कुलदीप नय्यर काय करायचे की, वाघा-अटारी सीमेवर जायचे. दरवर्षी १४ किंवा १५ ऑगास्टला. आणि तिथे जाऊन मेणबत्त्या लावायचे. हे गेली पंधरा - सोळा वर्षे सुरू होते. यामागे उद्देश एकच - भारत आणि पाकिस्तान या दोन देशात शांतता प्रस्थापित व्हावी. किती छोटीशी कृती, पण किती उदात्त अर्थाचा संदेश!
आज कुलदीप नय्यर यांचं निधन झालं. आता यापुढे सीमेवर जाऊन मेणबत्त्या पेटवून शांततेचा संदेश कोण देईल की नाही, ते माहित नाही. पण १४ आणि १५ ऑगस्टला वाघा अटारी सीमा 'कुलदीप नय्यर' नावाच्या शांतीदूताची वाट पाहत राहील, एवढं नक्की.
स्वातंत्र्यपूर्व भारतात जन्म. आता पाकिस्तानात असलेलं सियालकोट हे जन्मगाव. वयाच्या पंचविशी-तिशीत फाळणी झाली. त्यामुळे फाळणीच्या जखमा झाल्या, त्यावेळी ते जाणते होते. दोन्हीकडील लोकांचे अश्रू त्यांनी पाहिले होते. कदाचित म्हणूनच या दोन देशांनी शांततेत राहावे, यासाठी मरेपर्यंत त्यांचा जीव तुटत राहिला.
दोन वर्षांपूर्वी अरुण शेवते सरांच्या ऋतुरंग दिवाळी अंकात फाळणीचा अनुभव कुलदीप नय्यर यांनी कथन केला आहे. वाचताना अंगावर काटा येतो. काय तो थरार!!!
कितीतरी ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार होता हा माणूस. फाळणी असो वा भारत - पाकिस्तान युद्ध, आणीबाणी असो वा देशाच्या खासगी रणनीती.
लाल बहादुर शास्त्री यांचे ते माध्यम सल्लागार होते. शास्त्रींचे निधन झाले, त्यावेळी ते त्यांच्यासोबत होते. शास्त्रींच्या निधनाच्या कारणाबाबत अजूनही दबक्या आवाजात संशय घेतला जातो. या विषयावरही अधिकाराने आणि नेमके बोलणारे नय्यर हेच होते. ते अनेकदा बोललेही. नाही असे नाही.
भारत पाकिस्तान यांची फाळणी ज्या इंग्रज अधिकाऱ्याने केली. म्हणजे ज्याने पाहणी करून सीमा रेषा आखून दिली, त्या रेडक्लिफ या अधिकाऱ्याची लंडनमध्ये जाऊन नय्यर यांनी भेट घेतली आणि फाळणी नक्की कशी झाली, याची माहिती घेतली. नकाशा होता का, किती शहरे इकडे, किती शहरे तिकडे असे काही ठरले होते का, हे नय्यर यांनी त्याला विचारले होते. त्याचा दस्तऐवज सुद्धा त्यांच्याकडे होता.
स्वातंत्र्योत्तर भारताची वाटचाल, धोरणे, चुकीचे निर्णय वगैरे गोष्टींवर अधिकाराने बोलणारा, माहिती देणारा माणूस आपण आज गमावला.
८० हून अधिक वृत्तपत्र, १४ विविध भाषांमधून लेखन, अनेक पुस्तके, व्याख्याने... विचारविश्व किती मोठे होते या माणसाचे!!
कुलदीप नय्यर आज गेले. ९५ वर्षांचे होते. वय झालेच होते. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता नांदावी म्हणून आपल्या पत्रकारितेच्या पलिकडे जात प्रयत्न करणारा सच्चा मानवतावादी आज हरपला.
खरं सांगतो, आज भारत - पाकिस्तानच्या सीमेवरील तीक्ष्ण काटेरी कुंपण सुद्धा भावूक झालं असेल. नय्यर साब, तुम्हाला आदरांजली.
नामदेव अंजना | www.namdevanjana.com