21 September, 2014

कासाच्या माळरानावर

(फोटो गुगलवरुन घेतला आहे. कासाचा फोटो लवकरच अपडेट करेन)

हिरवागार निसर्ग ज्याला भुरळ घालत नाही असा माणूस सापडणं थोडं कठीणच. त्यातही जर गावाकडची हिरवळ तर प्रचंड आकर्षित करते. ऐन पावसाळ्यात गावाकडे गेलो की हिरव्या-हिरव्या माळरानावर फेरफटका मारणं, नद्यांच्या मंजुळ खळखळाटात उड्या मारणं, हिरवी चादर पांघरलेल्या डोगरांच्या चढणी चढणं किंवा कड्यांवरुन अगदी शिवरायांच्या मावळ्यांसारखं चढाई करणं हे ठरलेलंच. गेल्या सहा वर्षांपासून शिक्षणासाठी मुंबईत आल्याने गावाकडे जाणं तसं कमीच झालंय. पण गावाकडची ओढ काही कमी झाली नाहीय. आजही जेव्हा मिळेल तेव्हा गावाकडे पळणं सुरुच असतं. त्यात पावसाळ्यात तर सुट्टी आणि तीही मुंबईत हे गणीत कधीच नसतं. मुंबईतला पवसाळाही नकली वाटतो. असो.
      परवा गावी गेलो होतो. काही विशेष काम वगैरे नव्हतं. पण सुट्टी आहे म्हणून गाव गाठला. ऐन पावसाळ्यात गावाला जायला मिळतंय यापेक्षा वेगळा आनंद काय? गावाकडची ओढच अशी आहे की इकडे मुंबईत काम करत असताना कुणीतरी आपल्याला जबरदस्तीने इथे डांबून ठेवलं आहे असं वाटू लागतं. त्यांमुळे सुट्टी मिळताच गावकडे पळायचं असं ठरलेलंच. असो. तर परवा गावी गेलो असताना सहजच एका संध्याकाळी गावाबाहेरच्या माळरानावर फेरफटका मारण्यासाठी गेलो. आता गावाकडे वेगवेगऴ्या जंगलांना, माळरानांना नावं असतात हे तुम्हाला वेगळे सांगायला नको. कधी तिथल्या झाडावरुन कधी एखाद्या नदीवरुन तर कधी-कधी एखाद्या माळरानाला असं नाव का पडलं हे कळायला मार्गच नसतो. लोकं बोलतात म्हणून आपणही बोलू लागतो. तर परवा गावी गेलो असताना मी आमच्या गावाशेजारील माळरानावर गेलो. कासात. हो कासात असं त्या माळरानाचं नाव आहे. कासात जायला गावातून तशी एक पायवाटच आहे आणि पावसाळ्यात ती पायवाट कसली चिखल-पायवाटच असते. गाई-गुरं त्याच वाटेवरुन जात असल्याने पायवाट चिखलाने बरबटलेली. पण मग त्या पायवाटेवरील दगड्यांवर उड्या मारत मी कासात पोहोचलो. कासाच्या कुंपणावरुन कासाच्या माळरानावर एक नजर फिरवली. वाह! क्या बात है! मन प्रसन्न झालं. मुंबीतल्या उंचच उंच इमारती पाहून पाहून थकलेले डोळे कासाचं माळरान पाहून पुरतं सुकावले. यस्कड उघडून कासात शिरलो. (यस्कड म्हणजे एखाद्या शिवारात जाण्यासाठी जो प्रवेशद्वार तयार केलेला असतो. त्याला आमच्याकडे यस्कड असे म्हणतात) कासाच्या एका बाजूला उंच डोंगर तर दुसरीकडे उतरंड. उतरंडीवरुन थोडा खाली उतरलो तर पावसाळ्यात सतत खळखळत वाहणारी नदी. कासाच्या माळरानावर अगदी मधोमध प्रचंड विस्तिर्ण आणि अगदी आपणच या पूर्ण माळरानाचं मालक आहोत या आवेशात-डौलात उभा असणारा आंब्याचं झाड. थोडा वेळ त्याच आंब्याच्या झाडाखालील दगडवर बसलो. तेवढ्यात पावसाची एक जोरात सरकट आली. मी आंब्याच्या अजून जवळ गेलो. आंब्याच्या खाली बसल्याने पावसाने भिजत नव्हतो पम मी मुद्दामच आंब्याखालून बाहेर येऊन पावसाचा आनंद घेत उभा होत. पुरता भिजलो. भिजताना कसलीही चिंता नव्हती. ना कपडे भिजतील याची..ना सर्दी-खोकला होईल याची. इकडे मुंबईत पावसाचे चार थेंब अंगावर पडली कि मनात भीती निर्माण होते की आता आजारी वगैरे पडतोय की काय. भिजल्या अंगानेच पूर्ण कासाचा माळ फिरलो. गावी असताना गाई-गुरं चरायला घेऊन जायचो तेव्हा याच कासाच्या माळरानावर गाई-गुरांना आणायचो. एकदा का या माळरानावर गाई-गुरं सोडली की त्या आंब्याखाली बसायचं. इतरांच्या बैलांसोबत आपल्या बैलांची झोंबी होत नाही ना हे फक्त पाहात राहायचं. सूर्य मावळतीला गेला की गुरांना परतीकडे वळवायचं. कासाच्या माळरानावर पाऊल ठेवल्यावर अशा अनेक आठवणी जागा झाल्या.
अजून एक आठवण म्हणजे याच कासाच्या माळरानावर आम्ही शाळकरी मुलं पावसाळ्यात दर शनिवार-रविवार खो-को, कबड्डी खेळायला जायचो. उन्हाळ्यात क्रिकेटची पिच तयारच असायची. पावसाळ्यात खो-खो, कबड्डी खेळून कपडे चिखलाने माखल्यावर कासातूनच खाली उतरायचं आणि नदीवर अंघोल्या करायचं आणि मग घरी परतायचं. अर्थात घरी येऊन आईचा ओरडा असायचा मात्र या सर्व मौजमजेत या ओरड्याचं काही विशेष वाटायचं नाही. अशा खूप आठवणी या कासाच्या माळरानाशी जोडल्या गेल्या आहेत. आज फक्त त्या आठवणीच राहिल्यात. 
-  नामदेव अंजना

27 July, 2014

पाताळगंगा नव्हे गटारगंगा


मध्यंतरी प्रचंड प्रदुषित असलेल्या पाताळगंगा नदीवर अभ्यास करण्याची मला संधी मिळाली. काही कारणास्तव हा अभ्यास मी पूर्ण करु शकलो नाही मात्र जेवढा अभ्यास केला ते मांडण्याचा प्रयत्न करतोय.... अर्थात या अभ्यासासाठी सर्वात जास्त मदत लाभली ती युसुफ मेहेर अली सेंटरची... मदन मराठे सरांना सेंटरच्या गाडीतून एमआयडीसी परिसर, पाताळगंगा नदी अशा अनेक ठिकाणी भेटी घालून दिल्या. मदन मराठे सर स्वत: 1989 च्या आंदोलनात सक्रि. सहभागी होते त्यामुळे त्यांना पाताळगंगा नदीच्या प्रदुषणाची खडानखडा माहिती आहे. नदी प्रदुषण होताना समोर दिसतंय शिवाय त्यावर जालिम उपाय असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मदन मराठे सरांसोबतचा अनुभव ग्रेट होता...त्यांच्यासोबत आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी पाड्यांनाही भेटी देता आल्या... इमेल आयडी चेक करत असताना हा रिपोर्ट हाती लागला. पातळगंगा नदी प्रदुषणावर काम करत असलेल्यांना कदाचित यातून काही लिंक मिळू शकेल...त्यासाठी मी थोडक्यात तयार केलेला रिपोर्ट इथे देत आहे...
एकीकडे पाण्याचा प्रश्न दरवर्षी पाचवीला पुजलेला असतानाच त्याचवेळी दुसरीकडे नदी प्रदुषणामुळे नदीच्या नदी वाया जाण्याचे भयानक चित्र आपल्याकडे आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी उगम पावणारी पातळलगंगा नदी ही जणू एक प्रकारची गटारगंगाच झाली आहे. खोपोली ते धरमतर खाडी असा जवळ-जवळ ६० किलोमीटरचा प्रवास हा नदी करते. औद्योगिक कारखाने येण्याच्या आधी या नदीवर सुमारे ४० ते ४५ गावांच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून होता. मात्र औद्योगिक कारखान्यांच्या आगमनानंतर पाताळगंगा नदी प्रदुषित व्हायला सुरुवात झाली. कारखान्यांतून निघणारे विषारी सांडपाणी नदीत सोडले जाते त्यामुळे नदीतील माश्यांचा व इतर जीवांचे अस्तित्वच धोक्यात आले अन् पिण्याच्या पाण्यासाठी पाताळगंगा नदीवर अवलंबून असलेल्यांची माणसांचेही. १९८९ च्या आंदोलनानंतर या काही कारखान्यांनी संयुक्तरपणे Common Effluent Treatment Plant (CETP) बसविले व काही मोजक्या कारखान्यांनी अंकर्गत स्वत:चे CETP बसविले. मात्र हे प्लॅंटसुद्धा किती प्रमाणात कारखान्यातून निघणारा सांडपाणी शुद्ध करतात याबद्दल शंकाच आहे कारण पाताळगंगा एमआयडीसीनजीकच्या सजग नागरिकांचे असे म्हणने आहे की माहारष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी निरीक्षणासाठी आल्यावर फक्त हे प्लॅंट चालू केले जातात. तर काही कारखान्याचे स्वत:चे असे अंतर्गत ETP आहेत पण प्रश्न असा आहे की हे ETP प्लॅंट इतके महाग आहेत की एखाद्या कारखान्याला वैयक्तिकरित्या बसविणे खूप खर्चिक होऊन बसतं. असे असताना जर काही कारखान्यांचे अंतर्गत प्लॅंट असतील तर ते प्लॅंट केवढ्या प्रमाणात कार्यन्वित असतील याचा शंका येते. शिवाय CETP मधून प्रक्रिया करुन जे शुद्ध (?) पाणी पाताळगंगेत सोडले जाते ते पाणी जर धरमतर खाडीतच प्रत्यक्षपणे सोडले गेले असते तर पाताळगंगा प्रदुषित होण्याचे कारणच नाही मात्र हे शुद्ध (?) केलेले सांडपाणी असलेले पाईप धरमतर खाडीच्या आधी म्हणजे जवळ-जवळ १३ कि.मी. दूर पाताळगंगेत सोडले आहे. जर हेच पाईप धरमतर खाडीपर्यंत सोडले गेले तर पाणी पाताळगंगा एमआयडीसीमुळे होणार्या जलप्रदुषणाला लगाम लागू शकतो मात्र एवढी मोठी पाईपलाईन टाकणे खर्चिक असल्याने ती टाकली जात नाही. त्यामुळे हे रसायनयुक्त पाणी पुढील १३ कि.मी. पाण्याचे प्रदुषण करते. एवढच नव्हे तर हे सांडपाणी पाताळगंगेत सोडण्यासाठी आणले जाते त्या पाईपचेही रसायनयुक्त पाण्याच्या प्रवाहामुळे गळती होते. मग याचा परिणाम स्थानिकांना सहन करावा लागतो. त्याचबरोबर न सहन होणारी दुर्गंधी तर आहेच. 
पाताळगंगा एमआयडीसीमधील CETP च्या एका कर्मचार्याशी चर्चा केल्यावर असे लक्षात  आले की पाताळगंगा एमआयडीसीमध्ये CETP असल्याने पाताळगंगा नदीत सोडण्यात येणारा पाणी हे शुद्ध असते. त्यामुळे पाताळगंगा नदी प्रदुषणाचे मूळ खोपोलीत आहे कारण तिथूनच कारखान्यातून निघणारा सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता पाताळगंगेत सोडला जातो व जे मोठे रासायनिक कारखाने आहेत ते खोपोलीत आहेत त्यामुळे खरा प्रदुषण खोपोलीत होतो.
स्थनिक रहिवाश्यांना सरकारने पिण्याच्या पाण्याची सोय करुन दिली हे म्हणून स्थानिकही कोणत्याच प्रकारचा आवाज उठवत नाहीत. शिवाय स्थानिकांना काही प्रमाणात एमआयडीसीमध्ये कामही मिळाले आहे. १९८९ साली खूप मोठ्या प्रमाणावर लोकं रस्त्यावर उतरली होती याचे कारण तेव्हा पाताळगंगेच्या आजूबाजूचे रहिवाशी हे पाताळगंगेच्या पाणयावरच अवलंबून होती मात्र ता पिण्याच्या पाम्याची सोय जाली आहे. मात्र कित्येक गावंच्या व्यावसायावर गदा आली. पाताळगंगेतील माश्यांचे अस्तित्व या रसायनयुक्त पाण्याने संपले व पाताळगंगेला पावसाळ्यात पूर आल्यावर पाणी आजूबाजूच्या परिसरात घुसतो त्यामुळे रसायनयुक्त पाण्याने जमीनीही नापिक झाल्या आहेत. एकीकडे पाण्यासाठी वणवण आणि दुसरीकडे पाण्याबाबत असलेला हलगर्जीपणा. खरंच यावर गांभीर्याने विचार करायला हवं आहे.
-          नामदेव अंजना

25 May, 2014

याला ‘स्ट्रगल’ ऐसे नाव...

वयाच्या तुलनेने खूपच लवकर अंगावर आलेली घराची जबाबदारी.. कुणाच्या भावाचे शिक्षण, तर कुणाच्या बहिणीचे शिक्षण.. अजारी आई-वडिलांच्या औषध-पाण्याचा खर्च, तर कधी फुटक्या नशिबामुळे आलेल्या असंख्य अडचणी अशा नानाविध जाबाबदाऱ्या वयाच्या सतरा-अठराव्या वर्षीच खांद्यावर उचलून या जीवघेण्या स्पर्धेत तग धरून राहत काम करून शिक्षण घेणारे तरुण-तरुणी या मुंबईसारख्या शहरात काही कमी नाहीत. शिक्षणाला पर्याय नाही हे चांगले ठाऊक असते, पण हातात चार पैसे आल्याशिवाय शिक्षण घेऊ  शकत नाही व घरही चालू शकत नाही हे वास्तव स्वीकारून जगाच्या या जीवघेण्या स्पर्धेत पडेल ते काम करून पैसे कमावायचे व शिक्षणसुद्धा पूर्ण करायचे आणि घराची जाबाबदारी सांभाळायची असे ठरवून सकाळी घरातून बाहेर पडलेल्या व रात्री आकारा-बारा वाजेपर्यंत अखंड मेहनत... 

जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात सध्या स्पर्धा सुरू झाली आहे. या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर या स्पर्धेत आपणही सहभागी होणे अपरिहार्य आहे. जो स्पर्धेत नाही त्याचे अस्तित्वच नाही किंवा त्याला या जगात नाव नाही असे काहीसे एक भयानक चित्र गेल्या काही वर्षापासून पुढे येताना दिसते आहे. ग्लोबल आणि लोकल या शब्दांमध्येसुद्धा विशेष काही फरक राहिले नाही.  हे जग म्हणजे एक खेडे झाले आहे. या ‘ग्लोबल’ जगात स्पर्धेसाठी काहीही करायला तयार होणारी माणसे पावलापवलावर दिसू लागली आहेत. आणि या ग्लोबल जगात तग धरून राहायचे असेल  तर आपल्यालाही या स्पर्धेचे नियम, अटी, कायदे-कानून माहीत असायला हवेत. पण या साऱ्या ससेमिऱ्यात माणसाच्या भावनांची पायमळणी होते आहे. मात्र इथे हाच नियम आहे व त्यानुसारच आपण जगले पाहिजे हे मान्य करून कित्येक तरुण-तरुणी या स्पर्धेत उतरत आहेत. शिक्षण क्षेत्रसुद्धा या स्पर्धेचा भाग झाला आहे. घरी बेताची परिस्थिती आहे. शिकलो नाही तर येणारा काळ आपल्या जगण्याचे जे हाल करेल ते आताच डोळ्यांसमोर दिसत असल्याने शिक्षणाचे महत्त्व आधिकच वाढले आहे किंबहुना ते दुपटीने वाढले आहे. हे जाणून काहीही झाले तरी शिकायचेच या ध्येयाने पछाडलेले अनेक जण मुंबई-पुण्यासारख्या तथाकथित मेट्रोपोलिटन शहरांमध्ये आपल्याला नेहमीच भेटतात.
गावाकडून मुंबई-पुण्यासारख्या शहरांत फक्त शिकण्यासाठी आलेल्या बहुतांशी तरुण-तरुणी अर्धवेळ काम करून शिकण्यालाच पसंती देतात असे दिसुन येते आहे. इथली महागाई न परवडण्यासारखी आहे, त्यामुळे स्वत:चा खर्च स्वत: करून शिकणारेही इथे आहेत आणि स्वखर्चाबरोबरच घराची आर्थिक जबाबदारी सांभाळून शिक्षण घेणारेही इथे आहेत. अकरावी व बारावी ही दोन वर्षे नाइट कॉलेजमधून पूर्ण करताना हल्ली अनेक जण दिसतात. जेणे करून दिवसा काम करता येईल व कामाबरोबर शिक्षणही पूर्ण करता येईल. बारावीनंतर पुढील शिक्षणाची वेळ साधारणत: बहुतांश कॉलेजमध्ये सकाळचीच असल्याने तशी फारशी अडचणसुद्धा येत नाही.  दिवसभर काम व रात्री कॉलेज किंवा सकाळी कॉलेज व नंतर रात्रीपर्यंत काम अशी शिकण्यासाठीची तडजोड अनेक जण करतात. ज्या दिवसांत आयुष्याची मौजमजा अनुभवायची, कॉलेजातील विविध स्पर्धा, महोत्सव, विविध डेज्, व्याख्यानं यांमध्ये सहभाग घ्यायचा त्या वेळेत काम करावे लागते. याबद्दल मनात कुठे तरी वाईट वाटतंच, मात्र हासुद्धा आपल्या नशिबाचाच एक भाग आहे हे त्यांच्या मनाने मान्यही केलेले असते. शिवाय शाळेमध्ये असताना हिंदी सिनेमांतील कॉलेज लाईफ पाहून कॉलेजचे जे काल्पनिक आयुष्य रंगवलेले असते त्या साऱ्यांचा चुराडा झालेला पाहून अनेक तरुणांची मने दुखावलेलीसुद्धा असतात. पण याला पर्याय नाही याची त्यांना जाणीव असते. आपण काही जन्मत:च सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेलो नाही याची त्यांना पूर्ण कल्पनाही असते. आयुष्यात स्वत:च्या पायावर उभे राहायचे असेल तर याला पर्याय नाही हे या तरुणांना पूर्णपणे मान्य आहे. एवढंच नाही तर जे तरुण पूर्णवेळ कॉलेज करतात तेही कमवून शिकण्याचा प्रयत्न करतात. दररोज सकाळी चार-पाच वाजता उठून पेपरची लाइन टाकणे, दुधाची लाइन टाकणे इत्यादी अनेक छोटी छोटी कामे करून किमान स्वखर्च भागवण्याचा प्रयत्न करतात.
एकीकडे स्त्री शिक्षणासाठी सरकार विविध योजना आणून स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रसार-प्रचार करत आहे, तर त्याचवेळी दुसरीकडे अनेक मुली अर्धवेळ काम करून मुलांच्या खांद्याला खांदा लावून शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. घरातील धुणी-भांडी करून कामाला जाणे, शिवाय कामावरून पुन्हा कॉलेजला जाणे असा विस्मयकारक दिनक्रम अनेक तरुणींचा असल्याचे निदर्शनास येते. स्त्रिशिक्षणाचे अदर्श खरेतर काम करून शिक्षण घेणाऱ्या मुली ठरत असतात. मात्र अर्धवेळ काम करून नव्या जगासाठी शिक्षणाची कवाडे उघडणाऱ्या या तरुणींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, याकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे अनेक तरुणींचे मत आहे.
अर्धवेळ काम करून शिक्षण घेणाऱ्यांच्या समस्याही तितक्याच गंभीर आहेत, जितके त्यांचे आयुष्य बिकट आहे. घरची आर्थिक बिकट परिस्थिती असलेले अनेक जण रात्र कॉलेजचा पर्याय निवडतात, मात्र मुंबई- पुणे- नागपूर अशी काही महत्त्वाची शहरे सोडली तर रात्र कॉलेज फारशी कुठे दिसत नाहीत, शिवाय या शहरांतील रात्र कॉलेजची अवस्थाही भयानक आहे. कुठे शिक्षक कमी, तर कुठे इमारत मोडकळीस आलेली. किमान उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी तरी व्यवस्थित सोयी-सुविधांची आवश्यकता आहे. संगणकासारख्या आधुनिक उपकरणांची गरज आहे. अखंड मेहनत करून शिक्षण घेणाऱ्यांच्या या तक्रारी ऐकल्यावर मन हेलावतं.
स्वावलंबन, जबाबदारपणा हे गुण प्रत्येकाच्या अंगात भिनलेला आढळून येतो. वयाच्या तुलनेने जरी लवकर नोकरी करावी लागली असली तरी ज्याला आपण प्रॅक्टिकल नॉलेज असे म्हणतो ते या तरुण-तरुणींमध्ये खूप असल्याचे दिसते. त्यामुळे आई-वडिलांच्या कमाईवर व नावावर शिक्षण घेऊन बक्कळ पैसा व नाव कमावणाऱ्यांसहित इतर सर्वासाठीच अर्धवेळ काम करून शिक्षण घेणारी तरुणाई आदर्श आहे. त्यांची शिक्षणाची ओढ, जिद्द, ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करण्याची तयारी, कोणतेही मानसिक दडपण न घेता आपल्या मेहनतीवर विश्वास यामुळे या साऱ्या तरुण-तरुणींचे कौतुक करावे तेवढे थोडेच. शिक्षण नावाच्या या माहितीच्या अथांग पसरलेल्या महासागराला गवसणी घालण्यासाठी जिवाचे रान करून शिकणाऱ्या सर्वच तरुण-तरुणींच्या प्रयत्नांना आणि जिद्दीला सलाम.

- नामदेव अंजना

(पूर्वप्रसिद्धी- युवा नियतकालिक... लिंक- http://www.zoneyuva.com/young-achiver/2191)

23 May, 2014

शाळेतील पंधरा ऑगस्टचं भाषण

आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, शिक्षकवर्ग आणि इथं जमलेल्या माझ्या विद्यार्थी बंधू-भगिनींनो.. देशाच्या स्वातंत्र्याबद्दल मी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते शांत चित्तेने ऐकाल अशी मला आशा आहे.....(एक दीर्घ श्वास घेवून... भाषणाची गाडी वेगात सुटते..) १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्या स्वातंत्र्यविरांपैकी एक म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक.. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणाऱ्या टिळकांचा जन्म रत्नागिरीतील चिखली या गावी झाला..... मग जेवढं काही पाठ केलंय धाडधाड बोलून टाकायचं आणि धन्यवाद...जईंद जय महाराष्ट्र... (जय हिंद, जय महाराष्ट्रअसे स्पष्ट शाळेत कुणी बोललेले आठवत नाही..अर्थात मीही नाही), असा समारोप.
छायाचित्र गुगल या संकेतस्थळावरून घेतला आहे
शाळेतल्या अर्ध्याहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थींनीच्या भाषणाची सरुवात आणि समारोप असाच असायचा. फार फार तर टिळकांच्या जागी महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर वा अन्य कोणा स्वातंत्र्यविरांचं नावं असायचं आणि त्यांचं योगदान... मात्र सुरुवात आणि समारोप सारखाच... मीही काही वेगळं भाषण करायचो अशातला भाग नाही... बरं १५ ऑगस्टला भाषण कोण करणार हेही ठरलेलं असायचं.... वर्गात पहिल्या पाचमध्ये येणारी टाळकीच या  भाषण नावाच्या फंदात पडायचे... ध्वजारोहणानंतर शाळेच्या वऱ्हांड्यात बसायचं...व्यासपीठावर शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, आजूबाजूच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक इत्यादी इत्यादी. बाकी शिक्षक सर्व मुलांच्याही मागे बसायचे. मग पाचवीपासून दहावीपर्यंत अशा क्रमाने एक एक जण भाषणाला जाणार... पाचवीची मुलं भाषण करत असताना सहावीची मुलं भाषण लिहून आणलेली कागद शेवटचं एकदा चाळत बसलेला असायची.. छातीत धडधड... काही चुकलं तर सर्वजण हसतील ही भिती... पुढे गेल्यावर गेले चार-पाच दिवस पाठ केलेले भाषण कुत्रा मागे लागल्यासारखं धाडधाड कुठेही न थांबता बोलून टाकायचं... समोरच्यांना भाषणातून काही कळलं, नाही कळलं याच्याशी काडीमात्र घेणंदेणं नसायचं... एकादचं बोलून झालं की चेहरा खांद्याच्या बाजूला वाकवायचा आणि चेहऱ्यावरचा घाम शाळेच्या शर्टाला पुसायचा मग एक दीर्घ श्वास घेवून आपल्या जागी बसायला जायचं.... ज्याचे भाषण उत्तम व्हायचं त्याचं दोन-चार दिवस तरी आजूबाजूच्या चार-पाच गावात तारिफ व्हायची... मग काय गडी एकदम हवेतच... अमक्या अमक्याच्या पोरानं लय भारी भाषणबाजी केलान..पोरगा तसा हुशारच हाय... मेला नाव कमवील बघ... अशी गावातील म्हाताऱ्यांच्या प्रतिक्रिया... खरंच शाळेतील भाषण म्हणजे अविस्मरणीयच. बरं एक सांगायचं राहूनच गेलं... १५ ऑगस्टचं भाषण हे फक्त १५ ऑगस्टलाच नव्हे तर २६ जानेवारीलाही उपोयागाला यायचं.. २६ जानेवारी म्हणजे १५ ऑगस्टचं रिपिट टेलिकास्टचं जणू...त्यामुळे चार-पाच दिवस कठोर मेहनतीने पाठ केलेलं भाषण फुकट जायचं नाही....भाषण लिहून काढलेला कागदही नीट घडी घालून कुठल्यातरी वहीत ठेवून द्यायचा आणि जाननेवारीतच बाहेर काढायचा...
सुदैवाने माझ्या शाळेत माझ्या वक्तृत्वाची नेहमी वाहवा झाली.... वर्गातील पहिल्या तीन क्रमांकांमध्ये यायचो म्हणूनच नव्हे तर वक्तृत्व चांगलं होतं म्हणूनही. फक्त शाळेतच नव्हे तर जिल्हा स्तरावरही शाळेचं प्रतिनिधित्व करण्याचं भाग्य लाभलं...
मुंबईत जेव्हा दहावीनंतरचं शिक्षण घ्यायला आलो तेव्हापासून म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून मुंबईतील अनेक वक्तृत्व स्पर्धांध्ये भाग घेण्याची संधी मिळाली... अनेक वक्तृत्व स्पर्धा जिंकलोही.. अनेक टाळ्या मिळवल्या पण गावच्या शाळेच्या वऱ्हांड्यातील भाषणाची तोड या कुठल्याच स्पर्धांना नाही....

आदिवासींवरील 'मटा'मधील लेखाच्या निमित्ताने...

'आदिवासी: विकास की विस्थापन' हे मिलिंद बोकीलांचे पुस्तक काही महिन्यांपूर्वी वाचले.... या पुस्तकात 'आदिवासी म्हणजे आद्य निवासी' अशी आदिवासींची व्याख्या आहे....आद्य म्हणजे मूळचे, स्थानिक... 

माझ्या माहितीप्रमाणे देशातील जिथे जिथे आदिवासी भाग आहेत तिथे तिथे मूलभूत सुविधांचीही वणवण आहे... अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधाही त्यांना मिळत नाहीत... संगणक आणि तुमचं इंटरनेट तर त्यांच्या गावीही नाही... अर्थात काही आदिवासी पाड्यांपर्यंत या सुविधाही पोहोचल्याही असतील मात्र त्या 'काही' आदिवासी पाड्यांपर्यंतच.... याचा अर्थ आपण त्यांचा हक्क हि्रावून घेतो आहे... इथल्या स्थानिकांनाच त्यांचे हक्क मिळत नाहीत.... आदिवासींपर्यंत आपली सरकारी यंत्रणा कधी पोहोचणार आहे कुणास ठाऊक....

विशेषत: रायगड जिल्ह्यात आदिवासींची संख्य़ा मोठ्या प्रमाणावर आहे... माझ्या गावच्या आजूबाजूच्या आदिवासी पाड्यातील अनेक तरुण शिक्षण अर्धवट सोडून देतात...
दहावीनंतर लगेच मुलींचं लग्न होतं...बालवयातच लग्न...त्यामुळे पुढील आयुष्यात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतं... का आपलं या आदिवासी बांधवांकडे दुर्लक्ष होतंय....?

पनवेलच्या तारा, रसायनी, आपटे या परिसरात काही आदिवासे पाडे आहेत..तिथे मी स्वत: फिरलो आहे... तिथली परिस्थिती तर अधिक भयानक आहे... विटभट्टीवर काम करण्याच्या नावाने त्यांच्यावर खूप अत्याचार होतात... विटभट्टी मालक काम न केल्यास मारहाणही करतात... असेही काही अनुभव इथल्या आदिवासींनी सांगितले...

एका विषयावर अभ्यास करण्यासाठी मागे एकदा पालघर परिसरातील आदिवासी पाड्यांना भेट देण्याची संधी मिळाली त्यावेळी तर असे लक्षात आले की साला हे आपण ज्या विकासाच्या गोष्टी करतो त्या किती पोकळ आहेत....खिशातल्या मोबाईलवर फोन आला म्हणून बोलायला बाहेर काढला तर चार-पाच मुले गोळा झाली.. मोबाईल बघायला.... आता सांगा तुमचा विकास कुठं पोहोचलाय ते....

आज महाराष्ट्र टाईम्समध्ये 'आदिवासी साहित्य आणि अस्मितावेध' या पुस्तकातील प्रस्तावना प्रकाशित केली आहे... हा लेख वाचताना हे सारे आठवलं....

आदिवासी पाड्यांपासून विकास आजून कोसो दूर आहे हे नक्की..... माहित नाही सरकारी यंत्रणा तिथपर्यंत कधी पोहोचेल की नाही ते... पण आपण एक नागरिक म्हणून तरी पोहोचणार आहोत का नाही...?.... अर्थात काही संस्था आदिवासींसाठी खूप काम करत आहेत आणि त्यांना तर सलाम कारण आदिवासींचा विश्वास संपादन करुन त्यांच्यात राहून त्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न करणे हे तितके सोपे नाही याची मला जाणीव आहे....

16 December, 2013

किडनॅपिंगची गाडी


लहान असताना आपल्याला भिती घालण्यासाठी आई-वडील विविध शक्कली लढवत असत. “झोप नाहीतर बुवा येईल” (हा बुवा म्हणजे कोण आणी तो कसा दिसतो ? या प्रश्नाचे उत्तर मला अजातागायात मिळाले नाही) किंवा “जेवलास नाही तर भूत तुला घेवून जाईल”(भुताचेही तसेच आहे, हा भूत मी आजतागायत पाहिले नाही) वैगरे वैगरे अशी अनेक वाक्य आपल्याला भीती जणू घालण्यासाठी तयारच करून ठेववलेली असतात. मात्र अशाही काही गोष्टी, प्रसंग, व्यक्ती असतात ज्यांना आपण लहानपणापासून घाबरत आलेलो असतो किंवा त्यांचा दारारा आपल्या मनात कायम राहतो. म्हणजे अनेकवेळा आपण आपल्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीला घाबरत असतो. मात्र अनेकदा तर काही अशां अफवा पसरतात कि आपोआपच आपल्या मानता एक प्रकारची भीती निर्माण होते आणि आपण स्वतःहूनच सावध राहत असतो.
थोड्या-बहुत फरकाने प्रत्येकाने आप-आपल्या लहानपणी अशाप्रकारचा दरारा अनुभवला असलेच. मला आठवतंय माझ्या लहानपणी “किडनॅपिंगच्या गाडी”चा दरारा. 
आमचे गाव तसे डोंगराळ परिसरात. अगदीच काही कडेकपऱ्यात वसलेला नाही पण सपाट माळरानावरही नाही. आणि शिवाय गावात दिवसातून अगदी मोजक्याच गाड्या यायच्या. हल्ली अनेकांनी स्कूटर घेतल्या आहेत म्हणून गाड्यांचा सुळसुळाट थोडा वाढला आहे पण माझ्या लहानपनापर्यंत तरी एखादी नवीन गाडी गावात आली तर अख्ख्या गावातील मुले त्या गाडीच्या अवती-भोवती गोळा व्हायची. गावात येणारे रस्ते डांबरी असले तरी त्यावर डांबर कुठे दिसायचीच नाही त्यामुळे येणारी गाडी धुरळ्यावर रंगून आलेली असायची त्यामुळे त्या गाडीच्या आजू-बाजूला जमलेले तमाम मुले त्या गाडीवर साचलेल्या धुरळ्यावर आप-आपले नाव लिहायचे. कधी कधी तर त्या गाडीत बसून गावापासून थोड्या अंतरापर्यंत लांब बसून जायचो आणि एका विशिष्ट ठिकाणी उतरून पुन्हा मागे तेवढेच अंतर पायी चालत यायचो. गाडीत बसण्याचाच आनंद एवढा आनंद असायचा कि परत येताना पाय दुखले तरी त्याचे काही विशेष काही वाईट वाटायचे नाही. कारण गाडीचे विशेष आकर्षण असणाऱ्या आम्हा गावाकडील मुलांना एखादी नवीन व कधीही न पाहिलेली गाडी आली तर मग काय विचारायचीच सोय नाही. असे आमचे गाडीबद्दल त्यावेळी आकर्षण असायचे. असो.
असाच माझ्या गावाकडील एक प्रसंग... मला आता अचूक साल आठवत नाही परंतु बहुतेक मी चौथी-पाचवीला असतानाची गोष्ट असेल म्हणजे २००२-२००३ च्या दरम्यानची. “एक किडनॅपिंगची गाडी गावाबाहेर फिरणाऱ्या मुलांना पकडून घेऊन जाते. या गाडीचा रंग सफेद असतो” अशी एक आमच्याकडे कुणीतरी अफवा पसरवली होती. ही अफवा होती कि खरच अशी सफेद रंगाची किडनॅपिंगची गाडी होती याबद्दल मलाही फारशी माहिती नव्हती व नंतरही कधी माहिती झाली नाही. पण या ‘सफेद’ रंगाच्या गाडीचा दरारा आम्हा मुलांवर किमान दीड-दोन वर्षे तरी कायम राहिला हे नक्की. या सफेद रंगाच्या गाडीची भीती आमच्या मनात इतकी रुजली कि आम्ही आमच्या गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर कुठेही सफेद रंगाची गाडी दिसली तर आम्ही जिथे मिळेल जागा तिथे लपण्याचा प्रयत्न करायचो. कधी-कधी तर रस्त्याच्या बाजू ह्या झाडा-झुडपांत लपताना पायाला टुपले किंवा अंगभर करवंदीच्या काट्यांनी खरचटले तरी आम्ही या साऱ्यांची पर्वा न करता जीव मुठीत घेवून पळायचो व एखाद्या दगडामागे किंवा कोणत्यातरी झाडाच्या मागे लपायचो. असे अनेक दिवस आम्ही त्या सफेद रंगाच्या ‘किडनॅपिंगच्या गाडी’ला घाबरत होतो. मात्र दिवसांवर दिवस गेले पण कधीही सफेद रंगाच्या गाडीने कधीही कोणा मुलाला पळवून नेले नाही त्यामुळे दिवसागणिक या ‘किडनॅपिंगच्या गाडी’ची भीती मनातून कमी होत गेली. आणि कालांतराने आम्ही विसरूनही गेलो. पण एव्हाना या गाडीची आम्हाला खूप भीती वाटते हे घरातल्यांना माहित पडले होते त्यामुळे मध्येच कधीतरी आम्हाला घाबरवण्यासाठी या सफेद गाडीचा नेहमी आधार घ्यायचे. पण कालांतराने आम्ही या भीतीपासून मुक्त झालो होतो. किंबहुना ही भीती मनापासून कायमचे निघून गेली होती.
आजही जेव्हा जेव्हा मला लहानपणीच्या या आठवणी आठवल्या कि मग पुन्हा लहान झाल्यासारखे वाटते आणि या साऱ्या आठवणी आठवत असताना कधी अचानक गंभीर चेहरा, कधी स्मित हास्य, कधी निराश अशा नानाविध मुद्रा चेहऱ्यावर उमटतात. या मुंबईच्या गजबजलेल्या शहरात रहायला आल्यापासून तर गावाकडील साऱ्या अनमोल क्षणांचे, मजेशीर प्रसंगांचे महत्व अधिकच जाणवू लागले आहे. गावाकडील ते सारे आयुष्य आपण या मुंबईच्या गजबजाटात हरवतो आहोत असेही वाटते. पुन्हा गावाकडे जावून तेच छान निर्मल आयुष्य जगावे असे वाटते.

-          -  नामदेव अंजना काटकर
        namdev.katkar@gmail.com

08 December, 2013

प्रेरणादायी व्यक्तिमत्व : सतीश काळसेकर

सतीश काळसेकर
खरंतर आयुष्यात अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांच्या विचारांमधून, वागणुकीतून काही ना काहीतरी आपण शिकत असतो. असेही अनेक व्यक्तिमत्व असतात ज्यांची नुसती कौतुकाची थाप आपल्याला प्रेरणादायी ठरत असते.... अशीच एक व्यक्ती ज्यांनी दिलेले प्रोत्साहन खरच माझ्यासाठी नेहमीच मोलाचे आहेत....
मी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षाला होतो... एका कामानिमित्त भूपेश गुप्ता भवनमध्ये गेलो होतो... ज्या व्यक्तीशी काम होतं.. ती व्यक्ती तिथे भेटणार होती... मी व माझा मित्र आकाश लोणके असे आम्ही दोघेजण गेलो होतो... भूपेश गुप्ता भवनच्या दुसऱ्या मजल्यावर गेलो.... उजव्या बाजूला एक केबिन दिसली...
आतील एकाने विचारले “कोण हवे आहेत ? काही काम आहे का ?”
मी त्यांना सविस्तर सांगितले कि असे असे काम आहे..यांना यांना भेटायचे आहेत...
“ठीक आहे.. बाजूला जी केबिन आहे तिथे बसलेत बघा ते ज्यांना तुम्हाला भेटायचे आहे...” ते म्हणाले.
आम्ही दोघेही बाजूच्या केबिनच्या दिशेने गेलो. आत केबिनमध्ये सफेद रंगाच्या कुर्ता-पायजमा परिधान केलेला अंगाने धडधाकट आणि आवाजात कणखरपणा  आणी स्पष्टपणा असलेला एक व्यक्ती.
“सर, आत येवू का ?” मी विचारले.
“अरे विचारताय काय ? तुमचीच केबिन आहे... तुम्हा तरुणांनी इथे येणे म्हणजे माझे भाग्यच..” समोरून उत्तर आले.
मी व आकाश आत केबिन मध्ये गेलो....परवानगी घेवून खुर्चीवर बसलो.... जे काम होते ते पूर्ण केले. विश्वास बसत नव्हतं कि एवढ्या मोठ्या व्यक्तीसमोर आपण बसलो आहोत. आतापर्यंत साहित्यिक म्हणून परिचयाचे असलेले हे व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यासमोर होते. अशा लोकांची भेट होणे म्हणजे माझे भाग्यच. समोर बसलेले ते व्यक्ती म्हणजे सतीश काळसेकर.
जवळ-जवळ दीड ते दोन तास आम्ही चर्चा केली असेल.. जेव्हा काळसेकर सरांना कळले कि मी व आकाश दोघेही पत्रकारितेचे विद्यार्थी आहोत तेव्हा त्यांनी पत्रकारितेवर खूप चर्चा केली. पत्रकारितेतील विविध व्यक्तिमत्वांची उदाहरणे दिली व पत्रकारिता कशी असावी याबद्दल सांगितले शिवाय खूप काही.... थोड्या वेळाने समोर असलेल्या एका गृहस्थाला जवळ बोलावले व त्याच्या कानात काहीतरी सांगितले. ते गृहस्थ बाहेर गेले व थोड्या वेळाने जयदेव डोळे लिखित “समाचार”  हे पुस्तक घेवून आले. काळसेकर सरांनी ते पुस्तक आम्हा दोघांना भेट म्हणून दिले. “नामदेव व आकाश तुमच्या आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.” असे पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्यांनी लिहिले आणि त्याखाली त्यांची स्वाक्षरी. क्या बात है !!! मनातल्या मनात म्हटले... आयुष्यात अजून काय हवे आहे ?...  एवढ्या मोठ्या व्यक्तीने असे स्वतःहून पुस्तक भेट देणे व त्यावर त्यांची स्वाक्षरी. एवढेच नव्हे.. काळसेकर  सरांनी आम्हा दोघांचाही पत्ता लिहून घेतला व गेली दोन-अडीच वर्षे ते एक रुपयाही न घेता ते आजही आम्हाला न विसरता त्यांचे “आपले वाङमय वृत्त” हे मासिक पोस्टाने पाठवतात....

खरच अशा लोकांकडून मिळणारी कौतुकाची थाप, त्यांच्याकडून मिळणारे प्रोत्साहन आयुष्यात खरच खूप मोलाचे असते.....

- नामदेव अंजना काटकर
  namdev.katkar@gmail.com

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...