यासारखा जागा झाला. प्रसंगी हातची कामं सोडत रस्त्यावर उतरला. अर्थात, या वर्गाच्या मनात कोणते वाईट हेतू होते, अशातला भाग नसला, तरी यांच्या अपेक्षा कायच्या काय अफाट होत्या, हेही मान्य करायला हव्या.

आता काय झालंय की, अण्णांच्या आंदोलनापासून ‘एक घाव दोन तुकडे’ टाईप मानसिकतेत फिट्ट होत, आता ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ या स्थितीपर्यंत हा वर्ग पोहोचला. आणि नेमकी मोदींच्या रुपात डायलॉगबाज आणि फायटिंग मास्टर रजनीकांत टाईप नेत्याची एन्ट्री राष्ट्रीय पातळीवर झाली. त्यामुळे काँग्रेसच्या आश्वासनं म्हणजे, केवळ गाजरं वाटून, मोदींचा नाटकी का होईना पण भिडणाऱ्या कथित भाषणांनी हा वर्ग अत्युच्च प्रमाणात प्रभावी झाला.

मुळात हा वर्ग ना काँग्रेसचा असतो, ना भाजपचा.. तो असतो काठावरचा. या वर्गाला सोनिया गांधी किंवा राहुल गांधींच्या भाषणांचा कंटाळा आलेला होता, त्याचवेळी मोदींनी मगरीसारखे वगैरे अश्रू ढाळत अत्यंत ड्रॅमॅटिक भाषणांमधून या काठावरल्या माशांच्या नाडीचा नेमका टोक पकडला आणि आपल्या नाडीला बांधून सोबत घेतले.

आता जेव्हा कधी सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भाषणं असतात, त्यावेळी या वर्गाच्या आधीच निराश मनाला ती फार पटत नाहीत. काँग्रेसने अपेक्षाभंग केला, हे त्यांच्या मनात फिट्ट झालेले असते. त्यांना राहुल किंवा सोनिया गांधींच्या क्षणात बदल घडवणारी वाक्य सापडत नाहीत किंवा डोंगराएवढ्या रकमा दिसत नाहीत. त्यामुळे मग मोदींच्या भाषणात या वर्गाला प्रचंड आशावाद सापडतो. अगदी डाव्यांच्या क्रांतिच्या स्वप्नाइतका.

अॅट द एन्ड इतकंच सांगायचंय की, सध्या साऊथ इंडियन पिक्चरसारखे 'एक घाव दोन तुकडे' टाईप काही असेल, तर त्याकडे आकर्षित होणारा वर्ग सुसाट वेगाने वाढत आहे. तो हतबल आहे. त्याला बदल हवा आहे. त्याला सगळं आता तत्परतेने हवंय. हा वर्ग यूट्यूबवरचा एखादा उत्साहवर्धक व्हिडीओ स्लो नेटमुळे बफर व्हायला लागला, तरी जगण्या-मरण्याच्या नाड्याच कुणीतरी आवळून धरल्यात की काय, अशा हतबलेतेने अस्वस्थ होतो.

उद्या मोदी जरी केवळ आश्वासनांची गाजरं दाखवत राहिले, तर त्यांनाही ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ असे सांगायलाही हा वर्ग मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनो, तुमचा पुढचा मतदार असा आहे. समजून-उमजून पावले उचला.

इतके बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद... जय महाराष्ट्र !

नामदेव अंजना

No comments:

Post a Comment

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...