17 August, 2015

श्रावण महिन्याच्या गावाकडील काही आठवणी:

१) श्रावण पाळणारे केस कापत नसत. त्याचा परिणाम आम्हा बिगर-श्रावण्यांवर होत असे. न्हावी गावात यायचा नाही, त्यामुळे आमचे केसही कानावर येईपर्यंत वाढायचे.

२) शाळेला श्रावणानिमित्त दर सोमवारी 'श्रावण सोमवार' या नावाखाली हाफ डे सुट्टी मिळत असे. म्हणजे दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर घरी जायला मिळायचं. म्हणून श्रावण वर्षभर असावा, असं वाटायचं.

३) बाकी श्रावणाचं महत्त्व घंटा काही माहित नव्हतं. गावतली मंडळी शेताच्या कामात गुंतलेली असतात. कुणी गाई-बैलांना चारा-पाण्यासाठी शिवारात घेऊन गेलेला असायचा, तर कुणी शेताच्या बांधावरचं गवत काढायला. बेनणी करायला. हे या महिन्याची कामं असायची आणि आजही आहेत.

४) बाजूच्या गावातून एक ज्येष्ठ वारकरी आपली जुनीपुराणी चोपडी घेऊन यायचा. बळीराम असं त्याचं नाव. गावकीच्या घरात हा बळीराम लोकांना रामायण-महाभारात-श्रावण बाळ इत्यादींच्या कथा ऐकवत असे. हे सारं दहिहंडीपर्यंत चालत असे. आम्हीही तिथे जायचो. चहा पिण्यासाठी.

५) आणखी एक श्रावणाचा उल्लेख म्हणजे दहावीपर्यंत कधीतरी बालकवींची श्रावणमासी.. वगैरे कविता परीक्षेपुरती वाचली होती. तीही परीक्षेनंतर विसरलो.


बस्स. एवढ्या आठवणी आहेत श्रावणाच्या. बाकी विशेष काही नाही.

भूमिका घ्यायची की नाही?

भालचंद्र नेमाडेंनी बाबासाहेब पुरंदरेंना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराला विरोध केला. अनेकांनी अतिशय खालच्या स्तराला जाऊन नेमाडेंवर टीका केली. तशीच टीका पुरंदरेंवरही केली. खूप वाद झाला आहे आणि होतो आहे. मला त्यात पडायचं नाही.

नेमाडे ज्ञानपीठ घेण्याच्या लायकीचे नाहीत, इथवर टीकेची पातळी घसरलीय. नेमाडेंनी साहित्यिक या नात्याने एक भूमिका घेतली, ती बरोबर की चूक हे ज्याने त्याने ठरवावे. पण नेमाडेंना नावं ठेवणाऱ्यांनी आधी त्या साहित्यिकांना जाब विचारावा, जे केवळ साहित्य संमेलनं, कार्यक्रम आणि सरकारी महामंडळांच्या खुर्च्या गरम करत असतात. त्यांना प्रश्न विचारा, जे सत्तेच्या दिशेला तोंड फिरवत राहातात. त्यांना प्रश्न विचारा, जे पुरस्कारासाठी सत्तेपुढे नाक घासतात आणि त्यांना प्रश्न विचारा, जे पुस्तकं खपण्यासाठी विचारधारेला बासणात गुंडाळून तत्वांची पायमल्ली करुन विरोधी विचारांच्या व्यासपीठावर बड्या बड्या गोष्टी करतात.

नेमाडेंनी किमान एक साहित्यिक म्हणून भूमिका तरी मांडली. ती भूमिका योग्य-अयोग्य हा नंतरचा भाग. ते ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या विचारधारेनुसार आणि मतानुसार ठरवावं. पण नेमाडेंवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करु नये, असे मला वाटतं. भूमिका घेणारा साहित्यिक एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच राहिलेत, त्यात नेमाडे आहेत. त्यांचा किमान आदर करा.

नुसती पुस्तकं लिहून... पांढऱ्यावर काळं करुन साहित्यिक झालेले खूप आहेत. (लहान तोंडी मोठा खास असला तरी मला असंच वाटतं) पण ज्यांनी पुस्तकातून, लेखातून, लेखनातून आपली भूमिका धीटपणे मांडलीय, ते माझ्या दृष्टीने साहित्यिक.

भूमिका घ्या असे एकीकडे बोंबळायचं...आणि त्याचवेळी, जे भूमिका घेतात त्यांना लाथडायचं. त्यांचे मु़डदे पाडायचे. जे भूमिका घेतात, त्यांना घेऊ दिलं पाहिजे. त्यांच्या भूमिकेला विरोध असेल तर सभ्य भाषेत, योग्य स्थळी, अहिंसेने विरोध करावा.

12 August, 2015

सारं समोर घडत असतानाही...

निपचित पडलेत...
हात-पैर
डोक्यातला मेंदू
आणि मन.

की,
असंवेदनशील झालेत ?
हात-पैर
डोक्यातला मेंदू
आणि मन.

सहनशिलतेच्या पलिकडले सारे...

तरीही निष्क्रिय का?
हात-पैर
डोक्यातला मेंदू
आणि मन.

माझी प्रतिक्रिया का उमटत नाही?

की मृतावस्थेत आहेत?
हात-पैर
डोक्यातला मेंदू
आणि मन.

माझी माणुसकी नामक नस तपासा कुणीतरी...
आणि बघा जरा, मी जिवंत आहे की मेलोय ते...


लोक हो...

विरोधी मत मांडायचं नाही
आपल्याच मतावर आडायचं नाही

तुमच्या धगधगत्या विचारांवर पाणी शिंपडा...
दोन-चार दिवस धुमसतील विचारांचे निखारे..
बंदीविरोधात देतील इशारे..
पण काळांतराने जुळवून घेतील परिस्थितीशी...

घटनेतली 19 वी ओळ ते टाकणार आहेत पुसून...
तेव्हाही त्यांचं स्वागत करा..खोटं का होय ना पण जरा हसून...

त्यांच्या चाली-रितींना,
हजारो-लाखो वर्षे पुराण्या संस्कृतीला,
त्यांच्या कायदे-कानूनांना,
आव्हानं द्यायची नाहीत...
नाहीतर तुम्हालाही ओंकारेश्वर पुलावर मारल्या गेलेल्या त्या इसमासारखं मारलं जाईल...

तुम्हाला जगायचं असल्यास..
त्यांचे थोर राष्ट्रवादी विचार लगेच शिकून टाका...
तुमची सदसदविवेकबुद्धी वगैरे आताच चांगल्या भावात विकून टाका...

त्यांच्या विचारातील चुका त्यांना सांगू नका,
त्यांच्या चाली-रितीतील दोष त्यांना सांगू नका...

तुम्ही विचारविरहित असाल तर तुम्हाला जगण्याची संधी आहे...
कारण इथे विरोधी विचारांवर बंदी आहे...


कविता 'ती'च्यासाठी...

एक:
ये बये,
चूल-मूल
फार फार तर वऱ्हांड्यात ये...
पण ध्यानात ठेव निळ्या छताला तुझं डोकं दाखवू नको...

दोन:
ये बये,
शेत-माळ
फार फार तर वऱ्हांड्यात ये...
पण गार गार हवा देणाऱ्या पात्यांना कधी डोकं दाखवू नको...

ये बये,
तुला कोंडतोय कुणी उंबरठ्याच्या बाहेर,
तर कुणी उंबरठ्याच्या आत...
कुणी हिंसेच्या शस्त्रात,
तर कुणी दराऱ्याच्या शब्दात....
तरीही तू सहन करतेस.. त्याने नसतं हे सहन केलं..

म्हणून...

तुझी पहिली गरज तुझं स्वातंत्र्य आहे..
जे तुलाच मिळवायचं आहे..
चार-दोन जण राहतील उभे मागे तुझ्या..
पण खूप जणी असतील सोबत तुझ्या.....

घटना झाल्यावर...

निषेध,
आंदोलन,
मोर्चे
सभा,
परिसंवाद,
धरणं,
निदर्शनं,
काळे झेंडे,
रास्ताराको,
जाळपोळ,
निवेदनं,
आवाहनं,
आव्हानं,
बदल्याच्या धमक्या,
प्रत्युत्तरं,
टीका,
हल्ला
इत्यादी
इत्यादी...
ते तरीही घाबरत नाहीत..
ते शांत राहतात...
कारण त्यांना खात्री असते...
आपल्या आरंभशूरतेची अन् निमित्तखोरपणाची...

डॉलरचे दिवस

प्रातिनिधिक फोटो
परवा स्पार्क्सची चप्पल घेतली. रोख रक्कम ४४९ रुपये फक्त. एकदम फिक्स्ड. एक रुपया कमी नाही की एक रुपया जास्त नाही. दुकानात तसा बोर्डच लटकवलेला. त्यामुळं उगाच बार्गेनिंग करण्यात काडीचा अर्थ नव्हता. पण तरीही, अंगभूत सवयीप्रमाणे शेवटी शेवटी 'देखो भाई, कुछ कम होगा तो' असं म्हटलंच. पण, 'प्राईज फिक्स रहता है हमारे इधर.. देख, बोर्ड भी लगाया है.. लेना है तो लेलो.. नहीं तो रहने दो' असे उत्तर मिळाल्यावर गप्प बसलो. फिक्सचा बोर्ड लावलाय म्हणजे जणू किती किंमतीत चप्पल विकायची याबाबत ISI नेच प्रमाण ठरवून दिलंय. पण गप्प बसलो. जावदे कशाला उगाच वाद. चप्पलही आवडलेली. रफ अँड टफ युज, असं काहीसं तो दुकानदार म्हणाला होता. मग पैसे देताना मनातल्या मनात दुकानादाराप्रती चार उच्च दर्जाच्या शिव्या हासडल्या. आतून थोडं बरं वाटलं. आत्मसमाधानी वगैरे. तेवढ्यात एक रुपयाचं नाणं दुरानदाराने पुढे केलं. मी ते घेऊन रागानं पाय आपटत चालता झालो. चप्पल आवडलेली म्हणून दुकानदारावरचा राग फार काळ राहिला नाही.

वेळ खूप होता. म्हणून रिक्षाने वगैरे घरी न जाता चालतच निघालो. पुढे एका कोपऱ्यावर एक छोटंसं चपलांचं दुकान दिसलं. वाघमारे चप्पल मार्ट नावाचं. दुकानात चपलांचा खच पडलेला. नव्यानेच सुरु झालेलं हे दुकान असावं बहुधा. कारण याआधी या रस्त्याने येताना कधी हे दुकान दिसलं नव्हतं. असो.

तर दुकानातील एका कोप-यात निळे पट्टे आणि पांढ-या रंगाची चप्पल दिसली. थोडं दुकानाच्या येथे थांबलो. दुकानदार रागात बघू लागला. अर्थात बघणारच ना. दुसऱ्या दुकानातून चप्पल आणलेली पिशवी हातात आणि आता काय बघतोय माझ्या दुकानात? असा सवाल त्याला पडला असावा. मी पटकन चपलेवरील लेबल पाहिला आणि क्षणाचाही विलंब न करत तेथून निघालो. चपलेवर लेबल होतं 'डॉलर'.

डॉलर. कधीकाळी आयुष्याचा भाग बनलेली ही चप्पल. शाळेत जातानाची अर्धी अधिक पायपीट ही या डॉलरच्या चपलांनीच केलीय. पॅरेगॉन आणि डॉलर या चपलांचाच तो जमाना. पाऊस संपला की तालुक्याच्या ठिकाणी खास चप्पल आणण्यासाठी आम्ही पोरं जायचो.

बरं या पॅरेगॉन आणि डॉलरनेही आम्हा पोरांना विभागलंही होतं. म्हणजे बघा ना.. पॅरेगॉनची किंमत ७० ते ८० रुपये असे आणि डॉलरची चप्पल अगदी ३५ ते ४० रुपयांत मिळे. महाग पण टिकाऊ अशी पॅरेगॉनची ख्याती आणि जास्तीत जास्त दोन-तीन महिने अशी डॉलरची ओळख. मग ज्याच्या घरी बऱ्यापैकी पैसा आहे, तो पॅरेगॉन घेत असे आणि आधीच काटकसरीने जगणारा मुलगा डॉलरवरच भागवत असे. अर्थात, ही दरी आम्ही पोरांनी एकमेकांना कधीच जाणवू दिली नाही, हे महत्त्वाचं. पण ज्याकडे जास्त पैसे तो पॅरेगॉन आणि कमी पैसेवाला डॉलर, हे वास्तव नाकारुन चालणार नाही. गरिबीच्या झळा त्या डॉलरच्या चपलेतून कायम जाणवत असत.


डॉलरची सर स्पार्क्ससारख्या महागड्या कंपनीच्या चपलांनाही नाही. कारण 'डॉलर' आमच्यासाठी केवळ चप्पल नव्हती, ती होती गरिबीची जाणीव आणि जबाबदारीचं भान.

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...