05 February, 2019

प्रश्न विचारावे लागणारच


अनेकजण अण्णांच्या उपोषणाची टर उडवत आहेत, तर काहीजण उपोषण करणे खायची गोष्ट आहे का, असा सवाल विचारत आहेत. काल दिवसभर इथे यावर खल झाला. आजही होईल. अण्णांच्या विरोधकांमध्ये विरोधी पक्षाचे समर्थक, भाजप विरोधक, अण्णांच्या आंदोलनाचा विश्लेषक आहेत, तर अण्णांच्या बाजूने स्पष्टपणे भाजप समर्थक किंवा अनेक संवेदनशील माणसं आहेत, ज्यांना व्यक्तिगत अण्णांची काळजी वाटते.

मुळात प्रश्न उपोषणाला विरोध हा नाहीच. उपोषण अण्णांनी करावं, अन्यथा मोदींनी करावा किंवा राहुल गांधी यांनी करावं. प्रश्न असा आहे की, तुमच्या उपोषणातील मुद्द्यांचे विविध कंगोरे. उदाहरणार्थ - अण्णांचे लोकपाल किंवा शेतीविषयक इतर मुद्दे यावर या सरकारची आतापर्यंतची भूमिका काय, उपोषण केल्याने तत्काळ त्या भूमिकेत बदल होईल का, राजकीय समर्थन हवेच आहे का, केंद्राशी संबंधित मुद्दे राज्याचं मुख्यमंत्री सोडवेल का, आधी मसुदा देऊन फसवणूक झालेली असताना पुन्हा मासुद्यावर माघार घ्यावी का इत्यादी नाना प्रश्न या उपोषणाला जोडले आहेत.

अण्णा हजारे यांनी ज्याप्रकारे काँग्रेसच्या काळात आंदोलने केली, उपोषणे केली, तशी आता का केली नाही? असा सवाल विचारण्याआधी मी अण्णांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारू पाहतो, देशाची चिंता फक्त भ्रष्टाचार या मुद्द्यावर आहे का तुम्हाला? देशात सामाजिक उलथापालथ होत असताना, तुमच्यासारख्या देशाच्या सेवेचा वसा घेतलेल्या माणसाने मौन का बाळगावे? जात आणि धर्म वेगळा म्हणून माणसं मारली जातात, संशयाच्या आधारावर सामूहिक हत्याकांड केले जाते इत्यादी मुद्द्यांवर अण्णा का बोलले नाहीत? की हे मुद्दे देशसेवेशी निगडित नाहीत?

आता तुम्ही म्हणाल, त्यावर बोलायलाच हवे का? तर हो, अण्णा हजारे यांच्यासारख्या देशसेवा देशसेवा म्हणत उठबस करणाऱ्या समाजसेवकाने बोलायला हवे. तुम्ही राजकीय सोईने मुद्दे उचलणार असाल, तर कसे चालेल? मग तुमच्या नेहमीच्या मुद्द्याला पण काहीच अर्थ उरणार नाही. कारण सगळे मुद्दे एकमेकांशी संबंधित आहेत. कुठलाही देश एकाच मुद्द्यावर पुढे जात नाही. देशात जसे भ्रष्टाचार निर्मूलन झाले पाहिजे, तसेच भेद निर्मूलन सुद्धा झाले पाहिजे. मात्र इथे तर प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सत्ताधारी भेदांची पेरणी करत आहेत. आवाज दाबत आहेत. अशा काळात देशसेवा, लोकशाही यांची पारायणे करणाऱ्या अण्णांनी बोलले पाहिजे. आणि अण्णा बोलत नसतील, तर त्यांना प्रश्न विचारले गेलेच पाहिजेत.

अण्णांनी १९८० पासून कालच्या म्हणजे २०१९ पर्यंत वीस उपोषणे केली. १५२ दिवस अण्णा उपाशी राहिले. ज्यावेळी अवघा देश डोक्यावर (चांगल्या अर्थाने.) घेतो, त्यावेळी आपली जबाबदारी सुद्धा वाढते. मला वाटेल त्याच मुद्द्यावर मी उपोषण करेन, इथवर ठीक आहे. पण इतर मुद्द्यांवर किमान ज्येष्ठतेचे मत, भूमिका वगैरे मांडणं गरजेचे आहे. केवळ भ्रष्टाचार एके भ्रष्टाचारी करून भागणार नाही. जोडून येणारे शेकडो मुद्देही महत्त्वाचे आहेत.

सीबीआय किंवा इतर स्वायत्त संस्थांच्या सध्या किंवा आधी सुरू असलेल्या गोष्टींवर अण्णा का बोलत नाहीत? बोलायला हवे. अण्णांच्या उपोषणाशी हे मुद्दे संबंधित नाहीत, असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. लोकपाल, लोकायुक्त हे उद्या स्वायत्त संस्था म्हणून काम करतील. तेही जर पुढे जाऊन केंद्र सरकारच्या हातातील बाहुले बनणार असतील, तर स्वायत्त संस्थांच्या स्वायत्ततेसाठी अण्णांनी बोलायला हवे.

बाकी अण्णांच्या हेतूबद्दल शंका घ्यावी, असे सध्यातरी वाटत नाही. मात्र, हेतू व्यापक करुन, तो इतर अनेक मुद्द्यांपर्यंत आणावा, एवढेच. देशसेवा आणि लोकशाही वगैरे नावं घेत केवळ एका मुद्द्याला चिकटून बसत असाल आणि त्या मुद्द्याशी जोडून इतर मुद्द्यांवर चुप्पी साधत असाल, तर अण्णा, तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारले जाणारच.

सात दिवस उपाशी राहिलात, म्हणजे हेतू शुद्ध आहे आणि संसार नसलेला पंतप्रधान देश लुटणार नाही, असे केवळ आपापले भक्त मानत असतात, आमच्यासारखे प्रश्न विचारणारे नाहीत.

1 comment:

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...