28 June, 2017

आकाशच्या इंटरकास्ट लग्नाची गोष्ट

आता जवळपास महिना व्हायला आलाय आकाश आणि निकिताच्या लग्नाला. या दोघांच्या लग्नाचा प्रसंग थरारक आहे. लग्नाचा दिवस तर विसरुच शकत नाही. मुळात थेट लग्नाचा प्रसंग सांगण्याऐवजी एकंदरीतच बॅकग्राऊंड सांगण्याची गरज वाटते. थोडी लांबलचक वगैरे पोस्ट होईल.. पण ठीकंय. खूप दिवस लिहीन म्हणत होतो. पण राहत होतं. म्हणून लिहितोच.

कॉलेजच्या काळापासून, विशेषत: डिग्रीच्या फर्स्ट ईयरपासून एक मित्र अधिक जवळचा होता. तो म्हणजे आकाश लोणके. मी पार्ल्यातल्या विमानतळाजवळील झोपडपट्टीत राहायचो आणि आकाश तिथेच पुढे आंबेडकरनगरमध्ये. कॉलेजला येणं-जाणं सोबत. पुढे आणखी एक मित्र जोडला गेला, तो म्हणजे राजेश पाटील. आता असे एकूण तीन मित्र झालो. अगदी जिगरी.

कॉलेजमध्ये अनेक खाच-खळग्यांच्या दिवसात आकाश, राजेश आणि मी एकमेकांना मदतीचा हात देत राहिलो. अगदी कोणत्याही अपेक्षेविना. अर्थात खऱ्या मैत्रीत अपेक्षा नसतेच. अगदी तसंच. पुढे कॉलेज संपलं आणि आम्ही आपापल्या कामाच्या शोधात निघालो. मध्यंतरी आकाश 'मुंबई मित्र'ला कामाला लागला, मी एबीपी माझात. राजेशच्या जॉबचं काही झालं नाही. कारण त्याच्या घरीच असंख्य प्रॉब्लेम सुरु होते. तर एकंदरीत तिघेही आपापल्या कामात, अडचणींमध्ये व्यस्त होतो. बोलणं-चालणं-भेटणं सुरु असायचं.
( फोटो : कोर्टात लग्नाची प्रोसेस पूर्ण करुन आल्यानतंर पोलिस स्टेशनला जाण्याआधी रेस्टॉरंटमध्ये जेवताना एकीकडे - निकेतन भोसले, राजेश पाटील आणि मी... तर दुसरीकडे - आकाश आणि निकिता )
तिघांबाबत एक अत्यंत वाईट योगयोग आहे. तिघांच्याही वडिलांचे छत्र हरपलंय. म्हणजे आकाशाचे वडील वारले, त्याच्या दोन वर्षांनी माझे आणि नंतर दोन वर्षांनी म्हणजे गेल्या वर्षी राजेशचे. तिघेही आपापल्या जागी स्थिरावण्याच्या प्रयत्नात होतो. त्यातले मी आणि आकाश कामाच्या बाबतीत बऱ्यापैकी स्थिरावलोही. राजेशची हेळसांड अधिक होते. अगदी आजही. त्याच्या पप्पांच्या आजारपणाच्या काळात त्याने खूप सोसलंय. त्याने खूप चढ-उतार पाहिलेत.

दरम्यानच्या काळात तिघांचं भेटणं सुरुच होतं. बोरिवलीच्या 'लाजरी' बारमध्ये किंवा पार्ल्याच्या 'शिवलीला' बारमध्ये अनेक संध्याकाळ घालवल्यात. (तिघांपैकी कोण पितो, हे विचारु नका). अशी एकंदरीत आमची मैत्री. माझ्यासाठी तर हे दोघे जीवाभावाचे आहेत. मुळात तिघेही एकमेकांसाठी महत्त्वाचे. कुठल्याही अडचणीत सोबत असतोच. आधार म्हणून. फक्त एकमेकांना हाक मारायची. बस्स. असे मित्र मिळणं खूप नशीब लागतं. खूप.

आता मुद्द्यावर येतो. खूप दिवस बोलणं नाही झालं. म्हणून राजेशला 10 की 11 मे रोजी फोन केला. म्हटलं, "किधर है पाटील? जिंदा है ना? कब मिल रहा है?"... राजेश म्हणाला, 'ते सर्व सोड... आकाश शादी कर रहा है.. 30 जून को.. तू पण ये.. बाकी का उसको फोन लगा के बात कर'.

आकाश लग्न करतोय आणि आपल्याला माहित नाही, असं कसं कसं शक्यय. थेट आकाशला फोन केला आणि विचारलं. तर म्हणे, "हो.. रे. शादी कर रहा है. लेकीन थोडा प्रॉब्लेम है.. लडकी के घरवाले तयार नहीं है.".. म्हटलं, हे काहीतरी वेगळं प्रकरण दिसतंय. मग आकाशकडे नीट चौकशी केली. तेव्हा कळलं, मुलगी (निकिता) उत्तर प्रदेशातली आहे. जातीने ब्राम्हण आहे. आणि आमचा आकाश महार. (मला ही जात वगैरे सांगायची नव्हती, पण त्याचं संदर्भ पुढे स्पष्ट होईलच.)

माझ्या डोक्याचा भुगाच झाला. म्हटलं ब्राम्हण आहे म्हटल्यावर विरोध तर होणारच होता. आकाशला फोन केला आणि विचारलं, "काय करायचं ठरवलंयेस?".. तर म्हणे, "पळून लग्न करणार. निकिता तयार आहे. कुछ प्रॉब्लेम नहीं आएगा"... तरी मला काही सूचत नव्हतं. पुन्हा आकाशला विचारलं, "निकिता ऐनवेळी पलटणार नाही ना? पोलिसांसमोर ती रडली, तरी तू गोत्यात येशील. कारण ती शेवटपर्यंत निर्णयावर ठाम राहायला हवी."... तेव्हा मग आकाशने सांगितलं की, ती देईल साथ वगैरे किंवा पलटणार नाही वगैरे. मग आम्हालाही धीर आला. म्हटलं, जे होईल ते होईल.. बघू काय ते.

30 मे रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मुंबईतील खारच्या कोर्टात गेलो. सोबत निकेतन भोसले, राजेश पाटील होतेच. म्हणजे आता कोर्टात मी, राजेश, निकेतन, आकाश आणि निकिता असे एकूण पाच जण होतो. आकाशच्या वकिलाने सांगितल्याप्रमाणे पॅनकार्ड आणि आधारकार्ड घेऊनच आलो होतो. तीन साक्षीदार लागतात म्हणून आम्ही तिघे मित्र. लग्नाची प्रोसेस पूर्ण झाली. कोर्टाच्या बाहेर आलो.

खरंतर लग्नाची प्रोसेस फार कठीण नव्हती. मात्र आता यापुढे सर्व कठीण दिसत होतं. आकाशचा तर चेहराच उतरला होता. राजेशही मला हळूच म्हणाला होता, पोलिसांसमोर निकिता नीट बोलायला हवी, नाहीतर आपले सर्वांचेच लागतील. पण मला आकाशचे शब्द आठवत होते. आकाश म्हणालेला, निकिता नाही घाबरणार, ती धाडसाने बोलेल वगैरे. आणि आकाशवर माझा पूर्ण विश्वास होता.

आम्ही कोर्टाखाली आल्यावर ठरवलं, चला सेफ्टीसाठी आता पोलिस एनसी करायची. म्हणजे पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. पण थोडी भीती मनात होती. ती म्हणजे पोलिस निकिताला हजार प्रश्न विचारणार. त्यात तिला मराठी नीट जमत नाही. ती कुठे अडखळली आणि घाबरली तर पोलिस पटकन निगेटिव्ह होतील. त्यात एका पत्रकार मित्राला फोन केल्यावर कळलं की, पोलिसांकडे गेल्यावर ते निकिताच्या आई-वडिलांना बोलावतील. आता तर मलाही भीती वाटायला लागलेली. पण चेहऱ्यावर भीती दाखवून काहीच उपयोग नव्हता. कारण आकाशच्या चेहऱ्यावर आधीच काळजी दिसत होती. त्यात आपणही घाबरलेलो दिसलो, तर मग बट्याबोळच सगळा.

म्हटलं, चला... जो होगा देखा जाएगा. राजेश पाटील आणि निकेतन भोसले बाईकवरुन विलेपार्ल्याला पोहोचले. मी, आकाश आणि निकिता ट्रेनने पार्ल्याला आलो. पार्ला स्टेशनबाहेर 'आरके' हॉटेलमध्ये जेवण केलं आणि रिक्षाने एअरपोर्ट पोलिस स्टेशनला निघालो. पोलिस स्टेशनला जाईपर्यंत पार वाट लागली होती. काय होईल माहित नव्हतं. पण तरीही हसता चेहरा ठेवणं भाग होतं.

अखेर दुपारी पोलिस स्टेशनला पोहोचलो. थोडी भीती वाटत होती. पण आकाश के लिए कुछ भी.... म्हणून निर्धास्तही होतो. दोस्तासाठी काय होईल, ते बघू. बिनधास्त राहायचं, हे राजेश, निकेतन आणि मी तिघांनीही मनोमन ठरवलेलं.

गेल्या गेल्या पोलिसांना सांगितलं, कोर्ट मॅरेज केलंय. पण निकिताच्या घरी माहित नाही. निंबाळकर करुन इन्स्पेक्टर होते तिथे. अत्यंत समजूतदार माणूस. तेच म्हणाले, "काळजी करु नका. बसा त्या बाकड्यावर.".. आम्हा पाचही जणांच्या चेहऱ्यावरील टेन्शन त्यांनी ओळखलं असावं. निंबाळकरांनी त्यांच्या हवालदाराला सांगितंल, "त्यांना पाणी द्या."... पाणी वगैरे प्यायल्यानंतर त्यांनी आकाशला उठवलं आणि सटासट प्रश्नांची सरबत्ती केली. काय करतो, कधीपासून प्रेम होतं, कधीपासून ओळखता, तुझ्या घरी कोण असतं, तिच्या घरी कोण असतं, तुझं वय काय, तिचं वय काय..... वगैरे वगैरे. आकाश भांबावून गेल्याचं मला लक्षात आलं.

मी उठलो. निकेतन बाकड्यावर बसला होता. निकेतनमुळे खूप आधार वाटत होता. कारण त्यानेही चेहऱ्यावर अजिबात टेन्शन असल्याचे दाखवलं नाही. राजेश पोलिस स्टेशनच्या पायऱ्यांवर बाजूला बसला होता. तर मी उठलो आणि निंबाळकरांच्या समोर गेलो. मला म्हणाले, तू कोण आहेस.. म्हटलं, "नामदेव अंजना. आकाशाच मित्र आहे. एबीपी माझात काम करतो.".. तर म्हणे, "आयडी दाखव,".. संध्याकाळी शिफ्टला यायचं होतं म्हणून आयडी सोबतच होता. आयडी दाखवला. त्यात आकाशही पत्रकारच. फक्त त्यावेळी त्याच्याकडे आयडी नव्हता. पण पत्रकार म्हटल्यावर त्यांचं आमच्याशी बोलण्याची शैलीच बदलली. तसेही ते अत्यंत चांगले वागत होते. पण बाकी गोष्टीतही खूप मदत झाली.

पोलिसांनी जबाब नोंदवायला सुरुवात केली. अर्थात निकिताचा. मुलाच्या म्हणण्याला यावेळी काही अर्थच उरत नाही. निकिताकडून त्यांनी सारं लिहून घेतलं. कुणी दबाव आणला नाही ना वगैरे. निकिताही तोपर्यंत निर्धास्तच होती. त्यामुळे तिने न घाबरता सर्व माहिती सांगितली, सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. एक टप्पा पार केला. त्यामुळे आम्हा सर्वांच्याच जीवात जीव आला. पण पिक्चर अभी बाकी था...

पोलिसांनी प्रोसेसप्रमाणे निकिताकडून तिच्या आई-पप्पांचा फोन नंबर घेतला आणि कॉल केला. तिचे पप्पा कुठेतरी बाहेर होते. आईला फोन लागला. तिला पोलिसांनी बोलावून घेतलं. आता तर राजेश, निकेतन आणि माझी थोडी काळजी वाढली होती. आणि आकाशच्या चेहऱ्यावरील टेन्शन तर लख्खपणे दिसत होतं.

त्यात एक गोष्ट चांगली घडली, पार्ल्याचे शिवसेना शाखाप्रमुख नितीन डिचोलकर तिथे आले होते. डिचोलकरांना पार्ल्यात असल्यापासून ओळखत होतो. हनुमान रोडच्या गोकूळ कट्ट्यावर चहा प्यायला रोज संध्याकाळी तिथे असतात. प्रकरण जास्त टोकाला वगैरे गेलं तर आधार म्हणून डिचोलकर असल्याने बरं वाटलं.

काही वेळाने पोलिस ठाण्याच्या आवारात मोठ्याने आवाज करतच निकिताची आई, आजी, भाऊ, काका आणि एरियातले काहीजण आले. झुंबडच्या झुंबड आली आणि आम्ही फक्त पाच जण होतो. बारीक पोरं असल्यागत. राजेश, निकेतन, मी आणि आकाश-निकिता. काय मोठं झालं, तर आमच्या नाकीनऊ येणार होते.

निकिताची आई पोलिस स्टेशनमध्ये आली, ती थेट आकाशच्या अंगावरच. आम्ही बाकड्यावर बसलो होतो. निकेतन आणि मी मध्ये उभं राहिलो. आणि एक पोलिस हवालदारही आमच्यासोबत होते. त्यामुळे तिची आई पुढे आली नाही. थोडी झटापट झाली. पण फार मोठं काही झालं नाही.

पोलिसांनी त्या सर्वांना बाहेर नेलं आणि आम्हाला आधार दिला. ते निंबाळकरच म्हणाले की, "टेन्शन घेऊ नका. मी समजावतो त्यांना. तिची आई आहे म्हटल्यावर हायपर होणारच.".. मुळात एवढा राडा होणार, हे आम्ही गृहित धरलेलंच. पण पोलिसांच्या नकळत निकिताची आजी पुन्हा रागाच्या आवेशात पोलिस स्टेशनमध्ये घुसली आणि थेट आकाश आणि निकिता जबाब नोंदवत बसलेल्या दिशेने गेली. मोठ्या आवाजात आकाशकडे हात रोखून म्हणाली, "तुझे ये भीमवालाही मिला क्या? हम ब्राम्हण है, ये तो याद रखना था.. मेरी बच्ची होती तो काट डालती."... हे ऐकून माझं तर डोकंच फिरलं.

एकतर जीवाभावाचा दोस्तय. त्याला उद्देशून असं काही ऐकून घेताना भयानक राग आला होता. आम्ही बसल्या जागेवरुन तडकन् उठलो. तेवढ्यात पुन्हा पोलिसांनी आम्हाला रोखलं. म्हणाले, आम्ही त्यांना बाहेर काढतो. हायपर झालेत ते. शिवाय, 'काट डालती' वगैरे बोलल्याने पोलिसही निकिताच्या आजीवर संतापले आणि तिला थेट बाहेर काढलं.

ते लोक पोलिस स्टेशनच्या आवारातच काही वेळ बसले होते. आम्हीही काही वेळ तिथेच बसून राहिलो. पोलिस स्टेशनच्या आवारात आहोत, तोपर्यंत सेफ आहोत, हे माहित होतं. कारण हे ब्राम्हण असले, तरी डोक्याने गेलेली माणसं आहेत. हे लोक काही करु शकतात, हे माहित होतं. म्हणून रिस्क नको म्हणून अर्धा तास पोलिस स्टेशनलाच बसलो. मग निकिताचे घरचे थोड्या वेळाने निघून गेले. मग आम्हीही निघालो....

पोलिस स्टेशनच्या बाहेरुनच रिक्षा पकडली आणि विलेपार्ले स्टेशनला जाण्याऐवजी थेट अंधेरी स्टेशनला रिक्षा नेली. पार्ला स्टेशनला निकिताचे लोक असले तर प्रॉब्लेम नको म्हणून. तेवढं बरं त्यावेळी डोक्यात आलं. कारण आधीच निकिताच्या आजीमुळे डोक्याचा भुगा झाला होता. अखेर सर्व संकटं पार पडली.

आकाश आणि निकिताचं चार-पाच वर्षांचं प्रेम होतं. अखेर दोघेही आयुष्याचे सोबती झाले. आकाश माणूस म्हणून ग्रेट आहे. तो निकिताला आनंदात ठेवेल, यात मला तीळमात्र शंका वाटत नाही. तो मेहनती आहे, जबाबदार आहे, जाणीव असलेला आहे.. त्यामुळे त्याच्यासाठी कोणतीही रिस्क घ्यायला काही वाटत नाही.

शेवटी एकच..... सर्व नीट झालं असलं तरी निकिताच्या आजीचं वाक्य अजूनही डोक्यात घिरट्या घालतंय. 'हम ब्राम्हण है... तुझे ये भीमवालाही मिला क्या?', हे वाक्य काळजाला टोचलंय. दोन्ही बाजूंनी या वाक्याचा त्रास होतो. एकतर माझ्या मित्राला ती असं म्हणाली. साला आम्ही मैत्रीत कधी जात आणली नाही आणि हे तर थेट जातीवरच बोट ठेवत होते. पण प्रकरण सेन्सिटिव्ह होतं म्हणून गप्पच बसणं पसंत केलं. आणि दुसरं म्हणजे कुठल्या मानसिकतेत अजून ही मंडळी वावरतात राव? कधी निघणारेत हे जातीच्या चौकटीबाहेर?

बरं आमच्या आकाशने रितसर तिच्या घरी मागणीही घातली होती. त्यांनी त्याला पाहून होकारही दिला होता. पण जात आडवी आली. 'जात' जाता जात नाही, ती अशी. ते तथाकथित उच्चजातीतले ना.. मग आमचा आकाश कसा त्यांना चालेल?

असो. आकाश आणि निकिताच्या संसाराला दोन-चार दिवसात महिना होतोय. दोघांच्याही सुखी संसाराला खूप खूप शुभेच्छा.

17 June, 2017

डेन्जर गांधी


गांधी हा प्राणीच डेन्जर होता. 
त्याला वगळून पुढे जाताच येत नाही.



गांधी मेला नाही. 
गांधी मरणारही नाही.
मुळात गांधी मरतच नाही.



इकडे गांधी तिकडे गांधी
जिकडे तिकडे गांधीच गांधी

काँग्रेसच्या पोस्टरवर गांधी
मोदींच्या भाषणात गांधी
केजरीवालच्या टोपीवर गांधी
अण्णांच्या उपोषणात गांधी
हाॅलिवूडच्या पिक्चरात गांधी
पोंक्षेच्या नाटकात गांधी
वर्ध्याच्या आश्रमात गांधी
आश्रमातल्या विश्रामात गांधी

इकडे गांधी तिकडे गांधी
जिकडे तिकडे गांधीच गांधी.



कुणाला पक्षाच्या बॅनरवर गांधी हवा असतो.
तर कुणाला स्वच्छतेचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून.
कुणाला विचारांसाठी, तर कुणाला टीकेसाठी.
कुणाला वैचारिक खाद्य म्हणून हवा असतो.
तर पोंक्षेंसारख्यांना पोटापाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी.
कारण काहीही असो. 
गांधी लागतोच.



किती आले किती गेले. 
काहींनी जमेल तितकी जमेल तशी बदनामी केली.
तर काहींनी हव्या तेवढ्या हव्या तशा शिव्या दिल्या. 
काहीजण टकळ्या म्हणाले.
काहीजण उघडा म्हातारा म्हणाले.
काल-परवा तर कुणीतरी देशद्रोही म्हणाले.



एवढ्या टीकेनंतरही गांधी मिश्किल हसतो.
या म्हाताऱ्याच्या मनात राग कधीच नसतो.



जिथे जन्मला गांधी, तिथेच हरला गांधी. 
जिथे लढला गांधी, तिथे कणभर उरला गांधी. 
पण सातासमुद्रापार मना-मनात शिरला गांधी.



आईनस्टाईनला विश्वास बसेना, कुणी होता गांधी!
मंडेलाचा तर आदर्श ठरला गांधी!
ओबामाचा तर संघर्ष बनला गांधी!
बच्चा खान तर स्वत:च झाला गांधी!



इकडे गांधी तिकडे गांधी
जिकडे तिकडे गांधीच गांधी



- नामदेव अंजना

हे भयंकर अस्वस्थ करणारं चित्र आहे!

इंग्लिश शाळांच्या पिवळ्या धमक बस सक्काळ-सक्काळ धावतात नुसत्या. इकडून तिकडे, तिकडून इकडे. कुठल्यातरी फूटपाथवर किंवा दुकानाच्या आडोशाला डोळे चोळत बसलेली चिमुरडी आपापल्या गाडीच्या रस्त्याकडे नजर रोखून असतात, गाडी लवकर येऊ नये या तीव्र इच्छेने.

जन्मठेपेची शिक्षा भोगायला जाणाऱ्या एखाद्या कैद्याच्या चेहर्‍यावरील एक्स्प्रेशन्ससारखे चिमुरड्यांचे चेहरे. कधीतरी ही सारी चिमुरडी शाळांविरोधातच उठाव करतील, असं वाटून जातं.



मग गाडी येते तेव्हा नजर रोखून बसलेले चेहरे आणखी उदास होतात. जगणंच नकोसं झालेल्या माणसासारखे भासतात. त्या पिवळ्या धमक बसमधली मदतनीस खाली उतरते आणि एखाद्या जेलरप्रमाणे चिमुरड्यांना गाडीत भरते. आणि दरवाज्यातच उभी राहते पुढच्या कैद्यांना शोधत.

दहा-पंधरा जणांच्या घोळक्यातला एखादाच चिमुकला गाडीच्या इमर्जन्सी एक्झिट विंडोतून आपल्या बेन्चमेटला पाहून हसत हसत हात दाखवतो. अगदी एखदाच. बाकी सारे शाळेचे कैदीच जणू.

हसत-खेळत शिकवण्यापेक्षा, शिकण्याची आवड निर्माण करण्यापेक्षा जबरदस्तीने उत्तरं कोंबली जातायेत डोक्यात. शाळेच्या शंभर टक्के निकालाच्या हव्यासापुढं ही चिमुरडी शिकण्यालाच कंटाळत चाललीयेत. हे भयंकर अस्वस्थ करणारं चित्र आहे!

वो भी क्या दिन थे, जब राज ठाकरे 'राजसाब' थे...



आता तीनशे साठ अंशात मत बदललंय. विचार बदललेत. प्रत्येक मुद्द्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय. पण जर तीनशे साठ अंश हे चक्र उलट फिरवलं, तर मी काहीसा वेगळा सापडतो. आताचा मी आणि तेव्हाचा मी, यात चमत्कारिक बदल जाणवतो. मी मुंबईत येणं आणि राज ठाकरेंचा आक्रमक नेता म्हणून उदय होणं, हे समकालीन वगैरे. 2008 ला मुंबईत आलो त्यावेळी कल्याणमध्ये उत्तर भारतीय परीक्षार्थींना मारहाण करत राज ठाकरे नावाचा नेता मराठी माणसांचा नवा हिरो बनत होता. पुढे मराठीच्या नावाने मारझोड करत 'मराठी ह्रदयसम्राट' ही बिरुदावलीही त्यांनी पदरी पाडली. तो काळ खऱ्या अर्थाने राज ठाकरेंचा होता. या ब्लॉगमधील माझा हा फोटो तेव्हाचाच. राज ठाकरेंच्या स्टाईलमध्ये वगैरे काढलेला. वाईट्ट फॅन होतो त्यांचा. कॉलेजच्या या काळातल्या आठवणीही तितक्याच भन्नाट आहेत.


अकरावीला पार्ल्यातल्या डहाणूकर कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतल्यानंतर अगदी काही दिवसातच राज ठाकरे नावाचं वादळ आजूबाजूला घिरट्या घालू लागलं. गावाकडनं आल्याने आधीच थोडा न्यूनगंड मनात होता. त्यामुळे समविचारी आणि सेम परिस्थितीतला कुणी मित्र हवाच होता. तेव्हा अशुतोष चव्हाण भेटला. अशुतोष डाऊन टू अर्थ वाटला. गावाकडून आलोय म्हणून कधी तुसडेपणाने वागला नाही. सांभाळून घेणारा माणूस. त्यामुळे त्याच्याशी चांगली मैत्री झाली. पण आशुतोष राज ठाकरेंचा कट्टर कार्यकर्ता. तितकचा बाळासाहेबांचाही. पण उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेंवर अधिक प्रेम. आशुतोषच्या सोबत राहून मनसेत काही प्रमाणात का होईना अॅक्टिव्ह झालो. माझ्याकडे तेव्हा कॅमेरा फोन नव्हता. पण अशुतोषच्या मोबाईलवर तेव्हा राज ठाकरेंची भाषणं ऐकायचो. इव्हन डहाणूकर कॉलेजमध्ये मनसेची पहिली विद्यार्थी युनियनही आम्ही सुरु केली. त्यासाठी राजगडावर जाऊन तांबोळींना भेटलो. ते तांबोळी आता बहुतेक मुंबई विद्यापीठात सिनेट सदस्य आहेत. कदाचित. तर मनसे, राज ठाकरे वगैरेंच्या नावाखाली फुकटचा माज करायचो. आमच्यासोबत सौरभ नावाचा मित्र होता. त्याच्यासमोर तर राज ठाकरेंना नुसतं 'राज ठाकरे' म्हटलं तरी तो कॉलर पकडायचा. एकदम कट्टर. 'राजसाहेब'च म्हणायचं असा त्याचा आग्रह असायचा. असे ते दिवस होते. राज ठाकरे नावाचं भूत अक्षरश: मानगुटीवर बसलं होतं. रोजच्या पेपरमधले राज ठाकरेंचे फोटो कोरुन वहीत चिटकवणं काय किंवा भाषण लाईव्ह असेल तर कामावरुन लवकर येणं काय... राज ठाकरेंसाठी कुछ भी... पुढे पत्रकारिता शिकण्यासाठी बारावीनंतर डहाणूकर कॉलेजमधून समोरील साठ्ये कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं. तरी काही दिवस डहाणूकरमध्ये येणं-जाणं सुरु असायचं. डहाणूकर आणि साठ्ये ही दोन्ही कॉलेज समोरासमोरच आहेत. पण नंतर नंतर कॉलेज आणि पार्ट टाईम जॉब, यात वेळ मिळेनासा झाला आणि मनसे-बिनसे बंद केलं. विशेष म्हणजे साठ्ये कॉलेजला गेल्यावर पार्ट टाईम जॉब करणं सुरु केलं. तेव्हा पहिला जॉब मालाडच्या लिबर्टी गार्डनजवळील 'तिवारी अँड कं.' या सीए फर्ममध्ये मिळाला. म्हणजेच बॉस उत्तर भारतीय. साला नशीब असं असतंय. कधीकाळी भैय्यांना हव्या तेवढ्या शिव्या द्यायचो आणि गरजेच्या काळात याच तिवारी सरांनी मोठी मदत केली. दरम्यानच्या काळात वाचन वाढलं. नरहर कुरुंदकर, अवचट, मार्क्स वगैरे डोक्यात घुसू लागले. मग राज ठाकरे खूपच बोगस वाटू लागले. हळूहळू राज, मनसे सर्व डोक्यातून साफ निघूनच गेले. उलट भावनिक मुद्द्यावरुन मारहाण वगैरे करण्याचा रागच येऊ लागला. अगदी तीनशे साठ अंशात बदललो. काही महिन्यांपूर्वी कळलं की, ज्या अशुतोषमुळे हे राज ठाकरे नावाचं फॅड डोक्यात घुसलं होतं, तोही मनसे-बिनसेतून बाहेर पडलाय. त्यालाही राज ठाकरेंच्या लक्झरियस पॉलिटिक्सचा कंटाळा आला. तर दुसरीकडे, 'राजसाहेबच' असं बोलण्याचा अट्टाहास करणारा सौरभ नावाचा मित्रही यातून बाहेर पडला. सौरभ मध्यंतरी भेटला, तेव्हा सांगत होता की, हे राजकारण वगैरे आपली ऐपत नाही. ते आपला वापर करतात वगैरे. एकंदरीत सौरभही पार बदललाय. तो पार्ल्यात 'पुरेपूर कोल्हापूर' चालवत होता. आता कुठे असतो माहित नाही. कधीकाळी डहाणूकर कॉलेजमध्ये भारतीय विद्यार्थी सेनेच्या पोरांना आव्हान देत पहिली युनियन आम्ही ज्या मित्रांनी सुरु केली होती, ते सगळेच मित्र राज ठाकरेंच्या विचारांपासून दुरावलेत, हे विशेष. तर राज ठाकरेंना 'राजसाब' म्हणण्याचाही एक काळ होता. हा फोटोही त्याच काळातला. फेसबुकच्या 'आन धीस डे'मुळे हा फोटो पुन्हा समोर आला आणि काही वर्षे मागे गेलो.

07 June, 2017

शेतकरी संपावर दृष्टीक्षेप


लिहावं की नाही आणि लिहावं तर नक्की काय लिहावं, अशा बारीक-सारीक प्रश्नांशी येऊन गेले पाच दिवस थांबतोय. काही मुद्द्यांवर दुमत आहे, तर काही मुद्द्यांवर रोखठोक भूमिका आहे. आणि काही मुद्द्यांना कडाडून विरोधही आहे.

काल-परवा जेव्हा लिहिण्याचा विचार केला, तेव्हाच ठरवलं, सरसकट कोणतीच भूमिका न घेता, त्यावर मुद्देसूद लिहायचं. भले शेतकरी संपाविरोधात गेलं तरी चालेल किंवा सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने एकांगी वगैरे वाटलं तरी चालेल.

खरंतर खूप मुद्दे आहेत. खूप अंग आहेत. तेवढीच मतं-मतांतरंही आहेत. पण आज अमर हबीब सरांची मुलाखत ऐकली आणि काही मुद्दे क्लियर झाले. त्यानंतर म्हटलं यावर थोडं लिहूया. मग येणाऱ्या प्रतिक्रियेवरुन आपण आपल्या मतात तसे बदल करु, जर समोरच्याचं योग्य असेल तर.

आताही लिहितोय, ते बहुधा विस्कळीत असेल. अधे-मधे लिंक तुटेल. पण बघा. शक्य असल्यास पूर्णच वाचा.

मागण्या काय?
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी, या चार प्रमुख मागण्या पुढे करत शेतकऱ्यांनी संपाचं हत्यार उचललं. खरंतर या चारही मागण्यांवर सरकारला किमान ठोस आश्वासन देण्यास पुरेपूर वाव होता. मात्र, शेतकरी संपाला मुख्यमंत्र्यांनी इतकं लाईटली घेतलं की, आता उडालेला भडका त्याच लाईटलीपणाचा आहे.

मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
संपानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री माध्यमांसमोर आले, तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करणं गरजेचं होतं. मात्र, ते म्हणाले, "शेतकऱ्यांच्या संपाआडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव आहे. शेतकरी आणि पोलिसांची झटापट होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडावी, असं त्यांचं नियोजन आहे."

मुख्यमंत्र्यांकडून संपावर प्रश्नचिन्ह
आता मुद्दा असा आहे की, संपामागून कोण बोंबा मारतोय, हे महत्त्वाचं आहे की हजारो-लाखोंचा आवाज महत्त्वाचा आहे? इथेही दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे, मुळात संप शेतकऱ्यांनी सुरु केला. इथे कुठल्याही पक्षाचा झेंडा सुरुवातीला दिसला नाही. आताही दिसत नाही. आता राजकीय पक्ष पाठिंबा देत आहेत, पण झेंडा घेऊन संपात नाहीत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे, संपात काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सहभागी असेल, तर चूक काय? विरोधकांनी शेतकऱ्यांचे मुद्दे उचलून धरले, मग ते उघडपणे असो वा लपून-छपून, काय फरक पडतो? विरोधक शेतकऱ्यांसाठी आक्रमक झालेत, हे चूक आहे का? मुळात मुद्दा असा होता की, शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला राजकीय पक्षांचं लेबल लावणं, ही मुख्यमंत्र्यांनी पहिली मोठी चूक केली. शेतकऱ्यांच्या प्रामाणिक भावनेचा अनादर होता तो.

त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशीही संपाला तितकं गांभिर्याने घेतलं नाही. मात्र, शहराला दुधाची टंचाई भासू लागली, भाज्यांची आवक घटली, तशी संपाची तीव्रता 'वर्षा'वर जाणवू लागली. मग सूत्र हलली. कोण ते नेते, कुठे राहतात, बोलवा वगैरे वगैरे. बहुतेक.

उद्विग्न शेतकरी
इथेही कसंय ना, शहरांच्या पोटाला खळगे पडल्याशिवाय, ग्रामीण भागातील चटक्यांची जाणीव होत नाही, हे दुर्दैवच. शहराच्या नाड्या गावाकडच्या माणसांच्या हातात आहेत, हे गेल्या पाच दिवसात कळलंच असेल. कागदी नोटांची बंडळं असून काही फायदा नसतो, जेव्हा घरात दाना-पाणी नसतो, हे कळलं असेल एव्हाना सर्वांना. नसेल तर कळेल. कारण हा संप सुरुवात आहे. जर ग्रामीण भागाशी असंच वर्तन शासन-प्रशासन आणि शहरांचं राहिलं, तर असे अनेक संप येत्या काळात शेतकऱ्यांच्या उद्वेगात नियोजित आहेत, हे ध्यानात ठेवायला हवं. पोशिंद्याला कमी लेखण्याइतकी मोठी चूक कुणी करु नये. असो.

भाजपाललेले सदाभाऊ
आता थोडं पुढे जाऊया... संपाला मोडीत काढण्यासाठी खरंतर मुख्यमंत्र्यांकडे इसपिकचा एक्का आहे. ते म्हणजे सदाभाऊ. कारण सदाभाऊ हे शेतकरी चळवळीतले नेते आहेत. सार्वजनिक जीवनातील एकूण-एक वर्षे त्यांनी शेतीविषय प्रश्नांवर झगडत घालवली आहेत. त्यांच्यावर कितीही टीका झाली, तरी त्यांनी शेती प्रश्नांची खाच-खळगी आणि काना-कोपरे माहितयेत. त्याचा फायदा खरंतर मुख्यमंत्र्यांना घेता आला असता आणि शेतकऱ्यांना आश्वस्त करता आलं असतं. मात्र, सदाभाऊ आता 'भाजपाललेत'. ते शेतकरी नेते राहिले नाहीत. असंच यावरुन दिसतं. कारण त्यांनाही शेतकरी संपावर नीट तोडगा सूचवता आला नाही. इतकी वर्षे शेती प्रश्नावर झगडूनही हे येऊ नये, हे विशेषच.

पांडुरंग फुंडकर : एक संशोधन
यात एक माणूस आणखी विस्मयचकीत करणारा आहे. तो म्हणजे कृषीमंत्री. पांडरुंग फुंडकर हे कॅरेक्टर सध्या कुठल्या बिलात आहे, तेच कळंना झालंय. फुंडकर म्हणजे खरंच संशोधनाचा विषय आहे. कृषी क्षेत्राशी रिलेटेड विषयांने राज्य ढवळून निघालंय, इतकंच नव्हे या राज्यातील लोण शेजारी मध्य प्रदेशात गेलंय, तरी हे कॅरेक्टर पुढे येत नाही. मला तर कधी कधी वाटतं फुंडकर फक्त कृषी विद्यापीठांचे पदवीदान समारंभ अटेन्ड करणं आणि कृषी प्रदर्शनांची उद्घाटन करण्यासाठीच कृषीमंत्री झालेत की काय... कठीणय कृषी खात्याचं राव!

असो. त्या कृषीमंत्र्यांवर फार बोलण्यात अर्थ नाही. ते तितके महत्त्वाचे नाहीत. मुख्यमंत्रीही त्यांना तितकं महत्त्वं देत नाही. मग आपण का द्यावं? कृषी विद्यापीठांमध्ये तशीही संशोधनाच्या नावाने बोंबाबोंबच आहे. मग काहीतरी उद्योग म्हणून, या कृषीमंत्र्यांवर संशोधन करुन, यांचं नक्की काय चाललंय ते समोर आणा. तेवढंच कृषीविद्यापीठांना संशोधन केल्याचं समाधान मिळेल आणि राज्याचे कृषीमंत्री नक्की काय करतात, तेही कळेल.

नेतृत्त्वहीन तरीही पॉझिटिव्ह
खरंतर मराठा मोर्चासारखंच शेतकरी संपही नेतृत्त्वहीन आहे. एरवी 'नेतृत्त्वहीन' असणं, थोडं निगेटिव्ह वाटतं. पण या शेतकरी संपात ते अगदी पॉझिटिव्ह वाटतं. कारण जनक्षोभ तर वाढत जातोय आणि संप मोडीत काढण्यासाठी कुणाशी चर्चा करायची हेच कळंना झालंय, अशा स्थितीत सरकार आडकलं. हे अडकणं खूप महत्त्वाचं होतं. कारण तरच टाळकं जाग्यावर येतं आणि आपण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी चलढकलपणा केल्याचं हे फळ असल्याचं लक्षात येतं.

स्वयंघोषित शेतकरी नेते
तरी सरकारने स्वत:च शेतकरी संपाचे नेते बनवले, त्यांना चर्चेसाठी रात्रभर बसवलं आणि त्यांच्याच करवी संप संपल्याचे जाहीर केले. पण मुळातच तळातल्या शेतकऱ्याने संप सुरु केल्याने असल्या जयाजी-सूर्याजी वगैरेंना कोण मानणार नव्हतं, हे ओघाने आलंच. झालंही तसंच. जयाजी सूर्यवंशीला माफी मागायला लावून शेतकऱ्यांनी संपाचा निश्चय दृढ केला आणि स्वयंघोषित शेतकरी नेत्यांना घरी बसवलं. शेतकऱ्यांची ही एकजूट खूप महत्त्वाची आहे. आतासाठीच नव्हे, येत्या काळासाठीही.

आशादायी सुकाणू समिती
पुढे सुकाणू समिती वगैरे स्थापन झाली. यात नक्कीच सेन्सिबल माणसं दाखल झालीयेत. त्यामुळे शेतकरी संपाला योग्य दिशा मिळेल, एवढं नक्की. या समितीत शेतकऱ्यांसाठी संसदीय आखाड्यात लढणारीही माणसं आहेत, रस्त्यावर लढणारीही माणसं आहेत आणि वैचारिक व्यासपीठावर माहिती-आकडेवारी मांडत शेतकऱ्यांजी बाजू मांडणारीही माणसं आहेत. त्यामुळे नक्कीच सुकाणू समिती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी आशा वाटते.

आता थोडं आणखी वेगळ्या मुद्द्याकडे येतो. मी या लेखाच्या सुरुवातीला त्या मुद्द्याचा ओघवता उल्लेख केला, तो म्हणजे किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांची भूमिका. अमर हबीब यांची भूमिका मला वैयक्तिकरित्या काही अंशी पटते आणि ती महत्त्वाचीही वाटते.

अमर हबीब यांची भूमिका काय?
शेतकरी संपातील किंवा खासदार राजू शेट्टी यांचीही महत्त्वाची मागणी आहे, ती म्हणजे, 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.' यावर अमर हबीब यांनी अत्यंत व्हॅलिड पॉईंट मांडलेत. त्यांच्या मते, "या देशात कर्मचाऱ्यांच्या जमिनी आहेत, व्यापाऱ्यांच्या जमिनी आहेत, इनकम टॅक्स भरणाऱ्यांच्या जमिनी आहेत, त्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी माझ्या मुलांनी मार खावा, असं मला अजिबात वाटत नाही. सातबारा कोरा करण्याबाबतच्या मागणीत अधिक स्पष्टता हवी. ज्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे, त्यांचंच कर्ज माफ करा, दुसऱ्यांचं कर्ज माफ करण्याची गरज नाही. दुसऱ्यांचं कर्ज माफ करणं म्हणजे सरकारी तिजोरीवर दरोडा घालणं आहे."

मला सातबारा कोरा करण्याला विरोध करताना अमर हबीब यांनी मांडलेले हे मुद्दे अत्यंत व्हॅलिड वाटतात. शिवाय, यावेळी त्यांनी सिलिंग, आवश्यक वस्तू आणि जमीन अधिग्रहण, हे तीन शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची मागणी केलीय. शेतकऱ्यांचे बहुतांश प्रश्न अशा कायद्यांमुळे आणि शासन-प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळेच वाढत चालले आहेत.

असो.

आणि हो, वर एक मुद्दा राहिलाच. तो म्हणजे दूध, भाजीपाल्याची नासाडी. यावरुन अनेकजणांनी शेतकऱ्यांवर टीका वगैरे केली. काहींनी सेल्फी काढणाऱ्यांचे फोटो पोस्ट करुन संपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सर्वांना बांधून मुसळाने बडवलं पाहिजे.

दगडावर लाखो लिटर दूध वाया घालवता, त्यावेळी नासाडी आठवत नाही. बरं तेही जाऊद्या. तिथं श्रद्धेचा वगैरे मुद्दा आहे. ते मान्य करु. पण भाव मिळाला नाही म्हणून शेतकऱ्याची उत्पादन जागच्या जागी कुसून जातं, त्यावेळी कळवळा होत नाही. त्यावेळी तथाकथित नासाडी वगैरे आठवणार नाही. आताच बरं आठवते. डोळ्यांदेखत कित्येक धान्य सडून-कुसून गेलेलं पाहिलेल्या शेतकऱ्याला आपणच पिकवलेलं धान्य रस्त्यावर टाकून देताना दु:ख होत नसेल असं वाटतंय का?... पण दु:ख करण्यापलिकडे गेलंय सारं. आर नाही तर पार... जाईल एका वर्षाचं. पण पुढचं भविष्य तर सुकर होईल, ही त्यामागे भावना आहे. हा लढा त्यासाठीच आहे.

शेवटी एकच.

पोशिंदा जगला पाहिजे. तुमचा-आमचा किंवा केवळ देशाचाच नव्हे, तर अवघ्या जागाचा. कारण तुम्ही-आम्ही कागदी नोटा किंवा सोन्याची नाणी, स्मार्टफोन किंवा सॉफ्टवेअर-हार्डवेअर खाऊन जगू शकणार नाहीत. पोटाची भूक भागवणारा तोच आहे. जो लढतोय. रडतोय. त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. त्याला आधार दिलाच पाहिजे. या पोशिंद्याच्या बाजूनेच कायम राहिलं पाहिजे. भले एकांगी का होईना. जगवणाऱ्याच्या बाजूने ठामपणे उभं राहिलं पाहिजे.

सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...