प्रातिनिधिक फोटो |
परवा
स्पार्क्सची चप्पल घेतली. रोख रक्कम ४४९ रुपये फक्त. एकदम फिक्स्ड. एक रुपया कमी
नाही की एक रुपया जास्त नाही. दुकानात तसा बोर्डच लटकवलेला. त्यामुळं उगाच
बार्गेनिंग करण्यात काडीचा अर्थ नव्हता. पण तरीही, अंगभूत
सवयीप्रमाणे शेवटी शेवटी 'देखो भाई, कुछ
कम होगा तो' असं म्हटलंच. पण, 'प्राईज
फिक्स रहता है हमारे इधर.. देख, बोर्ड भी लगाया है.. लेना है
तो लेलो.. नहीं तो रहने दो' असे उत्तर मिळाल्यावर गप्प बसलो.
फिक्सचा बोर्ड लावलाय म्हणजे जणू किती किंमतीत चप्पल विकायची याबाबत ISI नेच प्रमाण ठरवून दिलंय. पण गप्प बसलो. जावदे कशाला उगाच वाद. चप्पलही
आवडलेली. रफ अँड टफ युज, असं काहीसं तो दुकानदार म्हणाला
होता. मग पैसे देताना मनातल्या मनात दुकानादाराप्रती चार उच्च दर्जाच्या शिव्या
हासडल्या. आतून थोडं बरं वाटलं. आत्मसमाधानी वगैरे. तेवढ्यात एक रुपयाचं नाणं
दुरानदाराने पुढे केलं. मी ते घेऊन रागानं पाय आपटत चालता झालो. चप्पल आवडलेली
म्हणून दुकानदारावरचा राग फार काळ राहिला नाही.
वेळ खूप होता. म्हणून
रिक्षाने वगैरे घरी न जाता चालतच निघालो. पुढे एका कोपऱ्यावर एक छोटंसं चपलांचं
दुकान दिसलं. वाघमारे चप्पल मार्ट नावाचं. दुकानात चपलांचा खच पडलेला. नव्यानेच
सुरु झालेलं हे दुकान असावं बहुधा. कारण याआधी या रस्त्याने येताना कधी हे दुकान
दिसलं नव्हतं. असो.
तर
दुकानातील एका कोप-यात निळे पट्टे आणि पांढ-या रंगाची चप्पल दिसली. थोडं
दुकानाच्या येथे थांबलो. दुकानदार रागात बघू लागला. अर्थात बघणारच ना. दुसऱ्या
दुकानातून चप्पल आणलेली पिशवी हातात आणि आता काय बघतोय माझ्या दुकानात? असा सवाल त्याला पडला असावा. मी पटकन चपलेवरील लेबल पाहिला आणि क्षणाचाही
विलंब न करत तेथून निघालो. चपलेवर लेबल होतं 'डॉलर'.
डॉलर.
कधीकाळी आयुष्याचा भाग बनलेली ही चप्पल. शाळेत जातानाची अर्धी अधिक पायपीट ही या डॉलरच्या
चपलांनीच केलीय. पॅरेगॉन आणि डॉलर या चपलांचाच तो जमाना. पाऊस संपला की
तालुक्याच्या ठिकाणी खास चप्पल आणण्यासाठी आम्ही पोरं जायचो.
बरं या
पॅरेगॉन आणि डॉलरनेही आम्हा पोरांना विभागलंही होतं. म्हणजे बघा ना.. पॅरेगॉनची
किंमत ७० ते ८० रुपये असे आणि डॉलरची चप्पल अगदी ३५ ते ४० रुपयांत मिळे. महाग पण
टिकाऊ अशी पॅरेगॉनची ख्याती आणि जास्तीत जास्त दोन-तीन महिने अशी डॉलरची ओळख. मग
ज्याच्या घरी बऱ्यापैकी पैसा आहे, तो पॅरेगॉन घेत असे आणि
आधीच काटकसरीने जगणारा मुलगा डॉलरवरच भागवत असे. अर्थात, ही
दरी आम्ही पोरांनी एकमेकांना कधीच जाणवू दिली नाही, हे
महत्त्वाचं. पण ज्याकडे जास्त पैसे तो पॅरेगॉन आणि कमी पैसेवाला डॉलर, हे वास्तव नाकारुन चालणार नाही. गरिबीच्या झळा त्या डॉलरच्या चपलेतून कायम
जाणवत असत.
डॉलरची
सर स्पार्क्ससारख्या महागड्या कंपनीच्या चपलांनाही नाही. कारण 'डॉलर' आमच्यासाठी केवळ चप्पल नव्हती, ती होती गरिबीची जाणीव आणि जबाबदारीचं भान.
No comments:
Post a Comment