28 November, 2016

कुबेर सरांचा फिडेलद्वेषी संपादकीय लेख आणि काही प्रश्न


लोकसत्तेचा आजचा संपादकीय (क्रांती, कॅस्ट्रोआणि जग) लेखात काही मुद्दे आक्षेपार्ह, दिशाभूल करणारे आणि असत्य वाटले. अमेरिकेतील एखाद्या पत्रकाराने फिडेल कॅस्ट्रोवर लिहिल्यासारखा आजचा संपादकीय वाटतो. कारण वाक्यागणिक फिडेलद्वेष स्पष्टपणे दिसून येतो. फिडेलवरील रागापायी कुबेर सरांनी अत्यंत ऐकीव माहितीच्या आधारावर फिडेलवर टोकाचे आरोप केले आहेत. हे आरोप सर्वसामान्य वाचकांची दिशाभूल करणारे आहेत. या सर्वांवर चर्चा करण्याबरोबर संपूर्ण संपदकीय लेखाचीच चर्चा करुया.

नेहमीप्रमाणे सहा कॉलमचा संपादकीय. यातील पहिला दीड कॉलम हुकुमशहाची लक्षणं आणि वर्णन करण्यात घालवला आहे. या दीड कॉलममधील काही मुद्द्यांशी सहमत आहे. म्हणजे एखाद्या हुकूमशहानं खोट्या कहाण्या सांगणं किंवा एखाद्या हुकुमशहाचं वैयक्तिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य विरोधी असतं वगैरे. किंवा अगदी नेतृत्त्वमंडलात दुसऱ्या क्रमांकावर कोणीही चालत नाही वगैरे. हे सर्व ठीकंय. हुकुमशहा कसा असतो, हे चांगल्याप्रकारे कुबेर सरांनी सांगितलंय. पण पुढे या मुद्द्यांचा फिडेल कॅस्ट्रोशी संबंध जोडल्याने, कुबेरसरांचा फिडेलद्वेष स्पष्टपणे दिसू लागतो. अगदी प्रत्येक वाक्या-वाक्यातून.

पहिल्या दीड कॉलममध्ये हुकुमशहाचं वर्णन केल्यानंतर, हा कॉलम संपता संपता कुबेर सर लिहितात - क्रांतिकारकांत नेहमीच एक हुकुमशहा दडलेला असतो आणि त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या कथित क्रांतीची अखेर होत असते. फिडेल कॅस्ट्रो यांच्याबाबत हे सर्व घडले.म्हणजेच कुबेरसर फिडेलला हुकुमशहा समजतात. असेलही. पण याच संपादकीयमध्ये कुबेर सरांनी हुकुमशहाचं जे वर्णन केलंय, ते वाचल्यावर फिडेल हुकुमशहा कसा असेल, असा प्रश्न पडतो. चला तर मग कुबेर सरांच्या संपादकीयतील काही मुद्द्यांवर स्वतंत्रपणे चर्चा करुया...

मुद्दा क्र. 1 – हुकुमशहाचं (अप्रत्यक्षपणे फिडेलचं वर्णन करताना) वर्णन करताना कुबेर सर लिहितात, ‘त्यांची शारीरिक क्षमता दांडगी असते. ते सलग 20-20 तास काम करु शकतात. अमोघ वक्तृत्व हे अशांचे आणखी एक वैशिष्ट्य.

आता कुबेर सरांच्या वरील मुद्द्याची गोची कशी आहे बघा. बातिस्ता राजवट जुलमी होती, असमानता आणि भेदभावाला खतपाणी घालणारी होती, हे कुबेर सरांनाही मान्य असेल. नसेल, तर मान्य असायला हवे. कारण बातिस्ता राजवट तशीच होती, हे सर्वमान्य आहे. मग अशा राजवटीला उलथवून टाकायचं, तर 20-20 तास सलग काम करायला नको का? जनतेला विश्वासाने सोबत घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधायला नको का? बातिस्ता राजवट जुलमी होती. मग फिडेलची शारीरिक क्षमता, शब्दश: शारीरिक न घेत आपण लष्करी ताकद म्हणूया, ती दांडगी नको का? मग हे सर्व फिडेलने केले असेल, तर तो हुकुमशहा कसा? जुलमी राजवटीविरोधात बंड करण्याचा त्याचा तो मार्ग होता. जनतेची असमानतेतून सुटका करणं, हे फिडेलचं ध्येय होतं.

मुद्दा क्र. 2. कुबेर सरांनी फिडेलचं अमेरिकी प्रेम सांगण्याचा प्रयत्न केलाय. ते लिहितात – ‘अमेरिकाविरोधाची जाहीर भाषा करणाऱ्या या नेत्याने मधुचंद्रासाठी अमेरिकेचीच निवड केली होती आणि त्या देशात मित्रपरिवारासह मौजमजा करणं त्यांना आवडत असे. परंतु पुढे स्वत:च्या सत्तांतरात अमेरिकेचा अडथळा आहे हे लक्षात आल्यावर कॅस्ट्रो यांनी अमेरिकेच्या विरोधात आगलावी भूमिका घेण्यास सुरुवात केली.

इथेही कुबेर सरांचा फिडेलद्वेष दिसून येतो. कारण मधुचंद्रासाठी ही खरंतर फिडेलची वैयक्तिक गोष्ट. पण तरीही आपण असं म्हणूया की, एवढ्या मोठ्या माणसाला वैयक्तिक आयुष्य वगैरे गोष्ट नसते. असं जरी म्हटलं, तरी एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे, बातिस्ता राजवटीविरोधात दंड थोपटल्यानंतर फिडेलने कधीच अमेरिकेचे गालगुच्छे घेतले नाहीत. अमेरिकेच्या दुटप्पी, भांडवलदारी, कपटी राजाकारणाचा त्याने कायम कडाडून विरोधच केला. ज्यावेळेपासून बातिस्ता राजवटीविरोधात फिडेल उभा ठाकला, त्यानंतर अमेरिकेचे गोडवे फिडेलने गायलेत का? तर नाही. मग फिडेलला अमेरिकेचं आकर्षण होतं, असं कसं म्हणू शकता? मधुचंद्र वगैरे ही बंडाआधीची गोष्ट आहे, हे स्वत: कुबेर सर सांगतात. म्हणजे बंडाआधीच्या गोष्टींवर पुढील वाटचाल तोलणार आहात का? फिडेलचा अमेरिकाविरोध अवघ्या जगाला माहित आहे. मग बातिस्ताविरोधातील लढाई सुरु करण्याआधीचे दाखले देऊन, फिडेलला अमेरिकेबाबत दुटप्पी कसे ठरवता?

मुद्दा क्र. 3. कुबेर सरांनी दुसऱ्या कॉलमच्या शेवटी आणि तिसरा कॉलम पूर्ण फिडेल आणि चे गव्हेरा यांच्यातील सुसंवादी नात्यावरच संशय व्यक्त करण्यात घालवला आहे. फिडेलला क्युबन क्रांतीनंतर चे गव्हेरा नको होता, असं कुबेर सरांनी म्हटलंय. हे वाक्यच असत्य वाटतं. कारण चे गव्हेरा आणि फिडेल यांचं नातं पुराव्यानिशी सर्वांना माहित आहे. आता फिडेलला राग वगैरे होता, या चर्चा आहेत. ऐतिहासिक दस्ताऐवज या दोघांमधील सख्य समोर ठेवतं. मग चर्चांआधारे त्यांच्या नात्यावर संशय का व्यक्त करता

या संदर्भात कुबेर सर लिहितात – “दोन तलवारी म्यानात ज्याप्रमाणे एका वेळी राहू शकत नाहीत त्याचप्रमाणे दोन क्रांतिकारकही एकाच प्रदेशात एकत्र नांदू शकत नाहीत. चे याचा अंत झाला आणि कॅस्ट्रो यांना रान मोकळे मिळाले.” 

कुबेर सरांचं वरील वाक्य प्रचंड दुर्दैवी वाटतं. दुर्दैवी यासाठी की, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा कुबेर सरांना चांगला अभ्यास असतानाही, त्यांना हे वाक्य लिहावं वाटलं. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत म्हणून चे गव्हेराला फिडेलने बाजूला केलं, असं जर काही क्षणासाठी मानायचं ठरवलं, तर मग कुबेर सरांनी एक प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं, तो प्रश्न म्हणजे- फिडेलची सावली बनलेल्या राऊल कॅस्ट्रो या तलवारीला फिडेलने एकाच म्यानात कशी जागा दिली?’ कारण फिडेलला चे नको होता, तर राऊल कॅस्ट्रोही का चालला असता? त्यालाही बाजूला केलं असतं. मुळात चे गव्हेराला तसंही सत्ता उपभोगण्याचा हव्यास नव्हता. तो क्रांतीचा प्रसार करण्यासाठी क्युबन क्रांतीनंतर निघून गेला. त्यामुळे फिडेल चे गव्हेराच्या विरोधात होता, हे सपशेल खोटं विधान वाटतं.

मुद्दा क्रं. 4. पाचव्या कॉलमच्या सुरुवातीलाच कुबेर सर फिडेलद्वेष सांभाळत लिहितात- अशा प्रवृत्तीच्या हुकूमशहांना जागतिक मंचावर मिरवणे आवडते. कॅस्ट्रो त्यास अपवाद नव्हते. अमेरिकाविरोधी जगाचे ते प्रवक्ते बनले. यातून स्वार्थ साधण्यापलिकडे त्यांच्या हाती काहीही लागले नाही.
या तीन विधानांमधून कुबेर सरांना हे सांगायचंय की, फिडेलने काहीच केले नाही. त्याने फक्त स्वार्थ साधला आणि हुकुमशाही जगभर मिरवली. कुबेर सरांचा हा मुद्दा खोडून काढण्यासाठी अजित अभ्यंकराच्या महानायकाचे निर्वाण!या लेखातील एक पॅरा इथे देतो आहे. त्यातून तुम्हाला कळेल, की फिडेलने क्रांतीनंतर क्युबात काय काय केलं. अभ्यंकर सर लिहितात- क्युबन क्रांतीने जगाला काय दिले हे सांगताना तिने क्युबाला काय दिले, हे प्रथम सांगितले पाहिजे. सर्व प्रथम शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार आणि अल्पावधीतच ९९ टक्के साक्षरता या क्रांतीने दिली. सर्वांना उत्तम शिक्षण आणि आरोग्याच्या मोफत सेवा दिली. मानवी विकास निर्देशांकामध्ये अमेरिका आणि अतिश्रीमंत राष्ट्रांच्या मालिकेतील एक देश म्हणून नाव मिळविले. खनिज उर्जेला पर्याय देणाऱ्या मानवी, प्राणी तसेच सौर उर्जा स्रोतसाधनांचा विकास करून त्यांना दैनंदिन जीवनाचा भाग बनविले. क्रांतीच्या पूर्वी असणारे साखरेसारख्या पर्यावरण विनाशक पिकाच्या निर्यातीवरचे अवलंबित्व कमीत कमी करून दाखविले. पर्यावरणस्नेही जैविक तंत्रज्ञानाचा विकास करून नवीन औषधांचा विकास केला. हेपिटायटिस बी, मॅनेंजायटिस, डेंग्यू यासारख्या आजारांवर लशींचा शोध लावला. १९६९ पासून ३ लाख २५ हजार ७१० क्युबन आरोग्य सेवकांनी जगातील १५८ देशांत आरोग्य कार्यक्रमांत सहभाग घेऊन आपल्या वैद्यकीय प्रणालीचा भ्रातृभावी लाभ त्यांना मिळवून दिला आहे. जैविक खतांचाच वापर मोठ्या प्रमाणात करून उत्पादनवाढ प्राप्त केली. शहरात शेती आणि शेती उत्पन्न घेण्याच्या पर्यावरणस्नेही पद्धतींचा विकास केला.

बरं कुबेर सरांनी यापुढेही फिडेलला वाक्यागणिक झोडपून काढलंय. खरंतर मनातच फिडेलबद्दल पूर्वग्रह ठेवून काही लिहिलं, तर त्यातून द्वेषयुक्त शब्दच बाहेर पडतील, यात शंका नाही. त्यात कुबेर सरांचा कम्युनिस्टांविरोधातील राग सर्वज्ञात आहे. ह्योगा चावेझवरील संपादकीय सर्वांना आठवतच असेल. कम्युनिस्ट म्हणजे चूकच, असं मनातच ठरलेलं असेल, तर मग पुढे लिहिताना-बोलतानाही वेगळं अपेक्षितही नसतं. त्यातून द्वेषाचीच भावना प्रकट होत जाते.

इतकं लिहिल्यानंतर-बोलल्यानंतरही मी प्रमाणिकपणे नमूद करु इच्छितो की, फिडेल चुकला असेलही. किंवा चुकला असेलच, असं म्हणूया. पण कमालीच्या खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि ऐकीव माहितीचा आधार घेत त्याला झोडपून काढणं कितपत योग्य आहे?

शेवटाकडे जाताना फिडेलच्याच एका विधानाने शेवट करेन. कुबेर सर म्हणतात, फिडेल हुकूमशहा होता. तर फिडेल हुकूमशहा होताच. मात्र, त्याची व्याख्या वेगळी होती. तो म्हणायचा, “क्रांती म्हणजे शोषितांची शोषकांविरोधातील हुकूमशाही”. आणि फिडेलने अशीच क्रांती केली. मग तुम्हा-आम्हाला ती हुकूमशाही का वाटेना. त्याच्या मते आणि क्युबावसीयांमते फिडेल योग्य होता. म्हणूनच फिडेलने पाच दशकांहून अधिक काळ क्युबाचं नेतृत्त्व केलं.

21 November, 2016

"घेऊन जा तिला. आता तुझं कर्ज फिटलं."

...ते दोन पाय मातीने माखलेले होते. चिखलात बरबटलेले. चकचकीत पांढ-या शुभ्र मार्बलवर एखाद्या नव्या नवरीचे कुंकवाने रंगवलेल्या पायाचे ठसे उमटावे तसे त्या दोन पायांचे ठसे उमटले. आखीव आणि रेखीव. घराच्या मधोमध शेवटच्या ठशांवर ते माखलेले पाय स्तब्ध होत उभे राहिले.


पायांच्या नखांमध्ये माती भरलेली. बरबटलेले पाय लपवायचे तरी कसे? तरीही जमतील तितकं पायांची बोटं दुमडण्याचा प्रयत्न करी, पण तोल जाई. मग पुन्हा सावरुन उभं राहावं लागे. पायांनाही घाम सुटला. त्याची भीती अन् अविश्वास दाखवणारी पायांची अलगद हालचाल स्पष्ट दिसत होती.


इतक्यात समोरुन आणखी दोन पाय आले. जाडजूड, ठाम आणि निर्धास्त. आडदंड अन् रुबाबदार पैलवानी अंगाचा अंदाज यावा असे ते पाय.


नंतर आलेल्या पायाचा माणूस खुर्चीत बसला आणि एक पाय दुस-या पायावर आखडून टाकला. तोच इकडे माखलेल्या पायाचा माणूस त्याच अविश्वासू अवस्थेतील पायाने उभा होता. त्याच्या पायांना आणखी घाम सुटला.


आता चार पायांची दोन माणसं त्या पांढ-या शुभ्र मार्बलच्या खोलीत झाली होती. तोच आणखी दोन पाय त्या खोलीला चिटकून असलेल्या खोलीतून बाहेर आले. याच खोलीतून तो आडदंड अन् रुबाबदार माणूसही बाहेर आला होता. तिसरे दोन पाय बाईचे होते. पायात मातकट पडलेले पैंजण होते. पाय स्वच्छ धुतलेले, तरीही मूळ ओळख पुसून गेली नव्हती. पायाच्या नखात माती होतीच. चपलेमुळे गोरा राहिलेला भाग सोडला, तर तिचे पायही माखलेलेच होते.


मातकट पैंजणाचे दोन्ही पाय माखलेल्या दोन पायांपाशी जाऊन थांबले. तितक्यात तो आडदंड अन् रुबाबदार पायांचा माणूस माखलेल्या पायांच्या माणसाला म्हणाला, "घेऊन जा तिला. आता तुझं कर्ज फिटलं."

17 November, 2016

लेनिन, यशवंतराव चव्हाण आणि जॉन रीड्सचं पुस्तक



टेन डेज दॅट शूक द वर्ल्ड..... रशियन राज्यक्रांतीचा अभ्यास करणारे हे पुस्तक वाचल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकत नाहीत. इतकं काय महत्त्वाचं होतं या पुस्तकात? की दस्तुरखुद्द लेनिनने हे पुस्तक वाचण्याचं जनतेला आवाहन करावं. रशियासारख्या बलाढ्य देशाचा नेता आणि रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता एखादं पुस्तक वाचायला सांगतो, हे नक्कीच वेगळं आहे. म्हणून या पुस्तकाबद्दल थोडं लिहिण्याचा विचार मनात डोकावला आणि जी माहिती मिळाली, त्याआधारे थोडं लिहिलंय...
पहिल्या आवृत्तीचं मुखपृष्ठ
जॉन रीड्स या अमेरिकन पत्रकाराने 1919 साली टेन डेज दॅट शूक द वर्ल्ड हे पुस्तक लिहिलं. रशियन राज्यक्रांतीचं आँखो देखी रिपोर्टिंग म्हणजे हे पुस्तक. स्वत: अनुभवलेले प्रसंग, भेटलेले नेते आणि स्वत:च्या नजरेतून विश्लेषण असं या पुस्तकाचं स्वरुप. फर्स्ट हँड एक्सपीरियन्स्ड असं या पुस्तकाला म्हणता येईल. “THIS book is a slice of intensified history—history as I saw”, या वाक्याने जॉन रीड्सने टेन डेज दॅट शूक द वर्ल्ड या आपल्या पुस्तकाची सुरुवात केलीय.
 
जॉन रीड्स हा मूळचा अमेरिकन पत्रकार. द मासेस या मासिकासाठी रशियन राज्यक्रांती कव्हर म्हणून करायला गेला आणि तो तिथलाच झाला. जॉन रशियन राज्यक्रांतीने भारावून गेला. हे पुस्तक तटस्थ नाही. ते लेनिनच्या बाजूने आहे. मात्र, इथेही जॉन रीड्सने वाचकांची फसवणूक केली नाही. त्याने पहिल्या आवृत्तीच्या मनोगतातच म्हटलंय की –in the struggle my sympathies were not neutral. इतकं प्रामाणिकपणे या पुस्तकाचं लेखन आहे. जे पुढे लेनिनलाही भावलं.

अमेरिकन पत्रकार जॉन रीड्स

या पुस्तकाची जेवढी स्तुती झाली, तेवढीच टीकाही. 1919 साली लिहिलेलं हे  पुस्तक कित्येक दशकं कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलंय. दुर्दैवाने या पुस्तकावरील टिका किंवा स्तुती ऐकायला जॉन रीड्स फार काळ जगला नाही. पहिल्या महायुद्धाची-रशियन राज्यक्रांतीचा चालता-बोलता इतिहास सादर करणारं हे पुस्तक 1919 साली प्रकाशित झालं आणि अवघ्या काही महिन्यातच म्हणजे 1920 साली जॉन रीड्सचा मृत्यू झाला. जॉनच्या मृत्यूनंतरही एक विशेष घटना घडली. ती म्हणजे, जॉन रीड्सचा मृतदेह मॉस्कोमधील क्रेमलिन वॉल नेक्रोपोलिसमध्ये दफन करण्यात आलं. इथे फक्त सेव्हिएत नेत्यांचे मृतदेहच दफन केले जायचे. तिथे अमेरिकन पत्रकार जॉन रीड्सचा मृतदेहही दफन करण्यात आला, हे विशेष.

या पुस्तकाबद्दल 1919 च्या शेवटी लेनिन म्हणाला होता, With the greatest interest and with never slackening attention I read John Reed's book, Ten Days that Shook the World. Unreservedly do I recommend it to the workers of the world. Here is a book which I should like to see published in millions of copies and translated into all languages. It gives a truthful and most vivid exposition of the events so significant to the comprehension of what really is the Proletarian Revolution and the Dictatorship of the Proletariat. These problems are widely discussed, but before one can accept or reject these ideas, he must understand the full significance of his decision. John Reed's book will undoubtedly help to clear this question, which is the fundamental problem of the international labor movement.”

रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता लेनिन

दस्तुरखुद्द लेनिने अशाप्रकारे पुस्तकाला पावती देणे, नक्कीच जॉन रीड्सच्या दृष्टीने मोठी गोष्ट होती. मात्र, 1924 साली याच पुस्तकावर स्टॅलिनने टीका केली. इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडणारं हे पुस्तक असल्याचं स्टॅलिन म्हणाला. पण स्टॅलिनची टीका ऐकायला जॉन रीड्स जिवंत नव्हता. मात्र, स्टॅलिनने टीका केली असली, तरी त्याकडे दुर्लक्ष करत जगभरातील वाचकांनी जॉन रीड्सच्या पुस्तकाची दखल घेतली. आणि आजीही घेतायेत.  

या पुस्तकाची चर्चा जगभरात झाली. अमेरिकेतून एक पत्रकार रशियात येतो काय, तो रशियन राज्यक्रांतीच्या प्रेमात पडतो काय, रिपोर्टिंग सोडून तो राज्यक्रांती अनुभवतो काय... सारंच विस्मयचकित करणारं. या पुस्तकावर पुढे सिनेमाही निघाला. आयसेन्स्तीन, स्यिर्ग्येई भ्यिकायल व्झिच या वास्तववादी सिनेमे बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रशियन दिग्दग्शकाने 1927-28 दरम्यान या पुस्तकावर आधारित सिनेमाही तयार केला.

या पुस्तकाचं आपल्या महाराष्ट्राशीही एक वेगळं नातं आहे. ऐकून थोडा धक्का बसला असेल ना? पण खरंय. महाराष्ट्राची बांधणी ज्या माणसाने केली, त्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आयुष्यावरही या पुस्तकाचा विशेष प्रभाव होता.

यशवंतराव चव्हाणांना ज्या पुस्तकांनी प्रभावित केली, जी पुस्तकं यशवंतरावांना सर्वात जास्त आवडली, त्यात जॉन रीड्सच्या टेन डेज दॅट शूक द वर्ल्ड या पुस्तकाचाही समावेश होता.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण

यशवंतराव चव्हाण यांना ज्यावेळी रशिया, लेनिन आणि रशियन राज्यक्रांतीबद्दल अधिक माहिती जाणून घ्यावी वाटली, त्यावेळी त्यांनीही जॉन रिड्सचं टेन डेज दॅट शूक द वर्ल्ड हे पुस्तक वाचलं. या पुस्तकाने यशवंतराव पुरते भारावून गेले. ते लेनिनच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडले. हे पुस्तक वाचल्यानंतर यशवंतराव लिहितात की, लेनिन यांच्या राजकीय व आर्तिक परिस्थितीचे विश्लेषण करुन निर्णय घेण्याच्या शक्तीबद्दल अचंबा वाटत राहिला आणि लेनिनसंबंधी वाटणारी आदराची भावना तेव्हापासून जी मनात बसली, ती त्यानंतर आजपर्यंत वाढत राहिली आहे.

असं हे पुस्तकं... आणि अशी त्याची कथा. एखाद्या पुस्तकालाही असा इतिहास असू शकतो. हे या छोट्याशा लेखातून सांगण्याचा हा प्रयत्न.

16 November, 2016

हेमिंग्वेचं फॉकनरला सणसणीत उत्तर


काही लेखक उगाच किचकट वगैरे लिहितात, असं एक वाचक म्हणून माझं मत आहे. असं किचकट लेखन वाचल्याने वाचक पार गोंधळू जातात. अनेकदा तरअसे होते की, लेखक वाचकाला गृहित धरतो. अॅक्चुअली तसं न करता, आपलं लेखन सर्वसमावेशक असायला हवं. 'बिटविन द लाईन्सच्या फंदात न पडता, जसं आहे तसं लिहावं. कारण या तथाकथित 'बिटविन द लाईन्स' सगळ्यांनाच कळतात, अशातला भाग नाही.

अगदी मराठीतलं उदाहरण घेऊन बोलायचं झाल्यास, अनिल अवचट किंवा आसाराम लोमटे वगैरे लेखकांसारखं लिहावं. जे ओठात, तेच शब्दात. फार वेडीवाकडी वळणं नाहीत किंवा उगाच नको असलेल्या तांत्रिक शब्दांची गुंफण नाही. साधं-सोपं लेखन. वाचकांनाही ते आवडतं. तर दुसरीकडे विलास सारंग. तसं मी नेहमीच सांगतो की, विलास सारंग माझे वन ऑफ दी फेव्हरेट लेखक. सारंगांचं बहुतेक लेखन वाचलंय. मॅनहोलमधला माणूस असो किंवा त्यांच्या कविता वगैरे. सर्वच. पण मला सारंगांचं लेखन प्रचंड किचकट वाटतं. त्यांचं लेखन समजणारा एक वेगळा वाचकवर्ग असावा, असं सारखं वाटतं.

याचा परिणाम असा होतो की, एखादं किचकट पुस्तक एखाद्या नव्यानेच पुस्तकं वाचायला सुरुवात केलेल्या वाचकाच्या हाती पडलं, तर वाचनापासून दूर होण्याची शक्यता असते. कारण असे अनेकजण भेटतात, ज्यांची प्रतिक्रिया असते, "एकदा वाचायला घेतलेलं रे ते अमुकू-तमुकू पुस्तक. कसं बकवास रे. कंटाळा आला. मग कधी काही वाचलंच नाही.". त्यामुळे जितक्या सोप्या पद्धतीने लिहिता येईल तितक्या सोप्या पद्धतीने लिहायला हवं.

असंच वेबवर बागडत असताना अर्नेस्ट हेमिंग्वे (1899 ते1961) आणि विल्यम फॉकनर (1897 ते 1962) यांचा संवाद सापडला. किचकट, न कळणारी लेखनशैली वगैरे मुद्द्याशी संबंधितच दोघांमधील हा प्रसिद्ध संवाद आहे

तसं हेमिंग्वे आणि फॉकनर हे समकालीन लेखक. विशेष म्हणजे दोघेही पुलित्झर आणि नोबेल अशा जगप्रसिद्ध-प्रतिष्ठित पुरस्कारांचे मानकरी. 1949 साली विल्यम फॉकनरला साहित्याचं नोबेल, तर 1954 ला हेमिंग्वेला साहित्यचं नोबेल मिळालं. आणि अशाच चार-पाच वर्षांच्या अंतराने पुलित्झरही दोघांना मिळालं. त्यात फॉकनरचा दोनदा पुलित्झरने सन्मान झाला. तरीही मला हेमिंग्वे ग्रेटच वाटतो. अर्थात, त्यामागे त्याच्या लेखनासोबत त्याचं आयुष्यही कारणीभूत आहे. अत्यंत स्व‍च्छंदी आणि दिलखुलास माणूस.

विषयांतर नको.. हेमिंग्वेबद्दल पुन्हा कधीतरी लिहीन. त्यांचं आयुष्य भारीय. पण आता मुद्द्याकडे येऊ या. तर हेमिंग्वे कसा अगदी साधं सरळ सोप्या भाषेत लिहायचा. त्याच्या लेखनात फार तांत्रिक आणि न समजणारी भाषा नसायची. त्यावरुन फाॅकनरने खिल्ली उडवणारं एक विधान केलं आणि त्याला अत्यंत हजरजबाबीपणे हेमिंग्वेने उत्तर दिलं.

तर हेमिंग्वेच्या लेखनाबद्दल बोलताना फॉकनर एकदा म्हणाला, "हेमिंग्वेच्या लिखाणातल्या एखाद्या शब्दाचा अर्थ पाहण्यासाठीसुद्धा कुणाला शब्दकोष पाहावा लागला असेल असे ऐकले नाही. सगळे लिखाण सरळसोपे. अगदी बाळबोध हो."
फाॅकनरच्या या विधानाला उत्तर देताना हेमिंग्वे म्हणाला, "बिच्चारा फॉकनर ! मोठमोठे बोजड शब्द वापरल्यामुळे त्यातल्या भावना तीव्र होतात असे त्याला खरेच वाटते की काय?"

दोन नोबेल विजेत्या लेखकांच्या या एकमेकांना उद्देशून प्रतिक्रिया. हेमिंग्वेचं म्हणणं अगदी खरंय. बोजड शब्द वापरल्याने आपल्या लेखनाला वजन प्राप्त होतं, असं मुळीच नाहीय. जितकं सोपं लिहाल, तितकं ते अधिक प्रभावीपणे वाचकांपर्यंत पोहोचतं. तसं मराठी साहित्यात सोप्या पद्धतीने लिहिणाऱ्यांची कमी नाही. पण तरीही असेही होते-आहेत की ज्यांचं लेखन दोनदा-तीनदा वाचल्याशिवाय कळत नाही. असो. हेमिंग्वे आणि फॉकनरचा हा किस्सा एकेठिकाणी वाचनात आला, त्यावरुन थोडं लिहावं वाटलं.

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...