20 September, 2016

आधार देणारा माणूस : दिपक करंजीकर


नुकताच मुंबईत आलो होतो. डहाणूकरमध्ये अकरावीसाठी प्रवेश घेतला. कमवून शिकावं लागणार, हे घरातून न सांगताच कळलं होतं. कारण शिकवण्याची घरच्यांची परिस्थिती नव्हती. अशात मुंबईला आल्यावर सर्वात पहिलं काम केलं ते पेपरलाईन टाकण्याचं. त्यावेळी पार्ल्यातील संत जनाबाई रोडवरील इमारतींमध्ये पेपर टाकत असे. शिवाय याच रस्त्यावरील पार्ले निमेश सोसायटीसमोरील जी. के. जाधव नावाच्या भल्या गृहस्थाच्या पेपर स्टॉलवर पेपर विकण्यासाठी दुपारी 11 पर्यंत बसत असे. त्यावेळी पेपर वाचण्याची सवय लागली. डहाणूकरमध्ये नाट्यमंडळात सक्रीय असल्याने लोकसत्ता-मटामधील नाटकांच्या जाहिराती पाहून नवं नाटक आल्यावर ते आवर्जून पाहणं, हे ठरलेलं असायचं.

काही दिवसांनी एक व्यक्ती पेपर स्टॉलवर इंडियन एक्स्प्रेस घेण्यासाठी आली. या व्यक्तीला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटलं. नंतर ते दिपक करंजीकर असल्याचं लक्षात आलं. गांधी विरुद्ध सावरकर’, ‘प्रेमाच्या गावा जावेया आपण पाहिलेल्या नाटकातील कलाकार. दिपक सर पेपर घ्यायला आले की, त्यांच्यासोबत नेहमी बोलणं व्हायचं. मी शिकतोय, मला वाचनाची आवड आहे, मला नाटकांची आवड आहे हे सर्व त्यांना कळल्यावर ते माझ्याशी आणखी आपुलकीने बोलू लागले. अगदी पेपरस्टॉलवरुन घरी चहा प्यायला बोलवत असत आणि विविध विषयांवर गप्पा मारत असत.

कितीही मेहनत करावी लागली तरी बेहत्तर पण शिक्षण सोडू नको, काही गरज लागल्यास बिनदिक्कीतपणे घरी ये आणि माग, असे सांगणारे दिपक सर माझ्यासाठी त्यावेळी एकप्रकारे आधारस्तंभ होते आणि आजही आहेत. नाटकांच्या प्रयोगानिमित्ताने बाहेर जात असत. मात्र, जेव्हा कधी पेपर घेण्यासाठी येत असत, तेव्हा माझ्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असत. एवढा मोठा कलाकार आपल्याशी बोलतो, याचं खूप बरं वाटायचं. आजूबाजूने जाणारे लोक माझ्याकडे पाहत बसायची. मराठी नाट्यपरिषदेचे कार्यवाह-सिने-नाट्य अभिनेता आपल्याशी बोलतो, हे खूप काही वाटायचं.

मुंबईत आल्यावर दिपक सर अशी व्यक्ती होती, ज्यांनी शिक्षणासाठी मानसिक आधार दिला. ज्या काळात शिक्षण सोडून आता फक्त काम करावं, असा विचार मनात येत होता, त्यावेळी दिपक सरांनी मला समजावून शिक्षण पूर्ण करण्यास सांगितलं.

पुढे अर्थक्रांती प्रतिष्ठानच्या मुंबई ऑफिससोबत काम करण्यासाठी त्यांनी माझी निवड केली. मग त्यांच्याशी नेहमी बोलणं व्हायचं. अगदी घरातला एक असे ते माझ्याशी वागायचे आणि आजही तसेच वागतात.

आजही कधी पदोन्नती झाली, स्पर्धा जिंकलो, लेख छापून आला की त्यांना आवर्जून मेसेज करतो, मग रिप्लाय म्हणून दिपक सरांचा एक नेहमीचा मेसेज येतो, तो मेसेज खूप प्रेरणादायी असतो. तो म्हणजे नामदेवा, मोठा हो. अभिमान वाटतो तुझा.

कलाकार म्हणून हा माणूस ग्रेट आहेच, पण माणूस म्हणूनही. अगदी डाऊन टू अर्थ. आजही एबीपी माझाच्या ऑफिसमध्ये कधी 'माझा विशेष'च्या चर्चेसाठी आले, तरी माझ्या डेस्ककडे आवर्जून येतात. मी नसलो, तर माझी चौकशी करतात. भारी वाटतं. 'आपली माणसं' अशीच असतात.


आज दिपक सरांचा वाढदिवस... सर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

16 September, 2016

एक्झिट



रात्री दोन वाजता 'अफवा खरी ठरावी म्हणून...'ची पहिली कथा संपवली. एक्झिट. कथा एकच. पण दोन भागात- 'एक्झिट १' आणि 'एक्झिट २'. पहिला भाग वाचत असताना हिच कथा आहे, असं वाटून जातं. पण दुसरा भाग काहीतरी नवीनच समोर ठेवतो. पार धक्काच देतो. जोराचा.


एक्झिट कथा दोन स्त्रियांच्या मनातलं वादळ मांडते. मीता आणि प्रज्ञा- एक कथेची पात्र, तर दुसरी कथा लेखिका. एक्झिट एक कथा असली, तरी दोन जगणं आपल्यासमोर ठेवते.


कथा काल्पनिक नसतात, या मताचा मी आहे. त्या अनुभवाधारित किंवा प्रसंगाधारित असतात. (केवळ मनेरंजनासाठी लिहिलेल्या कथांबाबत बोलत नाही. कारण त्या पूर्णपणे काल्पनिकच असतात.) अर्थात कथेच्या गरजेनुसार थोडी खेचाखेच आणि काही रंजित घटना त्यात समाविष्ट केल्या जातात. पण सरसकट नाही. आणि काही कथा तर आपल्या आजूबाजूला घडलेली एखादी घटनाच वाटावी इतकी वास्तवदर्शी असते. 'एक्झिट'ला वास्ताचा मोठा स्पर्श मला जाणवला. ती कुठल्या घटनेवर आधारित आहे की पूर्णपणे कल्पनेतून साकारलीय, हे कथालेखिकाच सांगू शकेल. म्हणजे प्रज्ञा दया पवार याच.


पहिल्या भागात मीता नामक स्त्रीची कथा आणि व्यथा मांडलीय. सिद्धहस्त दिग्दर्शकाशी १५ वर्षांचं लग्न मोडून एका ज्युनियर आर्टिस्टशी म्हणजेच कुबेरशी नीता लग्न करते. पण त्याच्यशी पटत नाही. तो मारझोड करतो. एका मोठ्या दिग्दर्शकाला सोडून ज्युनियर आर्टिस्टशी लग्न केलं. का तर तो आवडला. पण काळाने त्यालाही बदलवलं. मग पुढे मीताच्या मनाची घालमेल. कुबेर घर सोडून जातो. मीता एकटी पडते वगैरे. असं खूप काही पहिल्या भागात कथा गुंतवते.


आता दुसरा भाग याच कथेचा शेवट असेल, असं वाटतं तोच काहीतरी धक्कादायक वाचयला मिळतं. प्रज्ञा नामक लेखिकेने कथा लिहिलेली असते आणि पहिल्या भागातील मीता ही प्रज्ञाच्या कथेची पात्र असते. कथेचं रुपच पालटतं. अगदी धक्कादायकपणे. मध्यरात्री मीता म्हणजेच कथेची पात्र लेखिकेच्या घरी येते. मग सुरु होतो लेखिका प्रज्ञा आणि कथेतील पात्र मीता यांचा संवाद. वाचक अक्षरश: गुंतून राहील असा संवाद.


पहिला भाग गुंतवून ठेवतो कथेत, तर दुसरा भाग धक्केच देतो. कथेचं पात्रच रात्री अपरात्री घरी येतं म्हटल्यावर आणखी काय होणार?


मीताची कथा प्रज्ञाने छान लिहिलीय आणि प्रज्ञाची कथा प्रज्ञा दया पवार यांनीही छान लिहिलीय. कथेचा फॉर्म प्रचंड आवडला.


'
अफवा खरी ठरावी म्हणून...'ची पहिलीच कथा खूप आवडली. म्हणून त्यावर थोडं लिहिलंय. अजून यातील ११ कथा वाचायच्या आहेत. आता थेट संपूर्ण कथासंग्रह वाचून झाल्यावरच सविस्तर लिहीन. तोपर्यंत इतकंच.


(माझं अनुभवविश्व कदाचित या कथांमधील बारकावे, संदर्भ नीट समजू शकणार नाही. पण तेवढी मुभा वाचकांनी आणि लेखिकेने मला द्यावी.)

14 September, 2016

ऑगस्टची खरेदी



ऑगस्टच्या पगाराची खरेदी उशिरा झाली. इतकी की, पाच-सहा तारखेपर्यंत होणारी खरेदी, आज १४ तारीख उजाडली. म्हणजे पंधरवडा उलटलाच. हे ठीक नाही. पाच-सहा तारखेपर्यंत नवी पुस्तकं घरात आलीच पाहिजेत. अन्यथा पुस्तकांचं कपाट सैरभैर होतं. बाकी काही नाही.


माझ्या पुस्तकांचं कपाट म्हणजे अतृप्त आत्माच. पुस्तकांची भूक शमता शमत नाही. महिन्याच्या सुरुवातीला नवी पुस्तकं हवीच. अन्यथा मला त्रास देतो. हे कपाट माझ्यावर आर्थिक मंदी लादणार, हे नक्की. असो.


तर पहिल्या आठवड्याऐवजी आज पंधरवाडा उलटता-उलटता वझिरा नाका गाठला. शब्द बुक गॅलरीत गेलो. आज पूर्ण बुक हाऊस फिरलो नाही. पहिल्याच स्टँडमधील आठ पुस्तकं निवडली. अर्थात प्रत्येक पुस्तक वाचावं असंच आहे.


खरंतर पुस्तक निवडण्यामागे एक कारण असतं. तसंच आजच्या खरेदीतील पुस्तकांनाही आहे. आज जी पुस्तकं घेतलीयेत, त्यात ग्रामीण वास्तव मांडणारीच निम्मी आहेत. उदाहरणार्थ- कृष्णात खोतांच्या 'गावठाण' आणि 'धूळमाती' या दोन कादंब-या, शिवाय आसाराम लोमटेंचे 'इडा पीडा टळो' आणि 'आलोक' हे दोन कथासंग्रह.


पण फक्त ग्रामीणच नाही. असंही एक पुस्तक खरेदी केलंय, जे खरंतर आधीच वाचायला हवं होतं. पण असो. उशिरा का होईना अखेर माझ्या संग्रहात दाखल झालंय. ते म्हणजे, प्रज्ञा दया पवार लिखित 'अफवा खरी ठरावी म्हणून..' हा कथासंग्रह.


आणि वरील पुस्तकांसोबत माझ्या आवडत्या लेखाकाची एकूण तीन पुस्तकं खरेदी केलीत. अर्थात विलास सारंग यांची. 'तंदूरच्या ठिणग्या', 'मॅनहोलमधला माणूस' आणि 'कविता १९६९ ते १९८४' अशी तीन पुस्तकं. खरंतर विलास सारंगांचे संपूर्ण साहित्य माझ्या संग्रही हवंय. लवकरच घेईन. कारण शेवटी खिशाकडेही पाहावं लागतं. नाहीतर उशिरा येणारी आर्थिक मंदी आताच यायची अंगावर.


तर प्रवीण बांदेकरांचं 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' घ्यायचं होतं. ते विसरलो. पुढच्यावेळी तेच आधी घेणार. असो.


एकंदरीत आज मोठी खरेदी केलीय. पुस्तकांचं कपाट आणि माझी वाचनाची भूक थोडी का होईन यांनी शमवण्याचा प्रयत्न करतो. अजून खूप वाचायचंय. खूप खरेदी करायचीय. तोपर्यंत इतकंच.

08 September, 2016

गांधी, उदयनराजे आणि अॅट्राॅसिटी



महात्मा गांधी आणि उदयनराजेंमध्ये लय इंटरेस्टिंग साम्य आहे. कुणी विचारही केला नसेल. पण तुम्हाला तर माहितंचय मी किती हुशार आहे. त्याच हुशारीचा वापर करुन गांधी आणि उदयनराजेंमधलं 'साम्य' शोधलंय. चला... फार दुनिया घुमाके न आणता सांगूनच टाकतो.


गांधी कुठेतरी कधीतरी बोलले होते की, माझी दोन विधानं परस्परविरोधी असतील, तर दुसरं विधान ग्राह्य धरा. कारण दोन विधानांदरम्यान माझ्यात मतपरिवर्तन झालं असणार.


उदयनराजेही याच पाँईंटवर गांधींसारखे आहेत. आता उदयनराजे असे कुठे म्हणाले नाहीत. पण त्यांचा इतिहास हेच सांगतो की, त्यांच्या दोन विधानांपैकी दुसरं विधान ग्राह्य धरावं. कारण उदयनराजेंनी पहिलं विधान 'चढल्यावर' केलं असण्याची शक्यता अधिक असते. 'उतरल्यावर' कळतं की, आपण बोलण्यातून मोठा घोळ घातलाय. मग दुरुस्ती करुन दुसरं विधान करतात.


आता तुम्हाला माहितंचंय की मी उदाहरणाशिवाय बोलत नाय. घ्या उदाहरण- बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण देण्यासाठी पत्रकारांसमोर पाठिंबा दर्शवला. पण नंतर बहुधा 'उतरली' असावी. तेव्हा मग पत्रक काढून 'बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवरायांचा इतिहास वास्तवाला धरुन नाही' असे जाहीर केलं आणि महाराष्ट्रभूषण देण्यास कडाडून विरोध केला.


सो उदयनराजेंना इतकं सिरियसली घेण्याची गरज नाही. टेक इट इजी.


आता राहता राहिला मुद्दा अॅट्राॅसिटीचा किंवा गैरवापर होत असल्याचं बोलण्याचा. तर गैरवापर होतोय, असंही बोलायचं नाही ही हुकुमशाही आहे. रद्द करावा की नाही, हा आकडेवारी व गैरवापरांच्या संख्येवर आधारित मुद्दा आहे. पण गैरवापर होतोय, असंही बोलू नये, हे जरा अतिच होतंय.


कुणी निरपराध मराठा तरुण केवळ अॅट्राॅसिटीमुळे पोलीस ठाण्याचे आणि कोर्टाचे उंबरठे झिजवत असेल, तर त्या कायद्याविरोधात त्याच्या मनात राग निर्माण होणं सहाजिक आहे आणि हा राग व्यक्तच करायचा नाही, असे म्हणणे म्हणजे मुस्कटदाबी आहे.


बाकी अॅट्राॅसिटीचा किती गैरवापर होतोय, याची आकडेवारी अजून माझ्याकडे तरी नाही. माझं गाव कुणबी आणि मराठ्यांचं आहे. मात्र, अजूनही कुणाला अॅट्राॅसिटीचा गैरवापर झाल्याचा अनुभव नाही. तरीही अॅट्राॅसिटीवर सखोल चर्चा व्हावी, या मताचा मी आहे.

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...