12 June, 2013

एक शाळा बांधली म्हणजे सर्व काही झालं असे होत नाही..........

शिक्षणाचा प्रसार होण्याची अजून खूप गरज आहे. नुसती एखाद्या गावात एखादी शाळा बांधली म्हणजे त्या गावात शिक्षणाचा प्रसार झाला असे म्हणता येणार नाही. आणि नुसतं शिक्षण देणे महत्वाचे नाहीत तर ते शिक्षण घेतल्यावर पुढे कोण-कोणत्या संधी उपलब्ध आहेत ? याचीही माहिती विद्यार्थ्यांना देणे आवश्यक असते. शिक्षणाचा प्रसार व्हायला हवा व त्यासाठी सरकारने व आपल्या सुशिक्षित समाजाने प्रयत्न करायला हवे हे आता वेगळे सांगायला नको. शिक्षण कसा आहे ? आजच्या शिक्षणाची गुणवत्ता काय आहे ? यावर काही दिवसांच्या अंतरावर वृत्तपत्र, दृक्श्राव्य माध्यमे यांमधून चर्चा होतंच असते. पण मला यापेक्षा थोडा वेगळं मुद्दा मांडायचा आहेअ व तो ही माझ्या अनुभवावर आधारित.... माझ्या गावाच्या आजूबाजूच्या वीस-पंचवीस गावांनी मिळून आमच्या शाळेची स्थापना केली. अर्थात माझ्या शाळेला आता सरकारी अनुदान मिळतं पण त्या अनुदानासाठीही हजार खेपा घालाव्या लागतात. अर्थात अनुदानासाठी म्हणा किंवा इतर कोणत्याही सरकारी कामासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात यात काही नाविन्य नाही. पण मी ज्या शाळेत शिकलो तिथले असे अनेक अनुभव मला महत्वाचे यासाठी वाटतात कि शाळेत शिकणारे अनेक जण हुशार असून सुद्धा त्यांना दहावीनंतर काय करावं हेच काळात नाही. अर्थात ती त्यांची चुकी नसते कारण त्यांना मार्गदर्शन करणारा कुणीच भेटत नाही. माझ्या गावात व आजूबाजूच्या काही गावातही अशीच प्रथा रूढ झाली आहे कि दहावीनंतर कुठीतरी “ऑफिस”मध्ये कामाला लागायचं. महाविद्यालयीन शिक्षण फक्त शाळेमध्ये पहिल्या पाच मध्ये येणाऱ्या मुला-मुलींनीच घ्यायचं. अर्थात आता थोडा यात बदल झाला आहे. मात्र ८० ते ९० टक्के मुलं हे उच्च शिक्षण घेताच नाहीत. आत आयला अनेक करणे आहे. त्यामध्ये पुढे काय करायचं याचं मार्गदर्शन करणारा कोणी नसतो, आर्थिक परिस्थितीमुळे मुंबईला येऊन ४ ते ५ हजार रुपयाचा पगार घेणे हेच समोर असतं असे अनेक करणे आहेत. आणि जे शिकतात ते हि कॉमर्स कारण कॉमर्समधून कुठे ना कुठे नोकरी लागतेच असा विश्वास प्रत्येकाला असतो. करिअरच्या वेगळ्या वाटा धुंडलायचा कुणी प्रयत्नहि करत नाही कारण त्यांना त्याचं मार्गदर्शन करणार कोणीच नसतो. वृत्तपत्रातून मार्गदर्शन घ्यावं तर वृत्तपत्र हि दररोज गावत पोहचत नाही. म्हणून आमच्या इकडचे अनेक मुले हे ये रे माझ्या मागल्या असे करत गावातले इतर मुले जसे कामाला लागले तसेच आपणही लागू अशीच त्यांची मानसिकता असते. माझ्या गावात व आजूबाजूच्या गावात अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच मुले व मुली आहेत जे तथाकथित शिक्षणाच्या बाहेर जावून शिकले. एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच डॉक्टर, वकील, इंजिनियर आहेत. दहावीनंतर मुलीच्या शिक्षणाची तर बोंबच. कारण एकतर मुली हुशार नसतात असा समाज. पण हा कोणी विचार करत नाही कि ती घराचं सर्व काम सांभाळून अभ्यास करायची म्हणून तिला अभ्यासाकडे दुर्लक्ष करावं लागलं आणि म्हणून तिला कमी गुण मिळाले. आणि जरी कोण एका मुलीला जास्त गुण मिळाले आणि चांगल्या टक्केवारीने पास झाली तरी तिला जेमतेम बारावी पर्यंत शिकवलं जातं कारण मग जास्त शिकली तर लग्नाला मुलगा कोण मिळणार? अशी मानसिकता... सुदैवाने मला मुंबईत मार्गदर्शन करणारी अनेक जण भेटले म्हणून मी चाकोरीबाहेर जावून शिकलो पण ज्यांना असे मार्गदर्शक मिळताच नाहीत. त्याचं काय?... एखादी शाळा बांधून दिली म्हणजे आपण शिक्षणाचा प्रसार केला असे होत नाही. माझं असे वैयक्तिक मत आहे कि प्रत्येक शाळेमध्ये एक उच्च शिक्षणमार्ग व व्यावसायीक मार्गदर्शन करणारे कक्ष असावेत. तरच शैक्षणिक प्रसारासाठी धडपड चालू आहे ती फळास येईल.....

- नामदेव अंजना काटकर
  namdev.katkar@gmail.com

2 comments:

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...