हिरोचा
सूड घेण्यासाठी व्हिलन एखाद्या पोलिसाला पैसे देतो. मग पोलिस हिरोच्या घरी येतात. 'तुम्हारे घर में
हाथियार हैं' किंवा
'तुम्हारे
घर में ड्रग्ज हैं' वगैरे
डायलाॅग मारुन तपास सुरु करतात. त्यापैकी व्हिलनकडून पैसे घेतलेला पोलिस पटकन
हत्यार किंवा ड्रग्ज तिथे लपवतो आणि तोच शोधून काढतो. मग हिरोला अटक करतात आणि
जेलमध्ये टाकतात.
आठवतंय का असं काही? हिंदी पिक्चरमध्ये तर सर्रास असे सीन असायचे. महेश मांजरेकरांच्या 'कुरुक्षेत्र'मध्येही आहे असा एक सीन. पण हल्लीच्या सिनेमांमध्ये सूड घेण्याचे हे सीन कमी असतात. म्हणूनच की काय, उद्धव ठाकरेंनी कमी भरुन काढलीय. निमित्त मलिष्का ठरली.
असंख्य मुंबईकरांच्या समस्येला तिने फक्त गाण्यातून व्यक्त केले. तर पालिकेसह मातोश्रीवर इतका जळफळाट झाला की, थेट मलिष्काच्या घरात पालिकेचे अधिकारी धडकले आणि तपासणीत अळ्या सापडल्या. आता मलिष्काच्याच घरी का तपासणी पथक गेले, त्यांना तिथे अळ्या असण्याचे स्वप्न पडले होते का, सोनूचं गाणं आणि या तपासणी छाप्याचा काही संबंध आहे का वगैरे निरर्थक प्रश्न विचारु नयेत. ते महत्त्वाचे नसतात. असो.
मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे हे जळजळीत वास्तव आहे. शेंबडं पोरगंही सांगेल, काय स्थिती आहे. अगदी आदित्य ठाकरेही सांगू शकतील. मात्र, तरी बीएमसीला वाटतंय की आपण मुंबईचं शांघाय केलंय की काय! म्हणून मलिष्काचा भलताच राग आलाय गड्यांना.
बरं.. राग यावा. नाही असे नाही. पण मलिष्काला कामाचे दाखले न देता फिल्मी स्टाईल उत्तर देण्याचं ज्या कुणाच्या सुपीक डोक्यात आलं ना, त्याला दोन कोंबड्या आणि चार नारळांचं नैवद्य द्यायला हवं!
विशेष याचं वाटतं की, बीएमसीसम्राट उद्धव ठाकरेंनी तर सदर प्रकरणात सरळ सरळ मुंबईकरांना मुर्खातच काढलंय किंवा मुंबईकर मुर्खच आहेत, असे ते गृहितच धरत असावेत. कारण त्यांची प्रतिक्रिया भारीय. उद्धवसाहेब म्हणतात, 'पाऊस जास्त पडतो त्याला पालिका कशी जबाबदार?'... ज्या मुंबईकरांनी मतं दिली त्यांनी हसावं की रडावं, हेही पुढे उद्धवसाहेबांनी स्पष्ट करायला हवं होतं. म्हणजे कसं सगळेच प्रश्न सुटले असते. पावसाला जबाबदार धरण्यासाठी सत्ता दिलीय का साहेब?
पावसाळ्यातच तर मुंबई महापालिकेची खरी कसोटी असते. याच काळात तर मुंबईकरांना अडचणींना सामोरं जावं लागतं. त्याचवेळी जर तुम्ही जबाबदारी झटकून वागत असाल, तर तुमच्या सत्तेत असण्या-नसण्याचा उपयोग काय? पावसाळ्याच्या तीन महिन्यांतल्या समस्या सोडल्या तर मुंबईकराची बाकी नऊ महिने कोणती तक्रार असते ओ? कुठलीच नाही. पण तेही तुमच्याने होत नाही. असो.
हे तर काहीच नाही. त्या किशोरीबाई पेडणेकरांचं तर नवीनच काहीतरी. त्यांनी सोनूच्याच तालावर मलिष्काला टार्गेट करणारं गाणं तयार केलं आणि उलट प्रश्न केलेत. अहो, किशोरीबाई... जरा रिक्षात बसा आणि मुंबई फिरा. मग बघा कंबरडं मोडून पालिकेच्या सुविधा नसलेल्या रुग्णालयात अॅडमिट व्हावं लागतंय की नाही ते. असो. या किशोरीबाईंवर फार शब्द खर्ची घालत नाही. कारण किशोरी पेडणेकर हे कॅरेक्टर एकंदरीतच अत्यंत उत्साही आहे. कट्टर सेनाप्रेमात काय बी बडबडतंय.
यात आणखी एक इंटरेस्टिंग टर्न आला तो अब्रुनुकसानीचा दाव्याने. हे म्हणजे विनोदाची उच्चतम पातळी होय. कोण अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार? तर सेनेवाले? हा हा हा....
थोडं विषयांतर होईल, पण बोलायलाच हवं. अहो, उद्धवसाहेब, अब्रुनुकसानीचा दावा तर आम्ही तुमच्यावर ठोकायला हवा. आमच्या मराठा-आई-बहिणींचा अवमान करणारं गलिच्छ व्यंगचित्र छापलंत... खरंतर अशावेळी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला जातो. शासन-प्रशासनाच्या खराब कामगिरीवर बोट ठेवल्याने कुणावर दावे-बिवे ठोकले गेल्याची आपल्याकडे उदाहरणं नाहीत. असो.
एकूणच या सर्व प्रकाराची समरी अशीय की, आमच्याविरोधात बोलाल तर तुम्हाला टार्गेट लिस्टीत टाकून त्रास देऊ. मग अळ्या सोडण्याचे चाळे वगैरे करु. बरंय राव. म्हणजे यापुढे आम्ही समस्यांवर बोलायचंही नाही आणि तुम्ही मात्र आमच्या आया-बहिणींवर गलिच्छ व्यंगचित्र बिनबोभाटपणे छापावी.
बरं त्यातल्या त्यात एक समाधनाची बाब अशीय की, मलिष्काला शिवसेना स्टाईल वगैरे उत्तराची धमकी न देता, अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा देत कायदेशीर मार्ग अवलंबण्याची तयारी दाखवली, हेही नसे थोडके. असो.
उद्धवसाहेब, शेवटी एकच सांगणं, तुमच्या कामापेक्षा भावनेच्या आहारी जात शिवसेनेला मतदान करणाऱ्या मुंबईकरांची संख्या अधिक आहे, हे लक्षात असू द्या आणि वेळीच कामाला लागा. कारण जेव्हा मुंबईकर काम बघून मत देतील, तेव्हा शिवसेनेचा महापालिकेवरचा झेंडा उतरलाच म्हणून समजा.
No comments:
Post a Comment