31 January, 2019

गांधी हत्येनंतरची 'वावटळ'



वावटळ कादंबरी वाचून पूर्ण झाली. एकर आणि माणदेशी माणसं आणि हे तिसरं पुस्तक. व्यंकटेश माडगूळकर हा माणूस भयंकर पछाडत जातोय. उगाच किचकट किंवा बोजड शब्द न वापरता, हलके फुलके शब्द आणि समजणारी भाषा. काही ठिकाणी त्या त्या स्थितीनुसार अस्सल गावाकडील शब्द येतात. पण पुढचा मागचा संदर्भ लागून, कळून जातं तेही.

३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी या माणसाची हत्या झाली. त्या दिवसापासून या कादंबरीच्या कथेला सुरुवात होते. गांधी हत्येनंतर जो काही हल्लकल्लोळ मजला, गोंधळ - गदारोळ झाला, अफराफर मजली अशी सगळी पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. मुंबई-पुण्यातील हिंसेची वावटळ तुफान वेगाने गाव-खेड्यांपर्यंत पोहोचली. ब्राम्हणांची घरं जाळली गेली, शेजारी - पाजारी अचानक जाती शोधून, नामानिराळी झाली, ओळखीनाशी झाली. गांधी हत्येनंतर निर्माण झालेल्या या दंगलीत शेकडो वर्षांपासून जोपासलेली नाती सुद्धा कशी होरपळली, हे या कादंबरीत मांडलं आहे.

गोपू, यशवंता आणि शंकर या तीन ब्राम्हण मित्रांची ही गोष्ट. शंकर ही कथा सांगत कादंबरी पुढे सरकवत नेतो. पुण्यात शिक्षणासाठी - कामासाठी रहात असलेल्या या तिघांना गांधी हत्येनंतर जे पहावे लागले, सोसावे लागले, त्याची ही गोष्ट. जातीने ब्राम्हण असलेल्या गोडसे नामक व्यक्तीने गांधींना मारल्याने, पुण्यात हाहाकार माजला.

पुण्यातील स्थिती दंगलींमुळे भयंकर होत असल्याचे पाहून, तिघेही आपापल्या गावी जाण्यासाठी निघतात. या मार्गात जे अनुभव येतात, ते थरारक आहेत. ब्राम्हण असल्याने आपल्यावर केव्हाही हल्ला होऊ शकतो, हे भय मनात ठेवून वाट चालणारी ही तीन मुलं आपल्याला त्यावेळच्या स्थितीचं भयंकर रूप दाखवू पाहतात.

गावात पोहचेपर्यंत घरात कुणी वाचला असेल की नाही, याची चिंता असते, गावात माणसं ठीक आहेत, पण घरदार जाळून खाक झाले असल्याचे दिसते. रातोरात दंगलखोरांचे गटच्या गट गावावर हल्ले करायला येतात काय, घरदार जाळतात काय, घरातील वस्तू चोरून नेतात काय... हे सगळं गांधींच्या हत्येच्या निषेधार्थ सुरू असते. गांधी महाराज की जय, भारत माता की जय, अशा घोषणा देत, लुटालुट आणि हिंसेचे तांडव गावोगावी झाले, त्याचे हे चित्रण या कादंबरीत आहे. ज्या गांधीने आयुष्यभर अहिंसेचा प्रचार केला, विचार मांडला, त्याच गांधीच्या हत्येनंतर शहरं आणि गावं पेटवली गेली, हिंसेचे रौद्ररूप पाहायला मिळाले, त्या अनुषंगाने या कादंबरीचा विषय आहे.

या कादंबरीचा नायक शंकर आहे. तो विवेकी आहे. गांधी हत्या झाली हे वाईट आणि त्या हत्येमुळे कुणाचा दोष नसलेल्यांची दंगलीत राखरांगोळी झाली, हेही वाईट, हे शंकरला कळत होते. लेखकाने शंकरच्या तोंडून केवळ गांधी हत्येनंतर ब्राम्हणांची झालेली तारांबळ मांडली नाही, तर या काळातही ब्राम्हणांनी आपले वर्चस्ववादी विचार कसे सोडले नाहीत, हेही दाखवून दिले आहे.

शंकरच्या घराला आग लावली गेली म्हणून त्याच्या घरचे गावातील पाटलाच्या घरी आश्रय घेतात. तेव्हाही शंकरची आई तिथे वेगळी चूळ, वेगळे जेवण करते. शंकर विचारतो, आई, अशा स्थितीत सुद्धा तुला हा भेद आठवतो? त्यावर आई म्हणते, आपण आपले सोवळे - कोवळे सोडायचे नाहीत, आता आपल्यासोबत हे जाणार. म्हणजे, कितीही अंगावर आले, कितीही जीवावर आले, तरी जात सोडायची नाही, ही मानसिकता यातून लेखकाने दाखवली आहे. असे सारे एकीकडे असताना, शंकर आणि त्याचे कुटुंब गाव सोडण्याचा निर्णय घेतात, तेव्हा मात्र मन हेलावून जातं.

पेंशन घेऊन उर्वरित आयुष्य गावात घालवण्याचे हेतूने शंकरचे आबा गावात राहायला आलेले असतात. मात्र, गांधी हत्येनंतर उद्भवलेल्या या स्थितीत गावात रहावे त्यांना वाटत नव्हते, ब्राम्हण असल्याने झालेला त्रास त्यांच्या मनावर मोठा आघात करणारा होता, कधीच कुणाच्या वाट्याला न गेलेल्या आबांना फार दुःख झाले, म्हणून गाव सोडण्याचा निर्णय घेऊन, पोराबाळासह शहराच्या दिशेने निघतात, त्यावेळचे संवाद वाचताना आपणही आरपार तुटत जातो.

गांधी हत्या वाईट होती. मात्र त्यानंतर झालेल्या दंगलीत किती नाती दुरावली, जात विसरुन घराला घर चिकटून जगलेली माणसं तुटली, शहरं या ना त्या कारणावरून कोलमडत असतात, मात्र एकीने जगणारे गाव सुद्धा विस्कटले, याचे भयंकर रेखाटन या कादंबरीत आहे. माडगूळकरांनी खूप भिडणारे लिहिले आहे. शक्य झाल्यास कादंबरी नक्की वाचा.

21 January, 2019

सुभाष




काॅलेज सोडून नियमित जाॅब पकडावा, असा विचार डोक्यात होता. फर्स्ट ईयर डिस्टिंक्शनमध्ये पास झालेलो. पण सेकंड ईयरला अॅडमिशन घेण्यासाठी १५ हजार रुपये नव्हते. सगळी धावाधाव संपल्यानंतर अखेर सुभाषला याबाबत सांगितलं. त्याने तातडीने १० हजार रुपये रोख हातात ठेवले आणि म्हणाला, आरामात परत कर. पण शिक्षण सोडू नकोस.


सुभाषसारखे आजच्या जगात सहसा भेटत नाहीत. निस्वार्थी आणि मुक्तहस्ताने मदत करणारे. सुभाष वेगळा आहे. अफाट संवेदनशील माणूस.


खरंतर वरील प्रसंग हा माझ्याबाबतीत घडला म्हणून सांगितला. आणि हा फक्त एक झाला. असे असंख्य प्रसंग सुभाषच्या खात्यात जमा आहेत. सुभाषने माणसं कमावलीयेत. तो खरा श्रीमंत आहे.


सुभाषच्या या जाणीवेमागे असंख्य खाचखळग्यांचा इतिहास आहे. मुळात चढ-उतार पार केल्याशिवाय अथांग समुद्राचा अनुभव गंगा-यमुनेसारख्या महानद्यांनाही चुकला नाही. तिथं आपली काय बात? तसंच काहीसं सुभाषचं आयुष्य भन्नाट वळणांचं, अतिव दु:खाचं आणि अफाट इनस्पिरेशनल आहे.


माझी आणि त्याची भेट झाली मुंबईतील विलेपार्ल्यात. संत जनाबाई रोडवरील जाधवांच्या पेपर स्टाॅलवर. पेपरलाईन टाकून चहा पित बसलो असताना, सुभाष पेपर टाकत तिथे आला. त्याला पेपरलाईनसाठी पोरगा हवा होता.


त्याचवेळी मी जिथे पेपर टाकायचो, त्याने दोन-एक महिन्याचा पगार दिला नव्हता. जाधवांनी सूचवलं, याच्याकडे काम करणार का? तातडीने हो म्हणालो. सुभाषचं नाव पार्ल्यातल्या पेपरवाल्यांमध्ये आदरानं घेतलं जाई. त्यामुळे तशी ओळख होतीच. बस्स आमच्या ओळखीचा आणि पुढच्या काळात मैत्रीचा प्रवास इथून सुरु झाला. सुभाष अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी एक झाला.


सुभाषशी ओळख असणं अभिमानाची बाब वाटावी, इतका सच्चा माणूस. एकास दोन नाही. अगदी आत एक-बाहेर एक. स्पष्ट आणि सरळ. मात्र साधा. याच साधेपणामुळे अनेकांनी त्याला फसवलंही. पण तो तरीही आपला मदत करण्याची सवय सोडली नाही. सुभाषकडे काम करता करता कित्येकांना मदत करताना आणि कित्येकांनी हजारो रुपयांना सुभाषला फसवल्याचं ऐकलंय. 'जाऊदे, कुठे नेणाराय पैसा.' असं बोलून त्याचा प्रवास सुरुच आहे. अविरत आणि अखंड. सुभाषच्या या स्वभावाचं मला फार कौतुक वाटतं.


सुभाषचा वैयक्तिक प्रवास खाचखळग्यांचा आहे. मात्र तेवढाच इनस्पिरेशनल. माणूस म्हणून घडण्याचा प्रवास.


कळतही नव्हतं, त्या वयात सुभाषच्या आईचं निधन झालं. मग शाळा शिकत असतानाच गावातल्या किराणा मालाच्या दुकानात कामाला राहिला. शेतात कामं करत, शाळेपासूनच नोकरी करत शिक्षण घेतलं. दरम्यान वडिलांनी दुसरं लग्न केलं. आईची माया ती आईचीच. हे कळू लागल्यानंतर त्याने अभ्यासातली गोडी वाढवली आणि दहावी-बारावी पूर्ण केली. पुढे पदवीचं शिक्षण घेऊन मुंबईत आला. मात्र शिक्षणाच्या जोरावर नोकरीची वाणवा असल्याने मिळते ते काम करत गेला.


हनुमान रोडवरील फुलांच्या दुकानात काम करुन, खाण्या-पिण्याची आणि त्या दुकानातच झोपण्याची व्यवस्था झाली. पुढे पेपरलाईन टाकू लागला आणि मग स्वत:ची पेपरलाईन सुरु केली. मधल्या काळात कुठेच आधार मिळेना म्हणून हनुमान रोडवरच्याच गझाली हाॅटेलच्या फूटपाथवर वडापव पोटात सारुन कित्येक रात्री घालवल्या. मातीचं आंथरुण आणि आभाळाचं पांघरुण. बस्स!


या सर्व गोष्टींना आता १५ हून अधिक वर्षे लोटली. रत्नागिरीतल्या चिपळूणपासून सुरु झालेला प्रवास मुंबईच्या सावलीत विसावलाय. आता पार्ल्यातील एका चांगल्या भागात रुम घेऊन, पत्नी आणि चिमुकल्या मुलीसोबत स्थायिक आहे. इतक्या खाचखळग्यांची जाणीव मनात कायम ठेवून, अशाच स्थितीतून कुणी आला असेल तर सुभाष मदत करायला मागे पुढे पाहत नाही. उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला कळू नये, इतका दानशूर. या व अशा अनेक गोष्टींमुळे त्याचा मित्रपरिवारही अफाट आहे.

20 January, 2019

महाआघाडीच्या सभेबाबत 10 निरीक्षणं



2019 च्या लोकसभेची तयारी म्हणून पश्चिम बंगालमध्ये देशातील विरोधी पक्षांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. देशातील दिग्गज नेते उपस्थित होते. लाखोंचा जनसागर समोर होता. केजरीवा यांच्यासारखा एरवी या महाआघाड्यांपासून अलिप्त राहणारा नेताही या सभेत होता. त्यामुळे या सभेचं महत्त्व मोठं आहे. या महाआघाडीच्या महासभेबाबत काही निरीक्षणं :

1. महाआघाडीच्या सभेत काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे दिसले. मात्र, ते त्या व्यासपीठावर तोंडी लावण्यापुरते वाटले. काँग्रेसला वगळून महाआघाडी वगैरे चर्चा नको, म्हणून खर्गे तिथे होते की काय, असा निष्कर्ष काढायला वाव आहे. अर्थात, खर्गेंसारखा दिग्गज नेता हजेरी लावतो म्हणजे ठोस कारण असणार. पण तरी.

2. ज्याप्रकारे आपापल्या राज्यात ताकद राखून असलेले प्रादेशिक पक्ष एकजुटीने गाठी-भेटी घेत आहेत, महारॅली आयोजित करतायत, त्यावरुन यांची आघाडी काँग्रेसलाही धक्का द्यायला मागे-पुढे पाहणार नाही, असे वाटायला लागलंय. इन शॉर्ट, यूपीए-एनडीए सोडून तिसरी फ्रंट उभारुन निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात किंवा निवडणुकीनंतर एकत्र येऊ शकतात.

3. अरविंद केजरीवाल यांच्यासारखा नेता जर महाआघाडीच्या व्यासपीठावर येत असेल, तर या महाआघाडीची मोट बांधण्यात यश मिळालंय, असे म्हणायला वाव आहे. कारण ठोस कारणं, नेमके मुद्दे, स्पष्ट भूमिका असल्याशिवाय पवार वगैरेंसारख्या मुरलेल्या राजकारण्यांच्या नादाला केजरीवाल लागणार नाहीत.

4. पश्चिम बंगालमधील महाआघाडीच्या व्यासपीठावर चार-पाच मुख्यमंत्री, राष्ट्रीय नेते वगैरे होते. मात्र, त्यांचे वैयक्तिक राजकीय संबंध पाहता, ते कायम ताणलेलेच दिसतात. त्यात शरद पवार हेच समन्वयवादी दिसत होते. यांना जोडणारा धागा म्हणून पवारांकडे पाहू शकतो.

5. प्रत्येक प्रादेशिक पक्षाने जमेल तशा आघाड्या करुन, जमेल तसं स्वबळावर लढून, जास्तीत जास्त खासदार निवडून आणून, निवडणुकीनंतर एक व्हायचं, असा एक मानस दिसून येतो.

6. भाजप खासदार असलेले शत्रुघ्न सिन्हा हेही महाआघाडीच्या व्यासपीठावर दिसले. तसे ते आधीही विरोधकांच्या व्यासपीठावर दिसले होते. मात्र, विरोधकांच्या एवढ्या मोठ्या व्यासपीठावर त्यांचे असणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या या कृतीमुळे भाजपमधील इथर नाराजांना बळ मिळू शकतं आणि तेही पुनर्विचार करु शकतात.

7. यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा अशांचा फायदा असा की, त्यांचे बोलणे लोक जास्त मनावर घेतील. कारण ते भाजपचे असून, पक्षविरोधी बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे सिरियसली पाहिले जाईल. याचा फायदा विरोधकांना नक्कीच होईल.

8. महाआघाडीच्या व्यासपीठावरुन डाव्यांना लांब ठेवल्याचे चित्र होते. कालच्या सभेचं आयोजन ममता बॅनर्जींनी केल्याने डाव्यांना स्थान दिले नसावे. मात्र या नेत्यांनी विसरायला नको, देशात शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचे काम डावे करत आहेत. डाव्यांच्या शेतकरी संघटनाच मोठ-मोठाले मोर्चे काढत आहेत. त्यांना डावलत असाल, तर फटका निश्चित बसेल.

9. महाआघाडीच्या व्यासपीठावरील नेत्यांची भाषणं ऐकल्यांतर एक निश्चित आहे की, हे लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करणार नाहीत. निकालानंतर पक्षीय बलाबल पाहून ठरवतील. यात काँग्रेस प्रचंड मागे पडू शकतं. त्यामुळे एखाद्या प्रादेशिक पक्षाचा नेताच पुढे येऊ शकतो.

10. प्रत्यक्ष महाआघाडी आणि अप्रत्यक्ष महाआघाडी असेही विश्लेषण होणे गरजेचे आहे. कारण जर प्रत्यक्ष महाआघाडी घोषित केली गेली, तर भाजपला आपला शत्रू ठरवणे सोपे जाईल आणि भाजप तसा प्रचार सुरु करेल. मात्र, अप्रत्यक्ष किंवा आतून महाआघाडी आणि प्रत्यक्षात स्वतंत्र ताकदीनुसार लढून नंतर एक व्हायचं, असं झाल्यास, भाजपची गोची होईल आणि नेमका कुणाला विरोध करायचा, असा गोंधळ उडू शकतो. सध्याच्या महाआघाडीचा हेतू असाच काहीसा दिसून येतो.

अर्थात, ही निरीक्षणं फार वरवरची आणि घाईची आहेत. मात्र, तरीही साधरणत: असं चित्र आहे. महाआघाडीच्या व्यासपीठवरील नेत्यांच्या राजकीय गाठी-भेटी, त्यांच्या त्यांच्या राज्यातील समीकरणे, मित्रपक्षांशी असलेले संबंध, त्यांच्या नेत्यांच्या महत्त्वकांक्षा, दरम्यानच्या काळातील यांची भाषणं इत्यादी गोष्टींचा अभ्यास करुनच खरेतर निष्कर्ष काढायला हवे, मात्र तूर्तास कालच्या सभेतून जे वाटलं ते मांडलंय.

19 January, 2019

माणूस म्हणून संपण्याचा नेमका काळ कोणता?





कुणीच लपवत नव्हतं, हे उघडं नागडं देह
कुणालाच माहीत नव्हतं काही
कुठलं गुप्त, कुठलं जगजाहीर अंग
कुणालाच माहीत नव्हते लज्जेचे मापदंड

केवळ शारीरिक भुकेचे नव्हते कुणीच भुकेले
नजरेलाही तेव्हा नव्हती चटक कसलीच
हातही जात नव्हते नेमक्या अमूक ठिकाणी
कानही ऐकत नव्हते वासनांध गाणे

कुणीच जात नव्हते निसर्गाच्या विरोधात
बळजबरीचा गंधही नव्हता कुठल्या स्पर्शात
मुक्त होते, मर्यादित किंवा आणखी कसे
जे होते ते दोन्ही पाखरांच्या संमतीने.

मग हा विकृतीचा खेळ नेमका सुरु कधी झाला?
माणूस म्हणून संपण्याचा नेमका काळ कोणता?

....
नामदेव अंजना

18 January, 2019

थोर युवा नेत्या पूनमताई महाजन


ज्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर पटदिशी त्यांचं नाव आठवण्याऐवजी, 'प्रमोद महाजनांची मुलगी', असं सर्वात आधी मनात येतं, त्या थोर युवा नेत्या पूनमताई महाजन यांच्याबद्दल फार आधीपासूनच माझ्या मनात सहानुभूती आहे. ही सहानुभूती अर्थात त्यांच्या अगाध ज्ञानाबद्दल आणि वैचारिक प्रगल्भतेबद्दल आहे. कारण त्यांचे ज्ञान आणि वैचारिक प्रगल्भता महान भाजपीय परंपरेला साजेशी अशीच आहे.
 
प्रभू रामचंद्र हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय आहेत, या त्यांच्या नव्या संशोधनात्मक-विधानाची सोशल मीडियावर टिंगल होताना दिसली. खरेतर तशी टिंगल व्हायला नको. याचे कारण थोर युवा नेत्या पूनमताई महाजन यांच्या ज्ञानाची कवाडे कुट्ट अंधाराच्या दिशेने उघडतात, त्यामुळे त्यात त्यांचा काही दोष नाही. मात्र, त्यांच्या या अगाध ज्ञानाबद्दल चिंतित होण्याचे कारण म्हणजे, त्यांनी आपले हे ज्ञान सार्वजनिक न करता, लपवून ठेवून, त्यातील एक्सक्लूझिव्हनेस जपला पाहिजे. कारण त्यात अखंड हिंदू राष्ट्राचे हित आणि जगविख्यात पक्षोपयोगी स्वार्थ सामावलेले आहे.
 
या ताईंचे गेल्या वर्षीचे एक विधान असेच अति-प्रचंड ज्ञानाच्या अवकाशातून आले होते. मुंबईत आलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चातील शेतकऱ्यांना त्यांनी माओवादी म्हटले होते. अर्थात, इथेही ताईंचा काहीच दोष नव्हता. कारण आधी म्हटले ना, की या ताईंच्या ज्ञानाची कवाडे कुट्ट अंधाराच्या दिशेने उघडतात. सो, देअर इज अ प्रॉब्लेम.
 
मकरंद अनासपुरे यांच्या कुठल्याशा कार्यक्रमात पंकजा ताई आणि या महशय ताई आल्या होत्या. त्यावेळीही राहुल गांधी यांच्यावर उथळ टीका यांनी केली होती. मला तेव्हाही आश्चर्य वाटले नव्हते. उलट हसू आले की, ज्यांना एखादी लाट आल्याशिवाय निवडून येण्याची खात्री देता येत नाही, त्यांनी एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यावर, ज्याने स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले आहे, त्याच्यावर उथळ टीका करावी?!
 
घराणेशाहीचे समर्थन करताना एक मुद्दा मांडला जातो, तो म्हणजे, आपलं नेतृत्व सिद्ध करत असाल, तर घराणेशाहीची टीका थोडी बोथट होते. राहुल गांधी यांनी ते केले. या पूनमताईंनी काय केले? प्रमोद महाजन यांच्या सारख्या पहाडी नेतृत्वाला साजेसा एकतरी गुण यांच्यात आहे का? उथळ आणि असबंध बडबडत राहण्यापलिकडे काय आहे यांच्यात? जरी असे असंबंध बडबडणे पक्षीय संस्कृती असेल तरी.
   
माहीत नाही, पण या ताईंच्या बोलण्यात मला कायम अहंकार दिसतो. आमचं कुणी काही बिघडवू शकत नाही, असा टोन बोलण्यात जाणवतो. असो. खरंतर एवढ्या प्रतिभावान, प्रगल्भ आणि ज्ञानसंपन्न थोर युवा नेत्यावर बोलण्याएवढे आपले कर्तृत्व नाही, तरी थोडे धाडस केलेच.

12 January, 2019

कोट्याबहाद्दर राऊत


'ठाकरे' सिनेमाचा म्युझिक लॉन्चिंग सोहळा सुरु होता. संजय राऊत तिथे होते. ते निर्माते असले, तरी निर्माते म्हणून ते 'टेम्पररी' आहेत. राजकीय नेते हा त्यांचा 'पूर्णवेळ व्यवसाय' आहे. त्यामुळे सहाजिक तेथे उपस्थित पत्रकाराने संजय राऊतांना गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरु असलेल्या 'बेस्ट'च्या संपावर प्रश्न विचारला.

शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेने बेस्टची पुरती वाट लावलीय. वर्षानुवर्षे यांचे नेते बेस्टच्या समितीचे अध्यक्ष असून बेस्टला डबघाईत नेली. त्याच सेनेच्या खासदाराने म्हणजेच संजय राऊतांनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर काय द्याव? तर हे संजय राऊत म्हणतात, "ठाकरे सिनेमा 'बेस्ट' आहे. सिनेमातील म्युझिकही 'बेस्ट' आहे."

'सामना'च्या अग्रलेखातून फुकट्या कोट्या करण्याची सवय जडलेल्या या माणसाला कुठला विषय गंभीर आणि कुठला विषय हलका-फुलका हेही समजेनासे झालेलं दिसतंय. हे केवळ यांच्या खासदारापुरता विषय मर्यादित नाही. यांच्या नेतृत्त्वाचीही हीच गत.

दोन-दोन आकडी आमदार आणि खासदार मिरवणाऱ्या पक्षाचा नेता अर्थात उद्धव ठाकरे हे सलग 7 तास महापौर बंगल्यावर बसूनही बेस्ट संपावर तोडगा काढू शकत नाहीत. हे काय राज्य चालवणार? यांना महापालिकेचा बेस्ट नावाचा एक उपक्रम नीट चालवता येईना.

25 वर्षे मुंबई महापालिकेवर आणि पर्यायाने बेस्टवर सत्ता असूनही मुंबईची याच लोकांनी वाट लावलीय, हे जळजळीत सत्य आहे. उगाच इथे असलेल्या सेना समर्थकांनी सेनेचे फुकाचे समर्थन करु नका. जे चूक ते चूक म्हणायला शिका. असल्या उथळसम्राटांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी.

आता त्या शशांक राव यांना धारेवर धरायला लागलेत हे. मुंबईकरांचे हाल करातायत म्हणे. अरे शशांक राव गेले चुलीत. तुम्ही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर काय म्हणताय बोला. शशांक राव नावाला पुढे आहेत आणि ते पुढे असण्याला त्यांच्या मागे हजारो कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित मागण्यांवर काय म्हणणं आहे, ते सांगावं सेनेच्या लोकांनी. बाकी फुकाच्या बाता नि फुकाच्या कोट्या बंद कराव्यात. बोगस लेकाचे.

पाहा संजय राऊत यांच्या उथळ कोट्यांचा व्हिडीओ :


07 January, 2019

कलाकारांनो, तुम्हाला का सपोर्ट करायचं?



मराठी सिनेसृष्टीतील अनेकांचा प्रॉब्लेम असा आहे की, त्यांना त्यांच्या सिनेमाला थिएटर मिळाला नाही की आवाज उठवतात. म्हणजे, यांची अडचण झाली की बोंब ठोकणार आणि आमच्यावर अन्याय झालाय, आमची कोंडी केली जातेय, असे ओरडत मदतीची याचना करणार.

अन्याय झाला असेल किंवा मराठी सिनेमांना थिएटर मिळत नसेल, तर ते चूकच आहे. आणि त्यांना थिएटर मिळायला हवा, यात दुमत नाही.

प्रश्न असा आहे की, तुम्ही जसे सर्वसामान्य मराठी प्रेक्षकांनी तुमच्यासाठी आवाज उठवण्याची अपेक्षा करता, त्याचवेळी हेही ध्यानात ठेवायला हवे की, जो प्रेक्षक असतो म्हणजे इतरवेळी सर्वसामान्य माणूस असतो, त्या सर्वसामान्य माणसांच्या अडी-अडचणींच्या काळात तुम्ही त्याच्यासाठी येता का धावून? जाहीरपणे भूमिका घेता का?

काही सन्मानिय अपवाद वगळता कलाकार मंडळी बोटचेपी भूमिका घेण्यात किंवा सोईची भूमिका घेण्यात पटाईत असतात. कलाकारांचा दबाव हा नक्कीच प्रभावी असतो. व्यवस्थेत बुलंद आवाज कलाकारांचा मानला जातो. असे असताना आतापर्यंत कितीतरी मुद्द्यांवर, जेव्हा गरज असते, तेव्हा हे कलाकार बोलले? आपण बोललो तर आपल्याला ट्रोल केले जाईल किंवा आपल्याला विशिष्ट विचारधारेचे ठरवले जाईल, असल्या शंकेत वावरुन भित्रे का बनतात?

एक गोष्ट स्पष्ट असायला हवी, थिएटर मिळत नाहीत म्हणून इतरांनी तुमच्यासाठी आवाज उठवावा, अशी अपेक्षा असेल, तर इतरांसाठी सुद्धा तुम्ही विविध मुद्द्यांवर आवाज उठवायला हवा. एकमार्गी अपेक्षा कशी चालेल?

समाजातील इतर प्रांतातील सोडून द्या, किती कलाकारांनी नसीर यांच्या मुद्द्यावर एकत्रित येऊन, विवेकी आणि समतोल साधणारी भूमिका मांडली? एरवी हागल्या - मुतल्याचे ट्विट करणारे कितीजण नसीरच्या बाजूने किंवा विरोधात बोलले?

आता म्हणाल, बोललेच पाहिजे का? हा अट्टाहास का? तर होय, बोलले पाहिजे. कलाकार म्हणून येणारी जबाबदारी सुद्धा तुम्ही सांभाळली पाहिजे. केवळ तुमचे सिनेमे किंवा इतर कला जनतेने पाहावी, एवढी अपेक्षा ठेवू नये. प्रसंगी जनतेला भेडसावणाऱ्या गोष्टींवर जाहीर बोलले पाहिजे आणि कृती केली पाहिजे. आणि हा अट्टाहास नाही, कर्तव्य आहे. कारण ज्यावेळी तुम्हाला हक्क मिळतात, त्यावेळी त्यासोबत येणारी जबाबदारी तुम्हाला झटकता येणार नाही.

'भाई' सिनेमाच्या निमित्ताने महेश मांजरेकर हे एक उदाहरण आहे. या निमित्ताने सर्वच कलाकार, सिनेमे आणि संबंधितांना हे लागू होते. कारण जर हे गांभीर्याने घेतले, तर यापुढे थिएटर मिळत नाही म्हणून राजकीय नेत्यांची उंबरठे झिजवावे लागणार नाहीत, तर जनताच तुमच्यासाठी रस्त्यावर येईल. कारण तुम्ही त्यांच्यासाठी उभे राहिलेले असाल.

मी पुन्हा नमूद करतो, यात सन्मानिय अपवाद वगळतो आहे. कारण अनेक कलाकार सोशल मीडिया किंवा रस्त्यावर उतरुन भूमिका घेतात, अनेक कलाकार सढळ हाताने मदत करतात. त्यांचा आदर आणि सन्मान माझ्या मनात आहे. म्हणून ते अपवाद.

04 January, 2019

कोण पुलं?




आज एकजण तावातावाने सांगत होता, 'पु. ल. देशपांडे म्हणजे तमाम मराठी माणसांच्या गळ्यातले ताईत', 'असा एकही मराठी माणूस सापडणार नाही, ज्याला पुलं माहीत नाहीत'. पुढे आणखी काय काय म्हणत होता. महाराष्ट्राला पडलेले गोड स्वप्न वगैरे. मी थोडे थोडे ऐकून घेतले आणि न राहून बोलूच लागलो.


पु. ल. देशपांडे हे उत्कृष्ट साहित्यिक होते, यात कुठलाच वाद नाही. माझ्यासारख्या वाचकाने तर हे नाकारणे म्हणजे मूर्खपणा ठरेल किंवा पुलंचे लेखन वाचले नाही असा त्याचा अर्थ होईल. मात्र, पुलं माहीत नसलेला एकही मराठी माणूस शोधून सापडणार नाही, हे विधान जरा अतीच होतं राव. आणि आता 'भाई : व्यक्ती की वल्ली'निमित्त अनेकजण हे विधान करत सुटलेत.


पुलंच काय, तुमची कितीतरी लेखक मंडळी आमच्या गावापर्यंत कधी पोहोचलीच नाहीत. हा त्या लेखकांचा दोष की तिथवर शिक्षण पोहोचवणाऱ्या सरकारचा दोष हे खरंच माहीत नाही. पण हे सत्य आहे. मुंबई, पुणे, नागपूर किंवा तत्सम शहरं आणि काही निमशहरी भाग वगळला तर या लेखकांचे लेखन गाव-खेड्यांपर्यंत पोहोचले नाही, हे वास्तव आहे.


दूर कशाला, माझ्या शाळेत अभ्यासबाह्य केवळ एकच पुस्तक होते. तेही मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये खिडकीवर पडलेले असायचे. शिपायांना बोलवण्यासाठी बेल ठेवण्यासाठी त्या पुस्तकाचा नंतर नंतर वापर होऊ लागला, हेही आठवते आहे. ते पुस्तक म्हणजे - श्यामची आई. त्यातल्या सुरुवातीच्या चार - पाच रात्री वाचल्या होत्या.


दहावी होईपर्यंत अभ्यास सोडून कुठलेच पुस्तक आमच्या नशिबी नव्हते. हा माझा व्यक्तिगत अनुभव म्हणून माझ्यापुरता मर्यादित आहे, असे नाही. खरेतर माझा हा अनुभव प्रातिनिधिक आहे, असे मी म्हणेन. कारण अशीच स्थिती कमी - अधिक प्रमाणात ग्रामीण भागात आहे.


आम्हाला तर जगातील सर्व विनोद आपला लक्ष्या, अशोक सराफ, गोविंदा, जॉनी लिव्हर हेच लिहितात की काय, असेच वाटत होते. पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार वगैरे आमच्या गावीही नव्हती. शहराशी संपर्क आला, ग्रंथालयांच्या पायऱ्या चढू लागलो, तेव्हा कुठे पुलं वगैरे काही गोष्ट जगात आहेत, हे कळू लागलं. अर्थात, यात पुलंचा कमीपणा नाही, पण आमच्यापर्यंत त्यांचे लेखन या कधी पोहोचलेच नाही. आजही शंभरतील फार फार तर तीस लोकांना पुलं माहीत असतील. जर सरासरी काढायची तर. अशी स्थितीत असताना आपण किती धाडसी विधाने करतो की, पुलं माहीत नसलेला एकही मराठी माणूस सापडणार नाही वगैरे.


आणि हो, या लिहिण्यातून पुलंना कमी लेखण्याचा प्रयत्न नाही. तर आपल्या शिक्षण व्यवस्थेने म्हणा किंवा वाचक - लेखक किंवा एकंदरीत साहित्यविश्वाने आमच्यापर्यंत हे लेखन कधीच पोहचवले नव्हते. आजही अशीच स्थिती आहे. हे वास्तव आपण स्वीकारून साहित्य गावापर्यंत पोहचवले पाहिजे. तरच या लेखकांवर सिनेमे निघाले तर प्रेक्षक येतील.


बाकी मुंबई - पुणे किंवा तत्सम शहरांमध्ये ज्या गोष्टी घडतात, त्या प्रमाण मानून अवघ्या राज्याला किंवा कधी कधी जगाला पण लागू होतात, असले अवाजवी धाडस काहीजण करतात ना, त्यांची फारच कमाल वाटते. या शहरी डबक्यातून बाहेर पडून पाहण्याची गरज आहे. हे बाहेरचे जग खूप गोष्टींपासून अद्याप अनभिज्ञ आहे. अर्थात, ते अनभिज्ञ राहू नये, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.


खूप विस्कळीत लिहिले आहे. पण इन शॉर्ट, अनेक साहित्यिक नि त्यांचे साहित्य शहरांच्या वेशी ओलांडून शेताच्या बांधावर कधी पोहोचलेच नाही. ते पोहोचायला हवे.

आपला तो बाब्या...



आपला पक्ष काय विचारधारेचा आहे, पक्षाचा नेता काय विचारधारेचा आहे, याची किमान माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडे बाळगायला काय हरकत आहे मी म्हणतो? म्हणजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार असलेल्या व्यंगचित्रात अधिक सातत्य राखून असलेल्या राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी टीका सहन न झाल्याने काल परवा कुणा व्यक्तीला उठाबशा काढायला लावल्या. यावरुन हे तोंड वाजवायला लागतं आहे. अन्यथा, मनसेच्या ऑनलाईन दादागिरीला मी तर कंटाळलो आहे.


फेसबुक की अन्य कुठल्याशा सोशल मीडियावर कुणा व्यक्तीने राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्दात टीका केली, म्हणून मनसैनिकांनी त्याला उठा बशा काढायला लावल्या - अशी बातमी आहे.


काय कमालीची विसंगती आहे पहा. ज्या पक्षाचा नेता व्यंगचित्रकार म्हणून देशाचे पंतप्रधान, मोठमोठे राजकीय नेते इत्यादींवर हवे तसे तोंडसुख घेण्याचे स्वातंत्र्य बाळगून आहे, त्या नेत्याच्या पक्षाने एखाद्या व्यक्तीला विरोधी मत मांडण्याचा अधिकार देऊ नये? आक्षेपार्ह कमेंट असेल, तर स्वीकारायला नकोच. पण मग कायदेशीर तक्रार करा ना, उठाबशा काढायला लावणे, ही दादागिरी का? की ही पद्धत पक्षीय विचारसरणीचा भाग मानायचा? किती काळ असल्या गुंडगिरीच्या पद्धती राज ठाकरे अवलंबत बसणार आहेत?


एका झटक्यात आलेले १३ आमदार, नाशिकमधील जवळपास ४० नगरसेवक, मुंबईतील ७ पैकी ६ नगरसेवक गमावल्यानंतर सुद्धा आपल्या राजकीय पद्धतीवर फेरविचार करावा, अशी कधी चर्चाही कृष्णकुंजवर होत नसेल का?


आज 'एकला चलो रे' या भूमिकेतून राज ठाकरे यांचा पक्ष जातो आहे. युती, आघाडी, वंचित आघाडी वगैरे तडजोडयुक्त लोंढणे गळ्यात न बांधता जाणारा हा पक्ष तेवढ्यासाठी कौतुकास्पद ठरतो, विविध मुद्द्यांवर थेट, ठाम आणि रोखठोक भूमिका घेतल्याने सुद्धा मनसेचे कौतुक करावे वाटते. मात्र आपल्या पक्षीय क्रिया आणि विचारसरणीचा काहीतरी ताळमेळ कधी बांधला जातो की नाही? की तशी शिकवण कार्यकर्त्यांना दिली जात नाही? की तीच शिकवण आहे? असो.


मूळ मुद्दा मनसेच्या कार्यकर्त्यांच्या दादागिरीचा आहे. हे रोज दिवसागणिक वाढत जाणारे फॅड थांबले पाहिजे. यांच्या नेत्याने जाहीर सभेतून 'गांडू'पासून सगळे शब्द वापरावे, हवे तसे व्यंगचित्र काढावे, मात्र यांच्या विरोधात कुणी काहीच बोलू नये, असल्या अपेक्षा ठेवता? स्वतःही तसे वागायला, बोलायला शिका की.


ज्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी कुणा व्यक्तीला उठाबशा काढायला लावल्या, त्यांनी माझ्या 'गंडलेले नवनिर्माण' या पोस्टवरील मनसेच्या कार्यकर्त्याच्या कमेंट वाचाव्यात. मग उठाबशा काढण्यासाठी शिवाजी पार्क बुक करायला लागेल, इतके अपशब्द वापरणारे खोऱ्याने कार्यकर्ते पक्षातच आहेत, हे कळून येईल. असो.


राज ठाकरे अनेकदा आपल्या भाषणात विविध संदर्भावेळी एक म्हण वापरत असतात, ती म्हणजे, 'आपला तो बाब्या, अन् दुसऱ्याचा तो कार्टा'. हेच आज राज ठाकरेंना सांगावे वाटते.


गेल्या काही दिवसात राज ठाकरे यांच्या काही भूमिका पटल्या होत्या. त्यावरुन त्यांच्या बदलत्या राजकीय वाटचालीवर अंदाज बांधावा, भाष्य करावे, तर नेमके हे असले प्रकार करुन आपल्या मूळ पदावर कार्यकर्ते येतात. असो.


राजसाहेब, कार्यकर्त्यांना खरंच समजवा. सर्वसामान्य माणूस भित्रा असतो. मात्र, त्याला एका मर्यादेच्या पलिकडे दादागिरी सहन होत नाही. मग तो जमेल त्या गोष्टीतून विरोध करतो. तुम्हाला मतांमधून तो विरोध दाखवण्यात आला आहे. इतका जालीम अनुभव गाठीशी असताना सुद्धा कार्यकर्त्यांना पाठीशी घालता, हे फारच धाडसाचे आहे. काही विधायक गोष्टी लावून धरा, म्हणजे धरता, पण मध्येच हे प्रकार करता आणि विधायक गोष्टी विसरुन तुमच्या पक्षीय दादागिरीच्या गुणांचीच जास्त चर्चा होते. विधायक गोष्टी मागे पडून जातात. विचार करा जमलं तर.

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...