रात्री
दोन वाजता 'अफवा
खरी ठरावी म्हणून...'ची
पहिली कथा संपवली. एक्झिट. कथा एकच. पण दोन भागात- 'एक्झिट १' आणि 'एक्झिट २'. पहिला भाग वाचत असताना
हिच कथा आहे, असं
वाटून जातं. पण दुसरा भाग काहीतरी नवीनच समोर ठेवतो. पार धक्काच देतो. जोराचा.
एक्झिट कथा दोन स्त्रियांच्या मनातलं वादळ मांडते. मीता आणि प्रज्ञा- एक कथेची पात्र, तर दुसरी कथा लेखिका. एक्झिट एक कथा असली, तरी दोन जगणं आपल्यासमोर ठेवते.
कथा काल्पनिक नसतात, या मताचा मी आहे. त्या अनुभवाधारित किंवा प्रसंगाधारित असतात. (केवळ मनेरंजनासाठी लिहिलेल्या कथांबाबत बोलत नाही. कारण त्या पूर्णपणे काल्पनिकच असतात.) अर्थात कथेच्या गरजेनुसार थोडी खेचाखेच आणि काही रंजित घटना त्यात समाविष्ट केल्या जातात. पण सरसकट नाही. आणि काही कथा तर आपल्या आजूबाजूला घडलेली एखादी घटनाच वाटावी इतकी वास्तवदर्शी असते. 'एक्झिट'ला वास्ताचा मोठा स्पर्श मला जाणवला. ती कुठल्या घटनेवर आधारित आहे की पूर्णपणे कल्पनेतून साकारलीय, हे कथालेखिकाच सांगू शकेल. म्हणजे प्रज्ञा दया पवार याच.
पहिल्या भागात मीता नामक स्त्रीची कथा आणि व्यथा मांडलीय. सिद्धहस्त दिग्दर्शकाशी १५ वर्षांचं लग्न मोडून एका ज्युनियर आर्टिस्टशी म्हणजेच कुबेरशी नीता लग्न करते. पण त्याच्यशी पटत नाही. तो मारझोड करतो. एका मोठ्या दिग्दर्शकाला सोडून ज्युनियर आर्टिस्टशी लग्न केलं. का तर तो आवडला. पण काळाने त्यालाही बदलवलं. मग पुढे मीताच्या मनाची घालमेल. कुबेर घर सोडून जातो. मीता एकटी पडते वगैरे. असं खूप काही पहिल्या भागात कथा गुंतवते.
आता दुसरा भाग याच कथेचा शेवट असेल, असं वाटतं तोच काहीतरी धक्कादायक वाचयला मिळतं. प्रज्ञा नामक लेखिकेने कथा लिहिलेली असते आणि पहिल्या भागातील मीता ही प्रज्ञाच्या कथेची पात्र असते. कथेचं रुपच पालटतं. अगदी धक्कादायकपणे. मध्यरात्री मीता म्हणजेच कथेची पात्र लेखिकेच्या घरी येते. मग सुरु होतो लेखिका प्रज्ञा आणि कथेतील पात्र मीता यांचा संवाद. वाचक अक्षरश: गुंतून राहील असा संवाद.
पहिला भाग गुंतवून ठेवतो कथेत, तर दुसरा भाग धक्केच देतो. कथेचं पात्रच रात्री अपरात्री घरी येतं म्हटल्यावर आणखी काय होणार?
मीताची कथा प्रज्ञाने छान लिहिलीय आणि प्रज्ञाची कथा प्रज्ञा दया पवार यांनीही छान लिहिलीय. कथेचा फॉर्म प्रचंड आवडला.
'अफवा खरी ठरावी म्हणून...'ची पहिलीच कथा खूप आवडली. म्हणून त्यावर थोडं लिहिलंय. अजून यातील ११ कथा वाचायच्या आहेत. आता थेट संपूर्ण कथासंग्रह वाचून झाल्यावरच सविस्तर लिहीन. तोपर्यंत इतकंच.
(माझं अनुभवविश्व कदाचित
या कथांमधील बारकावे, संदर्भ नीट समजू शकणार
नाही. पण तेवढी मुभा वाचकांनी आणि लेखिकेने मला द्यावी.)
No comments:
Post a Comment