18 May, 2020

प्रॅक्टिकल क्रांतिकारक

एक छोटासा प्रसंग सांगतो. इन्स्पिरेशनलही म्हणता येईल. एका ध्येयानं माणसाला किती पछाडावं आणि मोठ्या जिद्दीनं, कष्टानं ते कसं पूर्ण करावं, याचं हे छोटंसं उदाहरण.
दक्षिण गोव्यात वसलेलं काणकोण हे शहर. विसाव्या शतकाच्या सुरूवातील हे शहर विस्तारित गावंच होतं. इथं घडलेला १९१०-१९१५ सालाच्या दरम्यानचा हा प्रसंग.
काहीशा कामासाठी पैंगीणकर हा माणूस काणकोणच्या मामलेदार कचेरीत गेला होता. साहेब कामात असल्याचं सांगत तिथल्या कारकूनानं पैंगीणकरांना बाहेर वऱ्हांड्यात बसायला सांगितलं.
पैंगीणकर नम्र माणूस. ते बाहेर वऱ्हांड्यातल्या बाकावर बसले. तेवढ्यात आतून पोके प्रभू चोडणकर नावाचा कारकून बाहेर आला आणि म्हणाला, “पैंगीकरण, इथून उठ. तू कोण, कुठल्या जातीचा, याचा विचार न करता बाकावर बसलास. बाकावर बसण्याची तुझ्या जातीचा पात्रता नाही.”
पैंगीणकर संतापले. पण तिथं पर्याय नव्हता. ते तिथून उठले नाहीच. पण काम झाल्यानंतर तिथून निघताना पैंगीणकर म्हणाले, “पोके प्रभू, माझ्यात जर माणसाचं रक्त असेल, तर प्रतिज्ञा करतो. एक दिवस तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून माझे वंशज बसलेले मी पाहीन.”
मधल्या काळात पैंगीणकर या माणसानं समाजक्रांतीचं मोठं काम केलं. ते यथावकाश थोडक्यात पुढे सांगेनच.
पुढे १९६३ साली गोव्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून दयानंद बाळकृष्ण बांदोडकर म्हणजेच ज्यांना आपण भाऊसाहेब बांदोडकर म्हणतो, त्यांनी शपथ घेतली.
ही बातमी समजातच पैंगीणकरांचे डोळे पाणावले.
“अण्णा, रडताय?” कुणीतरी पैंगीणकरांना विचारलं.
ते म्हणाले, “हे आनंदाश्रू आहेत. काणकोणत्या कचेरीत पोके प्रभू नावाच्या कारकूनाला म्हटलं होतं, तुझ्या खुर्चीला खुर्ची लावून माझ्या समाजाचा वंशज बसवेन. आज खुर्चीला खुर्ची नव्हे, तर गोव्याच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदी माझ्या समाजाच माणूस बसलाय. आज पोके प्रभू जिंवत असता, तर त्याला मोटारीत टाकून नेला असता आणि बांदोडकरांचा शपथविधी दाखवला असता.”
हे पैंगीणकर म्हणजे देवदासी समाजाला जाचक अनिष्ट प्रथांच्या बेड्यांमधून मुक्त करणारे ‘राजाराम रंगाजी पैंगीणकर’
देवदासी म्हणजे देवळी समाज. घरातली एक स्त्री देवाला वाहिली जात असे. देवदासी म्हणत तिला. देवदासी कसली भोगदासीच. तत्कालीन ब्राह्मणांकडून तिचा केवळ वासनेसाठी वापर केला जाई. तिला होणाऱ्या मुलाबाळांना ना नाव दिलं जाई, ना घरच्या जमीनजमुल्यातला एक कण.
स्वत: राजाराम हा अशाच देवदासीच्या पोटी जन्मलेला मुलगा. त्याच्या नावाचा प्रसंग असाच अंगावर काटा आणणारा आहे.
वयाच्या दृष्टीनं लवकरच समज आलेला राजाराम फार हुशार होता. वाचनाची प्रचंड आवड. पुण्यात टिळक केसरी वृत्तपत्र काढत असल्याचं त्याला कळलं. त्यानं कसेतरी पैसे जमवून वृत्तपत्र मागवायचं ठरवलं. त्यासाठी मनीऑर्डर केली, पत्र पाठवलं.
काणकोणच्या पोस्टातून हा सर्व व्यवहार झाला. त्यावेळी राजारामनं पत्रात नाव लिहिलं, ‘राजाराम रंगाजी पैंगीणकर’.
कुणीतरी येऊन राजारामच्या आईला ज्यानं ठेवून घेतलं होतं, त्या बाप्पााला हे सांगितलं. तो भडकला. तातडीनं राजारामच्या घरी आला आणि म्हणाला, “माझं नाव यानं का लावलं, तोंड दाखवायला जागा ठेवली नाही यानं.”
बरीच वादावादी झाल्यानंतर राजाराम म्हणाला, “मी आईचं नाव लावलंय. देशावर गाणारीच्या नावामागे जी लावतात. म्हणून तुझं नाव रंगा आणि मागे जी लावलं – रंगाजी.”
त्यावर बाप्पा म्हणाला, मग आणखी एक जी लाव.
राजारामला त्यांचा टोमणा कळला. त्याला वाईट वाटलं. त्याला एवढी समज होती की, लहान मुलांनी शौच केली की त्याला ‘जीजी’ म्हणतात.
बापाचं नावही लावता येऊ नये, असला कसला हा समाज आणि असल्या कसल्या ह्या परंपरा, यानं राजाराम संतापला, रडला. त्याची आई सुद्धा हतबल होती. पण पुढच्या काळात याच रुढी-परंपार मोडीत काढण्यासाठी राजारामनं आयुष्यभर खास्ता खाल्ल्या.
देवदासी समाजात ‘शेंसविधी’ चाले. मुलगी अविवाहित राहून मंदिराची सेवा करत असे. भारतात अजूनही काही भागात हे चालतं. या विधीनुसार घराच्या चांगल्या, देखण्या मुलीला मंदिराला वाहिलं जाई. मंदिराला वाहिलं म्हणजे ब्राह्मणांच्या हवाली करत. तिला ब्राह्मण ठेवून घेत.
या आणि अशा प्रथांविरोधात राजाराम पैंगीणकरांनी लढा दिला आणि तत्कालीन पोर्तुगीज सत्ताधाऱ्यांकडून शेंसविधी प्रतिंबंधक कायदा मंजूर करून घेतला. यासाठी त्यांना अवघं आयुष्य खर्ची घालावं लागलं.
मुळात हा समाज गायनाच्या कलेचा. पण ती कला ब्राह्मणांच्या मनोरंजनासाठी असे. कर सुरू म्हटलं की गायचं, वाजव म्हटलं की तबला वाजवायचा असं. कलेला सुद्धा अनिष्ट प्रथांमध्ये जखडून ठेवलं गेलं होतं.
भाररत्न लता मंगेशकर, भारतरत्न एम एस सुब्बुलक्ष्मी, गानसरस्वती किशोरी अमोणकर इत्यादी बरीच नावं या समाजातलीच.
या समाजानं पुढे गोमंतक मराठा समाज, प्रागतिक मराठा समाज असं नाव धारण केलं. पण या समाजाच्या मुळाशी अनिष्ट प्रथा होत्या, किंबहुना त्या प्रथा लादल्या गेल्या होत्या. त्या प्रथांना उखडवून टाकण्याचं काम राजाराम रंगाजी पैंगीणकरांनी केलं आणि समाजातील कित्येकांना यशाची शिखरं बांधून दिली.
या लढ्याला खरी सुरूवात झाली ती, १९१० च्या आसपास.
२ ऑक्टोबर १९१० चं राजाराम रंगाजी पैंगीणकरांचं भाषण म्हणजे इथल्या जाचक व्यवस्थेच्या थोबाडीत मारलेली थप्पडच. त्या भाषणातील काही वाक्य इथे नमूद करावी वाटतात.
“आमचा समाज गुलाम बनलाय. लोकांसमोर वर बसण्याचादेखील आम्हाला दर्जा नाही. आमचा पुरूषवर्ग बायकांच्या जिवावर जगतो आणि बायक इतर समाजाच्या बटीक आहेत. आम्ही देवाची सेवा करतो. पण कोणच्या देवाची? ज्या देवावार किंवा देवळावर आपला काडीचाही आधिकार नाही, अशा देवीची. इतकेच नाही, तर देवळात चौकावर बसण्याससुद्धा आपल्याल जागा नाही? इतर समाजाच्या वासनेचे बळी ठरलेल्या आमच्या घरातील बायकांनाच दोष देतो. का? आमच्या आयाबहिणींना वाटत नसेल की, स्वत:चा संसार असावा? शेंसविधी करून देवाशी लग्न लावून भावनांचा चुराडा नाही का होत? वर दोष कुणाला, देहविक्री करतात म्हणत आमच्याच आयाबहिणींना. संसाराची स्वप्नं जळून गेलेल्या आमच्या आयाबहिणी चंचल कशा?”
राजाराम पैंगीणकरांचं हे धारदार भाषण देवदासी समाजाला जाचातून मुक्त करण्यासाठी घेतलेल्या पहिल्या सभेतलं.
या पुस्तकाच्या लेखिका अमित नाईक याच समाजातल्या. त्यांच्या आईनंही या यातना जवळून पाहिल्यात. त्या या पुस्तकाच्या मनोगतात म्हणतात, ते इथे नमूद करावे वाटते. आणि राजाराम पैंगीणकरांनी शेंसविधी बंद करून नेमके काय महानकार्य केले, हे या वाक्यातून समजून शकेल.
अमित नाईक म्हणतात, “मला वैयक्तिक पातळीवर घराणे म्हणावे, असा वारसा नाही. अर्थात, शोषितांना वैयक्तिक वारसा नसतो. पण त्यांना भरभक्कम सामाजिक वारसा असतो. राजाराम रंगाजी पैंगीणकर हा माझ्यासारख्या अनेकांचा अभिमानास्पद वारसा आहे.”
पुरुषसत्ताक आणि जातीसत्ताक पद्धतीच्या जोखडात अडकलेल्या स्त्रियांच्या मुक्ततेचा अखंड ध्यास घेऊन, तो तडीस नेणाऱ्या राजाराम रंगाजी पैंगीणकरांना मी ‘प्रॅक्टिकल क्रांतिकारक’ असंच म्हणेन.
या संपूर्ण चळवळीदरम्यान अनेकदा दोन पावलं मागे येण्याची त्यांना वेळ आली, कधी माघार, तर कधी नमते घेण्याचीही वेळ आली. ते कधीच आदर्शवादी भूमिकेत राहिले नाहीत. मानवी हक्क आमच्या समाजाला मिळाले पाहिजेत, एवढेच त्यांनी पाहिले.
माझा मित्र अरविंद गजानन जोशी याची ‘अजात’ डॉक्युमेंट्री पाहिल्यानंतर गणपती बाबा यांच्या क्रांतिकारी कार्याबद्दल माहिती कळाली आणि त्यावेळी जसा मी हादरून गेलो होतो. तसाच अमिता नाईक यांचं ‘गोष्ट पैंगीणकरांच्या संघर्षाची’ हे पुस्तक वाचून हादरलो. पैंगीणकर या माणसानं उभारलेला आणि यशस्वीरित्या ध्येयोपर्यंत नेलेला लढा हा केवळ या समाजापुरता नसून, अमर्याद प्रेरणादायी आहे.

16 May, 2020

‘शारदाबाई’ नावाचं रानफुल



एका मुलाचा ढिगाऱ्याखाली सव्वा वर्षाचा असताना डोळ्यांदेखत मृत्यू, काही वर्षांनी आणखी एका मुलाचा दोन महिन्याचा असताना मृत्यू आणि त्यानंतर आणखी काही वर्षांनी तिसऱ्या मुलाचा हातातोंडाशी आला असताना ऐन पस्तीशीत खून… अशा एखाद्या आईवर डोंगर कोसळवणाऱ्या घटना.

यातूनही स्वत:ला सावरत एक बाई जिद्दीनं शिकते, लोकल बोर्डात सलग १४ वर्षे सदस्य राहते, वेगवेगळ्या कमिट्यांचं नेतृत्व करते, शेती करते, अकरा-बारा मुलांना प्रसंगी अंगावरचे दागिने विकून शिकवते… हे कुणालाही स्वप्नवत वाटावं असं जगणं आहे – ‘शारदाबाई गोविंदराव पवार’ – या बाईचं.

या पुस्तकात एक वाक्य आहे - ‘काळोखातून चंद्रकोर प्रकट व्हावी, कलेकलेनं ती वाढत राहावी आणि एकेदिवशी तमाम सृष्टीनं पौर्णिमा अनुभवावी’. शारदाबाई गोविंदराव पवार या बाईचं आयुष्य हे नेमकं याच वाक्याचं जिवंत उदाहरण आहे.

खूप दिवसांपूर्वी ‘लोक माझे सांगाती’ हे शरद पवारांचं आत्मचरित्र वाचलं होतं. भारावून गेलो होतो. सतत पन्नास वर्षे राज्य आणि देशाच्या राजकारणाचा सक्रीय भाग राहणं आणि तेही अवघ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आपल्या चाली-चितपटांकडे लावून ठेवणं, हे सहजसोपं काम नाहीय. स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकीय परिघात हे फारच क्वचित नेत्यांना जमलं असावं. पण हे शरद पवार इतक्या उंचीवर का पोहोचले, याचं कारण ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात नसून, ‘शारदाबाई गोविंदराव पवार’ या सरोजिनी नितीन चव्हाण लिखित चरित्रात आहे.

शारदाबाई आणि गोविंदराव पवार

शरद पवार कळण्यासाठी आधी त्यांची आई समजून घेणं गरजेचं आहे. शारदाबाईचं चरित्र वाचल्यानंतर शरद पवारांनी केलेल्या पुढच्या डोंगराएवढ्या कामाचं विशेष नवल वाटत नाही. कारण ज्या वटवृक्षाचा पाया इतका भरभक्कम असेल, त्यानं आभाळभर पसरणं ओघानं आलंच.

कोल्हापूरमध्ये जन्मलेल्या शारदाबाईंचं समज येण्याआधीच पितृछत्र हरपलं. पुढं मोठ्या बहिणीचे पती काकासाहेब जाधव यांच्याकडे आई, स्वत: शारदाबाई आणि लहान भाऊ असे राहायला गेले. पितृछत्र हरपल्यानंतर मोठ्या बहिणीकडे राहावयास जाण्याची शारदाबाईंच्या आयुष्यातील ही घटना इथं नमूद करण्याचं कारण महत्त्वाचं आहे.

काकासाहेब जाधव हे राजर्षि शाहू महाराजांच्या सहवासात वाढलेले. त्याच विचारांचे. अशा माणसाच्या छत्रछायेखाली शारदाबाई आई-भावासोबत राहण्यास आल्यानंतर पुरोगामी विचारांचा वारा लागणार नाही, असं कसं होईल? शारदाबाईंच्या जडणघडणीत आणि एकूणच वाटचालीत मोलाचा वाटा राहिला तो काकासाहेब जाधवांचा. राजर्षि शाहूंच्या विचारांच्या काकासाहेबांनी शारदाबाईंच्या शिक्षणासाठी यशस्वी प्रयत्न केले.

पुढे पुण्यात आल्यांतर रमाबाई रानडेंच्या ‘सेवासदन’मध्ये खऱ्या अर्थाने तल्लख बुद्धीच्या शारदेला ज्ञानाची कवाडं उघडी झाली. आपण समाजापोटी काहीतरी करायला हवं, याची जाणीव रमाबाईंसारख्या विशाल हृदयी व्यक्तीच्या सहवासात आल्यानंतर लक्षात आलं.

पवार कुटुंबीयांचं काटेवाडीतील घर

काकासाहेबांमुळं राजर्षि शाहूंच्या पुरोगामी विचारांचा वसा आणि रमाबाईंमुळे समाजपयोगी कामांचा धडा – हे सर्व आत्मसात करून शारदाबाईंनी पुढे आपली वाटचाल केली.

पितृछत्र हरपलं म्हणून खचून न जाता, प्रवासात मदतीला आलेल्या प्रत्येकाच्या सहकार्यानं आणि स्वत:च्या अफाट इच्छाशक्तीच्या बळावर शारदाबाई राजकारणात उतरल्या. आजच्या जिल्हा परिषदेचं तेव्हाचं रूप असलेल्या लोकल बोर्डात पुणे जिल्ह्याच्या सदस्या झाल्या. वेगवेगळ्या कमिट्यांवर गेल्या.

पोटात सहा-सात महिन्यांचं बाळ घेऊन बारामती ते दौंड आणि दौंड ते पुणे असा रेल्वेनं प्रवास करत शारदाबाई बोर्डाच्या बैठकांना हजेरी लावत. बांधकाम, शेती, शिक्षण अशा विविध समित्यांवर त्यांनी तत्कालीन परकीय सत्तेतही लोकोपयोगी कामं केली. या सगळ्या कामात गोविंदराव पवार या माणसाच्या हातभार आणि आधाराचाही अनुल्लेख करता येणार नाही.

शारदाबाई लोकल बोर्डात बिनविरोध निवडून गेल्यानंतरची बातमी

गोविंदरावांनी शारदाबाईंना दिलेल्या स्वातंत्र्यामुळं कदाचिते हे सर्व शक्य होण्यास सोपं झालं असावं. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुजन समाजातील कुणी बाई अशी शिकते, लोकल बोर्डात जाते, सगळ्या मुलांना हवं तेवढं शिकवते, हे कल्पनावत होतं. पण गोविंदरावांच्या पाठिंब्यांनं आणि जिद्दीनं शारदाबाईनं ते केलं.

केवळ वैयक्तिक प्रगती नव्हे, तर समाजाला आपल्या कामाचा आणि आपल्या कामातून मिळणाऱ्या संदेशाचा कसा उपयोग होईल, हेही बाईंनी पाहिलं. मग ते भूतानं झपाटलेल्या घरात राहून अंधश्रद्धेला मी जुमानत नाही, हे तत्कालीन काहीशा प्रतिगामी वातावारणाला ठामपणे सांगू पाहणं असो किंवा डोक्यावरचा पदर खाली पडू न देण्याच्या त्या काळात पदर कंबरेला खोचून टांगा चालवणं असो… शारदाबाई म्हणजे विलक्षण होत्या.

आपल्या सर्व मुलांना आणि मुलींनाही त्यांनी शिकवलं. संस्कार दिले. महाराष्ट्राच्या खेड्यांमध्ये राहून शारदाबाई या विदुषीनं देशाला हिमालयाशी स्पर्धा करणारी मुलं दिली, हे या पुस्तकातील वाक्य किती यथोचित आहे हे लक्षात येतं. आणि हेही खरंय की, मुलांना शिकवत असताना, संस्कार देत असताना, बाईंनी प्रत्येक मुलाच्या गंधमय वेगळेपणाला हिरावून न घेता फुलू दिलं.

शारदाबाई आणि गोविंदराव पवार

खरंतर शरद पवार नव्हे, तर शारदाबाई या पवार कुटुंबातील पहिल्या राजकारणी. त्यांनी लोकल बोर्डात काँग्रेसचा आधार घेतला, मात्र त्यांची बिजं लढवय्यी शेतकऱ्याची होती. कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेधे अशा मंडळी पवारांच्या घरात येत-जात असतं. पुढे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाल्यानंतर बाई वैचारिकदृष्ट्या या पक्षाच्या जवळ गेल्या. पण काँग्रेसच्या विचारांच्या शरद पवारांना त्यांनी कधी अडवणूक केली नाही.

मात्र, शेकाप आणि काँग्रेसबद्दल बाईंनी नमूद केलेलं मत आजही विचार करण्याजोगं आहे. त्या म्हणत, “काँग्रेसप्रणित समाजवादी समाजरचना तळागातल्या जनतेला कसा न्याय मिळवून देईल? सध्याचा काँग्रेसप्रणित समाजवाद हा आधी समृद्धी, नंतर वाटप असा आहे. तो मला पटत नाही. काँग्रेसला समाजवादी समाजरचना निर्माण करण्याचे कार्य करावयाचे असेल, तर काँग्रेसही प्रथम श्रमजीवी, शेतकरी, कामगार व गरीब मध्यमवर्ग यांचा विश्वास संपादन करणारी असली पाहिजे, तर संपत्तीच्या वाटपामध्ये गरिबांना आधी न्याय मिळेल आणि त्यातून खऱ्या अर्थाने एकसंध समाजाची निर्मिती होऊ शकेल.”

बाईंच्या या वाक्यातून त्यांच्यावरील केशवराव जेधे, कर्मवीर अण्णा, राजर्षि शाहू यांच्या विचारांचा पगडा स्पष्टपणे दिसून येतो.

मात्र, असं असलं तरी त्यांनी शरद पवारांच्या राजकीय विचारांना विरोध केला नाही. शरद पवार १९६७ साली ज्यावेळी पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले, तेव्हा अनंतराव पवार (अजित पवार यांचे वडील) यांनी शरद पवारांच्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यावेळीही शारदाबाईंनी अनंतरावांना आधाराच दिला. आपली विचारसरणी त्या आड आणली नाही.

अनंतराव पवार (अजित पवारांचे वडील) अगदी शरद पवारांसारखे दिसत..

विचारांच्या दृष्टीनं काळाच्या कितीतरी पुढे असलेली बाई, शेतकरी-बहुजन समाजाच्या मदतीसाठी एका पायावर तयार असलेली बाई, घरदार सांभाळताना राजकारणात झोकून देऊन काम करणारी बाई… काळ, प्रवास सर्व उलट दिशेनं वाहत असतानाही धीर न ढळू देता, प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर शारदाबाईनं आकाश ठेंगणं करून दाखवलं.

बाईंच्या विचार आणि कृतीमध्ये किती ताकद होती, हे त्यांच्या पोरा-बाळांनी विविध क्षेत्रात घेतलल्या भराऱ्यांमधून दाखवूनही दिलंय. बीज दमदार असेल, तर वृक्ष चांगलाच फोफावतो – हे याच पुस्तकातील शेवटचं वाक्य याचा सार आहे.

या लेखाचा शेवट करताना याच पुस्तकाच्या सुरूवातीच्या काही ओळी मुद्दाम इथे नमूद करेन. खरंतर शारदाबाईंचं आयुष्य काय होतं, हे या चार-पाच ओळीतून स्पष्ट होईल.

अनेक रानफुळे अतिशय सुवासिक असतात. तथापि, ती रानातच उमलतात, फुलतात. आपला आसमंत सुगंधाने दरवळून टाकतात आणि तेथेच कोमेजूनही जातात. समारंभाच्या व्यासपीठापर्यंत ती पोहोचण्याची शक्यताही नसते. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्या अशा फुलांची समाजाला फारशी माहितीही होत नाही. शारदाबाईंची व्यक्तिरेखा या रानफुलासारखीच.

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...