वावटळ कादंबरी वाचून पूर्ण झाली. एकर आणि माणदेशी माणसं आणि हे तिसरं पुस्तक. व्यंकटेश माडगूळकर हा माणूस भयंकर पछाडत जातोय. उगाच किचकट किंवा बोजड शब्द न वापरता, हलके फुलके शब्द आणि समजणारी भाषा. काही ठिकाणी त्या त्या स्थितीनुसार अस्सल गावाकडील शब्द येतात. पण पुढचा मागचा संदर्भ लागून, कळून जातं तेही.
३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी या माणसाची हत्या झाली. त्या दिवसापासून या कादंबरीच्या कथेला सुरुवात होते. गांधी हत्येनंतर जो काही हल्लकल्लोळ मजला, गोंधळ - गदारोळ झाला, अफराफर मजली अशी सगळी पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. मुंबई-पुण्यातील हिंसेची वावटळ तुफान वेगाने गाव-खेड्यांपर्यंत पोहोचली. ब्राम्हणांची घरं जाळली गेली, शेजारी - पाजारी अचानक जाती शोधून, नामानिराळी झाली, ओळखीनाशी झाली. गांधी हत्येनंतर निर्माण झालेल्या या दंगलीत शेकडो वर्षांपासून जोपासलेली नाती सुद्धा कशी होरपळली, हे या कादंबरीत मांडलं आहे.
गोपू, यशवंता आणि शंकर या तीन ब्राम्हण मित्रांची ही गोष्ट. शंकर ही कथा सांगत कादंबरी पुढे सरकवत नेतो. पुण्यात शिक्षणासाठी - कामासाठी रहात असलेल्या या तिघांना गांधी हत्येनंतर जे पहावे लागले, सोसावे लागले, त्याची ही गोष्ट. जातीने ब्राम्हण असलेल्या गोडसे नामक व्यक्तीने गांधींना मारल्याने, पुण्यात हाहाकार माजला.
पुण्यातील स्थिती दंगलींमुळे भयंकर होत असल्याचे पाहून, तिघेही आपापल्या गावी जाण्यासाठी निघतात. या मार्गात जे अनुभव येतात, ते थरारक आहेत. ब्राम्हण असल्याने आपल्यावर केव्हाही हल्ला होऊ शकतो, हे भय मनात ठेवून वाट चालणारी ही तीन मुलं आपल्याला त्यावेळच्या स्थितीचं भयंकर रूप दाखवू पाहतात.
गावात पोहचेपर्यंत घरात कुणी वाचला असेल की नाही, याची चिंता असते, गावात माणसं ठीक आहेत, पण घरदार जाळून खाक झाले असल्याचे दिसते. रातोरात दंगलखोरांचे गटच्या गट गावावर हल्ले करायला येतात काय, घरदार जाळतात काय, घरातील वस्तू चोरून नेतात काय... हे सगळं गांधींच्या हत्येच्या निषेधार्थ सुरू असते. गांधी महाराज की जय, भारत माता की जय, अशा घोषणा देत, लुटालुट आणि हिंसेचे तांडव गावोगावी झाले, त्याचे हे चित्रण या कादंबरीत आहे. ज्या गांधीने आयुष्यभर अहिंसेचा प्रचार केला, विचार मांडला, त्याच गांधीच्या हत्येनंतर शहरं आणि गावं पेटवली गेली, हिंसेचे रौद्ररूप पाहायला मिळाले, त्या अनुषंगाने या कादंबरीचा विषय आहे.
या कादंबरीचा नायक शंकर आहे. तो विवेकी आहे. गांधी हत्या झाली हे वाईट आणि त्या हत्येमुळे कुणाचा दोष नसलेल्यांची दंगलीत राखरांगोळी झाली, हेही वाईट, हे शंकरला कळत होते. लेखकाने शंकरच्या तोंडून केवळ गांधी हत्येनंतर ब्राम्हणांची झालेली तारांबळ मांडली नाही, तर या काळातही ब्राम्हणांनी आपले वर्चस्ववादी विचार कसे सोडले नाहीत, हेही दाखवून दिले आहे.
शंकरच्या घराला आग लावली गेली म्हणून त्याच्या घरचे गावातील पाटलाच्या घरी आश्रय घेतात. तेव्हाही शंकरची आई तिथे वेगळी चूळ, वेगळे जेवण करते. शंकर विचारतो, आई, अशा स्थितीत सुद्धा तुला हा भेद आठवतो? त्यावर आई म्हणते, आपण आपले सोवळे - कोवळे सोडायचे नाहीत, आता आपल्यासोबत हे जाणार. म्हणजे, कितीही अंगावर आले, कितीही जीवावर आले, तरी जात सोडायची नाही, ही मानसिकता यातून लेखकाने दाखवली आहे. असे सारे एकीकडे असताना, शंकर आणि त्याचे कुटुंब गाव सोडण्याचा निर्णय घेतात, तेव्हा मात्र मन हेलावून जातं.
पेंशन घेऊन उर्वरित आयुष्य गावात घालवण्याचे हेतूने शंकरचे आबा गावात राहायला आलेले असतात. मात्र, गांधी हत्येनंतर उद्भवलेल्या या स्थितीत गावात रहावे त्यांना वाटत नव्हते, ब्राम्हण असल्याने झालेला त्रास त्यांच्या मनावर मोठा आघात करणारा होता, कधीच कुणाच्या वाट्याला न गेलेल्या आबांना फार दुःख झाले, म्हणून गाव सोडण्याचा निर्णय घेऊन, पोराबाळासह शहराच्या दिशेने निघतात, त्यावेळचे संवाद वाचताना आपणही आरपार तुटत जातो.
गांधी हत्या वाईट होती. मात्र त्यानंतर झालेल्या दंगलीत किती नाती दुरावली, जात विसरुन घराला घर चिकटून जगलेली माणसं तुटली, शहरं या ना त्या कारणावरून कोलमडत असतात, मात्र एकीने जगणारे गाव सुद्धा विस्कटले, याचे भयंकर रेखाटन या कादंबरीत आहे. माडगूळकरांनी खूप भिडणारे लिहिले आहे. शक्य झाल्यास कादंबरी नक्की वाचा.
No comments:
Post a Comment