28 February, 2017

येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष !


पुण्यात आज राम कदम कलागौरव पुरस्कारावेळी शरद पवार यांची सुधीर गाडगीळांनी मुलाखत घेतली. यावेळी गाडगीळांनी पवारांना खऱ्या अर्थाने बोलतं केलंय. या मुलाखतीत पवारसाहेबांनी एक भन्नाट किस्सा सांगितला. तो खास तुमच्यासाठी लिहून काढलाय.

कवीवर्य पी. सावळाराम यांच्याशी संबंधित हा किस्सा आहे. शरद पवार, गदिमा आणि वसंतराव नाईकांमधील हा संवाद अफलातून आहे. खालील संपूर्ण संवाद शरद पवारांनी जसा सांगितलाय, तसा लिहून काढलाय. त्यामुळे पवारसाहेब सांगतायेत, हे ध्यानात ठेवून वाचा....

"मी विधानसभेत नुकताच आमदार म्हणून निवडून गेलो होतो. 1968-69 ची गोष्ट आहे. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. आणि मी काँग्रेस पक्षाचा सेक्रेटरी होतो. तर काहीतरी कामासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलो. तिथे माडगूळकर बसले होते. त्यांनी नाईकसाहेबांना सांगितलं की, दोन दिवसांनी ठाण्याला नगराध्यक्षपदाची निवडणूक आहे आणि तिथे आमचा एक दोस्त आहे. त्याला अध्यक्ष करायचंय. आणि काही करुन करायचंय. नाईकांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, यांच्या दोस्ताला निवडून आणायचं काम तू घ्यायचं."

मी विचारलं, "कोण दोस्त?"

त्यांनी सांगितलं, "सावळाराम पाटील म्हणजे पी. सावळाराम"

म्हणजे आपल्याकडे कदाचित आठवत असेल, एकेकाळी लग्न लागलं की, गंगा-यमुना वगैरे ही जी सगळी गाणी वाजवली जायची, ती लिहिणारे ते पी. सावळाराम.

मी मनात म्हटलं, एवढे मोठे कवी आपल्याला ठाऊक आहेत. पण हे मुनिसिपाल्टीच्या भानगडीत कुठं पडले आणि तिथं कसे निवडून येतील?"

नाईकसाहेब म्हणाले, "काही करुन त्यांना निवडून आणायचंय."

ठीकंय. आता माझ्यावर काम सोपवलं. गेलो ठाण्यात. तिथे काय उद्योग करायचे ते केले. दोन-तीन मतं कमी होती. ती दोन-तीन मतं कशी मिळवायची, त्यासाठी आणखी काय ते उद्योग केले. आणि त्यांना आम्ही निवडून आणलं.

निवडून आणल्यानंतर त्यांना (पी. सावळाराम) गाडीत घालून मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलो.

सावळाराम पाटील यांचं मूळ गाव येडेनिपाणी. इस्लामपूरच्या जवळ आहे.

मुख्यमंत्र्यांच्या घरी माडगूळकरही होते. माडगूळकरांनी पी. सावळारामांना मिठी मारण्याऐवजी मला मिठी मारली आणि म्हणाले, "काय दोस्ता काम केलंस! येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास." 

शरद पवार यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ :



06 February, 2017

ही विकृती आहे!



विरोधी बाकांवर असतानाही सत्ताधारी आणि त्यातही देशाचे पंतप्रधानच शरद पवार यांच्यासमोर लोटांगणं घालतात म्हणून अनेकांच्या जीवाची घालमेल सुरु होतीच. त्यात भरीस भर साहेबांना 'पद्मविभूषण' मिळल्याने आधीच्या घालमेलीचं अस्वस्थेत रुपांतर झालं. तेही विकृत अस्वस्थेत. आणि त्यातूनच हे फोटो आणि विनोदी कॅप्शन सूचू लागलेत.

मुळात या विषयावर लिहिण्याची इच्छा नव्हती. पवार साहेबांना 'पद्मविभूषण' जाहीर झाल्यानंतर लिहायला हवं, असं वाटलं होतं. पण नाही लिहिलं. अगदी शुभेच्छा देणारी पोस्टही नाही टाकली. म्हटलं शुभेच्छा, अभिनंदन वगैरे मनातून आहेतच. पण गेले काही दिवस व्हाॅट्सअॅप असो किंवा फेसबुक, सगळीकडे असे फोटो फिरतायेत. म्हणून राहावलं नाही.

पवार साहेबांना 'पद्मविभूषण' म्हणजे देश संकटाच्या खाईत लोटला गेला, अशी बोंबाबोंब सुरु झाली. काहीही ठोस काम नसताना त्या सैफ अली खानला 'पद्म' मिळालेला पवारग्रस्तांना चालतो. पण ५० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीनंतर पवारांचा 'पद्म'ने गौरव केला गेला, तर जळफळाट होतो. कमालै !

१९६७ ला पवारसाहेब पहिल्यांदा आमदार झाले. आज २०१७ सुरुय. ५० वर्षांची यशस्वी राजकीय कारकीर्द देशात मोजक्या नेत्यांची आहे. त्यात पवारसाहेब अव्वल स्थानी आहेत.

१९७५-७६-७७ चा काळ. मतांच्या जमवा-जमवीसाठी वाट्टेल ते करावं लागत होतं. कास्ट अन् रिलिजन पाॅकेट्स निर्णायक ठरत होते. त्या काळात शरद पवारांनी मुस्लिम व्होट बँकेला फाट्यावर मारत हमीद दलवाईंना आपल्या सरकारी निवासस्थानी उपाचारासाठी ठेवून घेतले. राजकारणात उघडपणे इतकी बेधडक कृतीपूर्ण भूमिका नेमक्याच नेत्यांनी घेतलीय. त्यात पवार साहेब आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा मुद्दाही असाच आहे.

५० वर्षांची कारकीर्द आहे. अनेक निर्णय चुकले असतील. चूकले आहेतच, असे म्हणूया. पण नेमकं तेच घेऊन बसून, बाकीच्या सकारात्मक कार्याकडे का दुर्लक्ष केलं जातं? की हे दुर्लक्ष जाणीवपूर्वक असतं?

पवारांना 'पद्मविभूषण' म्हटल्यावर तळपायाची आग मस्तकात जाणा-यांनी एकदा 'पद्म' पुरस्कारांची यादी तपासा, लक्षात येईल कुणा-कुणावर खैरात केलीय ते. मग अटलजींच्या डाॅक्टरपासून ते सुषमा स्वराजांच्या डाॅक्टरपर्यंत किंवा असे कैक. मग ५० वर्षे सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या आणि तेही लोकांचा प्रतिनिधी म्हणून वावरणाऱ्या व्यक्तीचा 'पद्म'ने गौरव झाला, तर चूक काय?

'
पवार' हेच ज्यांचं दुखणं आहे, त्यांना 'पद्म' रोखता आला नाही म्हणून आता अशी बदनामी सुरुय. अशी नाही तर तशी. पण बदनामी करायचीच. चालूद्या.

'
लोक माझा सांगाती' असं म्हणणा-या नेत्याला मूठभर विकृत डोचक्यांची भीती नसते. तशी असती, तर ५० वर्षे सार्वजनिक जीवनात काढता आली नसती. असो.

पवार साहेब ५० वर्षे हुकुमशाहीने सत्तेत नव्हते. लोकशाही मार्गाने लोकांमधून निवडून जात होते. ५० वर्षे सातत्याने निवडून येतात, याचा अर्थ खरे 'लोकप्रतिनिधी' आहेत. मग याच इतक्या मोठ्या कारकीर्दीचा 'पद्म'ने गौरव चूक कसा? आणि 'पद्म'चा राग म्हणजे गेल्या काही दिवसात सोशल मीडियातून फिरणारे हे फोटो. ते पाहून थोडं लिहावं वाटलं.

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...