03 May, 2017

असाही पाकिस्तान


निस्बेट रोड. थांबा... फक्त नावावरुन मत ठरवण्याची अस्सलभारतीय चूककरु नका. हा काही लंडन, न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन वगैरेमधील रोड नाही. तुम्हाला आतापर्यंत तसंच काहीसं वाटलं असेल. त्यात नवल नाही. आपण भारतीय आहोत म्हटल्यावर. आणि त्यातही शितावरुन भाताची परीक्षा घेण्यात माहीर असणारे. असो. तर निस्बेट रोड आहे लाहोरमध्ये. चला, लाहोर म्हटलं की पाकिस्तान. म्हणजे आपला दुश्मन. पण त्याआधी निस्बेट रोडबद्दल दोन-तीन गोष्टी तरी ऐकून घ्या.

या निस्बेटरोडवर सरदार दयाळसिंग मजिथिया यांचं भव्य स्मारक आहे. अगदी दिमाखात. मजिथिया म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेत ज्यांच सहभाग होता, त्यांपैकी एक. अत्यंत पुरोगामी विचारांचे. राम मोहन रॉय यांच्या विचारांचे पाईक.

पहिली स्वदेशी बँक म्हणून ओळख असणाऱ्यापंजाब नॅशनल बँकेच्या पहिल्या संचालक मंडळातही दयाळसिंग होते आणि काही काळ याच बँकेचे अध्यक्षही. किंबहुना पंजाब नॅशनल बँकेची स्थापनाच 23 मे 1894 रोजी दयाळसिंग यांच्या घरी झाली. तर या दयाळसिंग यांच्या देणगीतूनचदयाळसिंग लायब्ररीसुरु झाली.

निस्बेट रोडवरील या दयाळसिंग लायब्ररीचा भारताशी खूप घनिष्ठ वगैरै संबंध आहे. या लायब्ररीत लोकमान्य टिळांचे तीन कार्ड सापडतात. अगदी आजही. आर्क्टिक होम इन वेदाज, ओरायन आणि तिसरं म्हणजे गीतारहस्य.

आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मंडाळेचा तुरुंगवास भोगून आल्यानंतर टिळकांनी गीतारहस्य प्रकाशित केलं. त्यातील एक प्रत त्यांनी लाला लजपतराय यांना दिली. लालांना दिलेली प्रत या लायब्ररीत आहे. महाभारत, रामायण हे ग्रंथही तिथे आहेत. ‘सुरक्षित’.

वर जसं म्हटलंय ना, हे निस्बेट रोड थोडं वेगळं प्रकरण आहे. या रोडवर पावला-पावलावर भारताच्या खुणा आजही आढळतात. पाकिस्तानातील वेगवेगळ्या हुकुमशाही सरकारने त्या पुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही आठवणी पुसल्या जात नाहीत. अगदी तसंच झालं आणि अनेक आठवणी, ज्या भारताशी संबंधित आहेत, त्या राहिल्या. इथल्या संवदेनशील मनाने त्या प्राणपणाने जपल्याही. त्यातलीच आणखी एकगीता भवन

लाहोरमधील निस्बेट रोडवरील ज्या दयाळसिंग लायब्ररीचा वर उल्लेख केला, त्याच लायब्ररीच्या समोरील बाजूस हे गीता भवन आहे. या गीता भवनाच्या खुणा आजही शिल्लक आहेत. हे भवन सेवकराम यांनी बांधलं. सेवकराम यांचे वडील गंगाराम हे लाहोरमधील त्याकाळचे सेवाभावी गृहस्थ. गंगाराम यांनी तिथल्या गरिबांसाठी एक हॉस्पिटलही काढलं. सर गंगाराम हॉस्पिटल म्हणून आजही ते प्रसिद्ध आहे.

पुढे पाकिस्तानमधील लष्करशहा झिया उल हक यांच्या इस्लामीकरणाच्या रेट्यात गीता भवनवरही हातोडा चालवला गेला. तरीही इमारतीच्या मध्यवर्ती भागात आजही दोन हत्तींच्या शिल्पामध्येगीता भवनहे देवनागरीतलं नाव रुबाबाने दिसतं.

निस्बेट रोडवर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या भारताशी संबंधित आहेत. याच परिसरात मुस्लिम लीगचं अधिवेशन भरलं होतं, ज्या अधिवेशनात स्वत: लोकमान्य टिळक उपस्थित होते. याच अधिवेशनात मोहम्मद अली जीनांनी हिंदू सणांच्या दिवशी गोहत्या करण्याचा प्रस्ताव मांडून संमत केला होता. याच परिसरात नॅशनल कॉलेज आहे, ज्यात शूरवीर भगतसिंग शिकला. आणि भगतसिंग शिकला, त्या काळात कॉलेजचे प्राचार्य होते छबिल दास. याच निस्बेट रोडच्या भागात महाराज गुलाबसिगं यांचा महाल होता. वगैरे वगैरे. खूप काही. तर निस्बेट रोड असा आहे.

हे जे काही सांगितलं, ते काही माझ्या मनातलं नाही. हे सारं पाकिस्तानात राहून, फिरुन, देश समजून घेतलेल्या माणसाने सांगितलंय. अरविंद गोखले यांनी. गोखलेंचंअसाही पाकिस्ताननुकतंच वाचून पूर्ण केलं. त्या पुस्तकाबद्दल राहून मला लिहावं वाटलं.

या पुस्तकाच्या टॅगलाईनसारखेच यातील लेख आहेत. टॅगलाईन आहे – ‘साहित्य, संस्कृती कलाक्षेत्रातील आगळावेगळा पाकिस्तान...’.

खरंच खूप वेगळा पाकिस्तान अरविंद गोखलेंनी 34 लेखांमधून मांडला आहे. शेवट-शेवटचे 1-2 लेख सोडले, तर कुठल्याही लेखाला कुठेही राजकीय स्पर्श नाही. सगळे लेख तिथल्या लोकांविषयी, भारताशी मिळत्या-जुळत्या परंपरांविषयी, ऐतिहासिक नातेसंबंधांविषयी, लोकसंस्कृतीविषयी, वास्तूंविषयी, अखंड भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील आठवणींविषयी...आणि बरंच काही.

सिलसिलापिक्चरमधल्या एका गाण्यात एक ओळ आहे, ‘मजबूर ये हालात, इधर भी है, उधर भीतसं काहीतरी या दोन्ही देशांमधील लोकांमध्ये असल्यासारखं या पुस्तकातून वाटलं. तिथली माणसं आणि इथली माणसं यांमध्ये काहीही फरक नाही. तिच कथा, तिच व्यथा आहे.

राजकारण, प्रशासन, लष्कर या तीन गोष्टींनी पाकिस्तानला बरबाद केलं आणि आपणही या तीनच गोष्टींमधून पाकिस्तानकडे पाहतो. मात्र, तिथली तळागाळातली स्थिती वेगळी आहे. तिथेही आपल्यासारखी हाडामासाची माणसं आहे, ज्यांचीही रोजच्या जगण्यासाठी धावपळ सुरु आहे. आपल्याइथे जसं बाबा आमटे तसं तिथे अब्दुल सत्तार इधी होते. असं खूप काही.

अनेक पाकिस्तानी लोकांना भारताबद्दल आजही आकर्षण आहे, कुतुहल आहे. आपली जन्मभूमी कशी असेल, याची उत्सुकता आजही तिथल्या म्हाताऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसते. जाणवते.

अगदी आताचाच प्रसंग सागायचा तर जावेद सिद्दिकी लिखितबेगम जानहे नाटक पाकिस्तानी रंगभूमीवर तुफान गाजलं. 600 रुपये पर हेड तिकीट असतानाही पाकिस्तानी नाट्यरसिकांनी ते डोक्यावर उचलून धरलं.

जावेद सिद्दिकी भारतात तसा प्रसिद्द आहे. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, उमराव जान, कोई मिल गया, बाजीगर यांसारख्या सिनेमांचं कथालेखन सिद्दिकीने केलंय. त्याच्याच कथेवर आधारीत पाकिस्तानातील बेगम जान नाटक आहे. या सिद्दिकीने पाकिस्तानी निर्मात्याकडून या नाटकाचं मानधन म्हणून काय मागितलं असेल? सिद्दिकी म्हणाला, “पाकिस्तानी रंगभूमीवर माझं नाटक सादर झाल्याचे फक्त फोटो पाठवून द्या, बस्स तेच मानधन.”. सिद्दिकीच्या या दिलदारपणाला पाकिस्तानी नाट्यरसिकांनाही मोठ्या मनाने दाद दिली आणि 600 रुपये पर हेड तिकीट असतानाही हाऊस फुल्ल नाटक चाललं.

जावेद सिद्दिकीचं नाटक पाकिस्तानात चाललं, ते अदृश्य ऋणानुबंधांवरच. अर्थात कथाही त्या तोडीची होती. पण त्या कथेला भारतभूमीच्या ओढीची भावनाही चिटकली होती.

पाकिस्तानी क्रिकेट टीमचा लेग स्पिनर म्हणून दानिश कनेरियाने चमकदार कामगिरी बजावली. तो लेग स्पिनचा आधार ठरला. फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात नाव कमावलेले दीपक फेरवानी कराचीत राहतात. न्यायमूर्ती राणा भगवानदास हे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. कराचीतील शिवमंदिराचे पुजारी म्हणून मोहन गायकवाड नावाचा माणूस काम पाहतो.... एक ना अनेक नावं, पदं, उदाहरणं आहेत, ज्यातून पाकिस्तानात भारताच्या खाणा-खुणा आढळतात.

पाकिस्तानात अजूनही भारतमातेच्या खाणा-खुणा कशाप्रकारे दडल्या आहेत, त्या तिथल्या लोकांनी आजही कशाप्रकारे जोपासल्या आहेत, हे पाना-पानावर सांगण्याचा प्रयत्न अरविंद गोखले यांनी केला आहे.

दोन देशातील लोकसंस्कृतीत किती साम्य आहे, हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवंच. शिवाय, माहिती, आकडेवारी यांची जोड आहेच. त्याचसोबत काही गोष्टी अतुट असतात, ते अनुभवण्यासाठीही हे पुस्तक वाचायला हवं, असं वाटतं.

माझ्या वाचकांच्या माहितीसाठी :
पुस्तकाचं नाव - असाही पाकिस्तान
प्रकाशन - रोहन प्रकाशन

No comments:

Post a Comment

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...