2002 साली गुजरात
दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन
फोटो पुढे आले, जे नंतर या दंगलीचे
प्रातिनिधीक फोटो म्हणून वापरले जाऊ लागले. एक फोटो होता कपाळावर भगवा फडका बांधून,
हातात तलवार घेतलेल्या अशोक परमार उर्फ अशोक मोची यांचा, तर दुसरा फोटो होता हात जोडून केविलवाण्या चेहऱ्याने पाहणाऱ्या कुतुबुद्दीन
अन्सारी यांचा. आज हे दोघे नेमकं काय करतात, याचा शोध नवभारत
टाईम्सचे पत्रकार नरेंद्र मिश्रा यांनी घेतला आहे. तो वृत्तांत सविस्तर :
“द्वेषाला
आयुष्यात कोणतेच स्थान नाही”
अशोक मोची यांना शोधत
शोधत मी अहमदाबादच्या जुन्या दिल्ली दरावाजा परिसरात गेलो. ‘के. टी. देसाई सरकारी स्कूलच्या जवळ, अहमदाबाद’
इतकाच काय तो अशोक मोची यांचा पत्ता मला सापडला होता. मग या
शाळेच्या परिसरात शोधाशोध केली. काही अवधी गेल्यानंतर रस्त्याच्या बाजूला फूटपाथवर
बुट पॉलिश करतान अशोक मोची दिसले.
साठीतल्या माणसासारखा
चेहरा, डोक्यावरचे आणि दाढीचेही केस पांढरे पडलेले, शरीरयष्टीने काहीसे कमकुवत झाल्याचे अशोक मोची दिसून येत होते. मी त्यांना
विचारले, "तुम्ही अशोक मोची आहात का?" ते होकारार्थी मान हलवून, पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाले.
नंतर कसंतरी त्यांना बोलतं केलं. सुरुवातीला नाही नाही करत होते. पण अखेर बोलायला तयार झाले.
त्यांना पहिला प्रश्न
अर्थातच त्या फोटोसंबंधी विचारला. एक फोटो किती आयुष्य बदलवू शकतो, हे जाणून घ्यायची उत्सुकता होती. ते म्हणाले, “खरंय. या फोटोने आयुष्य बदलवलं आहे. मला सर्वात मोठा दंगलखोरच बनवले गेले
होते, जो मी कधीच नव्हतो. पण त्यावेळी स्थिती अशी होती की,
द्वेषाच्या एका बाजूचा आडोसा घ्यावाच लागला. डोक्यावरील भगवा फडका
असो वा हातातली तलवार स्वत:च्या सुरक्षेसाठी होते, कुणाला घाबरवण्यासाठी नव्हे. त्या
दिवशी काही कट्टर लोक मुस्लिमांवर हल्ले करत होते आणि माझं घर तर मुस्लिम
मोहल्ल्याच्या बाजूलाच होते. त्यामुळे आपली वेगळी ओळख दाखवणे गरजेचे होते. कारण
प्रश्न जीवाचा होता.”. असं सारं सांगत असताना अशोक मोची हे
सुद्धा मान्य करतात की, दंगलीमागचे राजकारण त्यावेळी तसूभरही
लक्षात आले नव्हते.
आज ज्यावेळी ते स्वत:चा
फोटो पाहतात, त्यावेळी त्यांना
दु:ख होतं. आता अशोक मोची डॉ. आंबेडकर आणि बुद्धाचे विचार किती उत्साहाने सांगतात.
अशोक मोचींनी लग्न केले
नाही. किंबहुना, काही काळ ते गायब
होते. ते सांगतात, 2002 नंतर माझं म्हणणं कुणीच ऐकून घेतलं
नाही. सर्वांनी केवळ माझा वापर करुन घेतला.
“आता तर
भितीची देखील भिती वाटत नाही”
कुतुबुद्दीन अन्सारी हे
सुद्धा आता माध्यमांपासून दूर राहतात. किंबहुना, जुन्या
दिवसांची आठवणही निघू नये, असे त्यांना वाटते. मात्र अनेक
विणवण्या केल्यानंतर त्यांनी मला भेटण्याची तयारी दर्शवली.
कुतुबुद्दीन अत्यंत
साधेपणाने आणि मानाने, व
तितक्याच आनंदाने आपलं आयुष्य जगत आहेत. टेलरचे काम ते करतात. पत्नी आणि तीन
मुलांसोबतचा सुखी संसार अगदी व्यवस्थित सुरु आहे.
कुतुबुद्दीन अन्सारी
सांगतात, “अल्लाच्या मेहरबानीमुळे आता चांगली कमाई आहे. आता फक्त
एवढीच प्रार्थना आहे की, 2002 सारखी स्थिती पुन्हा उद्भवू
नये.”
त्या फोटोबद्दल
सांगाताना कुतुबुद्दीन भावूक होत म्हणाले, “2002
साली दंगलीपासून वाचण्यासाठी एका रुममध्ये लपून बसलो होतो. माझ्या समोर लोकांना
मारले जात होते. दोन दिवसांपर्यंत त्या रुममध्ये कोंडून राहिल्यानंतर एकेदिवशी
रस्त्यावरुन पोलिसांची गाडी येताना दिसली. मी बाहेर आलो आणि गाडी रोखली. त्यात
काही पत्रकारही होते. गाडीसमोर मी विणवण्या केल्या की, मला
माझ्या कुटुंबासह सुरक्षित स्थळी घेऊन चला. याचवेळी कुणीतरी माझा फोटो काढला,
जो नंतर दंगलीचा प्रातिनिधीक फोटो म्हणून वापरला गेला.”
“त्या फोटोने आयुष्य
बदलवून टाकले. दंगलीच्या नंतरही काही दिवस भितीचं एक सावट आजूबाजूला वावरत राहिलं.
मग मी गुजरात सोडून कोलकात्याला गेलो. मात्र तेथे मन रमलं नाही, म्हणून पुन्हा परतलो आणि सगळ्यांपासून दूर राहिलो. मात्र कुणालातरी माझी
खबर लागली, त्यावेळी पुन्हा घाबरवण्यास आणि धमक्या देण्यास
सुरुवात झाली. काही लोकांनी तर तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या
सद्भावना यात्रेत सहभागी होण्यासाठी दबावही आणला. मात्र मी गेलो नाही.”, असे सांगताना कुतुबुद्दीन यांच्या चेहऱ्यावर आजही ती भिती दिसून येते.
राजधानी एक्स्प्रेस
सिनेमाबद्दल बोलताना ते म्हणाले, “2014
साली राजधानी एक्स्प्रेस सिनेमात माझ्या परवानगीविना माझा फोटो दाखवण्यात आला.
त्यावेळी मला पुन्हा भिती वाटायला लागली होती.”. सध्या
कुतुबुद्दीन या सिनेमाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्याविरोधात कायदेशीर लढाई लढत
आहेत.
अशोक आणि कुतुबुद्दीन
एकमेकांना भेटतात का?
काळ कसा बदलतो पाहा, 2002 च्या दंगलीनंतर अनेक सौख्यपूर्ण नाती तुटली. जी
धर्माच्या पलिकडे होती. मात्र त्याच दंगलीचे प्रातिनिधीक फोटो बनलेल्या अशोक मोची
आणि कुतुबुद्दीन यांना मात्र या दंगलीने एकत्र आणले. आज दोघेही चांगले मित्र बनले
आहेत. एकमेकांचे खांद्यावर डोके ठेवून दोघे रडू शकतात, हातावर
टाळी देत हसू शकतात, इतके सख्य दोघांमध्ये आता आहे.
अशोक मोची सांगत होते, “कुतुबुद्दीन तर आता माझा भाऊ बनला आहे. कुतुबुद्दीनच्या
मुलीचं 2016 साली लग्न झालं. त्यावेळी मी कुटुंबासह गेलो होतो. आम्ही प्रत्येक
आठवड्याला एकदा तरी भेटतो. तासन् तास गप्पा मारतो. दोन समाजात कशाप्रकारे भेदाची
बिजं पेरली जात आहेत, यावरही आम्ही बोलतो.”
मार्च 2014 मध्ये
केरळमध्ये एका सामाजिक संस्थेने एक सद्भावना यात्रा आयोजित केली होती. त्यावेळी
अशोक मोची आणि कुतुबुद्दीन अन्सारी खूप वर्षांनी सार्वजनिकरित्या एका व्यासपीठावर
दिसले होते.
No comments:
Post a Comment