14 June, 2013

वाढदिवसानिमित्त पत्र.....

आदरणीय
राजसाहेब ठाकरे...

तुम्ही मराठी मनाचे बुलंद आवाज आहात..महाराष्ट्राच्या अस्मितेचे एकमेव लढवय्ये...मराठी लोकांसाठी प्राण पणाला लावू शकता..तुमच्याशिवाय महारष्ट्रात पर्याय नाही...असे अनेक वाक्य सकाळी सकाळी माझ्या एका मित्राकडून ऐकले... मी हि एकेकाळी तुमचा समर्थक होतो...आणि तोही कट्टर... आणि याच कट्टरपणातून मी व माझे काही मित्र एकत्र येऊन डहाणूकर महाविद्यालयात मनसेची विद्यार्थी संघटनेची बांधणीही केली होती..अर्थात नंतर काही कारणांमुळे संघटना काही मजबूत झाली नाही..व नंतर मनसेच्या अनेक विचारांपासून दुरावत गेलो .. .असो..तर आज मी तुम्हाला पत्र लिहितो आहे त्याची अनेक कारणे आहेत... मी नेहमी सर्वांना सांगतो कि तुमच्यासारखं नेत्याची देशाला गरज आहे...पण असे सांगत असताना मी एक वाक्य नेहमी या वाक्याला जोडतो ते म्हणजे राज ठाकरेंनी प्रांतवाद सोडून दिलं पाहिजे... अर्थात त्यांच्या दृष्टीने प्रांतवाद एकदम बरोबर आहे..व हाच मुद्दा त्यांना सत्तेची चव चाखायला देणार आहे यात तिळमात्र शंका नाही....पण मला फक्त काही गोष्टी तुमच्या कानावर घालायच्या आहेत.... आता हेच बघा ना दुसऱ्या एखाद्या प्रांतातून (स्वतःच्याच देशातल्या दुसऱ्या प्रांतात) आलेला कोणी एक माणूस हा मौजमजा करायला येत नाहीत..पोटाची भूक भागवण्यासाठी सार्वजन स्थलांतर करतात..आता तुम्ही यावर म्हणाल कि तिकडच्या नेत्यांनी त्यांची सोय करावी...तुमचं बरोबर आहे साहेब..पण तेथील स्थानिक नेते नाही करत त्यांच्या पोटातल्या भुकेची कदर म्हणून त्यांनी काय उपाशी मारावे ?... आणि ते इथे आले तर आपल्या महाराष्ट्राच्या विकासातहि भर पडतेच ना...आणि हो इथे जर ते काही बेकायदेशीर करत असतील तर नक्कीच त्यांच्या विरोधात उभे राहिले पाहिजे.. पण विरोधात उभे राहताना हातात काठ्या घेवून नाही तर बाजूला वकील घेवून....
तुमच्यासारख्या नेतृत्वाचे सर्व गुण असलेल्या नेत्याची फक्त महाराष्ट्राला नाही तर अख्ख्या भारताला गरज आहे.. तुमची दूरदृष्टीमहाराष्ट्रासारख्या राज्याला आवश्यक आहे... एक प्रांतवाद सोडून तुम्ही बोला...मग बघा जे आहेत त्यांच्या दुपटीने तरुण तुमच्या मागे उभे असतील.. विकासाच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरा मग बघा किती मोठा पाठींबा मिळतो ते.. उलट उत्म्ही लोकांना समजावून सांगायला हवे कि उत्तर परदेशी असो वा बिहारी हे सारे आपलेच देशबंधू आहेत... महाराष्ट्र राज्य दूरदृष्टी असलेल्या आणि सर्वसमावेशक विकासाची मागणी करणाऱ्या नेत्याच्या शोधात आहे.. आणि हे सारे गुण तुमच्यात आहेत...फक्त प्रांतवाद सोडून राजकारण करावे एवढीच इच्छा आहे...आज जेव्हा आम्ही तरुण महाराष्ट्र सोडून उत्तरेकडे जातो एखाद्या कामासाठी तेव्हा आमच्या मनात भीती असती आमच्या जीवाची कारण आपल्या महाराष्ट्रात आपण उत्तरेकडील जनतेला जशी वागणूक देतो तशी वागणूक आपल्याला त्यांनी दिली तर ?... एक तरुण म्हणून सांगावेसे वाटलं ते सांगितल...आणी हो वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...

-नामदेव अंजना काटकर

  namdev.katkar@gmail.com

12 June, 2013

एक शाळा बांधली म्हणजे सर्व काही झालं असे होत नाही..........

शिक्षणाचा प्रसार होण्याची अजून खूप गरज आहे. नुसती एखाद्या गावात एखादी शाळा बांधली म्हणजे त्या गावात शिक्षणाचा प्रसार झाला असे म्हणता येणार नाही. आणि नुसतं शिक्षण देणे महत्वाचे नाहीत तर ते शिक्षण घेतल्यावर पुढे कोण-कोणत्या संधी उपलब्ध आहेत ? याचीही माहिती विद्यार्थ्यांना देणे आवश्यक असते. शिक्षणाचा प्रसार व्हायला हवा व त्यासाठी सरकारने व आपल्या सुशिक्षित समाजाने प्रयत्न करायला हवे हे आता वेगळे सांगायला नको. शिक्षण कसा आहे ? आजच्या शिक्षणाची गुणवत्ता काय आहे ? यावर काही दिवसांच्या अंतरावर वृत्तपत्र, दृक्श्राव्य माध्यमे यांमधून चर्चा होतंच असते. पण मला यापेक्षा थोडा वेगळं मुद्दा मांडायचा आहेअ व तो ही माझ्या अनुभवावर आधारित.... माझ्या गावाच्या आजूबाजूच्या वीस-पंचवीस गावांनी मिळून आमच्या शाळेची स्थापना केली. अर्थात माझ्या शाळेला आता सरकारी अनुदान मिळतं पण त्या अनुदानासाठीही हजार खेपा घालाव्या लागतात. अर्थात अनुदानासाठी म्हणा किंवा इतर कोणत्याही सरकारी कामासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात यात काही नाविन्य नाही. पण मी ज्या शाळेत शिकलो तिथले असे अनेक अनुभव मला महत्वाचे यासाठी वाटतात कि शाळेत शिकणारे अनेक जण हुशार असून सुद्धा त्यांना दहावीनंतर काय करावं हेच काळात नाही. अर्थात ती त्यांची चुकी नसते कारण त्यांना मार्गदर्शन करणारा कुणीच भेटत नाही. माझ्या गावात व आजूबाजूच्या काही गावातही अशीच प्रथा रूढ झाली आहे कि दहावीनंतर कुठीतरी “ऑफिस”मध्ये कामाला लागायचं. महाविद्यालयीन शिक्षण फक्त शाळेमध्ये पहिल्या पाच मध्ये येणाऱ्या मुला-मुलींनीच घ्यायचं. अर्थात आता थोडा यात बदल झाला आहे. मात्र ८० ते ९० टक्के मुलं हे उच्च शिक्षण घेताच नाहीत. आत आयला अनेक करणे आहे. त्यामध्ये पुढे काय करायचं याचं मार्गदर्शन करणारा कोणी नसतो, आर्थिक परिस्थितीमुळे मुंबईला येऊन ४ ते ५ हजार रुपयाचा पगार घेणे हेच समोर असतं असे अनेक करणे आहेत. आणि जे शिकतात ते हि कॉमर्स कारण कॉमर्समधून कुठे ना कुठे नोकरी लागतेच असा विश्वास प्रत्येकाला असतो. करिअरच्या वेगळ्या वाटा धुंडलायचा कुणी प्रयत्नहि करत नाही कारण त्यांना त्याचं मार्गदर्शन करणार कोणीच नसतो. वृत्तपत्रातून मार्गदर्शन घ्यावं तर वृत्तपत्र हि दररोज गावत पोहचत नाही. म्हणून आमच्या इकडचे अनेक मुले हे ये रे माझ्या मागल्या असे करत गावातले इतर मुले जसे कामाला लागले तसेच आपणही लागू अशीच त्यांची मानसिकता असते. माझ्या गावात व आजूबाजूच्या गावात अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच मुले व मुली आहेत जे तथाकथित शिक्षणाच्या बाहेर जावून शिकले. एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच डॉक्टर, वकील, इंजिनियर आहेत. दहावीनंतर मुलीच्या शिक्षणाची तर बोंबच. कारण एकतर मुली हुशार नसतात असा समाज. पण हा कोणी विचार करत नाही कि ती घराचं सर्व काम सांभाळून अभ्यास करायची म्हणून तिला अभ्यासाकडे दुर्लक्ष करावं लागलं आणि म्हणून तिला कमी गुण मिळाले. आणि जरी कोण एका मुलीला जास्त गुण मिळाले आणि चांगल्या टक्केवारीने पास झाली तरी तिला जेमतेम बारावी पर्यंत शिकवलं जातं कारण मग जास्त शिकली तर लग्नाला मुलगा कोण मिळणार? अशी मानसिकता... सुदैवाने मला मुंबईत मार्गदर्शन करणारी अनेक जण भेटले म्हणून मी चाकोरीबाहेर जावून शिकलो पण ज्यांना असे मार्गदर्शक मिळताच नाहीत. त्याचं काय?... एखादी शाळा बांधून दिली म्हणजे आपण शिक्षणाचा प्रसार केला असे होत नाही. माझं असे वैयक्तिक मत आहे कि प्रत्येक शाळेमध्ये एक उच्च शिक्षणमार्ग व व्यावसायीक मार्गदर्शन करणारे कक्ष असावेत. तरच शैक्षणिक प्रसारासाठी धडपड चालू आहे ती फळास येईल.....

- नामदेव अंजना काटकर
  namdev.katkar@gmail.com

04 June, 2013

एकांत...

त्यांना तुमची सोबत नको असते.. त्यांना हवा असतो एकटेपणा....एकांतवास...

कधी कोणी रागावलं... एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करूनही पराभव पत्करावा लागला..कि आपण निराशेच्या खाईत लोटले जातो. सारखं सारखं त्याचं गोष्टीचा विचार करत बसतो. तेच तेच विचार पुन्हा पुन्हा आपल्या डोक्यात येत राहतात. आजूबाजूला आपल्याला कुणीच नको असतं..अन्यथा त्याच्यावर आपला राग निघतो. जी लोकं खरच रागिट असतात ते आपली निराशा कुठल्यातरी निर्जीव वस्तूची आपटाआपट करुन व्यक्त करतात. पण त्यांची गोष्ट वेगळी असते जे आपली निराशा व्यक्त करण्यासाठी एकांतवासाचा पर्याय निवडतात. मला त्या लोकांबद्दल नेहमी अप्रूप वाटत आलं आहे जी लोकं आपल्याला आलेली निराशा काळ्याकूट्ट काळोखाशी व्यक्त करतात. तो काळोखही शांतपणे त्या व्यक्तीची भूमिका ऐकून घेतो. एकांतवासाता व्यक्त होणाऱ्या व्याक्ती ह्या खूपच संवेदनशील असतात... का बरं वाचत असावं त्यांना की आपलं ऐकणारं कोणाच नाही ? की त्यांना या जगात कोणावर विश्वासच राहिलेला नसतो ? माहित नाही बुवा... पण एक नक्की की त्यांना त्या एकांतातल्या काळोखावर त्या क्षणाला खूप विश्वास असतो. इतका की त्या एकांतात ते तासनतास बसून राहतात.. काळोखाच्या सोबतीत त्याना बहुधा मन मोकळं होता येत असावं..किंवा तो काळोखच त्यांना समजावत असावा..समजून घेत असावा.. असेल काही... अशा संवेदनशील लोकांना एकांतवास हवा असतो तो आजूबाजूच्या निर्दयी माणसांपासून.. अशा माणसांपासून जे त्या व्यक्तीला समजून घेत नाहीत..त्या व्यक्तीला व्यक्त होऊ देत नाहीत... मग अशा परिस्थितीत त्या लोकांकडे त्यांचं ऐकून घेणारा एकच असतो तो म्हणजे....एकांत..

- नामदेव अंजना काटकर
  namdev.katkar@gmail.com

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...