03 July, 2017

मशिदीच्या आडोशातली माणुसकी

मुंबईतील दहिसरला हायवेवर एक मशीद आहे. नॅन्सी काॅलनी बस स्टाॅपच्या थोडं पुढे. आता मेट्रोचं काम सुरुय म्हणून बस स्टाॅप तोडलाय.

पाच-सहा दिवसांपूर्वीची गोष्ट. हायवेच्या इकडून जात होतो. जोराचा पाऊस आला. थांबलो. आजूबाजूला पाहतोय, तर आडोसा दिसेना. मेट्रोच्या कामामुळं कन्स्ट्रक्शनचं सगळं साहित्य पडलेलंय. आडोसा म्हणून मशीदच होतं. भिजायचं नव्हतं. पण मशिदीच्या पडवीत कसं जावं, या विचाराने तिथेच गोंधळत राहिलो. पाऊस वाढला, मग न राहता मशिदीच्या पडवीत घुसलो.

दुपारची वेळ. त्यामुळे फार कुणी तिथं नव्हतं. दोघे जण होते फक्त. एक पस्तीशी-चाळीशीतला आणि दुसरा साठीतला बहुतेक. तर पडवीत अगदीच कोपर्‍याला उभा होतो. बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसाचे शिंतोडे अंगावर येत होते.

मशिदीच्या पडवीत हात-पाय धुण्यासाठी रांगेत चार-पाच नळ आहेत. तिथे हे दोघे गप्पा मारत बसले होते. एक जण नळाचं काहीतरी काम करत होता. दुसरा त्याच्याशी बोलत होता.

(फोटो : ज्या मशिदीतला हा प्रसंग आहे, त्या मशिदीबाहेरुन आज जात होतो. आणि आज पाऊस नव्हता. तेव्हा फोटो काढला.)

नुसताच गप्पा मारत बसलेल्या साठीतल्या माणसाने माझ्याकडे पाहिलं. मी आपला बाहेर पाहत होतो. पाऊस जाण्याची वाट बघत उभा होतो. माझ्यावर उडणारे पाण्याचे शिंतोडे त्या साठीतल्या माणसाने पाहिले असावे बहुतेक. तो म्हणला, 'बेटा अंदर हो जा... भिग जाएगा'

मशिदीची कधी पायरी चढलो नव्हतो. गावाकडे रोहा आणि तळा या दोन्ही तालुक्यांच्या ठिकाणी मोठी मुस्लीम वस्ती. रोहात तर 'मुसलमान मोहल्ला' नावाचा एरियाच आहे. सर्व मराठी मुसलमान. त्यामुळे मशिदी आहेतच. किंबहुना, कित्येक मित्रही मुस्लीम होते. पण तरी मशिदीत जाण्याचा योग आला नाही. किंवा जावं वाटलं नाही वगैरे. मात्र मशिदीबद्दल कुतुहल कायम होतं. आत कसं आणि काय काय असतं वगैरे.

कधी मशिदीत न गेल्याने मगाशी पावसात भिजल्यावर आडोसा शोधतानाही मशिदीचा आडोसा घेताना थोडा थबकलो होतो. त्यात आता हे साठीतले गृहस्थ तर म्हणत होते की, 'अंदर हो जा बेटा..'

मी म्हटलं, 'चाचा, ठीक है... कम हो जाएगा अभी बारीश'.

हे 'चाचा' बोलणं किती सवयीने येतं ना? म्हणजे कुणी वयस्कर मुस्लीम गृहस्थ असेल तर तोंडून आपसूक 'चाचा' निघतं. याचंही फार कौतुक वाटतं. चाचा म्हणजे किती जवळचं नातं जोडतो आपण दोन सारख्याच अक्षरांच्या एका शब्दाने!

तर ते चाचा बाजूचं स्टीलचं टेबल पुढे सरकवत म्हणाले, 'बेटा.. जल्दी नही जाएगा बारीश.. बैठ इधर..'

मी थोडा पावसाचा अंदाज घेतला. पाऊस थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत, हे लक्षात आलं. म्हटलं, दहा-पंधरा मिनिटं बसू. नाहीच थांबला तर जाऊ भिजतच.

चाचा आणि दुसरा पस्तीशी-चाळीशीतला माणूस पुन्हा आपल्या कामात अन् गप्पांमध्ये रमले. मी पावसाकडे पाहत मशिदीच्या पडवीत त्या स्टीलच्या टेबलावर बसलो. पावसाकडे आणि समोरील हायवेवरुन सुसाट वेगाने जाणाऱ्या गाड्या पाहत अगदी वीस-पंचवीस मिनिटं बसलो.

मध्ये एकदा स्वत: पाणी प्यायल्यावर पस्तीशी-चाळीशीतल्या त्या माणसाने मला 'पाणी पिणार का?' विचारलं. पण तहान नसल्याचं सांगून पुन्हा पावसाकडे टक लावून बसलो. एकदा हळूच पडवीतना मशिदीत टोकावलोही. वडाचं एखादं विस्तीर्ण झाड मावेल इतकी आत जागा. आणि वडाच्या झाडाखाली जो निवांतपणा असतो, तसं वातावरणही. गावाकडं आमचं ग्रामदैवताचं मंदिरही असंचय. विस्तीर्ण वड मावेल इतकं मोठं. आणि निवांत.

वीस-एक मिनिटं झाल्यानंतर पाऊस कमी आला. मी तिथून निघालो. जाताना चाचाला म्हटलं, 'थँक्स चाचा.' त्यांनी फक्त स्मित हास्य देत निरोपाचा हात वर केला. बरं वाटलं.

मला त्या वीस-एक मिनिटात त्या चाचांनी किंवा तिथल्या दुसर्‍या माणसाने एकही प्रश्न विचारला नाही. ना त्यांनी प्रश्नांकित नजरेने पाहिले. जन्मोजन्मीची ओळख असल्यागत वागले. भिजतोय हे पाहून आत बोलावलं, बसायला खुर्ची दिली, प्यायला पाणी विचारलं... अन् जाताना निरोपासाठी हातही वर केला.

हा माझ्यासाठी माणुसकीचा अनुभव होता. आणि दोस्तहो, ही माणुसकी धर्माच्या चौकटीत अडकत नसते. स्वतंत्र असते. मुक्तपणे वावरणारी!

No comments:

Post a Comment

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...