18 July, 2018

वारी : काही आठवणी आणि काही प्रश्न

फोटो सौजन्य : फेसबुक दिंडी
मूळ नाव ज्ञानेश्वर, शाळेत दाखल करताना आजोबांनी ज्ञानदेव सांगितलं, लिहिणाऱ्याने नामदेव लिहिलं...असा माझ्या नावाचा प्रवास. पण ज्ञानेश्वर असो, ज्ञानदेव असो, वा नामदेव. तिन्ही नावं वारकरी संप्रदायाशी संबंधित आहेत. नाव ठेवण्यामागे अर्थात आजोबांचं वारकरी संप्रदायातील असणं कारणीभूत आहे. लहानपणापासून घरात - गावात - पंचक्रोशीत वारकरी संप्रदायाबद्दल प्रमाणिक श्रद्धा आहे.
आधी केवळ देव-धर्म म्हणून वारकरी संप्रदायाबद्दल आदर होता, मात्र पुढे तुकोबा वाचल्यानंतर विचारानेही या परंपरेशी जोडला गेलो. तमाम संतांच्या जीवनातून बंधुभावाचीच शिकवण दिली गेलीय. आपण किती अंगीकारली हा पुढचा वादाचा मुद्दा. पण संतपरंपरा ही एकता आणि बंधुभावावर आधारलेली आहे, एवढे निश्चित.
चौथीत असताना माझ्या हट्टामुळे आणि सहावीत असताना आजोबांनी स्वत:हून - अशा दोनवेळा आजोबांनी पंढरीची वारी घडवली. वारीशी संबंधित एक रंजक आठवण आहे. आजोबांचं बोट धरुन पंढरीच्या डेपोत एसटीतून उतरल्यावर घोषणा ऐकायला आली - "यात्रेचा काळ आहे. चोरांचा सुळसुळाट आहे. आपापल्या बॅगांवर लक्ष ठेवा." घोषणा ऐकून आजोबा कुजबुजले, "आम्हीही चोरीच करायला आलोय - बा पांडुरंगाच्या आशीर्वादाची चोरी करायला."
आमच्या गावाकडं वारकरी संप्रदाय चांगला रुजला आहे. मुळात शेतकरी समाज असल्याने वारकरी संप्रदायासारखं तळातल्या माणसांचं जगणं सांगणारा संप्रदाय रुजण्यास सुपिक वातावरण होतं. आणि तसेच झाले. आजही सगळ्या एकादशा नित्यनेमाने साजऱ्या केल्या जातात. दिवंगत सोनब अण्णा कदम यांनी बंधुभावाचा संदेश देणारे किर्तन गावा--गावात केले. लोकांना वारकरी संप्रदायाशी जोडले. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रवीण दादा हा वारसा सक्षमपणे पुढे नेत आहे. एकंदरीत मनाने-तनाने वारकरी परंपरेशी जोडला गेलेला आमचा परिसर आहे.
पुढे मुंबईत आल्यानंतर वाचनाकडे वळलो. एका दिवशी तात्यांचं म्हणजे आदरणीय डॉ. आ. ह. साळुंखे यांचं 'विद्रोही तुकाराम' हाती आलं. वैचारिकतेनेही संतपरंपरेशी अधिक घट्टपणे जोडला गेलो. वारकरी संप्रदायाशी जोडला गेलो असलो तरी, काही गोष्टी कायम प्रश्नांकित करत आल्यात. त्यावर आता बोलावं वाटतंय. किंवा वरील सारा लेखनप्रपंच त्या प्रश्नांसाठीच केलाय.
चंद्रभागेच्या वाळवंटी नाना जाती-धर्माची माणसं एकरुप होतात. जाती-धर्माची लेबलं पंढरीच्या बाहेर सोडतात आणि पंढरीच्या विठ्ठलाच्या नामात दंग होतात. कुणीही स्पृश्य-अस्पृश्य राहत नाही. वारीतला प्रत्येकजण केवळ 'वारकरी' असतो. मात्र हेच वारकरी जेव्हा पंढरीची वारी करुन आपापल्या गावात पोहोचतात, तेव्हा पुन्हा आपल्या जाती-धर्मात का शिरतात? (अर्थात अपवाद आहेत. नाही असे नाही.) संतपरंपरेनी विश्वबंधुभावाचा संदेश दिला, तो पंढरीत आपण अंमलात आणतो, मग परतल्यावर का विसरतो? आजूबाजूला जाती-धर्मात विघातक तेढ निर्माण होत असताना, आपल्याला याचे उत्तर नक्कीच शोधायला हवे.
फ्रेंच राज्यक्रांतीने स्वतंत्र्य, एकता बंधुता ही मूल्य दिली असे म्हणतात. मात्र आपल्या वारकरी संप्रदायाने फ्रेंच राज्यक्रांतीच्या साडेसातशे वर्षांपूर्वीच एकता आणि बंधुभावाची शिकवण दिली. ते आपण किती लवकर विसरलो.
ज्या संतपरंपरेने आपल्या वारकरी संप्रदायाच्या चळवळीचं नेतृत्त्व संत सोयराबाई, संत जनाबाई यांसारख्यांच्या खांद्यावर सोपवलं. त्याच परंपरेतील आपण स्त्रियांना का दुय्यम वागणूक देत असून, स्त्रियांकडे कमकुवत म्हणून का पाहतो?
असे अनेक प्रश्न आज मनात घिरट्या घालतात. वारकरी संप्रदायाबद्दल आस्था असल्याने या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आपण घेतला पाहिजे आणि आपली परंपरा अधिक सक्षम बनवली पाहिजे. कारण वारकरी संप्रदाय हा या भूमीतल्या आधुनिकतेचा अविष्कार आहे. आपण परंपरा जपली पाहिजे. कारण अशी परंपरा जगातल्या खूप कमी समूहांच्या वाट्याला आली आहे. आपण त्यात नशीबवान आहोत.

नामदेव अंजना

02 June, 2018

जगण्याचा प्रश्न



जात, धर्म इत्यादी भावनिक मुद्देच बहुतांशवेळा आपल्याकडील निवडणुकांच्या केंद्रस्थानी पाहायला मिळतात. विकास हा मुद्दा तोंडी लावण्यापुरता राहतो. जगण्याची तारांबळ असताना, आपल्याला जाती-धर्मात विभागले जाते आणि आपण विभागलो जातो - असे का होते? हे एक न सुटणारे कोडे आहे. किंबहुना मानसिक संशोधनाचा हा विषय आहे. असो.

आज 'आरोग्य' या विषयावर बोलू. किती किचकट शब्द वापरला ना - 'आरोग्य'. जात किंवा धर्मावर बोलू म्हटले असते, तर मांड्या सरसावून आणि बाह्य थोपटून पुढे आला असतात, तेही डोळ्याचे कान आणि कानाचे डोळे करुन. आपली गरज काय नि आपण करतो काय, हे न समजल्यामुळेच आपली ही हालअपेष्टा झालीय आणि यापुढे होणार आहे.

ज्यांना शक्य आहे, त्यांनी माझ्या या लेखाच्या शेवटच्या शब्दापर्यंत सोबत राहा. काहीतरी महत्त्वाचे माझे सांगणे आहे.

दहा-एक दिवसांपूर्वी 'लॅन्सेट' या जगप्रसिद्ध मासिकात अरोग्यासंदर्भात एक यादी प्रसिद्ध झाली. खरंतर अशा कित्येक मासिकांमध्ये कित्येक विषयांवरील याद्या प्रसिद्ध होत असतात. पण लॅन्सेट या मासिकाचे आरोग्य क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. 1923 पासून हे मासिक केवळ आरोग्य क्षेत्रासंबंधी माहिती प्रसिद्ध करतं. भारतीय परिप्रेक्षात सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे ही यादी सुद्धा महत्त्वाची आहे. या यादीत काय आहे आणि त्यात इतके महत्त्वाचे काय आहे, त्यासंबंधी पुढील चर्चा आहे.

'लॅन्सेट' मासिक आरोग्यासंदर्भात माहिती, आकडेवारी, बातम्या, सर्वेक्षणं इत्यादी गोष्टी करत असतं. आरोग्य क्षेत्राला वाहून घेतलेले हे मासिक आहे. यात वैद्यकीय सेवेची गुणवत्ता आणि उपलब्धता यासंबंधी एक 195 देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आलीय. सर्वात उत्तम वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय उत्पादनांची उपलब्धता असणारा देश पहिल्या स्थानावर, तर सर्वात वाईट गुणवत्ता आणि उपलब्धता असणारा देश 195 व्या स्थानावर अशा उतरत्या क्रमाने ही यादी आहे. हे थोडे सविस्तर यासाठी सांगितले, कारण यातील भारत देशाचे स्थान धक्कादायक ठिकाणी आहे.

'लॅन्सेट'ने प्रसिद्ध केलेल्या यादीत भारताचे स्थान 145 वे आहे. म्हणजे वैद्यकीय सेवेची गुणवत्ता आणि उपलब्धता इतकी ढासळली आणि खालावली आहे. थोडे तुलनातमकदृष्ट्या आपण याकडे पाहू. याच यादीतील आपल्या आजूबाजूच्या देशांचे स्थान पाहू. म्हणजे आपल्याला लक्षात येईल. या यादीत चीन (48), श्रीलंका (71), बांगलादेश (133), भुतान (134), नेपाळ (149), पाकिस्तान (154) आहेत. आपण महासत्ता वगैरे होण्याचे स्वप्न पाहत असताना आरोग्य क्षेत्राची ही हेळसांड गंभीर आणि भयंकर आहे.

भारतात गोवा आणि केरळ असे दोन राज्य सोडले, तर इतर राज्यांमध्ये आरोग्य क्षेत्राची पार धुळधाण झालीय. त्यात उत्तर प्रदेश तर सर्वात खालच्या स्थानी आहे. एक विशेष नोंद यामध्ये सापडते, ती म्हणजे 1980 नंतर भारतातील आरोग्य क्षेत्राला उतरती कळा लागली. याचवेळी आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, याच काळात आरोग्य क्षेत्रात खासगीकरणाने पाय ठेवायला सुरुवात केली आणि पुढे अजस्त्र विळख्यात ही जीवनावश्यक सेवा अडकली गेली. त्यात सरकारचेही वारंवर दुर्लक्ष होत आहे. आरोग्यावरील खर्च केवळ 1.2 टक्के आहे.

शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रातील खासगीकरण देशहिताचा नसतो. कारण हे दोन्ही क्षेत्र त्या त्या देशाचं भविष्य ठरवत असतात. मात्र भारतात नेमके हेच दोन क्षेत्र भयंकररित्या खासगी क्षेत्राच्या कचाट्यात अडकले आहेत. आजही ग्रामीण भागात 50-100 किमी अंतर पार केल्याशिवाय सर्व सोई-सुविधायुक्त असे रुग्णालय नसतो. तिथेही खर्च परवडणारा नसतो.

आरोग्य चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. अरुण गद्रे यांनी आजच्या (2 जून 2018) 'सकाळ' वृत्तपत्रातील लेखात एक छान कल्पना सूचवली आहे. अर्थात ती खूप आधीपासूनची आहे. पण त्यांनी अधोरेखित केली आहे. खरंच त्यावर विचार करण्याची नितांत गरज आजच्या घडीला आहे. कॅनरडा, यरोप, ब्राझील यांसारख्या देशांमध्ये 'यूनिव्हर्सल हेल्थ केअर' पॉलिसी आहे. म्हणजे काय, तर वैद्यकीय सेवेसाठी कुणाला पैसे द्यावे लागत नाही, तर सर्व खर्च सरकारतर्फे करातून केला जातो. ही इतकी मोठी पॉलिसी जरी आपल्याकडे आणता आली नाही, तरी किमान सुरुवात म्हणून सरकारी रुग्णालयात तरी औषधं मोफत देणारं 'तामिळनाडू मॉडेल' आपण देशभर राबवायला हवे.

आरोग्य हा जगण्याचा प्रश्न आहे. मात्र आपल्या चर्चांचे विश्व भावनिक मुद्द्यांनी इतके व्यापलं आहे की, आपण जगण्याच्या प्रश्नांवर बोलणंच टाकलं आहे. आपण ते बोलायला हवे. तरच जगण्याचा प्रश्न सुटेल.

नामदेव अंजना - namdev.anjana@gmail.com

07 May, 2018

मोदी आणि त्यांचे कुत्रे



राहुल गांधी यांनी कुत्र्यांकडून देशभक्तीचे धडे शिकायला हवेत, असे कर्नाटकातील बगलकोटमध्ये मोदी बोलतात आणि भाजपचे बगलबच्चे टाळ्या वाजवतात. वाह... काय ती देशाच्या पंतप्रधानाची भाषा आणि काय तो देशाच्या जनतेचा प्रतिसाद!

एकीकडे संस्कृतीचा ठेका घेतल्यासारखे टेंभा मिरवायचा आणि दुसरीकडे वैफल्यग्रस्तासारखे विकृत वागायचे, अशा दोन दगडावरील मोदींची सर्कस ज्या चमत्कारिकरित्या वर्तमानात सुरु आहे, ते पाहता 2024 काय 2050 पर्यंत त्यांची सत्ता अबाधित राहील, यात शंका नाही. पण प्रश्न सत्तेचा नाही, प्रश्न आहे नैतिकतेचा, खऱ्या संस्कृतीचा आणि खरेपणाचा. दुर्दैवाने, नेमकी याच गोष्टींची मोदींच्या संस्कृतीत कमतरता दिसून येते.

विकास वगैरे गोष्टी होत राहतात. कुठल्याही देशाची ओळख फक्त त्या देशाच्या जमिनीवरील चकाकी पाहून ठरत नसते, तर तिथलं समाजकारण, राजकारण, संस्कृती इत्यादी गोष्टींचा मिलाफ म्हणजे त्या देशाची ओळख असते. याच गोष्टींचा भुस्काट करुन विकासाच्या गोष्टी करणार असाल, तर त्या केवळ बाताच ठरतात.

अर्थात, मोदी आणि कंपनीची देशभक्तीची व्याख्याच वेगळी आहे म्हणा. त्यामुळे प्रश्न खरेतर तिथेच निकालात निघतो. मोदींचा कुत्र्यांकडून देशभक्ती शिकण्याचा सल्ला कधी कधी योग्यच वाटतो. मागे एका भाषणात मोदी म्हणाले होते, "सैनिकांपेक्षा जास्त धाडस व्यापाऱ्यांमध्ये आहे". आता असे म्हणणाऱ्या नेत्याला देशभक्ती ही किती उथळ गोष्ट वाटत असावी, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे अर्थात व्यापाऱ्यांसमोर सैनिकाला कमी लेखणारी देशभक्ती राहुल गांधी यांनी शिकली नसेल, हा मोदींचा अंदाज तसा खरा आहे.

आणि मुळात मोदींनी देशभक्ती कुणाला शिकवायची? तर ज्याच्या खापर पणजोबांनी आपले आयुष्य देशासाठी वाहिले, ज्याच्या पणजोबांनी देशासाठी आपले अवघे आयुष्य देऊन देशाची बांधणी केली, ज्याच्या आजीने देशासाठी जीवाची पर्वा केली नाही, ज्याच्या वडिलांनी देशासाठी बलिदान दिले... ज्यांचं कुटुंब हा भारत देश घडण्यासाठी आपापल्या काळात खारीचा वाटा उचलतो, त्याला मोदी देशभक्ती शिकवणार? वाह रे पट्ट्या! मानलं बुवा तुला.

देशाचे पंतप्रधानपद हे मानाचं आहे. त्यामुळे ते बिरुद मिरवणाऱ्या माणसाची भाषा पदाला साजेशी असायला हवी आणि पदाला शोभणारी सर्वसमावेशकताही त्याकडे असायला हवी. सध्या प्रत्यक्षात उलटे दिसते आहे. इतिहासात डोकावताना हा वर्तमान किती नकारात्मक आहे, याची तीव्र जाणीव होते.

श्यामा प्रसाद मुखर्जी यांना पहिल्या मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय असो किंवा अटल बिहारी वाजपेयींना काँग्रेसने संयुक्त राष्ट्र संघात देशाची बाजू मांडण्यासाठी निवड करणे असो... यात तत्कालीन पंतप्रधानांची सर्वसमावेशकता दिसते. मुखर्जी हे अपक्ष आहेत म्हणून त्यांना डावलणं तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना सहज शक्य होते आणि अटल बिहारी वाजपेयी हे विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना संयुक्त राष्ट्रात संघात पाठवल्या जाणाऱ्या डेलिगेशनमधून वगळणे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनाही सहज शक्य होते. पण दोघांनीही त्या त्या वेळी तसे केले नाही. कारण सर्वसमावेशकता आणि विरोधी विचारांचा मान राखण्याची संस्कृती त्यांच्यात शाबूत होती. या दोघांनीही किंवा त्यांच्या आगे-पिछे आलेल्या कुठल्याच पंतप्रधानांनी कधीच विरोधी पक्षाला कुत्रे-बित्रे म्हटले नव्हते.... असा सारा इतिहास माझ्या देशाचा असताना, जेव्हा माझ्या देशाचा पंतप्रधान विरोधी पक्षाच्या नेत्याला कुत्र्याकडून देशभक्ती शिकण्याची भाषा करतो, त्यावेळी देशाच्या संस्कृतीची पिछेहाट माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणाला ठळकपणे जाणवते आणि अस्वस्थ करते.

असो. सत्ता काही सर्वकाळ टिकणारी नसते. आज-ना-उद्या जाईल. पण असंय ना की, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो आहे. 

24 April, 2018

वाचनप्रवास


काही महिन्यांपूर्वीचा फोटो आहे हा. आता आणखी एक थर वर बांधला आहे. मी फार निवडक पुस्तकं खरेदी केली आहेत. कथा, लोककथा, प्रवासवर्णन, कादंबरी, कवितासंग्रह, वैचारिक लेखसंग्रह, आत्मचरित्र इ. पुस्तकांनी भरलेला असा हा माझा किताबखाना आहे.

कुणाला नाटक पाहायला आवडतं, कुणाला सिनेमा, कुणाला मुशाफिरी, तर कुणाला आणखी काही. पोटा-पाण्याच्या धबाडग्यातून बाहेर पडून, आवडत्या गोष्टीत मन रमवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तसाच माझाही. मला पुस्तकं वाचायला आवडतात. खूप खूप आवडतात. इतकं इतकं वाचायला आवडतं, की मॅक्झिम गॉर्कीची भलीमोठी ‘आई’ कादंबरी एका बैठकीत संपवलीय.

दहावीपर्यंत पाठ्यपुस्तकांपलिकडे ‘श्यामची आई’ वगळता फार काही वाचले नव्हते. तसेही गावी कथा-कादंबऱ्यांसारखी पुस्तके नसायची. आमच्या शाळेलाही लायब्ररी वगैरे नव्हती. आताही एका कपाटाची आहे. त्यामुळे अभ्यासापलिकडे वाचन व्हायचं नाही.

अकरावीपासून पुढील शिक्षणासाठी मुंबईत आलो आणि अर्थात पावलं कॉलेजच्या लायब्ररीकडे वळली. म. ल. डहाणूकर कॉलेजला असतानाही फार अवांतर वाचन झालं नाही. एकतर पार्ट टाईम जॉब, त्यात इंग्रजीतून सर्व विषय आणि नाट्य मंडळात जाणारा वेळ. या साऱ्या गोष्टींमुळे तिथेही वाचनाकडे फार वळलो नाही.

पुढे पत्रकारितेसाठी साठ्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. इथे खऱ्या अर्थाने वाचनाला सुरुवात झाली. गोडी लागली. वर्षानुवर्षांचा अनुशेष भरुन काढावा अशा पद्धतीने वाचायला सुरुवात केली.

साठ्ये कॉलेजची लायब्ररीत हजारोंच्या पटीत पुस्तके आहेत. थेट लायब्ररीत जाऊन, हवे ते पुस्तक निवडून, घरी घेऊन जाऊन वाचण्याची मुभा होती. लायब्ररीचे सर्व काका तसे होते म्हणा. शिवाय इथे लाभलेले सर्व शिक्षकही वाचनाच्या आवडीला पुरक ठरले.

वादविवाद, वक्तृत्त्व, कथाकथन इ. स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागलो आणि त्यामुळे वाचनाला आणखी प्रोत्साहन मिळालं.

डॉ. कुंदा प्रमिळा निळकंठ, प्रा. गिरीजा गुप्ते, प्रा. गजेंद्र देवडा, प्रा. समीर जाधव यांच्यासारख्या शिक्षकांमुळे वाचनात आणखी भर घालत गेलो.

कुंदा मॅडमच्या घरात तर स्वत:ची लायब्ररी आहे. तिथे जाऊन वाचता यायचं. शिवाय कुंदा मॅडमनी सूचवलेले प्रत्येक पुस्तक बौद्धिक खुराक असायचा. आजही असतो. गिरीजा गुप्ते मॅडमने सूचवलेली अनेक पुस्तके वाचली. देवडा सरांनाही वाचनाची प्रचंड आवड आहे. वादविवाद स्पर्धांच्या निमित्ताने विविध विषयांवर समीर सरांनी पुस्तके सूचवलेली. प्रा. केतन भोसले सरांशीही विविध विषयांवर कॉलेजच्या पॅसेजमध्येच उभे राहून चर्चा करायचो. वर्ल्ड इज फ्लॅटसारखं पुस्तक केतन सरांनी सूचवलं होतं. एकंदरीत शिक्षक मंडळीच वाचनाला प्रोत्साहन देणारी ठरली.

वाचनाची ही भूक प्रचंड वाढत गेली. साठ्ये कॉलेजची लायब्ररी, पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघ, गोरेगावमधील केशव गोऱ्हे स्मारक ट्रस्टची लायब्ररी अशा तीन लायब्ररींनी वाचनाची भूक खूप भागवली. त्यांनतर पुस्तके विकत घेण्यासाठी पार्ल्यातील मॅजेस्टिक डेपो, दादरमधील साहित्य अकादमी, भूपेश गुप्ता भवन हे गाठायचो. केशव गोऱ्हे स्मारक आणि दादरचे संदर्भ ग्रंथालय इथे दिवस दिवस बसून वाचल्याचे प्रसंग आहेत.

नंतर एबीपी माझामध्ये कामाला लागलो आणि पार्ला किंवा दादरकडे जाणे कमी झाले. त्यात पार्ल्यातून मी दाहिसरला राहायला गेलो. ट्रेन कनेक्टिव्हिटीमुळे मुंबईत तसे काही जवळ-दूर हा प्रकार नसला तरी ट्रेनमधील गर्दीचा विचार करता दूरच गेलो म्हणायला हवे. पर्यायाने दादरला जाऊन पुस्तके खरेदी करणे कमी झाले. पण याची कमतरता बोरिवलीमधील येशू पाटील सरांच्या ‘शब्द’ गॅलरीने भरुन काढली.

पुस्तकांसोबतच वाचनाची इतर माध्यमंही हाताळत असतो. चित्रलेखा, लोकप्रभा, साधना, इंडिया टुडे (हिंदी), डाऊन टू अर्थ यांसारखी मासिकं, सप्तरंग (सकाळ), लोकरंग (लोकसत्ता), संवाद (मटा), मंथन (लोकमत), लिटररी रिव्ह्यू (द हिंदू) यांसारखे वृत्तपत्रीय लेखन, राईट अँगल, एक रेघ, बिगुल, अक्षरनामा यांसारखी ऑनलाईन पोर्टल, कविता-शेरो-शायरी वाचनासाठी रेख्ता, आठवणीतली गाणी, कविताकोश या वेबसाईट्स, दिवाळी अंक, विशेषांक इत्यादी गोष्टी वाचनाची भूक भागवण्यास मोठी मदत करतात. याआधी युवराज मोहिते सरांचं ‘कलमनामा’ आणि शिरीष पारकरांचं ‘महाराष्ट्र माझा’ सुद्धा वाचायचो. आता बंद झालंय. पण बहुतांश अंक आजही संग्रहित आहेत.

आणखी एक गोष्ट म्हणजे काही खास पुस्तकेही माझ्या संग्रही आहेत. खास म्हणजे, प्रा. प्रवीण बांदेकर, डॉ. कुंदा मॅडम, सतीश काळसेकर, कोंकणी लेखक दामोदर मावजो इत्यादींनी स्वत:च्या स्वाक्षरीनिशी भेट दिलेली पुस्तके माझ्या किताबखान्यात आहेत. एकंदरीत पुस्तकांबाबत फारच सुखी माणूस आहे मी.

पुस्तकंच वाचतो म्हणून अनेकजण टोमणे मारतात, काहीजण विविध विषयांचे रेफरन्स मागतात, काहीजण पुस्तकं सूचव म्हणतात, काहीजण पुस्तकेच वाचण्यासाठी मागतात वगैरे वगैरे. मात्र या साऱ्या गोष्टी सांभाळत मी माझे वाचन नियमित सुरुच ठेवतो. कारण केवळ बौद्धिक भूक भागवणे हे या वाचनामागचा माझा हेतू नाही, तर वाचन माझी आवड आहे. मला त्यातून आनंद मिळतो. नवनव्या गोष्टी कळतात. विविध गोष्टींचे कुतुहल वाढवतात. आपल्याला अनेक गोष्टी माहित असाव्यात, या कुतुहलापोटी वाचनाचा प्रवास सुरु झाला होता, तो आता सवयीपर्यंत येऊन ठेपला आहे.

पुस्तक दिनाचं निमित्त साधत हे लिहिलं आहे. चार-पाच ओळीत काहीतरी लिहीन म्हटलं आणि हे असं लांबलचक झालं. तरी वाचनाच्या या प्रवासातील अनेक रंजक किस्सेही आहेत. ते लिहियाला घेतले तर आणखी लांबलचक होईल. म्हणून इथेच थांबतो. पण पुस्तकांचाच विषय आहे म्हणून नागराज मंजुळेंच्या पुस्तकावरील एका कवितेने समारोप करतो. मला ही कविता फार आवडते.
मी एकाकी आहे
आणि या निर्घृण जगात
एकट्या-दुकट्या माणसानं
स्वरक्षणार्थ काही बाळगावं
म्हणून पुस्तक बाळगतो
मी कुठेही असो
पुस्तक सोबत असतंच
मी ते वाचत नसलो
तरी पडून असतो
छातीवर घेऊन प्रेयसीसारखं
वेळीअवेळी
मला एकटा पाहून
धावून येणाऱ्या ओसाडावर
मी पुस्तकच परजतो... तलवारीसारखं.

12 April, 2018

भोवताल टिपणारी मैत्रीण



लिहीन लिहीन म्हणता राहून जात होते. आणि साहित्यिक, सामाजिक किंवा राजकीय विषयांवर लिहिणे वेगळे. ते जमते. मात्र कुठल्या कलेवर लिहायचे म्हटल्यास, थोडे दडपण येते. कारण थोडे आवक्याबाहेरचे वाटते. आपल्या परिघात ते बसेल की नाही, यात शंका असते. तरी प्रतिक्षाच्या चित्रांवर बोलावे वाटते आहे. अगदी मनापासून. या लिहिण्यात परीक्षण नाही, फक्त निरीक्षण आहे.

कला कोणतीही असो, ती सादर करणारी व्यक्ती जर संवेदनशील असेल, तर त्या कलेला उंची प्राप्त होते, असे म्हणतात. याचा अर्थ कलेला भावनेशी जोडले गेले आहे. शब्दशः जिवंत नसली, तरी कलेत जिवंतपणाचे अंश असतात. ती सजीव असते. प्रतिक्षाचे चित्र पाहिल्यावर माझ्या मनात हे आणखी गडद आणि पक्के होते. कारण संवेदनशील तर ती आहेच, पण सोबत संवेदनशील भाव तिच्या चित्रात सुद्धा उतरले आहेत. तिच्या चित्रांचे मोठेपण यातच दडले आहे. तरी आणखी काही पदर तिच्या चित्रांच्या आड आहेत, ते उलगडण्याचा प्रयत्न करतो. कारण तिचा एक एक चित्र हजारो शब्द व्यक्त करतो. त्यामुळे ते नक्कीच या शे-पाचशे शब्दात सांगता येण्यासारखे नाही. तरी धाडस करतोच आहे.

प्रतीक्षा मुळात पत्रकार. व्यवसायाने म्हणेन. कारण आवडीने ती चित्रकार असेल. (असायला हवी.) पत्रकारितेत रोजच्या सुसाट वेगवान बातम्यांनी संवेदना पार बोथट होत जातात. एका क्षणी या साऱ्याचा कंटाळा येतो. नको वाटते हे जग. खून, हाणामाऱ्या, बलात्कार, छळ, चोरी, भ्रष्टाचार इत्यादी बातम्या रोज कानावर पडून कुणी संवेदनशील माणूस त्रस्त होणारच. अस्वस्थ होणारच. तरीही आपल्यातील संवेदनशील भावना, कलात्मकता, सृजनशीलता टिकवून ठेवणे, ही काही कमी हिंमतीची बाब नाही. मोठे बळ लागते अंगात. सुदैवाने प्रतीक्षात ते आहे. आणि चित्रांच्या माध्यमातून ते ती दाखवूनही देते.

तुमचा स्वभाव हा तुमच्या वागण्या-बोलण्यात परावर्तित होत असतो. वर्तनातून दिसत असतो. तसाच तो तुमच्या कृतीतून सुद्धा दिसतो. हेच निकष कलेला लागू पडतात. मग ती कला लेखनाची असो वा चित्राची. विषय कोणताही असो, त्यात तुमच्या स्वभावाचे आणि विचारांचे प्रतिबिंब उमटतेच.

प्रतीक्षा जितकी संवेदनशील आहे, जितकी हळवी आहे, तितकी सडेतोड आहे. तिचे स्वतःचे असे विचार आहेत. प्रत्येक गोष्टीवर तिचे मत असते. भूमिका घेऊन जगणारी आहे. ती भोवताल टिपत असते. कॉलेज संपल्यानंतर तिच्याशी फार बोलणे होत नाही. पण जेव्हा कधी आम्ही बोलतो, तेव्हा तिचे भोवताल टिपणे किती नेमके आहे, हे लक्षात येते. चित्र इतक्या नेमकेपणानं रेखाटण्यामागे तिचा 'भोवताल टिपणे' हाच गुण कामी येत असावा.

समोर ऑब्जेक्ट ठेवून चित्र काढणे वेगळे. अर्थात तेही कमी महत्त्वाचे नाही. पण डोक्यात एक विचार ठेवून चित्र काढणे हे किती कठीण असू शकते! विशेष म्हणजे, आपल्या डोक्यातील विचार चित्राच्या माध्यमातून जसेच्या तसे प्रकट करणे, नक्कीच कठीण बाब असावी. प्रतीक्षाचे चित्र पाहता, तिला ते सहज जमत असावे. किती सहज वाटतात तिचे चित्र. पण तितकेच खोल अर्थाचे.

तिचे स्त्रीविषयक चित्र कायमच माझ्या आवडीचे राहिले आहेत. प्रत्येक चित्रामागे एक प्रसंग आहे, विचार आहे, कल्पना आहे. तिच्याशी बोलताना अनेकदा काही किस्से तिने सांगितले सुद्धा आहेत. तेही खूप इंटरेस्टिंग आहेत. रंगांचा मुक्तहस्ताने वापर करत किती खोल शिरत जाते प्रतीक्षा. तिचा हर एक चित्र याची प्रचिती देत राहतो.

प्रतीक्षाने रेखाटलेली बहुतेक चित्र पहिली आहेत. एखादे प्रदर्शन भरवता येईल, इतकी तर नक्कीच झाली आहेत. तरी ती तिच्या पुरते ठेवते. माहित नाही का ते. पण ती सगळ्यांसमोर यायला हवीत, एवढेच माझ्यासारख्या मित्राला तिच्याकडून अपेक्षा आहे. तिने यावर विचार करावा. म्हणून हा जाहीर लेखनप्रपंच केला आहे.

प्रतिक्षाने रेखाटलेले निवडक चित्र इथे पाहायला मिळतील : https://www.facebook.com/pratiksha.choukekar.5/photos_all

आँधी हमारे बस में नहीं, मगर...



फेसबुक, ब्लॉग यांसारख्या माध्यमांचा प्रभाव सर्वश्रुत आहे. तरी अनेकांना शंका असतेच. त्यामुळेच ते इथल्या लेखनाला दुय्यम समजतात. मला ते पटत नाही. मध्यामात काम करत असताना, एवढे नक्कीच लक्षात आले आहे की सोशल मीडियाचा प्रभाव दखल घेण्याजोगा झाला आहे. कारण महिन्याकाठी किमान चार ते पाच तरी बातम्या सोशल मीडियातून आलेल्या असतात. इन शॉर्ट.. या माध्यमाचा प्रभाव आहेच.

इन जनरल न बोलता स्पेसिफिक माझ्यापुरते बोलून, ते जनरालाईज् करतो. म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते लक्षात येईल.

फेसबुक किंवा ब्लॉगवर लिहिताना मी कुठलेही विधान करताना उथळपणा टाळतो. एखादी पोस्ट लिहिल्यावर त्यातील एखाद्या मुद्द्यावर कुणी प्रश्न विचारला, तरी त्यावर स्पष्टीकरण देण्याची तयारी ठेवतो.

मागे मी रावते, पवार, मनसेवर लिहिलेले ब्लॉग हे कित्येक संदर्भ शोधून, चर्चा करुन लिहिले होते. कारण उद्या कुणी त्यातून आपल्याला खोडून काढू नये किंवा कुणी चूक दाखवली तर त्या मुद्द्याचा प्रतिवाद करता यावा.

माझी हुशारी वगैरे सांगण्याचा हेतू नाही. पण इथे गांभीर्याने लेखन केले जाते, हे कळावे म्हणून वरील उदाहरणे दिली. किंबहुना, मीच नव्हे, असे अनेकजण इथे सिरीयसली लेखन करतात. थोडक्यात या व्यासपीठावर सुद्धा जबाबदार लेखन केले जाते.

असे सारे असताना, सोशल मीडियावर (फेसबुक, ब्लॉग इ.) लिहिणारे वायफळ लिहितात, उथळ असते, त्यावर विश्वास ठेवू नये इत्यादी सरसकट विधाने जबाबदार लोकांनी टाळली पाहिजेत आणि या लेखनाकडे सुद्धा गांभीर्याने पाहिले पाहिजे.

मला या ठिकाणी आशुतोष जावडेकर यांचे एक विधान मुद्दाम नमूद करावे वाटते. ते म्हणतात, "सोशल मीडियातील लेखन म्हणजे साहित्याचे लोकशाहीकरण आहे." मला हे अगदी पटले आहे. इथे प्रत्येकजण व्यक्त होतो. ते चूक की बरोबर हा मुद्दा नंतर येतो. मुक्तपणे व्यक्त होता येणे, हे महत्त्वाचे. कदाचित आम्ही लिहितो ते 'अग्रलेखी' भाषेत नसेल, पण 'थेट' असते, एवढे नक्की.

सरते शेवटी तेच... व्यक्त होण्यासाठी प्रत्येक युगाचे, प्रत्येक पिढीचे एक माध्यम असते. आजच्या युगाचे, पिढीचे माध्यम सोशल मीडिया आहे, असे म्हणूया. ते स्वीकारले पाहिजे. त्यावर टीका करुन लिहिणाऱ्या मंडळींचे खच्चीकरण करु नये.

आणि हो, आमच्या लेखनाचा प्रभाव किती असेल माहित नाही. पण तरीही आम्ही लिहिणार, बोलणार आणि न पटलेल्या गोष्टींना धडका मारणारच. इथे शेवट करताना मला अझहर इनायती यांचा शेर आठवतो, त्यानेच शेवट करतो. या शेरमधून सोशल मीडियावरील लेखनामागची माझी किंवा माझ्यासारख्या अनेकांची भूमिका लक्षात येईल...
ये और बात कि आँधी हमारे बस में नहीं..
मगर चराग़ जलाना तो इख़्तियार में है..

स्टेप अप रिव्हॉल्युशन



कोणतीही चळवळ असो, तिला कलेची साथ मिळाली, तर तिची तीव्रता दसपटीनं वाढते. आणि एखाद्या चळवळीचं माध्यमच कला असेल, तर?.. तर मग चळवळीची उंची नक्कीच दखल घेण्यासारखी असते. याबाबत इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. 2012 साली प्रदर्शित झालेल्या 'स्टेप अप रिव्हॉल्युशन' या हॉलिवूडपटाचा विषयही असाच आहे आणि याच सूत्रावर आधारलेला आहे. मॉब डान्सच्या माध्यमातून आपली राहती वस्ती वाचवण्याचा यशस्वी लढा काही तरुण देतात.. त्यांची ही कहाणी.

आज वीक ऑफ होता, म्हणून यूट्यूबवर सर्च करताना, हा सिनेमा समोर आला. थोडा वेगळा वाटला म्हणून पाहत गेलो आणि खरंच एका मस्त विषयावर बनवलेला सिनेमा पाहता आला. हिंदीत डब केला गेलाय. त्यामुळे भाषेचा अडसर आला नाही. मोजून 99 मिनिटांचा सिनेमा आहे, त्यामुळे कंटाळवाणाही वाटला नाही.

मॉब डान्स हा सिनेमाचा विषय असला तरी त्यातील लव्ह स्टोरी, ड्रामा कमी नाहीय. मात्र त्यावर फार वेळ खर्च केला गेला नाही. विषयाला धरुन सिनेमा पुढे नेला जातो. त्यामुळेच कुठे कंटाळवाणं वाटत नाही.

दक्षिण अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांताच्या समुद्रकिनाऱ्यावर मियामी नावाचे शहर वसले आहे. या शहरात या सिनेमाचं कथानक फिरतं. इथल्या एका हॉटेलमध्ये काही तरुण काम करत असतात. डान्सची आवड असलेले हे तरुण ट्राफिक असो किंवा कुठला कार्यक्रम, तिथे मॉब डान्स करतात आणि व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करतात. त्यातून पैसे कमावणे हा हेतू असतो. सीन नामक तरुण त्यांचा मुख्य असतो.

पुढे सीन आणि त्याचे मित्र ज्या भागात राहतात, त्या म्हणजे मियामी कोस्टवर बिल अँडरसन नामक बिल्डारची नजर पडते आणि तिथे आलिशान हॉटेल बांधण्याची कल्पना त्याला सुचते. अर्थात, यात सीन आणि त्याच्या दोस्तांची राहती वस्ती जाणार असते.

ज्या मॉब डान्सचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करुन पैशासाठी वापर केला जायचा, त्याचाच या बिल अँडरसन विरोधात आवाज उठवण्यासाठी का वापर करु नये, अशी कल्पना सीनची गर्लफ्रेंड एमिली सुचवते. इथे थोडे इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ती म्हणजे, ही एमिली बिल्डर असलेल्या बिल अँडरसनची मुलगी असते. हे जेव्हा सीनच्या ग्रुपला कळते, त्यावेळी अर्थात थोडी वादाची ठिणगी पडते. मात्र तिथूनही थोडी खटापट होऊन पूर्ववत होतं. नंतर वस्तीत हॉटेल बांधण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम आखला जातो, तिथेच सीन आणि त्यांचा ग्रुप मॉब डान्स करुन त्या माध्यमातून आपली भूमिका मांडतात. आणि बिल्डर बिल अँडरसनला झुकायला भाग पाडतात. अशी थोडक्यात या सिनेमाची स्टोरी आहे.

'One step can change your World' अशी सिनेमाची टॅगलाईन आहे. ती किती नेमकी आहे, हे सिनेमा पाहिल्यावर लक्षात येते.

Ryan Guzman (सीन), Kathryn McCormick (एमिली), Peter Gallagher (बिल्डर बिल अँडरसन), Misha Gabriel (सीनचा मित्र) ही महत्त्वाची स्टारकास्ट. यापलिकडेही अनेकांच्या छोट्या-मोठ्या भूमका आहेत. त्याही अर्थात उल्लेखनीयच आहेत. स्कॉट स्पिर याने हा सिनेमा दिग्दर्शित केलाय.



कॅमेरा, एडिटिंग वगैरे गोष्टी कशा आहेत, यावर मी बोलणार नाही. कारण त्यातले मला कळत नाही. पण विषयाचे म्हणाल, तर एक उत्तम विषय आहे. स्टार्ट टू एन्ड कुठेही बोअरिंग वाटत नाही. सिनेमा यूट्यूबवर अव्हॅलेबल आहे. नक्की पाहा.

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...