16 December, 2013

किडनॅपिंगची गाडी


लहान असताना आपल्याला भिती घालण्यासाठी आई-वडील विविध शक्कली लढवत असत. “झोप नाहीतर बुवा येईल” (हा बुवा म्हणजे कोण आणी तो कसा दिसतो ? या प्रश्नाचे उत्तर मला अजातागायात मिळाले नाही) किंवा “जेवलास नाही तर भूत तुला घेवून जाईल”(भुताचेही तसेच आहे, हा भूत मी आजतागायत पाहिले नाही) वैगरे वैगरे अशी अनेक वाक्य आपल्याला भीती जणू घालण्यासाठी तयारच करून ठेववलेली असतात. मात्र अशाही काही गोष्टी, प्रसंग, व्यक्ती असतात ज्यांना आपण लहानपणापासून घाबरत आलेलो असतो किंवा त्यांचा दारारा आपल्या मनात कायम राहतो. म्हणजे अनेकवेळा आपण आपल्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीला घाबरत असतो. मात्र अनेकदा तर काही अशां अफवा पसरतात कि आपोआपच आपल्या मानता एक प्रकारची भीती निर्माण होते आणि आपण स्वतःहूनच सावध राहत असतो.
थोड्या-बहुत फरकाने प्रत्येकाने आप-आपल्या लहानपणी अशाप्रकारचा दरारा अनुभवला असलेच. मला आठवतंय माझ्या लहानपणी “किडनॅपिंगच्या गाडी”चा दरारा. 
आमचे गाव तसे डोंगराळ परिसरात. अगदीच काही कडेकपऱ्यात वसलेला नाही पण सपाट माळरानावरही नाही. आणि शिवाय गावात दिवसातून अगदी मोजक्याच गाड्या यायच्या. हल्ली अनेकांनी स्कूटर घेतल्या आहेत म्हणून गाड्यांचा सुळसुळाट थोडा वाढला आहे पण माझ्या लहानपनापर्यंत तरी एखादी नवीन गाडी गावात आली तर अख्ख्या गावातील मुले त्या गाडीच्या अवती-भोवती गोळा व्हायची. गावात येणारे रस्ते डांबरी असले तरी त्यावर डांबर कुठे दिसायचीच नाही त्यामुळे येणारी गाडी धुरळ्यावर रंगून आलेली असायची त्यामुळे त्या गाडीच्या आजू-बाजूला जमलेले तमाम मुले त्या गाडीवर साचलेल्या धुरळ्यावर आप-आपले नाव लिहायचे. कधी कधी तर त्या गाडीत बसून गावापासून थोड्या अंतरापर्यंत लांब बसून जायचो आणि एका विशिष्ट ठिकाणी उतरून पुन्हा मागे तेवढेच अंतर पायी चालत यायचो. गाडीत बसण्याचाच आनंद एवढा आनंद असायचा कि परत येताना पाय दुखले तरी त्याचे काही विशेष काही वाईट वाटायचे नाही. कारण गाडीचे विशेष आकर्षण असणाऱ्या आम्हा गावाकडील मुलांना एखादी नवीन व कधीही न पाहिलेली गाडी आली तर मग काय विचारायचीच सोय नाही. असे आमचे गाडीबद्दल त्यावेळी आकर्षण असायचे. असो.
असाच माझ्या गावाकडील एक प्रसंग... मला आता अचूक साल आठवत नाही परंतु बहुतेक मी चौथी-पाचवीला असतानाची गोष्ट असेल म्हणजे २००२-२००३ च्या दरम्यानची. “एक किडनॅपिंगची गाडी गावाबाहेर फिरणाऱ्या मुलांना पकडून घेऊन जाते. या गाडीचा रंग सफेद असतो” अशी एक आमच्याकडे कुणीतरी अफवा पसरवली होती. ही अफवा होती कि खरच अशी सफेद रंगाची किडनॅपिंगची गाडी होती याबद्दल मलाही फारशी माहिती नव्हती व नंतरही कधी माहिती झाली नाही. पण या ‘सफेद’ रंगाच्या गाडीचा दरारा आम्हा मुलांवर किमान दीड-दोन वर्षे तरी कायम राहिला हे नक्की. या सफेद रंगाच्या गाडीची भीती आमच्या मनात इतकी रुजली कि आम्ही आमच्या गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर कुठेही सफेद रंगाची गाडी दिसली तर आम्ही जिथे मिळेल जागा तिथे लपण्याचा प्रयत्न करायचो. कधी-कधी तर रस्त्याच्या बाजू ह्या झाडा-झुडपांत लपताना पायाला टुपले किंवा अंगभर करवंदीच्या काट्यांनी खरचटले तरी आम्ही या साऱ्यांची पर्वा न करता जीव मुठीत घेवून पळायचो व एखाद्या दगडामागे किंवा कोणत्यातरी झाडाच्या मागे लपायचो. असे अनेक दिवस आम्ही त्या सफेद रंगाच्या ‘किडनॅपिंगच्या गाडी’ला घाबरत होतो. मात्र दिवसांवर दिवस गेले पण कधीही सफेद रंगाच्या गाडीने कधीही कोणा मुलाला पळवून नेले नाही त्यामुळे दिवसागणिक या ‘किडनॅपिंगच्या गाडी’ची भीती मनातून कमी होत गेली. आणि कालांतराने आम्ही विसरूनही गेलो. पण एव्हाना या गाडीची आम्हाला खूप भीती वाटते हे घरातल्यांना माहित पडले होते त्यामुळे मध्येच कधीतरी आम्हाला घाबरवण्यासाठी या सफेद गाडीचा नेहमी आधार घ्यायचे. पण कालांतराने आम्ही या भीतीपासून मुक्त झालो होतो. किंबहुना ही भीती मनापासून कायमचे निघून गेली होती.
आजही जेव्हा जेव्हा मला लहानपणीच्या या आठवणी आठवल्या कि मग पुन्हा लहान झाल्यासारखे वाटते आणि या साऱ्या आठवणी आठवत असताना कधी अचानक गंभीर चेहरा, कधी स्मित हास्य, कधी निराश अशा नानाविध मुद्रा चेहऱ्यावर उमटतात. या मुंबईच्या गजबजलेल्या शहरात रहायला आल्यापासून तर गावाकडील साऱ्या अनमोल क्षणांचे, मजेशीर प्रसंगांचे महत्व अधिकच जाणवू लागले आहे. गावाकडील ते सारे आयुष्य आपण या मुंबईच्या गजबजाटात हरवतो आहोत असेही वाटते. पुन्हा गावाकडे जावून तेच छान निर्मल आयुष्य जगावे असे वाटते.

-          -  नामदेव अंजना काटकर
        namdev.katkar@gmail.com

08 December, 2013

प्रेरणादायी व्यक्तिमत्व : सतीश काळसेकर

सतीश काळसेकर
खरंतर आयुष्यात अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांच्या विचारांमधून, वागणुकीतून काही ना काहीतरी आपण शिकत असतो. असेही अनेक व्यक्तिमत्व असतात ज्यांची नुसती कौतुकाची थाप आपल्याला प्रेरणादायी ठरत असते.... अशीच एक व्यक्ती ज्यांनी दिलेले प्रोत्साहन खरच माझ्यासाठी नेहमीच मोलाचे आहेत....
मी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षाला होतो... एका कामानिमित्त भूपेश गुप्ता भवनमध्ये गेलो होतो... ज्या व्यक्तीशी काम होतं.. ती व्यक्ती तिथे भेटणार होती... मी व माझा मित्र आकाश लोणके असे आम्ही दोघेजण गेलो होतो... भूपेश गुप्ता भवनच्या दुसऱ्या मजल्यावर गेलो.... उजव्या बाजूला एक केबिन दिसली...
आतील एकाने विचारले “कोण हवे आहेत ? काही काम आहे का ?”
मी त्यांना सविस्तर सांगितले कि असे असे काम आहे..यांना यांना भेटायचे आहेत...
“ठीक आहे.. बाजूला जी केबिन आहे तिथे बसलेत बघा ते ज्यांना तुम्हाला भेटायचे आहे...” ते म्हणाले.
आम्ही दोघेही बाजूच्या केबिनच्या दिशेने गेलो. आत केबिनमध्ये सफेद रंगाच्या कुर्ता-पायजमा परिधान केलेला अंगाने धडधाकट आणि आवाजात कणखरपणा  आणी स्पष्टपणा असलेला एक व्यक्ती.
“सर, आत येवू का ?” मी विचारले.
“अरे विचारताय काय ? तुमचीच केबिन आहे... तुम्हा तरुणांनी इथे येणे म्हणजे माझे भाग्यच..” समोरून उत्तर आले.
मी व आकाश आत केबिन मध्ये गेलो....परवानगी घेवून खुर्चीवर बसलो.... जे काम होते ते पूर्ण केले. विश्वास बसत नव्हतं कि एवढ्या मोठ्या व्यक्तीसमोर आपण बसलो आहोत. आतापर्यंत साहित्यिक म्हणून परिचयाचे असलेले हे व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यासमोर होते. अशा लोकांची भेट होणे म्हणजे माझे भाग्यच. समोर बसलेले ते व्यक्ती म्हणजे सतीश काळसेकर.
जवळ-जवळ दीड ते दोन तास आम्ही चर्चा केली असेल.. जेव्हा काळसेकर सरांना कळले कि मी व आकाश दोघेही पत्रकारितेचे विद्यार्थी आहोत तेव्हा त्यांनी पत्रकारितेवर खूप चर्चा केली. पत्रकारितेतील विविध व्यक्तिमत्वांची उदाहरणे दिली व पत्रकारिता कशी असावी याबद्दल सांगितले शिवाय खूप काही.... थोड्या वेळाने समोर असलेल्या एका गृहस्थाला जवळ बोलावले व त्याच्या कानात काहीतरी सांगितले. ते गृहस्थ बाहेर गेले व थोड्या वेळाने जयदेव डोळे लिखित “समाचार”  हे पुस्तक घेवून आले. काळसेकर सरांनी ते पुस्तक आम्हा दोघांना भेट म्हणून दिले. “नामदेव व आकाश तुमच्या आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.” असे पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्यांनी लिहिले आणि त्याखाली त्यांची स्वाक्षरी. क्या बात है !!! मनातल्या मनात म्हटले... आयुष्यात अजून काय हवे आहे ?...  एवढ्या मोठ्या व्यक्तीने असे स्वतःहून पुस्तक भेट देणे व त्यावर त्यांची स्वाक्षरी. एवढेच नव्हे.. काळसेकर  सरांनी आम्हा दोघांचाही पत्ता लिहून घेतला व गेली दोन-अडीच वर्षे ते एक रुपयाही न घेता ते आजही आम्हाला न विसरता त्यांचे “आपले वाङमय वृत्त” हे मासिक पोस्टाने पाठवतात....

खरच अशा लोकांकडून मिळणारी कौतुकाची थाप, त्यांच्याकडून मिळणारे प्रोत्साहन आयुष्यात खरच खूप मोलाचे असते.....

- नामदेव अंजना काटकर
  namdev.katkar@gmail.com

06 December, 2013

कामवासना, नियंत्रण आणि विवेक संस्कार

सध्या दिवसागणिक महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. माध्यमांच्या पाठपुराव्यामुळे त्यातल्या काही पिडीत महिलांना न्याय मिळतही असेल पण खरतर माध्यमांपर्यंत काही मोजक्याच घटना पोहचतात. अशा असंख्य भगिनी या देशात असतील ज्या लैंगिक छळाला बळी पडत असतील. काही धाडसी भगिनी या अत्याचाराविरुद्ध लढतात तर अनेकजणी सहन करतात हे अत्याचार. अत्याचार करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे मात्र त्याचवेळी आपण हे ही लक्षात घेतले पाहिजे कि शिक्षा दिली म्हणजे यापुढे महीलांवर अत्याचार होणे थांबतील असा अर्थ काढणे मूर्खपणाचे आहे. त्यामुळे यावर कायदेशीर शिक्षेसोबतच अजून दुसरा कोणता उपाय असेल तर तो म्हणजे लैंगिक शिक्षण देणे आवश्यक आहे.

अगदी स्पष्ट बोलायचे तर स्त्रियांचे गुप्तांग अनेकवेळा आपण शिव्या म्हणून वापरतो. का असे आपण करतो ? ज्या अवयातून आपला जन्म झाला आहे त्याला आपण त्याच्याशी एखादा टोकाचे हिंस्त्र कृत्य कसे करू शकतो ? असे अनेक प्रश्न मला पडले आहेत. यावर एक उत्तर असे आहे कि असे हिंस्र कृत्य करणाऱ्यांचे स्वतःच्या मेंदूवर नियंत्रण नसते. कामवासना ही एक प्रबळ अशी वासना आहे पण याचा अर्थ ती नियंत्रणात ठेवता येत नाही असा होत नाही. मला तर असे वाटते कि कामवासनेवर नियंत्रण न केल्यामुळेच आज हाहाकार माजला आहे. मग हा हाहाकार रोखायाचा असेल तर त्यासाठी काय करायला हवे तर अंगी संयम बाणवायला हवे. मेंदूवर नियंत्रण असायला हवे. त्यासाठी आवश्यक असणारे विवेकाचे संस्कार लहानपणापासून घरातील जेष्ठ व्यक्तींनी करायला हवे. असे म्हणतात कि “The orgasm occurs not between two legs, but between two ears”. शेवटी कामवासना काय किंवा अन्य विकृती काय सर्वांचे नियंत्रण हे मेंदुतूनच होते. म्हणून हे सारे थांबवणे आपल्या इच्छेवर असते. जरी संपूर्णपणे नाही थांबवता आले तरी काही प्रमाणात नक्कीच नियंत्रण मिळवता येवू शकते. असे मला वाटते.

(वरील लेखनात काही चूक झाली असेल तर दुरुस्ती करावी. मला जे वाटतं ते मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अजून विश्लेषण करून हा विषय मांडता येईल हे माहित असूनसुद्धा मी कमीत कमी शब्दात मांडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे.)

-          -   नामदेव अंजना काटकर 
     namdev.katkar@gmail.com

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...