31 July, 2017

नियोगींच्या शोधात!



चार पाच वर्षांपूर्वी. म्हणजे कॉलेजला असताना वगैरे. गिरिजा गुप्ते मॅडमनी शंकर गुहा नियोगींवर वाचन करायला सांगितलं होतं. गिरिजा गुप्ते म्हणजे साठ्ये कॉलेजच्या सोशोलाॅजीच्या हेड. आणखी मोठी ओळख सांगायची तरत्या कामगार नेते कॉ. वसंत गुप्तेंच्या कन्या. तर त्यांनी नियोगींवर वाचायला सांगितले. त्यांनी जाणीवपूर्वक संदर्भपुस्तकांची नावं वगैरे काहीच दिली नाहीत. म्हणाल्यातुझं तू शोध आणि वाच. त्या शोधण्याच्या प्रोसेसमध्येही खूप काही गवसेल. आयते संदर्भ दिले तर शोधण्याच्या प्रोसेसमधील ज्ञान गमावशील. 

झालं.. म्हटलं आता हे नियोगी कुठे भेटतीलमग गूगलबाबाकडे गेलो. वीकिपिडियावर माहिती मिळाली. पण तीही त्रोटक. मग डोकं आणखी भणभणायला लागलं. म्हटलं काय फाल्तूगिरीय रावगिरीजा मॅडमने नाव सांगावं एखद्या व्यक्तीचं आणि त्याच्याबद्दल इंटरेनेटलाही माहिती नसावी! 

त्या काळात दादरच्या मुंबई मराठी संदर्भ ग्रंथसंग्रहालयात आठवड्याला दोन-तीनदा येणं जाणं होत असे. कॉलेज सुटल्यावर कामावर दांडी मारुन दादर गाठलं. तिथे ते दाढीवाले काका असायचे. अजूनही असतात बहुधा. ते दाढीवाले काका कधी हसतच नसत. कायम धीरगंभीर चेहरा. पुस्तकांची खडान् खडा माहिती. तिथले कम्प्युटर आता आलेपण या काकांना कुठल्या रकान्यात कुठलं पुस्तक आहेते करेक्ट माहिती असे. अजूनही असेलच अर्थात. 

तेव्हा सात रुपये दिवसाचे द्यावे लागत. आता दहा रुपये झालेत. कदाचित आणखी वाढलंही असेल. वर्षभरात गेलोही नाही. असो. तर रिसिट घेतल्यावर म्हटलंशंकर गुहा नियोगींवर काहीही हवंय. 

नियोगींवर फार काही मिळेल वाटत नाही. त्यांना म्हटलंजे आहे ते द्या. कारण नियोगी कोण प्राणी आहेइथपासूनच माझ्या अज्ञानाची सुरुवात होती. त्यांनी सुरुवातीला कुठलंसं मॅगझिन आणलं. १९९३ चा अंक. कव्हरची दोन्ही पानं गळून पडली होती. कुठलंसं साप्ताहिक होतं. त्यात एक लेख नियोगींवर होता. हर्डीकरांनी लिहिलेला. रिपोर्ताज टाईप. 

संदर्भ ग्रंथसंग्रहालयाच्या वर पंखा असलेल्या जागी खिडकीपाशी एकदम हवेशीर बसलो. लेख वाचायला सुरुवात केली. अंगातली धडधड वाढली. वाचनाच्या उत्सुकतेचा वेग वाढत गेलातस तसा वाचनाचाही वेग वाढला. हुश्श....  लेख संपला.

शंकर गुहा नियोगी आता डोक्यात-ह्रदयात-मनात शरला. फिट बसला. आता हा नियोगी बाहेर निघत नाही. झापटलंय नियोगीने. 
घरी आलो. दुसर्‍या दिवशी कॉलेजला गेलो. तेव्हा गिरिज मॅडमना नियोगींबद्दल काय माहिती मिळालीयाचा इतिवृत्तांत दिला. त्यांना हलकासा आनंद झाला. मग त्यांनी पहिला संदर्भ दिला. म्हणाल्यारंगनाथ पठारेंनी शंकर गुहा नियोगींवर रिसर्च करुन पुस्तक प्रकाशित केलंय. 

शोधमोहीम रंगनाथ पठारेंच्या साहित्याकडे वळली. कुठून कळलं माहित नाहीगोरेगावच्या केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या वतीने पठारेंचा दस्ताऐवज प्रकाशित करण्यात आल्याचं कळलं. केशव गोरे स्मारकात येणे-जाणे नित्याचे असते. स्नेहल पंगेरकर नावाची मैत्रीण होती. ती आणि मी इथल्या लायब्ररीत तासन् तास वाचत बसायचो. त्यामुळे तिथले काका ओळखीचे होते. 

दुसर्‍या दिवशी केशव गोरे गाठलं. रिसर्च डाॅक्युमेंटेशन मिळवलं. आणि तिथल्या तिथे वाचायला सुरुवात केली. अफाट.. अद्भुत.. अचंबित करणारा संघर्ष! 

शंकर गुहा नियोगी... गांधींपेक्षाही अस्सल गांधीवादी. जुलमी-अत्याचारी भांडवलदारीला आव्हान देत खाण कामगारांसाठी लढा उभारत असतानाही डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर घेऊन आंदोलनं. इतका अहिंसावादी भारताच्या संघर्षशाली इतिहासात क्वचितच कुणी झाला असावा. रंगनाथ पठारेंनी नियोगींचं सारं आयुष्यसंघर्ष कट टू कट चितारलंय. 

त्या काळात देशात दोन कामागार नेत्यांची प्रचंड चर्चा होती. त्यात एक होते गिरणी कामगारांचा संप घडवणारे डॉ. दत्ता सामंत आणि दुसरे होते खाण कामगारांसाठी लढणारे शंकर गुहा नियोगी. दत्ता सामंतांनी केलेला संप आशियातील सर्वात मोठा संप ठरला. मात्र, नियोगी याहून वेगळे होते. या दोघांमध्ये बेसिक फरक असा होता की, नियोगींना वैचारिक बैठक होती. वाचन, सामाजिक जाण, निरीक्षण असे विविध गुण त्यांच्या अंगात होते. मला तर ते गांधींपेक्षाही गांधीवादी वाटतात. 

छत्तीसगडमधील दल्ली राजहरा हे मुळातच खाणींचा परिसर म्हणून ओळखला जातो. इथले बहुतेक सगळेच लोक खाणीत काम करणारे. मात्र, खाण मालकांनी कधीच या लोकांच्या जगण्याप्रति संवदेनशीलता दाखवली नाही. कधीच त्यांच्या दुखण्या-खुपण्याकडे गांभिर्याने पाहिलं नाही. खाण मालकाइतकेच शासन-प्रशासनाने ‘जाणीवपूर्वक’ दुर्लक्ष केलं. त्यामुळे लहान मुलांसह गर्भवती महिलांना प्रचंड आजारांना, त्रासाला सामोरं जावं लागे. मुळातच खाणींमुळे नाना समस्यांना तोंड द्यावं लागे.

एकदा खाणीतच काम करणाऱ्या कुसुमबाई नावाच्या महिलेवर नीट उपचार झाले नाहीत आणि तिचा मृत्यू झाला. त्यावेळी कुठलाही उतावीळपणा न करता त्यांनी अत्यंत अहिंसेचा मार्ग शोधला आणि इथल्या 109 कामगारांच्या मदतीने एका गॅरेजमध्ये हॉस्पिटल सुरु केलं. आजही 5 ते 50 रुपयांत उपचार येथे होतात. संघटनांच्या बळावर आणि समाजसेवी वृत्तीच्या माणसांवर तीन मजली हॉस्पिटल कामगारांच्या भल्यासाठी सरुच आहे. अहिंसेच्या मार्गाने खाण मालकांना दिलेलं हे एक उत्तर होतं.

पुढे अहिंसेच्याच मार्गावर चालत नियोगींनी अनेक आंदोलनं केली. खाण कामगारांच्या आरोग्याचे, त्यांच्या मुला-बाळांच्या शिक्षणाचे, हक्क-अधिकारांचे मुद्दे घेत मोर्चे काढले. आवाज उठवला. मात्र, कुठेही कसली कुणाला दुखापतही केली नाही. 70 च्या दशकात खाण कामगारांच्या बोनससोबत इतर मागण्यांसाठी जवळपास 10 हजारांहून अधिक कामगारांना घेऊन ते रस्त्यावर उतरले. आपल्या मागण्यांच्या घोषणा दिल्या. मात्र शासन-प्रशासनाने झोपेचं सोंग घेतलं होतं. अशा वेळी कुणाचीही तळपायाची आग मस्तकात जाईल, मात्र नियोगींनी इतका मोठा लोकसमूह शांतपणे सांभाळला. त्यांच्या इतका कुशल संघटक, विचारी नेता पुढेही कुणी झाला नाही, होणार नाही.

कमाने वाला खाएगा’ असे म्हणत अहिंसेच्या मार्गाने खाण कामगारांसाठी आवाज उठवणाऱ्या शंकर गुहा नियोगींची 28 सप्टेंबर 1991 च्या रात्री काळोखात गोळी मारुन हत्या करण्यात आली. ती कुणी केली, हे स्पष्ट होतं. खाण कामगारांना गुलामांची वागणूक देणाऱ्या खाण मालकांना अहिंसेच्या मार्गाने जेरीस आणणाऱ्या निशस्त्र नियोगींना शस्त्राने संपवलं गेलं. नियोगी हे जुलमी भांडवलदाऱ्यांचे स्वतंत्र भारतातील पहिले बळी ठरले.

नियोगींच्या अंत्ययात्रेत अलोट गर्दी होती. तळागाळातील माणसं होती. असं म्हणतात, छत्तीसगडच्या इतिहासात कुणाच्याच अंत्ययात्रेत इतकी माणसं नव्हती, तितकी नियोगींच्या अंत्ययात्रेत होती. ती सारी नियोगींनी कमावलेली माणसं होती. जोडलेली माणसं होती. ज्यांच्यासाठी लढला, ते सारे तेव्हा एकवटले होते. ‘लाल हरा झंडा जिंदाबादनियोगी भैया जिंदाबाद’, या घोषणेने छत्तीसगड हळवं झालं होतं. तळागाळातल्या माणसांच्या दु:खाला आपलं दु:ख समजून त्याला फुंकर घालणारा असा कामगार नेता होता.

खरंतर नियोगींबद्दल खूप लिहिता येईल. नियोगी हा नुसता शब्द एका लेखात डोळ्यांसमोर आला आणि नियोगींबद्दल वाचनासाठी केलेले प्रयत्न आणि नियोगींचं आयुष्य डोळ्यांसमोर तरळू लागलं. खरंतर हे त्रोटकच सांगितलं. यापेक्षा अधिक संघर्षमय असं जगणं नियोगींचं होतं. एकदा नक्की जाणून घ्या. नियोगी खरा ‘माणूस’ होता.

नामदेव अंजना | www.namdevanjana.com

30 July, 2017

आय लव्ह यू सनी लिओनी!



जगाची पर्वा करु नये वगैरे बाता मारुन मारुन अनेकजण थकतात. इनक्लुडिंग मी. पण प्रत्यक्षात प्रसंग येतो त्यावेळी लोक काय विचार करतील, याचाच विचार करत बसतो. मग ते लोग क्या कहेंगे, ये भी हम सोचेंगे, तो लोग क्या सोचेंगे?’ असले कधीकाळी उर बडवून हाणलेले डायलॉग विसरुन जातो आणि लोकांचाच विचार करुन पाय पुढे-मागे सरकवत बसतो. अशा प्रसंगांवेळी मला सनी लिओनी खूप उजवी वाटते.

पॉर्न स्टार म्हणून प्रसिद्धीस आलेली सनी लिओनी पुढे भारतात येऊन बॉलिवूडमध्ये नशीब अजमावते आहे. मात्र, इथेही तिला अनेकदा भेदांना सामोरं जावं लागलं. तिने तशी जाहीर खंतही व्यक्त केली होती. मात्र कुठेही न खचता, तिने आपलं करिअर सुरुच ठेवलं. एकामागोमाग एक सिनेमे येत राहिले आणि देशाच्या कानाकोपऱ्यात ती पोहोचली. आता कुठे अवॉर्ड शोमध्ये वगैरे तिला प्रस्थापित बॉलिवूडकर एखाद्या कोपर्‍यात जागा देऊ लागले आहेत. हेही काही बॉलिवूडचे उपकार नाहीत. तर सनी लिओनीने स्वतःला सिद्ध केल्यानंतरचे पडसाद म्हणता येईल.

भारतात सनीला पॉर्न स्टारच्याच अँगलने पाहिले गेले. अजूनही तिचा उल्लेख पॉर्न स्टार ते बॉलिवूड स्टारअसाच होतो. ही किचकट कट्टर भारतीय मानसिकता आहे. एखाद्या व्यक्तीला लेबल लावले की पुढच्या प्रतिक्रिया देणं त्यांना सोपं जातं. पण सनी लिओनीने याची कधीच पर्वा केली नाही.

“Only GOD will judge! Life is short, Lets make the most of it.”,
हे सनी लिओनीचं ट्विटरवरील स्टेटस तिच्या एकंदरीत भूमिकेकडे अधिक प्रखरतेने लक्ष केंद्रित करणारं आहे. सर्वशक्तीमान असलेला ईश्वर ठरवेल, मी चूक आहे की बरोबर. आणि फक्त तोच ठरवेल. असं तिला म्हणायचंय. याचाच दुसरा अर्थ असाय की, तुम्ही ठरवायचं नाही. मला हे खूप क्रांतिकारी वाटतं. एकीकडे पाय घसरुन पडल्यावर आपल्याला कुठं लागल़य का हे पाहण्याआधी, आपल्याला पडताना कुणी पाहिलं तर नाही ना, हे पाहणरे आपणतर दुसरीकडे आपल्या तत्त्वांवर जगणारी सनी लिओनी. आपण जे करतो, ते आपल्यादृष्टीने योग्य आहे ना, हे ती पडताळून पाहते. जग काय विचार करतं, हे तितकं महत्त्वाचं नसतं. सनी लिऑनने हे सूत्र तिच्या आयुष्यापुरतं चांगलं अंगिकारलं आहे.

पॉर्न स्टार असणं चांगलं की वाईट किंवा ते नैतिक की अनैतिक वगैरे भानगडीत पडत नाही. ते ठरवायला आपण आहोत. विशेषत: भारतीय तर आहेतच. नैतिक-अनैतिक ठरवण्यात आपला हात धरणारा दुसरा तरबेज कुणी नसावा. असो.

भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारे कृत्य वगैरे बोलून आपण तिला देशद्रोही लेबल लावून पाकिस्तानचा रस्ता दाखवला नाही, ही खूपच मोठी गोष्टय. नाहीतर हल्ली छोट्या छोट्या गोष्टींवरुन हकालपट्टीच्या गोष्टी होतात. घरावर दगडफेक वगैरे होते. तसं अजून सनीबाबत झालं नाही, हेही बरंच आहे म्हणायला हवं.

भारतीय सिनेसृष्टीत एन्ट्री केल्यानंतर सनी लिओनीने अनेक सिनेमे इंटिमेट सीन असणारे केले. ते चाललेही. जे विकतं ते तेच तिने केले. पण याचा साईड-इफेक्ट असा झला की, आधीच पॉर्न स्टार ही ओळख, त्यात बॉलिवूडमध्ये आल्यानंतरही ओन्ली अॅडल्टफिल्म्स करणंयामुळे तिची इमेज पॉर्न स्टारपासून वेगळी होऊ शकली नाही. उलट ती इमेज आणखी गडद झाली. त्यात सिनेमांच्या पलिकडे जाऊन सनी लिओनी काय सामाजिक कामं करते किंवा काय तिची भवतालावर काय मतं आहेत, हे आपण कधीच पाहिले नाही. किंवा तशी आपल्याला गरज भासली नसावी. कारण सनी लिओनी म्हणजे ओन्ली अॅडल्ट’. इथवरच आपण मर्यादित राहिलो. ती काय चांगलं करेल, याची अपेक्षाच मनात नसावी. पण सनी लिओनीच्या गेल्या काही वर्षातील भूमिका पाहिल्या की, तिच्यातील संवेदनशीलतेचं आणि माणुसकीचं दर्शन होतं.

गेल्या कित्येक वर्षांपासून सनी लिओनी पेटाया प्राण्यांच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या संस्थेसोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या जोडली गेली आहे. देशात जिथे जिथे प्राणमात्रांवर अत्याचार होतात, त्यांना मदत हवी असते, त्यासाठी पेटामार्फत मदत करणं किंवा त्यासंदर्भातील धोरणांसाठी सोशल मीडियातून आवाज उठवणं असेलसनी लिओनी कायम पुढाकार घेते. हे तुम्हा-आम्हाला जमण्यासारखं नाहीय. कारण त्यासाठी अस्सल माणसाचं काळीज लागतं. तरच त्यात प्रत्येक सजीवाप्रती संवेदनशीलता येते. सनीमध्ये ती आहे. फक्त आपल्या कुजकट मानसिकतेने तिला पॉर्नच्या पुढे पाहिलंच नाही. तिच्या याच संवेदनशील अंगाला आणखी दुजोरा देणारी घटना गेल्या आठवड्याभरातलीच. ती म्हणजे मुलगी दत्तक घेणं होय.

जवळपास दोन वर्षांपूर्वी सनी लिओनी आणि तिचा पतीन डॅनियल वेबरने एका अनाथ आश्रमला भेट दिली होती. त्यावेळीच त्यांनी मुलगी दत्तक घेण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर महिना-दीड महिन्यापूर्वी सनी लिओनी एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी लातुरात येऊन गेली. तेव्हा तिच्या संवेदनशील नजरेने एका चिमुकल्या परीला हेरुन ठेवलं होतं. ती कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा तिच्या बिझी शेड्युलमध्ये गुंतली. त्यानंतर पुन्हा लातुरात गेली आणि त्या चिमुकल्या परीला थेट दत्तकच घेतलं.

शाहरुख, करण जोहर, तुषार कपूर वगैरे मंडळी मुलगा किंवा मुलीसाठी सरोगसी किंवा टेस्ट ट्युब बेबीचा आधार घेत असताना, जिला पॉर्न स्टार म्हणून मेन-स्ट्रीमपासून झिडकारत राहिलो, त्या सनी लिओनीने आपलं पहिलं मुल दत्तक घेतलं. तीही मुलगी. आणि त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे लातूरमधील उदगीरसारख्या ग्रामीण भागातील. हेही नक्कीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. आता इथेही खुल्या दिलाने तिचं किती स्वागत होईल, हा मुद्दा आहेच. पण तिला त्या कौतुकाची वगैरे गरज नाही. ती कौतुक आणि टीकेच्या पलिकडे जाऊन विचार करणारी आहे. जगणारी आहे, हेच तिने यातून दाखवलं आहे.

आपलं अपत्य गुटगुटीत, सोज्वल, गोरापान वगैरे असला पाहिजे, ही व्यक्त न होणारी सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात असतेच. पण या तथाकथित सुप्त इच्छेलाही सनी लिओनीने फाटा देत, वर्णभेदाच्या पेकाडात लाथ हाणत मुलीची निवड केली. मुळात इथेही मुलीची निवड तिने केली असंही म्हणता येणार नाही. कारण तिनेच म्हटलंय की, मुलीची निवड आम्ही केली नाही, तर मुलीनेच आमची निवड केलीय. निशा असं गोड नावही ठेवलंय.

सनी, इतकं मोठं मन घेऊन आलीस भारतात. पण तुला इथल्या कोत्या मनाने कायमच तथाकथित संस्कृतीच्या फूटपट्टीवर मोजू पाहिली. ते किती निर्बुद्ध आहेत, हे तू तुझ्या कृतीतून दाखवून दिलंस.

आणि हो, सनी, जग काय म्हणेल, या गोष्टीला तू कायमच फाट्यावर मारुन जगतेस. विशेष म्हणजे जग सारं तुला तुझ्या भूतकाळानेच ओळखू पाहत असलं, तरी तुझ्या भविष्याची वाटचाल ठळकपण दाखवून दिलीयेस, हे कुणी आता पाहत नसलं.. तरी ते नक्कीच महत्त्वाचं आहे. आज ना उद्या याचे सकारात्मक पडसाद तुझ्या प्रवासावर नक्की उमटतील.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनाथ चिमुकली दत्तक घेऊन तू जे पाऊल उचललं आहेस, ते नक्कीच कौतुकास्पद आहे. तुझ्यातल्या आईला सलाम!

अनेक नायिका नटापटा करुन मिरवत असतात. त्यातल्या अनेक केवळ सुंदर दिसणार्‍या आण चकमकीत लाईट्समध्ये झगामगा करणाऱ्या असतात. त्यांच्यापेक्षा तू किती वेगळी आहेस, या झगमगाटी दुनियेच्या पलिकडे तुझ्यातली संवेदनशीलता किती जपलीयेस, हेच तू चिमुकल्या निशाला दत्तक घेऊन दाखवलंयेसया क्षणी अगदी मनापासून म्हणावं वाटतंय, आय लव्ह यू सनी लिओनी!


बीएमसीसम्राटांचं 'सूड'कारण


हिरोचा सूड घेण्यासाठी व्हिलन एखाद्या पोलिसाला पैसे देतो. मग पोलिस हिरोच्या घरी येतात. 'तुम्हारे घर में हाथियार हैं' किंवा 'तुम्हारे घर में ड्रग्ज हैं' वगैरे डायलाॅग मारुन तपास सुरु करतात. त्यापैकी व्हिलनकडून पैसे घेतलेला पोलिस पटकन हत्यार किंवा ड्रग्ज तिथे लपवतो आणि तोच शोधून काढतो. मग हिरोला अटक करतात आणि जेलमध्ये टाकतात.

आठवतंय का असं काही? हिंदी पिक्चरमध्ये तर सर्रास असे सीन असायचे. महेश मांजरेकरांच्या 'कुरुक्षेत्र'मध्येही आहे असा एक सीन. पण हल्लीच्या सिनेमांमध्ये सूड घेण्याचे हे सीन कमी असतात. म्हणूनच की काय, उद्धव ठाकरेंनी कमी भरुन काढलीय. निमित्त मलिष्का ठरली.

असंख्य मुंबईकरांच्या समस्येला तिने फक्त गाण्यातून व्यक्त केले. तर पालिकेसह मातोश्रीवर इतका जळफळाट झाला की, थेट मलिष्काच्या घरात पालिकेचे अधिकारी धडकले आणि तपासणीत अळ्या सापडल्या. आता मलिष्काच्याच घरी का तपासणी पथक गेले, त्यांना तिथे अळ्या असण्याचे स्वप्न पडले होते का, सोनूचं गाणं आणि या तपासणी छाप्याचा काही संबंध आहे का वगैरे निरर्थक प्रश्न विचारु नयेत. ते महत्त्वाचे नसतात. असो.

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे हे जळजळीत वास्तव आहे. शेंबडं पोरगंही सांगेल, काय स्थिती आहे. अगदी आदित्य ठाकरेही सांगू शकतील. मात्र, तरी बीएमसीला वाटतंय की आपण मुंबईचं शांघाय केलंय की काय! म्हणून मलिष्काचा भलताच राग आलाय गड्यांना.

बरं.. राग यावा. नाही असे नाही. पण मलिष्काला कामाचे दाखले न देता फिल्मी स्टाईल उत्तर देण्याचं ज्या कुणाच्या सुपीक डोक्यात आलं ना, त्याला दोन कोंबड्या आणि चार नारळांचं नैवद्य द्यायला हवं!

विशेष याचं वाटतं की, बीएमसीसम्राट उद्धव ठाकरेंनी तर सदर प्रकरणात सरळ सरळ मुंबईकरांना मुर्खातच काढलंय किंवा मुंबईकर मुर्खच आहेत, असे ते गृहितच धरत असावेत. कारण त्यांची प्रतिक्रिया भारीय. उद्धवसाहेब म्हणतात, 'पाऊस जास्त पडतो त्याला पालिका कशी जबाबदार?'... ज्या मुंबईकरांनी मतं दिली त्यांनी हसावं की रडावं, हेही पुढे उद्धवसाहेबांनी स्पष्ट करायला हवं होतं. म्हणजे कसं सगळेच प्रश्न सुटले असते. पावसाला जबाबदार धरण्यासाठी सत्ता दिलीय का साहेब?

पावसाळ्यातच तर मुंबई महापालिकेची खरी कसोटी असते. याच काळात तर मुंबईकरांना अडचणींना सामोरं जावं लागतं. त्याचवेळी जर तुम्ही जबाबदारी झटकून वागत असाल, तर तुमच्या सत्तेत असण्या-नसण्याचा उपयोग काय? पावसाळ्याच्या तीन महिन्यांतल्या समस्या सोडल्या तर मुंबईकराची बाकी नऊ महिने कोणती तक्रार असते ओ? कुठलीच नाही. पण तेही तुमच्याने होत नाही. असो.

हे तर काहीच नाही. त्या किशोरीबाई पेडणेकरांचं तर नवीनच काहीतरी. त्यांनी सोनूच्याच तालावर मलिष्काला टार्गेट करणारं गाणं तयार केलं आणि उलट प्रश्न केलेत. अहो, किशोरीबाई... जरा रिक्षात बसा आणि मुंबई फिरा. मग बघा कंबरडं मोडून पालिकेच्या सुविधा नसलेल्या रुग्णालयात अॅडमिट व्हावं लागतंय की नाही ते. असो. या किशोरीबाईंवर फार शब्द खर्ची घालत नाही. कारण किशोरी पेडणेकर हे कॅरेक्टर एकंदरीतच अत्यंत उत्साही आहे. कट्टर सेनाप्रेमात काय बी बडबडतंय.

यात आणखी एक इंटरेस्टिंग टर्न आला तो अब्रुनुकसानीचा दाव्याने. हे म्हणजे विनोदाची उच्चतम पातळी होय. कोण अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार? तर सेनेवाले? हा हा हा....

थोडं विषयांतर होईल, पण बोलायलाच हवं. अहो, उद्धवसाहेब, अब्रुनुकसानीचा दावा तर आम्ही तुमच्यावर ठोकायला हवा. आमच्या मराठा-आई-बहिणींचा अवमान करणारं गलिच्छ व्यंगचित्र छापलंत... खरंतर अशावेळी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला जातो. शासन-प्रशासनाच्या खराब कामगिरीवर बोट ठेवल्याने कुणावर दावे-बिवे ठोकले गेल्याची आपल्याकडे उदाहरणं नाहीत. असो.

एकूणच या सर्व प्रकाराची समरी अशीय की, आमच्याविरोधात बोलाल तर तुम्हाला टार्गेट लिस्टीत टाकून त्रास देऊ. मग अळ्या सोडण्याचे चाळे वगैरे करु. बरंय राव. म्हणजे यापुढे आम्ही समस्यांवर बोलायचंही नाही आणि तुम्ही मात्र आमच्या आया-बहिणींवर गलिच्छ व्यंगचित्र बिनबोभाटपणे छापावी.

बरं त्यातल्या त्यात एक समाधनाची बाब अशीय की, मलिष्काला शिवसेना स्टाईल वगैरे उत्तराची धमकी न देता, अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा देत कायदेशीर मार्ग अवलंबण्याची तयारी दाखवली, हेही नसे थोडके. असो.

उद्धवसाहेब, शेवटी एकच सांगणं, तुमच्या कामापेक्षा भावनेच्या आहारी जात शिवसेनेला मतदान करणाऱ्या मुंबईकरांची संख्या अधिक आहे, हे लक्षात असू द्या आणि वेळीच कामाला लागा. कारण जेव्हा मुंबईकर काम बघून मत देतील, तेव्हा शिवसेनेचा महापालिकेवरचा झेंडा उतरलाच म्हणून समजा.

03 July, 2017

मशिदीच्या आडोशातली माणुसकी

मुंबईतील दहिसरला हायवेवर एक मशीद आहे. नॅन्सी काॅलनी बस स्टाॅपच्या थोडं पुढे. आता मेट्रोचं काम सुरुय म्हणून बस स्टाॅप तोडलाय.

पाच-सहा दिवसांपूर्वीची गोष्ट. हायवेच्या इकडून जात होतो. जोराचा पाऊस आला. थांबलो. आजूबाजूला पाहतोय, तर आडोसा दिसेना. मेट्रोच्या कामामुळं कन्स्ट्रक्शनचं सगळं साहित्य पडलेलंय. आडोसा म्हणून मशीदच होतं. भिजायचं नव्हतं. पण मशिदीच्या पडवीत कसं जावं, या विचाराने तिथेच गोंधळत राहिलो. पाऊस वाढला, मग न राहता मशिदीच्या पडवीत घुसलो.

दुपारची वेळ. त्यामुळे फार कुणी तिथं नव्हतं. दोघे जण होते फक्त. एक पस्तीशी-चाळीशीतला आणि दुसरा साठीतला बहुतेक. तर पडवीत अगदीच कोपर्‍याला उभा होतो. बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसाचे शिंतोडे अंगावर येत होते.

मशिदीच्या पडवीत हात-पाय धुण्यासाठी रांगेत चार-पाच नळ आहेत. तिथे हे दोघे गप्पा मारत बसले होते. एक जण नळाचं काहीतरी काम करत होता. दुसरा त्याच्याशी बोलत होता.

(फोटो : ज्या मशिदीतला हा प्रसंग आहे, त्या मशिदीबाहेरुन आज जात होतो. आणि आज पाऊस नव्हता. तेव्हा फोटो काढला.)

नुसताच गप्पा मारत बसलेल्या साठीतल्या माणसाने माझ्याकडे पाहिलं. मी आपला बाहेर पाहत होतो. पाऊस जाण्याची वाट बघत उभा होतो. माझ्यावर उडणारे पाण्याचे शिंतोडे त्या साठीतल्या माणसाने पाहिले असावे बहुतेक. तो म्हणला, 'बेटा अंदर हो जा... भिग जाएगा'

मशिदीची कधी पायरी चढलो नव्हतो. गावाकडे रोहा आणि तळा या दोन्ही तालुक्यांच्या ठिकाणी मोठी मुस्लीम वस्ती. रोहात तर 'मुसलमान मोहल्ला' नावाचा एरियाच आहे. सर्व मराठी मुसलमान. त्यामुळे मशिदी आहेतच. किंबहुना, कित्येक मित्रही मुस्लीम होते. पण तरी मशिदीत जाण्याचा योग आला नाही. किंवा जावं वाटलं नाही वगैरे. मात्र मशिदीबद्दल कुतुहल कायम होतं. आत कसं आणि काय काय असतं वगैरे.

कधी मशिदीत न गेल्याने मगाशी पावसात भिजल्यावर आडोसा शोधतानाही मशिदीचा आडोसा घेताना थोडा थबकलो होतो. त्यात आता हे साठीतले गृहस्थ तर म्हणत होते की, 'अंदर हो जा बेटा..'

मी म्हटलं, 'चाचा, ठीक है... कम हो जाएगा अभी बारीश'.

हे 'चाचा' बोलणं किती सवयीने येतं ना? म्हणजे कुणी वयस्कर मुस्लीम गृहस्थ असेल तर तोंडून आपसूक 'चाचा' निघतं. याचंही फार कौतुक वाटतं. चाचा म्हणजे किती जवळचं नातं जोडतो आपण दोन सारख्याच अक्षरांच्या एका शब्दाने!

तर ते चाचा बाजूचं स्टीलचं टेबल पुढे सरकवत म्हणाले, 'बेटा.. जल्दी नही जाएगा बारीश.. बैठ इधर..'

मी थोडा पावसाचा अंदाज घेतला. पाऊस थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत, हे लक्षात आलं. म्हटलं, दहा-पंधरा मिनिटं बसू. नाहीच थांबला तर जाऊ भिजतच.

चाचा आणि दुसरा पस्तीशी-चाळीशीतला माणूस पुन्हा आपल्या कामात अन् गप्पांमध्ये रमले. मी पावसाकडे पाहत मशिदीच्या पडवीत त्या स्टीलच्या टेबलावर बसलो. पावसाकडे आणि समोरील हायवेवरुन सुसाट वेगाने जाणाऱ्या गाड्या पाहत अगदी वीस-पंचवीस मिनिटं बसलो.

मध्ये एकदा स्वत: पाणी प्यायल्यावर पस्तीशी-चाळीशीतल्या त्या माणसाने मला 'पाणी पिणार का?' विचारलं. पण तहान नसल्याचं सांगून पुन्हा पावसाकडे टक लावून बसलो. एकदा हळूच पडवीतना मशिदीत टोकावलोही. वडाचं एखादं विस्तीर्ण झाड मावेल इतकी आत जागा. आणि वडाच्या झाडाखाली जो निवांतपणा असतो, तसं वातावरणही. गावाकडं आमचं ग्रामदैवताचं मंदिरही असंचय. विस्तीर्ण वड मावेल इतकं मोठं. आणि निवांत.

वीस-एक मिनिटं झाल्यानंतर पाऊस कमी आला. मी तिथून निघालो. जाताना चाचाला म्हटलं, 'थँक्स चाचा.' त्यांनी फक्त स्मित हास्य देत निरोपाचा हात वर केला. बरं वाटलं.

मला त्या वीस-एक मिनिटात त्या चाचांनी किंवा तिथल्या दुसर्‍या माणसाने एकही प्रश्न विचारला नाही. ना त्यांनी प्रश्नांकित नजरेने पाहिले. जन्मोजन्मीची ओळख असल्यागत वागले. भिजतोय हे पाहून आत बोलावलं, बसायला खुर्ची दिली, प्यायला पाणी विचारलं... अन् जाताना निरोपासाठी हातही वर केला.

हा माझ्यासाठी माणुसकीचा अनुभव होता. आणि दोस्तहो, ही माणुसकी धर्माच्या चौकटीत अडकत नसते. स्वतंत्र असते. मुक्तपणे वावरणारी!

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...