22 June, 2020

द मॅन फ्रॉम बलिया

Image may contain: 1 person, beard and close-up


भारतात पंतप्रधानपदावर विराजमान झालेली व्यक्ती साधारणत: आधी कुठल्या ना कुठल्या मंत्रिपदावर विराजमान होऊन आलेली असते. आजही आणि आधीही, अप्रत्यक्षपणे हा प्रघात राहिलाच आहे. किंवा वरच्या पदाच्या त्या पायऱ्याच म्हणूया. (राजीव गांधी अपवाद. पण ते पंतप्रधान होण्याला वेगळी कारणं होती)

पण चंद्रशेखर हे असे नेते होऊन गेले, जे खासदार राहिले आणि थेट देशाचे पंतप्रधान... अधेमधे ना कुठलं मुख्यमंत्रिपद, ना कुठलं केंद्रीय मंत्रिपद. त्या पदावरून उतरल्यावरही पुढे ते कधीच कुठल्या मंत्रिपदावर गेले नाहीत. जणूकाही सरकारमधील 'पंतप्रधानपद' या एकाच पदासाठी ते बनले होते.

'द मॅन फ्रॉम बलिया' म्हणून देश ज्यांना ओळखतो त्या चंद्रशेखर यांची 'जीवन जैसा जिया' आत्मकथा वाचली. त्याआधी चंद्रशेखर यांच्याबद्दल फारच जुजबी माहिती होती. मात्र, राजकमलनं प्रकाशित केलेली ही त्यांची आत्मकथा त्यांच्या अनेक चढ-उतारांची विस्तृत माहिती देणारी आहे. तीही स्वत: चंद्रशेखर यांच्या शब्दात.

राजनितीने देश के एक साहित्यिक को छिन लिया... असं चंद्रशेखर यांच्याबद्दल हिंदी साहित्य वर्तुळात म्हटलं जाई. हिंदी भाषेवर त्यांचं कमालीचं प्रभुत्व होतं. त्यांच्या आत्मकथेतील भाषा शैलीतून ते लक्षातही येतं.

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील इब्राहिमपट्टीचा राहणारा हा समाजवादी आंदोलनातील धडाडीचा कार्यकर्ता पुढे काँग्रेसमध्ये गेला आणि तिथूनही पुढे बाहेर पडला. या माणसाचं संपूर्ण आयुष्य विस्मयचकित करणारं राहिलंय.

कर नाही त्याला डर कसली, या उक्तीनं जगलेला हा माणूस. एक प्रसंग यात आहे. राम मनोहर लोहियांसारख्या पहाडी व्यक्तीला आपल्या गावात बोलावून, 'आप खाना खा के निकल जाइए' असं बेधडकपणे बोलणारा हा माणूस काय निडरवृत्तीचा असेल, याची कल्पना केलेली बरी.

त्याचं झालं असं की, गावाजवळील वार्षिक कार्यक्रमात आचार्य नरेंद्र देव यांना बोलावण्याचं ठरलं होतं. पण त्यांना ते शक्य नव्हतं म्हणजे आचार्यंनी राम मनोहर लोहियांना जाण्यास सांगितलं. लोहियांना कोलकत्त्यात काही काम होतं, म्हणून ते जाण्यास उत्सुक नव्हते. पण आचार्यंची विनंती टाळणं शक्य नव्हतं. पण कोलकात्याला जाण्यासाठी बलियातून सर्व नियोजन करावं, अशी अट घालून ते बलियात आले. पण येईपर्यंत ते कुरकूर करत राहिले. परत जाण्याचं कुठलंच नियोजन केली नसल्याची तक्रार-कम-आरोप लोहियांनी चंद्रशेखर यांच्यावर केला आणि चंद्रशेखर भडकले.

लोहिया त्यावेळी प्रचंड लोकप्रिय होते. मात्र, आपल्या प्रामाणिक हेतूंवर संशय घेणाऱ्या लोहियांना चंद्रशेखर म्हणाले, 'हमारे कार्यक्रम में आपकी जरूरत नहीं, आप खाना खा के निकल सकते हो' पुढे लोहियांना आपली चूक कळली आणि त्यांनी कार्यक्रम करून जाण्याचा निर्णय घेतला.

चंद्रशेखर यांच्याबद्दलचा हा एकच प्रसंग नाही. देशात ज्यावेळी इंदिरा गांधी यांची प्रतिमा 'आयर्न लेडी' म्हणून प्रस्थापित झाली होती, ज्यावेळी अनेक बडे नेते इंदिरा गांधींसमोर बोलायला बिथरत असत, त्यावेळी चंद्रशेखर हे इंदिरा गांधी यांच्यासमोर परखडपणे बोलण्याचं धाडस बाळगून होते. असाच प्रसंग ते मोरारजी देसाईंबाबत घडलेला सांगतात.

मोरारजी देसाईंशी काहीशा कारणावरून भांडण झालं. लोकसभेतच दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. चंद्रशेखर त्यावेळी काँग्रेसमध्येच होते. इंदिरा गांधींनी चंद्रशेखर यांना वैयक्तिकरित्या गाठत सांगितलं, "मोरारजी भाई बडे है. मैं नहीं चाहती आप पार्टी से बाहर हो. आप माफी माँग लिजिए." क्षणाचा विलंब न करता, चंद्रशेखर इंदिरा गांधी यांना म्हणाले, "मैं कोई हिंदू रमणी नहीं हूँ, जो मरते वक्त तक पती का साथ निभाए. स्वाभिमान के साथ जिता हूँ" हे सांग त्यांनी पक्षालाही राम राम ठोकण्याचा गर्भित इशारा दिला. असे होते चंद्रशेखर.

चंद्रशेखर यांच्या समाजवादी ते काँग्रेस या प्रवासावर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यावेळीही आणि आताही घेतला जातो. पण समाजवादी असो किंवा कुठे, जिथे चंद्रशेखर गेले, तिथे त्यांनी समाजवाद रुजवण्याचा प्रयत्न केला. राजकारणाचे डावपेच खेळले, पण समाजावादाच्या मुलभूत विचारांशी ते ठाम राहिले.

एकदा स्वत: इंदिरा गांधींनी विचारलं, आप काँग्रेस को समाजवादी मानते हैं क्या? त्यावर चंद्रशेखर म्हणाले, "थोडा मानता हूँ, थोडा मनवाना चाहता हूँ" इंदिरा गांधींना हे काही कळलं नाही. इंदिरा गांधींनी आणखी विचारल्यावर चंद्रशेखर म्हणाले, "अगर काँग्रेस को समाजवाद के तरफ नहीं ले सका, तो काँग्रेस को ही तोड दुँगा" --- इतके स्पष्ट होते चंद्रशेखर.

आणीबाणीनंतर स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांना पंतप्रधानपद मिळेल अशी आशा होती. पण त्यावेळी मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. ते न मिळाल्याने चंद्रशेखर नाराज असल्याच्या बातम्या सुद्धा त्यावेळी आल्या. मोराराजींच्या मंत्रिमंडळात त्यांच्या कुठलेच मंत्रिपद न घेण्याच्या निर्णयानं त्या बातम्यांना आणखीच खतपाणी घातलं.

पुढे नोव्हेंबर 1990 ते जून 1991 दरम्यान भारताचे पंतप्रधान झाले. सातच महिने त्यांना कार्यकाळ मिळाला. राजीव गांधींच्या पाठिंब्यावर हे सरकार होतं. खूप टीका झाली या सरकारवर. अर्थसंकल्पही मांडता आला नाही, इतकं अस्थिर सरकार होतं हे. पण ज्यावेळी राजीव गांधी पाठिंबा काढतायेत, अशी कुणकुण लागली, पाठिंबा काढण्याआधीच चंद्रशेखर यांनी राजीनामा दिला.

पुढेही ते संसदेत खासदार म्हणून जात राहिले. पण कुठल्याच मंत्रिपदाला पुन्हा स्पर्श केला नाही. आपला जन्म केवळ पंतप्रधानपदासाठीच झालाय, हेच कदाचित ते सांगू पाहत होते की काय, असं वाटून जातं.

जवळपास चार-पाच दशकं राजकारणात राहूनही ते आर्थिकदृष्ट्या कफल्लकच राहिले. एक दिवस त्यांच्या पत्नीनं विचारलं, "आप ने बच्चों के लिए कुछ भी किया नहीं." चंद्रशेखर सांगतात, पत्नीचं ते वाक्य ऐकून मन भरून आलं, काहीच उत्तर देऊ शकलो नाही.

नवी दिल्ली ते कन्याकुमारी असा चार हजारहून अधिक किलोमीटरचा प्रवास करून भारत समजून घेणारा, पक्षाचा कार्यकर्ता ते अध्यक्ष होऊनही कुठल्याच मंत्रिपदावर न गेलेला, थेट पंतप्रधानपदावर पोहोचलेला आणि कुणीही पाठिंबा काढण्याआधी देशाच्या सर्वोच्च पदाचा राजीनामा दिलेला, उत्तरप्रदेशातील छोट्याशा गावातून आलेला शेतकऱ्याचा पोरगा, राजकारणातल्या भल्याभल्यांना तोंडावर सुनावणारा....हा नेता समजून घेण्यासाठी 'जीवन जैसा जिया' वाचायलाच हवं. वाचताना तुमचा ताबा घेतो हा माणूस - इतकं सुंदर लेखन आहे.

18 May, 2020

प्रॅक्टिकल क्रांतिकारक

एक छोटासा प्रसंग सांगतो. इन्स्पिरेशनलही म्हणता येईल. एका ध्येयानं माणसाला किती पछाडावं आणि मोठ्या जिद्दीनं, कष्टानं ते कसं पूर्ण करावं, याचं हे छोटंसं उदाहरण.
दक्षिण गोव्यात वसलेलं काणकोण हे शहर. विसाव्या शतकाच्या सुरूवातील हे शहर विस्तारित गावंच होतं. इथं घडलेला १९१०-१९१५ सालाच्या दरम्यानचा हा प्रसंग.
काहीशा कामासाठी पैंगीणकर हा माणूस काणकोणच्या मामलेदार कचेरीत गेला होता. साहेब कामात असल्याचं सांगत तिथल्या कारकूनानं पैंगीणकरांना बाहेर वऱ्हांड्यात बसायला सांगितलं.
पैंगीणकर नम्र माणूस. ते बाहेर वऱ्हांड्यातल्या बाकावर बसले. तेवढ्यात आतून पोके प्रभू चोडणकर नावाचा कारकून बाहेर आला आणि म्हणाला, “पैंगीकरण, इथून उठ. तू कोण, कुठल्या जातीचा, याचा विचार न करता बाकावर बसलास. बाकावर बसण्याची तुझ्या जातीचा पात्रता नाही.”
पैंगीणकर संतापले. पण तिथं पर्याय नव्हता. ते तिथून उठले नाहीच. पण काम झाल्यानंतर तिथून निघताना पैंगीणकर म्हणाले, “पोके प्रभू, माझ्यात जर माणसाचं रक्त असेल, तर प्रतिज्ञा करतो. एक दिवस तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून माझे वंशज बसलेले मी पाहीन.”
मधल्या काळात पैंगीणकर या माणसानं समाजक्रांतीचं मोठं काम केलं. ते यथावकाश थोडक्यात पुढे सांगेनच.
पुढे १९६३ साली गोव्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून दयानंद बाळकृष्ण बांदोडकर म्हणजेच ज्यांना आपण भाऊसाहेब बांदोडकर म्हणतो, त्यांनी शपथ घेतली.
ही बातमी समजातच पैंगीणकरांचे डोळे पाणावले.
“अण्णा, रडताय?” कुणीतरी पैंगीणकरांना विचारलं.
ते म्हणाले, “हे आनंदाश्रू आहेत. काणकोणत्या कचेरीत पोके प्रभू नावाच्या कारकूनाला म्हटलं होतं, तुझ्या खुर्चीला खुर्ची लावून माझ्या समाजाचा वंशज बसवेन. आज खुर्चीला खुर्ची नव्हे, तर गोव्याच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदी माझ्या समाजाच माणूस बसलाय. आज पोके प्रभू जिंवत असता, तर त्याला मोटारीत टाकून नेला असता आणि बांदोडकरांचा शपथविधी दाखवला असता.”
हे पैंगीणकर म्हणजे देवदासी समाजाला जाचक अनिष्ट प्रथांच्या बेड्यांमधून मुक्त करणारे ‘राजाराम रंगाजी पैंगीणकर’
देवदासी म्हणजे देवळी समाज. घरातली एक स्त्री देवाला वाहिली जात असे. देवदासी म्हणत तिला. देवदासी कसली भोगदासीच. तत्कालीन ब्राह्मणांकडून तिचा केवळ वासनेसाठी वापर केला जाई. तिला होणाऱ्या मुलाबाळांना ना नाव दिलं जाई, ना घरच्या जमीनजमुल्यातला एक कण.
स्वत: राजाराम हा अशाच देवदासीच्या पोटी जन्मलेला मुलगा. त्याच्या नावाचा प्रसंग असाच अंगावर काटा आणणारा आहे.
वयाच्या दृष्टीनं लवकरच समज आलेला राजाराम फार हुशार होता. वाचनाची प्रचंड आवड. पुण्यात टिळक केसरी वृत्तपत्र काढत असल्याचं त्याला कळलं. त्यानं कसेतरी पैसे जमवून वृत्तपत्र मागवायचं ठरवलं. त्यासाठी मनीऑर्डर केली, पत्र पाठवलं.
काणकोणच्या पोस्टातून हा सर्व व्यवहार झाला. त्यावेळी राजारामनं पत्रात नाव लिहिलं, ‘राजाराम रंगाजी पैंगीणकर’.
कुणीतरी येऊन राजारामच्या आईला ज्यानं ठेवून घेतलं होतं, त्या बाप्पााला हे सांगितलं. तो भडकला. तातडीनं राजारामच्या घरी आला आणि म्हणाला, “माझं नाव यानं का लावलं, तोंड दाखवायला जागा ठेवली नाही यानं.”
बरीच वादावादी झाल्यानंतर राजाराम म्हणाला, “मी आईचं नाव लावलंय. देशावर गाणारीच्या नावामागे जी लावतात. म्हणून तुझं नाव रंगा आणि मागे जी लावलं – रंगाजी.”
त्यावर बाप्पा म्हणाला, मग आणखी एक जी लाव.
राजारामला त्यांचा टोमणा कळला. त्याला वाईट वाटलं. त्याला एवढी समज होती की, लहान मुलांनी शौच केली की त्याला ‘जीजी’ म्हणतात.
बापाचं नावही लावता येऊ नये, असला कसला हा समाज आणि असल्या कसल्या ह्या परंपरा, यानं राजाराम संतापला, रडला. त्याची आई सुद्धा हतबल होती. पण पुढच्या काळात याच रुढी-परंपार मोडीत काढण्यासाठी राजारामनं आयुष्यभर खास्ता खाल्ल्या.
देवदासी समाजात ‘शेंसविधी’ चाले. मुलगी अविवाहित राहून मंदिराची सेवा करत असे. भारतात अजूनही काही भागात हे चालतं. या विधीनुसार घराच्या चांगल्या, देखण्या मुलीला मंदिराला वाहिलं जाई. मंदिराला वाहिलं म्हणजे ब्राह्मणांच्या हवाली करत. तिला ब्राह्मण ठेवून घेत.
या आणि अशा प्रथांविरोधात राजाराम पैंगीणकरांनी लढा दिला आणि तत्कालीन पोर्तुगीज सत्ताधाऱ्यांकडून शेंसविधी प्रतिंबंधक कायदा मंजूर करून घेतला. यासाठी त्यांना अवघं आयुष्य खर्ची घालावं लागलं.
मुळात हा समाज गायनाच्या कलेचा. पण ती कला ब्राह्मणांच्या मनोरंजनासाठी असे. कर सुरू म्हटलं की गायचं, वाजव म्हटलं की तबला वाजवायचा असं. कलेला सुद्धा अनिष्ट प्रथांमध्ये जखडून ठेवलं गेलं होतं.
भाररत्न लता मंगेशकर, भारतरत्न एम एस सुब्बुलक्ष्मी, गानसरस्वती किशोरी अमोणकर इत्यादी बरीच नावं या समाजातलीच.
या समाजानं पुढे गोमंतक मराठा समाज, प्रागतिक मराठा समाज असं नाव धारण केलं. पण या समाजाच्या मुळाशी अनिष्ट प्रथा होत्या, किंबहुना त्या प्रथा लादल्या गेल्या होत्या. त्या प्रथांना उखडवून टाकण्याचं काम राजाराम रंगाजी पैंगीणकरांनी केलं आणि समाजातील कित्येकांना यशाची शिखरं बांधून दिली.
या लढ्याला खरी सुरूवात झाली ती, १९१० च्या आसपास.
२ ऑक्टोबर १९१० चं राजाराम रंगाजी पैंगीणकरांचं भाषण म्हणजे इथल्या जाचक व्यवस्थेच्या थोबाडीत मारलेली थप्पडच. त्या भाषणातील काही वाक्य इथे नमूद करावी वाटतात.
“आमचा समाज गुलाम बनलाय. लोकांसमोर वर बसण्याचादेखील आम्हाला दर्जा नाही. आमचा पुरूषवर्ग बायकांच्या जिवावर जगतो आणि बायक इतर समाजाच्या बटीक आहेत. आम्ही देवाची सेवा करतो. पण कोणच्या देवाची? ज्या देवावार किंवा देवळावर आपला काडीचाही आधिकार नाही, अशा देवीची. इतकेच नाही, तर देवळात चौकावर बसण्याससुद्धा आपल्याल जागा नाही? इतर समाजाच्या वासनेचे बळी ठरलेल्या आमच्या घरातील बायकांनाच दोष देतो. का? आमच्या आयाबहिणींना वाटत नसेल की, स्वत:चा संसार असावा? शेंसविधी करून देवाशी लग्न लावून भावनांचा चुराडा नाही का होत? वर दोष कुणाला, देहविक्री करतात म्हणत आमच्याच आयाबहिणींना. संसाराची स्वप्नं जळून गेलेल्या आमच्या आयाबहिणी चंचल कशा?”
राजाराम पैंगीणकरांचं हे धारदार भाषण देवदासी समाजाला जाचातून मुक्त करण्यासाठी घेतलेल्या पहिल्या सभेतलं.
या पुस्तकाच्या लेखिका अमित नाईक याच समाजातल्या. त्यांच्या आईनंही या यातना जवळून पाहिल्यात. त्या या पुस्तकाच्या मनोगतात म्हणतात, ते इथे नमूद करावे वाटते. आणि राजाराम पैंगीणकरांनी शेंसविधी बंद करून नेमके काय महानकार्य केले, हे या वाक्यातून समजून शकेल.
अमित नाईक म्हणतात, “मला वैयक्तिक पातळीवर घराणे म्हणावे, असा वारसा नाही. अर्थात, शोषितांना वैयक्तिक वारसा नसतो. पण त्यांना भरभक्कम सामाजिक वारसा असतो. राजाराम रंगाजी पैंगीणकर हा माझ्यासारख्या अनेकांचा अभिमानास्पद वारसा आहे.”
पुरुषसत्ताक आणि जातीसत्ताक पद्धतीच्या जोखडात अडकलेल्या स्त्रियांच्या मुक्ततेचा अखंड ध्यास घेऊन, तो तडीस नेणाऱ्या राजाराम रंगाजी पैंगीणकरांना मी ‘प्रॅक्टिकल क्रांतिकारक’ असंच म्हणेन.
या संपूर्ण चळवळीदरम्यान अनेकदा दोन पावलं मागे येण्याची त्यांना वेळ आली, कधी माघार, तर कधी नमते घेण्याचीही वेळ आली. ते कधीच आदर्शवादी भूमिकेत राहिले नाहीत. मानवी हक्क आमच्या समाजाला मिळाले पाहिजेत, एवढेच त्यांनी पाहिले.
माझा मित्र अरविंद गजानन जोशी याची ‘अजात’ डॉक्युमेंट्री पाहिल्यानंतर गणपती बाबा यांच्या क्रांतिकारी कार्याबद्दल माहिती कळाली आणि त्यावेळी जसा मी हादरून गेलो होतो. तसाच अमिता नाईक यांचं ‘गोष्ट पैंगीणकरांच्या संघर्षाची’ हे पुस्तक वाचून हादरलो. पैंगीणकर या माणसानं उभारलेला आणि यशस्वीरित्या ध्येयोपर्यंत नेलेला लढा हा केवळ या समाजापुरता नसून, अमर्याद प्रेरणादायी आहे.

16 May, 2020

‘शारदाबाई’ नावाचं रानफुल



एका मुलाचा ढिगाऱ्याखाली सव्वा वर्षाचा असताना डोळ्यांदेखत मृत्यू, काही वर्षांनी आणखी एका मुलाचा दोन महिन्याचा असताना मृत्यू आणि त्यानंतर आणखी काही वर्षांनी तिसऱ्या मुलाचा हातातोंडाशी आला असताना ऐन पस्तीशीत खून… अशा एखाद्या आईवर डोंगर कोसळवणाऱ्या घटना.

यातूनही स्वत:ला सावरत एक बाई जिद्दीनं शिकते, लोकल बोर्डात सलग १४ वर्षे सदस्य राहते, वेगवेगळ्या कमिट्यांचं नेतृत्व करते, शेती करते, अकरा-बारा मुलांना प्रसंगी अंगावरचे दागिने विकून शिकवते… हे कुणालाही स्वप्नवत वाटावं असं जगणं आहे – ‘शारदाबाई गोविंदराव पवार’ – या बाईचं.

या पुस्तकात एक वाक्य आहे - ‘काळोखातून चंद्रकोर प्रकट व्हावी, कलेकलेनं ती वाढत राहावी आणि एकेदिवशी तमाम सृष्टीनं पौर्णिमा अनुभवावी’. शारदाबाई गोविंदराव पवार या बाईचं आयुष्य हे नेमकं याच वाक्याचं जिवंत उदाहरण आहे.

खूप दिवसांपूर्वी ‘लोक माझे सांगाती’ हे शरद पवारांचं आत्मचरित्र वाचलं होतं. भारावून गेलो होतो. सतत पन्नास वर्षे राज्य आणि देशाच्या राजकारणाचा सक्रीय भाग राहणं आणि तेही अवघ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आपल्या चाली-चितपटांकडे लावून ठेवणं, हे सहजसोपं काम नाहीय. स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकीय परिघात हे फारच क्वचित नेत्यांना जमलं असावं. पण हे शरद पवार इतक्या उंचीवर का पोहोचले, याचं कारण ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात नसून, ‘शारदाबाई गोविंदराव पवार’ या सरोजिनी नितीन चव्हाण लिखित चरित्रात आहे.

शारदाबाई आणि गोविंदराव पवार

शरद पवार कळण्यासाठी आधी त्यांची आई समजून घेणं गरजेचं आहे. शारदाबाईचं चरित्र वाचल्यानंतर शरद पवारांनी केलेल्या पुढच्या डोंगराएवढ्या कामाचं विशेष नवल वाटत नाही. कारण ज्या वटवृक्षाचा पाया इतका भरभक्कम असेल, त्यानं आभाळभर पसरणं ओघानं आलंच.

कोल्हापूरमध्ये जन्मलेल्या शारदाबाईंचं समज येण्याआधीच पितृछत्र हरपलं. पुढं मोठ्या बहिणीचे पती काकासाहेब जाधव यांच्याकडे आई, स्वत: शारदाबाई आणि लहान भाऊ असे राहायला गेले. पितृछत्र हरपल्यानंतर मोठ्या बहिणीकडे राहावयास जाण्याची शारदाबाईंच्या आयुष्यातील ही घटना इथं नमूद करण्याचं कारण महत्त्वाचं आहे.

काकासाहेब जाधव हे राजर्षि शाहू महाराजांच्या सहवासात वाढलेले. त्याच विचारांचे. अशा माणसाच्या छत्रछायेखाली शारदाबाई आई-भावासोबत राहण्यास आल्यानंतर पुरोगामी विचारांचा वारा लागणार नाही, असं कसं होईल? शारदाबाईंच्या जडणघडणीत आणि एकूणच वाटचालीत मोलाचा वाटा राहिला तो काकासाहेब जाधवांचा. राजर्षि शाहूंच्या विचारांच्या काकासाहेबांनी शारदाबाईंच्या शिक्षणासाठी यशस्वी प्रयत्न केले.

पुढे पुण्यात आल्यांतर रमाबाई रानडेंच्या ‘सेवासदन’मध्ये खऱ्या अर्थाने तल्लख बुद्धीच्या शारदेला ज्ञानाची कवाडं उघडी झाली. आपण समाजापोटी काहीतरी करायला हवं, याची जाणीव रमाबाईंसारख्या विशाल हृदयी व्यक्तीच्या सहवासात आल्यानंतर लक्षात आलं.

पवार कुटुंबीयांचं काटेवाडीतील घर

काकासाहेबांमुळं राजर्षि शाहूंच्या पुरोगामी विचारांचा वसा आणि रमाबाईंमुळे समाजपयोगी कामांचा धडा – हे सर्व आत्मसात करून शारदाबाईंनी पुढे आपली वाटचाल केली.

पितृछत्र हरपलं म्हणून खचून न जाता, प्रवासात मदतीला आलेल्या प्रत्येकाच्या सहकार्यानं आणि स्वत:च्या अफाट इच्छाशक्तीच्या बळावर शारदाबाई राजकारणात उतरल्या. आजच्या जिल्हा परिषदेचं तेव्हाचं रूप असलेल्या लोकल बोर्डात पुणे जिल्ह्याच्या सदस्या झाल्या. वेगवेगळ्या कमिट्यांवर गेल्या.

पोटात सहा-सात महिन्यांचं बाळ घेऊन बारामती ते दौंड आणि दौंड ते पुणे असा रेल्वेनं प्रवास करत शारदाबाई बोर्डाच्या बैठकांना हजेरी लावत. बांधकाम, शेती, शिक्षण अशा विविध समित्यांवर त्यांनी तत्कालीन परकीय सत्तेतही लोकोपयोगी कामं केली. या सगळ्या कामात गोविंदराव पवार या माणसाच्या हातभार आणि आधाराचाही अनुल्लेख करता येणार नाही.

शारदाबाई लोकल बोर्डात बिनविरोध निवडून गेल्यानंतरची बातमी

गोविंदरावांनी शारदाबाईंना दिलेल्या स्वातंत्र्यामुळं कदाचिते हे सर्व शक्य होण्यास सोपं झालं असावं. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुजन समाजातील कुणी बाई अशी शिकते, लोकल बोर्डात जाते, सगळ्या मुलांना हवं तेवढं शिकवते, हे कल्पनावत होतं. पण गोविंदरावांच्या पाठिंब्यांनं आणि जिद्दीनं शारदाबाईनं ते केलं.

केवळ वैयक्तिक प्रगती नव्हे, तर समाजाला आपल्या कामाचा आणि आपल्या कामातून मिळणाऱ्या संदेशाचा कसा उपयोग होईल, हेही बाईंनी पाहिलं. मग ते भूतानं झपाटलेल्या घरात राहून अंधश्रद्धेला मी जुमानत नाही, हे तत्कालीन काहीशा प्रतिगामी वातावारणाला ठामपणे सांगू पाहणं असो किंवा डोक्यावरचा पदर खाली पडू न देण्याच्या त्या काळात पदर कंबरेला खोचून टांगा चालवणं असो… शारदाबाई म्हणजे विलक्षण होत्या.

आपल्या सर्व मुलांना आणि मुलींनाही त्यांनी शिकवलं. संस्कार दिले. महाराष्ट्राच्या खेड्यांमध्ये राहून शारदाबाई या विदुषीनं देशाला हिमालयाशी स्पर्धा करणारी मुलं दिली, हे या पुस्तकातील वाक्य किती यथोचित आहे हे लक्षात येतं. आणि हेही खरंय की, मुलांना शिकवत असताना, संस्कार देत असताना, बाईंनी प्रत्येक मुलाच्या गंधमय वेगळेपणाला हिरावून न घेता फुलू दिलं.

शारदाबाई आणि गोविंदराव पवार

खरंतर शरद पवार नव्हे, तर शारदाबाई या पवार कुटुंबातील पहिल्या राजकारणी. त्यांनी लोकल बोर्डात काँग्रेसचा आधार घेतला, मात्र त्यांची बिजं लढवय्यी शेतकऱ्याची होती. कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेधे अशा मंडळी पवारांच्या घरात येत-जात असतं. पुढे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाल्यानंतर बाई वैचारिकदृष्ट्या या पक्षाच्या जवळ गेल्या. पण काँग्रेसच्या विचारांच्या शरद पवारांना त्यांनी कधी अडवणूक केली नाही.

मात्र, शेकाप आणि काँग्रेसबद्दल बाईंनी नमूद केलेलं मत आजही विचार करण्याजोगं आहे. त्या म्हणत, “काँग्रेसप्रणित समाजवादी समाजरचना तळागातल्या जनतेला कसा न्याय मिळवून देईल? सध्याचा काँग्रेसप्रणित समाजवाद हा आधी समृद्धी, नंतर वाटप असा आहे. तो मला पटत नाही. काँग्रेसला समाजवादी समाजरचना निर्माण करण्याचे कार्य करावयाचे असेल, तर काँग्रेसही प्रथम श्रमजीवी, शेतकरी, कामगार व गरीब मध्यमवर्ग यांचा विश्वास संपादन करणारी असली पाहिजे, तर संपत्तीच्या वाटपामध्ये गरिबांना आधी न्याय मिळेल आणि त्यातून खऱ्या अर्थाने एकसंध समाजाची निर्मिती होऊ शकेल.”

बाईंच्या या वाक्यातून त्यांच्यावरील केशवराव जेधे, कर्मवीर अण्णा, राजर्षि शाहू यांच्या विचारांचा पगडा स्पष्टपणे दिसून येतो.

मात्र, असं असलं तरी त्यांनी शरद पवारांच्या राजकीय विचारांना विरोध केला नाही. शरद पवार १९६७ साली ज्यावेळी पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले, तेव्हा अनंतराव पवार (अजित पवार यांचे वडील) यांनी शरद पवारांच्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यावेळीही शारदाबाईंनी अनंतरावांना आधाराच दिला. आपली विचारसरणी त्या आड आणली नाही.

अनंतराव पवार (अजित पवारांचे वडील) अगदी शरद पवारांसारखे दिसत..

विचारांच्या दृष्टीनं काळाच्या कितीतरी पुढे असलेली बाई, शेतकरी-बहुजन समाजाच्या मदतीसाठी एका पायावर तयार असलेली बाई, घरदार सांभाळताना राजकारणात झोकून देऊन काम करणारी बाई… काळ, प्रवास सर्व उलट दिशेनं वाहत असतानाही धीर न ढळू देता, प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर शारदाबाईनं आकाश ठेंगणं करून दाखवलं.

बाईंच्या विचार आणि कृतीमध्ये किती ताकद होती, हे त्यांच्या पोरा-बाळांनी विविध क्षेत्रात घेतलल्या भराऱ्यांमधून दाखवूनही दिलंय. बीज दमदार असेल, तर वृक्ष चांगलाच फोफावतो – हे याच पुस्तकातील शेवटचं वाक्य याचा सार आहे.

या लेखाचा शेवट करताना याच पुस्तकाच्या सुरूवातीच्या काही ओळी मुद्दाम इथे नमूद करेन. खरंतर शारदाबाईंचं आयुष्य काय होतं, हे या चार-पाच ओळीतून स्पष्ट होईल.

अनेक रानफुळे अतिशय सुवासिक असतात. तथापि, ती रानातच उमलतात, फुलतात. आपला आसमंत सुगंधाने दरवळून टाकतात आणि तेथेच कोमेजूनही जातात. समारंभाच्या व्यासपीठापर्यंत ती पोहोचण्याची शक्यताही नसते. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्या अशा फुलांची समाजाला फारशी माहितीही होत नाही. शारदाबाईंची व्यक्तिरेखा या रानफुलासारखीच.

22 August, 2019

‘रॉ’ची गूढ आणि चित्तथरारक गाथा




काश्मीरप्रश्न ऐन भरात असताना आणि त्यावरून विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या धाडसाबद्दल, एक घाव दोन तुकडे’टाईप निर्णयक्षमतेबद्दल देशभर चर्चा सुरु असताना आणि त्यातच ‘गेल्या 70 वर्षात काय झालं?’ या प्रश्नाची अपार चलती असताना, रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ हे पुस्तक हाती आलं.

वाचताना खिळवून ठेवणाऱ्या पुस्तकांबाबत बोलायचं झाल्यास याआधी लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे, अनुराधा पुनर्वसु अनुवादित ‘अमृता-इमरोज’, सारंग दर्शने अनुवादित ‘शोध राजीव गांधी हत्येचा’ आणि अवधुत डोंगरे अनुवादित ‘राजीव गांधी हत्या : एक अंतर्गत कट’ ही तीन पुस्तकं मी वेड्यासारखी वाचली होती. त्यानंतर बहुधा ‘रॉ’वरील हे पुस्तकच त्या वाचन-वेडानं वाचलवं असावं. पुढल्या पानावर काय आहे, याची भयंकर उत्सुकता मनात सातत्याने बाळदग अगदी भान हरपून हे पुस्तक पूर्ण केलं.

जवळपास तीनशे पानांचं पुस्तक आणि चोवीस प्रकरणं अशा या पुस्तकाचं तांत्रिक स्वरूप आहे. झपाटल्यासारखं वाचल्यास दोन किंवा तीन दिवसात पूर्ण होऊन जातं.

कौटिल्याच्या व्यूहनिती इथपासून भारतीय राजवटीदरम्यान असलेल्या ब्रिटिशांच्या गुप्तचरसंस्था, त्यानंतर स्वातंत्र्योतत्तर भारतातील गुप्तचरसंस्था, मग शेजारी देशांमुळे निर्माण झालेल्या सुरक्षेच्या प्रश्नामुळे भारताला आवश्यकता भासू लागलेली पूर्णवेळ गुप्तचरसंस्था आणि त्यातून स्थापन झालेली ‘रॉ’ अर्थात रिसर्च अँड अनालिसिस विंग.

असा सारा प्रवास मांडत असताना रवी आमले सर ज्या उदाहरणांद्वारे भारताच्या गुप्तचरसंस्थेचा इतिहास सांगत सुटतात. ते वाचताना तल्लीन व्हायला होतं आणि अभिमानाने उर भरून येताना काही क्षणी दचकायलाही होतं, काही क्षणी काळजाचा ठोकाही चुकतो, काही ठिकाणी तत्कालीन राजकीय नेतृत्त्वाच्या निर्णयक्षमतेची आदरयुक्त नि अभिमानयुक्त कमालही वाटते.
अमेरिकेची ‘सीआयए’, रशियाची ‘केजीबी’ आणि इस्रायलची ‘मोसाद’ यांसारख्या जगभरात नावाजलेल्या गुप्तचरसंस्थांच्या गौरवगाथा आपण नेहमीच ऐकत आलोय. मात्र, आपल्याला आपल्याच माणसांची कदर नसते’ हे विधान जसे आपण नेहमीच्या आपल्या आयुष्यात वापरतो, तसंचत ते ‘रॉ’साठी लागू होतं. कारण आपल्याच गुप्तचरसंस्थेची कदर आपल्याला नाही की काय, असा प्रश्न विशेषत: आजच्या घडीला ठळकपणे मला पडतो. याचं कारण विद्यमान सरकारने एअरस्ट्राईक किंवा सर्जिकल स्ट्राईकचे निर्णय घेतल्यानंतर आधीचे सरकार कसे थंड पडलेले होते, याचं चर्वितचवण करत बसतो. मात्र, एकदा आपण आपला इतिहास नीट डोळ्यांखालून घातला पाहिजे. हा मुद्दा जेव्हा देशाच्या सुरक्षेसंदर्भात येतो, त्यावेळी हे पुस्तक या चर्वितचवणाला सडेतोड उत्तर ठरेल.

रॉ’चा इतिहास आणि गौरवशाली कामगिरी सांगत असताना लेखक केवळ काही प्रसंग किंवा घटनांमध्येच रमत नाहीत. तर या निमित्ताने गुप्तचर प्रांतातील भारताच्या अनुशंघाने काही इतिहिसातील दाखलेही देतात. वेदांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत कशाप्रकारे त्या त्या काळात कशाप्रकारे गुप्तहेरांचं अनन्यसाधारण महत्त्व राहिलं, ते लेखक संदर्भासहित सांगतात.

कौटिल्याचा उल्लेख आपल्याकडे आजही सातत्याने होतो. ‘कौटिलीयम् अर्थशास्त्रम्’ या त्याच्या राजनीतीशास्त्रावरील ग्रंथात त्याने गुप्तचर यंत्रणांचाही विशेष उल्लेख केला आहे. त्यात त्याने कापटिक, उदास्थित, गृहपतिकव्यंजन, वैदेहकव्यंजन, तापसव्यंजन, सत्री, तीक्षण, रसद आणि भिक्षुकी असे गुप्तहेरांचे नऊ प्रकार सांगितलेत. भारतीय गुप्तचरसंस्थेच्या स्थापनेत कौटिल्याच्या मांडणीचा मोठा प्रभाव दिसून येतो.

गुप्तचरसंस्थांचं महत्त्वं केवळ कौटिल्याला कळलं होतं अशातला भाग नाही. मधल्या काही काळातही जगाच्या विविध भूभूागावर तिथल्या सत्ताधाऱ्यांच्या आवश्यकतेनुसार या यंत्रणांची उभारणी झाली. आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत बोलायचं झाल्यास, छत्रपती शिवाजी महाराजांनी गुप्तहेरांचा योग्य आणि चाणाक्ष बुद्धीने वापर केला.

रवी आमले जसं सांगतात की, दुर्दैवाने शिवरायांच्या गुप्तहेरसंस्थेविषयी आपल्याला फार माहितीच नाही. आणि माहिती असायला तेव्हाची कागदपत्र किंवा काही आज उपलब्धच नाहीत. बखरी किंवा इतर माध्यमातूनच त्यावेळच्या गुप्तहेरसंस्थेविषयी माहिती मिळते.

बहिर्जी नाईक हे शिवरायांच्या हेरखात्याचे प्रमुख होते, एवढेच काय ते आपल्याला माहिती आहे. तेही कशावरून, तर सभासदांच्या बखरीमुळं. ते बखरीत लिहितात, ‘दर हजारी, पंच हजारी, सरनोबत यांजवळून वाकनिसीचे कारकून व हरकारे व जासूद ठेवावे. सरनोबताजवळ बहिरजी जाधव नाईक, मोठा शाहाणा, जासुदांचा नाईक केला. तो बहूत हुशार चौक करून ठेविला’ मात्र, हेर म्हणून बहिर्जी नाईकांबद्दलही आपल्याकडे पुरेशी माहिती नाही. त्यानंतर अगदी सुरतेच्या लुटीप्रकरणातील त्यांची कामगिरी. आपल्याकडे गुप्तहेरांच्या अंगाने इतिहासाकडे पाहिलंच नाही. असो.

तर ‘रॉ’बद्दल लिहिताना रवी आमले इतिहासातही शिरतात. कौटिल्यपासून दाखल देत ते ‘रॉ’च्या स्थापनेपर्यंत पोहोचतात. त्यामुळे केवळ ‘रॉ’चा इतिहास नव्हे, तर एकूण भारतीय गुप्तहेरसंस्थांचा इतिहास कळायला आपल्याला मदत होते.

पंडित नेहरू, लालबहादुर शास्त्री यांसारख्या पंतप्रधानांपासून खरंतर ‘रॉ’सारख्या अस्साल भारतीय गुप्तहरसंस्थेची नितांत आवश्यकता असताना, म्हणजेच देशाच्या बांधणीपासूनच गरज असताना, त्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. कदाचित तेव्हाची गुप्तचरस संस्था पुरेशी आहे, असंच गृहित धरलं गेलं. मात्र, त्याचे परिणाम आपल्याला तेव्हा तेव्हा भोगावे लागलेच.

रॉ’सारखी संस्था उभारायची म्हणजे, त्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणातील आपला दूरदृष्टीकोन, आपलं स्थान, देशाच्या सुरक्षाप्रश्नांची नीट माहिती, त्यावर काय करायचंय, याची जाण अशा सर्वच गोष्टींची राजकीय नेतृत्त्वाला माहिती असायला हवी. सोबत अफाट निर्णयक्षमता आणि कुठल्याही कामगिरीसाठी प्रचंड धाडसाचीही गरज असते. या सर्व गोष्टींचा मिलाफ झाला, तो इंदिरा गांधी यांच्या निमित्ताने.

रॉ’च्या अनेक यशांचं किंवा अशी संस्था उभारून तिचा पाया मजबूत करण्याचं श्रेय जसं इंदिरा गांधी यांना जातं, तसंच ते रामेश्वरनाथ काव यांनाही जातं. रामेश्वरनाथ काव यांच्याबद्दल अनेकांना अनेक ठिकाणी वाचलंही असेल. स्वातंत्र्योत्तर भारतातील गुप्तचरसंस्थेचा आणि त्यांच्या पुढील यशोगाथांचा कण म्हणजे रामेश्वरनाथ काव.

भारतातील हेरगिरीचा इतिहास, ‘रॉ’ची स्थापना हे सांगत असताना आणि पुस्तकाला पुढे नेत असताना लेखक भारताच्या जडण-घडणीतले एक-एक प्रसंग आपल्यासमोर मांडतात आणि ‘रॉ’चा गौरवशाली इतिहास सांगतात.

विशेषत: पाकिस्तानच्या फाळणीकडे, मुक्तियुद्ध, मिशन सिक्कीम, ऑपरेशन काहुटा, ऑपरेशन लाल दोरा, खलिस्तानचा खेळ, ऑपरेशन मेघदूत, काश्मीरकथा, लंकाककांड, मिशन नेपाळ या प्रकरणांमधून ‘रॉ’चं महत्त्वं आपल्याला कळून येतं. हे वाचत असताना ‘गेल्या 70 वर्षात तुम्ही काय केलं?’ असं आपल्या आधीच्या सत्ताधाऱ्यांना किमान सुरक्षेच्या प्रांताबाबत तरी विचारण्याचं धाडस होणार नाही. काही ठिकाणी ‘रॉ’ किंवा इतर गुप्तहेरसंस्थाही कमी पडल्या. नाही असे नाही. मात्र, आपण देश म्हणून सुरक्षेबाबत काहीच केले नाही, असं म्हणणं जर अतिशोयोक्तीच ठरावी.

रॉ’सारख्या गुप्तचर संस्थांच्या कारवाया त्या घडत असताना कधीच बाहेर येत नाहीत. त्या पूर्णपणे गुप्त असतात. त्या येतात नंतर. अशा पुस्तकांमधून किंवा कुठल्यातरी संदर्भांनी. कारण गुप्तहेरांची कामगिरी ही काही मर्यादित काळापुरती नसते. अविरत चालणारी प्रक्रिया असते. अशावेळी रॉ’सारख्या संस्थेची कामगिरी, काही घटनांमधील महत्त्वपूर्ण भूमिका वाचयाला मिळाल्यास नक्कीच कुणालाही आवडतं. तेच या पुस्तकाने साधलंय. ‘रॉ’ची माहिती देत असताना वाचकांना खिळवून ठेवतं हे पुस्तक. अर्थात, भारताच्या या गुप्तचरसंस्थेचा इतिहासही तसाच आहे म्हणा, भान हरपून खिळवून ठेवणारा.

आपल्या गुप्तचरसंस्थेने काय केलंय आणि विशेषत: गेल्या 70 वर्षात काय झालंय?’ या प्रश्नांची काहीप्रमाणात उत्तरं मिळवण्यसाठी तरी हे पुस्तक नक्कीच वाचा.

नामदेव अंजना
(प्रतिक्रियेसाठी ईमेल : namdev.anjana@gmail.com)

30 May, 2019

राजीव गांधी हत्या : तपास, कट, प्रश्न आणि पुस्तक

 
राजीव गांधी दूरदृष्टी असलेले नेते होते. देखणा, हुशार आणि मृदू स्वभावाचा हा माणूस. त्यात पंडित नेहरूंचा नातू आणि कणखर शब्दाचं दुसरं रूप असलेल्या इंदिरेचा मुलगा. त्यामुळे अर्थात, राजकारणात आल्यानंतर राजीव यांच्याबद्दल आकर्षण, कुतूहल वगैरे अनेक गोष्टी घेऊन असंख्य भारतीय वावरत होते.

राजकारणात सक्रिय होण्याचे कोणतेही संकेत राजीव यांनी इंदिरा यांच्या मृत्यूआधी दिले नव्हते. त्यामुळे इंदिरा यांची हत्या झाली आणि पक्षीय दबावाला बळी पडत म्हणा किंवा आणखी काही, राजीव राजकारणात आले. ते आले, रुळले आणि देशाला सर्वोत्तम बनवण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले. ते प्रयत्न अर्ध्यात राहिले. काळाने त्यांना जगू दिले नाही.

राजीव यांच्याबद्दल केवळ ऐकून होतो. लिटरली फक्त ऐकून. आपण जसे रामायण, महाभारत केवळ ऐकून असतो ना तसेच. कधीच पूर्ण माहितीपट किंवा एखादे पुस्तक वाचले नव्हते. शाळेत किंवा नंतर मोठ्यांकडून राजीव यांच्याबद्दल ऐकले, एवढीच काय ती माहिती.

पंडित नेहरू यांचा नातू आणि इंदिरा गांधी यांचा मुलगा हीच ओळख किती मोठी...मग कशाला हवं आणखी वाचायला? असा साहजिक प्रश्न अनेकांसारखा माझ्याही मनात होता. झालेही तसेच. मी राजीव यांचे एकाही चरित्र वाचले नव्हते. अद्याप नाही.

राजीव यांच्याबद्दल सर्वप्रथम काय वाचले असेन, तर थेट त्यांच्या हत्येचा शोध घेणाऱ्या आयपीएस डी आर कार्तिकेयन आणि आयपीएस राधाविनोद राजू यांनी लिहिलेले 'शोध राजीव गांधी हत्येचा' हे पुस्तक.

एखाद्या माणसाचा जीवनप्रवास आधी न वाचता थेट हत्येच्या शोधाचा प्रवास वाचला. जेव्हा हे पुस्तक वाचले तेव्हा हादरे बसले होते. कसलं भयंकर कटकारस्थान रचून राजीव यांची नियोजित हत्या केली गेली. प्रभाकरन शिवरासान, नलिनी, धानु, शुभा, पायस इत्यादी कित्येक नावांनी भांबावून सोडलं.

राजीव यांची हत्या एलटीटीई या दहशतवादी संघटनेने केली, हे पुस्तकाच्या दहाव्या - बाराव्या पानापासून लेखक कार्तिकेयन सांगत राहतात. ते वारंवार हेच का सांगत राहतात, याची शंका मलाही आली. पण कदाचित राजीव हत्येचे केंद्र तेच असावे, म्हणून असेल, असेच गृहीत धरले.

ऐन निवडणुकीत राजीव यांची हत्या झाली. १९९१ सली २१ मे रोजी. निवडणूक जिंकून राजीव पुन्हा सत्तेत येतील आणि आपल्या ध्येयाला अडथळे निर्माण होतील, असे समजून प्रभाकरन आणि त्याच्या एलटीटीई या संघटनेने राजीव यांना नियोजित कट रचून संपवले. असे एकूण या पुस्तकात सांगितले आहे. तसे अनेक संदर्भ आणि दुवे सुद्धा दिले आहेत. तपासाची एक विशिष्ट प्रक्रिया पुस्तकात आहे. मात्र तरी अनेक प्रश्न. अनुत्तरित राहतात.

इतर अनेक आरोपी गळ्यात अडकवलेली गोळी खाऊन आत्महत्या करतात, शिवरासनच कसा बंदुकीच्या गोळीने मारला जातो, इथपासून ते डी आर कार्तिकेयन अख्ख्या पुस्तकभर राजीव हत्येचे दुसरे कुठलेच कारण तपासून पाहत नाहीत, त्यांचा रोख केवळ एलटीटीई राहिला आहे. श्रीलंका करार आणि शंतीसेनेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा रोख योग्य असला, तरी इतर शक्यता त्यांनी तपासून पहिल्याच नाही का? काहीसे प्रश्नात बुडवून टाकणारे हे पुस्तक आहे.

हे पुस्तक वाचून झाले आणि काही दिवसांच्या अंतराने 'राजीव गांधी हत्या... एक अंतर्गत कट?' हे फराझ अहमद या क्राईम रिपोर्टरचे पुस्तक हाती लागले. धडाधड वाचत गेलो आणि त्याचं वेगाने हादरे सोसत गेलो. पहिल्या पानापासून हादरे, धक्के, खळबळजनक दावे.

विशेष म्हणजे, राजीव हत्येच्या तपासाचे प्रमुख आयपीएस डी आर कार्तिकेयन यांच्या पुस्तकातील दावे सुद्धा खोडून काढण्याचा प्रयत्न फराझ अहमद यांनी केला आहे. त्यापुढे चंद्रशेखर, पी व्ही नरसिंहराव यांची नावं येतात आणि जागच्या जागी उडायला होतं. इतके धक्के. या पुस्तकाबद्दल अधिक सांगणार नाही. ते तुम्हीच वाचा. कारण अधिक खोलवर कळेल. मी अर्ध्यात सांगून, पुस्तक वाचण्याची तुमची ओढ कमी होईल.

फराझ अहमद यांनी उपस्थित केलेल्या सर्वच प्रश्नांना ठोस संदर्भ नसले, तरी त्यांनी उपस्थित केलेलं प्रश्न, सांगितलेली स्थिती, मांडलेला क्रम आपल्याला चक्रावून टाकतो आणि अनेक ठिकाणी आपणही राजीव हत्येबाबत आणि पुढील तपासाबाबत सुद्धा साशंक होत जातो. राजीव हत्येच्या तपासाचे पुस्तक वाचल्यानंतर आठवणीने हेही पुस्तक न विसरता वाचा.

बाकी काही असो... राजीव यांच्या सारखा दूरदृष्टी असलेल्या उमद्या नेत्याला आणि तंत्रज्ञानसंपन्न आधुनिक भारताचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण नेतृत्वाला भारत मुकला हे खरंय. राजीव असते, तर आजची भारतीय प्रगतीची शिखरे वेगळी असती, हे वेगळे सांगायला नको. आणि अर्थात, राजकीय चित्र सुद्धा वेगळे असते.

नामदेव अंजना

15 April, 2019

वाचनेबल 'पॉलिक्लिक'




पॉलिक्लिक...उण्यापुऱ्या ११० पानांचे पुस्तक. तीन विभागांमध्ये मिळून एकूण १४ लेख. सध्याच्या ट्वेंटी-ट्वेंटीच्या सुपरफास्ट वातावरणात वाचनेबल ठरेल, असे हे छोटेखानी पुस्तक आहे. पण त्यातील माहिती, आकडेवारी, नोंदी, अनुभव एक सुंदर दस्तऐवज आहे. त्यासाठी सर्वप्रथम सोनाली शिंदे या लेखिका-पत्रकार मैत्रिणीचे मनापासून अभिनंदन!
 
आधी म्हटल्याप्रमाणे तीन भागात पुस्तक विभागले आहे. 'उत्सव लोकशाहीचा', 'अण्णा ते मोदी व्हाया निर्भया' आणि 'सोशल मीडियाचे विश्वरूप दर्शन' अशा तीन भागात अनुक्रमे सात, तीन आणि चार लेख आहेत. प्रत्येक विभागाला अनुसरून योग्य विभागणी केलेली दिसते. ही झाली तांत्रिक माहिती. आता पुस्तकातील आशायाकडे वळूया. 

'सोचना तो पडेगा बॉस' या डायलॉगने या पुस्तकाचा शेवट होतो. पुस्तक वाचत असताना आणि वाचून पूर्ण झाल्यावर शेवटचा हा डायलॉग किती समर्पक आहे, हे लक्षात येतं.

निवडणूक आणि एकंदरीत राजकीय पटावर मध्यामांचा उगम, त्यांचा वाढता वापर ते अगदी हा राजकीय पट व्यापून टाकण्यापर्यंतचा प्रवास या पुस्तकातून लेखिकेने मांडला आहे. हे मांडत असताना स्वानुभव, त्यातून विश्लेषण, तसेच माध्यमांच्या अंगाने देशातील आणि परदेशातील प्रभावशाली आणि दखलपात्र घटनाही यात नोंदवल्या आहेत. त्यामुळे जसे पुस्तकाचे महत्व अधिक वाढते, तसे लेखिकेची संशोधक वृत्ती सुद्धा दिसते. 


'उत्सव लोकशाहीचा' या पहिल्या भागातील सातही लेख भारतातील निवडणुका आणि राजकीय प्रक्रिया यांच्यावर आधारित आहेत.
निवडणुका जाहीर होण्याआधीच माहौल, निवडणुका जाहीर झाल्यावर माध्यमांच्या नजरेतून हा लोकशाहीचा उत्सव आणि उत्साह, हे मांडत असताना लेखिका सोशल मीडिया चे या सगळ्या प्रक्रियेतील शिरकाव सांगते. त्यानंतर अशा आल्या वृत्तवाहिन्या या लेखात माध्यमांचा भारतातील आगमन, प्रवास मांडते. सर्वसामान्य माणसांचे हक्क, अधिकार सांगताना, या माध्यमांचे कसे लोकशाहीकरण झाले, हेही लेखिका सांगते. 

पहिल्या भागात लेखिकेची संशोधक वृत्ती प्रकर्षाने जाणवते. माहितीचा ऐवज देत असताना, तारीख, साल, आकडेवारी यांचा लेखाजोखा आपले ज्ञान वाढवण्यास प्रचंड उपयुक्त ठरेल, असे आहे. भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर आजवरचा निवडणुका आणि त्यातील माध्यमांचा वापर हा वर्षगणिक मांडलेला लेखाजोखा अत्यंत कौतुकास्पद आहे. यातल्या काही लेखात मूळ मथळ्याशी लिंक तुटलेली दिसते. पण माहिती, आकडेवारीने तुडुंब भरलेल्या लेखांमुळे तेवढी कमतरता मोडीत काढतात.

भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आजवरच्या निवडणुकांचा इतिहास थोडक्यात मांडताना लेखिकेनी प्रत्येक निवडणुकीचे वैशिष्ट्य सांगितले आहेत. ती सारी वैशिष्ट्य इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे, स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक 4 ते 5 महिने चालली, ही बाब असो वा रामायण मालिकेतील सीतेने जशी लोकसभा निवडणूक लढून जिंकली, तशीच रावणानेही जिंकली. अशा महत्त्वाच्या घटना यात नोंदवल्या आहेत. पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत भारतीय निवडणुकीच्या प्रवासाचा सारा पट मोजक्या शब्दात लेखिकेने मांडला आहे.

दुसऱ्या भागात केस स्टडी टाईप लेख असले, तरी त्यातील लेखात लेखिकेचे पत्रकार असणे ठळकपणे दिसते. अण्णा हजारे आंदोलन, निर्भया केस, मोदींचा उगम या तीन गोष्टींचा पट मांडताना, लेखिकेने माध्यमांच्या अंगाने तिन्ही गोष्टी पडतळल्या आहेत. या तिन्ही लेखात विशेष माहिती नसली, तरी लेखिकेचा व्ह्यू कळून येतो. 

तिसऱ्या आणि शेवटच्या भागात लेखिकेने माध्यम हाच लेखांचा गाभा ठेवून जागतिक स्तरावरील उदाहरणे सांगितली आहेत. अरब स्प्रिंग, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक ही त्यातील दोन महत्त्वाची उदाहरणे. अरब स्प्रिंग वर लिहिलेला लेख विशेष वाचनीय आहे. माध्यमांचा कसा वापर या मध्या आशियातील क्रांत्यांसाठी झाला, याचा लेखाजोखा यात आहे. यातील अरब स्प्रिंगवरील लेख वाचताना जसे आपण तल्लीन होत जातो, तेवढाच इंटरेस्टिंग लेख ओबामा यांच्या उदयावरील आहे.

तिसऱ्या भागातील शेवटचे दोन लेख जागतिक स्तराशी तसे संबंधित नाहीत. मात्र दोन्ही लेख जाता जाता जे डोस वाचकांना पाजले पाहिजे, विशेषतः आजच्या काळातील वाचकांना, ते नेमकेपणानं पाजले आहेत. विशेषतः शेवटच्या लेखात विचार करण्याजोगी मांडणी आहे. मत तुमचं, मेंदू कुणाचा? असा या शेवटच्या लेखाचे नाव आहे. 


सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, माध्यम हा केंद्रबिंदू ठेवून पुस्तकाची गुंफण आहे. भारतातील राजकीय वातावरण, निवडणुका, महत्वच्या घटना, जगातील क्रांतिकारी घटना इत्यादींचा धावता आढावा आणि प्रसंगी सखोल माहिती, आकडेवारी या पुस्तकात वाचायला मिळते. 

माध्यामांनी कसा हा भोवताल हळूहळू व्यापून टाकला आहे, याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. या भोवतालाचे बरे वाईट पडसाद आहेत. काही या पुस्तकात उल्लेख केले आहेत. बाकी पुस्तक वाचताना आपल्या आपसूक लक्षात येतात.

कुठेही एकांगी न होता, तस्थपणे आपल्याकडील अनुभव, माहिती, आकडेवारी इत्यादी वाचकांच्या हाती लेखिकेने सोपवले आहे. लेखिकेचे हे पहिले पुस्तक आहे. त्यामुळं काही बारीक सारीक गोष्टी माफ होतात. म्हणजे, काही लेख घाईने संपवले गेल्यासारखे वाटते. त्यात अजून लिहिता आले असते, असेही वाटून जाते. किंवा उदाहरणे कमी पडतात, प्रसंग आणि व्यक्तिमत्व आणखी फुलवता आले असते, असेही वाटले. पण फार न लांबवता थोडक्यात मोजके आणि नेमके मांडण्याचा यशस्वी प्रयत्न लेखिकेने केला आहे. हा प्रयत्न कौतुकास्पद आणि स्तुत्य आहे. सोनाली शिंदे या लेखिका-पत्रकार मैत्रिणीस पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!!

नामदेव अंजना - namdevanjana.com

24 March, 2019

काँग्रेसचा बेगडी पुरोगामीपणा


 
नवीनचंद्र बांदिवडेकरांना तिकीट द्यायचं की नाही, हा काँग्रेसचा पक्षाअंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी घरात शस्त्र नि स्फोटके सापडलेल्या सनातनच्या साधकाला समर्थन करणाऱ्या बांदिवडेकरला तिकीट द्यावं किंवा थेट सनातनचा म्होरक्या असलेल्या जयंत आठवलेला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावा. व्हॉटेव्हर. मुद्दा असाय की, केवळ मतांसाठी असले चाले केल्यानंतर काँग्रेसने पुरोगामीपणा आणि गांधीवादी असल्याचा आव आणू नये. इतकेच.

ज्या गांधींच्या नावावर (विचारांवर नव्हे!) गेली सत्तरहून अधिक वर्षे काँग्रेस पक्ष चालतोय. त्या गांधींची वैचारिक भूमिका किमानपक्षी काँग्रेसने लक्षात ठेवायला हवी होती. अहिंसा शब्दाला आपल्या गुणांबाबत काहीसा कमीपणा वाटावा, इतके अहिंसावादी गांधी होते. अशा पक्षाने घरात स्फोटके ठेवणाऱ्या आणि त्या स्फोटकांचा नि त्या आरोपीचा विवेकवाद्यांच्या हत्येशी संबंध असताना, त्याला थेट लोकसभेचं तिकीट देणं, हे गांधींच्या कुठल्या तत्त्वात बसते? हे सत्यसाई बाबाचा फोटो शासकीय निवसस्थानातील 'पुरोगामी भिंती'वर टांगणाऱ्या अशोक चव्हाणांनी सांगावं. म्हणजे कसं, काँग्रेसच्या बेगडी नि बोगस पुरोगामीपणाचा बुरखा आणखी नीट फाटला जाईल.

वैभव राऊतचं समर्थन करणारे बांदिवडेकर हे समाजबांधव म्हणून तिथे गेले होते, असं 'सत्यसाई भक्त' अशोक चव्हाण सांगतायत. त्या अशोक चव्हाणांना इतकाच प्रश्न आहे की, वैभव राऊत हा भंडारी आहे म्हणून त्याला अटक करण्यात आली नव्हती, तर त्याच्या घरात स्फोटके सापडली म्हणून अटक करण्यात आली होती. असं असताना वैभव राऊतला 'समाजबांधव' म्हणून समर्थन करण्याचा प्रश्न येतोच कुठे? इतके बालिश स्पष्टीकरण अशोक चव्हाणांकडून येणं अनपेक्षित होतं. मात्र, तात्काळ मला त्यांचे 'सत्यसाई'प्रेम आठवलं आणि मी शांत झालो. म्हटलं, शक्य आहे!

तसेही रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार कुठल्याही स्थितीत निवडून येणार नाही, हे निश्चित. काँग्रेसच्या उमेदवाराचा फायदा डॉ. निलेश राणेंनाच होईल. वर आघाडीतल्याच सुनील तटकरेंनी राणेंना पाठिंबा दिलाय. त्यामुळे सगळा सावला गोंधळ आहेच. त्यात हे बांदिवडेकर काही येत नाहीत. मात्र, तरीही काँग्रेसने सनातनशी संबंधित व्यक्तीला उमेदवारी देण्याची डेअरिंग केली, यावर चर्चा व्हायलाच हवी आणि त्यावरुन काँग्रेसचं बेगडी पुरोगामीत्व समोर यायलाच हवं.

बांदिवडेकरची शिफारस ज्यांनी केलीय, असे ऐकिवात आहे, त्यांचं नाव ऐकून माझा संताप वाढलाय. ते म्हणजे हुसेन दलवाई. हुसेन दलवाई यांनी जर बांदिवडेकरच्या नावाची शिफारस केली असेल, तर हुसेन दलवाई यांनी हमीदभाईंचे भाऊ असल्याचे कुठे सांगू नये. हमीदभाईंचं सच्चा पुरोगामीपणा हुसेनभाईंनी धुळीस मिळवल्याचे हे जिवंत उदाहरण आहे.

पुरोगामी चळवळीतून किंवा विवेकवाद्यांकडून तक्रार करुन जर काँग्रेस सनातनशी संबंधित बांदिवडेकरची उमेदवारी रद्द करत नसेल, तर हा अरेरावीपणा काँग्रेसला आणखी गाळात रुतवून ठेवणार, हेही नक्की. 

दुसरीकडे, चंद्रपुरात शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांना काँग्रेसकडून तिकीट मिळावी म्हणून कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे मागणी केली. तर आता जाहीर झालेल्या उमेदवारीवर काँग्रेसकडून पुनर्विचार सुरु झालाय. म्हणजे मतांसाठी नि राजकारणासाठी केवळ तुम्ही उमेदवाऱ्या बदलणार, पण विचारांना केराची टोपली दाखवणार... वाह रे वाह!!!

ज्या कन्हैयाने देशभरात भाजप नि मोदीविरोधी वातावरण निर्माण केलं, त्याच्या विरोधात बेगुसरायमधून उमेदवार देण्याचा काँग्रेसचा विचार असो किंवा सनातनाच्या बांदिवडेकरला उमेदवारी देण्याचा निर्णय असो... काँग्रेसला लोकशाही वगैरे वाचवायची नसून, केवळ पक्ष शाबूत ठेवायचाय नि सत्ता मिळवायचीय, एवढेच यातून दिसतेय. आणि हेच असेल तर काँग्रेसची हेलकावे खात तरंगणारी नौका तळाशी जायला वेळ लागणार नाही, एवढे निश्चित.

नामदेव अंजना | namdevanjana.com

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...