28 February, 2019

जंग तो खुद ही एक मसला है..


माध्यमनिर्मित युद्धज्वर पाहता, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना 'अहो जहो' करणे म्हणजे सुद्धा देशद्रोह ठरवा, इथवर 'नाजूक' स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत हल्ला, युद्ध, प्रतिहल्ला यासंबंधी कथित प्रवाहाच्या विरोधात बोलणे म्हणजे आपणच तोफेसमोर उभे राहण्यासारखे आहे. भले हा प्रवाह दिशाहीन का असेना!

अशा एकंदरीत स्थितीत कुठल्याही राजकीय नेत्याने सडेतोड, स्पष्ट आणि विवेकी या शब्दांना साजेशी भूमिका घेणे सुद्धा कठीण होऊन बसते. आपले कार्यकर्ते सुद्धा युद्धाच्या दिशाहीन चर्चेच्या प्रवाहात अडकलेले असताना, पक्ष आणि राजकीय नेता म्हणून रोखठोक भूमिका शक्य नसते. कारण कार्यकर्ते दुरावण्याची आणि प्रवाह विरोधात जाण्याची शक्यता जास्त असते. अशा काळात राज ठाकरे यांच्यासारखा नेता उजवा ठरला आहे.


पुलवामा हल्ल्याचा निषेध करत असताना, युद्ध नको सांगून, संवादाची मागणी करुन, राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसात विरोधी पक्षातील नेत्यांकडून जी अपेक्षा होती, ती पूर्ण केली. अगदी काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाने सुद्धा इतकी खमकी भूमिका घेणे टाळले. कदाचित जनभावना विरोधात जाईल, याची भीती त्यांना सतावत असावी. राज ठाकरेंनी असा कुठलाही विचार न करता, विवेकी विचार शाबूत ठेवला आणि भूमिका स्पष्ट केली. त्यांचे मानावे तेवढे आभार कमी.


यावेळी राज ठाकरे यांच्या गेल्या काही वर्षातील भूमिका आपण विसरता कामा नये. जेणेकरुन या नेत्याची त्याच्या राजकीय चौकटीतील प्रगल्भता लक्षात येईल. पाकिस्तानी कलाकार, खेळाडू यांना वेळोवेळी मनसेने विरोध केला आहे. त्या त्या वेळी शस्त्रसंधी किंवा हल्ले असे कारण होते. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा राज ठाकरे यांनी निषेध व्यक्त करुन, प्रसंगी रस्त्यावर उतरुन विरोध केला. मात्र, शासन - प्रशासनाच्या व्यवस्थेत राहून विरोध करणे आणि युद्ध करून निषेध नोंदवणे यातील फरक ते जाणून आहेत, याचा मनस्वी आनंद वाटला.


राज ठाकरे यांच्या पत्रातील शब्द नि शब्द आजच्या घटकेला योग्य भूमिकेचा आदर्श आहे. तरीही भाजपची मंडळी त्यांना ट्रोल करत आहेत. मात्र तो जागतिक नाईलाज आहे. कारण अक्कलशून्य मंडळींना आपण काय बोलणार? राज ठाकरे यांच्या भूमिकेमागे नेमका अर्थ काय, हे कळण्याची मानसिकता आणि बुद्धी नसलेली मंडळी भाजपच्या सोशल मीडियावर काम करतात आणि युद्धाचे समर्थन करत सुटतात. असो.


खरंतर जे चूक आहे, त्यावर बोलत आलेच पाहिजे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या इतर असंख्य मुद्द्यांवर माझा टोकाचा विरोध आहे. मात्र, सद्यस्थितीत राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही प्रगल्भ राजकीय नेत्याचे दर्शन घडवणारी आहे. अर्थात, असा संवाद करुन प्रश्न सोडवण्याची भूमिका राज ठाकरेंनी इतर मुद्द्यांवर सुद्धा घ्यावी, ही अपेक्षा आहेच. मात्र, तूर्तास इतकेच.


राज ठाकरेंची युद्धाबाबत भूमिका सांगितली. त्या भूमिकेचे कौतुक सुद्धा केले. पण मला काय वाटतं? तर साहिर लुधियानवीच्या काही ओळींमधून मी माझी भूमिका सांगेन :

"जंग तो खुद ही एक मसला है
जंग क्या मसअलों का हल देगी
इसलिए ए शरीफ इंसानों
जंग टलती रहे तो बेहतर है
आप ओर हम सभी के आंगन में
शम्मा जलती रहे तो बेहतर है"

तर साथींनो, आपण युद्धाचा विरोध केलाच पाहिजे. सोशल मीडियावर लिहून केला, तरी ते कमी नाही. याचे कारण युद्धाची खुमखुमी असलेले विद्यमान नेते सोशल मीडियाचा ट्रेण्ड पाहून निर्णय घेणारे आहेत. त्यामुळे इथूनही राज ठाकरे यांच्यासारखे ठामपणे युद्धाच्या विरोधात उभे राहू.

आमच्या गावाकडे युद्धाची काय स्थिती?



दोन दिवस गावी होतो. शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होता. या कार्यक्रमासोबत देशातील सध्याच्या तणावाच्या स्थितीची गावाकडे काय प्रतिक्रिया असेल, याचीही उत्सुकता होती.

माझं गाव (बारशेत, रोहा, रायगड) समुद्र किनारपट्टीपासून ३५-४० किलोमीटर अंतरावर असल्याने, सुरक्षा यंत्रणेकडून काही सूचना दिल्या असतील का? गावात तणाव असेल का? अशा अनेक प्रश्नांचे काहूर मनात होतेच. मात्र, गावात गेल्यावर हे सगळे प्रश्न कोलमडून पडले.


सगळं शांत. शेतीची कामं ऐन जोमात आहेत. कुंपण घालण्यापासून भाजणीच्या कामांपर्यंत रेलचेल सुरु आहेत. मे महिना तोंडावर येऊन ठेपला असल्याने पाणी टंचाई डोक्यावर घिरक्या घालते आहे. अशा एकंदरीत रोजच्या कामात गावकुस गुरफटली आहे. जशी वर्षानुवर्षे गुरफटलेली असते. गावाच्या कुठल्याच क्षितिजावर युद्ध, हल्ला वगैरे गोष्टींचा मागमूस नाही.


शहरापासून दूर डोंगररांगेत वसलेल्या गावाने असे अज्ञानात राहणे चांगले की वाईट, हे माहीत नाही. मात्र, सद्यस्थितीत गाव अशा अज्ञानात राहिल्याचे बरेच वाटले. उगाच नको तो तणाव, नको ती धावपळ, नको ते टेंशन गावाने उरावर घेऊन जगण्यात काडीचा अर्थ नाही.


हल्ला झाला आणि त्यात आपले सैनिक शहीद झाले, एवढी खबर गावात पोहोचली आहे. टीव्ही असल्याने बातम्या पाहिल्या जातात. पण पुलवामा कुठे आहे, हल्ला नेमका कुठे झाला, कुणी केला, का केला, हे काही कळत नसल्याने हल्ल्याच्या ठिकाणचे उद्ध्वस्त दृश्य पाहून हळहळ व्यक्त होते फक्त.


गावात काही शिकली सवरलेली माणसं आहेत, त्यांना देशात नक्की काय चाललं आहे, ते कळतं. पण इतरांना सांगण्यात ते वेळ दवडत नाही. कारण पुन्हा मग सगळं निस्तरून नि विस्तरून सांगावे लागते. कोण एवढा डोक्याला ताण देतो? त्यापेक्षा अज्ञानात आहेत, तेच बरे!


काल पाकिस्तानचा विमान पडल्याची घटना टीव्हीवर पाहताना आई म्हणाली, "त्यात कुणी आसल त्याला लागलं आसल ना?"
मी म्हटलं, "आई, ते आपल्या देशाचे विमान नव्हते."
आई म्हणाली, "मग काय झालं मेल्या? माणूस आत आसल ना? जगला-वाचला आसला तर बरं व्हईल, जाम लागलं आसल रं त्याला. दुष्मनाला पण असं होऊ नये."


त्या विमानातील पायलट मृत्युमुखी पडला, हे तिला सांगण्याचा फंदात मी पडलो नाही. तिच्या अज्ञानात प्रचंड सुख जाणवलं मला.


आमच्या घरासमोर भिकी अक्का राहते. टीव्ही पाहायला आमच्या घरात येते. सारख्या युद्धाच्या बातम्या पाहून, तिने प्रश्न विचारला, "पाकिस्तान म्हणजे आपण की ते?"


आई असो किंवा भिकी अक्का, किंवा यांच्यासारखे अनेकजण असोत, एक नक्की - या देशात एक मोठा वर्ग राहतो, ज्यांच्या भावनांना सीमेचे बंधन नाही!

12 February, 2019

खरे प्रश्न (भाग-1) : अदानीच्या नावानं चांगभलं!


फोटो सौजन्य : दंतेवाडा टुरिझम
छत्तीसगड राज्यात हसदेव अरण्य नावाचे प्रचंड मोठे जंगल आहे. मोठे म्हणजे कितीतर तबब्ल 1 लाख 70 हजार हेक्टर इतके मोठे. अत्यंत घनदाट आणि विस्तीर्ण. खऱ्या अर्थाने निसर्गसंपन्न असं हे जंगल. इथे विविध वनस्पतींच्या दुर्मिळ जाती-प्रजाती आढळतात. एलिफंट कॉरिडोर म्हणूनही या जंगलाची ओळख आहे. वनस्पती आणि प्राण्यांपुरते जंगलाचे महत्त्व नाही, तर निसर्ग म्हणूनही देखणा आणि जतन करावा असा हा भाग. इथल्या आदिवासी समाजाचा उदरनिर्वाहही याच जंगलावर अवलंबून आहे.

आता झालंय असं की, आजपासून चार-पाच दिवसांपूर्वी म्हणजे 10 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वन सल्लागार समितीने (FAC) परसा कोल माईनला प्राथमिक मंजुरी दिली गेली. ही परसा कोल मायनिंग कपंनी राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेडची असून, राजस्थान कॅलियरिंज लिमिटेड ही कंपनी खोदकाम करणार आहे. पण या सगळ्यामागे उद्योगपती गौतम अदानी आहेत. कसं ते सांगतो.

अदानींची प्रतिमा सांभाळण्यासाठी आता राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेडचे संचालक एसएस मीना पुढे आलेत. या एसएस मीना म्हणत आहेत की, “छत्तीसगडमधील हे खाण खणण्याचं काम राजस्थान कॅलियरिंज लिमिटेडला दिलीय. अदानींना दिले नाही.” पण वस्तुस्थिती अशीय की, राजस्थान कॅलियरिंज लिमिटेड ही कंपनी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची कंपनी म्हणून लिस्टेड झालीय. त्यामुळे प्रत्यक्ष नसलं, तरी अप्रत्यक्षरित्या या सर्व जांगडगुत्त्यामागे गौदम अदानी आहेत, हे वेगळे सांगायला नको.

फोटो सौजन्य : मनी कंट्रोल
आधी म्हटल्याप्रमाणे 1 लाख 70 हजार हेक्टरवर हसदेव अरण्य पसरलं आहे. धक्कादायक म्हणजे, यापैकी 841.538 हेक्टरवर परसा ओपनकास्ट कोल माईन असेल. म्हणजे, तुम्हा-आम्हाला समजण्याच्या भाषेत सांगायचं तर 800 फुटबॉल मैदान मावतील, एवढी जागा. म्हणजे, एवढ्या विस्तीर्ण परिसरातील निसर्गावर खाणीची कुऱ्हाड कोसळणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असा हा विषय आहे. मात्र, या विषयाचे कुणालाही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. 


छत्तीसगड बचाओ आंदोलनाचे नेते अलोक शुक्ला ‘हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना म्हणाले की, “या प्रकल्पामुळे केवळ घनदाट जंगल नेस्तनाबूत होणार नाहीय, तर एलिफंट कॉरिडोरही उद्ध्वस्त होईल आणि या प्रदेशावर हायड्रोलॉजिकल परिणामही होईल. इथले आदिवासी तर पूर्णपणे याच जंगलावर आधारित आहे.


अदानींसारख्या भांडवलदारांचं पोट कधीच भरत नाही. त्यांना ना जंगलाची चिंता नसते, ना तिथे राहणाऱ्या माणसांची. मग पशु-पक्ष्यांची बातच कशालामात्र, ‘भांडवलदारम्हटल्यावर, तुम्हाला वाटेल, हे कम्युस्टांचे शब्द वगैरे आहेत. यांचा विकासाला विरोधच असतो. मात्र, एक लक्षात ठेवा, या उद्योगपतींच्या घशात देशाची नैसर्गिक संपत्तीही घालण्यास सुरुवात झालीय. विकासाची वाट विनाशातून जाता कामा नये, अन्यथा उद्ध्वस्त होण्यासाठी वेळ जाणार नाही.

आणि हो, माध्यमांसदर्भातही बोलायला हवं. वरील विनाशकारी प्रकरणाची दखल हिंदुस्तान टाईम्स, स्कूपहूप, नई दुनिया यांसारख्या काही नेमक्या आणि मोजक्याच वृत्तपत्र, वेबसाईट्सनी घेतली आहे. 

संदर्भ :

05 February, 2019

प्रश्न विचारावे लागणारच


अनेकजण अण्णांच्या उपोषणाची टर उडवत आहेत, तर काहीजण उपोषण करणे खायची गोष्ट आहे का, असा सवाल विचारत आहेत. काल दिवसभर इथे यावर खल झाला. आजही होईल. अण्णांच्या विरोधकांमध्ये विरोधी पक्षाचे समर्थक, भाजप विरोधक, अण्णांच्या आंदोलनाचा विश्लेषक आहेत, तर अण्णांच्या बाजूने स्पष्टपणे भाजप समर्थक किंवा अनेक संवेदनशील माणसं आहेत, ज्यांना व्यक्तिगत अण्णांची काळजी वाटते.

मुळात प्रश्न उपोषणाला विरोध हा नाहीच. उपोषण अण्णांनी करावं, अन्यथा मोदींनी करावा किंवा राहुल गांधी यांनी करावं. प्रश्न असा आहे की, तुमच्या उपोषणातील मुद्द्यांचे विविध कंगोरे. उदाहरणार्थ - अण्णांचे लोकपाल किंवा शेतीविषयक इतर मुद्दे यावर या सरकारची आतापर्यंतची भूमिका काय, उपोषण केल्याने तत्काळ त्या भूमिकेत बदल होईल का, राजकीय समर्थन हवेच आहे का, केंद्राशी संबंधित मुद्दे राज्याचं मुख्यमंत्री सोडवेल का, आधी मसुदा देऊन फसवणूक झालेली असताना पुन्हा मासुद्यावर माघार घ्यावी का इत्यादी नाना प्रश्न या उपोषणाला जोडले आहेत.

अण्णा हजारे यांनी ज्याप्रकारे काँग्रेसच्या काळात आंदोलने केली, उपोषणे केली, तशी आता का केली नाही? असा सवाल विचारण्याआधी मी अण्णांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारू पाहतो, देशाची चिंता फक्त भ्रष्टाचार या मुद्द्यावर आहे का तुम्हाला? देशात सामाजिक उलथापालथ होत असताना, तुमच्यासारख्या देशाच्या सेवेचा वसा घेतलेल्या माणसाने मौन का बाळगावे? जात आणि धर्म वेगळा म्हणून माणसं मारली जातात, संशयाच्या आधारावर सामूहिक हत्याकांड केले जाते इत्यादी मुद्द्यांवर अण्णा का बोलले नाहीत? की हे मुद्दे देशसेवेशी निगडित नाहीत?

आता तुम्ही म्हणाल, त्यावर बोलायलाच हवे का? तर हो, अण्णा हजारे यांच्यासारख्या देशसेवा देशसेवा म्हणत उठबस करणाऱ्या समाजसेवकाने बोलायला हवे. तुम्ही राजकीय सोईने मुद्दे उचलणार असाल, तर कसे चालेल? मग तुमच्या नेहमीच्या मुद्द्याला पण काहीच अर्थ उरणार नाही. कारण सगळे मुद्दे एकमेकांशी संबंधित आहेत. कुठलाही देश एकाच मुद्द्यावर पुढे जात नाही. देशात जसे भ्रष्टाचार निर्मूलन झाले पाहिजे, तसेच भेद निर्मूलन सुद्धा झाले पाहिजे. मात्र इथे तर प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सत्ताधारी भेदांची पेरणी करत आहेत. आवाज दाबत आहेत. अशा काळात देशसेवा, लोकशाही यांची पारायणे करणाऱ्या अण्णांनी बोलले पाहिजे. आणि अण्णा बोलत नसतील, तर त्यांना प्रश्न विचारले गेलेच पाहिजेत.

अण्णांनी १९८० पासून कालच्या म्हणजे २०१९ पर्यंत वीस उपोषणे केली. १५२ दिवस अण्णा उपाशी राहिले. ज्यावेळी अवघा देश डोक्यावर (चांगल्या अर्थाने.) घेतो, त्यावेळी आपली जबाबदारी सुद्धा वाढते. मला वाटेल त्याच मुद्द्यावर मी उपोषण करेन, इथवर ठीक आहे. पण इतर मुद्द्यांवर किमान ज्येष्ठतेचे मत, भूमिका वगैरे मांडणं गरजेचे आहे. केवळ भ्रष्टाचार एके भ्रष्टाचारी करून भागणार नाही. जोडून येणारे शेकडो मुद्देही महत्त्वाचे आहेत.

सीबीआय किंवा इतर स्वायत्त संस्थांच्या सध्या किंवा आधी सुरू असलेल्या गोष्टींवर अण्णा का बोलत नाहीत? बोलायला हवे. अण्णांच्या उपोषणाशी हे मुद्दे संबंधित नाहीत, असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. लोकपाल, लोकायुक्त हे उद्या स्वायत्त संस्था म्हणून काम करतील. तेही जर पुढे जाऊन केंद्र सरकारच्या हातातील बाहुले बनणार असतील, तर स्वायत्त संस्थांच्या स्वायत्ततेसाठी अण्णांनी बोलायला हवे.

बाकी अण्णांच्या हेतूबद्दल शंका घ्यावी, असे सध्यातरी वाटत नाही. मात्र, हेतू व्यापक करुन, तो इतर अनेक मुद्द्यांपर्यंत आणावा, एवढेच. देशसेवा आणि लोकशाही वगैरे नावं घेत केवळ एका मुद्द्याला चिकटून बसत असाल आणि त्या मुद्द्याशी जोडून इतर मुद्द्यांवर चुप्पी साधत असाल, तर अण्णा, तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारले जाणारच.

सात दिवस उपाशी राहिलात, म्हणजे हेतू शुद्ध आहे आणि संसार नसलेला पंतप्रधान देश लुटणार नाही, असे केवळ आपापले भक्त मानत असतात, आमच्यासारखे प्रश्न विचारणारे नाहीत.

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...