दोन दिवस गावी होतो. शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होता. या कार्यक्रमासोबत देशातील सध्याच्या तणावाच्या स्थितीची गावाकडे काय प्रतिक्रिया असेल, याचीही उत्सुकता होती.
माझं गाव (बारशेत, रोहा, रायगड) समुद्र किनारपट्टीपासून ३५-४० किलोमीटर अंतरावर असल्याने, सुरक्षा यंत्रणेकडून काही सूचना दिल्या असतील का? गावात तणाव असेल का? अशा अनेक प्रश्नांचे काहूर मनात होतेच. मात्र, गावात गेल्यावर हे सगळे प्रश्न कोलमडून पडले.
सगळं शांत. शेतीची कामं ऐन जोमात आहेत. कुंपण घालण्यापासून भाजणीच्या कामांपर्यंत रेलचेल सुरु आहेत. मे महिना तोंडावर येऊन ठेपला असल्याने पाणी टंचाई डोक्यावर घिरक्या घालते आहे. अशा एकंदरीत रोजच्या कामात गावकुस गुरफटली आहे. जशी वर्षानुवर्षे गुरफटलेली असते. गावाच्या कुठल्याच क्षितिजावर युद्ध, हल्ला वगैरे गोष्टींचा मागमूस नाही.
शहरापासून दूर डोंगररांगेत वसलेल्या गावाने असे अज्ञानात राहणे चांगले की वाईट, हे माहीत नाही. मात्र, सद्यस्थितीत गाव अशा अज्ञानात राहिल्याचे बरेच वाटले. उगाच नको तो तणाव, नको ती धावपळ, नको ते टेंशन गावाने उरावर घेऊन जगण्यात काडीचा अर्थ नाही.
हल्ला झाला आणि त्यात आपले सैनिक शहीद झाले, एवढी खबर गावात पोहोचली आहे. टीव्ही असल्याने बातम्या पाहिल्या जातात. पण पुलवामा कुठे आहे, हल्ला नेमका कुठे झाला, कुणी केला, का केला, हे काही कळत नसल्याने हल्ल्याच्या ठिकाणचे उद्ध्वस्त दृश्य पाहून हळहळ व्यक्त होते फक्त.
गावात काही शिकली सवरलेली माणसं आहेत, त्यांना देशात नक्की काय चाललं आहे, ते कळतं. पण इतरांना सांगण्यात ते वेळ दवडत नाही. कारण पुन्हा मग सगळं निस्तरून नि विस्तरून सांगावे लागते. कोण एवढा डोक्याला ताण देतो? त्यापेक्षा अज्ञानात आहेत, तेच बरे!
काल पाकिस्तानचा विमान पडल्याची घटना टीव्हीवर पाहताना आई म्हणाली, "त्यात कुणी आसल त्याला लागलं आसल ना?"
मी म्हटलं, "आई, ते आपल्या देशाचे विमान नव्हते."
आई म्हणाली, "मग काय झालं मेल्या? माणूस आत आसल ना? जगला-वाचला आसला तर बरं व्हईल, जाम लागलं आसल रं त्याला. दुष्मनाला पण असं होऊ नये."
त्या विमानातील पायलट मृत्युमुखी पडला, हे तिला सांगण्याचा फंदात मी पडलो नाही. तिच्या अज्ञानात प्रचंड सुख जाणवलं मला.
आमच्या घरासमोर भिकी अक्का राहते. टीव्ही पाहायला आमच्या घरात येते. सारख्या युद्धाच्या बातम्या पाहून, तिने प्रश्न विचारला, "पाकिस्तान म्हणजे आपण की ते?"
आई असो किंवा भिकी अक्का, किंवा यांच्यासारखे अनेकजण असोत, एक नक्की - या देशात एक मोठा वर्ग राहतो, ज्यांच्या भावनांना सीमेचे बंधन नाही!
No comments:
Post a Comment