20 March, 2017

संघर्ष जारी रहेगा !

(दिवसभर अन्नत्याग केल्यानंतर संध्याकाळी मुंबईतील मनोरा आमदार निवाससमोरील हिरवळीवर उपोषण सोडलं.)


शेताच्या बांधावर घाम गाळून त्याच मातीत गुडूप झालेला बाप आणि सालभर राब राब राबून पिकाला भाव मिळत नाही म्हणून उजाड माथ्याने आसवं गाळत शेताच्या बांधावर धैर्य एकवटत कणखर बनू पाहणारी माय....तुमच्यासाठी होता कालचा दिवस.

मातीत झिजलेल्या अन् घामाने भिजलेल्या हर एका पोशिंद्यासाठी काल एक दिवस अन्नत्याग केला. १९ मार्च निमित्त ठरलं, सहवेदना आणि तळमळ दिस-रात असतेच. शेवटी जगवतोय तो मला. झगमगाटी मुंबईत चेहरा लखाखती राहत असला, तरी काळजाला चिटकलेली माती आजन्म तशीच राहील.
(मुंबईतील उपोषणात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा मित्र ब्रम्हा चट्टे ज्यूस पित उपोषण सोडताना. गालाला हात टेकून ब्रम्हाकडे पाहणारा कृष्णा वर्पे आणि काळ्या कुर्त्यावर मी स्वत:)

दिवसभर उपाशीपोटी काम करत उपोषणात सहभाग घेतला. यातून काय साध्य झालं, हा मुद्दा नाही. मनात खदखद आहे, ती जिवंत आहे ना, हे चाचपडून पाहिलं. बस्स. वेळीच लक्ष घाला राजेहो, खदखद फार तग धरुन ठेवता येत नाही. आमचा बा शेतकरी जगला पाहिजे राजेहो.
(मुंबईतील किसानपुत्र)

एका दिवसाच्या अन्नत्यागाने कितीसा फरक पडेल, माहित नाही. पण दिवसातल्या प्रत्येक क्षणाने जी खदखद वाढवलीय, तिच्याने नक्कीच फरक पडेल, एवढं निश्चित.

दिवसभर काम करता करता केलेल्या उपोषणानंतर मनोरा आमदार निवासासमोरील हिरवळीच्या साक्षीने उपोषण सोडलं. समविचारी समवीयन आणि ज्येष्ठांच्या सोबतीने. मुंबईतील किसानपुत्रांनीही अमर हबीब सरांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत पुढाकार घेतला. आणखी सहभाग अपेक्षित होता. पण ठीकंय. निराशावादी सहभाग नक्कीच नव्हता. चित्र आशादायी आहे. संघर्ष जारी रहेगा !

12 March, 2017

केजरीवालांनी ‘करुन दाखवलं’ !



शिक्षण क्षेत्रात अधिक काम करण्याची गरज आहे वगैरे नेहमीच चर्चेचा विषय असतो. मग चर्चा अर्थात सरकारच्या ध्येय-धोरणांपर्यंत येऊन ठेपते. मग सुरु होते पुढील चर्चा, ती म्हणजे सरकारने बजेटमध्ये शिक्षणावर किती खर्च केला वगैरे. आणि अर्थात समोर येतं, सरकारने शिक्षणावर बजेटमधील नाममात्र भाग खर्च केलाय. मग टीका, सूचना, सल्ले वगैरे रांगेत असतातच.

शिक्षणावर अधिक खर्च होण्याची गरज आहे, हे खरंय. ते सरकारला का कळत नाही, हा नक्कीच कळीचा मुद्दा आहे. पण ज्यांना कळलाय, त्याची वाहवा तरी कुठे होतेय? पाहा ना अरविंद केजरीवाल यांच्यावर दिवस-रात्र आपली तोफ डागणारे आज गप्प आहेत. कारण सकारात्मक गोष्टींवर न बोलता, केवळ टीकेसाठी मुद्दे शोधली जातात.

केजरीवालांनी असं काय केलंय, ज्यामुळे त्यांची वाहवा करण्याची गरज आहे? तर त्यांनी नक्कीच अत्यंत मोठं आणि स्तुत्य असं पाऊल उचललं आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने दिल्लीचा 2017-18 चा बजेट सादर केला. मनीष सिसोदियांनी मांडलेला हा बजेट एकूण 48 हजार कोटींचा आहे. विशेष म्हणजे, केजरीवाल सरकारने 48 हजार कोटींपैकी 24 टक्के भाग म्हणजे सुमारे 11 हजार 300 कोटी रुपये फक्त आणि फक्त शिक्षण क्षेत्रावर खर्च करण्याचं ठरवलंय. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी खऱ्या अर्थाने करुन दाखवलंआहे.

शिक्षण क्षेत्रातील विविध योजना, शाळेची कामं, अनुदान इत्यादींसाठी हा खर्च असणाराय. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसोबतच आता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिलं जाणाराय. हे एकच नव्हे. यातील अत्यंत स्तुत्य काय असेल, तर संगणक कक्ष आणि ग्रंथालयांची संख्या वाढवली जाणार आहे आणि त्यासाठीच अधिक खर्च असेल. सोबत, शाळेतील खोल्यांची संख्या वाढवणं वगैरे आणखी गोष्टी आहेतच.

यात आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, केजरीवालांनी बजेटीमधील शिक्षणावरील तरतूद तीन वर्षे वाढवतच नेली आहे. केजरीवाल सरकारच्या पहिल्या बजेटमध्ये शिक्षणावर 9,836 कोटी रुपये खर्च, दुसऱ्या बजेटमध्ये 10,690 कोटी रुपये खर्च करण्यात आला, तर तिसऱ्या बजेटमध्ये म्हणजे आताच्या बजेटमध्ये 11,300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांकडे सरकारने गांभिर्याने पाहायला हवं. या क्षेत्रात अत्यंत सचोटीने काम करायला हवं वगैरे बोललं जातं. विशेष म्हणजे सरकारी पातळीवरही असं बोललं जातं. मात्र, प्रत्यक्षात काहीही दिसत नाही. केजरीवालांनी ते प्रत्यक्षात करुन दाखवलंय, हे विशेष.

तळागाळात काम केलेल्या, सामाजिक जाणीव असलेल्या या रॅमन मॅगसेसेपुरस्कार विजेत्या माणसाकडून अशाप्रकारचं काम नक्कीच अपेक्षित होतं. कितीही टीका होवो, वेगवेगळे प्रयोग हा माणूस आपल्या राज्यात राबवत आहे. अनेकदा त्यांना जाणीवपूर्वक ट्रोल केलं जातं, पण त्याकडे दुर्लक्ष करुन आपलं काम सुरुच ठेवत आहेत, हे विशेष.


सर्वाधिक वाचलेली पोस्ट

बापाने आत्महत्या केली तो दिवस!

आजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...