पूर्व प्रसिद्धी- दैनिक ऐक्य (सातारा)
परवा गावी
गेलो होतो. तालुक्याच्या ठिकाणाहून थेट गावात जाणारी गाडी पकडली. खूप दिवसांनी
गावाकडे निघालो होतो. एसटीने गावाच्या दिशेला कूच केली. शासनाच्या ह्या लाल
डब्याची सफर गेली सहा-सात वर्षे केली नव्हती. आज किती वर्षांना एसटीत बसलो होतो.
गाव डोंगरात असल्याने तालुक्याच्या ठिकाणाहून गाडी चढणीला लागली. एसटीतून मागे
एकदा टोकावून पाहिलं...तालुक्याचं ठिकाण खूपच ओबड-धोबड वाढलेलं पाहून थक्क झालो.
चार-पाच वर्षात हे शहर इतकं पसरावं, याची कल्पना नव्हती. तालुक्याचं ठिकाण
शहरीकरणाच्या कचाट्यात सापडलं होतं. पाच-सहाशे दुकानं आणि घरं असलेलं तालुक्याचं
ठिकाण आता पाच-सहा हजारांच्या घरात गेलंय. हळूहळू एसटी डोंगराच्या आड
गेली..तालुक्याचं ठिकाण दिसेनासं झालं. चार-पाच गावांनंतर माझं गाव. प्रत्येक गावात
गाडी थांबत-थांबत चाललेली.. चार गावं गेल्यानंतर गाडी उतरंडीला लागली. लांबूनच
नारळीची दोन झाडं स्वागत करताना दिसली. गावाच्या वेशीवर येऊन पोहोचलो.
‘बारशेतवाले’ कंडक्टर ओरडला. मी पटापट सामान सीटवर उतरवून घेतला आणि एसटीतून उतरलो.
थोडा वेळ एसटी स्टँडवरच थांबलो. गाव खूप बदलल्याचं तिथेच जाणवलं.. एसटी स्टँडवर
थांबल्या ठिकाणी मला आठवलं... पूर्वी गावात एसटी आली की, एसटीतनं मुंबईहून कोण
आलंय हे पाहायला गावातली तमाम चिमुरडी धावत-पळत यायची. मुंबईहून आलेल्या माणसाचं खूप
कौतुक असायचं. मुंबईहून आलाय म्हणजे एक वेगळाच मान गावात मिळायचा. हे सारं आठवत
एसटी स्टँडवर उभा होतो. थोड्याट वेळात भानावर आलो. एसटीतून कोण आला हे पाहायला
कुणीच आला नव्हता.. आता एसटीचंही विशेष आकर्षण राहिलं नाही.
पूर्वी गावात एसटी आली की गावातील लहान-सहान मुलं एसटी स्टँडच्या दिशेना
धावत. एसटी आली...एसटी आली.. असे बोंबळतच आपल्या सवंगड्यांसह गावातील असेल-नसेल
तेवढा ताफा एसटी स्टँडवर येई. कोण आलंय मुंबईहून? याची उत्सुकता आम्हा चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर असे. मुंबईहून गावातला कोणी
का आलेला असेना, येणाऱ्याच्या घरातल्यांना जितका आनंद तितकाच आम्हा चिमुरड्यांना
असे. एसटी थांबली पण नसायची तेव्हा एसटीत कोणी दिसतं का ते पाहणं सुरु असायचं.
एसटीतून उतरल्या-उतरल्या त्याच्या हातातलं सामान घेण्यासाठी झुंबड उडत असे. तेव्हा
गावात येणारं दुसरं वाहन नव्हतं. एसटी ही एकमेव वाहन होतं जे नेमाने गावात येई.
अर्थात ती कधीच वेळेवर नसे मात्र गावतल्यांना दळणवळणाचं ते एकमेव साधन. गावातल्या
आम्हा चिमुरड्यांना एसटीबद्दल वेगळं आकर्षण होतं. तालुक्याच्या ठिकाणाहून
निघालेल्या एसटीसाठी आमचा गाव शेवटचा स्टॉप असल्याने ड्रायव्हर-कंडक्टर हात-पाय
धुण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी एसटी थोडा वेळ थांबवून ठेवत. मग आम्ही मुलं
एसटीत चढून धुमाकूळ घालत असायचो.
आज गावाच्या एसटी स्टँडवर उतरलो आणि साधं चिटपाखरुही स्वागताला नव्हतं.
गावात आल्यावर एकप्रकारचा पोरकेपणा जाणवला. एसटीबद्दल ती उत्सुकता आता लहान-सहान
पोराबाळांमध्ये राहिली नाही. अनेकांच्या घरापुढे दुचाकी लावलेली पाहिल्यावर एसटीवर
न आलेल्या चिमुरड्यांच्या मागची कारण मी समजलो. एसटी ही आता फक्त अतिगरीब अशांसाठी
राहिलीय की काय असे एका क्षणी मनात येऊन गेलं.
एसटीच्याही अधिक इतर चारचाकींचं गावातल्या आम्हा मुलांना कुतुहल असायचं.
गावात चारचाकी आली की गावातली झाडून एकूण एक पोरं-बाळं त्या चारचाकीच्या गोल रिंगण
घालून उभे राहायचे. गावात येणारा रस्ता डांबरी नसल्याने गाडी धुरळ्याने माखलेली
असायची. माग चारचाकीवर धुरळा बसला की त्यावर आपलं नाव लिहिणं वगैरे चालू व्हायचं.
हल्ली तसेही फार काही होत नाही. किंबहुना नाहीच.
गावातल्या चिमुरड्यांना आता चारचाकी, दुचाकीबद्दल फार कुतुहल-बितुहल राहिलं
नाही. जग बदललं म्हणजे नक्की काय झालं...तर हे असे.
गवातली पोरंबाळां एसटी स्टँडवर झुंबड करत येतील अशा आशेनं उभा असलेला मी
कुणीच न आल्याने सामान उचलला आणि गावात प्रवेश केला. गावाच्या वेशीतून आत गेल्यावर
एकप्रकारची स्मशाण शांतता जाणवली. गावात कुणीच नाही की काय? असा भास व्हावा, इतकी शांतता गावात भासली. पूर्वी एसटी आल्यावर मुलं जशी
एसटी स्टँडच्या दिशेना धावत, अगदी तसंच गावातली म्हातारी-कोतारी वऱ्हांड्यात येऊन
उभी राहायची. कोण आलंय मुंबईतून हे पाहण्यासाठी. मात्र आज ना कुणी म्हातारी-कोतारी
ना कुणी चिमुरडे. आपण आपल्याच गावात आलोय ना, हे पडताळून पाहावं की काय, अशी
शांतता गावात पसरलेली.
गावातला घरपट माणूस मुंबईत. काहीजण तर गावाला सोडचिठ्ठी देऊन थेट मुंबईतच
स्थायिक झालेत. मुलांचं शिक्षण, रोजगार अशी कारणं देत गावाला सोडून थेट मुंबई
गाठली आणि तिथेलच झाले. त्यांचंही गावाला येणंजाणं होतं मात्र तेही पाहुण्यासारखं.
गाव आता पोरका वाटू लागतो. ऐन संध्याकाळी गावात पोराबाळांता जो धुमधडाका असायचा तो
आता होत नाही... गाई-गुरांना गोठ्याकडे ओरडत-ओरडत नेणारा गुराखी कुठे दिसत नाही. ‘बावा, आलास काय मुंबईसून?’ असा डोळे
मिचमिचवत, चेहऱ्याचा मुका घेणाऱ्या आजीचा सवाल कानावर पडला नाही. सारं काही वेगळं
वाटत होतं. कुणा दुसऱ्याच्या येथे पाहुणा गेल्यावर जे वातावरण असतं, तेच आज गावात
वाटत होतं. गेल्या सहा-सात वर्षात किती बदललं ना हे गाव ? मरायला टेकलेले आजी-आजोबा आणि हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच
चाळीशी-पन्नाशीतले राहिलेत गावात...नाहीतर बहुतेकांनी थेट मुंबईच गाठली. मुंबईच्या
महागड्या खोलीत माय-बापाला जागा नसल्याने त्यांना महिनाकाठी ठराविक रक्कम देऊन
गावी ठेवलेले अनेक भेटले. गावगाडा म्हणून काही राहिलाच नाही. असेल तर तसा तो
भासलाच नाही.
अखेर घरात शिरलो... घरामागून एक मोठासा गाईचा हंबरडा ऐकायला आला आणि मन
तृप्त झालं. गावाकडे आल्याचा हा पहिला भास. जे माणसांनी नाही कळलं ते
गाई-बैलांच्या हंबरड्यांनी कळलं. ‘लेका, तू
गावाकडे आलायेस रे बाबा’ असे
सांगण्याचाच प्रयत्न त्या गोमातेने हंबरड्यातून केला असावा. इतका काळजात घुसला तो
हंबरडा.
ही कथा माझ्याच गावाची नव्हे.. असे अनेक गावं आता ओसाड पडत चाललीत..ओसाड
शेतासारखी! जितकं भावनिक व्हायला होतं हे सारं पाहिल्यावर
त्याचवेळी चिंताग्रस्तही. गावाकडची मुंबईला जाणारी माणसं काही मौजमजेला जात नाहीत,
हे वास्तवही मला आठवलं. गाव सोडून मुंबईसारख्या अफाट गर्दीच्या शहरात जाणारा
पोटाची खळगी बुजवण्यासाठीच जातो.. तेव्हा
लक्षात येतं गावं ओसाड पडण्याचं कारण. गारपीट, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी या साऱ्यांनी
कंटाळलेला शेतकरी पोराबाळांना मुंबईसारख्या शहरात पाठवू लागला आहे. इकडं काही होऊ
शकत नाही... ना दोन वेळेचं पोट भरु शकत, अशा मानसिकतेत गावाकडची माणसं दिसली.
सहा-सात वर्षांपूर्वी जो गाव मी अनुभवला तसा गाव आता नव्हता.. याची ही दुसरी बाजू
होती.
गाव आता पूर्वीसारखा राहिला नाही, गावात आल्यावर पूर्वसारखं वाटत नाही, अशी
मी नावं ठेवत असताना मी मलाच एक प्रश्न केला ‘मी तरी कुठे गावाचं गावपण सांभाळायला इथे राहिलो? मी सुद्धा मुंबईच गाठली ना?’
No comments:
Post a Comment